Waki (वाकी)

वाकी, ता. आष्टी, जि. बीड.


येथील 10 स्थाने - वाकी गावाच्या पश्चिम विभागी सीना नदीच्या पूर्व काठावर मंदिरात व मंदिर परिसरात आहेत. (स्थाने विखुरलेली असल्याने व्यवस्थित चौकशी करुन करावी लागतात, नाहीतर स्थाने सुटतात)


जाण्याचा मार्ग :

वाकी हे गाव, मिरजगाव आष्टी मार्गावर मिरजगावहून ईशान्येस 3 कि. मी. आहे व आष्टीहून नैर्ऋत्येस 14 कि. मी. आहे. वाकी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. वाकीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात एकदा व उत्तरार्ध काळात दोन वेळा असे एकूण तीन वेळा वाकी येथे आले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील 10 स्थान एकाच मंदिर व परिसरात आहेत.)

1. अवस्थान स्थान :

हे स्थान वाकी गावाच्या पश्चिम विभागी सीना नदीच्या पूर्व काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी या मढाचे नाव ‘नारायण’ मढ असे होते. या स्थानाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूचे खांब व देवळाच्या दारसंका नमस्कारी आहेत.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात शिराळ्याहून वाकीला आले त्या वेळी त्यांचे या ठिकाणी एक महिना वास्तव्य होते. (पू. ली. 346, स्था. पो.) व उत्तरार्धात मढपिंपरीहन वाकीला आले. त्यावेळी त्यांचे येथे तीन दिवस वास्तव्य होते. (उ. ली. 270, स्था. पो.) त्यानंतर पारगावला वस्ती झाली. दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ पुन्हा पारगावहन येथे आले, या ठिकाणी दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. मग थोडी विश्रांती घेऊन सर्वज्ञ येथून मिरजगावला गेले. (उ.ली. 272) पूर्वार्धातीलही एक महिन्याच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून मिरजगावला गेले. दाको नावाच्या भक्ताची व सर्वज्ञांची प्रथम भेट येथेच झाली. (पू. ली. 156, तु. प्र)


2. आसन स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या वायव्येस आहे.

लीळा : दुसऱ्यास हीन लेखून स्वत:स श्रेष्ठ समजणाऱ्या एका जोग्याचा सर्वज्ञांनी, नाथोबास स्थिती देऊन पराभव केला. (उ.ली. 270, स्था.पो.)


3. पटीशाळेवरील आसन स्थान :

हे स्थान देवळाच्या उत्तर-दक्षिण, पूर्वाभिमुख पटीशाळेत दरवाजाच्या दक्षिण बाजूस आहे. या स्थानाच्या पूर्व बाजूचा खांब नमस्कारी आहे.

लीळा : 1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंना येथे नेहमी आसन होत असे (स्था.पो.)

2) जोगनायका विज्ञापनी पदुमनाभी पाठवणी (पू. ली. 348)


4. चोर कुमति हरणे स्थान :

हे स्थान पटीशाळेतील आसन स्थानापासून पूर्वेस 13 फूट अंतरावर आहे.

लीळा : एके दिवशी रात्रीच्या वेळेस चोर आले. त्यावेळी सर्वज्ञ पटीशाळेवर बसलेले होते. भक्तजन सर्वज्ञांना म्हणाले, “जी जी कोणीतरी , माणसे आली !” सर्वज्ञ म्हणाले, “तुम्ही भिऊ नका, मढामध्ये जा.” मग सर्वज्ञ अंगणामध्ये येऊन उभे राहिले. तेवढ्यात चोर जवळ आले ते सर्वज्ञांना म्हणाले, “आम्ही तुम्हाला उपद्रव देण्यासाठी आलो आहोत.” सर्वज्ञ त्यांना म्हणाले, “आम्ही भिक्षु महात्मे आहोत. आमच्याजवळ एक-दोन वस्त्रे आहेत, ते तुम्ही घेऊन जा. आम्हाला आणखी कोणीही देईल.’ सर्वज्ञांचे शब्द ऐकन चोर म्हणाले. “हे तुम्हालाच अस द्या.” मग सर्वज्ञांना नमस्कार करून ते निघून गेले. अशा प्रकारे सर्वज्ञांनी त्यांची वाईट बुद्धी हरण केली.


5. मादने स्थान :

हे स्थान चोर कुमति हरणे स्थानापासून पूर्वेस 12 फूट 5 इंच अंतरावर आहे. (स्था. पो.)


6. लघु परिश्रय स्थान :

हे स्थान देवळापासून उत्तरेस 14 फूट 8 इंच अंतरावर वांकेश्वराच्या देवळाच्या दक्षिण भिंतीला लागून दक्षिणाभिमुख देवळात आहे. (स्था. पो.)


7. आसन स्थान :

हे स्थान देवळाच्या ईशान्येस व दीपमाळेच्या वायव्येस चौथऱ्यावर दक्षिणाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे जोगेश्वरीचे देऊळ होते. त्या देवळाच्या पटीशाळेवरील हे स्थान होय. (स्था. पो.)


8. आसन स्थान :

हे स्थान वांकेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळात नंदीच्या दक्षिण बाजूस (डाव्या बाजूस) दोन खांबांमध्ये आहे (स्था. पो.)


9. आसन स्थान :

हे स्थान वांकेश्वराच्या देवळाच्या पाठीमागे तरटीच्या झाडाखाली आहे. (स्था.पो.)


10. आसन स्थान :

हे स्थान वांकेश्वराच्या देवळाच्या वायव्येस सीना नदीच्या पूर्व काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पिंपळाचे झाड होते. त्या झाडाखालील. हे स्थान होय. (स्था. पो.)


देवळाच्या दक्षिणेस पाण्याच्या नळासमोरील महाद्वार स्थान नावाने ओळखले जाणारे स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) गावाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान


वाकीची एकूण स्थाने : 11


  • Purvardha Charitra Lila – 346
  • Waki : वांकीए मढीं अवस्थान :।।:
  • गोसावी वांकीए बिजें केलें: गावांतु पूर्वाभिमुख नारायेणाचां मढु तेथ अवस्थान जालें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि मिरी-पींपळगाव(केळ)-मढपिंपरी असा मार्ग क्रमण करित वांकी येथे आले. यावेळी स्वामींचे येथे अवस्थान झाले…)
  • Purvardha Charitra Lila – 347
  • Waki : चोरकुमति हरणे :।।:
  • गोसावियांसि विळीचां वेळीं मढाचियें पटिशाळें आसन जालें: तो गाउ वोसुः तें चोराचें स्थानः विळीचां चोर आलेः भक्तिजनें रातांजनां भिक्षे गेली होतीः तियें आलीं: तिहीं झाडांतु वाकाणीं चोर देखिलें: मग येतखेवींचि गोसावियांपुढां सांघितलें: ‘‘जी झाडांतु माणुसें देखिली जीः’’ तवं चोर जगतिभितरीं आलें: पुढां उभे राहिलें: भक्तिजनीं तथा बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः चोर बाबाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः भीा ना भितरीं जाः’’ गोसावी आंगणां बीजें केलें: तेथ उभे जालें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मे हो याः’’ तवं चोरीं नमस्कार करौनि म्हणितलें: ‘‘जी जीः आलो जीः परि ओखटेनि आलोः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं महात्मे कीं गाः तुम्हीं यां ओखटे कां होआवे? आणि उपद्रवु कां कराल? कां गा महात्मे होः’’ चोरी म्हणितलें: ‘‘चोरासि काइ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ओखटे होउनि आलेतिः मां जें होउनि आलें तें कां करा नाः फाळुकीं दोनि एकें असति तियें तुम्हीं नेयाः मां हें भिक्षु महात्मेः यांसि आणिक कव्हणीं देइलः’’ एतुलेनि तयाचि कुमति हरलीः चोरीं म्हणितलें: ‘‘ना जीः तैसें काही नाहीः ये गोसावीचि नेसावेः गोसावीचि पांगुरावेः परि हें रानः जी हें गोसावियांजोगें स्थान नव्हेः हें येतेजातेया चोराचें खांगे जीः गोसावी एथ नसावेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ काइ असे? मां काइसेया नसावें? तैसें काही असें तरि कां गा ऐसां स्थानीं असिजेलः तैसें एथ काही नाहीः’’ चोरीं म्हणितलें: ‘‘ऐसें जीः तरि सुखें राज्य किजो जीः’’ म्हणौनि जोहार केलाः मग तें निगालेः ऐसीं गोसावी तयाची कुमति हरीलीं :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात रामदरा येथे २० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मात्रकौळि-आष्टी-पारेगाव-शिराळ्यावरुण वाकिला आले. स्वामीचे वाकि येथे १ महिना वास्तव्य(अवस्थान) होते. तेव्हांच्या ह्या लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 348
  • Waki : जोगनायका विज्ञापनिं पदुमनाभी पाठवणीं देणें :।।:
  • जोगनायक तें पदुमनाभीदेवांचे श्रेष्ठ भाउः पदुमनाभी तें गृह सांडुनि सन्निधानीं असतिः म्हणौनि एकु दीं तें थोरे आवेसे पालाणौनि पदुमनाभीतें नेयावेया वांकियेसी निगालें: पाइक परिवार बहुतः चांग निवडीलें: तयातें म्हणितलें: ‘‘तुम्ही पुढां जावेः श्रीचांगदेवोराऊळासि ऐसोनि ऐसें करावें: आणि पदुमनाभीतें आणावें: तवं मीं येत असेः’’ म्हणौनि पाइक खांडीवोडणीयें पुढां पाठविलेः आपण मागीलाकडौनि निगालाः गोसावियांसि दुपाहारीचां पूजावसरू जालेंयानंतरें आरोगणा जालीः पहूड जालाः उपहूड जालाः पटिशाळें आसनीं उपविष्ट असतिः विळीचां भक्तिजनें भिक्षा करौनि आलीः भक्तिजनीं म्हणितलें: ‘‘जी जीः पाठक आलें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भियानाः याचां भाउ यातें नेयावेया येतु असेः’’ तवं तें पाइक पुढां आलें: गोसावियांतें देखिलें आणि तयाचि कुमति गेलीः आणि म्हणितलें: ‘‘ऐया रेः गोसावी साक्षात मल्लीनाथुः ऐयाः ऐयाः: गोसावी साक्षात सिध्दनाथुः’’ मग ‘जोहाः देवा जोहारूः’ करौनि दंडवते करूं करूं पुढें वोडणें घालुनि वरि हातिएर ठेउठेउ मांडखुटी घालौनि भवंताले बैसलेः ‘‘ऐयाः साक्षात पूजिते लिंग मां: कैसा तो पापियाः दुराचारें पापिये लिंगभेदु करविला गाः ब्राम्हणु नव्हेः हा मातंगु गाः आम्ही बहुती धुरा देखिलीयाः परि ऐसीं धूर आम्ही कव्हणी ठाइं नाहीं देखिलीः’’ तवं तेयांसि उसीरू लागला म्हणौनि जोगनायक आलें: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: जवळी बैसलें: ओखटे करूं आला तें असत्कर्माची कुमति हरीलीः गोसावी क्षेम पुसिलें: जोगनायकें म्हणितलें: ‘‘जी जीः पदुमनाभीतें पाठवावेः याची माता या कारणें रात्रंदीसु थोर रडतचि असें: अन्नोदके नेघेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हा एथौनि बोलाविला?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि काइ एथचा कोण्ही बोलाविला?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि एथ याची काइ चाड पडिली असें? काइ एथौनि यातें राहाविले असेः न्या ना कां आपुला पदुमनाभीः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘ना जीः गोसावियांपासी असें म्हणौनि गोसावियांतेचि म्हणावे आणि काइः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जा गा पदुमनाभीः’’ पदुमनाभीदेवीं म्हणितलें: ‘‘हा मातें नेइल कैसा? ऐसें याचें बळ पाहो याः’’ जोगनायकें म्हणितलें: ‘‘पदुमनाभी चालः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना मीं न येः’’ जोगनायकें म्हणितलें: ‘‘कैसा न येसीः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘आतां पाहो पां याचें बळः मातें बांधौनि नेइल?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः आतांचां तवं जा पां: एथौनि तुमतें पाठवीजत असिजेः मग मागौते याः’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि दंडवत करौनि निगाले :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात रामदरा येथे २० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मात्रकौळि-आष्टी-पारेगाव-शिराळ्यावरुण वाकिला आले. स्वामीचे वाकि येथे १ महिना वास्तव्य(अवस्थान) होते. तेव्हांच्या ह्या लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 349
  • Waki : उपासनियां स्तीति :।।:
  • उपासनीए तें सदा स्तीतिमंतचिः एकु दिसीं उपासनिया स्तीति जालीः गोसावी तयातें भिक्षेसि पाठविलें: तें स्तीतिसीं रातांजना भिक्षें गेलेः एकाची वाठी उचलौनि घेउनि आलेः म्हातारी एकाचीए चुलीवरील रांधनें सेंदुर ऐसें तापलें होतें: तें हातीं घेउनि आलेः बाहीरि घातलें: एकीं म्हातारी बाइको करडै भाजीत होतीः तें करडभाजणे हातीं घेउनि कुंपावरि घातलेः तो कुंप धडधड जळीनलाः एकांचें मुसळ हिरौनि खांदीं घालुनि नागिवेचि भिक्षा करीतेः मागुते एकु दीं भिक्षेसि गेलेः तो पाखालेचां खुलिगा चहुं पाइं धरूनि उचलौनि खांदावरि घातलाः तैसेचि भिक्षा केलीः एके गावीं लोकें भेण वेसी घातलीं होतिः तें वेसी दहाबारा दादुलेयां उचलेनां: तेहीं तें वेसी मोडुनी उचलुनि एरी वाही घातलीं: नागिवे देखौनि बाइला भीतीः भेणें दादुले बाइला लपवीतिः थाळा सुनि भिक्षा घालीतिः लोकां आश्चर्य जालें: लोक भेवो लागलें: लोकु आपणालेया कथा करीतिः एक म्हणतिः हें श्रीचांगदेवराऊळांचे पीशाचः’’ कोणी म्हणें: ‘‘गावां पांडवें आलें असतिः गोसावियांतें धर्मु म्हणतिः बाइसातें ‘कोंती’ म्हणतिः उपासनियातें म्हणतिः ‘‘हे एव्हडे अतुळ बळः तरि हा ‘भीउं’ होएः’’ उपाध्यातें ‘अर्जुन’ म्हणतिः दायंबातें ‘नकुलु’ म्हणतिः नाथोबातें ‘सहदेवो’ म्हणतिः देमाइसातें ‘दृपदी’ म्हणतिः ‘वांकियेसि पांडव आले’ म्हणतिः ‘‘आरेः कळीसि पांडव अवतरलेः’’ ऐसिया अनेका परिचियां सामर्थ्यरूपा कथा करीतिः ऐसीं सात दिस स्तीति होतिः मग भंगलीः गोसावी तेथौनि बीजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात रामदरा येथे २० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मात्रकौळि-आष्टी-पारेगाव-शिराळ्यावरुण वाकिला आले. स्वामीचे वाकि येथे १ महिना वास्तव्य(अवस्थान) होते. तेव्हांच्या ह्या लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Waki : दाको भेटि :।।:
  • एकु दीं दाको गोसावियांचिया दरीसना आलाः गोसावियांसि भेटि जालीः दंडवते घातलीः श्रीचरणां लागलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बैसाः’’ तो बैसलाः गोसावी आश्वासन केलें: बाइसाकरवी जेउ घालविलेः विडा देवविलाः मग तेणें विनविलें: ‘‘जी मीं जाइनः’’ मग पाठवणी जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात रामदरा येथे २० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मात्रकौळि-आष्टी-पारेगाव-शिराळ्यावरुण वाकिला आले. स्वामीचे वाकि येथे १ महिना वास्तव्य(अवस्थान) होते. तेव्हांच्या ह्या लीळा…)
  • Utarardha Charitra Lila – 270
  • Waki : वांकीए मढीं वस्ति :।।:
  • एरी दीं उदेयाचां पूजावसरु जालेंयानंतरें गोसावी वांकीएसि बिजें केलें: मढीं दुपाहारीचां पूजावसर जालाः आरोगणा जालीः पहूड जालाः उपहूड जालाः वस्ति जालीः भिक्षा अवसरीं गोसावी मिरडेया बिजें केलें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि मिरी-पींपळगाव(केळ)-मढपिंपरी असा मार्ग क्रमण करित वांकी येथे आले. यावेळी स्वामींचे येथे अवस्थान झाले…)
  • Utarardha Charitra Lila – 270
  • Waki : मंडळीका स्तीतिः हटविवादें जोगीया पराजयो करणें :।।:
  • एकु दीं उदेयाचां पूजावसर जालेंयानंतरें गोसावियांसि मढामागें आसन असेः पासी नाथोबा असतिः तवं नाथपंथी जोगी महात्मा एकु आपणेयांतें सिद्ध म्हणवीः महालक्ष्मीयेसि होताः तो गोसावियांपासी आलाः पासी बैसलाः नाथोबातें म्हणितलें: ‘‘हे काइ हटु जाणति?’’ नाथोबा नाइकतेया भाषा उगेचिः तथा गोसावियांतें पुसिलें: ‘‘तरि आपण काही जोगु जाणिजे?’’ गोसावी श्रीमुगुटें निराकरिलें: मग तेणें म्हणितलें: ‘‘हटें पींडुः पिंडें प्राप्तिः जोगु नाहीं: जुगुती नाहीं: जोगवटा नाहीं: ध्यान नाहीं: धारण नाहीं: लए नाहीं: लक्ष नाहीं: आसन नाहीं: समादी नाहीं: जोगु नासलाः जोग भांडाविलाः जोगाचें पार कोण्हीं नेणें: जोगु गहनुः हें अवघे चेंदेपाइकः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मग मग गा मंडळीकाः जोगीया काइ म्हणतु असेः’’ आणि नाथोबासि स्तीति जालीः ‘‘ये रे जोगीयाः आसनें घालूं:’’ म्हणौनि नाथोबा आसनें घालूं लागलेः तें तो सोयेही नेणेः नाथोबाए चैधंसि आसनें घातलीं: मग तेणें म्हणितलें: ‘‘हें साधन म्हणाः ए डोहीं देवता असेः धवळा बैलु असेः घाणा असेः देवता घाणा तापटीत असें: ए डोहीं पव्हेः तों महात्माः’’ नाथोबायें म्हणितलें: ‘‘हा रेः तूं म्हणसि ए डोही देवता असेः धवळा बैलु असेः घाणा असेः देवता घाणा तापटीत असें:? उठी रे जोगीयाः दाखवीः’’ म्हणौनि पायीं धरुनि नाथोबायें फरफरां काढिलाः डोहापासी नेलाः तो ‘‘वरिजो जीः वरिजो जीः’’ म्हणौनि काकुलती आलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘सोडा गा मंडळीकाः’’ मग नाथोबायें डोहांतु उडी घातलीं: पव्हिनलेः नाथोबासीं म्हणितलें: ‘‘एथ कें आहे रे जोगीया देवता? कें आहे रे पांढरा बैलु? कें आहे रे घाणा?’’ म्हणौनि बुडीया देतिः वाळु काढीतिः अवघा डोहो डहुळिलाः नाथोबासीं म्हणितलें: ‘‘एथ काही नाहीं रे जोगीयाः तू लटिकाः तुझा गुरु लटिकाः’’ आणि हातावरि पाणी हाणीतिः तळील वाळुही वरीं येः ऐसा डोहो डहुळुनि निगालें: जोगी भियालाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मंडळीका याः’’ मग आलेः तो जोगी भुइ रेघा काढीतु राहिलाः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्माः ऐसें न म्हणिजे हो बहुरत्णा वसुंधराः’’ मग गोसावी मढासि बीजें केलें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि मिरी-पींपळगाव(केळ)-मढपिंपरी असा मार्ग क्रमण करित वांकी येथे आले. यावेळी स्वामींचे येथे अवस्थान झाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: