Ramasgaon (रामसगाव)

रामसगाव, ता. घनसावंगी, जि. जालना

येथील 13 स्थाने 3 ठीकानी आहेत -
1. राजमठ - येथील 8 स्थाने - रामसगांव गावाच्या दक्षिनेकडे 1 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर एकाच ठीकानी व परिसरात आहेत.
2. आसनस्थान - येथील 4 स्थाने - रामसगांव गावाच्या दक्षिनेकडे दीड कि.मी.अंतरावर, व राजमठ च्या अलीकाडे अर्धा कि.मी.अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर एकाच ठीकानी आहेत.
3. मानीकदंडी आसनस्थान - येथील 1 स्थान - रामसगांव गावाच्या पूर्वेकडे 3 कि.मी.अंतरावर, धनगराच्या शेतात आहे.

जाण्याचा मार्ग :

रामसगाव, तीर्थपुरी साडेगाव मार्गावरील रामसगाव फाट्यापासून 4 कि.मी. आहे. तीर्थपुरी ते रामसगाव फाटा 3 कि.मी. साडेगाव ते रामसगाव फाटा 5 कि.मी. अंबड ते रामसगाव 37 कि.मी. रामसगावला जाण्यासाठी अंबडहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. जोगलादेवीहून किंचित आग्नेयेस रामसगाव पायमार्गे 3 कि.मी. आहे.

स्थानाची माहिती :

राजमढ व राजमढाच्या परिसरातील स्थाने.

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील 8 स्थान (क्र. 1 ते क्र. 8)

1. राजमढी अवस्थान स्थान :

हे स्थान रामसगावच्या दक्षिणेस तीन फर्लाग अंतरावर गोदावरी नदीच्या पूर्व काठी टेकडीवर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी या देवळास ‘नरसिंह’ मढ असे नाव होते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात ढाकेफळहून रामसगावला आले. प्रथम संगमेश्वराच्या देवळात त्यांना आसन झाले. आबाइसाच्या गुंफेत वसती झाली. दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथे आले. त्यांचे या ठिकाणी दहा दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून जोगलादेवीला गेले. (पू.ली. 272, तु.प्र.स्था.पो.)

येथील इतर लीळा : (1) उमाइसाच्या उपहाराचा स्वीकार करणे. (पू.ली.501)

(2) सोभागाच्या बहिणीचा उपहार स्वीकार करणे. (पू.ली.503)

2. काळस्फोट व्यथाहरण स्थान :

हे स्थान राजमढाच्या वायव्येस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लळताइसाची गुंफा होती.

लीळा : लळताइसा, ही रामनाथाची पुजारीण. तिच्या पायाला काळस्फोट झाला होता. त्यामुळे तिला फार वेदना होत होत्या. सर्वज्ञांनी येथे येऊन तिची दु:खाची व्यथा हरण केली. (पू.ली. 500,स्था.पो.)

3. मादने स्थान :

हे स्थान राजमढाच्या पूर्व बाजूला आहे. मंदिरात प्रवेश करताच डाव्या हाताच्या बाजूला आहे (स्था.पो.)

4,5. उत्तर व दक्षिण सोंडी स्थाने :

ही स्थाने याच देवळात राजमढाच्या मधात आहेत.

लीळा : सर्वज्ञांना या सोंडीवर कधी कधी आसन होत असे (स्था.पो.)

6. पूर्व दारवठा स्थान :

हे स्थान राजमठाच्या ईशान्येस 70 फूट अंतरावर पश्चिमाभिमुख देवळात आहे. (स्था.पो.)

7. उत्तर दारवठा स्थान :

हे स्थान राजमठाच्या ईशान्येस 80 फूट अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. (स्था.पो.)

8. वडाच्या झाडाखालील आसन स्थान :

हे स्थान उत्तर दारवठा स्थानापासून उत्तरेस 141 फूट अंतरावर ओताच्या दक्षिण काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वडाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञांनी येथे उमाइसाचे सांत्वन केले. (पू.ली.497,स्था.पो.)

येथील इतर लीळा : (1) काळदासभटांतांबोळग्रहणी स्थिती. (पू.ली. 498)

(2) वैजोबा भींगी नामकरण. (पू.ली. 499)

(3)ओती उमाइसाशी आश्वासन. (पू.ली.497)

(4) सौभागांची भेट. (स्था.पो. उ:प्रत)

(5) उमाइ दर्शना येणे. (पू.ली.502)

राजमढ व राजमढाच्या परिसरातील स्थाने संपूर्ण.

9. आसन स्थान :

हे स्थान रामसगावच्या दक्षिणेस 350 मीटर व राजमढाच्या उत्तरेस 200 मीटर अंतरावर सिद्धनाथाच्या देवळाच्या आग्नेयेस उंचवट्यावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे संगमेश्वराचे देऊळ होते. त्या देवळातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू ढाकेफळहून रामसगावला आल्यावर प्रथम त्यांना येथे आसन झाले. या ठिकाणी आबाइसा व उमाइसा यांची भेट झाली. त्याप्रसंगी सर्वज्ञांनी तैल्यकार युग्मा स्थिती या एकांकातील लीळेचे कथन केले. (पू.ली. 493, स्था.पो.खा.द.शा.प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील 4 स्थान (क्र. 9 ते क्र. 12)

10,11. मर्दना व मादने स्थान :

ही दोन स्थाने आसन स्थानाच्या पश्चिम बाजूस आहेत. आबाइसाच्या गुंफेपुढील ही दोन स्थाने होत.

12. वसती स्थान :

हे स्थान मर्दना, मादने स्थानाच्या पश्चिम बाजूस आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आबाइसांची गुंफा होती. त्या गुंफेतील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू ढाकेफळहन रामसगावला आले, त्या दिवशी त्यांचा येथे मुक्काम झाला. (पू.ली. 270, तु. प्र. स्था. पो. खा. द. शा. प्रत)

येथील इतर लीळा : (1) वाएनायकांच्या कुटुंबियांना दर्शन देणे. (पू.ली.496) कामाइ अष्टमंगळा नाम करणे. (पू.ली.496)

13. माणिकदंडी आसन स्थान :

हे स्थान रामसगावपासून पूर्वेस 3 कि.मी.अंतरावर कंडारी गावाकडे जाणाऱ्या बैलगाडी रस्त्याच्या दक्षिणेस श्री. शिवाजी लक्ष्मणराव भोजने यांच्या शेतात हिवऱ्याच्या झाडाखाली पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : (1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू ढाकेफळहुन येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. बाइसांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. गुळगा झाला. विडा झाला. (पू.ली. 491, स्था.पो)

(2) वाएनायकांची व सर्वज्ञांची येथे भेट झाली. त्यांच्या विनंतीवरून सर्वज्ञ येथून रामसगावला गेले. (पू.ली.492)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

अनुपलब्ध स्थाने :

1. एकांकातील पव्हेयातील वसती स्थान.

2. एकांकातील आरोगणा स्थान.

3. सिद्धनाथाच्या चौकातील आसन स्थान.

4. दारसंका धरणे स्थान.

5. महादेव पाठकाच्या गुंफेतील आरोगणा स्थान.

6. संगमेश्वराच्या आग्नेयेचे परिश्रय स्थान.

7. रामनाथाच्या चौकातील आसन स्थान.

8. सौभागाची विनंती स्वीकार स्थान.

9. रामनाथ देवळाच्या पूर्वेचे परिश्रय स्थान.

10. सिद्धनाथ देवळाच्या दक्षिणेचे वडाखालील चरणचारी उभे राहणे स्थान.

11. नरसिंह मढाच्या पश्चिमेचे आसन स्थान.

रामसगावची एकूण स्थाने : 24

  • Purvardha Charitra Lila – 104
  • Ramasgaon : रावसगांवीं वस्तिः महादेव पाठकां भेटिः पाणीभातु बाबुळशेंगा आरोगणा :।।:
  • यापरि पेणापेणा गोसावी क्रमेंक्रमें रावसगावां बिजें केलें: तेथ गंगेचिये थडी पव्हा राहिलाः तयामध्यें गोसावी आसनी उपविष्ट जालें: तवं लोक कणीकः तांदूळः तूपः दहीं ऐसें घेउनि आलेः गावों तीर्थांचां म्हणौनि बाइया सिदोरि न ठेवीतिचिः संप्रयोग होइल म्हणौनि आधिला दिसीं अवघेचि वेचिलेः गोसावियांलागी काही ठेवितीचिनाः गोसावियांसि आरोगणें उशीर होइल म्हणौनि बाइया लवकरि अष्टतीर्था केलियाः तीर्थस्नानें करौनि रंधनां प्रर्वतलियाः तवं गोसावी क्षुधा स्वीकरिलीः गोसावी सिद्धनाथीं महादेवो पाठकाचिये गुंफेसि बिजें केलें: उत्तरीले दारवंठेनि सिध्दनाथीं चौकीं नावेक आसन जालें: मग जगतिभितरीं सिध्दनाथावाव्ये महादेव पाठकांची गुंफाः तियेचीया दोन्ही द्वारशंका धरूनि गोसावी ऐसें आपणवोनि पाहिलें: तवं तें समोरे बैसले असतिः गोसावियांतें देखिलें: आणि ‘‘जी जीः येइजो जीः’’ म्हणौनि साउमें आलें: श्रीचरणां लागलें: आणि गोसावियांतें आपुलीये गुंफेआंत घेउनि गेलेः भितरीं आसन रचीलेः गोसावी आसनीं उपविष्ट जालें: तेहीं चरणक्षाळण केलें: टिळा आक्षेता केलियाः मग विनविलें: ‘‘जी नावेक पाणीभात कां घेइजेनाः’’ तें गोसावी मानिलेः पाणीभातुरू बाबुळशेंगाः ऐसीं आरोगणा दिधलीः हिरडा मुखशुध्दि दिधलीः मग गोसावियांसि तेथचि पहूड जालाः तंव एरीकडें बाइयाचें रंधन जालें: धाकुटेया बोणेबाइया गोसावियांसि बोलाउनी घेउनि गेलीः गोसावी तेथ बिजें केलें: बाइं म्हणितलें: ‘‘बा मौन्यदेयाः आजी भुकैले जालेतिः जेउं बैसाः’’ म्हणौनि मागील सांघितलें: गोसावी उगेचिः श्रीमुख प्रक्षाळण जालें: मग गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः तिया जेविलीयाः सिध्दनाथांवाव्यें पव्हा उतरला होताः तेथ पव्हेयाआंत वस्ति जाली :।।:
  • (टिप – रावसगाव येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मेहकर, लोनार, वरुन मेहकरच्या बोनेबायांसोबत पैठणला निघाले. यावेळी स्वामींचे रावसगावा येथे पव्ह्यासोबत वास्तव्य होते तेव्हाची ही लीळा. {पहा- सिध्दनाथांवाव्यें पव्हा उतरला होताः तेथ पव्हेयाआंत वस्ति जाली}…)
  • Purvardha Charitra Lila – 491
  • Ramasgaon : मार्गी माणिकदंडी आसनः वायनायका भेटिः विनती स्वीकारू :।।:
  • मार्गी माणिकदंडीचीया पींपळातळीं नावेक आसन जालें: बाइसीं चरणक्षाळण केलें: गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः तवं वायनायक आलें: तें पाडळीयेहुनि सकुटुंबी रावंसगावां निगालेः कामाइसां आठांगुळें म्हणौनि उजुवाटां गाडा नेलाः तें आपुले कामथ पडिताळित पडिताळित येत होतेः तवं गोसावियांतें पींपळातळी बैसलेयां देखिलें: आणि साउमा आलेः भेटि जालीः दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलें: मग म्हणितलें: ‘‘हें काइ जीः गोसावी एकलेः गोसावियांजवळी कव्हणी भक्तिजनें देखोंना? तें केवीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हा नव्हेः आतांची मंडळीकु निगाला आणि लुखदेवोभट तरि आपुलेया गावासि कालीचि गेलेः’’ मग वायनायकें तेथचि गोसावियांते पुसिलें: ‘‘जी जीः तरि गोसावी कव्हणीकडें बिजें करीति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें तपोवना निंबगावांसि जाइलः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ऐसें काइ जीः ऐसें एकलेयां?’’ मग वायनायकें विनविलें:’’ ‘‘जी जीः रावंसगावों बरवा जीः तेथ दोनि जगति असतिः बरवे सिद्धनाथाचें देउळ असेः रामनाथाचें देउळ असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे पूर्वदृष्ट असेः’’ मग तिहीं पुढति विनविलें: ‘‘रावंसगावां बीजें करावें जीः आणि एकवेळ गोसावी माझेया कुटुंबासि दरीसन द्यावें जीः’’ ऐसें अनुकरौनि विनविलें: मग गोसावी विनती स्वीकरिलीः गोसावी बिजें केलें: मग वायनायकें जाडीः पोतें: पुडवाटवाः सागळ ऐसें घेतलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावकडे निघाले तेव्हा रस्त्यात मानिकदंडा येथिल ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 492
  • Ramasgaon : रात्री वायनायक उपहार स्वीकारू :।।:
  • गोसावियांसि बाइसीं विळीचा पूजावसर केलाः तवं रात्री वायनायक उपहार घेउनि आलेः वायनायकाचिये हातीं ताटः जावयाचीये हातीं तुपाची वाटीः आंबेयाचा गाडुगाः तो दारवंठां उभा राहिलाः वायनायक ताट घेउनि भितरीं आलेः वायनायके ताट गुंफेसि ठेविलेः मग तयांचीये हातीची वाटी आणि गाडुगा घेउनि आलेः गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः वायनायक बिढारां गेले :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 493
  • Ramasgaon : रावसगावीं संगमेस्वरीं आबैसां उमाइसां भेटिः पूजास्वीकारू :।।:
  • गोसावी पुढां गजगति बिजें करीतिः जेउतें बिजें करीति तेउतें वायनायकमार्गी टाकीत येतिः बाइसें मागें राहिलीं: गोसावी संगमेस्वरासि बिजें केलें: वायनायकें ओटा झाडिला आणि ओटयावरि जाडीचें आसन रचीलें: गोसावी खोलबुंथी घालुनि आसनीं उपविष्ट जालें: वायनायक गोसावियांजवळी ओटयाखाली घुंगटु घालौनि पाय मोडोनि ओटया लिगटौनि बैसले असतिः तवं मागिलीकडुनि बाइसें आलीः तियें सागळ भरावेया गंगेसि गेलीः तवं आबैसें आलीः मागौती दारा गेली होतीः तवं आबैसें विसदेयालागी वाती लावावेया आलीः तेथ अष्टप्रहार देवतेसि वाती जळेः तवं वायनायकातें देखिलें: वाती लाउनी गेलीः मग उमाइसांपुढां सांघो लागलीः ‘‘उमैः उमैः या वायनायकासि काइ जालें? बाइलि एकीं आणिली असेः तें ओटयावरि बैसविली असेः आपण खाली बैसला असेः म्हातारपणी याचें न पारुखेः’’ तवं बाइसें सागळ भरूनि आलीं: बाइसीं गोसावियांतें म्हणितलें: ‘बाबाः ये गावीं मासोपवासिनी असति कीं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘असतिः’’ बाइसें गुंफेसि गेलीं: तवं आबैसें आंगणीं पाठीमोरि उभी असतिः बाइसीं आबैसाचे डोळे झोंकलेः आबैसीं म्हणितलें: ‘‘हे कोण पां? एथ मज कव्हणेंसीं रळी नाहीं: हांसें नाहीं: आणि मजसि रळी हासा करी ऐसें कोण्ही नाहीं:’’ ऐसें म्हणौनि आबैसीं तयांचे हात परवेसलेः हें आघात तवं बाइसाचीया सारिखेः आंगुळीया ओळखिलियाः बाइसाचीया आंगोळिया सरळिया: हात वोळखिलेः मग म्हणितलें: ‘‘हे कव्हण? बाइ?’’ आणि हांसौनि बाइसीं हात सोडिलेः भेटि जालीः मग आबैसीं म्हणितलें: ‘‘हें काइ बाइ? तुम्हीं आलींति तरि गोसावी क्यें?’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘ना हें नव्हति बाबा? एथ संगमेस्वराचेया ओटयावरि आसन असेः’’ तैसीचि आबैसें दुःख करूं लागलीं: अनुतापलीः मग उमाइसांपुढें सांघितलें: तेहीं विस्मितें संभ्रमितें हर्षातें पावलीं: तयातें आधिली दिसीं जयंती जाली होतीः तें आइती पानेंपोफळें घेउनि गोसावियांचिया दरीसनासि आलीः आसनावरि ओळगवीलीं: मग भेटि जालीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें काइं बाइः तुम्हीं म्हणाः यांतें समुद्रप्रांती ओळखैनः तरि आताची मुडपामुडप झगटोंनि गेलींति परि यातें ओळखाचिना मग सागरप्रांती काइ ओळखाल?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः मी पापीन जीः काइ ओळखैन जीः गोसावी ओळखवीति तरि वोळखिजे कीः’’ यावरि गोसावी ‘तैल्यकारयुगमा स्तीति’ हें गोष्टि सांघितलीः आबैसीं चरणक्षाळण केलें: चरणोदक घेतलें: उमाइसां चरणोदक घेतां सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मासोपवासिये हो तुम्हीं व्रतस्थां: एथचा वीधि ऐसा नव्हेः मासोपवासीनी अगपीं उदक घेवों नयेः’’ तिहीं आपुलीये गाळीलीये घागरीचें उदक आणिलें: तेणें चरणक्षाळण केलेः मग चरणोदक घेतलें: उरलें तें आपुलीये घागरी घातलें: गोसावी गुंफेसि बिजें केलें: बाइसीं गुंफा झाडुनि आसन केलें: गोसावीं आसनीं उपविष्ट जालें: मग आबैसीं गुंफेसि पूजा केली :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 494
  • Ramasgaon : (रावसगावीं संगमेस्वरीं) गुंफे आरोगणाः वस्ति :।।:
  • आबैसीं गोसावियांलागी उपहार करावेया तांदुळ सडिलेः तवं वायनायकें म्हणितलें: ‘‘आबैः मियां गोसावियांतें उपहारालागी आधींचि विनविलें असेः’’ मग आबैसीं म्हणितलें: ‘‘तुम्हीं रात्री कराः’’ तवं वायनायकें मानिलेः मग आबैसीं उपहार निफजविलाः गुंफेसि गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा विडा जालाः वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 495
  • Ramasgaon : गुंफे पहातां मार्जने :।।:
  • बाइसीं सांजवेळेचि आबैसातें म्हणितलें: ‘‘आबैः बाबासि बहुत दीं मार्जनें नाहीं: तरि चोखणी पाणीयाची आइती कराः’’ मग आबैसीं पाणीया डेरा भरीलाः चोखणी ठेविलीः गोसावियांसि मार्जनेयांलागी विनविलें: पडदणी ओळगउं आदरिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः आतां नां: प्रभाते कीः’’ तिया म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग गोसावियांसि पहूड जालाः मध्याने एकी रात्रीं आबैसें उठिलीः पाणी ठेउं आदरिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः रात्री वडील असेः आतांची नाः निद्रा कराः’’ मग निजैलीं: वेळां दोनि उठिलीः गोसावी निराकरिलेचिः पाहातां उठिलीं: वाती लाविलीः पाणी ठेविलेः गोसावी परिश्रयासि बिजें केलें: गोसावी परिश्रयोसारूनि आलेः उदका विनियोग केलाः मग गोसावियांसि आबैसीं वोलणी दिधलीः मर्दनामादनें जालें: बाइसीं गोसावियांसि वस्त्र ओळगवीलें: गोसावी आंगणी वस्त्रें वेढिलीं: भितरीं ओटयावरि आसनीं उपविष्ट जालें: बाइसीं पूजावसर केलाः तवं विवळलें :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 496
  • Ramasgaon : कामाइसां भेटिः अष्टमंगळा नामकरण :।।:
  • सकाळी वायनायक सकुटबी गोसावियांचिया दरीसना आलेः तें सांकड ऐसीं गुंफाः मग वायनायक एकु पावो भितरीः एकु पावो बाहरी ऐसें उभे राहिलेः एकाचीए हातीं विडा देतिः तें गोसावियांसि दरीसन करीः दंडवत घालीः श्रीचरणां लागेः मग निगेः वायनायक म्हणतिः ‘‘जीजीः हें अमुकें: हें अमुकें:’’ मग तें निगेः ऐसीं अवघीं भेटविलीः मग तयाची जाया कामाइसें आलीं: तेहीं विडें दरीसना केलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः गोसावी तयाची पाठ श्रीकरें स्पर्शिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘अष्टमंगल्या बाइसें यें:’’ वायनायकें म्हणितलें: ‘‘जीजीः मज दरीसन जालें तरि यां अवघेयां होआवें कीं जीः’’ मग कामाइसी गोसावियांचीये श्रीचरणीचेया आंगुठेयाचें नख देखिलेः आणि वेधलीं: तो नखचंद्र जीवीं खुपौनि पाहातेंचि ठेलीः तया नखावरूनि तयाचि दृष्टी नुपडेचिः मग कामाइसें निगालीः ऐसें अवघेयां दरीसन जालें: वायनायकाचिये घरीची परिचारिका मैळाः दारवंठेंसि लागौनि गोसावियांची अवघी श्रीमूर्ति पाहाति होतीः मग तिया गोसावियांसि विडा वाइलाः श्रीचरणां लागलीः ऐसा गोसावी तयासि अवसर दिधलाः मग पाठवणी दिधलीः तियें अवघीचि घरांसि गेलीः कामाइसां मैळातें पुसें: ‘‘हा वोः तू गोसावियांची अवघी श्रीमूर्ति देखिली?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना होः’’ मग तें कामाइसांपुढें सांघेः एरीकडें सर्वज्ञें म्हणितलेः ‘‘बाइः एतुकेयांतु एथीचें दरीसन कोणासि जालें?’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः अवघेया वायनायकाचेया कुटुंबासि जालें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तैसें नव्हेः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘तरि बाबाः कैसें होए?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः दारवंठेंसि बाइ उभी होतीः तियेसि जालें:’’ मग गोसावी सिद्धनाथासि बिजें केलें: बाहीरिला दोन्ही दारवंडा दोन्ही श्रीकरीं धरूनि गोसावी भितरीं अवलोकिलें: तवं भितरीं मासोपवासिनि बैसलीया होतियाः गोसावी तैथौनि बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 496
  • Ramasgaon : रामनाथीं नृसिंहीं अवस्थान :।।:
  • गोसावी ऐलाडिला वडापासी बिजें केलें: तवं वोत भरला होताः वोतीं उतारू नाहीं: गोसावी नावेक चरणचारी उभे होतेः मग वोतावरिलीकडें उतरलेः रामनाथाचेया देउळासि बिजें केलें: रामनाथीं नृसिंहीं अवस्थान जालें: दिस दहा :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 497
  • Ramasgaon : वोती उमाइसां संबोखु :।।:
  • गोसावियांसि तियेंचि दिसीं रामनाथाचेया वडातळीं आसन जालें: उमाइसें येउनि वोताऐलाडी उभी असतिः तेथुनि तेहीं गोसावियांसि दंडवतें घातलीं: गोसावी नावेक पाउलें च्यारी पुढारे थडीयेसि बिजें केलें: तेथ उभे राहिलेः मग उमाइसीं गोसावियांतें विनविलें: ‘‘जी जीः मीं गोसावियांजवळी येइनः येवों?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मासोपवासिये होः एथौनि या म्हणिजैल तरि येवो येइलः परि तुम्ही व्रतस्थें: तुम्हांसि सीमालंघन करुं न येः सिमा अतिक्रमूं न येः’’ तवं काळीदासभट आणि ब्राम्हण सिद्धनाथासि आलेः तें मादनयाचें पाणी देखौनि निंदा करू लागलें: तें उमाइसां न साहेः उमाइसीं म्हणितलें: ‘‘जी जीः ब्राम्हणु भकतु असे जीः हें महादेव पाठकः कालीदासभटः ऐसें अवघे काइ नेणोः काइ नेणोः बोलत असतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः बोलिजे ऐसें एथ काइ असे?’’ उमाइसीं म्हणितलें: ‘‘जी जीः काही तरि नाहीं: परि बडबडीत असतिः तरि मीं काइ करूं? आइकौनि खेदखिन्न होइजतायेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः इश्वरनिंदा ऐकोनि तुम्हांसि निवारवे तरि निवरिजेः ना तरि परतें जाइजेः तें स्थान परीत्यजिजेः परतेयां न वचवे तरि कानी आंगुळीया सुइजेतिः परि तें आइकावें नाः’’ मग तियें गेलीं: तिहीं तैसेचि केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 498
  • Ramasgaon : काळीदासभटां तांबुळग्रहण :।।: / काळीदासभटां तांबुळदानः स्तीति :।।:
  • एकु दिसीं एकादसीचां दिसीं गोसावियांसि रामनाथीचेया वडातळी आसन असेः काळीदासभट विळीचेया जागरणालागी गोसावियांचिया दरीसना आलेः सरिसे नातु मुंजीये भानू असतिः काळीदासभटाची लेकीचें पुत्र म्हणौनि नातुः तें इंद्रभटाचे आधिली संबंधीचें पुत्रः काळीदासभट इंद्रभटाचे सासरेः तयाची लेकी सरलीः मग इंद्रभटीं गौराइसें केलीः काळीदासभटीं गोसावियांसि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: बैसलेः तवं गोसावी श्रींमुखींचें तांबुळ परीत्यजितां तेहीं गोसावियांतें विनविलेः ‘‘जी जीः मज तांबुळ द्यावें:’’ म्हणौनि आंजुळी ओडविलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथचें तांबुळ घेइजे हा काइ वीधि कीं भाव?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘नेणे जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि काइ धर्मु?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘नेणो जीः जानामी धर्मं न च मे प्रवृत्तिः जानाम्य धर्मं न च मे निवृत्तिः केनापी देवेन हृदिस्थितेन यथा प्रयुक्तोस्मि तथा करोमिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि आजी एकादसी कीं?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना जीः गुरुचें: मातापितेयाचें: देवतेचें तांबुळ घेवों येः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पैलीकडें लोकु देखतुं असे की?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः घेवो येः लोकाचें काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे ऐसें अवघे असतिः’’ गोसावी श्रीकरें दाखविलें: तिहीं म्हणितलें: ‘‘हे काइ जीः असति तरि असति आणि काइः स्वधर्मपीडाममचिंत्यायोयं मत्पापशुद्धयर्थमिह प्रवृत्ताः। नाचेत्क्षमामप्यहमस्य कुर्याम् अतः क्रतघ्नो वद किदृशोन्यः’’ ऐसें म्हणौनि घेतलेः तैसीचि तयां स्तीति जालीः भोगिलीः भंगलीः मग गोसावी मढासि बिजें केलें: सरिसे तेहीं आलेः गोसावियांसि पूजा जालीः गोसावियांसि ताट केलें: आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः गोसावीं आसनीं उपविष्ट असतिः गोसावी मुंजीयातें म्हणितलें: ‘‘बाइः यांसि जेउं सुआः’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः भातु नाहीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि यासि तुपें माखौनि पौळी देयाः’’ बाइसीं दिधलीः मुंजीयें घेतलीः मग तें गेलें :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 499
  • Ramasgaon : वैजो भ्रुंगी नामकरण :।।: / वैजो वाळुक भजनी भ्रिंगी नामकरण :।।:
  • भटाचे भाउ वैजोबाः तयाचा गावो पूरः तिहीं आपुलिए सेतीची वाळुकें तोडिलीं: एकु डेरा पिकलां वाळुका भरलाः एकु डेरा हिरवेयां वाळुकां भरीलाः ऐसें दोनि डेरे वाळुकां भरूनि पूर उतरौनि गंगेचेनि मध्यें घेउनि आलेः रामनाथाचां वोतीं लाविलेः गोसावियांसि रामनाथाचां चौकीं आसन असेः तें खांदावरि डेरा ऐसें घेउनि येत असतिः तवं बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः बटिकाचा जाणो काइ माजु मोडैल ऐसा दिसतु असेः कैसें रोडिकें देहः पातळु ऐसां दिसत असें: परि किती वोझें घेउनि आलाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तो महादेवाचां भृंगीः हा एथचां भृंगीः’’ ऐसें प्रसादिक नाम ठेविलें: बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः भृंगी म्हणिजे काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः महादेवाचां ठाइं दोनि गणः एकां नांव भृंगीः तरि हा भृंगी होएः’’ वैजोबा आलेः डेरा उतरिलाः वाळुके पुढें पुंजा केलीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: गोसावी अवलोकिलीं: बाइसीं गोसावियांलागी चार्‍ही एकें कोवळी कोवळी निवडूं आदरिलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइ राहाः ये वाळुकें नेवो नकोः वांटे कराः’’ वाळुकें जारठें: हिरवीःं पिकलीं: कोवळीं: ऐसें अवघेयांचें वांटें केलें: मग दोनिचारि बाइसीं नेलीः आणि गोसावी अवघेयां अनुचरां आपण वाळुकें दिधलीं: तवं राणा आलाः मग गोसावी आपुला विभाग तो राणेयांसि देवविलाः गोसावी एकदोनि आपण प्रसादु केलाः अवघां भक्तिजनीं तृप्तिपर्येंत वाळुकें खादलीं: मग गोसावी मढासि बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 500
  • Ramasgaon : स्त्रीये काळस्फोटुव्यथा हरण :।।:
  • एकु दिसी गोसावियांसि रात्री नृसिंहीं पहूड असेः रामनाथां मागे एकीं विडांळ गुंफाः तेथ रामनाथीचीं कठियें: तियें नांव लळीताइसें: तियेसी पाइं काळस्फोटु निगालाः तियें रात्रीं विवळों लागलीं: अनेकां करूणाळापीं इश्वरप्रार्थना करीतिः बोबातें होतीं: ‘‘राख गा देवाः राखसि ना तरी मारि गा देवाः धाव गा देवाः पाव गा देवाः राख गा देवाः पोसि गा देवाः पोसीसिना तरि मारि गा देवाः’’ ऐसीं च्यारि पाहार बोबातें होतीं: उदेयांचि गोसावी परिश्रया बीजें केलें: परिश्रयोसारूनि उदका विनियोग केलाः मग तेणें ठायें गुंफेसि बिजें केलें: सरिसीं बाइसें होतीं: लळीताइसें तियें अर्ध गुंफेआंतु अर्ध गुंफेबाहिरी ऐसीं पिडली होतीं: गोसावी तो फोडु अवलोकिलाः श्रीचरणीचेनि आंगुठेनि दडपीलाः पावो श्रीकरें धरूनि श्रीमुखीची पीकी घातलीं: श्रीचरणीचेनि आंगुठेनि मर्दिलीः तियेची व्यथा होतीते निवर्तलीः दुखों ठेलें: तयासि निद्रा आलीः मग गोसावी नृसिंहाचेया देउळा बिजें केलें: बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः फोडु तरि सानाचि आणि बाइल तरि चार्‍ही पाहार विवळतचि होतीः आतां उगीचि राहिलीः तरि काइ सरली? आतां काहीचि देखों नाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा काळस्फोटुः एथोनि पाहिलाः म्हणौनि हें वांचलीः हें जरि नावेंक न तियें तरि इयेचें देह जातें: बाइ हें आलें: म्हणौनि देह वाचलेः आतां सुखे निद्रा आली असेः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘ते भाग्याचीः बाबाए रक्षिलीः तरि बाबाचां ठाइं राहो कां:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः जीवासि उर्ध्वगति नाहीं: अधोमतिः अधागितिः अधारितिः ऐसें जीवाचे देखणे असेः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 501
  • Ramasgaon : उमाइ विज्ञापणें उपहारू स्वीकारू :।।:
  • एकादसीचां दिसीं वैजोबा उमाइसांतें नेवों आलेः उमाइसांतें घोडेया वावूनि घेउनि गोसावियांचिया दरीसना आलेः भेटि जालीः दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलें: मग उमाइसीं विनविलें: ‘‘जी जीः माझा मासोपवास जाला जीः उपवासीं बैसलेया मास दिस जालाः तरि गोसावी गावासि बिजें करावें जीः’’ गोसावी विनती स्वीकरीतिचि ना मग गोसावीयांतें उपहारालागी विनविलें: पुढति गोसावियांतें विनविलें: ‘‘मी गोसावियांचा ठाइं उपहार करीनः गोसावी तेथ बिजें करावें जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें येइल तरि येइलः ना तरि उपहारू भ्रंगी हातीं धाडावाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग तिये साडेगावांसि गेलीः बारसीचां दिसीं वैजोबा हातीं दुरडीए घालुनि उपहारू पाठविलाः तें मढासि घेउनि आलेः मागिलीकडौनि आबैसें: उमाइसें आलीं: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः मग गोसावियांसि पूजावसरू जालाः आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः मग वैजोबासीं पाठवणी दिधलीः तेहीं दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलाः मग निगालां: मग गोसावियांसि पहूड जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 502
  • Ramasgaon : उमाइ दरीसनां येणें :।।:
  • एरे दिसीं उमाइसें गोसावियांचिया दरीसना पोट बांधौनि आलीं: गोसावीयांसि वडाखाली आसन असेः बाइसीं येतां देखिलीं आणि म्हणितलें: ‘बाबाः मासोपवासिनी नव्हेः हें लावं होएः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तें कां बाइ?’’ ‘‘कैसी पोट बांधौनि येति असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः ऐसें नव्हे कीं: तें एथचेया दरीसना येतें असतिः तुम्हीं यांतें लावं म्हणत असाः तुम्हीं यांसि सविया कैसिया देतें असाः’’ तवं तियें आलीं: गोसावियांसि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः मग तियें गोसावियांजवळी बैसलीं: गोसावियांचां श्रीकरीं निंबू होतें: तयांसि ऐसा मनोरथु उपनलाः ‘गोसावी हें निंबू मज देतु कां?’ गोसावी तयाची उल्लेखासरीसें तयासि निंबू दिधलें: आणि हर्षातें पावलीं: मग तियें श्रीचरणां लागौनि आज्ञा घेउनि गावां गेलीं :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 503
  • Ramasgaon : सोभागांचा उपहारू स्वीकारू :।।: / सोभागा विज्ञापनीं भगिनी उपहारू स्वीकारू :।।:
  • सोभाग बाइसांची बहिणी भूगावीं होतीः तिहीं सोभागातें म्हणितलें: ‘‘म्हांइबाइः मजकारणें गोसावियांतें एथ घेउनि येः उपहारालागी विनवी कां? मज गोसावियांचें दरीसन होइलः’’ मग तियें गोसावियांजवळी आलीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः उपहारालागी विनविलें: गोसावी विनती स्वीकरिलीः तिहीं उपहारू निफजविलाः रात्री रांधितां कांडितां गांवीचेनि अधिकार्ये आइकीलें: उदेयांचि सोभागांचिए बहीणीचा ब्राम्हणु धोत्रें धुवावेया गंगेसि जातु असेः तवं तो गावीचा पाटीलु दुर्गाचेया हुडेयावरि बैसला होताः तेणें पुसिलें: ‘‘तुमचां घरीं रात्री रांधीकांडी थोरी ऐसीं होती होतीः’’ तेणें म्हणितलें: ‘‘नाः आमेचए आकडसासूचे गुरु आलेः तयांलागी पाहुनरू करीत असों:’’ तवं तेणें म्हणितलें: ‘‘तुमचीये आकडसासूचे गुरु जालेः आतां तुमचिए ब्राम्हणीचें गुरु होती आणि काइ?’’ ऐसें काही काही भकों लागलाः मग तेणें येउनि घरीं सांघितलें: तिहीं म्हणितलें: ‘‘असो द्या परताः’’ मग उपहार निफजलेयांवरि सोभाग बाइसें गोसावीयांतें विनवावेया आलीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः आणि विनविलें: ‘‘जीजीः बिजें करावें:’’ गोसावी विनंती स्वीकरिलीः गोसावी बिजें करूं आदरीलें: पुर्विलेन दारवंठेनिहूनि बीजें केलें: पाउले च्यारि गेलेः पौळीचेया आग्ने कोनापासी उभे राहिलेः तेथौनि तें नगर अवलोकिलें: मग म्हणितलें: ‘‘सोभागे होः आतां हें न येः बाइः आतां यालागी एथचि उपहार घेउनि याः’’ मग तियें दुःख करूं लागलीं: जाउनी बहिणीपुढें सांघितलें: तियेंहीं दुःख करूं लागलीं: ‘‘या पापियाचेया गावां गोसावी काइसेया बिजें करीतिः’’ मग सोभागाबाइसें गोसावियांलागी उपहार घेउनि आलीः गोसावियांसि विळीचेया पाहारा एका आरोगणा जालीः भक्तिजना पांती जेवणें जालीः रात्री बाइसीं व्याळीयेलागी विनविलें: परि गोसावी व्याळी न करीतिचिः मग पहूड जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Ramasgaon : कामाइसाचीया बीया साखर आरोगणा :।।:
  • कामाइसीं वाळुकाचिया बीया साकरेसि घोळीलियाः तिया गोसावियांसि ओळगविलीयाः गोसावी आरोगीलिया :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)

या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: