Ramtek (रामटेक)

रामटेक, ता.काटोल जि.नागपूर


रामटेक येथील 9 उपलब्ध स्थाने एकाच परिसरात गावाच्या पूर्वेकडे रामटेक डोंगरावर भोगराम नावाने ओळखले जातात. उर्वरित स्थाने देवेतेच्या मंदिराच्या चौकात आहेत येथे पूजारी राहतात ते स्थाने दाखवतात.


जाण्याचा मार्ग :

मनसरहून आग्नेयेस रामटेक 7 कि. मी. आहे. नागपूर ते रामटेक (मनसर मार्गे) 47 कि.मी. आहे नागपूरहून रामटेकला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वेगाडी आहे. नागपूर व भंडारारोड मधील कन्हान जंक्शनहून रामटेकला जाता येते. रामटेक शहरात निवासाची सोय आहे. व आपले आश्रम सुद्धा आहेत.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

रामटेक शहराच्या ईशान्येस डोंगरावर किल्ल्यामध्ये पूर्वेच्या दक्षिणाभिमुख दरवाजाच्या आतील वराह मूर्तीच्या पश्चिमेस प्राचीन भोगरामाचे पूर्वाभिमुख देऊळ आहे. त्या देवळात आत जाताना डाव्या हाताला है स्थान आहे. स्थानाचा पूर्व-पश्चिम, उत्तराभिमुख ओटा आहे.

त्रेतायुगात श्रीराम रामटेक च्या मार्गाने पंचवटी ला गेले होते, म्हणून रामटेक हिंदूंसाठी तीर्थक्षेत्र आहे, त्याच गड मंदिर (राम मंदिर) च्या गड किल्यात आपले भोगराम मंदिर आहे. गड मंदिरा साठी ऑटोरिक्षा रामटेक शहरातून मिळतात.

भोगराम मंदिर


लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंचे एकांकात येथे दहा महिने वास्तव्य होते. (स्था.पो.)
येथील इतर लीळा : 1. भोगरामाचा पुजारी येथे प्रथम सर्वज्ञांची पूजा करीत असे. मग आत जाऊन देवतेची पूजा करीत असे (पू. ली. 44)

2. सर्वज्ञांची व बोणेबाइयांची भेट येथेच झाली. (पू.ली. 44)

3. याच ओट्यावर बसल्याने ब्राह्मणाला स्थिती झाली होती. (पू. ली. 45)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


भोगराम मंदिर

2. संदी स्थान :

भोगरामाच्या देवळाच्या उत्तर बाजूस भैरवाचे देऊळ आहे. या दोन देवळांमधील संदी संपूर्ण नमस्कारी आहे. ही नमस्कारी जागा वर्षभर बंद असते, फक्त कार्तिक पौर्णिमेच्या यात्रेच्या दिवशी खोलण्यात येते.


लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू दररोज या संदीतून बोणेबाइयांच्या गुंफेकडेजात असत. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

संधी स्थान

3. परिश्रया बीजे करणे स्थान :

हे स्थान देवळाच्या पूर्वेस आहे.


लीळा : पूर्वी जगतीची खिडकी पूर्व बाजूस होती. त्या खिडकीतून सर्वज्ञ परिश्रयाला जात असत. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

परिश्रया जाणे स्थान

4. लघुपरिश्रय स्थान :

हे स्थान परिश्रया बीजे करणे स्थानाच्या उत्तरेस आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5, 6, 7, 8, 9. ही पाच स्थाने देवळाच्या पाठीमागे आहेत :

ही स्थाने बोणेबाइयांच्या गुंफेशी संबंधित असलेली आरोगणा व आसन स्थाने आहेत. परंतु कोणत्या लीळेचे कोणते स्थान आहे, हे निश्चितपणे सांगता येणार नाही.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

खालीलप्रमाणे दिलेली स्थाने देवेतेच्या मंदिरातील चौकातले आहेत. तिथे स्थानाचे ओटे नसल्यामुळे ते केव्हाही उपलब्ध होऊ शकत नाही, ज्याला माहित आहे त्याला नेल्याशिवाय नमस करता येत नाही.

1. रामाच्या देवळातील आसन.

हे स्थान येथील मुख्य प्राचीन गड मंदिर अर्थात राम मंदिराच्या चौकात आहे, चौक नमस्कारी आहे, हिंदूंचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे अन्य भाविकांची गर्दी असते, म्हणून पुजारी चौकापर्यंत जाऊ देत नाही.

2. लक्ष्मणाच्या देवळातील आसन.

हे स्थान येथील मुख्य प्राचीन लक्ष्मण मंदिराच्या चौकात आहे, चौक नमस्कारी आहे, हिंदूंचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे अन्य भाविकांची गर्दी असते, म्हणून पुजारी चौकापर्यंत जाऊ देत नाही.

राम आणि लक्ष्मण मंदिर एकाच परिसरात आहेत. (गड मंदिर)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. सेंदूरबावी आरोगणा.

हे स्थान नमस करता येते, येथे आता ओटे बांधण्यात आले आहे, सेंदूर बावली म्हणजे एक मोठे कुंड आहे, हे कुंड आपल्या भोगराम मंदिरापासून पुर्वेकेडे 200 मीटरवर आहे, मुख्य पार्किंग जवळून सुद्धा जाता येते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. कापूरबावी आरोगणा.

कापुरबावीच्या तलावाकाठी चामुंडेश्वरी देवी मंदिर आहे कापुरबावी तलाव सेंदूरबावी वरून उत्तरेस पायी 1 कि.मी. आहे, स्थान अनुपलब्ध आहे. येथील स्थानाची जागा आम्हाला सापडली नाही, जर तुम्हाला माहित असेल तर खाली ईमेल बॉक्स माहिती द्यावी.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

कपूर बावी कुंड

5. अंबाळा तळ्याच्या पूर्व पाळीचे आरोगणा.

6. अंबाळा तळ्याच्या पश्चिम पाळी प्राचीन लिंगाचा देऊळी आसन.

7. अंबाळा तळ्याच्या दक्षिण पाळी आसन.

गड मंदिराकडे डोंगरावर जाताना खोल दरीत प्राचीन अंबाळा तलाव दिसतो, त्या तलावाच्या काठावर कधी-कधी आमचे सर्वज्ञ आरोगणा करीत असत, तिथे शिव मंदिराच्या चौकाची नमस्कारी जागा व काठावरील नमस्कारी जागा आम्हाला सापडली नाही, जर तुम्हाला माहित असेल तर खाली ईमेल बॉक्स माहिती द्यावी.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


8. नरसिंही आसन.

9. हनुमंताच्या देवळातील आसन

10. गुप्त रामी आसन

ही तिन्ही मंदिरे गड किल्याजवळ व पार्किंग जवळ आहेत, स्थाने अनुपलब्ध आहेत, नमस्कारी जागा आम्हाला सापडली नाही, जर तुम्हाला माहित असेल तर खाली ईमेल बॉक्स माहिती द्यावी.

गुप्त राम मंदिर गडाच्या पायऱ्या चढताना रस्त्यात पडतो, इथेच कुठेतरी गुप्त भैरव मंदिर असावे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (नरसिंह मंदिर)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (हनुमान मंदिर)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (गुप्त राम मंदिर)


11. गुप्त भैरवी आसन

12. धम्मऋषीच्या देऊळी आसन

13. सीतेच्या न्हाणीच्या उत्तरेचे आसन

14. परिश्रय


रामटेकची एकूण स्थाने : 23


  • Purvardha Charitra Lila – 44
  • Ramtek  :  भोगरामीं अवस्थान :।।: (रामटेक)
  • सर्वज्ञें म्हणितलेः ‘‘बाइः एथिचेया नामापासौनि वेधु कां स्थानापासौनि वेधुः’’ गोसावी भोगरामासि बिजें केलें: भोगरामाचिये पटिशाळे दक्षिणीली भितीसि पूर्वपसिम ओटाः तेथ अवस्थान जालें: तेथीचा बडुवा आधीं गोसावियांसि धूपार्ति करीः मग भोगरामासि करीः ऐसें केतुले एक दी राज्य केलें :।।: (हे गोष्टि गोसावी हिवरळीये लुखदेवोबावरूनि सांघितलीः ब्राम्हणा स्तीति मनसिळेवेर्‍हीं :।।:)
  • Purvardha Charitra Lila – 44
  • Ramtek  :  बोणेबाइयां भेटिः सेवा स्वीकारू :।।: (रामटेक) 
  • गोसावियांसि खडकुलीए अवस्थानः एकु दी भोगरामीचीया बाइया त्रियंबकासि गेलिया होतियाः त्रियंबकौनि मागोमतिया आलीयाः सावंखेडां ब्राम्हणां एकाचीए वोसरीए बिढार घेतलें: मग निद्रा करीतां समयी तेहीं ब्राम्हणीं पुसिलें: ‘‘आइः तुम्हीं काइ श्रीचांगदेवराऊळां गोसावियांचिया?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘नाः श्रीचांगदेवराऊळ तें कोण?’’ ब्राम्हणीं म्हणितलें: ‘‘ना आइः खडकुलीएसि एक पुरूख असतिः काइ सांघों तयाचें लावण्यः सौंदर्यः तयाचे तुम्हीं दरीसन घेया होः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो कां:’’ म्हणौनि निजैलियाः मग उदेयाचि उठौनि गंगेसि आलीयाः तेथुनि गोसावियांचियां दरीसना आलीयाः गोसावियांतें देखिलें: दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलीयाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यें एथीचीं यजमानें मां:’’ गोसावी तयासि बैसलेयां क्षेमालिंगन दिधलें: तिया गोसावियांपुढां बैसलीयाः मग बाइसीं पुसिलें: ‘बाबाः यजमानें म्हणिजेति काइ?’’ यावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें पूर्वि निरालंबी एकाकी विचरत विचरत सिंदुरगिरीसि भोगरामा गेलें होतें:’’ गोसावी भोगरामासि बिजें केलें: नगरांतु पाणिपात्रसि बिजें करीतिः मग अंबाळेयाचिये पूर्विली पाळीसि आरोगणा होएः कदाचित कापूरवावीसि आरोगणा होएः कदाचित सेंदुरवावीसि आरोगणा होएः भोगरामी ओटयावरि पहूड होएः उदेयासि गोसावी विहरणा बिजें करीतिः एकाधा दिसीं लक्ष्मणाचा देउळीं आसन होएः कहीं हनुमंताचां देउळी आसन होएः एकाधा दीं सीतेचीए न्हाणीए बिजें करीः उत्तरीलीकडें आसनः कदाचित अंबाळेया बिजें करीतिः तेथ पसिमीली पाळी लिंगाचीए देउळीए आसन होएः कहीं अंबाळेयाचीए दक्षिणीली पाळी पसिमीलीकडें आसन होएः एकाधा दिसीं नरसिंही आसन होएः एकाधा दिसीं धम ऋषीचा देउळीं आसन होएः एकाधा दीं गुप्तरामीं आसन होएः एकाधा दीं गुप्तबहीरवीं आसन होएः प्रतिदेउळीं: मढमंडपीः पटिशाळाः चैबारां: बावीपोखरणीः तळीं तळौलियाः ऐसीं अवघीं अवलोकीतिः आसन होएः मढावरि पांजरीभवतें अवलोकीतिः एकु दी गोसावी सोंडिएवरि चरणचारी उभे असतिः तवं बोणेबाइया देवतेसि दंडवता आलीयाः तिया गोसावियांतें देखिलें: आणि गोसावियांचिकडें आलीयाः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीयाः मग गोसावियांतें पुसिलें: ‘‘बा आपणेयां नांव काइ?’’ गोसावियांसि मौनाची प्रवृत्तिः गोसावी उगेचिः तिया भोगरामासि पूजा करावया आलीया होतियाः तें पूजा तिहीं गोसावियांचा ठाइ केलीः मग भोगरामासि केलीः मग गेलियाः तवं बडवे आले गोसावियांतें देखिलें: सौंदर्ये देखौनि वेधलेः श्रीचरणां लागलेः आणि विनविलें: ‘जी मीं गोसावियांची पूजा करीनः’ गोसावी मानिलें: मग चरणक्षाळण केलें: श्रीमुख प्रक्षाळण केलें: गुळळा जालाः चंदनाचा टिळा केलाः पुष्पाची पूजा केलीः ‘जय जय’ शब्दीं धूपार्ति मंगळार्ति केलीः पाठी बडवीं देवतेसी पूजा केलीः मग गोसावी रामाचेया देउळासी विहरणा बिजें केलें: एकु दीं भोगरामीचेनि राणेनि बोणेबाइयातें म्हणितलें: ‘‘आवो आवो बोणेबाइः इश्वरपुरूख एक आले असतिः तयासि तुम्हीं प्रतदिनीं दोही सांजी आरोगणा देयावीः’’ बोणेबाइया म्हणितलें: ‘‘ना हो कां:’’ म्हणौनि बाइया भोगरामासि आलीयाः गोसावियांसी ओटयावरि आसन असेः तेही दंडवत केलें आणि मागुते पुसिलें: ‘‘बा आपणेयां नांव काइ?’’ तवं गोसावियांसि मौनची प्रवृत्ति म्हणौनि उगेचिः मग रामासि गेलियाः देवतेसि नमस्कारू केलाः माघौतिया आलीयाः तेंहीचि म्हणितलें: ‘‘बा आपणेयां नांव काइ नग्नदेव?’’ गोसावी श्रीमुकुटें मानिलें: गोसावियांतें विनविलेः ‘‘बा नग्नदेव होः आमचेया गुंफे बिजें करावेः’’ गोसावियांसि बिजें करावाची प्रवृत्तिः गोसावी विनंती स्वीकरिलीः तयाचीये गुंफैसि बीजें केलें: दोहीं देउळांचिये संदीमागां अवकाशीं तयाची गुंफाः तयाची वाटा बिजें केलें: गोसावियांसि आसन रचीलें: गोसावी आसनी उपविष्ट जालें: आरोगणेचे विनविलें: गोसावी मानिलें: पाणीभाताची आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः मग पुढति विनविलें: ‘‘बा नग्नदेव हो जवं एथ असाल तवं एथ यावें होः आम्हीं उपहारू देउनिः उदेया जैसें असैल तैसें आरोगिजे बा विळीचां भिक्षा करौनि येउनिः मां जैसे असैल तैसें आरोगिजो बा’’ गोसावी मानिलें: मग तियें दिउनी गुंफेसि प्रतिदीनीं संदीहुनी बिजें करीतिः गोसावियांसि तेथ आरोगणा होएः कदाचित पाणिपात्रसि बिजें करीतिं: रामाचां देउळीं ओटयावरि पहूड होएः ऐसीं गोसावियांची थोरी प्रसिद्धीः तेयांचे बडुवे प्रतिदीनी देवतेसि पूजा करावेया येतिः तें आधी गोसावियांचा ठाइं करीतिः गोसावियांचें चरणक्षाळण करीतिः पूजा करीतिः दंडवते करीतिः श्रीचरणां लागतिः बाइसीं पुसिलें: ‘बाबाः तें कैसी पूजा बांधति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘सेवतेयां फुलांचे झळंबुकेः मुगुटीं कळेयांचा फराः मोगरे कळीयांचे बाहुसरः हातसरः अष्टांगावरि फुले ठेवतिः तुळसी वातीः मग धुपार्ति मंगळार्ति करीतिः साष्टांग दंडवतें घालीतिः श्रीचरणां लागतिः पाठीं देवतेसि पूजा करीतिः ऐसें प्रतिदीनी करीतिः’’ :।।: (हें गोष्टि गोसावी खडकुलीए रामीचेया बाइयांउपरि बाइसांप्रति सांघितलीः।।:)
  • Purvardha Charitra Lila – 44
  • Ramtek  :  गुप्तबहीरवीं अवस्थान :।।: (रामटेक)   
  • मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एकु दीं एणें गुप्तबहीरवीं विहरणा बिजें केलें: तेथ त्रिरात्र अवस्थान जालें: मागुते स्वस्थाना बिजें केलें: मग केतुलेयां एकां दिसां मनसिळेसि बिजें केलें:’’:।।:

Ramtek Sthan Darshan by Sarang Dhar || Jay Krishni Mahanubhav ||



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: