Wadwali (वडवाळी)

वडवाळी, ता. पैठण, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान वडवाडी गावाच्या पश्चिमेकडे 1 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर टेकाडावर आहे.


जाण्याचा मार्ग :

वडवाळी हे गाव, पैठण-शहागड मार्गावर पैठणहून पूर्वेस 6 कि.मी. आहे व शहाडहून वायव्येस 35 कि.मी. आहे. वडवाळीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. पैठण शहागड मार्गावरील वडवाळी गावाजवळील ओढ्याच्या पश्चिमेस दीड फर्लाग अंतरावर रस्त्याच्या दक्षिण बाजूस स्थानाकडे जाण्याचा रस्ता आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान वडवाळी गावाच्या पश्चिमेस एक फर्लाग अंतरावर ओढ्याच्या पश्चिम काठी व गोदावरी नदीच्या उत्तर काठी टेकडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे बागेश्वराची देऊळी होती. हे स्थान पूर्वार्धातील होय.

लीळा : सकाळचा पूजावसर झाल्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू मायगावहून वडवाळीला आले. गावाच्या दक्षिण वेशीच्या पूर्वेच्या लिंबाजवळ त्यांनी अवधूतांस भिक्षा करून येण्यास सांगितले. त्यानंतर ते येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. सर्वज्ञ इंद्रभटांना म्हणाले, “अवधूत भिक्षा करून येईल, तरी तुम्ही आपले नित्यकर्म, संध्या वगैरे करून या. मग इंद्रभट गंगेवर गेले. (पू. ली. 571, स्था.पो.)

सर्वज्ञ येथून पैठणला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) लिंबापाशी चरणचारी उभे राहणे स्थान.

2) घाटी आसन स्थान.

3) गावाच्या उत्तरेचे मळ्यातील पूजा आरोगणा स्थान.


मार्गीची अनुपलब्ध स्थान :

1) मार्गी गोपाळ भोजन दाखविणे स्थान.

2) पव्हे आसन स्थान.


वडवाळीची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila –
  • Vadwadi : मार्गी गोपाळभोजन दाखवणें: पव्हे आसन :।।:
  • मार्गी बिजें करितां गोसावी एक सेत पातलेः अपार कुसंबी तिखी ऐसें सेत देखिलें: तेथ चणा होताः गोसावी तयातें अवलोकिलें: आणि म्हणितलें: ‘‘बाइः एथ आसन घालाः मां एथौनि तुम्हांसि गोपाळभोजन दाखविजैलः हें पूर्वि गोपाळांतु होतें: कोवळी कुसंबी तिखी चणेनि घोळुनि आणाः’’ बाइसीं आसन घातलें: गोसावियांसी सेतीं आसन जालें: भक्तिजनीं घोळुनि आणिलाः गोसावियांसि एकी मांडखुंटीये आसन जालें: एकु श्रीचरणु उकडु पुढा केलाः डावीयें श्रीकरीं कालाः उजविये श्रीकरिचियां आंगुळीयांचिये संदी कुसंबिये तिखीयेचे ढेंसे धरिलें: आंगुठेनि घासु घेतिः तैसाचि तिखियेचा घांसु घेतिः आणि गोपाळांचेनि अनुकारें चार्‍ही दिसा पाहातिः गोपाळाचेया ऐसें घासु घेतीः मागौते चार्‍ही दिसा ढोराकडें पाहाणें: ऐसें गोपाळासारिखे अनुकार करौनि भक्तिजनां दाखवीतिः ऐसीं गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः गोसावी तेथौनि बिजें केलें: पुढीली मार्गीचिये पव्हे चौबारा नावेक आसन जालें: तेथ चरणक्षाळण जालें: गुळळा जालाः विडा जालाः मग बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. परत स्वामीं पांचाळेश्वर-बळेगाव-हिरडपूरी-नवगाव-मायगांवलावरुण वडवाळीला आले तेव्हाची ही लीळा. पूढे स्वामीं पैठणकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Vadwadi : वडवाळीये अवधूताचें भिक्षान्न आरोगणें :।।: / वडवाळीये अवधूताकरवि भिक्षा करवणें :।।:
  • गोसावी तियें दिसीं वडवाळीयेसि बिजें केलें: अग्निष्टीकें नावेंक आसन जालें: मग बहीरवांचां धाबां वस्ति जालीः वडवाळीये ऐलीकडें गावांपूर्वे निंबापासी आग्ने चरणचारी उभे राहिलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘अवधूताः मढियेची खापरि नगरीं भिक्षा कां किजेना? मग इंद्रभटातें म्हणितलें: ‘‘इंद्रेयाः तुम्ही काइ कराल? अवधूत भिक्षा करौनि येइलः तें तुम्हीं जेवाल गा?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः गोसावी काइ करीति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे जेविलः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी तरि आम्हीं गोसावियांचा प्रसादु घेउनिः’’ मग अवधूतातें गोसावी श्रीकरीचेनि अनुकारें दाखवित म्हणितलें: ‘‘अवधूताः साळेसि जाः आवांचें पात्र घेयाः नगरामध्यें ऐसीं वाटोळी भिक्षा कराः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो जीः’’ गोसावी नावेक पुढारें बिजें केलें: आणि मागौते म्हणितलें: ‘‘अवधूताः बाम्हण बाम्हण असतिः बाम्हणिये बहुत असतिः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः तें मीं जाणत असें:’’ मग तैसेचि तें भिक्षें गेलेः आपुलें आवरण केलें: मढीयेचें पात्र घेतलें: आणि नगरामध्यें भिक्षा करूं रीगालेः तवं गोसावी मळेयासि बिजें केलें: मळां आसन जालें: तवं अवधूत भिक्षा करौनि येतां देखिलेः आणि गोसावी गंगेचीए थडीए बिजें केलें: गंगेआंतु ओताऐलाडी दंउळीयेपासी इंद्रभटांतें भिक्षान्नाचिया हेतु म्हणितलें: ‘‘इंद्रेयाः अवधूताचें भिक्षान्न पातलें: तरि आपुली उगमुग कां सारानाः आपुली इटीमिटी सारूनी याः’’ तैसेचि तें गंगेसि गेलेः आपली इटीमिटी सारूनि आलेः संगमापैलीकडें देउळ होतें: पूर्वाभिमुख अग्निष्टीकाः तेथ गोसावियांसि दुपाहाराचा पूजावसर जालाः तवं अवधूत भिक्षा करौनि आलेः गोसावियांपुढें पात्र ठेविलेः तयासि भिक्षेसि आंबिलः भातुः दिवसीं: भाकरीः तुरीः लोणसणें: साकवतियाः ऐसें आलें होतें: तें गोसावी अवलोकिलें: मग म्हणितलें: ‘‘अवधूताः एक चुकलेति गाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी तें काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ना मीठ असे?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना जीः मीं मागों विसरला जीः आतां आणूं जाइन?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तें तेव्हेळीसीचि मागिजे कीं:’’ बाइसीं पदार्थ निवडूं आदरिलें: तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः कोरूके नको निवडूं: कालवाः’’ मग बाइसीं बहिर्वासावरि काला केलाः मीठ घातलें: अवघे वांटे केलेः गोसावियांचां अर्ध वांटा ताटीं ओळगवीलाः अर्ध ठेविलाः अवघेयां भक्तिजनासि वांटे दिधलेः गोसावी प्रसादु केलाः अवघेयां प्रसादु दिधलाः अवघां आधी प्रसादु घेतलाः जेउं लागलेः इंद्रभट प्रसादें घांसु घोळीतिः मग जेवीतिः जेवितां गोसावियांचा प्रसादु सरलाः तें उगेचि होतेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘इंद्रेयाः उगेचि कां गा राहिलेत? जेवाना कां?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः प्रसादु सरलाः’’ गोसावी इखितु हास्य केलें: गोसावियांसि आरोगणा जालीः मग पालिमांडे तयांकडें घातलें: तें पालिमांडा घांसु घोळीति आणि जेवीतिः ऐसीं गोसावियांसि भक्तिजनासहित भिक्षा अन्नाची आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः पहूड जालाः उपहूड जालाः मग गोसावी तेथौनि बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. परत स्वामीं पांचाळेश्वर-बळेगाव-हिरडपूरी-नवगाव-मायगांवलावरुण वडवाळीला आले तेव्हाची ही लीळा. पूढे स्वामीं पैठणकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: