Sukadi Dakram (सुकडी डाकराम)

सुकळी (डाकराम) ता. तिरोडा जि. गोंदिया


डाकराम सुकळी येथील 3 स्थाने एकाच परिसरात गावाच्या पूर्वेकडे मोठ्या मंदिरात आहेत. 2 स्थाने गावाच्या पूर्वेकडे मोठ्या मंदिरात आहेत. व येथील 1 स्थान तलावात मंदीर आहे तेथे आहे.


जाण्याचा मार्ग :

सुकळी हे गाव, तिरोड्याहून आग्नेयेस 10 कि. मी. आहे. रामटेक ते सुकळी (तुमसर, तिरोडा मार्गे) 91 कि. मी. भंडारा ते सुकळी (तुमसर मार्गे) 60 कि. मी. नागपूर ते सुकळी (भंडारा, तुमसर, तिरोडा मार्गे) 122 कि. मी. नागपूर-गोंदिया लोहमार्गावर तिरोडा हे रेल्वे स्थानक आहे. तेथे उतरून सुकळीला जाता येते. रामटेकहून कन्हान जंक्शन मार्गे तिरोड्याला जाता येते. सुकळीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाची माहिती :

1.  निद्रा स्थान :

हे स्थान सुकळी गावाच्या ईशान्येस 200 मीटर अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे भीवेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.


लीळा : संध्याकाळच्या वेळी देवळाच्या चौकात येऊन बसणाऱ्या वाघास सर्वज्ञांनी सिंहनाद करून पळवून लावले. मग येथे निद्रा केली. (पू. ली. 33, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2.  सिंहनाद करणे स्थान :

हे स्थान निद्रा स्थान देवळाच्या पूर्वेस आवाराच्या दरवाजाच्या आत दक्षिण बाजूस आहे.


लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू संध्याकाळच्या वेळेस निद्रा करण्यासाठी भीवेश्वराच्या देवळाकडे येत होते. त्यावेळी लोकांनी सांगितले, “आपण तिकडे जाऊ नका. तेथे वाघ आहे.” सर्वज्ञ त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता देवळाकडे आले. आवाराच्या मुख्य दरवाजातून आत येताच देवळाच्या चौकात बसलेल्या वाघाने मोठ्याने गर्जना केली. तेव्हा सर्वज्ञांनीही सिंहासारखी गर्जना केली. त्यामुळे तो वाघ घाबरून आवाराच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला. (पू. ली. 33, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

चैत्र पंचमीच्या यात्रेला जमलेली भाविकांची गर्दी

3.  आरोगणा स्थान :

हे स्थान तळ्यामध्ये देवळात आहे. या स्थानाचा फार मोठा ओटा आहे. (ए. ली. ३२ ख. प्रत)

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू गावातून भिक्षा करून येथे आले. श्रीचरणाने शिळेवर पाणी टाकून शिळा स्वच्छ केली. त्यावर श्रीकरीचे भिक्षान्न ठेवले. मग आरोगणा केली. (पू. ली. 33, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


निर्देशरहित स्थान :

1. निद्रा स्थानाच्या पाठीमागे असलेले चंदनेश्वर नावाचे स्थान.

2. निद्रा स्थानाच्या पाठीमागे असलेले उखळेश्वर नावाचे स्थान.

3. सिंहनाद स्थानाच्या दक्षिणेकडे असलेले खिडकेश्वर नावाचे स्थान.

4. सिंहनाद स्थानाच्या अंगणात असलेले कापूर विहीर नावाचे स्थान.

5. निद्रा स्थानाच्या पूर्व दिशेला असलेल्या मंदिरातील उंबर वट नावाचे स्थान.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


6. सुकडी गावातील विघ्नेश्वर नावाचे स्थान.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. सुकडी गावातील श्री. बळीराम तेली यांच्या घरातील साधूल बाबा नावाचे स्थान.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

अशी एकूण 7 स्थाने निर्देशरहित आहेत.


सुकळीची एकूण स्थाने : 3

निर्देशरहित स्थाने : 7


  • Lila : Purvardha Charitra – 33
  • Sukali (Dakaram)  :  डांकरामी व्याघ्रविद्रावन :।।: 
  • गोसावी डांकरामासि बिजें केलें: गावां नांव डांकरामुः देवते नांव भीमेश्वरूः नगरांतु पाणिपात्र केलें: नदी श्रीचरणेंकरौनि सीळातळावरि उदक घालुनि तेथ अन्न ठेविलें: आरोगणा केलीः विळीचां वेळीं पहूडावेया भीमेस्वराचेया देउळासि बिजें करीत होतेः तवं गांवीचे लोक पारीं बैसले होतेः तेही लोकीं वारिलें: ‘‘देवन्हो एथ न वचाः न वचाः एथ वाघु येत असेः’’ गोसावी अगाध चक्रवर्तिः आइकौनि नाइकतेया भाषा बिजें केलें: गोसावी ‘आइकीलें’ म्हणौनि तयांकडें ऐसीं मागिल वास पाहिलीः तेही म्हणितलें: ‘गोसावी आइकीलें असैलः’ आणि गोसावी तेथ बिजें केलें: तवं तेथ वाघु आला होताः गोसावियांतें देखौनि तेणे हाक दिधलीः आणि दडी मारूनि पीलंगों आदरिलें: आणि गोसावी सिंहनादु केला आणि तो वाघु बोबाउनी हागिलाः मुतिलाः पौळी उडौनि तेथौनि पळालाः तें पौळी पडिलीः भयास्तव रानचि सांडौनि गेलाः मग गोसावियांसि तेथ पहूड जालाः उदेयाचि गोसावियांसि उपहूड जालाः चौकीं आसन असेः तवं गुरव मुख्यकरौनि समस्त गांवीचा लोकु पूजा बांधावा तेथ आलाः टाळः घोळः काहाळाः कांसोळीः मृदंगः ढोलः डोंडिचीः तुरें वाजवीतिः हाका बोंबा देत सिंहनादु देतिः परि वाघु निगेनाः प्रत्यही तें ऐसेचि करीतिः नीच ताचा बोबाट आइकौनि तो वाघु जाएः मग तें देवतेसि पूजा करीतिः तें न निगेः तेहीं म्हणितलेः ‘‘आजी आझुइं कां निगेना?’’ तवं एकीं म्हणितलें: ‘‘कोल वारीत वारीत देव माणुस एक एथ आलें होतें: तयाचेया अविसावरि बैसला असैल म्हणौनि न निगेः’’ ऐसें भीत भीत दारवंठां आलेः मग तेहीं दुरौनि पाहिलें: तवं चौकीं गोसावियांतें आसनीं उपविष्ट देखिलें: ‘‘आरे हें इश्वरपुरूख रेः’’ ऐसें म्हणौनि अवघे भितरीं साउमे आलें: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: मग पुसिलें: ‘‘जी जीः एथ वाघु आला होता कीं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आला होताः’’ तेहीं पुसिलें: ‘‘जी तरि तो कैसेनि गेला? तयासि काइ केलें जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यातें देखौनि तेणें हाक दिधलीः एथौनि सिंहनादु केलाः तो गेलाः डाडाउनी हा ठावो सांडुनि पौळी उडौनि पळालाः तें हें पौळी पडिली असेः’’ म्हणौनि श्रीकरे दाखविलेः तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः तरि तो मागुता येइल की?’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नाः अद्यप्रभृति तो एथ न ये होः तो हें रान सांडौनि पळालाः हें स्थान निर्माेकळ जालें:’’ इतुकेनि गोसावी बिजें केलें: मग तें स्थान वसतें जालें :।।: महादाइसे वाराणसीं गेली होतीः तो पव्हा तेया वाटा आलाः तेथील लोकु म्हणेः ‘‘हे स्थान आधी वाघाभेण उध्वंस होतें: महादाइसीं म्हणितलें: ‘‘हें कोणी परि वसतें जालें गाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘साचोकारा रामु एथ आलाः तो चौकी आसन घालुनि बैसलाः तैसाचि वाघु गेलाः आणि तैलागौनि हें स्थान वसतें जालें: निरुपद्रव जालें:’’ ऐसीं गोष्टि महादाइसीं गोसावियांपुढां सांघितलीः त्याउपरि गोसावी महादाइसांपुढा हें गोष्टि सांघितलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तियें दिउनी तें स्थान सेव्य जालें: पाळते जालें:’’:।।: (हे गोष्टि गोसावी महादाइसाप्रति सप्तमात्रकां सांघितली :।।:)


Sukadi (Dakram) Sthan Darshan by Sarang Dhar || Jay Krishni Mahanubhav ||



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: