Sadegaon (साडेगाव)

साडेगांव, ता. अंबड, जि. जालना


येथील 1 स्थान - हे स्थान साडेगांव गावाजवळच नैऋत्येकडे गोदावरी नदीच्या काठावर टेकाडावर आहे.


जाण्याचा मार्ग :

पांढरीहून ईशान्येस साडेगाव पायमार्गे 3 कि. मी. आहे. साडेगावला जाण्यासाठी तीर्थपुरीहून वाहनमार्ग आहे. तीर्थपुरी ते साडेगाव 8 कि.मी. साडेगावला जाण्यासाठी अंबडहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान साडेगावच्या नैर्ऋत्येस एक फाग अंतरावर गोदावरी नदीच्या उत्तर काठी उंचवट्यावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे मैराळाचे देऊळ होते. त्या देवळाच्या पटीशाळेवरील हे स्थान होय.

लीळा : (1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात जोगलादेवीहून साडेगावला आले. प्रथम त्यांना या ठिकाणी उत्तराभिमुख आसन झाले. येथे गौराइसा, आवाइसा, उमाइसा यांची भेट झाली. आबाइसाने सर्वज्ञांना उपहाराची विनंती केली. संध्याकाळी उपहार घेऊन आली. मग पूजावसर झाला. सर्वज्ञांनी व्याळी केली. नंतर येथेच पहूड झाला. (पू. ली. 506, स्था. पो.)

2. राणाइसाला स्वातंत्रीए धर्म निरुपणे. (पू. ली. 507) दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ येथून पांढरीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. देवळाच्या दक्षिणेचे परिश्रय स्थान.

2. भद्रावती (बोरी) नदीच्या पश्चिम थडी लगतचे काटेरी झाडाखालील आसन स्थान.


साडेगावची एकूण स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila – 505
  • Sadegaon : मार्गी कांटिये तळीं आसनः लाकाचें पक्कान्न स्वीकारू :।।:
  • गोसावियांसि बोरि उतरौनि पैल थडी वाटे डावेया हाता कांटिये तळीं आसन जालें: तेथ तेही विडा ओळगवीलाः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः पुढां बैसलीः मग तयातें क्षेम वार्ता पुसिलीः राणाइसांची श्रमव्यथा देखौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः ये ऐसीं कां?’’ लाखाइसीं सांघितलीः ‘‘जी जीः बळ्हेग्रामूनि निगालोः एहीं नेमु घेतलाः ‘गोसावियांचें चरणोदकवांचैनि आणिक उदक न पीयें’ ऐसा परिच्छेदु केला जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः ऐसा नेमु न किजे कीं: विपायें हें न भेटे पां: पाहे केउतें जाएः तरि काइ कराल?’’ तियें उगीचि होतीः मग बाइसीं गोसावियांचे चरणक्षाळण केलेः बाइसें चरणोदक पेवों सूतें होती तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइ आधी याची मुर्द्धनीं सिंपाः’’ मग बाइसीं तयाची टाळु सिंपीलीः चरणोदक पेवों सुदलें: तिहीं चरणोदक घेतलें: मग तिहीं थाबडेयाची दुरडी गोसावियांपुढें ठेविलीः गोसावी श्रीकरें करौनि पाटियेचा पदरू फेडिलाः दुरडी उघडिलीः आणि म्हणितलें: ‘‘हे काइ बाइः बळ्हेग्रामीचें पक्वान्न?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना जीः काइसि पक्वान्नः हा लाकाचा थाबडाः’’ गोसावी थाबडा श्रीकरें घेतलाः करांगुळीयेचेनि नखेंकरौनि बुडडा उचडिलाः श्रीमुखीं घातलाः प्रसादु केलाः मग तिया जेविलीयाः गोसावियांसि गुळळा जालाः विडा जालाः मग गोसावी तेथौनि बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. नंतर “गोसावी दुपाहारीचि देवतांभुवनौनि बिजें केलें:” “बोरि उतरौनि पैल थडी वाटे डावेया हाता कांटिये तळीं आसन जालें:” असा उल्लेख आहे. पुढील गाव साडेगाव आहे. त्यामुळे सदर लीळा साडेगाव येथे Upload केली आहे…)
  • Purvardha Charitra Lila – 506
  • Sadegaon : साडेगावीं मैराळदेवीं वस्तिः गौराइसां भेटि :।।:
  • गोसावी साडेगावांसि बिजें केलें: मैराळदेवीं डावीएकडें रीगतां पटिशाळेवरि गोसावियांसि आसन जालें: जाडीचा कानवडा बांधलाः गौराइसें पींपळु सिंपों आणि अग्रोदकासि आलीं होतीः तवं जाडीचां कानवडा देखिलाः तिहीं म्हणितलें: ‘‘गोसावियांचीया सारिखी जाडी तरि काइ गोसावी बिजें केलें असैलः’’ ऐसें म्हणौनि आलीः तवं गोसावियांतें देखिलें: आणि भेटि जालीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीं: बैसलीं: मग गोसावी पुसिलें: ‘‘बाइः इंद्रा गावीं असे?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना नसति जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि अग्रोदक कव्हणालागी?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः काकोचेया देवांलागीः’’ तैसींचि तियें हर्षातें पावलीं: बिढारासि आलीं: आबैसां उमाइसां पुढां सांघितलें: तियें गोसावियांचिया दरीसना आलीं: भेटि जालीं: पानेपोफळे दरीसन करौनि दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीं: मग लाखाइसां: आबैसां: खेवांखेवीं जालीः तियें वृत्ति सोइरीं: आबैसीं पुसिलें: ‘‘लाखाइसें: तुम्हीं केधवां आलींति?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘आजी आलों:’’ मग आबैसें गोसावियांजवळी नावेक बैसलीं: गोसावियांतें उपहारालागी विनविलेः गोसावी विनति स्वीकरिलीः मग आबैसा लाखाइसातें बिढारा घेउनि गेलीं: उटिलीं: न्हाणीलीं: जेवण केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळि (जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्य (अवस्थान) होते. नंतर पुढे स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य (अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी साडेगावला आले तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 506
  • Sadegaon : रात्री आबैसांचा उपहारूः मैराळीं वस्ति :।।:
  • विळीचां आबैसांचा उपहारू आलाः गोसावियांसि भितरीं दक्षिणीलीकडें पूजा जालीः आरोगणा जालीः गुळळाः विडा जालाः राणाइसां पांतीं जेवण जालें: तेथचि रात्रीं पटिशाळे गोसावियांसि वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळि (जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्य (अवस्थान) होते. नंतर पुढे स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य (अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी साडेगावला आले तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 507
  • Sadegaon : राणाइसां स्वातंत्रियेधर्म निरूपण :।।:
  • लाखाइसांतें आबैसीं नेलें: राणाइसें बिढारीं राहिलीं: मग राणाइसें भुकैलीं जालीः उठतिः बैसतिः सिदोरियेची वास पाहाति आणि लाखाइसांची वाट पाहातिः आणि गोसावियांचिया श्रीमुखाची वास पहातिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः जेवा ना कां:’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः माझी आणि लाखाइसांची सिदोरी एकत्र असेः लाखाइसें येतिः मग जेउं वाढीतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः स्वभावां काइ सांघातु असेः तुम्हीं एकत्र कां ठेवाः स्वातंत्रीयु हा मोक्षः पारतंत्रीयु हा बंधः’’ मग लाखाइसें दिसु मावळता आलीः मग तिहीं पुसिलें: ‘‘राणाइः तु जेविलीसि?’’ ‘‘ना तुम्हांवीन कैसी जेविन?’’ मग तिहीं सिदोरी सोडिलीः आंबिलभातु घालूं आदरिलाः गोसावी पुसिलें: ‘‘बाइः हें काइ?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः हा आंबिलभातुः’’ मागौते गोसावी पुसिलें: ‘‘आणि हें काइ?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः हा दहींभातुः’’ तयावरि बाइसें लाखाइसांसि कोपलीं: ‘‘आपण तेथ जेविलीः इसि आंबिलभातु वाढीत असेः नको वाढूः बाबाकारणें उपाहारू येइलः हें बाबाचिये पांती जेविलः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइ प्रस्तुति तवं हा भातु वाढाः हा नकोः’’ मग तेहीं दधींभातु वाढिलाः तियें जेविलीं: स्वस्थचित्त जालीं :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळि (जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्य (अवस्थान) होते. नंतर पुढे स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य (अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी साडेगावला आले तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: