Shahagadh (शहागड)

शहागड, ता. अंबड, जि. जालना


येथील 1 स्थान - हे स्थान शहागड गावाच्या पश्चिमेकडे गावाजवळच गोदावरी नदीच्या पैल काठावर किल्ल्यात लहान मंदीरात आहे. येथे मुस्लिम पूजारी आहे.


जाण्याचा मार्ग :

शहागड, हे गाव, मलकापूर सोलापूर राज्यमार्गावर गेवराईहून उत्तरेस 12 कि.मी. आहे व अंबडहून दक्षिणेस 30 कि.मी. आहे; जालना ते शहागड 59 कि.मी. आहे; औरंगाबाद ते शहागड 84 कि.मी. आहे; बीड ते शहागड 44 कि.मी. आहे; पैठण ते शहागड 41 कि.मी. आहे; गांधारी ते शहागड 5 कि.मी. गांधारीहून पूर्वेस शहागड पायमार्गे 3 फाग आहे. शहागडला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान शहागड गावाच्या पश्चिमेस गावालगतच किल्ल्यामध्ये गोदावरी नदीच्या उत्तर काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पानेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकाच्या नैर्ऋत्य विभागीचे हे स्थान होय. नविन झालेल्या पुलाखालून शहागड गावात शिरलो की उजव्या बाजूला एक रस्ता सरळ चिंचोळा होत नदीच्या दिशेने जात राहतो. त्याच्या टोकाशी नदीच्या काठावर जूना प्राचीन किल्ला आहे. किल्ल्याचे अगदीच थोडे अवशेष आता शिल्लक आहेत. एक भव्य पण काहीशी पडझड झालेली कमान आहे. या कमानीतून आत गेलो की मंदिर लागते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू परीभ्रमणाच्या पूर्वार्धात शहगडच्या पश्चिमेस असलेल्या असलेल्या विस्तिर्ण अशा ताएश्वराच्या देवळात आले. देवळाच्या चौकातील, नैऋत्येस एक ओटा होता. त्या ओट्यावर स्वामींना आसन झाले. बाईसांनी पुजावसर केला. मग बाईसांनी तांदूळ आणले भात शिजवला. दुध आणले व गोसावीयांना व्याळीसाठी (सायंकाळचे भोजन) विनविले. परंतू गोसावीयांची प्रवृति नव्हती. मग तेथेच ओट्यावर रात्री निद्रा झाली. (पू.ली. 527, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून गांधारीला गेले. शाहगढ चे पूर्वीचे नाव श्रीपुरी होते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

येथील स्थानाला मुस्लीम परिवार शाहमुनींची (रुस्तम शाह साहब) दरगाह अर्थात समाधी समजून पूजा करतात, म्हणून आजही ह्या स्थानाच्या बाहेर ‘रुस्तम शाह साहब दरगाह’ लिहलेले आहे. पण वास्तविक तर येथे विस्तिर्ण अशा ताएश्वराचे मंदिर होते व स्वामींची येथे वसती झाली होती.

दरगाह समजताना सुद्धा मुस्लीम लोक महानुभावियांना इथे पूजा करण्यास परवानगी का देतात ? या मागचा इतिहास असा कि

शहागढचे पूर्वी चे नाव श्रीपुरी असे होते. असा लीळाचरित्रात उल्लेख आहे. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या शहागडला म्हणजे तेव्हाच्या श्रीपुरीला बाराव्या शतकात येवून गेले. तेव्हा पासून ते तायेश्वाराच्या मंदिरातील चौक महानुभावीयांसाठी पूजनीय आहे, परंतु नंतर स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यावर मुघलांचे राज्य आले, व मुस्लीम जनसंख्या वाढीस निघाली, त्यानंतर किमान 500 वर्षांनी म्हणजे इ.स. 1748 मध्ये मुस्लीम मराठी संत कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहामुनी यांचा जन्म झाला.

या 500 वर्षात महानुभावियांचे अनुयायी सुद्धा वाढले भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा प्रभाव त्या पंचक्रोशीत पडला, ज्यातून पुढे हे मुस्लिम घराण्यातील ‘शाह’ महानुभावांच्या एकेश्वरवादी भक्तीत रममाण झाले. ते इतके रममाण झाले की त्यांनी लिहीलेला ग्रंथ महानुभांचा मान्यताप्राप्त ग्रंथ बनला आणि गावाचे श्रीपुर हे नाव जावून एका मुस्लिम सुफी संतांच्या नावे या गावाला शहागड हे नाव मिळाले अर्थात लोकांनी दिले. शहामुनी यांनी पांचाळेश्वर येथील महंत मुनींद्र नावाच्या महानुभावाकडून महानुभाव पंथाची दीक्षा घेतली होती, ई.श्री. शहामुनीचे खरे नाव “शहाँ”असे होते, आपल्या या नावास गुरूचे नाव लावून शहामुनी केले. ई.श्री.शहामुनीने शहागड येथे असलेल्या श्रीचक्रधरांच्या चरणांकीत स्थानाजवळ राहूनच “सिद्धांतबोध” नावाचा ग्रंथ लिहिला. परमेश्वर कोण व कसा आहें त्याचि एकनिष्ठ भक्ति केली तर जन्म मरणा चा फेरा चुकतो. या ग्रंथात त्यांनी सांगितले, आणि आपण अविंध (मुस्लिम) खानीत जन्मलो याचे त्यांना फार दुःख होते. शहामुनीचा धार्मिक प्रभाव एवढा वाढला की शेकडो मुस्लिमांनी त्यांच्या पासून महानुभाव पंथाचा उपदेश घेतला. या धार्मिक प्रभावामुळेच श्रीपूरचे “शहागड” हे नामाभिधान झाले.
महानुभाव पूर्वजांनी शहागडकर नावाची महंती प्रतीष्ठा केली जे आज अस्तित्वात आहे, तसीच महंती जर “शहामुनी”या नावाने असती तर शहामुनीचे कार्य आणि धर्म प्रचाराचा इतिहास नवीन पीढीला कळला असता.

शहामुनींचे मोठेपण हे की त्यांनी आपल्या मुस्लीम धर्मातील विद्धंसकारी शक्तींची कडक निंदा आपल्या ग्रंथात करून ठेवली आहे. त्याकाळी हे मोठेच धाडस म्हणावे लागेल. आजही सुधारणावादी मुसलमान व्यक्तींना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागते. इतकेच नव्हे तर त्याला मारूनही टाकले जाते. अशा वेळी शाहमुनी लिहीतात.

नव्हे यातीचा ब्राह्मण । क्षत्रिय वैश्य नोहे जाण ।
शुद्रापरीस हीन वर्ण । अविंधवंशी जन्मलो ॥
ज्यांचा शास्त्रमार्ग उफराटा । म्हणती महाराष्ट्रधर्म खोटा ।
शिवालये मूर्ति भंगिती हटा । देवद्रोही हिंसाचारी ॥
जयांच्या सणाच्या दिवशी । वधिता गो उल्हास मानसी ।
वेदशास्त्र पुराणांसी । हेळसिती उद्धट ॥
ऐसे खाणींत जन्मलो । श्रीकृष्णभक्तीसी लागलो ।
तुम्हां संतांचे पदरी पडलो । अंगीकारावे उचित ॥

शहामुनींनी त्यांच्या सिद्धांतबोध ग्रंथात आपल्या कुळाची माहिती दिली आहे. आपल्या घराण्यात चार पिढ्यांपासून हिंदू देवी देवतांची पुजा अर्चना होत असल्याची माहिती स्वत: शहामुनींनीच लिहून ठेवली आहे. शहामुनींचे वंशज असलेली 5 घराणी आजही या परिसरांत नांदत आहेत. या स्थानाची ते लोक समाधी समजून देखभाल करतात. कारण त्यांना वाटते कि ही शाहमुनी यांची समाधी आहे, तसा बोर्ड पण त्यांनी मंदिरावर लिहून ठेवला आहे. आणि हे स्थान तेव्हापासून त्यांच्या कब्ज्यात आहे. पण वास्तविक ते महानुभावांचे वसती स्थान आहे, स्वामींच्या वसती स्थाना जवळ राहून शाहमुनी यांनी ग्रंथ लिहला व कदाचित येथेच कुठे तर त्यांना पुरले गेले असणार, म्हणून हा भ्रम त्या पिढीगत मुस्लीम परिवारांना होत आहे. शाहमुनींच्या उपरांत 3 ते 4 पिढ्यांनी महानुभाव पंथाचे अनुसरण केले, पण आता मात्र ते लोप पावत चालले आहे, मुसलमान असूनही हे शहामुनींच्या उपदेशाप्रमाणे मांसाहार न करणे पाळतात हे विशेष.


अनुपलब्ध स्थाने :

1. तायेश्वरी आसन स्थान.

2. देवळाच्या वायव्येचे परिश्रय स्थान.


शहागडची एकूण स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila – 526
  • Shahagad : श्रीपूरीं तायेस्वरीं आसन :।।:
  • गोसावी नदी उतरौनि तायेस्वरा बिजें केलें: गंगेचिये थडी उत्तरामुख विस्तीर्ण तायेस्वराचें देउळः तेथ चौकीं नावेक आसन जालें: चरणक्षाळण जालें: गुळळा जालाः विडा ओळगवीलाः तैसेचि गोसावी नांदीयाचेया साजेयाकडौनि बिजें केलें (पानेस्वरा बिजें केलें ) :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य (अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य (अवस्थान )होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य (अवस्थान) होते. पूढे स्वामी नंदापूर (नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाववरुण शहागडला आले. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 527
  • Shahagad : श्रीपूरीं पानेस्वरीं वस्ति :।।:
  • गावांपसिमें टेकावरि विस्तीर्ण पानेस्वरांचें देउळः पूर्वामुखः तेथ चैकाचां नैरूत्य कोनी ओटाः तयावरि वस्ति जालीः बाइसीं रात्रीचा पूजावसरू केलाः उपाध्याकरवी दूध आणविलेः तांदुळ वेळिलेः मग गोसावियांतें व्याळीयेलागी विनविलें: तवं व्याळीयेची प्रवृत्ति नाहीं: बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः या दुधाभाताचें काइ करूं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः दहीकरंबा कराः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘ दहीकरंबा तो कैसा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः भातांतु दूध घालावेः एळामिरीयाची वरि पुडी घालावीः ताकाचें बोट लावावेः तोंड बांधौनि ठेवाः दहीकरंबा होइलः’’ मग बाइसीं भातांतु दूध घातलें: ताकाचें बोट लाविलें: दहीकरंबा केलाः मग रात्री गोसावियांसि ओटयावरि पहूड जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य (अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य (अवस्थान )होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य (अवस्थान) होते. पूढे स्वामी नंदापूर (नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाववरुण शहागडला आले. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: