PimpalGaon Keli (Ghat)(केळी पिंपळगाव)

केळीपिंपळगाव, ता. आष्टी, जि. बीड.


केळीपिंपळगाव घाट गांवाच्या पश्चीमेकडे मंदीरात मुख्य स्थाना सहीत 5 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

केळीपिंपळगाव, अहमदनगर पाथर्डी मार्गावरील मराठवाडीपासून दक्षिणेस दीड कि.मी. आहे. अहमदनगर ते मराठवाडी 23 कि. मी. भिंगार ते मराठवाडी 20 कि.मी. केळीपिंपळगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच मराठवाडी येथे प्रभूकृपा आश्रमही आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील 5 स्थान एकाच मंदिरात आहेत.)

1. वसती स्थान :

हे स्थान पिंपळगावच्या पश्चिम विभागी उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे नारायणाचा मठ होता. त्या मठातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात खांडगावहुन केळीपिंपळगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. 262, स्था, पो.) पिंपळगावला आल्यावर, सर्वज्ञांनी भटोबासांना काही शिधा सामग्री आणण्यासाठी गावात पाठविले. पारावर कुणबी बसलेले होते. त्यांना भटोबास म्हणाले, “आम्हाला काही भिक्षा द्यावी.” त्यांनी विचारले, “तुमच्यामध्ये अन्न आहारी आणि दूध आहारी कितीजण आहेत?”भटोबास म्हणाले, “काही अन्न आहारी व काही दूध आहारी आहेत” ते म्हणाले, “तुम्ही जा. आम्ही साहित्य घेऊन येतो.” गावातल्या लोकांनी कणीक, तूप, तांदुळ, दुध असे सर्व साहित्य आणून दिले. ते गेल्यावर सर्वज्ञ भटोबासांना म्हणाले, “येथे सर्व अन्न आहारीच असताना तुम्ही त्यांना खोटे का सांगितले? तुम्ही महात्मे आहात. आपणाला जेवढे आणि जे लागेल ते सत्य बोलून प्राप्त करावे.” असे भटोबासांना शिक्षापण केले.


2. परिश्रय स्थान :

हे स्थान वसती स्थानाच्या पश्चिम बाजूस आहे. पूर्वी हे स्थान मठाच्या बाहेर होते. (स्था. पो.)


3. आरोगणा स्थान :

हे स्थान वसती स्थानापासून उत्तरेस 2 फूट अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञांनी येथे रात्री राळ्याच्या तांदळाचा भात आरोगण केला. (उ. ली. 264)


4. साधाशीश्रीचरण लावणे स्थान :

हे स्थान वसती स्थानापासून पूर्वेस 7 फूट अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू रात्री आरोगणा झाल्यावर पटीशाळेवर शतपावली करीत होते. लाहामाइसा आणि रत्नमाणिका पटीशाळेवर अंथरुण टाकून झोपल्या होत्या. फक्त साधा अंथरुणावर बसलेली होती. शतपावली करता करता सर्वज्ञ साधाजवळ आले. साधा नमस्कार करू लागली; परंतु तिला वाकून नमस्कार करता येईना, तेव्हा सर्वज्ञांनी आपला श्रीचरण उचलून साधाच्या कपाळास लावला. (उ.ली. 264)


5. आसन स्थान :

हे स्थान वसती स्थानापासून किंचित आग्नेयेस 14 फूट 4 इंच अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू खांडगावहून आल्यावर त्यांना प्रथम येथे आसन झाले. साधाने गरम पाणी आणून दिले. मग बाइसांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. (उ. ली. 262)

दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून चिचोंडीला गेले.


केळीपिंपळगावची एकूण स्थाने : 5


  • Utarardha Charitra Lila – 259
  • Pimpalgaon (Kele) : प्रभाते साधांतें पुढें पाठवणें :।।:
  • गोसावियांसि उदेयांचि उपहूड जालाः परिश्रयोसारुनि येउनि मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधें हो तुम्हीं पुढें चिचवंडिए जाः बिढार पाहाः तेथ पारणेयांची भिक्षा कराः तवं हें मागीलाकडौनि येइलः’’ साधीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग तियें तिघी बाइया पुढां निगालीयाः गोसावियांसि पूजावसर जालाः मग तेथौनि बिजें केलें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि नेवासा-रांजणगाव-मिरी-खांडगाववरुन पींपळगाव(केळ) येथे आले. येथे येन्याची स्वामींची ही पहीलिच वेळ. स्वामींना येथे वस्ति(एक रात्र वास्तव्य) झाली…)
  • Utarardha Charitra Lila – 262
  • Pimpalgaon (Kele) : पींपळगावीं मढीं वस्ति :।।: साधांची सेवा स्वीकारु :।।: / साधींकृत उष्णोदक पुजा :।।:
  • साधें पुढां गेलीं: मढु झाडिलाः वाटे गोवरु होताः तो पाएवरि वाट केलीः गुरुवातें भरणुकें मागितलें: तेथ उष्णोदक ठेविलेः गुरुवातें माळ गुंफौनि मागितलीः मग तिघी पटिशाळेवरि बैसौनि गोसावियांची वाट पाहातातिः विळु जालाः परि गोसावी न येतीचिः मग लाहामाइसीं रत्णाइसीं म्हणितलें: ‘‘एल्होः गोसावी तरि येतिचि नां? सिधे दादोसही अंतरलेः दादोस ना गोसावीः ऐसें जालें:’’ साधीं म्हणितलें: ‘‘उगीया असा वो आइया होः हा इकडील दिसु इकडें निगे तरि माझे गोसावी आनें आन बोलति?’’ ऐसीं गोष्टि करितातीः तवं गोसावी बिजें केलें: गोसावियांतें येत देखिलें: आणि साधीं पटिशाळेवरूनि दंडवतें घातलीं: साउमी गेलीं: श्रीचरणां लागलीः गोसावी उकरडेयाजवळी वाटेचें पुसिलें: ‘‘साधें हो हें वाट कव्हणें केली?’’ साधीं म्हणितलें: ‘‘जी जीः मियां:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें कां?’’ साधीं म्हणितलें: ‘‘जी जीः गोसावियांचिया श्रीचरणांवरि गोवरू येइलः रज जाइल म्हणौनिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें होएः’’ मग गोसावियांसि पटिशाळे आसन जालें: बाइसें चरणक्षाळण करूं बैसलीं: तवं साधीं उष्णोदक आणुनि दिधलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधें हो उष्णोदक कैचें?’’ साधीं म्हणितलें: ‘‘जी जीः या गुरुवाचां घरी भरणुकें मागितलें: मग उन्हवनी तापवलें:’’ ओटियेसि माळ होती तें बाइसांचा हातीं दिधलीः मग बाइसीं गोसावियांसि माळ ओळगवीलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे माळ कैंची?’’ साधीं म्हणितलें: ‘‘गुरुवातें गुंफौनि मागीतलीः’’ सर्वज्ञें म्हणितलें ‘‘बाइः साधें वप्तिसारें असतिः तुम्हा उपयोगा जातिः ऐसीं असतिः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हो कां बाबाः दैवाची भाग्याचीः’’ मग पूजावसर जाला :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि नेवासा-रांजणगाव-मिरी-खांडगाववरुन पींपळगाव(केळ) येथे आले. येथे येन्याची स्वामींची ही पहीलिच वेळ. स्वामींना येथे वस्ति(एक रात्र वास्तव्य) झाली…)
  • Utarardha Charitra Lila – 263
  • Pimpalgaon (Kele) : पयोव्रतानयनी भट शिक्षापणें :।।:
  • मग गोसावी भट आपजउं धाडिलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वानरेयाः काही आपजवा जाः’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि भटोबास गावांतु गेलेः पारीं कुणबी बैसले होतें: तयातें म्हणितलें: ‘‘आहो पाटील होः तुमचां गावीं ब्राम्हणाचीं घरें नाहीं: महात्मे गावां आले असतिः तरि काही कोरान्न भिक्षा होआवी?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘केंतिये असति?’’ होति तें सांघितलें: तेहीं पुसिलें: ‘‘पयोआहारिये आहाति कीं अन्नआहारियें?’’ भटीं म्हणितलें: ‘‘ना एकें पयोआहारीयें असतिः एकें अन्नआहारियें असतिः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो कां: तुम्हीं जाः आम्हीं आणुनिः’’ मग तिहीं कणिकीः तांदुळः तूपः दूध ऐसें घेउनि आलेः गोसावियांचां श्रीमुखीं तांबुळः गोसावी आसनी उपविष्ट असतीः गोसावियांपुढें ठेविलेः तेहीं म्हणितलें: ‘‘हें अन्नआहारियांसी घेयाः दूध पयोआहारियांलागी घेयाः’’ मग गोसावियांसि दंडवते घातलीं: तयां गेलेयांवरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां गाः यांतु कोण पयोआहारियें असति? ये देखों तवं अवघीं अन्नआहारीयेचि असतिः ऐसें कां बोलों बैसलासि? हां गा नावेकु पाहातासि कां: महात्मेनि सतर्जवा होआवेः’’ भटीं म्हणितलें: ‘‘जी नेणेचिः’’ मग श्रीचरणां लागलें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि नेवासा-रांजणगाव-मिरी-खांडगाववरुन पींपळगाव(केळ) येथे आले. येथे येन्याची स्वामींची ही पहीलिच वेळ. स्वामींना येथे वस्ति(एक रात्र वास्तव्य) झाली…)
  • Utarardha Charitra Lila – 264
  • Pimpalgaon (Kele) : साधां प्रसादग्रहणी एकादसी वर्तखंडन/व्रतभंगानुवादु :।।:
  • मग बाइसीं पूजावसरू केलाः उपहारु निफजविलाः तियें दिसीं एकादसीः रात्री वडील जालीः मग बाइसीं गोसावियांसि राळांदुळाचा भातु प्रधानत्वे ताट केलें: गोसावी ताटापासी बिजें केलें: गोसावी आरोगणा करितातीः साधें गोसावियांपासी बैसलीं असतिः गोसावी त्रिशुद्धि जेवावेया उठवीत होतेः तें एकादसी म्हणौनि न येतीचिः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधें हो एथचा प्रसादु घेयाल कीं?’’ साधीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः मज प्रसादु देयावाः’’ ‘‘साधें हो प्रसाद घेतें असाः तुमची एकादसी मोडैल कीं?’’ साधीं म्हणितलें: ‘‘ना जी न मोडेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘प्रसादु कां घेयावा?’’ साधीं म्हणितलें: ‘‘जी जीः पोट पवित्र होआवेयाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें होएः’’ मग गोसावियांसि दुधाभाताची आरोगणा जालीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तीं बोटांतु सामाए इतुका प्रसादु साधांसि वोपाः’’ मग बाइसीं दिधलाः साधीं घेतलाः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधें हों: तुमची एकादसी न मोडे होः’’ साधीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ मग गोसावियांसि तांबुळ जालें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि नेवासा-रांजणगाव-मिरी-खांडगाववरुन पींपळगाव(केळ) येथे आले. येथे येन्याची स्वामींची ही पहीलिच वेळ. स्वामींना येथे वस्ति(एक रात्र वास्तव्य) झाली…)
  • Utarardha Charitra Lila – 264
  • Pimpalgaon (Kele) : तथा(साधां) स्मरण विधानें निद्रे अनुज्ञा :।।:
  • मग तिघीं बाइ पटिशाळेवरि आंथुरीलें: तिया दोघी निजैलियाः साधें आंथुरणावरि बैसली असतिः रात्रीं चांदिणें पडिलें असेः गोसावी बाहीरि बिजें केलें: मग पटिशाळेवरि वेढे करूं लागलेः साधें पाहों लागलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधें हो निद्रा करां नाः’’ साधीं म्हणितलें: ‘‘जी जीः वेढे पाहाति असें: आतां निजैनः’’ मग गोसावी सेवटिला वेढेया तयांपासी बिजें केलें: मग तियें श्रीचरणां लागों बैसलीं: तवं वोणववे नाः मग गोसावी श्रीचरणु उचलुनि त्यांचीया निडळावरि ठेविलाः मग तियें वाडवेळु श्रीचरणु धरूनिचि होतीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हुं उं: साधें हो आतां निद्रा कराः’’ साधीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ गोसावी श्रीचरणांचेनि आंगुठेनि निजविलीं: आणि म्हणितलें: ‘‘साधें हो आतां एणेंसींचि ऐसींचि निद्रा कराः उठाल तेधवां एणेंसींचि उठाः हें देखिले तैसें आठविजे होः’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि साधीं निद्रा केलीः मग गोसावियांसि पहूड जालाः तियें चतुर्प्रहर तैसीचि श्रीमूर्ति देखतेंचि असति :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि नेवासा-रांजणगाव-मिरी-खांडगाववरुन पींपळगाव(केळ) येथे आले. येथे येन्याची स्वामींची ही पहीलिच वेळ. स्वामींना येथे वस्ति(एक रात्र वास्तव्य) झाली…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: