Vadaner Bhujang (वडनेर भुजंग)

वडनेर (भुजंग) ता. अचलपूर जि. अमरावती


वडनेर (भुजंग) येथील 7 स्थाने 3 ठीकाणी आहेत - 7 पैकी 5 स्थाने काकडा ते अंजनगांव (सूर्जी) रोडवरच वटेश्वर मंदीरात व बाजुला आहेत. 1 स्थान वडनेर (भुजंग) गावांच्या उत्तरेकडे 800 मीटर अंतरावर आहे. तर 1 स्थान गावांच्या पश्चिमेकडे गावांतच गोपीराजबाबा मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

वडनेर हे गाव, अंजनगावसुर्जी-काकडा मार्गावर अंजनगावहून किंचित् आग्नेयेस 9 कि.मी. आहे व काकड्याहन किंचित नैर्ऋत्येस 3 कि.मी. आहे. असदपूर ते वडनेर (काकडा मार्गे) 12 कि.मी. आहे व इसापूर मार्गे 11 कि.मी. आहे. वडनेरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान वडनेर गावाच्या ईशान्येस 200 मीटर अंतरावर अंजनगाव काकडा सडकेच्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वटेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे एकांकात येथे तीन दिवस वास्तव्य होते, (पू. ली. 80, स्था. पो.)

अवस्थान स्थान देवळाच्या उत्तरेचे पूर्वाभिमुख लहान देवळातील स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. जगतीच्या दारवठ्यातील स्थान :

हे स्थान अवस्थान स्थान देवळाच्या पूर्वेस पूर्वाभिमुख देवळात आहे. (स्था.पो.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. आसन स्थान :

हे स्थान अवस्थान स्थान देवळाच्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वडाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

लीळा : असदपूरहून परत वडनेरला आल्यावर सर्वज्ञांना येथे आसन झाले. त्यावेळी रामदेव ऊर्फ दादोस हे शेतातून आले. त्यांनी दोन वाळुके सर्वज्ञांना अर्पण केली. मग दहीभात घेऊन आले. सर्वज्ञांनी दहीभाताची आरोगणा केली. (पू. ली. 84, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. सर्पद्वय पतन स्थान :

हे स्थान अवस्थान स्थान देवळाच्या ईशान्येस अंजनगाव-काकडा सडकेच्या उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू संध्याकाळच्या वेळेस काकड्याहून वडनेरला आले. ते वटेश्वराच्या देवळांत झोपण्यासाठी जात होते. त्यावेळी पुजारी देवतेस धुपारती करून परत निघाला होता. तो सर्वज्ञांना म्हणाला, ”या देवळात पूजेची भांडी वगैरे आहेत, ती चोरीस जाऊ नयेत म्हणून देवळास कुलूप घातले आहे, तरी तुम्ही पलीकडच्या उत्तरेश्वराच्या देवळात झोपण्यासाठी जा.” मग सर्वज्ञ येथे आले. त्यांच्या वेळी येथे उत्तरेश्वराचे देऊळ होते. या ठिकाणी त्यांनी पहड स्वीकारला. येथील देवळात दोन महाभयंकर भुजंग साप रहात होते. ते रात्री एकमेकांशी भांडत भांडत सर्वज्ञांच्या छातीवर येऊन पडले. तेव्हा त्यांनी दोन्ही श्रीकरांनी दोन्हीही साप बाजूला फेकून दिले. ही घटना सकाळी पुजाऱ्यास कळाली, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. (पू. ली. 80 व 81, स्था. पो.)

देवळाच्या सभामंडपातील स्थान मांडलिक आहे.


5. परिश्रय स्थान :

हे स्थान सर्पद्वय पतन स्थान देवळाच्या पाठीमागे पूर्वाभिमुख लहान देवळात आहे. (स्था. पो.)

सर्पद्वय पतन स्थान देवळाच्या पूर्वेस अर्धा फाग अंतरावर दोन मांडलिक स्थाने आहेत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा) वरील दोन स्थान.


6. आसन स्थान (आंबजयच्या हद्दीतील) :

हे स्थान वडनेर गावाच्या उत्तरेस 800 मीटर अंतरावर बैलगाडी रस्त्याच्या पश्चिमेस उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : वडाच्या झाडाच्या पूर्व फांदीवर सर्वज्ञांना आसन असताना रामदेवांची भेट झाली. त्यानंतर त्यांना या ठिकाणी आसन झाले. येथे रामदेवांना सर्वज्ञांच्यापासून स्थिती झाली. (पू. ली. 82, स्था. पो.)

सर्पद्वय पतन स्थान देवळाच्या वायव्येस व अंजनगाव सडकेच्या उत्तरेस एक फर्लाग अंतरावरील पूर्वाभिमुख देवळातील ‘चिंतेश्वर’ नावाने ओळखले जाणारे स्थान निर्देशरहित आहे. 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. वसती स्थान :

हे स्थान वडनेर गावाच्या पश्चिम विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. हे ठिकाण ‘गोपीराज बाबा’ या नावाने ओळखले जाते.

लीळा : एकांकामध्ये असदपूरहून वडनेरला परत आल्यावर सर्वज्ञांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. त्या वेळी दादोसांनी येथे त्यांना आरोगणा दिली. (पू. ली. 85, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

गावाच्या आग्नेयेचे श्री. नानाबुवा पुजदेकर यांच्या शेतातील स्थान निर्देशरहित आहे.

पहिल्या वेळेच्या चार दिवसांच्या मुक्कामानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून असदपूरला गेले व दुसऱ्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून पातूरला गेले.


अनुपलब्ध स्थान :

1. गोपाळाच्या देवळाच्या नैर्ऋत्येचे परिश्रय स्थान


निर्देशरहित स्थाने : 3


वडनेरची एकूण स्थाने : 8


  • Purvardha Charitra Lila – 80
  • Vadaner (Bhujang) : वडनेरां वटेस्वरां बीजें करणें: लींगाचां देउळी वस्ति :।।:
  • वीळिचा गोसावीं वटेस्वराचेया देउळासि नीद्रास्थानासि बीजें केलेंः तवं राणा धूपार्ती करुनि नीगालाः राणेनि म्हणीतलेंः “जी जीः एथ उपकरणे’ असतिः तीएं जातीः म्हणौनि देउळासि कुंचीटाळे घातलें असेः तुम्ही पैलाडे देउळासि उतरेस्वराचेया नीद्रास्थानासि जाः” तेथ गोसावीं बीजें केलें मग उतरेस्वराचा देउळी गोसावीयांसि आसन जालेंः पहुडू स्वीकरिलाः राणा गावांआंतु गेलाः जेविलाः नीजैलाः आणि मध्याने एकि रात्री आठवलेंः “ते माहात्मे मीयां तेया देउळासि पाठवीलेः तेथ दोनि सर्प असति’:'” तैसाचि तो नीगालाः तवं वेसीसि कुंचीटाळे पडिलें मग तो मागुता घरासि आलाः च्याही पाहार नीद्रा नाहीः दुख करीतु नीजैलाः चडफडीतु होताः “केधवां दीस उगवैलः मां मीं केधवा जाइनः’।
  • Purvardha Charitra Lila – 81
  • Vadaner (Bhujang) : उत्तरेस्वरी सर्पद्वय पतन :।।: / रात्रीं वडनेरां सर्पद्वय निवारण :।।:
  • गोसावी वडनेरेया बिजें केलें: विळीचां गोसावी वटेस्वराचेया देउळीं निद्रास्थानासि बिजें केलें: वटेस्वरीं आसन जालें: तवं राणा धुपार्ति करौनि निगालाः निगता म्हणितलें: ‘‘देव होः एथ देवांची उपकरणें असतिः तियें जाति म्हणौनि देउळासि कुचिटाळें घालीजताः तुम्हीं पैली उत्तरेस्वराचा देउळीये निद्रा कराः’’ म्हणौनि दाखविलें: गोसावी मानिलें: पौळीबाहिरी उत्तरेस्वराचा देउळीं चैकी नावेक आसन जालें: मग पहूडलें: राणा गावांतु गेलाः जेविलाः निजैलाः मग आठविलेः ‘आहाः मियां तयां गोसावियांतें तया देउळा पाठविलें: आणि तेथ तरि दोनि सर्प असतिः’ तैसाचि निगालाः तवं वेसी घातलीं असेः माघौता गेलाः चार्‍ही पाहार निद्रा नाहीः दुःख करीते निजैलाः ‘केधवां दिस उगवैलः मां मीं केधवा जाइन’ ऐसा चडफडीत होताः तवं एरीकडें तें सर्प भांडिनले आणि गोसावियांचिया वक्षस्थळावरि पडिलेः गोसावी एकें श्रीकरें ऐसा एकु एउता सांडिलाः एकें ऐसा एकु एउता सांडिलाः मां दोन्हीं निवैर जालें: गोसावियांसि पहूड जालाः उदेयाचि उपहूड जालाः उदेयांसिचि राणा तेथ आलाः तवं गोसावी चैकीं आसनी उपविष्ट असतिः तेणें दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलाः आणि म्हणितलें: ‘‘देव हो एथ दोनि सर्प असतिः तें भलतेयासि घात करीतिः मीं तुम्हां पुढां सांघो विसरलाः ऐसा मीं हृदयशून्यः दुराचारूः पापरूप द्रोहीः’’ ऐसें म्हणौनि बहुत आत्मनिवेदन केलें: मग म्हणितलें: ‘‘रात्रीं आठवलें जीः रात्रीं येतु होता तवं वेसी कुचिटाळें घातलें होतें: जी जीः तरि काइ केलें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ दोनि सर्प असतिः’’ गोसावी श्रीकराचा आंगुळीया ऐसा अनुकार केलाः ‘‘ते रात्री भांडिन्नलेः झुंजुनि उरावरि पडिलेः’’ तवं तेणें म्हणितलें: ‘‘मग काइ केलें देव हो?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘उरावरि पडिलेया काइ किजे? हातें लौटिजेः तें केलें: एणें हातें हा फेडिलाः एणें हातें हा फेडिलाः आणि तें एथौनि निवैर केलेः आता हें स्थान निर्दाेख जालें:’’ इतुकनि राणेयासि विस्मयो जालाः मग गोसावी बिजें करू आदरिलें: राणेनि पुसिलें: ‘‘गोसावी कव्हणीकडें बिजें करीति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे ऐसें आंबजएकडें जाइलः’’ :।।:
  • Purvardha Charitra Lila – 82
  • Vadaner (Bhujang) : अंबजैए रामदेवां भेटिः अस्तीति :।।:
  • उदीयांचि गोसावी अंबजैएकडे वीहरणा बीजें केलेंः रामदेव वटेस्वरीचे कठीये होउनि वर्तत’ होतेः वटेस्वरीची परिचरीया करीतिः ते वटेस्वरासी आलेः रामदेवांसि आणि राणेयांसि मैत्रः राणेनि म्हणीतलेः “रामा रामाः मागां जैसीया पुरूखांचीया गोष्टी आइकिजति तैसे एथ इस्वरपुरूख आले होते: काइ सांघों तेयांचे सौंदर्यः काइ सांघों तेयांचे लावण्यः काइ सांघों तेयांचें इस्वर्यः काइ सांघों तेयांचे सामथ्य”: उतरेस्वरी दोनि सर्प भांडीनलेः उरावरि पडिलेः एके हातें एक टाकीलाः एकै हातें एकु टाकिलाः ऐसे ते सामथ्याचेः” रामदेवीं म्हणीतलें: “ते कवणीकडे गेले?” ‘नाः आंबजैएकडे जाउनिः म्हणीतले ते आतांचि आंबजैएकडे गेले.” मग रामदेव आंबजैएसि आलेः तवं गोसावीयांसि वडाचीए पूर्वीली खांदीएवरि लोंबतां श्रीचरणी आसन असेः एका श्रीचरणां दंडवत केलें मग दूसरेयाकडे येउनि दूसरेया श्रीचरणां दंडवत केलेंः गोसावी खांदीएवरौनि उतरले तेयांचीए डोइएवरि पांढरें घोंगडें होतें: तें बैसावेया घातलें: गोसावी आसनी उपवीष्ट जालेः देव पुढां बैसलेः गोसावीं कृपादृष्टी अवळोकिलें आणि गोसावीयांपासौनि तेयां स्तीति जालीः स्तीतिसुख भोगिलेंः नावेक बसले होते. मग स्तीति भंगलीः मग रामदेवीं गोसावीयांतें आरोगणें वीनवीलेंः गोसावीं वीनवणी स्वीकरिलीः रामदेव दधिभातु घेउनि आले मग रामदेवीं पासवडीएचे आसन रचिलेंः गोसावी आसनी उपवीष्ट जालेः आरोगण करितां सर्वतें म्हणीतलेंः “ऐसेया दधिभातेंसी आले होए तरि नीकें होएः” तवं तेयासी आठवलेंः “जी जीः असेः परि मी विसरला जीः” मग परिवंटीं आलें खोविलें होतेंः तें ओळगविलें मग आरोगण जालीः गुळुळा जालाः वीडा जालाः जाडि आथुरावेया घेतलीः वटेस्वरी पहुडु जाला’:।।
  • Purvardha Charitra Lila – 84
  • Vadaner (Bhujang) : वडातळी रामदेवां भेटिः दधिभात आरोगणा :।।:
  • मग गोसावी रामदेवाची उत्कंठा जाणौनि मागुतें वडनेरेया बिजें केलें: वडनेरेया इसापूरामध्यें सेत तेथ रामदेव माळेयावरौनि बैसौनि सेत राखतातीः तेहीं गोसावियांसि येतां देखिलें आणि माळेयावरूनि खालुते उतरलेः वटेस्वरादक्षिणे वटुः तेथ पूर्विली पालवी गोसावियांसी आसन असेः तवं राणा गोसावियांसी देखिलें: आणि तेणें म्हणितलें: ‘‘गोसावी क्ये बिजें केलें होतें? राम भवंतें पहातु होताः’’ तवं दादोस सेतौनि आलेः मग दादोसीं गोसावियांसि दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलेः दोनि वाळकें हाती होतीः तें गोसावियांचा श्रीकरीं ओळगवीलीः गोसावियांपुढां सेवकवृत्ति बैसलेः दादोसी क्षौर केले होतें: तें मुंडित देखौनि गोसावी भृभंगीचिया खुणां पुसिलें: तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः आमचे पीते भावर्येः उदीम करू जाणतिः तें उदीम करावया देशाउरा गेले होतें: तें येतां वाटे चोरीं उपद्रविलेः तें वार्ता गांवासि आलीः जी तें मीं आचरत असें: आजी सुतकः एर्‍हवी मीं गोसावियांसि दधिभाताची आरोगणा देतां:’’ माघौती दादोसीं म्हणितलें: ‘‘जी जीः आमतें दैविक पडिलें तरि गोसावियांसि आरोगणेलागी अन्न आणूं येइल?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘येइलः तैसें एथ काही नाहीं:’’ मग धोत्राचां पदरीं आलें बांधले आणि दधिभात वाटां घेउनि आलेः सागळे उदक आणिलेः गोसावियांसि वटेस्वराचिये सोंडियेवरि आरोगणा जालीः मग वटेस्वरी जाडी आंथुरीलीः गोसावी पहूड स्वीकरिला :।।:
  • Purvardha Charitra Lila – 85
  • Vadaner (Bhujang) : रात्री गोपाळीं वस्तिः आरोगण :।।:
  • मग विळीचां दादोसीं विनविलें: ‘‘जी जीः तयाचे क्रियापार करितां उसीर लागैलः तरि रात्रीं मज येतां अवघडः वेसी कुलुप पडतें: मग येवों जावों न येः तरि गोसावी गावां मध्यें आमचेया गृहासमीप गोपाळाचें देउळ असेः तेथ बिजें करावे जीः मज गोसावियांचिया दरीसनां यावेया सोपें होइलः’’ गोसावी मानिलें: गोपाळी बिजें केलें: मग रात्रीं रामदेवीं जाडी आणिलीः गोसावियांसि आसन रचीलें: गोसावी आसनीं उपविष्ट जालें: मग वाटां भातः तांबीया दूधः पापडः तांबगाडुगा उदक भरूनि आणिलें: गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः जाडीचें शयनासन रचीलें: तेथ पहूड उपहूड जाला :।।:
  • Purvardha Charitra Lila – 85
  • Vadaner (Bhujang) : तथा(दादोसा) पुनर्दर्शना पुढारू :।।:
  • मग उदेयाचि गोसावियांसि बिजें करितां दादोसीं विनविलें: ‘‘जी जीः दिस च्यारि राहावें जीः सुतक सरेलः मग मीं गोसावियांसरिसा जावों राहीनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे आतां न र्‍हायेः तुम्हीं मागिलाकडौनि याः’’ तवं तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः गोसावी कव्हणीकडें बिजें करीतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें मेघंकराकडें:’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः दरीसन कव्हणीं ठाइं दीजैल?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें मेघंकर प्रांता विसैएकडे देइलः’’ दादोस वडनेरेयांचिए सिवेचां वोहळवेर्‍ही बोळवीत आलेः मग राहिलेः गोसावी बिजें केलें :।।:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: