Vishvi (ईसवी)

ईसवी, ता.मेहकर जि. बुलढाणा


येथील 3 स्थाने एकाच परिसरात आहेत - ईसवी येथील 2 स्थाने गावाच्या पूर्वेकडे श्री त्रिकाळ यांचे शेतात मंदीरात व शेजारी आहेत. व 1 स्थान शेता जवळच लहान तळ्या शेजारी आहे.


जाण्याचा मार्ग :

अंजनीहून इसवी (घाटबोरी मार्गे) 23 कि.मी. आहे. मेहकर ते इसवी 31 कि.मी. अंजनीहून ईशान्येस इसवी पायमार्गे (अंध्रुड, शेलगाव मार्गे) 16 कि.मी. आहे. इसवीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.
तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील सर्व स्थाने.

1. वसती स्थान :

हे स्थान इसवी गावाच्या आग्नेयेस श्री. लक्ष्मण भिकाजी त्रिगाळ यांच्या शेतात पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात आलेगावहून इसवीला आले. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते (पू. ली. 89, स्था. पो.) व पूर्वार्धात पैठणहून रिद्धपूरला जाताना मेहकरहून इसवीला आले. त्या वेळीही त्यांचे येथे एकच रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 145, स्था. पो.)
येथील इतर लीळा :

1. ब्राह्मणाच्या अन्नाचा स्वीकार करणे. (पू. ली. 89)

2. पूर्वार्धात पूजा आरोगणा झाली. पहूड, उपहुड झाला. संध्याकाळचा पूजावसर व दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाला. (पू. ली. 145)

देवळातील दक्षिण बाजूचा दगडी खांब असलेला पूर्वाभिमुख चौक कोणत्या लीळेचा आहे, हे निश्चितपणे सांगता येणार नाही.


वसती स्थानाच्या उत्तरेचे स्थान निर्देशरहित आहे.


2. ब्राह्मणा भेटी स्थान :

हे स्थान देवळाच्या सभामंडपात आहे.

लीळा : एकांकात सर्वज्ञांची व गावातील एका ब्राह्मणाची येथे भेट झाली. (स्था.पो.)


3. आसन स्थान :

हे स्थान देवळाच्या पूर्वेस वडाच्या झाडाच्या दक्षिणेस पश्चिमाभिमुख देवळात आहे. तळ्याच्या पाळीवरील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे विहरणासाठी आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. दादोसांची भेट झाली. दादोस तळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले. तळ्यातलाल व पांढरी कमळे होती. ती त्यांनी तोडून आणली. मग सर्वज्ञांची साष्टांग पूजा केली. त्यानंतर सर्वज्ञांनी दादोसांना, खाजेयाचा, अन्नाचा व अमृताचा असे तीन दृष्टांत निरूपण केले. (पू. ली. 145)


देवळाच्या उत्तरेचे स्थान, विहिरीच्या उत्तर बाजूचे स्थान व आसन स्थानाच्या आग्नेयेचे स्थान व वायव्येचे स्थान ही चारीही स्थाने निर्देशरहित आहेत.

एकांकातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून अंजनीला गेले व पूर्वार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून आलेगावला गेले.


निर्देशरहित स्थाने : 6


इसवीची एकूण स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila – 89
  • Isvi : विसैये वस्तिः ब्राम्हणाचें अन्न आरोगणा :।।:
  • दादोस गोसावियांपासी विळुवेर्‍हीं उगेचि बैसले असतिः परि गोसावियांचीये आरोगणेची चिंता नाहीं: ना आपुलेया जेवणाची चिंता नाहीं: ऐसें काही स्फूरेनाः तवं तेथ देउळासि एकु ब्राम्हणु आलाः गोसावियांसि दंडवते केलीः श्रीचरणां लागलाः ‘‘जी माझेया आवारासिं बिजें किजो जीः’’ गोसावी तयातें म्हणितलें: ‘‘भटोः हें भुकैले असतिः यातें आपुलेया घरासि जेवावेया नेयाः’’ तेणें म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ तो तयातें घरा घेउनि गेलाः ओसरीये बैसों घातलें: तांबीया पाय धुवावेया दिधलाः पाय धुतलेः ब्राम्हणीतें म्हणितलें: ‘‘यांसि वाढीः’’ वाढलें: तवं दादोसीं म्हणितलें: ‘‘आमचिये पालवी घालाः आम्हीं आपुलेयां गोसावियांसि आरोगणा देउनिः मग आम्हीं जेउनिः’’ मग तेहीं अधिक वरणभात घातलाः धोत्राचे पालवीं बांधलाः दादोस वरणभात घेउनि आलेः गोसावीयांसि आरोगणा जालीः तयासि प्रसादु जालाः मग तेथ लिंगाचां देउळी दादोसीं गोसावियांसि जाडीची शय्या केलीः तेथ वस्ति जाली :।।:
  • एरी दीं गोसावियांसि उपहूड जालाः गोसावी तेथौनि बिजें केलें: दादोस सरिसे निगालेः गोसावी मार्गी उभेया ठाकौनि दादोसांतें रहाविलें: दादोसीं राहातां क्षेमाळिंगन दिधलें: श्रीचरणां लागलें: एक शत दंडवतें घातलीं: मग विनविलें: ‘‘जी जीः मज दरीसन कव्हणी ठाइं दीजैल?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘प्रतिष्ठाण प्रांताकडेः’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘जी जी किती दिवसा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मासा बारा कां:’’ मग दादोस वडनेरेया गेलेः गोसावी बीजें केलें :।।:
  • Purvardha Charitra Lila – 145
  • Isvi : विसैये रामदेवीं कमळीं पूजा :।।: / विसैये वस्तिः दादोसीं कमळीं पूजा :।।:
  • विसैये गोसावी तळेयाचिये पाळी सिध्दनाथाचेया लिंगाचेया देउळा बिजें केलें: चौकीं बाइसी मात्रा ठेविलीः देउळ पाहिलें: बाइसें तेथ उपहारू करावेया राहिलीं: गोसावी विहरणा बिजें केलें: तेथ समीपचि दुसरें तळेः तयाचीये पसिमीली पाळी चिंचेखाली आसन जालें: गोसावी परमेस्वरपूरा बीजें करीत असतिः ऐसें दादोसीं बळ्हेग्रामीं उपाध्याचेनि मुखें आइकीलें: मग गोसावियांलागौनि काही वाटेचें संबळ मेळउनी घेउनि आलेः विहरणी तळेयाचिये दक्षिणेचिये पाळी दादोसां भेटि जालीः हें दादोसांची पाचवी भेटिः दादोसीं दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: गोसावी क्षेमाळिंगन दिधलें: वेचु आणिलाः तो पुढां ठेविलाः तयांचा वीधि ऐसाः देखति तेथौनि दंडवतासि येतिः गोसावी पदें च्यारि सामोरें येउनि क्षेमाळिंगन देतिः मग दादोस एकचि दंडवत घालीतिः गोसावी ‘बैसा’ म्हणतिः आणि दादोस सेवकवृत्ति बैसतिः गोसावी तयांचें आणि स्वजना आप्ताचें क्षेम पुसतिः तें सांघतिः मग पानेपोफळें: द्रव्यः खाद्यपदार्थ पुढे ठेउनि नमस्कार करीतिः ऐसा भेटिचा तयांचा वीधि तो तैसाचि केलाः दादोस घामैले होतें म्हणौनि तळेयांत स्नान केलें: दादोस पव्हो रीगालेः तवं कमळें बरवीं देखिलीं: दादोसी म्हणितलें: ‘‘जीजीः गोसावियांसि कमळीं पूजा करीनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कराः’’ दादोसी म्हणितलें: ‘‘जी जीः तरि कमळें कैसिया परि काहाडु?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आंकोडेया करौनि काढाः’’ मग आकोडेया करौनि तळांची कमळें काढिलीः कमळांची अंगदे बाहुभुषणें केलीः गळदंडाः हातसरः मुगुटमाळ केलीः ऐसीं गोसावियांसि लौहिवां कमळीं पूजा केलीः मग दधिभाताची आरोगणाः गुळळाः विडा जालाः दादोसीं कमळाची पांकोळी तोडिलीः गोसावियांचां श्रीकरीं दिधलीः ‘‘जीजीः कौळपुरूखु उध्दारूनि दाखवावा जीः’’ गोसावी कमळाचें पातें श्रीकरीं घेतलें: श्रीकरीचिया करांगुळीचियां नखें करौनि उध्दारीलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देशकाळीचे आचार्ये इतुलेयामध्यें आचारित्व करित असतिः ऐसयामध्यें लीहुनि दाखवीतिः परि देवताचक्र उधारू न सरेः एर्‍हवी एथौनि देवताचक्र निरूपितां पृथ्वीएसणें कडीत आणि मरिूएसणी खडी न पूरेः देशकाळीचें आचार्य इतुलेया ऐसयामाजी संकळौनि सारीतिः’’ मग दादोसीं म्हणितलें: ‘‘जी ऐसें हें कव्हणीचि नेणेति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाणेति तरि चतुर्विधापरि भ्रमणातें कां पावैतिः’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘ते कैसें जी?’’ यावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मायाचक्रभ्रमणन्याये पर्यायवशे जीव सकळही पावेः एकवांचैनिः’’ मग गोसावी राहाटघटिकयेचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘राहाटी घडी बांधली असेः तें येः जायेः भरेः रीचवेः तैसा हा जीव चैतन्यि बांधला असेः तो स्वर्गा जाएः नरका जाएः मोक्षा जाएः कर्मभुमि येः क्रिया करीः’’ दादोसी म्हणितलें: ‘‘जी तरि जीवाचें करण काइ वायांचि जाये?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘केली क्रिया वांयां न वचेः क्रियेनुरूप फळ होएः’’ यावरि गोसावी खाजेयाचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘खाजे खादलेयां क्षुधानिवृत्ति तरि होए परि भूक न वचे तृप्ति नव्हेः अन्न जेविलेया भूक तरि जायेः अमरां नव्हिजेः अमृत पीजें तरि अमरा होइजेः तैसी इंद्रादिकांचीं फळें च्युतिमतें आणि दुःखरूपें: चैतन्यफळ मोक्षतुल्य परि तेथ च्युति हा दोषुः तैसा मोक्षु नव्हेः मोक्षु जालेयां याताात पारूखतिः’’ ये प्रसंगीं बहुत निरूपिले:।: मग कौळपुरूख उध्दारूनि दादोसासि दिधलाः गोसावियांतें चांगदेवभट बोलाउ आलेः मग गोसावी बिढारा बिजें केलें: बाइसीं उपहारू निफजविला होतां: बाइसे नेमु सारिलाः मग गोसावियांसि आरोगणा जालीः दादोसां सपांती जेवण जालें: विळींचा पूजावसर जालेयानंतरें दादोसीं गोसावियांतें पुसिलें: ‘‘आपणांसि तरि राहणें नाहीं: तरि मीं गावां जाइनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हो कां:’’ मग दादोसीं उठौनि आसनावरि पांच पोफळे ठेउनि शत एक दंडवतें घातलीं: ऐसाचि वीधि करीतिः उदेयांचि एक पोफळ आसनावरि ठेउनि एकचि दंडवत घालीतिः तेथ गोसावियांसि वस्ति जालीः एरी दिसीं उदेयाचां पूजावसर जालाः मग गोसावी बिजें केलें: दादोस पव्हेवरि बोळवीत आलेः तेथौनि परतलेः मग दादोसी कौळपुरूख कागदी उध्दारूनि तांबेयाचा पत्रीं उध्दारीलाः तांबेयाचे पत्र केलेः तेथ ठसा घातला :।।: (टिप – येथे स्वामी दुसर्यांदा आले. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पहिल्यांदा वासनिकडुन येथे आले होते. आता दुसर्यांदा मेहकर-अंजनिवरूण येथे आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: