Shekata (शेकटा)

शेकटा, ता. गेवराई, जि. बीड.


येथील स्थान शेकटा गावाच्या इशान्येकडे 1 कि.मी अंतरावर असलेल्या वंकनाथ महादेव मंदीरात सभामंडप/चौक म्हणजे हे 1 स्थान होय.


जाण्याचा मार्ग :

शेकटा हे गाव गेवराईहून नैर्ऋत्येस (माटेगाव मार्गे) 25 कि.मी. आहे. कोळगावहून पायमार्गे शेकटा (पिंपळामार्गे) 9 कि.मी. आहे. पाडळशिंगी पाथर्डी मार्गावरील शेकटा फाट्याहूनही शेकटा येथे जाता येते. शेकटा येथे जाण्यासाठी गेवराईहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान शेकटा गावाच्या ईशान्येस 1 कि.मी अंतरावर ओढ्याच्या पूर्व काठी, गेवराई मार्गाच्या दक्षिणेस वंकनाथाच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात चकलांब्याहून शेकट्याला आले. त्यांचे या ठिकाणी 5 दिवस वास्तव्य होते. (उ. ली. 570, स्था. पो.) त्यानंतर ते येथून परत चकलांब्याला गेले..

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


वसती स्थान म्हणून ओळखले जाणारे गावाच्या पूर्वेस दीड कि.मी. अंतरावर पिंपळा गावाच्या मार्गावरील श्री. निवृत्ती नाना थोरात यांच्या शेतातील स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) दक्षिण सोंडीवरील आसन स्थान

2) देवळाच्या अंगणातील मादने स्थान

3) विहीर अवलोकणे स्थान

4) पिंपळाखाली उभे राहणे स्थान

5) देवळाच्या दक्षिणेचे परिश्रय स्थान

6) देवळाच्या पश्चिमेचे परिश्रय स्थान

7) विहिरीच्या पलीकडचे परिश्रय स्थान

8) उदकाविनियोग स्थान


शेकट्याची एकूण स्थाने : 9


  • Utarardha Charitra Lila – 570
  • Shekata : सेकुटां वंकनाथीं अवस्थान :।।:
  • प्रतिदीनीं घुइनायकाचीं आरोगणा गोसावी भट नाथोबाच्या स्कंधावरि श्रीकरु घालुनी सेकुटेया बिजें करिता मार्गी काउळीए वीहिरीउत्तरें आसन जालें: तेथ श्रीमुख प्रक्षाळिलेः विडा जालाः घुइनायकाचे घरः कुळवडी महांडुळीं होतें: तवं तेथ घुइनायकु सेतासि आले होतें: तेथ भेटि जालीः मग घुइनायकें विनविलें: ‘‘जी जीः गोसावी सेकुटेयासि बिजें करीतिः तरि महांडुळी माझे घर असेः तरि तेथौनि गोसावी उपहारू आणवावा जीः’’ गोसावी मानिले आणि सेकुटेया बिजें केलें: तेथ गावां इशान्यें दूरी वंकनाथाचें देउळपूर्वामुखः तेथ चौकीं अवस्थान जालें: किती दिस हें नेणिजेः भितरीं उदेयाचां पूजावसरः दुपाहारीचां आरोगणाः पहूड उपहूड होयेः मग भक्तिजनां गावे विहीतिः भिक्षें पाठवीतिः विळींचां पूजावसरः धूपार्तिः मंगळार्ति होये दक्षिणेचेया सिहाडेयापासी आसन होयेः कदाचित भटः कदाचित दायंबाः कदाचित लखुबाइसें जातिः महांडुळींहुनि प्रतिदीनीं गोसावियांलागौनि उपहारु आणीतिः मग गोसावियांसि आरोगणा होयेः एकु दी चौकीं आसन असेः तवं उंदीर एकु आलाः गोसावियांचां जानुवरि बैसौनि मीसिया फुलफुलो लागलाः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मा एथ अससिः’’ म्हणौनि श्रीकरें स्पर्शिला आणि तटकरि उडौनि गेला :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे 2 महिने अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी-चकलांब्या वरुन सेकटा येथे आले. येथे वंकनाथाचें देउळात स्वामींचे काही दिवस (एक मते ५ दिवस) अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila – 571
  • Shekata : माहांडुळमार्गी भटां लखुबाइसां भांडण :।।: / भट लखुबाइ प्रकोप श्रवणीं भट अभिमानु स्वीकारु :।।:
  • ऐसां एकु दीं गोसावियांसि दुपाहाराचा पूजावसर जालाः लखुबाइसे महांडूळा घुइनायकाचया घरा ताट आणू गेलीः तवं तेथ तयां उसीरू लागलाः गोसावियांसि आरोगणें उसीरू जालाः म्हणौनि भटही अवसरी फेडूं गेलेः तवं तियें चौरंगावरि बैसौनि तेयाचेया ब्राम्हणीसी गोष्टि करितें असेतिः भट गेलें: उपाहारू घेतलाः निगालेः मग मार्गी कोपलेः भटां लखुबाइसां भांडण जालें: भटीं म्हणितलें: ‘‘तुम्हीं काइ एथ गोष्टि करावेया आलेति म्हणा? गोसावियांसि आरोगणे उसीरू जाला? जेथ जात असां तेथचि बैसत असाः’’ ऐसें कोपलें: तवं लखुबाइसीं म्हणितलें: ‘‘होः होः उगे असा विष्णुः’’ भटी म्हणितलें: ‘‘उगी अस पार्वतियेः’’ तवं लखुबाइसीं म्हणितलें: ‘‘पाहा वो माते की पार्वती केलीः ऐसेया महात्मेयाचां कपाळीं घाला सिध्दनाथाची घांटः’’ गोसावियांसि दारवंठांचिये पश्चिमीलिये सोंडियेवरि आसन जालें:’’ तयांसि उसीर कां लागलाः म्हणौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भोजयाः जा पां तिये आझुनि कां न येति? परि तेथचें एथ कांहीं सांघों नकाः प्राणियाचें दोष एथ न सांघिजेतिः एर्‍हवी एथौनि नेणिजे ऐसें काइ असेः तरि कां म्हणिजेनाः करीतिना परि एथीचेया दरीसनाहीं न येतिः’’ दायंबा साउमें आलेः तवं तियें ऐसीं भांडतें आलीं: भटीं दायंबापुढें अवघें सांघितलें: मग अवघी गोसावियांपासी आलीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः भटीं लवलवौनि ताट केलें: मग गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः पहूड जालाः उपहूड जालाः मग गोसावी तियें वीहिरीकडें परिश्रया बिजें केलें: सरिसे दायंबा नाथोबा असतिः गोसावी इतुकेया एकां पसिमें वाव्य कोनां आश्राइत परिश्रया बैसलेः भटीं दायंबाजवळी सांघितलें होतें: तें दायंबा हळूचिः गोसावी एकिति ऐसें नाथोबापुढें सांघतातीः मग गोसावी परिश्रयो सारिलाः तियें वीहिरीकडें तयांपासी बीजें केलें: उदकां विनियोगु करौनि गोसावी दायंबातें म्हणितलें: ‘‘काइ गा भोजया?’’ दायंबाए म्हणितलें: ‘‘काही नाहीं जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथौनि पुसिजत असिजे कीं:’’ तवं दायंबा हासो लागलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कां गा भोजयाः हासत असा?’’ दायंबाए म्हणितलें: ‘‘ना जीः गोसावी मातें वारिले असें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आता सांघाः’’ दायंबाए म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग गोसावी तयाचेया खांदावरि श्रीकरू घातलाः मग स्थिरगति बीजें करितादायंबाए अवघे भांडण गोसावियांपुढा सांघितलें: बाहीरि सिंहाडयासी उत्तरामुख आसन जालें: रीगतां डावेया हातां अवघी भक्तिजनें बैसलीः लखुबाइसें काही व्यापार करितें असतिः तियें बाहीरि भितरीं रीगतिनिगतिः आणि इतुलेनि गोसावी निरूपण करूं आदरिलेः प्रधान महात्मेयाचां महिमा निरुपीतिः पाठीं म्हणतिः ‘‘ऐसेंया ऐसेया महात्मेयाचां कपाळीं घाली घांटः’’ पुढति महिमा निरुपीतिः आणि म्हणतिः ‘‘ऐसेंया महात्मेया घाली घांटः’’ पुढति निरुपीतिः ऐसें वेळा दोनि च्यारि म्हणितलें: मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ते काइ तुम्हासि घातलीं: तें एथ घातलीं:’’ म्हणौनि ललाटावरि श्रीकरू ठेविलाः तवं लखुबाइसीं जाणितलें: जे ‘गोसावी मजचि म्हणत असतिः’ मग वर्मलीः श्रीचरणां लागलीः लखुबाइसीं विनविलें: ‘‘जी जीः नेणेचि जीः जी मियां यातें म्हणितले आणि गोसावी ओखटे घेतलेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा सर्वसंगपरित्याग करौनि एथ अनुसरलाः एथौनि याचां अभिमानुः मां हें काइ याप्रति बोलिलें? हें याप्रति बोलिलें कीं बाइः’’ म्हणौनि श्रीकरें जानु थोपटलीः तवं लखुबाइसें भ्यालीः तेही म्हणितलें: ‘‘जी तरि मज अवीधि घडला कीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हो बाइ घडलाः’’ अनुतापलीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः मग भटाते क्षमविलेः तवं गोसावी प्रसन्नताची म्हणितलें: ‘‘ऐसे साधन असे की बाइः’’ :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे 2 महिने अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी-चकलांब्या वरुन सेकटा येथे आले. येथे वंकनाथाचें देउळात स्वामींचे काही दिवस (एक मते ५ दिवस) अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: