Shendurni (शेंदुर्णी)

शेंदुर्णी ता.पाचोरा जि. जळगांव


येथील 5 स्थाने 2 ठीकानी आहेत - 3 स्थाने शेंदुर्णी गावातच सोन नदीच्या काठावरील मंदीरात आहे. याला दत्त मंदीर म्हणुन ओळखतात.
2 स्थाने गावाच्या दक्षिण विभागी वनदेव मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिरात आहेत.


जाण्याचा मार्ग :

शेंदुर्णी हे गाव, मालेगाव मुक्ताईनगर मार्गावर पाचोऱ्याहून पूर्वेस 26 कि.मी. आहे व पहूरहून नैर्ऋत्येस 10 कि.मी. आहे. पाचोरा-जामनेर लोहमार्गावरील शेंदुर्णी हे रेल्वे स्थानक आहे. शेंदुर्णी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. पाचोरा-शेंदुर्णी मार्गावर
आंबेवडगाव येथे पारिमांडल्य महानुभाव आश्रम आहे.


स्थानाची माहिती :

गावातील स्थाने

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील 3 स्थान)

1. अवस्थान स्थान :

हे स्थान शेंदुर्णी गावाच्या दक्षिण विभागी सोन नदीच्या पूर्व काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गोपाळाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. आज हे देऊळ, ‘श्रीदत्त मंदिर’ या नावाने प्रचलित आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पाचोऱ्याहून शेंदुर्णीला आले. त्यांचे या ठिकाणी 20 दिवस वास्तव्य होते. (पू.ली. 410, स्था,पो. उ.प्र.) त्यानंतर ते येथून पिंपळगावला गेले.

येथील इतर लीळा :

(1) पद्मनाभीने तयार केलेली हरभऱ्याची धिरडी आरोगण करणे. (पू.ली. 411)

(2) उपाध्ये व प्रसनायक यांना रिद्धपुरला पाठविणे. (पू.ली. 415)

(3) पदुमनाभी पाठवणी (पू.ली. 412)

(4) उपाध्या विष्णुभटा भेटी (पू.ली. 414)


अवस्थान स्थानाच्या पाठीमागचे स्थान निर्देशरहित आहे.


2. मर्दना स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानापासून ईशान्येस 8 फूट 7 इंच अंतरावर आहे. (स्था.पो.)

3. मादने स्थान :

हे स्थान मर्दना स्थानाच्या पूर्व बाजूस आहे. (स्था.पो.)


गावाच्या बाहेरील स्थाने

4,5. आसन स्थान :

ही दोन स्थाने शेंदुर्णी गावाच्या दक्षिणेस गावालगतच सोयगाव रस्त्याच्या नैर्ऋत्य बाजूस आहेत. आता येथे भव्य मंदिर बनले आहे. (स्था.पो.उ.प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

(1) लिंगाच्या देवळातील आसन स्थान.

(2) जगतीआंतुल उत्तराभिमुख देवळाच्या पटीशाळेवरील आसन स्थान.

(3) देवळाच्या पश्चिमेचे परिश्रय स्थान.

(4) दक्षिणेश्वराच्या देवळातील आसन स्थान.


निर्देशरहित स्थान : 1


शेंदुर्णी ची एकूण स्थाने : 9


  • Purvardha Charitra Lila – 410
  • Shendurni : सेंदुर्णीं गोपाळीं अवस्थान :॥:
  • गोसावी सेंदुर्णींयेसि बीजें केलेंः गावादक्षिणे गोपाळाचे देउळः पुर्वाभिमुख दारवंठाः तेथ सर्वज्ञें म्हणीतलेः बाइः हे देखिली श्रीकृष्णचक्रवर्तिची मूर्तिः हे सोनेसळेया फुटेयाची कास असेः मेघश्यामः मग बाइसि म्हणीतलेः बाबा श्रीकृष्णचक्रवर्ति ऐसे होतेः यावरी सर्वज्ञें म्हणीतलेः बाइःअवघी पाखाणाची मूर्तिः एथ काइ असेः मग उगीचि राहिलीः तेथ गोसावीयांसि अवस्थान जालेः किती दिस तें नेणिजे :॥: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस थांबले व भडेगाव-पाचोर्यावरुण सेंदुर्णींला आले. येथील वास्त्व्य(अवस्थान) काळ अज्ञात. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 411
  • Shendurni : पदुमनाभी उपहारू स्वीकारू :।।: / पदुमनाभीयाचनीं चनकवान आरोगणें :।।:
  • एकु दीं गोसावी उदेयाचा पूजावसरू जालेयानंतरे दक्षिणेस्वरा विहरणा बिजें केलें: मग विहरण सारूनि बिढारा बिजें करितां मार्गी चणा सांवगतु होताः वावरीं कडपे होतीः पदुमनाभीदेवातें म्हणितलें: ‘‘पदुमनाभीः जाः पैलु चणा मागाः मां एथ एक उपहारू कराः’’ मग तें ‘‘जी जीः’’ म्हणौनि निगालेः तें सेतकरीयापासी गेलेः तयातें म्हणितलें: ‘‘पाटील हो आम्हां काही चणा द्याः’’ पदुमनाभीतें निका संभावनिकु प्रशस्तः कांडोकांडीं मुदीयाः ऐसा बरवा देखौनि तेणें म्हणितलें: ‘‘लागे तें घेया जाः’’ गेलेः चणा वोली घालुनि मोट बांधुनि डोइए ठेविलीः तवं तो कुणबी शेतमालक आलाः तेणें पुसिलें: सेतकरियें सांघितलें: तेणें म्हणितलें: ‘‘हे सदैवं: कैसें घेइजे? ऐसें नेणेतिः’’ मग तेणें रगडविलाः उपनविलाः मग मोट बांधौनि डोइए ठेविलीः ते गोसावियांपासी घेउनि आलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं एथें आपुलेनि हातें धिडरीं रांधावीं: अर्ध चणें विकाः विकुनि तूप घेयाः अर्धेयाचीं धिडरीं कराः आपणचि दाळी करावीः आपणचि वाटावीः आपणचि धिडरीं करावीः पुसों लाभेः परि करउं न लभेः’’ मग तेंही तैसेचि केलें: तेहींचि चणे सोंडियेवरि भरडिलेः तेही दाळी दळुनि भिजत घातलीः आपणचि अवघें केलें: तवं बाइसें आलीं: तिहीं म्हणितलें: ‘‘बटिकाः ऐसें काइ करित अससि?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘बाइः गोसावीं मातें म्हणितलें: ‘आपणचि करावें:’ तरि मीं डाळी करीत असें:’’ बाइसीं गोसावियांतें विनविलें: ‘बाबाः मीं बाबापूरती आंजुळीभरी डाळीचीं धिडरीं वेगळीं करूं:’’ गोसावी मानिलें: मग बाइसीं तेयांतुल चणे घेतलेः भरडिलें: डाळी भिजों घातलीं: वाटिलीः मग गोसावियांलागी उत्तमें धीडरी केलीं: पदुमनाभीदेव बाइसातें पुसत जातिः बाइसें सांघेतिः तैसें तें करीत जातिः बाइसातें अवघा वेसरू मागितलाः मीठ मागितलें: मग धिडरीं केलीः काइसेयावरि केलीं तें नेणिजेः थोडे ऐसें चणें विकिलेः तांदुळ घेतलें: तूप घेतलेः उपहारू निफजविलाः मग गोसावियांसि विळीचांचा पूजा केलीः वस्त्र ओळगवीलें: धूपार्ति मंगळार्ति केलीः गोसावियांसि ताट केलें: गोसावी आरोगण करीत असतिः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः बटिकाचें एथ धिडरें वाढाः’’ बाइसीं धिडरें वाढिलें: मग गोसावी आरोगणा करिता म्हणितलें: ‘‘बाइः धिडरे निकें जालें:’’ ऐसीं आरोगणा जालीः भक्तिजना सहपांतीं जेवणें जालीं: गोसावियासिं गुळळा जालाः विडा जालाः ऐसें गोसावी विगळीत जे पदुमनाभीदेव तें महंता पुण्यासि पात्र केलें :।।:तां तवं जाये पां:’’ म्हणौनि गोसावी पाठविलेः मग तें नमस्कार करौनि उगेचि निगालेः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः म्हणत होतें तेचि जालें:’’ :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस थांबले व भडेगाव-पाचोर्यावरुण सेंदुर्णींला आले. येथील वास्त्व्य(अवस्थान) काळ अज्ञात. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 412
  • Shendurni : तथा (पदुमनाभीदेवांची)माता आगमनी पाठवणी :।।: / पदुमनाभी पाठवणी :।।:
  • गोसावियांसि मर्दनामादनें जालें: पटिशाळेवरि आसन असेः तवं पदुमनाभीदेवांची माता गौराइसें बीडींहूनि दांडीये बैसौनि पदुमनाभीदेवांतें नेयावेया आलीः काइ दरीसन केलें तें नेणिजेः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीः पासी बैसलीं: तिहीं गोसावियांचां ठांइं उपहारू दोनि एक केलें: वस्त्रपूजा केलीः मग विनविलें: ‘‘जी जीः रेमनायक सरलेः आणि जोगनायकासि कुळवाडी आवरेनाः तरि गोसावी पदुमनाभीतें पाठवावें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुमचां पदुमनाभी एथौनि बोलाविला?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि काइः एथचां कोण्हीं बोलाविला?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि नेया ना कां आपुला पदुमनाभीः हा एथें असावाः ऐसीं काही एथ चाड पडिली असे?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना जीः गोसावियांपासी असे म्हणौनिः आणि काइः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाये गाः पदुमनाभीः’’ पदुमनाभीदेवीं म्हणितलें: ‘‘यें मातें कैसेनि पां नेतिः ऐसें यांचें पाहों पां:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां तवं जाये पां:’’ म्हणौनि गोसावी पाठविलेः मग तें नमस्कार करौनि उगेचि निगालेः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः म्हणत होतें तेचि जालें:’’ :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस थांबले व भडेगाव-पाचोर्यावरुण सेंदुर्णींला आले. येथील वास्त्व्य(अवस्थान) काळ अज्ञात. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 413
  • Shendurni : देमाइसां: लखुबाइसां: भेटि :।।:
  • देमाइसें: लखुबाइसें: गोसावियांचिया दरीसना येतें असतिः गोसावी कोणें ठाइं राज्य करीत असतिः ऐसें नेणतिः हिंडत हिंडत सेंदुरणीयेसि आलीः पैली थडी भिक्षा केलीः नदी जेविलीं: एरी थडिचिए आळीये निद्रा करूं आलीं: रात्री बिढार एकी घरी घेतलें: गोसावियांसि विळीचां पूजावसर जालाः व्याळी जालीः बाइसीं फोडी ओळगविलीयाः विडीया करौनि देतें असतिः मार्तंड तें गोसावियांपासी बैसले असतिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मार्तंडाः या आरूतेः ऐसें ऐसें जाः ‘कवडा दूध जोडे दूध वोः’ ऐसें फोकराः’’ मग तें ‘‘जी जीः’’ म्हणौनि निगालेः आणि ‘गोसावियांसि तरि व्याळी जालीः आतां दूध काइसेयालागी?’ ऐसें विचारित गेलेः ‘‘कवडां दूध जोडे वोः’’ म्हणौनि फोकरूं लागलेः तवं देमाइसीं म्हणितलें: ‘‘लखुबाइः मार्तंडाचेया ऐसा शब्दुः’’ म्हणौनि साउमी गेलीं: देमाइसीं म्हणितलें: ‘‘हें कोण मार्तंडा?’’ मार्तंडें म्हणितलें: ‘‘ना वोः हें कोण देमाइसें?’’ देमाइसीं म्हणितलें: ‘‘ना वों:’’ देमाइसीं पुसिलें: ‘‘गोसावीं कोणी ठाइं असति?’’ मार्तंडें म्हणितलें: ‘‘गोपाळाचा देवाळीं असतिः चालाः चालाः तुमतें गोसावी बोलाउं पाठविलें असेः ऐसें गा आमचे गोसावीः आपुले ऐश्वर्य जाणो नेदीतिः ऐसें कां म्हणावेनाः आमकेया साउमेया जाः मां ‘कवडा दूध फोकराः’ ऐसें म्हणतिः’’ ऐसें म्हणौनि एरएर्‍हें गोसावियांचिया दरीसनां आलीः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: बैसलीं: गोसावियांपुढें सांघो लागलीः ‘‘एथ आलों: अमुकिए ठाइं भिक्षा केलीः आणि अमूकिए ठाइं जेविलोः निद्रा करावेया ऐलाडी आलोः तवं तेथ मार्तंड भेटलाः मग गोसावियांचिया दरीसनां आलोः’’ ऐसें अवघें सांघितलें: गोसावी बाइसाकरवी तयासी अभ्यागतवीधि करविलाः मग गोसावियांसि रात्रीचां पहूड जालाः बाइया निद्रा करूं गेलिया :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस थांबले व भडेगाव-पाचोर्यावरुण सेंदुर्णींला आले. येथील वास्त्व्य(अवस्थान) काळ अज्ञात. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 414
  • Shendurni : उपाध्यां: विष्णुभटां भेटि :।।:
  • उपाध्ये आणि विष्णुभटः हें मागां सन्निधानीहुनि कव्हणीये ठाउनी गेले होतें हें नेणिजेः मग मागौते गोसावियांचिया दरीसना निगालेः तें करंजखेडेयासि आलेः तेथ तिहीं गोसावियांतें एरंडवलिएकडें आइकीलें: मग विष्णुभटः उपाध्ये दवणें पर्वालागी टाकौनि जात असतिः सेंदुरनीसि आलेः एकीं ठाइं बिढार घेतलें: विष्णुभट बिढारासि गेलेः उपाध्ये हाटवटीयेसि कणीक घेओं गेलेः तवं तेथ म्हणितलें: ‘‘तुम्हीं काइ गोसावीयांचेया दरीसनां आलेति?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘गोसावी कोण?’’ तेणें म्हणितलें: ‘‘ना तुम्हीं नेणाः एथ गोसावी एक गोपाळाचेया देउळा आले असतिः’’ ऐसें वाणियें लक्षणोक्त सांघितलें: तैसेचि तें गोसावियांचिया दरीसना निगालेः तवं एरीकडें बिढारीं कव्हणीं एकी विष्णुभटांतें म्हणितलें: ‘‘तुम्हीं काइं गोसावियांचेः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘गोसावी कोण?’’ तेणें म्हणितलें: ‘‘ना एथ एक गोसावी गोपाळासि आले असतिः’’ तें तेथौनिचि निगालेः तेहीं बिढारीं निरोपु ठेविलाः ‘‘आमचें कोण्ही येति तरि गोसावियांचिया दरीसना गेलेः ऐसें सांघावेः’’ तैसेचि तेहीं निगालेः ऐसें एकीं बिढारीं आइकीलें: एकीं हाटांतु आइकीलेः दोघां दारवंठां भेटि जालीः उत्तमें पानेपोफळे पूजाद्रव्यें घेउनि दोघै सांगातें गोसावियांचीया दरीसना आलेः दंडवते घातलीः श्रीचरणां लागलें: बैसलेः गोसावी पुसिलें: ‘‘हे एथ असे ऐसें कोणें ठाइं आइकीले?’’ उपाध्यीं म्हणितलें: ‘‘जी जीः मियां हाटवटिये आइकीलें:’’ विष्णुभटातें पुसिलें: ‘‘तुम्हीं कोणीं ठाइं आइकीलें:’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः मियां बिढारीं आइकीलेः’’ ऐसें एरएरी मागील अवघें गोसावियांपुढां सांघितलें :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस थांबले व भडेगाव-पाचोर्यावरुण सेंदुर्णींला आले. येथील वास्त्व्य(अवस्थान) काळ अज्ञात. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 415
  • Shendurni : उपाध्यें: प्रसनायक रीधपूरासि पाठवणें :।।: / उपाध्यें: प्रसनायक श्रीप्रभुविधानपुर्वक परमेस्वरपूरां पाठवणें :।।:
  • एकु दिसीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालाः गोसावी श्रीप्रभुचा महिमा निरोपीत होतेः प्रसनायकासि ऐसें उपनलेः जे ‘श्रीप्रभुंचेया दरीसनां जावों:’ उपाध्यें आणि प्रसनायक बाहीरि निगालेः प्रसनायकें म्हणितलें: ‘‘जानोः मीं श्रीप्रभुंचेया दरीसना जाइनः तरि तूं येसि? जावों: तुज श्रीप्रभुचें दरीसन नाहीं:’’ तेहीं म्हणितलें: ‘‘गोसावियांतें पुसाः गोसावी पाठवीतिः तरि मीं येइनः’’ मग दोघै गोसावियांचिया दरीसना आलेः गोसावियांतें प्रसनायकें म्हणितलें: ‘‘जी जीः मियां जानोतें ऐसें म्हणितलें: ‘मीं श्रीप्रभुंचेया दरीसना जाइनः तरि तूं येसी?’ जानो ऐसें म्हणेः ‘गोसावियांतें पुसाः गोसावी पाठवीती तरि मीं येइनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें हां बटिका?’’ तेणें म्हणितलें: ‘‘हो जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं परमेस्वरपूरा जालः आणि एथौनि वरिजैल? परमेस्वरपूरा जावों म्हणेः तेणें मार्गे निगेः मां तिया मोहरा उभा ठाकेः तेथ केसणें गोमटेः तिया मोहरा एक एक पाउल घाली तया केसणें गोमटें: मां परमेस्वरपूरा जातां पाउल पाउलां गोमटें कीं गाः’’ ‘‘जी जीः’’ गोसावी पुसिलें: ‘‘कैं जाल?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः गोसावियांचां ठाइं पर्व करौनि मग जाउं:’’ तिहीं गोसावियांचां ठाइं दवनेपर्व केलें: मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुमचें परमेस्वरपूरां जाणे काइ?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ मग उपाध्यीं गोसावियांतें जावेयाचें पुसिलेः गोसावी तेयांसि वीधि विहिलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसेयाची निगावें: पेणोवेणां जावें: उपेणें न करावेः श्रीप्रभुंचें दरीसन घेयावेः समोर न बैसावें: वाडुवेळ श्रीचरणांवरि माथा ठेउनि नमस्कारू न करावाः’’ उपाध्यीं म्हणितलें: ‘‘ते कां जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देवतेसि निरोध होए ऐसी सेवा न किजेः मौनें बैसावें: श्रीप्रभुंसि निरोध न करावाः पाठवीति तेव्हेळी जावेः’’ मग तिहीं दोघीं पैर्‍हां विचारिलें: प्रसनायक म्हणतिः ‘‘लोणारावरूनि जावोः व्रजेचें स्नान होइलः सारंगधराचें दरीसन होइलः दोन्ही घडतिः मग श्रीप्रभुंचेया दरीसना जावोः’’ उपाध्ये म्हणतिः ‘‘उजूचि चांगदेवीहूनि श्रीप्रभुचेया दरीसना जावोः’’ ऐसें दोघीं विचारिलें: गोसावियांपासी आलेः एरएराचें सांघितलें: मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘सांघातियांसि एथचि विसंवादु मां: कें व्रजेचें स्नानः सारंगधरेसी दरीसन आणि कें श्रीप्रभुचें दरीसनः नेणों कोण एक आले तें कीर्तितें करौनि गेलें: आतां तेथ काइ असे? क्यें तें: क्यें हेः श्रीप्रभु तें साक्षात निर्गुण परब्रम्हः तयांचेया दरीसना जातां आणिक तीर्थाटन तें धिक्ः’’ मग दंडवते घालुनि निगालेः उपेणें न करीत चांगदेवासि गेलेः तवं तेथ संन्यासीयांसि परिखानिमंत्रण आंबेंभोजन मांडलें असेः एरींएरां निमंत्रण दिधलें: जेउं सरलेः आणि उदेयांचि उभयां अक्षत लाविलीः आणि उपाध्यें म्हणों लागलेः ‘‘हे काइ प्रसनायको?’’ सर्वज्ञें म्हणितलें: पेणोवेणां जावेः उपेणें न करावेः’ तरि तुम्हीं राहात असा कैसे?’’ प्रसनायकें म्हणितलें: ‘‘राहेः आंबेंयांची सराये तवं घेवों: मग श्रीप्रभुचें दरीसन तें काइ क्येंहीं जात असे?’’ मग तोही दिसु राहिलेः जेवण जालें: आणि एरे दिसीचें मागुतें निमंत्रण दिधलेः उपाध्यीं म्हणितलें: ‘‘तुम्हीं राहाल तरि राहाः मीं जाइनः’’ प्रसनायक राहिलेः प्रसनायकें म्हणितलें: ‘‘जाः प्रसादाहूनि शुक्लभट अधिक?’’ उपाध्ये निगालें: तें अळजपूरासि आलेः तेथ दामाचे उत्तम पांच आंबें घेतलेः दिसेंचि श्रीप्रभुचेया दरीसना आलेः श्रीप्रभुसि तिकोपाध्यांचिये ओसरीयेए मांचळियेवरि आसन असेः भेटि जालीः श्रीप्रभुपुढें आंबें ठेविलेः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: श्रीप्रभुपुढें हात जोडुनि उभे होतें: श्रीप्रभु श्रीकरीं आंबा घेतिः आणि मध्येचि आरोगीतिः आणि म्हणति ‘‘आवो मेलाः आंबा गोड आहे म्हणें: खावा म्हणें:’’ आणि आंबा आडवा फोडीतिः आरोगीतिः श्रीदोंदावरि रस गळेः खाड माखेः तें पुसीतिः ऐसें पाच आंबें कणुकणु चाखिलेः आरोगिलेः आणि ‘‘मेला घे ना म्हणें: आरे घे घे म्हणें:’’ म्हणौनि श्रीचरणें तयाकडें लौटिले आणि दोनि वेळीं वास पाहिलीः तें उपाध्यातें नुमटेचिः मग तिकोपाधचियां कन्या म्हणितलें: ‘‘भटोः राऊळ तुम्हांसि प्रसादु देत असतिः तो घेयाः’’ मग उपाध्यीं महाप्रसादु म्हणौनि घेतलाः आंबें घेतलें: मग बारवेसि गेलें: सिळी रोटी होतीः ती रोटी आणि तेल जेविलेः प्रसादाचें आंबें खादलेः मग विळींचां वेळीं उपाध्ये मागुतें दरीसनासि आलेः श्रीप्रभुंनि म्हणितलें: ‘‘मेला जाएः सापे जाएना म्हणें: सापु खाएना म्हणें: ऐसाचि येइल तो खाइल म्हणें:’’ तें उपाध्यासि उमटेनाः तवं सापु आलाः तेयाते देखौनि वासरू बुजालें: ‘‘मेला जाएः आला परि खाएचिनाः’’ मग गोसावी मागौते म्हणितलें: ‘‘आवो मेला जाएः साळेसि जाएः जाएना म्हणेः आता येइल तो खाइल म्हणेः’’ तेयासि उमटेनाः तेथ तिकोपाध्याची कन्या होतीः तिया म्हणितलें: ‘‘तुमतें गोसावी साळेसि पाठवीतातीः’’ मग उपाध्ये साळेसि गेलेः त्रिरात्री श्रीप्रभुंचा सन्निधानी होतें: मग दंडवत घालुनि निगाले :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस थांबले व भडेगाव-पाचोर्यावरुण सेंदुर्णींला आले. येथील वास्त्व्य(अवस्थान) काळ अज्ञात. तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: