Shendurjan (शेंदुरजन)

शेंदूरजन, ता.सिन्दखेडराजा जि. बुलढाणा


येथील 46 स्थाने 6 ठीकानी आहेत -
चाफ्याचा वाडा/श्रीकृष्ण मंदीर - येथील 19 स्थाने शेंदूरजन गावाच्या दक्षिण भागात गावातच भव्य मंदीरात आहेत.
श्रीदत्त मंदीर - येथील 19 स्थाने शेंदूरजन गावाच्या पश्चिम भागात गावातच भव्य मंदीरात आहेत.
वडतळील स्थानाचे मंदीर -  येथील 1 शेंदूरजन गावाच्या उत्तर विभागी लहान मंदीरात आहे.
पिंपळाचे झाड स्थानाचे मंदीर - येथील 4 स्थाने शेंदूरजन गावाच्या आग्नेयेस गावातच वाडासदृश्य मंदीरात आहेत.
नारायण मंदीर व गरुड साजे मंदीर - ही 2 स्थाने शेंदूरजन गावाच्या पूर्वेकडे गावालगतच 2 लहान मंदीरात आहेत .


जाण्याचा मार्ग :

बुलढाणा ते शेंदूरजन (मेरा व लव्हाळा दोन्ही मार्गे) 65 कि.मी. मेहकर ते शेंदूरजन (लव्हाळा मार्गे) 40 कि.मी. व देऊळगावमाळी मार्गे 30 कि.मी. मेहकर ते शेंदूरजन (सरळ मार्ग) 20 कि.मी. जालना ते शेंदूरजन (मार्गे न्हावा, सिंदखेडराजा, दुसरबीड, मलकापूरपांग्रा) 85 कि.मी. शेंदूरजनला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थकरूंच्या निवासाची सोय आहे. डोढ्र्याहून शेंदूरजन (अंढेरा फाटा, अंढरा, मेंडगाव, वाघोळा मार्गे) 22 कि. मी. आहे. हा पायमार्ग आहे.


स्थानाची माहिती :

1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19. मासोपवासिनीच्या आवारातील 19 स्थाने : (चाफ्याचा वाडा)

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंचे एकांकामध्ये शेंदूरजनप्रांती 12 वर्षे अवस्थान होते. ते एकांकामध्ये शेंदूरजन गावातील मासोपवासिनीच्या आवारी गेले होते. तेथे त्यांना मर्दना, मादने, पूजा, आरोगणा झाली होती. पहुड, उपहुड झाला होता. (पू. ली. 43 स्था. पो.) मासोपवासिनीच्या आवाराच्या ठिकाणी भव्य मंदिर उभारलेले असून ते आज ‘श्रीकृष्ण मंदिर’ या नावाने ओळखले जाते. याला ‘चाफ्याचा वाडा’ सुद्धा म्हणतात. श्रीकृष्ण मंदिर पूर्वाभिमुख असून ते गावाच्या दक्षिण विभागी आहे. तेथे एकुण 19 स्थाने आहेत; परंतु कोणत्या लीळेचे कोणते स्थान हे निश्चितपणे सांगता येत नाही.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19. बाह्मणाच्या आवारातील 19 स्थाने :

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात दोन वेळा शेंदूरजनला आले. पहिल्या वेळेस ते पैठणहून रिद्धपूरला जाताना राजूरहून शेंदूरजनला आले व दुसऱ्या वेळेस रिद्धपूरहून परतल्यावर मेहेकरहून शेंदूरजनला आले. (पू. ली. 161 ख. प्र.) दोन्हीही वेळेस त्यांचे ब्राह्मणाच्या आवारी एकेक रात्र वास्तव्य होते. दोन्हीही वेळेस त्यांना तेथे मर्दना, मादने, पूजा, आरोगणा झाली होती. (पू. ली. 143 व 175 स्था, पो.) बाह्मणाच्या आवाराच्या ठिकाणी भव्य मंदिर उभारलेले असून ते आज ‘श्रीदत्त मंदिर’ या नावाने ओळखले जाते. श्रीदत्तमंदिर पूर्वाभिमुख असून ते गावाच्या पश्चिम विभागी आहे. तेथे एकूण 19 स्थाने आहेत; परंतु कोणत्या लीळेचे कोणते स्थान हे निश्चितपणे सांगता येत नाही.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


येथील इतर ज्या सात स्थानांची स्थान पोथी आणि लीळाचरित्राच्या आधारे निश्चिती करता आली. ती स्थाने पुढीलप्रमाणे आहेत.

1. आसन स्थान :

हे स्थान शेंदूरजन गावाच्या उत्तर विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वडाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना एकांकात येथे आसन असताना मासोपवासिनीच्या भावाने त्यांना विनंती करून आपल्या घरी नेले. (पू. ली. 43, स्था. पो.)

काहींच्या मते याच ठिकाणी स्वामीनी ब्राह्मणाला चातक पक्ष्याचा दृष्टान्त सांगितला.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2,3,4,5. आसन स्थाने :

ही चार स्थाने आसन स्थान देवळापासून आग्नेयेस 250 मीटर अंतरावर पश्चिमाभिमुख देवळात आहेत. सर्वज्ञांच्या वेळी येथे पिंपळाचे झाड होते. त्या झाडाखालील ही स्थाने होत.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात पैठणहून रिद्धपूरला जाताना शेंदूरजनला आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. एक ब्राह्मण संध्या करण्यासाठी नागझरीला आला होता. त्याने परत येताना सर्वज्ञांना येथे बसल्याचे पाहिले. जवळ येऊन नमस्कार करून पुढे बसला, सर्वज्ञांच्यापासून त्याला स्थिती झाली. स्थिती भोगून संपल्यावर त्याने सर्वज्ञांना विनंती करून आपल्या घरी नेले. (पू. ली. 26 तु. प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


6. दारसंका धरून भितरी अवलोकणे स्थान :

हे स्थान शेंदूरजन गावाच्या आग्नेयेस 2,3,4,5. क्रमांकाच्या आसन स्थानापासून 200 मीटर अंतरावर पश्चिमाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञांच्या वेळी येथे नारायणाचे देऊळ होते. त्या देवळाच्या दारसंका धरून सर्वज्ञांनी आत अवलोकन केले. देवळात मासोपवासिनी बसलेल्या होत्या. त्यातील एका मासोपवासिनीने उठून त्यांना नमस्कार केला. (पू.ली.43)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. आसन स्थान :

हे स्थान दारसंका धरून अवलोकणे स्थानाच्या किंचित वायव्येस पश्चिमाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गरुडाचे साजे होते.

लीळा : सर्वज्ञांनी येथे मासोपवासिनीला आपल्या तांबोळाचा प्रसाद दिला. (पू. ली, 43, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


पूर्वार्धातील पहिल्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू शेंदूरजनहून मेहेकरला गेले व दुसऱ्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते शेंदूरजनहुन कोळगावला गेले.


अनुपलब्ध स्थान :

1. गावाच्या उत्तरेचे वावरामधील वडाच्या झाडाखालील आसन स्थान/चातक पक्षी दृष्टान्त निरुपण


शेंदूरजनची एकूण स्थाने : 46


  • Purvardha Charitra Lila – 43
  • Shendurjan : सेंदुर्जनी मासोपवासिनी स्तीति :।।: / सेंदुर्जनी मासोपवासिनी तांबुळप्रदानी स्तीति :।।:
  • गोसावी सेंदुर्जनासि मेघंकर प्रांतिचेया सेंदुर्जनासिः आणिक नव्हेः तेथ नारायणाचां देउळीं बिजें केलें: तवं तेथ अवघेया मासोपवासिनी बैसलीया असतिः गोसावी उभे ठाकौनि दोन्ही द्वारशंका दोहीं श्रीकरीं धरूनि भितरीं तेयातें अवलोकिलें आणि गोसावियांते देखौनि तेयांआंतु एकी आउसें साउमें येउनि श्रीचरणां लागलीः तेथचि तांबुळ मागितलें: दोन्ही हात श्रीमुखीचीया तांबुळासि वोडविलेः ‘‘जी मज तांबुळ देयावेः’’ तवं गोसावी श्रीकरें लोकाकडें दाखविलें: आणि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः या अवघीया देखत असति कीः’’ तिया म्हणितलें: ‘‘द्यावें जीः तैसें काही नाहीं: लोकाचे काइ जी?’’ मग गोसावी निराकरीत गरूडाचेया साजेयापासी बिजें केलें: तेथ उभेया ठाकुनी दिधलें: आणि तियेसी स्वरूपदरीसना स्तीति जालीः आणि देहभाव विसरलीः तैसीचि आपुलां ठाइ जाउनी बैसलीः साजां गरूडारेयापासी नावेक आसन जालें: तें आपुलें कर्म विसरलीः तवं तियेची परिचारिका आलीः तियें पुढां तेही एरी मासोपवासनी सांघितलें: ‘‘इचा मासोपवास भंगलाः एक महात्मे आलेः तयाचे उचिष्ट तांबुळ घेतलें:’’ तियेचेया संबंधीयापुढां सांघितलें: ‘‘पुरूखु एक आले होतें: तयाचीए मुखीचें तांबोळ या घेतलें आणि तिए दिउनी हें भुलली ऐसीं ठाकलीः’’ एकी म्हणतिः ‘‘वायो चळलाः’’ एकी म्हणतिः ‘‘पीसें लागलें:’’ मग संबंधीं गावांतु घरां नेलीः दुर्गा पूर्वे तयाचे घर होतें: तें पीशाचवत जाणौनि देव्हारेयावरि बैसविलीः तियेसी बारा वरूषें अन्नोदकें नाहीं: आपणपें काही जाणेंनाः तियचिये बाप भाउ ‘वायु’ म्हणौनि औषधें करीतिः ऐसीं स्तीति भोगीत देव्हारांचि तटस्ते बैसली होतिः गोसावियांते आपणेयापासी देखतचि असेः बारां वरीषां स्तीति भंगलीः एकसरीचि हाक देउनि उठिलीः ‘‘नागवलीयें वोः नागवलीयें वोः’’ आणि दुःख करूं लागलीः घरीचां पुसिलें: ‘‘आवो कैसी नागवलीयेसि?’’ तिया म्हणितलें: ‘‘नाः आतांची एथ इश्वर पुरूख होतें वोः आतांची तें गेलेः’’ घरीचां म्हणितलें: ‘‘आम्हीं देखोचिनाः’’ तिया म्हणितलें: ‘‘तुम्हीं ने दखाः परि मीं देखें कीं: तें इश्वरपुरूख येतील तरि माझें देह वांचैलः’’ ऐसें गुंडाळतां अक्षरीं बोलिलीः स्तवन करू लागलीः तवं धाकुटा भाउ कनवाळूः तेणें पुसिलेः ‘‘कैसें पुरूख असति?’’ तयापुढां खुणा सांघितलियाः ‘‘ना गौरवर्ण लंबकर्ण विशाळनेत्रः अजानबाहुः उच्चकपोळें: डाविये भवैवरि कांदीः आलौहित श्रीचरणः वरिषा पंचविसाची ऐसीं वयसा असेः ऐसें असतिः आतांची निगालेः तें जरि येतील तरि माझें देह वांचैलः एर्‍हवीं देह त्यजीनः’’ आणि देह जाये ऐसें दुख करुं लागलीः मग तियेचा धाकुटा भाउ निगालाः तयासि बहिणी थोर पीढीयेः मग तें गोसावियांसि नगरा बाह्यप्रदेशी पाहों गेलेः तियेची प्रदेशी वृक्षा एका तळीं गोसावियांसि आसन असेः तवं तेणें गोसावियांसि देखिलें: दंडवते घातलीः श्रीचरणां लागलाः मग तेणें अवघी गोष्टि गोसावियांपुढां सांघितलीः तिहीं गोसावियांसि विनविलें: आवारासि घेउनि गेलें: तिया गोसावियांतें देखिलें: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः मर्दना मादने जालें: पूजा आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः मग पहुड जालाः श्रीचरण सव्हान केलें: आणि मागौती स्तीति सुभर जालीः मग तेही पुसिलें: ‘‘जी अन्नोदकें नाहीं: तटस्ते असतिः आता इएसि काइ करू जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्ही उठवाल तेव्हेळी उठतिः बैसवाल तेव्हेळी बैसतीः तुम्ही जेववाल तेव्हेळी जेवीतिः’’ ऐसा गोसावी तयासि इतुका वर दिधलाः मग गोसावी बिजें केलें: माघौती बारा वरिषें तैसीचि स्तीति :।।:
  • Purvardha Charitra Lila – 143
  • Shendurjan : सेंदुर्जनी वस्तिः ब्राम्हणा भेटिः स्तीतिः आरोगण :।।:
  • उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें गोसावी सेंदुर्जना बिजें केलें: सेंदुर्जनी गावांउत्तरें वडातळी गोसावियांसि आसन जालें: नागझरियेसि ब्राम्हण एकु संध्यावंदनासि गेला होताः तेणें येतां गोसावियांतें देखिलें: आणि गोसावियांकडें आलाः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलाः मग पुढां बैसलाः गोसावी तयातें सुप्रसन्ना कृपादृष्टीं अवलोकिलें: आणि स्तीति जालीः भोगू सरलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटोः घरा जा नाः’’ मग ब्राम्हणें गोसावियांतें आरोगणे विनविलें: गोसावी तयाचेया घरा बिजें केलें: तेणें बाजसुविती घातलीं: श्रीचरण प्रक्षाळण केलें: चरणोदक घेउनि मस्तकीं वंदिलें: गंधाक्षता करौनि विडा ओळगवीलाः मग वोलणी ओळगवीलीः मर्दना दिधलीः मार्जनें जालें: पूजा जालीः भक्तिजनांसहित आरोगणा जालीः गोसावियांसि तेथचि पहूड जालाः उपहूड जालाः विळीचां पूजावसरू जालाः वस्ति जालीः मग गोसावी उदेयाचि मेघंकरा बिजें केलें: तो अनुवर्जित आलाः नमस्कार करौनि राहिलाः मग तो ब्राम्हण तया वडातळी ये आणि तेथ गोसावियांसि पाहार एकु देखतचि असेः स्थित्यानंदु भोगीः श्रीमूर्ति तेतुका काळ देखेः स्तीति भंगे मग गृहा जाए :।।: (टिप – स्वामींचे येथे हे दुसर्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पैठन-राहटगाव-कडेठान-राजौर-कोळगाववरुन येथे आले…)
  • Purvardha Charitra Lila – 175
  • Shendurjan : सेंदुर्जनी ब्राम्हणा आभासु कथन :।।: / सेंदुर्जनी ब्राम्हणा आभासदरीसनें वस्तिः पूजाः आरोगणा :।।:
  • गोसावी सेंदुर्जनासि बिजें केलें: गावां इशान्यें पींपळातळी गोसावियांसि आसन जालें: तो ब्राम्हण वडाखाली स्तीति भोगीत बैसला असेः जा वडातळी गोसावियांपासौनि स्तीति जालीः तया वडातळी प्रतिदीनीं तें येउनि बैसति आणि गोसावियांतें आपणेयापासी देखतिः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः हा तो ब्राम्हण नव्हे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘होए बाइः’’ बाइसी म्हणितलें: ‘बाबाः या काइ जालें? बाबातें देखिलेया परि बाबाजवळी न येः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तो यातें तेथचि देखतु असेः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हे काइ? बाबा तरि एथ असतिः मां तो तेथ कैसा देखत असे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तो स्तीतिचेनि आभासे देखत असेः’’ मग बाइसीं म्हणितलें: ‘बाबा बोलाउं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बोलावाः’’ बाइसें गेलीः ‘‘भटोः तुमतें बाबा बोलावीत असतिः चाला नाः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘बाइः हें नव्हति गोसावी एथचि उभे असतिः आम्ही गोसावियांजवळीचि असों:’’ बाइसीं म्हणितलेः ‘‘भटोः हें नव्हति पैल बाबाः पैर्‍हा असतिः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हे नव्हतिः गोसावी एथचि असतिः’’ बाइसें मागुतीं आलीं: ‘बाबाः ब्राम्हणु न येः तो म्हणतोः ‘हे नव्हति गोसावी उभे असतिः’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः खांद चुराः’’ बाइसें गेलीं: खांद चुरीलीः आणि स्तीति भंगलीः आणि म्हणितलें: ‘‘हे काइ बाइं: तुम्ही केधवा आलेति? आणि गोसावी कें असति?’’ बाइसीं हनुवटिये धरूनि ऐसें गोसावियांकडें तोंड करौनि दाखवित म्हणितलें: ‘‘भटो आतांची आलोः हें नव्हति बाबा पैर्‍हाः तुमतें बोलावीत असतिः’’ तेणें गोसावियांतें देखिलें: तैसाचि उठिलाः बाइसां दंडवत केलें: गोसावियांपासी आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलाः गोसावियांते प्रार्थिलें: ‘‘जीः गोसावी केधवां बिजें केलें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हेंचि येणें:’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी मीं चिंतित होतों गोसावीं केधवां बिजें करीतिः’’ यावरि गोसावी चातकाचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘चातक असेः तो गावोगावीं देशोदेशीं नदोनदी बावीपोखरणी असतिः परि तेथची उदकें तो न सेवीः वरौति चांचु करौनि उदैलेया मेघाची वास पाहेः तो वरीखें तें स्वीकरीः तैसें सर्वत्र विखो असेः विखो सेवावाची वासना असेः परि तो सेवीनाः मग परमेस्वर सन्निधान देउनि सकळ विखो पूरवीतिः मग गोसावियांतें विनविलें: ‘‘जीः माझेया घरासि बिजें करावे जीः’’ गोसावी विनती स्विकरिलीः तेणे सडासंमार्जन केलें: चौकरंगमाळीका भरीलियाः गुढीयातोरणे उभिलीः ऐसें महोत्साह केलें: गोसावी तयांचेया घरा बीजें केलें: श्रेष्ठासन रचीलें: श्रीचरण प्रक्षाळिलें: मर्दनामार्जनें जालें: पूजा जालीः टिळा लाविलाः आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः पहुुड जालाः उपहूड जालाः वस्ति जाली :।।: (टिप – येथे स्वामी तिसर्यांदा आले…स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे ऋद्धपूरवरुन बेलौरां-कारंजा-टाकळी-आलेगाव-आंजनी-मेहकर मार्गे आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: