Sautada-Ramdara (सौताडा-रामदरा)

सौताडा-रामदरा, ता. पाटोदा, जि. बीड.


येथील स्थाने ही सौतडा गावाच्या पश्चिमेकडे 2.5 कि.मी. रामदरा आहे तेथे रामेश्वर मंदीर परीसरात ही 5 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

सौताडा हे गाव, अहमदनगर बीड मार्गावर जामखेडहून ईशान्येस 7 कि.मी. आहे व बीडहून नैर्ऋत्येस 59 कि.मी. आहे. मातकुळीहन सौताडा (चिंचपूर, जामखेड मार्गे) 16 कि.मी. आहे. वनदेवाहून पूर्वेस सौताडा पायमार्गे (रामदरा मार्गे) 4 कि.मी. आहे. सौताडा गावात सानप गल्लीमध्ये एक मांडलिक स्थान आहे. तेथे रामदऱ्यातील स्थानाचे पुजारी राहतात. तेथे पाणी वगैरे पिण्याची सोय आहे. सौताडा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

(रामदऱ्यातील स्थाने)


सौताडा गावाच्या पश्चिमेस 2.5 कि.मी. अंतरावर ‘रामदरा आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील 3 स्थान एकाच मंदिर परिसरात आहेत)

1. अवस्थान स्थान :

हे स्थान रामदऱ्यामध्ये विचरणा नदीच्या पश्चिम काठावर रामेश्वराच्या देवळाच्या आवारात वायव्य विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. देवळात दक्षिण भिंतीला लागून स्थानाचा पूर्व-पश्चिम ओटा आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात साकतहून सौताड्याला आले. त्यांचे या ठिकाणी वीस दिवस वास्तव्य होते. (पू. ली. 339, स्था. पो.) त्यानंतर ते येथून मातकुळीला गेले.


2. आसन स्थान :

हे स्थान रामेश्वराच्या देवळाच्या चौकात आहे. देवळाला एकूण दोन दरवाजे आहेत. उत्तराभिमुख आणि पश्चिमाभिमुख, उत्तराभिमुख दरवाजातून आत जाताच डाव्या हाताचा जो चौक तो नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू साकतहून आल्यावर, गुंफेची साफसफाई होईपर्यंत त्यांना येथे आसन झाले. (पू. ली. 338, स्था. पो.)


3. परिश्रय स्थान :

स्थान रामेश्वर देवळाच्या दक्षिणेस चिंचेच्या झाडाजवळ आहे. पाच पायऱ्या हेच परिश्रय स्थान होय.


4. आसन स्थान :

रामेश्वर देवळाच्या उत्तरेस विंचरणा नदीवर उंच धबधबा आहे. त्या धबधब्याचे पाणी जेथे खाली पडते, तेथेशेजारीच कुंडाजवळ असलेल्या शिळेवर सर्वज्ञांना आसन झाले. तेथे जाण्यास अवघड आहे व कड्याचा काही भाग कोसळलेला असल्याने स्थानाची निश्चित जागा सांगता येत नाही; म्हणून लीळा आठवून दुरूनच नमस्कार करावा.

लीळा : एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू विहरणासाठी धारेकडे आले. शिळेवर आसन झाले. उंचावरून पडत असलेल्या पाण्याचे तुषार त्यांच्या अंगावर उडत होते. ते तुषार त्यांच्या चांपेगौर त्वचेवर माणिक मोत्यासारखे शोभून दिसत. मग सर्वज्ञांनी भक्तजनांना धारेभोवती प्रदक्षिणा करण्यास सांगितली. सर्वात पुढे बाइसा, त्या पाठीमागे चांगदेवभट, दायंबा, उपाध्ये, प्रसनायक. प्रदक्षिणा घालताना बाइसा घसरायच्या ते पाहून भक्तजन हसत; आणि सर्वज्ञही किंचित हसत. (पू. ली, 340, स्था. पो.) आणि तेथूनच सर्वज्ञांनी धार अवलोकन केली. (स्था, पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

रामदऱ्यातील स्थाने संपूर्ण


5. आसन स्थान :

हे स्थान रामदऱ्यातून पायऱ्या चढून वर गेल्यावर पुढे 200 मीटर अंतरावर पाऊल रस्त्याच्या उत्तर बाजूस चौथऱ्यावर आहे. येथे पडक्या मंदिराचे अवशेष म्हणून विस्तीर्ण नंदी आहे. स्थानाला ओटा आहे पण देऊळ नाही. या स्थानाच्या जवळच प्रशासनाने खेळण्याचे प्लेग्राउंड आता नवीन तयार केलेले आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू साकतहुन आल्यावर रामदऱ्यात जाण्यापूर्वी त्यांना येथे थोडा वेळ आसन झाले. बाइसांनी श्रीचरण प्रक्षाळण केले. गळळा झाला, विडा झाला. मग सर्वज्ञ रामदऱ्याकडे गेले. (पू.ली. 336, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


6. घाटी चरणचारी उभे राहणे स्थान :

हे स्थान क्रमांक 5 च्या स्थाना पासून काही अंतरावर त्याच परिसरात आहे. या स्थानाला सुद्धा ओटा आहे पण देऊळ नाही.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू साकतहुन आल्यावर रामदऱ्यात जाण्यापूर्वी त्यांना येथे थोडा वेळ उभे राहिले. मग सर्वज्ञ रामदऱ्याकडे गेले. (पू.ली. 336, स्था. पो.)


अनुपलब्ध स्थान :

1) गुंफेच्या अंगणातील मादने स्थान.

2) गुंफेच्या उत्तरेचे लिंगाच्या देवळातील आसन स्थान.

3) गुंफेच्या पूर्वेकडील पायऱ्यावर चरणचारी उभे राहणे स्थान.

4) गुंफेच्या पूर्वेकडील लिंगाच्या देवळातील आसन स्थान.


सौताड्याची एकूण स्थाने : 10


  • Purvardha Charitra Lila – 336
  • Sautada (Ramdara) : सविताडां साजां आसन :॥:
  • उदयाचा पूजावसर जालेयानंतरे तेथौनि गोसावी सविताडेयां बीजेः केलेंः सविताडेयां पश्चिमे साजेः तेथ गोसावीयांसि आसन जालेंः बाईसीं चरणक्षाळण केलेः गुळुळा जालाः बाईसीं फोडी ओळगविलीयाः विडिया करौनि दिधलीयाः विडा जालाः मग गोसावी तेथौनि रामदरेयासि बीजें केलें :॥:
  • (टिप – येथे हे पहील्यांदा येने… स्वामी पाटवध्याला १४ दिवस वास्तव्य करुन साकतवरुन सौताळ्याला आले…)
  • Purvardha Charitra Lila – 337
  • Sautada (Ramdara) : घोंगडें पतनश्रवणें चांगदेवभटां स्थाननिर्देशानुवादु :।।: / घाटीं चांगदेवभटीं घोंगडें पतन :।।:
  • गोसावी रामदरेया बिजें करिता घाटीं तिसरिये पाठरियेवरि उभे असतिः चांगदेवभटांचां खांदीं घोंगडें होतें: तें पडिलें: तें नेणतिः तें उगेचिः घाटासमीपचि आसन रचावेया गोसावी चांगदेवभटातें म्हणितलें: तवं चांगदेवभट गजबजिलें: इकडें तिकडें: मागा पुढा पाहों लागलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः काइ पाहात असा?’’ तेही म्हणितलें:‘‘जी जीः घोंगडें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइ पडिलें?’’ तेही म्हणितलें: ‘‘ना जीः न पडेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि काइ विसरलेति?’’ तेही म्हणितलें: ‘‘ना जीः विसरेनाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि काइ जालें?’’ तेही म्हणितलें: ‘‘ना जी निसरलें:’’ हें परिसौनि गोसावी इखितु हास्य केलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाः तेथचि पैल डोंगराबुडी खाली पडिलें असें: जाः’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि गेलेः तवं होतें: तें घेउनि आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पाटवध्याला १४ दिवस वास्तव्य करुन साकतवरुन सौताळ्याला आले व रामदर्याकडे निघाले तेथिल ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 338
  • Sautada (Ramdara) : दायंबा स्तीतिः आसन परीत्यागानुवादु :।।:
  • दायंबास स्तीति जाली होतीः तें पुढां गेलेः गोसावियांसि वरिली देउळीयें जेथ आसन रचावें तेथ जाउनी घोंगडेंयाची चैघडी घालुनि बैसलेः गुंफां जवं झाडिजे तवं बाइसें चौकीं आसन रचूं गेलीं: तवं दायंबा स्तीतिमंत बैसले असतिः बाइसीं म्हणितलें: ‘‘बटिकाः उठिः परता जाः एथ बाबासि आसन घालू देः’’ दायंबाये हुंकार देउनि म्हणितलें: ‘‘एथचि आसन रचावें मां? ऐसें पैर्‍हां घालानाः तेथ काही बोटें भोए खालावली असें?’’ बाइसासि विस्म जालां: तंव बाइसीं घागरा बांधलाः ‘बाबाः हें काइ जालें या पोरासि? बाबासि कैसें आसन रचूं नेदी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुमची म्हणौनि एणे भीड राखिलीः आणिकाचें तरि पैर्‍हा टाकूनि घालिताः एथचें म्हणौनि आडोळीचिनाः’’ आणि तयाची स्तीति भंगलीः उठिलें: मग बाइसीं तेथ आसन रचीलें: गोसावियांसि तेथ आसन जालें: चरणक्षाळण जालें: पूजाः आरोगणा जालीः पहूड जालाः एतुले वरीलीं लिंगाचिये देउळीः मग गोसावी गुंफेपासी बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पाटवध्याला १४ दिवस वास्तव्य करुन साकत-सौताळ्यावरुण व रामदर्याकडे आले येथे स्वामिंचे २० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हांच्या ह्या लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 339
  • Sautada (Ramdara) : रामदरां गुंफे अवस्थान :॥:
  • मग गोसावी रामदरेयआंतु बीजें केलेंः रामनाथाचिया देउळासि बीजें केलेंः तेथ आसन जालेः तेथ बाईसातें म्हणितलेंः बाई पैली गुंफेसि बिढार कराः गुंफा उघडविलीः गुंफा झाडीलिः सारवलीः चौकरंगमाळीका भरिलीयाः गुंफेभितरी ओटा पूर्वपश्चिमः गोसावीयांसि तया ओटयावरी पूजावसरु पहुड होयेः दोहि वेळेची आरोगणा होयेः पुर्वामुख भिंतीसि आसन होयेः बाईसें विडा ओळगवितीः दक्षिन विभागी ओटाः बाईसें शयनासन रचीतिः गोसावी आसनि उपविष्ट होतिः मग पहुड स्विकरीतिः ओटयावरी अवस्थान जालेंः दिस वीस :॥:
  • (टिप – येथे हे पहील्यांदा येने… स्वामी पाटवध्याला १४ दिवस वास्तव्य करुन साकत-सौताळ्यावरुण व रामदर्याकडे आले येथे स्वामिंचे २० दिवस वास्तव्य होते तेव्हांच्या ह्या लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 340
  • Sautada (Ramdara) : धारे आसनः प्रदक्षिणा करवणें :।।: / नदीधारे प्रदक्षिणा :।।:
  • एरी दीं उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें गोसावी धारेचेया कुंडा विहरणा बिजें केलें: तेथ थोरे सीळातळावरि उत्तराभिमुख आसन जालें: गोसावी भक्तिजनातें म्हणितलें: ‘‘ये धारे प्रदक्षिणा करा गाः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ मग बाइसे मुख्य अवघीचि गेलीः एक एकामागें प्रदक्षिणेसि निगालीः बाइसें पुढां: बाइसामागां चांगदेवभटः दायंबा उपाध्येः प्रसनायकः ऐसीं प्रदक्षिणा करावया एकमेकां पुढें रीगतिः धावतिः आडखुळतिः पडतिः निसरतिः तवं बाइसें निसरतिः पडतिः भक्तिजनें हासतिः गोसावी इखितु हास्य करीतिः श्रीमूर्तिवरि तुषार पडतिः तें माणुकूली खेवणिले सुवर्णाचे कण ऐसें दिसतिः ऐसीं जवं गोसावियांसी प्रवृत्ति तवं लीळा केलीः तें प्रदक्षिणा करौनि आलीं: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः पुढां बैसलीः मग गोसावी गुंफेसि बीजें केलें: ऐसें गोसावियांसि तेथ जवं अवस्थान तवं विहरणासि बिजें करीतिः कदाचित रामनाथाचेया देउळा बिजें करीतिः तेथ आसन होएः एकाधा दी नारायणाचा देउळीं आसन होएः एकाधा दी कुंडी आसन होएः एकाधा दी सीळयेवरि आसन होएः एकाधा दी लिंगाचीए देउळी आसन होए :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पाटवध्याला १४ दिवस वास्तव्य करुन साकत-सौताळ्यावरुण व रामदर्याकडे आले येथे स्वामिंचे २० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हांच्या ह्या लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 341
  • Sautada (Ramdara) : प्रसनायका भिक्षासौकर्यत्वनिषेदु कथन :।।: / प्रसनायका भिक्षासौकरीये कथन :।।:
  • भक्तिजन दिसवडी भिक्षे जातिः एक मात्रकौळियेः एक सवितडेयाः गोसावी प्रसनायकातें म्हणितलें: ‘‘तुम्ही जांबुखेडा भिक्षेसि जाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मढसौकर्य उदकसौकर्य भिक्षासौकर्य पाहुनि याः’’ दायंबा आणि प्रसनायक जांबखेडा भिक्षे गेलेः तवं तेथ भिक्षासौकर्यः मढसौकर्य उदकसौकर्य असेः प्रसनायकें म्हणितलें: ‘‘दाइंयाः आम्हीं एथ राहौनिः गोसावी पुसति तरि ऐसें सांघावें: भिक्षासौकर्य असेः मढसौकर्य असेः उदकसौकर्य असेः विजनसौकर्य असेः जै गोसावी बिजें करीति तें दिसी मज जाणवाः मग मीं येइनः’’ एरी दिसी दायंबा आलेः गोसावी भृभंगी पुसिलें: ‘‘तो क्यें गा?’’ दायंबाए म्हणितलें: ‘‘जी जीः तो तेथ राहिलाः’’ गोसावियांपुढें मागिल सांघितलें: ‘‘जी जीः गोसावियांतें प्रसनायकें बोलावूं पाठविलें असें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पोरूः गेला आपुलेया अंगाः’’ मग बाइसीं पुसिलेः ‘बाबाः आपुला अंगा कैसा गेला?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कव्हणी एकु संन्यासी असतिः तयातें धाकुटे राऊळ असतिः तयातें चातुर्मासीकारणें गावो पहावेया पाठवीतिं: बरवा गाउ सौकर्ये पाहावे आणि तुम्हीं यावें: मग तो गावो पाहतिः तें तेथ राहातिः प्रसादासि आलेयागेलेया हातीं निरोपु पाठवीतिः श्रीपादातें ऐसें म्हणावेः ‘भिक्षासौकर्य असेः मढसौकर्य असेः उदकसौकर्य असेः आम्हां पटीपगडी होइलः मां येउनिः’ तैसा पोरू आपुलेया भगेविणाचेया अंगा गेलाः जाः बोलाउनी घेउनि याः तेथौनि निनाः एथौनि हें निगालें गाः’’ मग दायंबा गेलेः ‘‘प्रसनायकोः तुमतें गोसावी बोलाउं धाडिले असेः’’ मग तें ‘‘वासुदेवोः’’ म्हणौनि निगालेः गोसावियांपासी आलेः दंडवते घातलीः श्रीचरणां लागलें: पासी बैसलेः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां गाः तुमतें एथौनि पाहावेया धाडिलें: कीं राहावेया धाडिलें? ऐसें न किजे कीं:’’ ऐसें गोसावी तयासि कोपलेः तें उगेचि होतें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पाटवध्याला १४ दिवस वास्तव्य करुन साकत-सौताळ्यावरुण व रामदर्याकडे आले येथे स्वामिंचे २० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हांच्या ह्या लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: