Sinnar (सिन्नर)

सिन्नर, ता.सिन्नर.जि. नाशिक


येथील 13 स्थाने 5 ठिकाणी आहेत.
(1) भीलमठ - सिन्नर शहरात 14 चौकाचा वाडा/भिलमठ या मंदीरात व आवारात 9 स्थाने आहेत.
(2) पट्टिशाळा मंदीर - सिन्नर शहराच्या वायव्येस देवी रोडवर गणपती साँमील जवळ, पट्टिशाळा मंदीरात 1 स्थान आहे.
(3) आवेश्वर मंदीर - सिन्नर शहराच्या वायव्येस पट्टिशाळा मंदीरा जवळ आवेश्वर मंदीरात 1 स्थान आहे. 
(4) गोंदेश्वर मंदीर - सिन्नर शहराच्या ईशान्येस गोंदेश्वर मंदीरात 1 स्थान आहे. सभामंडप/चौक म्हणजे हे 1 स्थान होय.
(5) भोजनता/विरहण - सिन्नर शहराच्या दक्षिणेस शीव नदीच्या काठावर मंदीरात 1 स्थान आहे.

(व्यवस्थित चौकशी करुन स्थाने करावी लागतात, नाहीतर स्थाने सुटतात)


जाण्याचा मार्ग :

सिन्नर हे शहर, पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून उत्तरेस 181 कि. मी. आहे व नाशिकहन आग्नेयेस 29 कि. मी. आहे. खोपडीहून पश्चिमेस सिन्नर 13 कि. मी. आहे. सिन्नरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


11 व्या शतकातील (श्रीनगर) सिन्नर, राजा फत्तेसिंह रस्त्यावर असलेल्या 14 चौकाच्या वाड्यातील उत्तराभिमुख देऊळ. सर्वज्ञांच्या वेळी या देवळास ‘भिल्लमठ’ असे नांव होते. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खोपडीहून येथे आले, येथे स्वामींचे 10 महिने वास्तव्य होते. त्यांनी एक दीपावली’ ही येथे साजरी केलेली आहे. तसेच या ठिकाणी कृष्णमुनी विरचित ऋक्मिणी स्वयंवर’ या ग्रंथांची निर्मिती करताना सर्वज्ञांनी त्यांच्याच शिष्याच्या रुपात येऊन भेट दिली होती.

स्थानाची माहिती :

भीलमठ येथील स्थाने :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील 9 स्थान. (एकाच आवारात आहेत)

1. अवस्थान स्थान :

हे स्थान सिन्नर शहरातील ‘राजा फत्तेसिंह’ पथावर असलेल्या चौदा चौकाच्या वाड्यात उत्तराभिमुख हेमाडपंथी देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी या देवळास ‘भीलमढ’ असे नाव होते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात खोपडीहून सिन्नरला आले. त्यांचे या ठिकाणी दहा महिने वास्तव्य होते. (पू.ली.236,स्था.पो.)

येथील इतर लीळा :

1) येथे सर्व भक्तजनांनी मिळून सर्वज्ञांच्या ठायी दवणा पर्व केले. मग सर्वजण खाली बसले. सर्वज्ञांच्यापासून सर्व भक्तजनांना स्थिती झाली.याच प्रसंगी सर्वज्ञांनी एल्हभटांचे ‘अवडळभट’ असे नामकरण केले. (पू.ली.241, स्था, पो.)

2) दायंबा जवळीक कथन, अन्य व्यावृत्तीप्रकरण निरुपण. (पू. ली. 244)

आतमधील महास्थानाच्या पुर्वेकडील दोन पाषाणी खांब नमस्कारी आहेत. तसेच आतील सर्व मठाला संबंध आहे. तसेच पाषाणी दरवाजा ही नमस्कारी आहे. (शा.ली.पु. 244)


2. महादाइसा, उमाइसा भेटी स्थान :

हे स्थान देवळापुढील पूर्व पश्चिम, उत्तराभिमुख दगडी पटीशाळेत दरवाजाच्या पूर्व बाजूस आहे.

लीळा : सर्व भक्तजन रामसगावहून सिन्नरला आल्यावर त्यांनी भीलमढाच्या शेजारीच राहण्यासाठी जागा घेतली. मग दादोस व भटोबास पाने. सुपाऱ्या. पूजाद्रव्ये आणण्यासाठी बाजारात गेले. तेवढ्या वेळात माहादाइसा आणि उमाइसा भीलमढाकडे आल्या. त्यावेळी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पटीशाळेवर येथे बसलेले होते. सर्वज्ञांची भेट झाली. त्यांनी आसनावर सुपाऱ्या ठेवल्या. दंडवत घातले. ही मराठी भाषेची आद्यकवियत्री महादाईसा व उमाइसाची सर्वप्रथम भेट होय. (पू. ली. 238, स्था. पो. उ. प्रत)


3. देवा, भटा, आबाइसा भेटी स्थान :

हे स्थान महादाइसा, उमाइसा भेटी स्थानापासून पूर्वेस 2 फूट 10 इंच अंतरावर आहे.

लीळा : दादोस, भटोबास, आबाइसा, माहादाइसा, उमाइसा, एल्हंभट हे सर्व भक्तजन रामसगावहून सिन्नरला सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूच्या दर्शनाला आले. येथे सर्वज्ञांची भेट झाली. त्यांनी पाने, सुपाऱ्या, पूजाद्रव्ये आसनावर ठेवली. दंडवत घातले. श्रीचरणा लागले. बाइसांनी सर्वज्ञांना विडा दिला. त्यानंतर तांबोळाचा प्रसाद सर्व भक्तजनांना दिला. त्यावेळी भटोबासांना स्थिती झाली. येथे आचार्य श्री नागदेव व स्वामींची प्रथम भेट झाली. (पू. ली. 239, स्था. पो.)


4. गुजरवेषे, गुजरभाषा बोलणे स्थान :

हे स्थान महादाइसा, उमाइसा भेटी स्थानापासून उत्तरेस 5 फूट 3 इंच अंतरावर आहे. या स्थानाच्या उत्तर बाजूचा खांब नमस्कारी आहे.

लीळा : देवगिरीचा ‘महादेव’ राजा मुंबई शहरातील माहिम विभागाकडे फिरतीसाठी गेला होता. तो येताना सिन्नरला आला. तेव्हा तेथे त्याला समजले की, वेरूळला जे पुरुष होते व ज्यांच्या दर्शनाची आपणाला उत्कट इच्छा होती, ते पुरुष येथे आहेत. राजाच्या मनात पुन्हा सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. म्हणून त्याने पाल्हाडांगीयाला शोध घेण्यासाठी पाठविले. पाल्हाडांगीया सिन्नरमधील सर्व देवळे शोधीत शोधीत भीलमढाकडे आला. त्याला वाटले. हे लहान देऊळ आहे. बहतेक ते पुरुष येथे नसतील. म्हणन आपण आवाराच्या दरवाजापाशी उभा राहिला व सेवकाला आत पाहण्यासाठी पाठविले. त्या वेळी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे पटीशाळेवर खांबाच्या आड गुजराथी वेष धारण करून उभे होते. सेवकाने विचारले, “येथे श्रीचांगदेवराऊळ गोसावी आहेत का?” सर्वज्ञ म्हणाले, “चांगदेवओराऊळ नेणों : ना बांगदेओगऊळ नेणों : म्हातारी एकि छे : ते गांवामाहिं भीक्षा मागण गै छे : यौ सही छा:” असे गुजराथी भाषेत उत्तर दिल्यावर ते येथून निघून गेले. (पू. ली. : 237, स्था. पो.)


5. मादने स्थान :

हे स्थान लाकडी पटीशाळेच्यापुढे पूर्व बाजूस वेढे स्थानांच्या उत्तरेस आहे. (स्था, पो.)

लीळा : या स्थानावर स्वामींना सुगंधीत द्रव्याने यथोपचार पध्दतीने स्नान विधी होत असे.


6. वेढे स्थान :

हे स्थान दगडी पटीशाळेपुढील लाकडी पटीशाळेवरील पूर्व भिंतीलगतच आहे.

लीळा : या स्थानावर स्वामीं वेढे करीत असत.


7. भटा श्लेष्मा परिहासू कथन :

हे स्थान दगडी पटीशाळेपुढील लाकडी पटीशाळेवरील दक्षिण भिंतीलगतच आहे.

लीळा : दादोस (रामदेव) याला इतर साधनेतील काही गुण अवगत होते. त्या गुणाव्दारे भटोबासांचा श्लेष्मा झाडू गेले होते. परत आल्यावर स्वामींनी भटोबासांना विचारले, ‘आपण कोठे गेला होतात?’ यावर भटोबास उत्तरले ‘जी जी : श्लेष्मा झाडू गेला होता’ यावर स्वामींनी भटोबासांना सांगितले की, दादोसांकडे जेतूके साधने आहेत, ते तुमचा श्लेष्मा हरण करण्यास असमर्थ आहेत. ती इतकी अपूर्ण आहेत की, त्या व्दारे गवताची
एक काडीही मोडु शकत नाही. तेव्हा अज्ञान, अन्यथाज्ञान, दु:खरुप श्लेष्मा काय दुर करु शकेल? त्याच्या जवळ जी साधना आहे. ती आम्हापासून आहे म्हणून तुम्ही आम्हाला शरण या असे स्वामींनी सांगितले. (पू. ली. : 240)


8. माहादाइसा बोळवीत राहावणे स्थान :

हे स्थान देवळाच्या ईशान्येस पश्चिमाभिमुख पडवीत आहे.

लीळा : दादोस, भटोबास मुख्यकरून सर्व भक्तजन गावाकडे परत निघाले असताना सर्वज्ञ माहादाइसाला पोचवीत येथपर्यंत आले. त्यांनी माहादाइसाला सन्निधानी राहुन दास्य करण्याविषयी सांगितले; पण माहादाइसा राहिल्या नाही. (पू. ली. 246, स्था, पो.)


9. लघुपरिश्रय स्थान :

हे स्थान देवळाच्या प्रदक्षिणा मार्गावर लहान देवळीमध्ये देवळाच्या पूर्व भिंतीला लागून आहे. (स्था. पो.)


10. गोंदेश्वराच्या चौकातील विहरण स्थान :

हे स्थान सिन्नर शहराच्या ईशान्येस देवळापासून (भीलमठापासून) 800 मीटर अंतरावर गोंदेश्वराच्या पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : एके दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू भक्तजनांसहित विहरणासाठी येथे आले. त्यांना चौकात आसन झाले. जवळ सर्व भक्तजन बसले. मग सर्वज्ञांनी, गोंदेश्वराच्या देवळापुढे पद्मेश्वराचे देऊळ कोणी बांधले, याची माहिती भक्तजनांना सांगितली. (पू. ली. 245, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


11. पट्टीशाळा स्थान :

हे स्थान सिन्नर शहराच्या वायव्येस देवळापासून (भीलमठापासून) 1 कि.मी. अंतरावर, गणपती साँमील जवळ, देवी रोड च्या उत्तर बाजूस दक्षिणाभिमुख देवळात आहे.

लीळा : एके दिवशी स्वामी भक्तजनांसंगे या ठिकाणी आले स्वामींना पाठ शिवणीचा खेळ खेळण्याची ईच्छा झाली ते आपल्या डखले नामक भक्तास म्हणाले ‘डखले आम्हाला शिवाल’ असे म्हणून डखले व स्वामी एकमेकांना शिवण्याचा खेळ खेळू लागले खेळ खेळतांना या मंदिराच्या उत्तरेस असणाऱ्या पाण्याच्या पाटातील पाणी स्वामी डखलेंवर उडवित डखले ही स्वामींवर पाणी ऊडवित असे स्वामी पाण्याच्या पाटावरुन ऊडी मारुन पलिकडे जात एकदा डखले पाण्यावरुन ऊडी मारत असतांना स्वामी डखलेला ढकलून देतात डखले पाण्यात पडताच पाणी व चिखल स्वामी मूर्तीवर ऊडते हे बघुन भक्तजनांना डखलेचा राग येतो भक्तजानांपैकी दादोस डखलेंना म्हणाले ‘डखले जो खेळ तुम्ही स्वामींबरोबर खेळता आहात त्यामुळे तुम्हाला दोष लागेल, स्वामी ईश्वर आहेत’ त्यांना खेळ वैगेरे कसला ! यावर डखले म्हणाले आम्ही स्वामींबरोबर हसी मजाक करतो’ त्यामुळे मी दोष कसा लागेल ? यावर स्वामी म्हणाले ‘दादोस तुम्ही डखलेंवर ऊगाच का रागावतात ? आम्हालाच खेळ आवडतो असे म्हणून स्वामींनी भक्तांमधील भांडन मिटविले. (पू. ली. 242, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

वीडियो मध्ये प.पु.म. श्री डोळसकर बाबाजी शास्त्री हे आहेत. यांचे आश्रम “श्री दत्त मंदिर, महानुभाव आश्रम, करंजगाव” हे आहे, नांदूर आणि निफाड या दोन्ही स्थाना वरून आश्रम 8 कि.मी.

12. आवेश्वराच्या देवळातील विहरण स्थान :

हे स्थान पट्टीशाळा स्थानापासून वायव्येस 150 मीटर अंतरावर आवेश्वराच्या पूर्भिवाभिमुख देवळात आहे.

लीळा : एके दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू भक्तजनांसहित विहरणासाठी येथे आले. त्यांना चौकात आसन झाले. जवळ सर्व भक्तजन बसले. मग बाईसांनी विचारल्यावर सर्वज्ञांनी, आवेश्वराच्या देवळाचे नाव आवेश्वर कसे पडले, याची माहिती भक्तजनांना सांगितली.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


13. अवस्थान स्थान/भोजनता :

हे स्थान सिन्नर शहराच्या दक्षिणेस पुणे-नाशिक महामार्गाच्या पलीकडे शिव नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वैजनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : भीलमढी दहा महिने अवस्थान झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. (पू.ली. 247, ख.प्रत) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे भीलमढी दहा महिने वास्तव्य झाल्यावर वैजनाथाचा देऊळी तीन दिवस वास्तव्य झाले. त्यानंतर पुन्हा भीलमढी एक रात्र मुक्काम झाला. एकण दहा महिने चार दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून भगूरला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. सिन्नर शहराबाहेरील आसन स्थान.

2. भीलमढाच्या जगतीच्या दारवठ्याच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.

3. भीलमढाच्या पश्चिमेच्या चतुर्मुखाच्या देवळातील आसन स्थान.

4. भीलमढाच्या वायव्येस नारायणाच्या देवळातील आसन स्थान.

5. भीलमढाच्या पश्चिमेस भैरवाच्या देवळातील आसन स्थान.

6. भीलमढाच्या पूर्वेचे परिश्रय स्थान,


सिन्नरची एकूण स्थाने : 19


  • Purvardha Charitra Lila – 236
  • Sinnar : श्रीनगरी भिलमढीं अवस्थान :।।:
  • गोसावी श्रीनगर पातलेः नगरांतु हाटवटीयाः चैबारी मढमंडे अवलोकीत भिलमढी बिजें केलें: गोसावियांसि चौकीं आसन जालें: दुपाहाराचां पूजावसर आरोगणा जालीः विळीचाचा पूजावसरू व्याळी जालीः मग गोसावियांसि भिलमढीं अवस्थान जालें: मास दहाः गोसावी तेथ राज्य करूं लागलेः गोसावियांसि तिन्ही पूजावसर होतिः आरोगणा होएः गुळळा होएः विडा होएः आंतु देवतेपूर्वे उत्तरामुख आसन होएः तेथचि पहूड होएः गोसावी प्रत्यही विहरणा बिजें करीतिः कहीं गावांउत्तरें ताएस्वर पूर्वाभिमुखः तेथ विहरण होएः कहीं सिद्धनाथ पूर्वाभिमुख तेथ विहरण होएः कहीं आग्ने कोनी चतुर्मुख तेथ विहरण होएः कदाचित अन्यत्रही स्थानी विहरण होए :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila – 237
  • Sinnar : राजेयाप्रेषित पुरूख स्वयंनाम गोपन :।।:
  • महादेवोरावो एळापूरावरौनि तैसाचि महिंबा ठाणेया कटकैये गेला होताः तो येत येतां सप्तश्रुंगा वरूनि श्रीनगरा आलाः तेणें म्हणितलें: ‘‘हे नगर बरवें: तरि एथ गोसावी असतिः’’ तवं तेथ तेणें आइकीलेः जे ‘एळापूरीं पुरूख होतेः तें एथ असतिः’’ म्हणौनि पाल्हा डांगेयातें पाहों धाडिलें: ‘‘पाल्हेया जाये पां रेः गोसावियांतें पाहेः सोधुनि येः’’ तेणें म्हणितलें: ‘‘हो कां:’’ म्हणौनि तो अवघीं देउळें पाहौनि भिलमढासि आलाः ‘‘एथें काइ असतीः हा धाकुटा मढुः’’ म्हणौनि आपण बाहीरिली दारवंठां उंबरवठां राहिलाः भितरीं पाइक जनु पाहों धाडिलाः गोसावियांसि दुपाहारीचां पूजावसर जालाः आरोगणा जालीः बाइसें गावांतु भिक्षे गेलीः पहूड उपहूड करौनि सोरठी जाडी प्रावर्ण करौनि गोसावी गुजरवेष घेतलाः गुजरदौंडी बांधलीः पटिशाळेवरि मदळसेसी खांबाआड त्रिभंगीं ठाण मांडुनि मदळसा धरूनि चरणचार्य उभे असतिः तवं तो पाइकजनु भितरीं आलाः तेणें पुसिलें: ‘‘एथ महात्मे असति की?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मेः बाहात्मेः इहा को काही नथीः हुं इहां अछोः’’ मागौतें तेणें पुसिलें: ‘‘श्रीचांगदेवोराऊळ गोसावी एथें असति कीं?’’ गोसावी कठीण उत्तर बोलिलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘सूं चांगदेवोराऊळ रेः मां नथीः चांगदेवराऊळ नथीः ना बांगदेवराऊळ नथीः मां इहां कोइ नथीः काइ नथीः ‘चांगदेवोराऊळ न जाणोः ना बांगदेवोराऊळ न जाणोः डोसी बाइ एकीं थीः तें भिक्षा मागन गै छेः हुंउ झांजनु गुजर इहां छोः’’ मग तो गेलाः तेणें उपहत अप्रशस्त देखौनि पाल्हाडांगीयापुढां सांघितलेः ‘‘तेथ श्रीचांगदेवराऊळ नाहीतः एक झांझन लाड असेः तयासि गुजरवेख असेः’’ मग पाल्हाडांगीया गेलाः तेणें रायापुढां सांघितलें: ‘‘एथ श्रीचांगदेवराऊळ नाहींतिः’’ परि राजेनि अवघीं स्थानें निरीक्षणें करौनि पाहाविलें: परि गोसावी दरीसन नेदितीचिः मग रायें म्हणितलें: ‘‘आहाः तैं तरि तैं पुरूखाचें दरीसन नव्हेचिः आतां तरि आतांहीं तया पुरूखाचें दरीसन नव्हेचिः’’ ऐसें म्हणौनि बहुत आत्मनिवेदन केलेः दुःख केलें: अपरीतोखु करौनि निगालाः हें अवस्था देहावधी होतीचिः तवं बाइसें भिक्षा करौनि आलीः हस्तीचे किंकाटः घोडेयाचें हींसः निसानाचें निनादः माणसाचा गर्जं ऐसें देखौनि बाइसीं पुसिलें: ‘बाबाः हा कव्हण?’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा महादेवराओः महिंबा ठाणेया गेला होताः’’ ऐसें गोसावी बाइसांपुढां अवघें सांघितले :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila – 238
  • Sinnar : महादाइसां: उमाइसां भेटि :।।:
  • आबैसाचा वडीलु पुत्र सारंगपाणी देशाउरा गेला होताः वाटें येतां तो चोरीं उपद्रविलाः तो सरलाः लेकी उमाइसाचें हातैरितैलेः तेणें दुःखें आबैसीं क्षेत्रसंन्यास घेतलाः रावसगावांसि आलीः भटीं रावंसगावीं सिद्धनाथी गुंफा केलीः तेथ तियें राहिलीः जवळी महादाइसेः उमाइसें: तेथ मास उपवास करीतिः कृछ चंद्रायणें व्रतें आचरतिः तवं तेथ दादोस आलेः तें आबैसांसि काही बरवें बोलेतिः तेणें दादोसांपासौनि स्तीति जालीः एकु दी तेथ दादोस आलेः दारीं अर्धपौचा वाहाणा फेडिलियाः आणि आपण भितरीं बैसले असतिः दादोस आबैसांसि काही बरवें बोलत असतिः तवं तेथ भट मोकळा कासोटाः आडवी वेणीः खांदावरि खांडेः ऐसें आबैसातें पडिताळावयां आलेः भट राउतपाइकवृत्ति वर्ततिः पटिशाळेवरि वेंघलेः तवं बाहिरी अर्धपौचा उच्चा वाहाणा देखौनि क्षोभलेः मग भटीं म्हणितलें: ‘‘वाहाणा काइसीया पायः’’ म्हणौनि ऐसें वोणऊनि पाहातिः तवं दादोसांतें भितरीं ओटयावर बैसलेयां देखिलें: आणि तमलेः दारीं अर्धपौचा वाहाणा होतियाः तिया खांडा सिरौनि जगतिचिये पौळी बाहीरि टाकिलीयाः तें दादोसीं देखिलें आणि भियालेः हळुचि उठिलेः सागळ घोंगडें घेतलें: दंड कमंडलु घेतलाः बाहीरि गेलेः वाहाणा पाहुनि घेतलियाः जाउनी तयाचि मागीला बाहीरिला वडाखाली बैसलेः महादाइसें: उमाइसें: तयातें देखौनि भियालीयाः तियाही पळालीयाः भटीं म्हणितलें: ‘‘हे काइ आबै?’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘ना हें महात्मेः निरूपण करीत होतें:’’ तवं भटीं म्हणितलें: ‘‘महात्मे काइसे? गोष्टि काइसेया? तुम्हां बाइलांतु दादुलेयाचा प्रवेश काइसां? निके करीतें असा हो आबैः हें रूपै धाकुटीः उमै धाकुटीः याचिकारणें तुम्हीं एथें गुंफा केली कीं:’’ ऐसें कोपलें: तवं आबैसीं तें उर्मी साहिलीः मग निवृत्ति जालेया आबैसीं म्हणितलें: ‘‘हे काइ नागदेवाः सरः हें तुज काइ जाले? या महात्मेयां तू जाणेसि ना हें दादोस निकेः या महात्मेयापासौनि आनंदु होएः स्तीति होएः यापासौनि गोमटें आतिः’’ भटी म्हणितलें: ‘‘तरि काइः होइल मां काइ रूपैयेसिः उमैयेसि होइलः हें तरणेधारेः याही तरणीयांधारियाः स्त्रियेसि पुरूखापासौनि होइल आणि काइः एथ मढी काइसेया बांधलीः याचि गोमटेयाकारणें बांधली असे?’’ तवं आबैसीं म्हणितलें: ‘‘ऐसें कैसें म्हणत अससिः न बोलः न बोलः तोंडें पाप नको घेवोः’’ भटी म्हणितलें: ‘‘तरि मज हो कां: मग जाणों:’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘होइलः हें महात्मे निकेः यांते मियां जेवावेया म्हणितलें होतेः अन्न रांधिलें असेः भानेयावरूनि उठविजेः तरि आयुष्य भविष्य उणें होएः भला काइ म्हणूं तुतें:’’ मग भटीं म्हणितलें: ‘‘तरि जावो बोलाउ?’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘जाए बोलावीः’’ तवं भटीं पुसिलें: ‘‘ते आता काइ बोलविले येति?’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘ना हो येतिः आता बोलावीः’’ भटीं म्हणितलें: ‘ेति तरि महात्मे होतिः ना जरि बोलाविलेयां न येति तरि नव्हतिः’ भटीं पुसिलें: ‘‘तरि काइ म्हणो?’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘ना आबैसीं तुमते बोलाविले असेः ऐसें म्हणा आणि येतिः’’ भटीं म्हणितलें: ‘‘हो कां:’’ म्हणौनि गेलेः तवं तें वडाखाली बैसले असतिः दादोसाते म्हणितलें: ‘‘महात्मे हो चालाः तुमतें आबैसें बोलवितें असतिः’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘हो कां: चालाः’’ मग तेहीं घोगडें घेतलेः वाहाणा घेतलियाः आलेः भटीं पोटीं म्हणितलें: ‘हे महात्मे होतिः यांसि राग द्वेषु तम नाहीं:’ दादोस आलेः आसन घातलेः बैसलेः मग आबैसीं पाय धुतलेः ठाय केलेः दादोसाचिये पांती भट जेविलें: मग दादोस विळीचाचा वेळीं गंगेकडें गेलेः भट बिढारीं राहिलेः आबैसीं म्हणितलें: ‘‘नागदेयाः ऐसा दादोसाकडें जाये पां: काइ करीताती तें पाहेः’’ भट गेलेः तवं बैसले असतिः जाउनी तयाजवळी बैसलेः पुसिलें: ‘‘म्हणे तुम्हांपासौनि अकृतिम आनंदु होएः’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘नाः आम्हांपासौनि होए ऐसेंही आतिः आणि नव्हे ऐसेंही आतिः आमचेया गोसावियांपासौनि होएचिः ऐसें सर्वथा आतिः’’ आणि नाम आइकत खेवी भटां स्तीति जालीः भोगिलीः केतुला एक काळ स्तीति भोगीतचि होतेः मग दादोसीं म्हणितलें: ‘‘आता चाला नागदेवो भटोः’’ आणि स्तीति भंगलीः उठिलेः दादोसांचें घोंगडें घेतलें: कमंडलु घेतलाः दोघै बिढारा येत असतिः आबैसीं देखिले आणि सुख जालें: भटोबासांसी दादोसांची आवडी संचरलीः विळीचां पांती दोघै जेविलेः रात्री गोष्टि करीतां भटीं पुसिलें: ‘‘तुम्ही आतां कोठें जात असा?’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘ना मीं आपुलेया गोसावियांचीया दरीसना पर्वाकारणें जात असों:’’ भटीं म्हणितलें: ‘‘ते तुमचे गोसावी कव्हणीकडें असति?’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘नाः श्रीनगरीं राज्य करीत असतिः’’ भटीं म्हणितलें: ‘‘तयांचेया दरीसना आमतें न्याल?’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘ना नेउनिः’’ भटीं म्हणितलें: ‘‘तुम्हीं कै जाल?’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘ना पर्वालागी जाउनीः’’ भटीं म्हणितलें: ‘‘आमचेया गावां याः मां तेथौनि जावों?’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘हो कां:’’ भटीं म्हणितलें: ‘‘कै याल?’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘ना आमकां दिसीं येउनिः’’ ऐसा सिद्ध जालाः दादोसीं म्हणितलें: ‘‘आबैसांतें घेउनि या होः’’ भटीं म्हणितलें: ‘‘हो कां:’’ भटीं आबैसांप्रति आनंदकथा सांघितलीः ‘‘हे भले असतिः ऐसें अन्यत्र न देखों: तरि चाला यांचेया गुरुतें पाहों: तें कैसें असति?’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘हो कां:’’ यावरि आबैसां थोर सुख जालें: मग भट गावां निगालेः निगतां आबैसासि निरोप दिधलाः जे ‘आबै दादोसातें गावां घेउनि या होः’ आबैसीं म्हणितलें: ‘‘हो कां: आणीनः’’ महादाइसीं आबैसातें म्हणितलें: ‘‘आबाइः म्हण कां नागदातें: हा येउ देइल तरि आम्हासि गोसावियांचें दरीसन होइलः’’ मग आबैसीं भटातें पुसिलें: भटी म्हणितलें: ‘‘ना हो कां: आइती कराः’’ तेहीं आइती केलीः मग आबैसें: उमाइसें: महादाइसें: दादोसः ऐसीं साडेगावांसि आलीः दादोस गंगे गेलेः तियें गृहा गेलीं: बाहीरिलीकडौनि भट आलेः ‘‘महात्मे देखों नाः’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘गंगे गेलेः’’ पुढति आबैसीं म्हणितलें: ‘‘बोलावीः गंधाक्षत करूं:’’ भटीं म्हणितलें: ‘‘हो कां:’’ म्हणौनि बोलाविलें: अर्घपाद्य करौनि गंधाक्षता केलियाः अवघीं जवळी बैसलीं: दादोसातें पाहुनरालागी म्हणितलें: पाहुनर केलाः मग दादोस गंगे गेलेः वाळवंटीं बैसले असतिः भट आलेः पुढां बैसलेः आणि स्तीति जालीः दादोस बिढारां निगालेः भटीं हातीं करवती घेतलीः घोंगडें घेतलें: उमाइसीं म्हणितलें: ‘‘रूपैः दादोसांपासौनि नागदेयासि काही गोमटें जालें:’’ मग दादोसः आबैसें: उमाइसें: महादाइसें: भटः एल्हंभटः ऐसीं गोसावियांचिया दरीसना निगालीः तियें बळ्हेग्रामासि आलीः तेथ दायंबा चांगदेवभट भेटलेः तेही सरिसे निगालेः ऐसीं श्रीनगरा आलीः आबैसीं भिलमढा सेजें बिढार केलें: दादोस आणि भट हाटां गेलेः पानेंपोफळें पूजाद्रव्य घेतलीः तियेत दादोसीं म्हणितलें: ‘‘नागदेयाः आम्हीं गोसावियांचे उचिष्ट घेऊनिः आमचे गुरु म्हणौनिः परि तुवां नेघांवे होः गोसावी काइ म्हणौनि नेणिजतिः’’ ऐसीं व्यावृत्ति केलीः भटी म्हणितलें: ‘‘हो कां:’’ उमाइसीं म्हणितलें: ‘‘रूपैः दादोसः नागदेवो जवं पानेंपोफळ घेउनि येति तवं दादोसांचें गुरु पाहौनि येवों? पैली देऊळीं असति चालाः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘ना हो कां:’’ म्हणौनि पांचपांच पोफळे घेतलीः गेलीः तवं गोसावियांसि आरोगणा जालीः पहूड उपहूड जालाः मां आंगणीं वेढे करीत असतिः तवं तिया दोन्हीं दारसंका धरूनि भितरीं पाहों लागलीयाः तवं गोसावियांतें देखिलें: आणि गोसावियांची श्रीमूर्ति पाहातेंचि ठेलीः तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइ याः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः आलोः’’ आणि परमसंतोखें आलीयाः मग गोसावी पटिशाळे आसनीं उपविष्ट जालें: तेही आसनावरि पांचपांच पोफळे ठेविलीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीयाः मग बैसलीयाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइया कोणीकडौनि येत असति?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘रावंसगावांकडौनिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कोणीकडें जाणें?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना त्रियंबकाकडेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘रावंसगांवी महादेवो पाठक नावें ब्राम्हणु असे कीं: तें निकेनि असति?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जी निकेनि असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाल तैं ऐसें म्हणावें: हें तुमतें पुसत होतें:’’ बाइसी पुसिलें: ‘बाबाः आपण केवी जाणिजे? बाबा पुसति ऐसा कव्हण ब्राह्मण बाबा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइ तो एथचा यजमानुः’’ बाइसी पुसिलें: ‘‘तो कैसा बाबा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः बोणेबाइयांसांघाते हें आले तें एथ पाणीभातुः बाबुळसेंगाः संपादीलियाः’’ म्हणौनि अवघी गोष्टि सांघितलीः मग तियें दंडवत घालुनि बिढारां गेली :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila – 239
  • Sinnar : देवां भटां भेटि :।।: / दादोसां भटां भेटि :।।:
  • दादोस पानेंपोफळें घेउनि आलेः आणि अवघीचि गोसावियांसि दरीसना आलीः दादोसी जेथौनि गोसावियांतें देखिलें: तेथौनि दंडवतें घालीतचि आलेः मग दादोसांसि मढाआंतु भेटि जालीः गोसावी उठौनि दादोसांसि क्षेम दिधलें: दादोसी दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलेः आसनावरि पांच पोफळें ठेविलीं: एरीं अवघां दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: उमाइसें: महादाइसें: श्रीचरणां लागलीः हळुचि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘त्रियंबकबाइया एथचियाची मां:’’ तें गोसावी आणि तियेंचि जाणतिः पानेपोफळें पूजा आसनावरि ठेविलीः मग अवघीचि बैसलीं :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila – 240
  • Sinnar : भटां श्ळेष्माहरणीं परीहासुनी सुककथन :।।: / तथा श्लेष्माहरणी अभ्यासु निराकरण :।।:
  • तैसेचि भट गंगेकडें गेले होतेः गोसावी बाहीरि विहरणां बिजें केलें: तवं भट पैलाकडौनि बिढारा येत होतें: ऐसीं पौळीपासी इशान्य कोनी भेटि जाली गोसावी पुसिलें: ‘‘क्यें गेले होतेति?’’ भटोबासीं म्हणितलें: ‘‘जीः जीः श्लेष्मा झाडूं गेला होताः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हां महांत्मेयापासौनि जे जालें असे तेणें सिवनी रांड नव्हेः मां तुमचा श्लेष्मा काइ झडेलः इतुला एक गुण जाला होताः तोही एथिचिया स्तीति पासाव गेलाः आम्हींचि केलें ऐसें होतेः तेहीं गेलेः मां तयाचेनि तुम्हासि काइ होइलः तयाचेनि आड गेलेया तण न मोडेः’’ पुढति सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हा स्तीति तें एथुनिची संचरिली म्हणौनि जालीः’’ एतुलेनि तयासि गर्व होता तो गेलाः’’ इतुकेनि भट संदेहीं पडलेः नमस्कार करौनि विचारीत बिढारा गेलेः गोसावी विहरण सारूनि स्वस्थानासि आलेः परि मनोधर्म भटांवरिलु हेतु काढिला नाहीं :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila – 241
  • Sinnar : दवनीकापर्वीं/दमनिकारोपणी डखलेयां स्तीति :।।:
  • ऐसां एकु दिसीं दवणे पर्वाचां दिसु आलाः बाइसीं गोसावियांचां ठाइं सडासंमार्जन चौकरंगमाळीका भरीलियाः अवघां पानेंपोफळें दवणा आणिलाः अवघीं न्हालीं: गोसावियांसि बाइसीं मर्दना मार्जनें केलें: पूजा केलीः धूपार्तिः मंगळार्ति केलीः तवं दादोस शिक्ष्यासी दवणा वाउं आलेः गोसावियांसि दवणा वाइलाः पानेंपोफळें ओळगवीलीं: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: यापरि समस्तींहीं गोसावियांसि दवनेपर्व केलें: श्रीमूर्ति अवलोकीत बैसलेः नाना कुंदौलांचियां माळाः अनेकां आभरणीं विराजमान श्रीमूर्ति निश्चळता स्वीकरौनि भक्तिजना अवसरू देत असतिः गोसावी जयातें कृपादृष्टी अवलोकीति तया स्तीति होएः ऐसें अवघेही स्तीति भोगीत बैसलेः डखले उगेचि दुःख करीत बैसले असतिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘डखलेयाः एथ येहीं अवघा पर्व केलें: तुम्हीं न कराः तें काइ?’’ डखला म्हणितलें: ‘‘ना जीः मातें दवणा नाहीं: ये दैवाचीः यातें करावेया असेः मातें काहीचि नाहीं जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे देइलः बाइः यांसि दवणा वोपा आणि विडा वोपाः’’ बाइसीं दवणाः माळः तांबुळ दिधलें: डखलां गोसावियांसि दवणा वाइलाः श्रीकंठीं माळ ओळगवीलीः आसनावरि विडा ओळगवीलाः पोफळ ठेविलें: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलेः आणि बैसलेः गोसावी डखलेयातें अवलोकिलें: आणि स्तीति जाली :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila – 242,243
  • Sinnar : तथा(भटा) खेळप्रसंगें प्राप्तदुःखभोगानुवादु :।।:
  • एकु दीं उदेयाचां पूजावसरू जालेयानंतरें गावांपसिमें पाटु होताः तेथ गोसावी विहरणा बिजें केलें: बाइसीं आसन केलें: गोसावी उभे ठेलेः फुटा आसनावरि ठेविलाः मग गोसावी एकमेकातें सिवावें: ऐसा खेळ खेळू आदरिलाः एल्हंभटः दादोसः भटः ऐसें अवघेचि खेळत होतें: तेथ गोसावी डखलेयातें म्हणितलें: ‘‘डखलेया यांसि सिवाल गा?’’ गोसावी पाट उडति आणि डखलेही उडतिः ऐसा खेळु प्रवर्तलाः डखले पाटु उडो बैसले आणि गोसावी तयातें बखलिलें: उडों नेदितीचिः मागुते उडों रीगालें: गोसावी तयातें परतेंचि लौटिलें: तें पाणियांत पडिलेः तें पाणीं उसळलें: तवं गोसावी पाट उडालेः अवघी श्रीमुर्ति पाणिये सिंतोडलीः तें देखौनि दादोसीं म्हणितलें: ‘‘मरः मरः डखलेया जेणें जेणें नरकासि जासि तें तेचि करितयासिः जो खेळु खेळत असा तेणें तुम्हीं नरकासि जालः गोसावी ईश्वरूः गोसावियांसि खेळु काइसा?’’ डखला म्हणितलें: ‘‘दादोः तुम्हीं उगे कां नसाः जी हांसीं खेळतो तीं हांसी आम्हीं नरका जाउनिः आणि आम्हीं काइसेया नरका जाउनि? मां जयासिं खेळ खेळत असो कीं तयाचेनि माझे नरक चुकतिः’’ तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यांतें कां गा म्हणत असा? कोपत असा हें एथौनिचि करूं आवडत असे कीं:’’ ऐसें म्हणौनि गोसावी दादोसासि कोपलेः मां पाटु उडतां जो भो केला होताः तो उडौनि पैलीकडें जावे ऐसें केले होतें: तो भो उडता डखलेयाचा पावो अवटळलाः लचकलाः तेणें पाइं तिडीक निगालीः इतुलेनि खेळु पूरे केलाः अवघे भक्तिजनः गोसावी तेथ येउनि उठविलें: धुतलेः वस्त्र वाळों घातलीं: परि गुडघां व्यथा बहुत उपनलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कां गाः दुखवलेतिः’’ डखला म्हणितलें: ‘‘हो जीः व्यथा बहुत होतें:’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यांतें शनैशनै घेउनि याः हें मढासि जाइलः’’ भक्तिजनी म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग मढा बिजें केलें: भिलमढापुढां नारायणाची देऊळीः तेथ डखले राहिलेः डखले पूजावसरा न येतिचिः पावो रात्री दुखो लागलाः डखले विवळतिः परवतिः परि तयातें कोण्ही पुसेचिनाः ऐसें बैसले असतिः उदेयांचि गोसावी परिश्रया बिजें करीतातीः तवं बाइसीं म्हणितलें: ‘‘डखलेयाः सागळ घेः बाबा सांगातें जायेः’’ डखलां बोलतां आइकीलें: आणि अधिका कुंथों लागलेः मग गोसावी तेथ बिजें केलें: डखलां श्रीचरण नमस्करिलीः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें काइ गा डखलेयाः पूजावसरा न याचिः घेया सागळः’’ तवं डखलां म्हणितलें: ‘‘जीजीः मीं गोसावियांसी रूसलाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कां गा?’’ डखलां म्हणितलें: ‘‘ना जीः चार्‍हीं पाहार पावो दुखत होताः मज निद्रा नाहीं: आणि गोसावी मातें पडिताळीतिचिनाः कोण्हातेंही पडिताळावा पाठवीतिचिनाः म्हणौनि मीं गोसावियांसि रूसला असे जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं महात्मे कीं गाः तुम्हीं कर्मवसें पातलें तें सकळै दुःख भोगे निमानावे कीं:’’ ऐसें गोसावी निरूपण करौनि तयांते आश्वासिलें: आणि दुःख निःशेष गेलेः डखलेयांसि आश्चर्य जालें: आणि डखलां उठौनि गोसावियांसि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलेः गोसावी परिश्रयासि बिजें केलें: तवं डखलेहीं सागळ घेउनि गोसावियांसरीसे निगालेः मग गोसावी परिश्रयोसारूनि मढा बिजें केलें :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila – 244
  • Sinnar : दाईबा जवळीक कथन’ :।।:
  • एकु दीसु दाइंबाएं गोसावीयांतें पुसिलेंः “जी जीः इस्वरी काइ अदए असे?” सर्वज्ञ म्हणीतलेंः “ना नसेः” “तरि हैं’ वीस्वरूप भ्रमण तें कां पां?” सर्वज्ञ म्हणीतलेंः “ना तें एथिचीया जवळीकावीणः” तेंही म्हणीतलेंः “हे काइ जी? तरि आम्हांसि’ काइ नव्हे? आम्हां इस्वरेंसी जवळीक असेः” सर्वतें म्हणीतलें: ‘कर्मभूमिचीयां देवतांसि आणि तुम्हांसि केतुली जवळीक? कर्मभूमिचीयां आणि अष्टौदेवयोनीचेयां देवतांसि केतुली जवळीक? अष्टौदेवयोनीसि आणि अंत्राळीचेया गणगंधर्वासि केतुली जवळीक? अंत्राळिचेयां गणगंधर्वासि आणि स्वर्गीचेयां इंद्रचंद्रादीकांसि केतुली जवळीक? इंद्रचंद्रादीका आणि कवीळासवैकुंठिचेयां हरिहराब्रह्मादीका केतुली जवळीक? हरीहरब्रह्मादीकांसि आणि क्षीराबधीचेया सेखसैयासि केतुली जवळीक? क्षीराबधीचेया सेखसैयासि आणि अष्टभैरवासि केतुली जवळीक? अष्टभैरवांसि आणि वीस्वरुपेसि केतुली जवळीक? वीस्वरुपेसि आणि चैतन्यासि केतुली जवळीक? मा चैतन्यापरू परमेश्वरू : तेयासी जवळीक होइल तरि होइलः आणि काइ गा भोजेयाः :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila – 245
  • Sinnar : गोंदेस्वरापुढें पद्मेश्वरू कथन :।।:
  • एकु दीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसरू जालेयानंतरें विहरणा बिजें केलें: गोंदेस्वराचां देउळीं बाळाणेयावरि आसन जालें: तवं बाइसीं पुसिलें: ‘बाबाः या देउळापुढें हें देउळ काइसें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाणां पां गाः या देउळापुढें हें देउळ काइसें?’’ कव्हणी काइ म्हणेः कव्हणी काइ म्हणेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे अभिमान कार्ये गाः’’ यावरि बाइसीं पुसिलें: ‘‘ते कैसें बाबा?’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः गोंदेस्वरापुढां पद्मेश्वरूः हा गोंदेश्वरूः मागां गोविंदु नावें व्यवहारा तेणें केलें: आणि तो पद्मेस्वरः पद्मा नावे व्यवहारा तेणें केलें: गोंदो मामाः पद्मा भाचाः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः गोंदेस्वरापुढां पद्मेश्वरू म्हणिजे काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘म्हातारीये एकीचा पुत्रुः तया नांव पद्माः तो आपुला घरीं न्हातु होताः हाटा जावेयाचिया लवडसवडी लवकरि पाणी सारविलेः माथां चोखणी लाविली होतीः भावजैयेतें म्हणितलें: ‘वेगु करा वोहणीः पाणी आणाः डोइ खरकटैलः’ भाउजइ वहिलें पाणी नाणीचिः तो पाणियाकारणें बोबाउं लागलाः तिया म्हणितलें: ‘हो गा हो आणितोः’ तेणें म्हणितलें: ‘आणा वहिलेः’ तवं माया म्हणितलें: ‘होहोः ऐसा वेगु करितोसिः जासि मां जोडुनि घेउनि येसिः काइ गोदेश्वंरापुढें पद्मेशरू करिसील?’ आणि तैसाचि तो डोइयेचा जुडा बांधौनि निगालाः डोइ खरकटैली ठेवौनि पैर्‍हां न्हालाः व्यवहारेया एकाचें द्रव्य काढिलेः तांगड सरीसें केलें: तेलंग देशा गेलाः तेथ अपार द्रव्य जोडिलें: कथिलाचियां खापटी भरीलिया तें कथिला बैल भरीलेः देवता अभिमान घेतलाः तें रूपैं जालें: गावांसि आलाः ग्राहिक बोलाविलें: तवं तें रूपैं देखिलें: तैसेचि मागुते बैल भरीलेः तो मागुतां तेथ गेलाः तेयातें म्हणितलें: ‘आपले रूपैं घेयाः आमचें कथिल देयाः’ तेही म्हणितलें: ‘आम्हीं दिधले तें कथिलचिः परि तुमचेनि भाग्यें जालें रूपैं: नेया आपुलेः आम्ही मागुते घेउनि तरि मागुते कथिलचि होइलः’ ऐसें विचारूनि म्हणितलें: ‘आगा हें तूचि घेः’ मग मागुता गावासि आलाः तेणें द्रव्यें हें देउळ करविलेः गोंदेस्वरापुढें पद्मेश्वरू केलाः उद्यापन जालें: मग मातें पूसों धाडिलें: ‘आतां मीं येवो?’ तिएचें रडता डोळे कुहिजले होतें: मग आपण घरां आलाः’ आणि मातिये म्हणितलें: ‘गोंदेस्वरापुढें पद्मेश्वरू केलाः आता माते न्हाणीं ओः’ मग तेणें माथा धुतलाः’’ पुढति सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ते हें मामेया भाचीयाचें देउळ गाः तुम्हासिं धर्मविषयी ऐसां अभिमानु होआवा कीं गाः एर अभिमानु तो नरकद्वार कीं:’’ :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila – 246
  • Sinnar : महादाइसातें राहावणें :।।: / दादोसः भटः निर्गमनी महादाइसातें राहावणें :।।:
  • दादोसः भट मुख्य अवघीचि गावां निगालीं: दादोसीं आधीला दिसीं सेंभरी दंडवते घातलीः एरी दिसीं दहा दंडवतें घातलीं: पानेंपोफळें गोसावियांपुढां ठेविलीः श्रीचरणां लागुनि निगालेः गोसावियांची श्रीमूर्ति दिसे तवं मागुतवाउली चालिलेः मग महादाइसेंही निगालीः निगतां गोसावी महादाइसातें म्हणितलें: ‘‘बाइः एथ राहो आवडे तरि राहा ना कां:’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जीजीः मज सांघातु नाहीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्हीं राहाः जरि तुम्हीं राहालः तरि तुम्हांकारणें वृद्धाबाइसें राहाविजतिः वृद्धाबाइसां आणि तुम्हां सांघातुः आणि जाल तें एथुनि कोण्हीं एक बोळवीत धाडिजैलः परि येता दादोसासरिसे येणें: जातां दादोसासरिसें जाणें: ऐसें नाः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘ना जीः मजविन घरीचें काहीचि चालेनाः मीचि अवघें करणसंवरण करीः मजविन कव्हणीं कवाड उघडीनाः म्हणौनि माझें राहाणें नव्हेः जी मीं न र्‍हायेः’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तेथिचें जे करावेः तें येथिचें सेवादास्य कराः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘ना जीः मीं न र्‍हाये केंहीं:’’ तियें न र्‍हातीचि :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila –
  • Sinnar : आवेस्वर कथन :।।:
  • उदेयाचां पूजावसर जालेयानंतरे गोसावी आवेस्वरासि बिजें केलें: तेथ आसन स्वीकरिलेः भक्तिजन अवघे उभे राहिलें: बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः कैसें कीर्तन अत्यंत बरवेः बाबाः यांसि आवेस्वर ऐसें नाम कां? हें सांघावेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः ये नगरीं कुम्हारु एकु होताः तो भक्तिजडः तो अपूर्व देवताव्रत स्तुति यथार्थ करीः तो बरवी मडकी करीः म्हणौनि समस्त लोक तयाचीचि घेतिः तो लोकांची कीर्तने देखौनि म्हणेः ‘मातें बहुत द्रव्य असते तरि मीही एखादे कीर्तन करिताः ऐसें मनी बहुत दिस केलीत असेः ऐसा एकु दिसी तेणें आवा केलाः मडकी एकत्र करौनि भोजलीः वरि मातिया बुझिलीः तो स्नान देवपूजा करौनि जेविलाः रात्री जालीः निजैलाः देवता स्वप्नी तयाते म्हणितलें: ‘‘आगा एः तुझी मडकी सोनटकेनि भरीली असतिः आता तुवा उदेयाचि देवाळासि काम लावावेः देवतेची स्थापना करावीः आवेस्वर नाम ठेवावेः’ तो उदेयाचि आवा जवं उघडौनि पाहे तवं अवघा सुवर्ण देखिलाः आणि हर्षलाः पाथरट बोलाविलेः तया सोनटके दिधलेः देवाळय करविलेः उद्यापन केलेः समग्र लोक जेवविलेः देवतेसि आवेस्वर ऐसें नांव ठेविलेः मग काही सोनटके रायासि भेटि केलेः रायें म्हणितलें: ‘‘तुज देवो प्रसन्न जालाः हें तूचि घेः आम्हीं नेघोः’’ ऐसीं गोष्टि गोसावी बाइसाप्रति सांघितलीः मग बिढारासि बिजें केलें :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila –
  • Sinnar : वैजनाथीं अवस्थान :।।:
  • गोसावी तैसेचि वैजनाथाचेया देउळा बिजें केलें: मधिलीये चैकी आसन जालें: मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एथचि बिढार घेउनि याः’’ ‘‘हो कां बाबाः’’ म्हणौनि बाइसें गेलीः मात्रा घेउनि आलीः तेथचि गोसावियांसि दुपाहारचा पूजावसर आरोगणा गुळळा विडा जालाः पहूड उपहूड जालाः त्रिरात्री अवस्थान जालें: एकु दिसीं चंद्रसेन रावो देवतेसि आलाः तो महादेव रायाचा जावइः तयासि तियें देवतेची भक्तिः तो पूर्विलेनि दारवंठेंनि देउळांत आलाः तवं तेणें गोसावियांते चैकी आसनी उपविष्ट देखिलें: मग दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलाः मां विनउं आदरिलें: ‘‘जी माझेया आवारासि बिजें करावे जीः’’ गोसावी विनती न स्वीकरीतिचिः मग तेणें तेथचि गोसावियांसि पूजा केलीः वोलीसाउला उपहार ओळगवीलाः दंडवत घातलें: श्रीचरणां लागलाः मग देवतेसि देउळांत गेलाः मागौते येउनि गोसावियांसि दंडवत करौनि गेलाः तेथ कव्हणी एक देवळामागे पशू उपद्रविलाः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः घेया मात्राः चालाः हें स्थान नपाळतेः’’ मग गोसावी तेथौनि भीलमढीयेसि बिजें केलें: तेथ वस्ति जाली :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila –
  • Sinnar : एल्हंभटां अवडळ नामकरण :।।:
  • गोसावियांजवळी अवघीचि भक्तिजनें बैसली असतिः भक्तिजना अवलोकन अवसरू दिधलाः गोसावी एरातें अवलोकीतिः एरातें अवलोकीतिः ऐसीं पृथकाकारें अवघीचि अवलोकिलीः एक एल्हंभटवांचैनि एरां अवघेयां स्तीति जालीयाः अवघे भक्तिजन स्तीति भोगूं लागलेः तें लावण्य परामृत धवधनी घेति आनंदभरीते उन्मेखा लोचनी श्रीमूर्ति अवलोकित उगेचि निश्चल बैसलें असतिः सुख भोगीत होतेः तवं एल्हंभटीं गोसावियांते प्रार्थिलें: ‘‘जीजीः इतुकेयांतु मींचि एकु अवडळु ऐसा दिसत असे जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें तरि तुम्हीं अवडळभट म्हणाः’’ आणि तया निरूपम स्तीति जालीः मग अवघे श्रीमूर्ति अवलोकीत उगेचि निश्चळ बैसलेः सर्वज्ञें डखलेयाते म्हणितलें: ‘‘हां गाः उगेयाचि बैसिजे ऐसा धर्म आति?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः आति ऐसाही एकु मार्गः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसां कोण मार्गु?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘ना जीः मोक्षमार्गः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तो द्वैत कीं अद्वैत?’’ उघाणी प्रवर्तलीः तिहीं म्हणितलें: ‘‘ना जी अद्वैतः’’ गोसावी द्वैत प्रतिष्ठीतिः तें अद्वैत प्रतिष्ठीतिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘द्वैत तें प्रत्यक्षाकारें द्वैत असे गाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि तुम्हीं महात्मे म्हणाः’’ आणि स्तीति भंगलीः मग गोसावियांतें भटीं खेइभटीं पुसिलें: ‘‘गोसावियांचांची सन्निधानीं असतां एकां आनंद स्तीति होएः एकां नव्हें: हें ऐसें काइ जी?’’ मग गोसावी हिरेयाचिये खाणीचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘कव्हणी एक हिरेयांची खाणि खणतिः खणतखणता खांब राखतिः वोदरे तेथ मध्यें टेका सुतिः तयासि ‘षटकोणी हिरा सांपडेः एकासि हिरकणी सांपडेः एक नसुधा रीगे निगेः एकावरि दरडी पडेः तैसें परमेस्वरसन्निधानी असता एका मोक्षु होएः एका देहविद्या होएः तथा संतफळे होतिः एका सृष्टीशून्य होएः एका नित्यनरक होतिः’’ मग गोसावियांसी सपरिवारीं आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः ऐसें पर्व जालें :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila –
  • Sinnar : उमाइसां मासोपवासिनी नामकरण :।।:
  • एकु दी उमाइसीं म्हणितलें: ‘‘जी जीः आम्हीं मासोपवास करूं: तरि तेणें काइं होए?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एणें इंद्रीयधर्म शमतिः’’ उमाइसीं म्हणितलें: ‘‘जी जीः तरि आम्हीं आणिकें व्रतें न करूं: मासोपवासचि करूं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें: तरि तुम्हां नांव मासोपवासिनी म्हणाः’’ तया दिसापासौनि गोसावी तयाते मासोपवासिनी म्हणति :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila –
  • Sinnar : रूपाइसां महादाइ नामकरण :।।:
  • एकु दीं महादाइसीं हें गोष्टि गोसावियांपुढां सांघितलीः ‘‘जी जीः वायनायकाची आजीः तया नांव महादाइसें: तियें प्राज्ञें जीः तिया वाचिलें होतें आणि तयां म्हाळसी प्रसन्नः तियेसी प्रत्यक्ष बोलेः तियें महादेरायाचीं पूरोहितें जीः राजा भले तें तयातें पुसेः तयां भविष्य स्फूरेः भविष्य करीति तें प्रत्यक्ष होएः एकु दी तेहीं विद्वांस खंडिले जीः ऐसिया बाइला प्राज्ञाः आपण काही नेणिजे जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः महादेवरायाचां ठाइं तियें महादाइसें: आणि तुम्हीं एथीचीं महादाइसें: तियें तयासि बोलतिः तरि तुम्हीं यांसि बोलाः’’ तवं महादाइसीं म्हणितलें: ‘‘हें काइ जी? मी काइ बोलो जाणे जीः तियेसि म्हाळसा बोलेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हो कां: तरि हेंचि तुमसी बोलैल होः’’ एरव्ही तयाचे नाव रूपाइसें :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila –
  • Sinnar : आबैसां वृद्धाबाइ नामकरण :।।:
  • अवघेयांचिया दसा धाकुटेयाः तयांतु आबैसें वडीलें: अवघेयातें बोलों: चालों: उठों: बैसों सिकवीतिः तें देखौनि एकु दी गोसावी आबैसातें म्हणितलें: ‘‘बाइः निके करीत असाः तुम्हीं यांसि अवघेया रक्षणः’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘जी जीः मीं वृद्धः माझें कव्हण आइकें: परि सिकवावे म्हणौनि सिकविताएः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें: तरि तुम्हां नांव वृद्धाबाइ म्हणाः’’ ऐसें प्रस्तावेयानुरूप गोसावी आबैसासि वृद्धाबाइसें हें नांव ठेविलेः मग गोसावी तेणेंचि नावें बोलाविति :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila –
  • Sinnar : तथा(भटा) स्थित्यंतर कथन :।।:
  • गोसावी भटातें कृपादृष्टी अवलोकिलेः आणि स्तीति सुभर जालीः दादोसमुख्य अवघीं निगालीं: भट बैसलैचि होतें: भटीं तें स्तीति पाहार एक भोगिलीः मग भंगलीः मग गोसावी भटांतें पुसिलें: ‘‘भटोः तुम्हां महात्मेयापांसौनि सुखस्तीति आति?’’ भटोबासीं म्हणितलें: ‘‘जीः जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मेयापासौनि जालें तेतुकैचि कीं काही एथ सुखविशेषु आगळा?’’ भटोबासीं म्हणितलें: ‘‘जीजीः सांपें कणु एकीं अधिकीः नावेक सुखविशेषु आगळा दिसत असेः हें निरूपम कीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ते नव्हेः हें एथौनि तुम्हां स्थित्यंतर गाः’’ यावरि भट उगेचि राहीलेः श्रीमूर्ति अवलोकीत बैसले होतेः तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां तुम्हीं बिढारा जाः महात्मा तुमची वाट पाहात असैलः’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलेः निगाले :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila –
  • Sinnar : भटां तांबुळग्रहणीं स्तीति :।।:
  • बाइसीं तयांची पोफळांच फोडी केलियाः गोसावियांसी विडा ओळगवीलाः विडीया करौनि दिधलीयाः सेवटिली विडीये गोसावी तांबुळ परीत्यजिलें: बाइसीं वाटां धरिलें: मग बाइसीं श्रीमुखीचें तांबुळ अवघेयासि प्रसादु दिधलाः दादोसीं मागाचि भटातें वारिलें होतें: ‘‘नागदेयाः गोसावी आमचें गुरु म्हणौनि आम्हीं तांबुळ घेउनिः तुवां नेघावें होः’’ तवं बाइसीं अवघेयासरीसें भटासिहीं दीधलें: तें भटीं घेतलें: घेतां विचारिलें: ‘जरि पुरूख तरि आम्हांसि गोमटें होइलः ना तरि एर्‍हवी आम्हीं थोडीया गाणीनाचणीयाची तांबोळें खादली असति? आम्हीं हाटींपाटणीं किती एकें उच्छिष्टें खादलीं असतिः तैसें हें एक आणि काइः हें तरि पुरूखः’ म्हणौनि तोंडीं घेतलें: आणि स्तीति जाली :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)
  • Purvardha Charitra Lila –
  • Sinnar : भोगुरीं वस्ति :।।:
  • उदेयांचि गोसावी भोगुरासि बिजें करितातीः तवं मार्गी पव्हेः तेथ आसन जालें: गुळळा विडा जालाः मग साउमें बिजें केलें: भोगुरीं सिध्दनाथीं आसन जालें: बाइसीं चरणक्षाळण केलें: उपहार निफजविलाः गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा विडा जालाः तेथचि वस्ति जाली :।।:
  • (टिप – श्रीनगर(सिन्नर)येथे स्वामींचे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउर-खोपडी वरुण आले. स्वामींचे सिन्नरला १० महिने वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: