Sawaladbara (सावळेदबारा)

सावळेदबारा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद


येथील 5 स्थाने - सावळेदबारा गावातच पूर्वीच भव्य मंदीर बांधकाम झालेले आहे. येथे मुख्य मंदीरासह 4 स्थाने आहेत. मोठ्या मंदीरासमोर दत्तमंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

जाळीच्या देवाहून ईशान्येस सावळदबारा पायमार्गे 5 कि.मी. आहे. जाळीच्या देवाहुन सावळदबारा (गिरडा फाटा मार्गे) 16 कि.मी. आहे. बुलढाणा ते सावळदबारा 50 कि.मी. सिल्लोड ते सावळदबारा (तोंडापूर-फत्तेपूर मार्गे) 86 कि.मी. अजिंठा ते सावळदबारा 57 कि.मी. सावळदवारा येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान सावळदबारा गावाच्या पूर्व विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गुंफा होती. त्या गुंफेतील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात तरोड्याहून सावळदबाऱ्याला आले. त्यांचे या ठिकाणी 20 दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून वालसांगवीला गेले. (पू.ली. 444 ख.प्र., स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. आरोगणा स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानापासून आग्नेयेस 5 फूट अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ दररोज येथे व्याळी करीत असत. (पू.ली. 444 ख.प्र.,वि.स्था.पो.क्र. 1625)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. आसन स्थान :

हे स्थान देवळाच्या गाभाऱ्यातून बाहेर येताच दक्षिण बाजूस (उजव्या हातास) सभामंडपात आहे. (स्था.पो.शा.प्र.)

या व्यतिरिक्त सभामंडपातील पाचीही स्थाने निर्देशरहित आहेत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. पूजा आरोगणा स्थान :

हे स्थान देवळाच्या वायव्येस वडाच्या झाडाजवळ दक्षिणाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे दायनायकांचा आवार होता.

लीळा : सर्वज्ञांना येथे दररोज पूजा आरोगणा होत असे. (पू.ली. 422, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. विहरण स्थान :

हे स्थान देवळाच्या सभामंडपाच्या उत्तरेस सावळदेवाच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळापुढे चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ येथे विहरणासाठी येत. त्या वेळी त्यांना चौकात आसन होत असे. (पू.ली. 209, तु.प्र.,स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) दायनायकांच्या आवारातील मादने स्थान.

2) देवळाच्या आग्नेयेचे परिश्रय स्थान.

3) संगमावरील देवळातील विहरणस्थान.

4) आंब्याच्या झाडाखालील विहरण स्थान.


सावळदबाऱ्याची एकूण स्थाने : 9


  • Purvardha Charitra Lila –
  • Savaldabara : सांवळदेवीं आटवलिये गुंफें अवस्थान :।।:
  • तैसेचि गोसावी दाइनायकाच आवारासि बिजें केलें: बरवें उच्चासन रचीलें: तेथ गोसावियांसि आसन जालें: बाइसांचे अवघे संबंधीये श्रीचरणां लागलें: मग अर्घपाद्य केलें: बाइसीं समस्तांसि चरणोदक सुधापान करविलें: मग गंधाक्षताः धूपदीप पुष्पमाळा ऐसा दाइनायकें गोसावियांसि यथोक्त पूजावीधि केलाः समस्तांकरवी करविलाः ऐसें गोसावियांचे अर्चन केलें: दाइनायकमुख्य समस्त सुहृद्वर्ग परमहर्षातें पावलेः मग दुपाहारचां पूजावसरः आरोगणाः गुळळा विडा पहूड उपहूड जालाः सायंकाळीं मर्दनामार्जने जालें: पूजावसर जालाः भक्तिजनासि पांतीप्रसाद जालाः मग गोसावी सावळदेवासि बिजें केलें: सावळदेवादक्षिणें आसन जालें: सावळेदेवाचें देउळ पूर्वाभिमुखः चैकासि दारे तीनिः एक उत्तराभिमुखः एक पूर्वाभिमुखः एक दक्षिणाभिमुखः पूर्वाभिमुख गाभाराः मग चौकीं आसन जालें: जगतिचा दारवंठां पूर्वाभिमुखः पसिमे खिडकीः सावळदेवादक्षिणे भितरीलीकडें जगतिसीं पूर्वपसिम पटिशाळ होतीः पूर्वपसिम उत्तराभिमुख ओटाः पटिशाळे पसिमीली सीरां एका खणाची गुंफा पूर्वाभिमुखः तीचें नांव आटवलीः तेथ अवस्थान जालें: किती दी तें नेणिजेः एक म्हणति दिस वीसः देउळा पौळीबाहिरी वाव्य कोनीं पांडा दाहा दायेनायकाचा आवारू पूर्वाभिमुखः खिडकीएहूनि गोसावी तयाचेया आवारासि बिजें करीतिः तेथ गोसावियांसि प्रतिदीनी मार्जनें होएः पूजा होएः तथा भक्तिजनासहित आरोगणा होएः गावांआग्ने वीहिरीपूर्वे बदरिखीया एकु आंबाः तयातळीं विहरणः सावळदेवीं विहरणः गावांदक्षिणें नैची थडीए दोही वाहाळामध्यें देवता असेः तेथ गोसावी विहरणां बिजें करीतिः एखादा दिसीं तळेयाचीए पाळीं आसन असेः ऐसें प्रतदिनी विहरणा बिजें करीतिं: विळीचां प्रतिदीनी व्याळीये दायेनायकाचें ताट येः सावळदेवाआग्ने परिश्रया बिजें करीतिः एकु दिसीं दायेनायकें गोसावियांसि वस्त्रपूजा केली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात कनाशी-भडेगाव-पाचोरा-सेंदुर्णींवरुन आले चांगदेवपूरिला ५ दिवस वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी नागापूर-हरताळा-पाळेगाव-टाकळिवरुन सावळदबार्यांला आले. स्वामींचे सावळदबार्या ला २० दिवस अथवा १ मास वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Savaldabara : मार्गी दायेनायकां भेटि :।।:
  • गोसावी एरे दिसीं सावळदेवा बिजें करीति ऐसें आधिली दिसीं मार्तंडातें बाइसीं म्हणितलें: ‘‘मार्तंडाः तूं सावळदेवासि जायेः दायांपुढें सांघावेः बाबा येत असतिः अवघी आइती करावीः आणि घोडेनिसीं बाबासि साउमेया यावें:’’ मग ‘‘हो का’’ म्हणौनि मार्तंड सावळदेवासि गेलेः तेथ बाइसाचें भाचे दायेनायक होतेः तयापुढें सांघितलें: ‘‘आहोः गोसावी येतातिः’’ तें परिसौनि हर्षे निर्भर जालें: तिहीं सडासंमार्जन करविलें: चौकरंगमाळीका भरविलियाः तोरणें गुढीया उभविलियाः उपाहाराची आइती करविलीः आपण घोडें घेउनि साउमे आलेः मार्गी दरीसन जालें: गोसावियांतें देखिलें आणि घोडेयाखालुते उतरलेः गोसावियांसी भेटि जालीः साष्टांग दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: मग दाइनायकें गोसावियांतें विनविलें: ‘‘घोडेयावरि बैसावे जीः’’ गोसावी विनती स्वीकरिली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात कनाशी-भडेगाव-पाचोरा-सेंदुर्णींवरुन आले चांगदेवपूरिला ५ दिवस वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी नागापूर-हरताळा-पाळेगाव-टाकळिवरुन सावळदबार्यां दिशेने स्वामीं निघाले तेव्हाची ही लीळा…)
  • (टिप : ही लीळा “सावळदेवाकडें बिजें करितां” असा निर्देश असल्यामुळे सावळदबार्याच्या जवळपासचीच लीळा असावी म्हणुन ‘सावळदबारा’ या ठीकाणीच ही लीळा Upload केली आहे.)
  • Purvardha Charitra Lila –
  • Savaldabara : मार्गी व्याघृ पाठीं येणें :।।: / मार्गी व्याघ्रा स्तीति :।।:
  • उदेयाचां पूजावसर जालेयानंतरे गोसावी चांगदेवींहूनि सावळदेवाकडें बिजें करितां मार्गी गुल्म संकुळांतुनि व्याघ्रें गोसावियांतें देखिलें: आणि बाहीरि निगालाः आणि गोसावी अमृतदृष्टी अवलोकीलाः तेणें दृष्टरोखातें सांडिलें: आणि आनंदनिर्भर स्तीति जालीः सत्वातें पावलाः साउमा आलाः बाइसें ‘बाबाः बाबा वाघुः’’ म्हणौनि गजबजों लागलीः ‘‘जी जीः वाघु आलाः’’ म्हणौनि भक्तिजनें भियालीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भियानाः येवो द्याः हा कोण्हाचें काही न करीः’’ मग गोसावी तो श्रीकरें स्पर्शिलाः ‘‘भीया तें याचां ठाइं नाहीं कीः’’ मग गोसावी सामोरें बिजें केलें: तो पाठीपाठी उगाचि येवो लागलाः मग बाइसीं तयाचीए पाठीवरि आपुली वस्त्रें घातलीः भक्तिजनें आपुलिया कंथा घातलियाः पाठींपाठीं आलाः गावां एकाचां आखरीं पावलेः आणि गोसावी उभे राहिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘लोकु देखैल आतां राहिजो महात्माः’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः एणें दृष्टरोख सांडिलाः हा कोण्हाचें काही न करी तरि येवो कां दीजे ना?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा आतां कव्हणासि उपद्रो न करीः परि याचें स्वरूप भयानक देखौनि लोकु यांसि उपद्रो करीलः’’ गोसावी समीप बिजें करौनिः अनुज्ञा दिधलीः ‘‘महात्माः जाः खेळाः’’ मग तो शरीरस्वभावो देहावधी विसरौनि गेला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात कनाशी-भडेगाव-पाचोरा-सेंदुर्णींवरुन आले चांगदेवपूरिला ५ दिवस वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी नागापूर-हरताळा-पाळेगाव-टाकळिवरुन सावळदबार्यां दिशेने स्वामीं निघाले तेव्हाची ही लीळा…)
  • ((टिप : ही लीळा “चांगदेवींहूनि सावळदेवाकडें बिजें करितां मार्गी” असा निर्देश असल्यामुळे ‘हारताळां’ व ‘सावळदबारा’ दोन्हि ठीकाणी ही लीळा Upload केली आहे.) (कारण “गोसावी चांगदेवीहूनि बिजें केलें: हारताळां तळेयाचीए उत्तरीलीए पाळीए तुंबापासी झाडाखाली आसन जालें:” असा निर्देश असल्यामुळे चांगदेव ऐवजी ‘हारताळां’ या ठीकाणी ही लीळा Upload केली आहे))

  • Purvardha Charitra Lila –
  • Savaldabara : तुरंगमारोहणीं देमतीप्रति श्रीकृष्णलीळा कथन :।।: / देमती तुरंगमारोहणीं प्रवृत्ति विषयो अनुवादु :।।:
  • मग गोसावियांसि घोडा ओळगवीलाः तो कुमैत वान तेजीः तयाचा वर्ण काळीया गाठीचां: केहाडा चैखुरीं विलासलाः गोसावी तया घोडेयावरि आरोहण केलें: पुढें भक्तिजन चालतिः मागिलांकडें गोसावीं: गोसावियांचें घोडें वरिकें: गोसावी मागिल वास पाहिलीः तवं मागिलीकडें देमाइसें भागलीं येतें असतिः तियें गोसावियांतें टाकुनि आलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देमतीः याः घोडेया बैसाः’’ म्हणौनि पासाडाचा अनुकारू दाखविलाः देमाइसीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः जालें नव्हे जीः’’ म्हणौनि पासाडावरि हात ठेविलाः यावरि गोसावी म्हणितलें: ‘‘देमतीः श्रीक्रष्णचक्रवर्ति कुब्जिकेंभूवना बिजें केलें: सरिसे उद्धवदेवः तिहीं दोन्हीं उचे आसनें बैसावेया घातलीः एका आसनावरि श्रीक्रष्णचक्रवर्ति बैसलेः उद्धवदेवातें म्हणितलें: ‘बैसा श्रीउधवदेव होः’ आणि उद्धवदेव खाली बैसलेः आसनावरि हात ठेविलाः तेथ तेही स्वामीसेवक भाव जाणविला आणि श्रीक्रष्णचक्रवर्तिचिए प्रवृत्ति विखो जालेः’’ तें गोष्टि सांघितलीः ‘‘तैसें तुम्हीं केलें: देमतीः तुम्हीं एथ स्वामीसेवक भावो जाणविला आणि एथचिये प्रवृत्ति विषयो जालेतिः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात कनाशी-भडेगाव-पाचोरा-सेंदुर्णींवरुन आले चांगदेवपूरिला ५ दिवस वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी नागापूर-हरताळा-पाळेगाव-टाकळिवरुन सावळदबार्यां दिशेने स्वामीं निघाले तेव्हाची ही लीळा…)
  • (टिप : ही लीळा “सावळदेवाकडें बिजें करितां” असा निर्देश असल्यामुळे सावळदबार्याच्या जवळपासचीच लीळा असावी म्हणुन ‘सावळदबारा’ या ठीकाणीच ही लीळा Upload केली आहे.)


या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: