Trimbakeshwar (त्र्यंबकेश्वर)

त्र्यंबकेश्वर, ता. नाशिक जि. नाशिक


येथे 3 स्थाने - त्र्यंबकेश्वर महादेव मंदीरातील लिंग नमास्कारी आहे हे 1 स्थान व सभामंडप/चौक म्हणजे दुसरे स्थान होय. तिसरे स्थान ब्रह्मगिरी पर्वतावर आहे.


जाण्याचा मार्ग :

त्र्यंबक हे गाव, नाशिकहून किंचित नैर्ऋत्येस 29 कि.मी. आहे. सिन्नरहून त्र्यंबक (नाशिक मार्गे) 58 कि.मी. आहे. त्र्यंबकला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. त्र्यंबकेश्वरा विडा वाहणे स्थान :

हे स्थान जुने त्र्यंबकेश्वर एवं जुने महादेव मंदिरात आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गोदावरी व अहिल्या या दोन नद्यांच्या संगमाजवळ आहे. देऊळाला एकूण तीन दरवाजे आहेत. देऊळाला एक पूर्वाभिमुख, एक दक्षिणाभिमुख, एक उत्तराभिमुख दरवाजा आहे. पेशवेकालीन त्र्यंबकेश्वर मंदिरात हे स्थान नाही. त्र्यंबकेश्वराचे लिंग नमस्कारी आहे व गाभाराही चरणांकित आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंनी लिंगास विडा अर्पण करून दोन्ही श्रीकरांनी लिंगास स्पर्श केला. (पू. ली. 250, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (स्थान क्र. 1 आणि 2)

विडा वाहण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात स्वामी गेले असता गाभाऱ्यात जातांना डाव्या हाताला भिंतीत पाषाणाचे आयाताकती कुंड होते. प्राचीन भाषेत त्याला मांधान असे संबोधित असत. स्वामींनी भत्तांकडून पान सुपारीचा वीडा घेतला व मांधानात विसळला. स्वामींच्या कर स्पर्शाने ते मांधान पवित्र झाले. स्वामींच्या करस्पर्शाने पवित्र झालेले हे मांधान जेंव्हा मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला तेंव्हा तेथील व्यवस्थापक कै. मौनीबाबा यांचे कडुन ना.जि. महानुभाव समितीत प्राप्त झाले.

या पवित्र मांधान विशेषाची स्थापना सन 1997 मध्ये श्री शंकरराव दादा मोरे त्यांच्या वस्तीवर (नाशिक त्र्यंबक रस्ता) 👉🏾 खंबाळे, ता. त्र्यंबकेश्वर करण्यात आली.

विशेष : परमेश्वर अवताराने लिंगाला विडा वाहण्यामागचे कारण म्हणजे, परमेश्वरांनी ज्याच्या पतित देह स्वीकारला होता त्या हरीपाळ देवाचा पंचलिंगी पूजा करण्याचा मनोदय परमेश्वर पुर्ण करीत होते. तसेच अचलपुर चा अंबीनाथ, त्र्यंबक चा त्र्यंबकेश्वर, नांदुर चा मध्यमेश्वर, आपेगाव चा विज्ञानेश्वर आणि ब्राह्मणी चा घटसिद्धनाथ अशा पाच लिंगाना परमेश्वरांनी विडा वाहीला होता. अर्थात परमेश्वर ज्या ठिकाणी जडत्वाचा जीव घातलेला असेल अशाच लिंगाला श्रीकराने स्पर्श करून विडा वाहत असत. त्यामुळे हरीपाळच्या इच्छापूर्ती बरोबरच तेथील जीवाला संबंधाचे दान होत असे आणि तेथील देवतेलाही आल्हाद लाभत असे.

2. आसन स्थान :

हे स्थान त्र्यंबकेश्वराच्या देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. आता येथे ओटा बांधण्यात आला आहे.

लीळा : त्र्यंबकेश्वराला विडा वाहिल्यानंतर सर्वज्ञांना देवळाच्या चौकात थोडा वेळ आसन झाले. (पू. ली. 250)

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात अंजनेरीहून त्र्यंबकला आले. त्र्यंबकेश्वराच्या देवळाच्या आवाराच्या वायव्य विभागी गुंफा होती. त्या गुंफेत सर्वज्ञांचे पाच दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून परत अंजनेरीला गेले. गुंफेचे अस्तित्व राहिले नाही.


3. ब्रह्मगिरीच्या दारवठ्यात चरणचारी उभे राहणे स्थान :

हे स्थान त्र्यंबक गावाच्या नैर्ऋत्येस 4 कि. मी. अंतरावर असणाऱ्या ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीच्या उगम स्थान मंदिरा (ब्रह्मगिरी मंदिर) पासून दक्षिणेस 50 फुट वर असणाऱ्या पूर्वाभिमुख देवळात आहे. हा रस्ता पायमार्ग आहे.

लीळा : या स्थानाचा उल्लेख स्थान पोथी मध्ये आढळत नाही, पण हे स्थान (पु. ली. 252) “ब्रह्मगिरीवरि गौतामाळां उदंबरें आरोगणें” या लीळेतिल “मग गोसावी ब्रह्मगिरीचेया घाटाचां दारवंठां चरणचारी क्षण एक उभें होतें:” हे आहे असे परंपरेने बोलले जाते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. त्र्यंबकी गुंफेतील अवस्थान स्थान.

2. गुंफेच्या अंगणातील मादने स्थान.

3. जगतीच्या आग्नेयेचे गंगेच्या पलीकडील परिश्रय स्थान.

4. कुशावर्ती आसन स्थान.

5. रामविहिराचा पाळी आसन स्थान.

6. लक्ष्मण विहिराचा पाळी आसन स्थान.

7. कोळाएचा घाटी आसन स्थान.

8. गंगाद्वारी आसन स्थान.

9. नरसिंही आसन स्थान.

10. कोळाएच्या उजव्या हाता आसन स्थान.

11. पटीशाळा आसन स्थान.

12. गुप्त त्र्यंबकी आसन स्थान.

13. गौतमाळ्याच्या पूर्वील पाळीवरील आसन स्थान.

14. गौतमाच्या भातवड्या दाखविणे स्थान.

15. सीतेचे कोथळे मोथळे दाखविणे स्थान.

16. बाइसाला समुद्र दाखविणे स्थान.


त्र्यंबक चे एकूण स्थान : 19


  • Purvardha Charitra Lila – 250
  • Trayambakeshwar : त्र्यंबकीं अवस्थानः विडा वाने :॥:
  • गोसावी त्र्यंबका बीजे केले : गोसावीयांसि गाभारेयांतु उकड आसन जालेः मग माधाणेंचे उदक श्रीकरी घेतलें: लिंगावरि घातलेः लिंग दोही श्रीकरें स्पर्शिलेः डखलेया चांगदेवभट्टातें विडा मागीतलाः माधानीं विडा धुतलाः मग गोसावी त्र्यंबका विडा वाईलाः नावेक चौकी आसन जालेः मग जगतिआंतु त्र्यंबकाचेया देउळा पश्चिम भागीं वायव्य कोना आश्राइत गुंफा तेथ अवस्थान जालेः दिस तीन :॥:
  • (..येथे हे पहील्यांदा येने. स्वामी वेरुळ-सिन्नर-नासिक-अंजनेरि वरुण त्र्यंबकेश्वरकडे आले व ३ दिवस थांबले.)
  • Purvardha Charitra Lila – 251
  • Trayambakeshwar : गंगाद्वारीं बडुवां संबोखु: डखलेया शिक्षापण :।।:
  • डखलेया शिक्षापण गोसावी कोळाइचा घाट वोळघिलेः कोळाइचा घाटी आसन जालें: मग कोळाइ उजवेया हाता आसनः तियें कुंडीचेनि उदके बाइसीं चरणक्षाळण केलेः तो प्रसाद अवघेया भक्तिजना जालाः मग गोसावियांसि गंगाद्वारी नावेक आसन जालें: मग कोळाइ उत्तरे नृसिंही नावेक आसन जालें: मग मढाचिये पटिशाळे बिजें केलें: तेथ पटिशाळें आसन जालें: भक्तिजनासि परावर निरूपण होत असेः कोळाइयेचे बोंबीहुनि पाणी निगत असेः तेथ डखले गेलेः तेथ डखलां आंगुळी सुदलीः मग म्हणतिः ‘‘खोललीकडें उभय गंगातीरें गावो नेसिः माणसें गुरें नेसिः वासरूवें नेसिः सेळिया मेंढीया नेसिः सेते नेसीः आतां माझी आंगुळी ने पां: तरि जाणें:’’ सर्वज्ञें म्हणितलें ‘‘ऐसें न म्हणिजे कीं गा डखलेयाः देवतेसि निरोध होएः’’ डखलां म्हणितलें: ‘‘जी जीः मीं सिविया देत असे? विपलावीत असे? काइ तेथीचे मोडीत असे? मीं गोष्टि सांघत असेः ऐसें असता माझाची निरोध होइलः तरि माझेचि पाप म्हणा?’’ गोसावी इखित हास्य केलेः खाली पाणियां अडी भरेः तें पाणी डखला अवघेचि सांडिलेः डखलां धाकुटेया कुंडापासी जाउनी म्हणितलें: ‘हें कुंड उपसों:’ म्हणौनि धाकुटें कुंड उपसिलेः तवं राणा आलाः तो बोबाउं लागलाः ‘‘माझे पाणी टाकिलें:’’ तवं डखला म्हणितलें: ‘‘तुझें पाणी काइसें? तू गुरवः तू काइ गौतमाचा दाइज? तुज गौतम काइ होए? आणि आम्हासि काइ नव्हे?’’ तवं बडुवा गोसावियापासी गार्‍हाणनिसीं आलाः ‘‘देखिलें जीः तुमचें शिक्ष्य गंगाद्वारीचें उदक सांडीतातीः तेणें उदकें आम्ही आपुले कुर्टं पासिू जीः तेथ आम्हां काही मिळेः येहीं अवघें पाणी सांडिलेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटोः तुम्हां दिसवडी काइ मिळे?’’ तेणें म्हणितलें: ‘‘जीः जीः रूये तीनि मिळेतिः कव्हणी दिसीं सरू दामु येः कव्हणीं दिसीं पाउनी दाम येः’’ मग तयासि गोसावी बाइसांकरवी पाउनी दाम न देववीतीचिः सरू दाम न देववितीचिः पूरा दाम देवविलाः सर्वज्ञें म्हणितलें ‘‘बाइः एकु दाम ओपाः’’ मग बाइसीं एकु दामु दिधलाः डखलां म्हणितलें: ‘‘हां जीः हें काइ गौतमाचे दाइ? मां एक दाम वोपिलाः’’ गोसावी डखलेयासि शिक्षापण केलें: मग अमृतोपमी शब्दीं आश्वासिलें: ‘‘तीर्थ देवताः पुरूखः या तिहींचा ऐसा अंत न पाहिजे कीं:’’ मग तेही ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि नमस्कारू केला :।।:
  • (टिप – हे पहील्यांदा त्र्यंबकेश्वरकडे येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-सिन्नर-नासिक-अंजनेरि वरुण त्र्यंबकेश्वरकडे आले व कोळाइचा घाटी आसन झाले.)
  • Purvardha Charitra Lila – 252
  • Trayambakeshwar : ब्रह्मगिरीवरि गौतामाळां उदंबरें आरोगणें :।।:
  • मग गोसावी ब्रह्मगिरीचेया घाटाचां दारवंठां चरणचारी क्षण एक उभें होतें: मग गौतमाळेया बिजें केलें: पूर्विली पाळीवरि उदंबरू पिकला होताः तेथ आसन जालें: उदंबरें पडिलीं होतीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यें उदंबरें वेचा गाः’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि अवघाचि भक्तिजनी उदंबरीचीयी रासी केलियाः मग बाइसीं गोसावियांसि पांच एकें उदंबरें निवडुनि ओळगवीलीः तें एक उदंबर गोसावी श्रीकरीं घेतलेः आणि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ब्र्रह्मगोळकु ऐसा असेः हें एक ब्रम्हांड गाः’’ तवं भक्तिजनीं म्हणितलें: ‘‘जी जीः बम्हांड तें कैसें जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जैसें हें उदंबर अवघें बीया भरले असेः तैसें जीव ये ब्रम्हांडी भरले असतिः म्हणौनि यातें ब्रम्हांड ऐसें म्हणिजेः आणि जैसीं उदंबरीं बहुतें उदंबरें लागली असति तैसी अनंते ब्रम्हांडे मायेसि लागली असतिः’’ ‘‘जी जीः’’ म्हणौनि श्रीचरणां लागलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘अफोडी उदंबर खाइजे तें ऐसें:’’ म्हणौनि श्रीमुखीं उदंबर घातलें: आरोगिलेः सर्वज्ञें कृपादृष्टी अवलोकुनी म्हणितलें: ‘‘कां गाः महात्मे होः पिंडप्रदान वर्तेना?’’ आणि अवघा भक्तिजनी धायेवरि उदंबरें खादलीः तें साखर ऐसीं जालीं म्हणौनि तृप्तिपर्येंत भक्षितचि होतेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां पूरे करा गाः एर्‍हवी पोटें दुखतीलः’’ मग न खातीचिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यावरि चूळ दोनि दोनि पाणी घेयाः’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि पियालें: मग गोसावी तेथौनि बिजें केलें :।।:
  • (टिप – हे पहील्यांदा त्र्यंबकेश्वरकडे येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-सिन्नर-नासिक-अंजनेरि वरुण त्र्यंबकेश्वरकडे आले व ब्रह्मगिरीवरि गौतामाळां घाटी आसन झाले.)
  • Purvardha Charitra Lila – 253
  • Trayambakeshwar : गुप्तत्र्यंबकी आसन :॥:
  • गोसावी गुप्तत्र्यंबका बीजे केले: तेथ गोसावी दोन्ही द्वारशंका धरुनि भितरी अवलोकिलेः मग गोसावीयांसि नावेक चौकीं आसन जालेः गुळुळा जालाः टीळा केलाः विडा ओळगविलाः मग गोसावी तेथौनि बीजे केले : आदीत्र्यंबकी आसन जालेः नावेक कुंडापासि आसन जालेः :॥:
  • (.. हे पहील्यांदा त्र्यंबकेश्वरकडे येने. स्वामी वेरुळ-सिन्नर-नासिक-अंजनेरि वरुण त्र्यंबकेश्वरकडे आले व गुप्तत्र्यंबकी आसन झाले.)
  • Purvardha Charitra Lila – 254
  • Trayambakeshwar : गौतमाचियां भातवडी दाखवणें :।।:
  • तेथौनि येतयेतां गौतमाचियां भातवडीया दाखविलीयाः सर्वज्ञें म्हणितलें ‘‘या देखिलीया गा गौतमाचियां भातवडीः’’ तें भातवडीआंत बिजें केलें: भक्तिजनीं म्हणितलें: ‘‘जी जीः भातवडीया म्हणिजे काइ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘गौतम साळी पेरीः तिया दिसेंचि होतिः दिसेंचि सांवंगीः दिसेचि मळीः दिसेचि अठयांसि सहस्त्रां ऋषिस्वरां भोजन देः उरे भात तो एथ सांटवीः तिया या भातवडीया गाः ‘ऋषिस्वरासि भोजन होएः मग निगावे ऐसें उपजेः तवं गौतमु निगो नेदीः मग तेहीं मावेचि गाय रचीलीः तें साळीयासि रीगालीः तें गौतमें आळमाळ थैक म्हणितलीः तवं तें पडिलीः इतुलेनि ऋषिस्वरें म्हणितलें: तू गौहत्यारा आणि ब्रम्हहत्याराः तुझा ठाइं कोण राहील?’ ऐसें म्हणौनि अवघे निगालीः’’ मग ब्रह्मगिरीवरूनि बिजें केलें :।।:
  • (टिप – हे पहील्यांदा त्र्यंबकेश्वरकडे येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-सिन्नर-नासिक-अंजनेरि वरुण त्र्यंबकेश्वरकडे आले ब्रम्हेगरीचिये सोंडियेवरि गोसावी उभे राहिलें व तेथौनि येतयेतां गौतमाचियां भातवडीया दाखविलीयाः तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila – 255
  • Trayambakeshwar : तथा सीतादेविचें कोथळे मोथळे दाखवणें :।।:
  • तेथौनि गोसावी बिजें केलें: तवं पुढां सीतेचे कोथळे देखिलेः तेथ गोसावी उभे राहिलेः आणि म्हणितलें: ‘‘देखिले गा सीतेचें कोथळे मोथळेः’’ म्हणौनि श्रीकरें दाखविलेः तवं भक्तिजनीं म्हणितलें: ‘‘जी जीः कोथळे मोथळे म्हणिजेति काइ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ सीता होतीः तें तिया धान्य साटवावेया पर्वतावरि कोथळे मोथळे केलें होतेः तें हें:’’ मग गोसावी तेथौनि बिजें केलें: ब्रम्हेगरीखालौते उतरलेः बाइसें पायरिया उतरतां थरथरां कापतें: गोसावी बाइसासि श्रीकरु देतिः दायंबामुख्य भक्तिजन पुढांचि गंगाळेया पातलें: मागिलाकडौनि बाइसें आलीः तियें दायंबातें कोपलीं: ‘बाबातें पारूखेसीचिनाः’’ दायंबाए म्हणितलें: ‘‘आम्हीं आणि गोसावी सरिसेचि आलोः’’ तवं बाइसीं म्हणितलें: ‘‘हा बाबा? बाबाए यासरिसे बीजें केलें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें यासरिसेही होतें: आणि तें तुम्हासि हातुही देत होतें:’’ बाइसासि आश्चर्य जालें: यावरि गोसावी सेंदुर्जनीची गोष्टि सांघितलीः आणि ओरंगलीची गोष्टि सांघितलीः तवं गंगाळा आसन जालें: मग कुशावर्ता बिजें केलें: कुंडीचीया उदकांत श्रीचरण घातलें: मग पसिमीली पटिशाळे पूर्वाभिमुख आसन जालें: बाइसीं श्रीचरण प्रक्षाळण केलें: मग दुपाहारचा पूजावसरु जालाः विडा ओळगवीलाः मग बकुळासि बिजें केलें: बकुळीं पूर्वाभिमुख नावेक आसन जालें: मग गुंफेसि बिजें केलें :।।:
  • (टिप – हे पहील्यांदा त्र्यंबकेश्वरकडे येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-सिन्नर-नासिक-अंजनेरि वरुण त्र्यंबकेश्वरकडे आले ब्रम्हेगरीचिये सोंडियेवरि गोसावी उभे राहिलें व तेथौनि येतयेतां सीतेचे कोथळे श्रीकरें दाखविलेः तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila –
  • Trayambakeshwar : समुद्र अवलोकणें :।।:
  • मग येतयेतां मार्गीः ब्रम्हेगरीचिये सोंडियेवरि गोसावी उभे राहिलें: आणि अवघेया भक्तिजना स्तीति संचरलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा देखिला पैल समुद्रः’’ म्हणौनि अवघे भक्तिजन पाहो लागलें: बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः कैसा बरवाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे पैल देखिलें पाणी जळमळीतु दिसत असेः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हो बाबाः दिसत असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे अवघी भूतसृष्टी कीं बाइः एथ कर्मलेप निमानणे आति परि निफज नाहीं:’’ :।।:
  • (टिप – हे पहील्यांदा त्र्यंबकेश्वरकडे येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-सिन्नर-नासिक-अंजनेरि वरुण त्र्यंबकेश्वरकडे आले, ब्रम्हेगरीचिये सोंडियेवरि गोसावी उभे राहिलें तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila –
  • Trayambakeshwar : रामतीर्थीं लक्षमणतीर्थीं आसन :॥:
  • उदयाचा पूजावसरु जालेयानंतरे गोसावी रामतीर्था बीजे केले : तेथ नावेक आसन जालेः रामविहरा लक्षमणविहारा अवलोकिलाः तेथ रामलक्षमणविहिरेयासमीप तयाची पाळी आसन जालेः गुळुळा जालाः विडा जाला :॥:
  • (.. हे पहील्यांदा त्र्यंबकेश्वरकडे येने. स्वामी वेरुळ-सिन्नर-नासिक-अंजनेरि वरुण त्र्यंबकेश्वरकडे आले व रामतीर्थीं लक्षमणतीर्थीं आसन झाले.)
  • Purvardha Charitra Lila –
  • Trayambakeshwar : गंगाळेया आसन :॥:
  • तैसेची गोसावी गंगाळेया बीजे केले : गंगाळे अवलोकिलें: तयाचीये पाळेवरी नावेक आसन जाले :॥:
  • (.. हे पहील्यांदा त्र्यंबकेश्वरकडे येने. स्वामी वेरुळ-सिन्नर-नासिक-अंजनेरि वरुण त्र्यंबकेश्वरकडे आले व गंगाळेया आसन झाले.)
  • Purvardha Charitra Lila –
  • Trayambakeshwar : कुशावर्ती आसन :॥:
  • कुशावर्ती पटिशाळें आसन जालेः तथा दुसरिये पटिशाळें: तथा कमळजै आसन जाले :॥:
  • (.. हे पहील्यांदा त्र्यंबकेश्वरकडे येने. स्वामी वेरुळ-सिन्नर-नासिक-अंजनेरि वरुण त्र्यंबकेश्वरकडे आले व कुशावर्ती आसन झाले.)
  • Purvardha Charitra Lila –
  • Trayambakeshwar : गौतमाळा गुंफे अवस्थानः :॥:
  • गोसावी गौतमाळेया बीजे केले : तेथ पाळीवरि गुंफा होतीः ते गुंफेसि गोसावीयांसि सप्तरात्र तथा पंचरात्र अवस्थान जाले :॥:
  • (.. हे पहील्यांदा त्र्यंबकेश्वरकडे येने. स्वामी वेरुळ-सिन्नर-नासिक-अंजनेरि वरुण त्र्यंबकेश्वरकडे आले व गौतमाळा अवस्थान झाले.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: