Patoda (पाटोदा)

पाटोदा, ता. पाटोदा, जि. बीड.


येथील स्थाने पाटोदा गावाच्या पश्चीमेकडे सरकारी सार्वजनीक बांधकाम कार्यालयाजवळच्या मंदीरात 5 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

साकतहून पाटोदा (महासांगवी मार्गे) 8 कि.मी. आहे. बीड ते पाटोदा (मांजरसुंभा मार्गे) 47 कि.मी. आहे व तांबाराजुरी मार्गे 40 कि. मी. आहे. साकतहन पूर्वेस पाटोदा पायमार्गे (महासांगवी मार्गे) 6 कि.मी. आहे. पाटोदा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. पाटोदा येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील सर्व स्थाने एकाच मंदिर परिसरात आहेत)

1. अवस्थान स्थान :

हे स्थान पाटोदा शहराच्या पश्चिम-विभागी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाजवळ पोलीस चाळीच्या पाठीमागे, पाटाच्या उत्तरेस उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात लिंब्याहून पाटोद्याला आले. त्यांचे या ठिकाणी 14 दिवस वास्तव्य होते. (पू. ली. 324, स्था, पो.) त्यानंतर ते येथून साकतला गेले.


2. पटीशाळेवरील आसन स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या उजवीकडे आहे.

लीळा : 1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू लिंब्याहून आल्यावर त्यांना प्रथम या ठिकाणी आसन झाले बाइसांनी त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. गुळळा झाला. मग विडा अर्पण केला. (पू. ली. 338, ख. प्र.)

2) सर्वज्ञांना येथे नेहमी आसन होत असे. (स्था, पो.)

3) श्रीमूर्तीच्या दर्शनाने राहीयाला संतोष वाटणे.

4) भटोबास आणि माहादाइसा पाडळीहन (जि. जालना) पाटोद्याला सर्वज्ञांच्या भेटीसाठी आले. तेव्हा येथेच त्यांची व सर्वज्ञांची भेट झाली. (पू. ली. 326)

5) चिंतन प्रश्नावरून राहीयाला पाठवणी देणे. (पू. ली. 333)

6) एके दिवशी सर्वज्ञ येथे बसलेले होते. त्यावेळी बीडहन पद्मनाभीदेव आले. सर्वज्ञांची भेट झाली. मग त्यांनी सर्वज्ञांची, वस्त्र अर्पण करून पूजा केली. (पू. ली. 334)


3. राहीया भेटी स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून ईशान्येस 8 फूट 6 इंच अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञांची व राहीयाची येथे भेट झाली. (पू. ली. 325 वि. स्था. पो. क्र. 1625)


4. मादने स्थान :

हे स्थान देवळाच्या दरवाजासमोर अंगणात आहे. (स्था. पो.)

मादने स्थानाच्या ईशान्येचे स्थान व वायव्येचे स्थान निर्देशरहित आहे.


5. आसन स्थान :

हे स्थान अवस्थान स्थान देवळाच्या पश्चिमेस केदाराच्या (महादेवाच्या) उत्तराभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : भटोबास आणि माहादाइसा पाडळीहन आल्यावर रात्री केदाराच्या देवळात झोपलेले होते. पहाटेच्या वेळेस परिश्रयाला जाऊन आल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. त्यांना चौकात आसन झाले. आधल्या दिवशी बरेच अंतर चालून आल्यामुळे माहादाइसा थकलेल्या होत्या. त्यांची सर्वज्ञांनी, भटोबासांच्याकडून श्रमनिवृत्ती करविली. (पू.ली.328,स्था.पो.)


केदाराच्या देवळाच्या बाहेरील उत्तर भिती लगतचे स्थान मांडलेले आहे. आवाराच्या पायऱ्या स्थान व अवस्थान स्थान देवळाबाहेरील पूर्व बाजूचे स्थान निर्देशरहित आहे.


अनुपलब्ध स्थान :

1) जगतीच्या दक्षिणेचे पिंपळाच्या झाडाखालील विहरण स्थान

2) देवळाच्या वायव्येचे परिश्रय स्थान

3) देवळाच्या उत्तरेस नदीच्या दक्षिण काठावरील वडाच्या झाडाखालील आसन स्थान

4) वांजरे नदी वडातळी आसन स्थान


पाटोद्याची एकूण स्थाने : 9


  • Purvardha Charitra Lila – 324
  • Patoda : पाटवधां केदारीं गुंफे अवस्थान :।।: / पाटवधां केदारीं गुणाकारदेवांचिए गुंफे अवस्थान :।।:
  • गोसावी पाटवधां केदाराचेया देउळा बिजें केलें: देउळा पूर्वे गुणाकारदेवांची गुंफा उत्तरामुखः गुंफेची पटिशाळ पूर्वपसिमः गोसावियांसि पसिमीलीकडें सीरां पटिशाळे आसन जालें: बाइसीं चरणक्षाळण केलें: गुंफा झाडिलीः सारविलीः रांगवळी भरीलीः गोसावी भितरीं पहूड स्वीकरिलाः बाइसीं उपहारू निफजविलाः मग गांवांआतुनी बरवे दही आणिलेः गोसावियांसि उपहूड जालाः मग गोसावियांसि दधिभाताची आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः मागुता पहूड जालाः उपहूड जालाः ऐसें पाखाआरूतें अवस्थान जालें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात बिडला ४ महिने वास्तव्य करुन पाली-पोहिचादेव-निंबागणेशवरुन पाटवध्याला आले व येथे स्वामींचे १४ दिवस वास्तव्य होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 325
  • Patoda : राहिया भेटि :।।: / राहिनायकां भेटि :।।:
  • एकु दीं दुपाहारीचां पूजावसरू जालेंयानंतरें गोसावियांसि पटिशाळेवरि पश्चिमीली सीरां बाइसीं आसन केलें: गोसावी आसनीं उपविष्ट असतिः पदुमनाभीदेवीं गोसावियांकारणें वस्त्र ओळगवीलें होतें: गोसावी तें नवे कोरें वस्त्र प्रावर्ण केलें होतें: गोसावियांचां वक्षस्थळावरील फुटा वारेनि कडें सरला होताः गोसावियांची श्रीमुर्ति उघडी ठाकली होतीः राहिनायकासि केदाराची भक्तिः तो गवळीः तो केदारासि आलाः देवतेसि पूजा केलीः मां प्रदक्षेणा करावया आलाः तवं महाद्वारापासुनि गोसावियांतें आसनीं उपविष्ट देखिलें: गोसावियांकडें आलाः राहिए चांपे गौरवर्ण श्रीमूर्ति देखिलीः ते गोसावी फुटेनि आच्छादिलीः तवं तो साउमा आलाः दरीसन जालें: दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलाः पुढां बैसलाः गोसावियांचे सौंदर्य लावण्य देखौनि बहुत क्षोभलाः मग म्हणितलें: ‘‘आंग उघडें घालिजो जीः डोळेयां हों देइं पारणें:’’ गोसावी थोडेंचि ऐसें आंग उघडें घातलें: सोनयाचे तकट ऐसें चांपेगौर वक्षस्थळ देखिलें: पुढति विनविलें: ‘‘घाली गा देवाआंग उघडें: हो देइं डोळेया धवधनीः’’ नावेक आगळें घातलें: पुढति विनविलें: ‘‘घाली गा जी आंग उघडें: हों देइं डोळेयां पारणें:’’ ऐसें तेणें तीनि वेळ म्हणितलें: मग अवघें आंग उघडैं घातलें: डोळेयांचें पारणे तथा धवधनी जालीः आणि मनी विचारिलें: ‘गोसावी रावो होति कां देवो होति?’ मग पुसिलें: ‘‘हां जीः गोसावी रावो कीं देवोः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे रावो नव्हेः देवो नव्हेः हें भिक्षु महात्मेः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना जीः मियां महात्मे बहुत देखिले होतेः ये गुंफैसि वसिष्टदेवः वामदेवः ब्रह्मचारिदेवः गुणकारदेवः देवर्तदेवः हगर्वदेव तयां मज बहुत दिस सन्निधिः तयापासी मीं अखंड येः तें माझा थोर स्नेहो करीति जीः मातें गोतमारी नावें जाळे होतें: तें तेंही सगडीआंतु घालउनी जाळविलें: तेही मज बहुत उपदेशु दिधलाः माझीए कानीं खडा रोविला आणि म्हणितलें: ‘तू दुखवतायेसि कीं?’ मीया म्हणितलें: ‘ना हो दुखवतोः’ तेही म्हणितलें: ‘तैसीचि तियें कच्छमच्छही दुखवति कीं:’ म्हणौनि तेही मजकरवी सांडविले जीः तयांचीं आंगे भेंडीं: पाणीभाताचीः गोसावियांचें आंग सरावुवांचें: मर्दनेचेः’’ ऐसिया गोष्टि सांघता गोसावियांचिया सौंर्दाचें स्तवन करीः ‘‘गोसावी रावो कां देवो? हा जीः गोसावियांतें कव्हणी असे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यातें कोण्ही नसेः’’ तेणें म्हणितलें: ‘‘ऐसें काइ होइल जी? नसे कैसे?’’ मग दंडवत करौनि घरासि जेवावेया गेलाः जेउनी मागुता आलाः श्रीमूर्ति अवलोकीत बैसलाः तवं भटः महादाइसें विळीचाचा पाहारा आली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात बिडला ४ महिने वास्तव्य करुन पाली-पोहिचादेव-निंबागणेशवरुन पाटवध्याला आले व येथे स्वामींचे १४ दिवस वास्तव्य होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 326
  • Patoda : भटां: महादाइसां भेटिः।।: राहिनायकां सन्निधिसामर्थ्य कथन :।।:
  • बीडीं गोसावियांचिया दरीसना पर्वाकारणें अवघीं गोसावियांची भक्तिजनें आलीं: महादाइसें नाहीं आलीः पर्व जालें: आणि केतुलेया एकां दिसां भट पाडळीयेसि गेलेः तेथ महादाइसें भेटलीः मग अवघा मंगळ पर्वकाळ सोहळा महादाइसां सांघितलाः तेणें तयांसि थोरू अपरीतोखु जालाः तियें दुःख करूं लागलीः भटांवरि भारवस घेवों लागलीः भटीं म्हणितलें: ‘‘तरि आतां चाला जावों: मी न राहीनः’’ महादाइसीं मानिलें: मग महादाइसीं उपहाराची आइती घेतलीः वळवटां पोती भरीलीः बरवे चोखट तांदुळ घेतलें: एरेएर बीडा आलीं: गोसावियांसि शोधिलें: तवं गोसावियांतें पाटवधां आइकीलें: मग एरी दीं दिसेंचि बीडींहुनि पाटवधेयासि आलीं: तवं गोसावियांसि पटिशाळें आसन जालें: जवळी राहिनायक असतिः तवं तियें आलीं: केदारीं गोसावियांसि भेटि जालीः गोसावी क्षेमाळीगनें दिधलीं: तिहीं दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलीः गोसावी आसनीं उपविष्ट जालें: महादाइसें पुढां बैसलीं: ‘‘मीं पर्वा चुकलिएं जीः’’ म्हणौनि दुःख करूं लागलीं: रडो लागलीः तवं राहिनायकें म्हणितलें: ‘‘हा होएं कीं मीं राहियाः मीं जाणें कीं:’’ म्हणौनि बाहे आफळीलीः ‘‘गोसावी ऐसें म्हणति जें ‘एथ कोण्ही नाहीं:’ हें गोसावियांची लेंक होइल कां बहिणी होइल?’’ मग पुसिलें: ‘‘हां जीः ये आइसें गोसावियांसि काइ होति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काही नव्हेतिः’’ राहिनायकें पुसिलें: ‘‘हां जीः तरि एव्हडा स्नेहाचा अतिशयो काइसा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं काइ होआ?’’ राहिनायकें म्हणितलें: ‘‘हां जीः जैसे आम्हीं तैसीं यें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तैसीचिः’’ राहिनायकें म्हणितलें: ‘‘तरि ये रडतें असति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथचिये सवेतवं: तुम्हींहीं दिस दोनिचारि असों लागालः आणि हें निगैल तवं तुम्हाही ऐसेचि होइलः तुम्हींहीं भेकों लागालः ऐसेचि रडालः’’ मग तें उगेचि राहिलें: गोसावी महादाइसासि आणि भटासि क्षेम वार्ता पुसिलीः तेहीं सांघितलीः मग गोसावी बाइसाकरवी तयाचे आधीं व्याळीचें करविलेः महादाइसीं विनविलें: ‘‘जी मीं विळीचा व्याळीएकारणें च्यारि एक तांदुळ वेळीनः दामा एकाचें दूध आणीन जीः’’ गोसावी मानीलें: मग महादाइसीं दंडवत घातलें: श्रीचरणां लागलीं :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात बिडला ४ महिने वास्तव्य करुन पाली-पोहिचादेव-निंबागणेशवरुन पाटवध्याला आले व येथे स्वामींचे १४ दिवस वास्तव्य होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 327
  • Patoda : तथा राहिनायक निवारित महादाइ व्याळी स्वीकारू :।।: / राहीयाकरवि दुध आणवणें :।।:
  • नावा एका महादाइसीं म्हणितलें: ‘‘राहिनायकोः एका दामाचें आम्हांलागौनि व्याळीये दुध आणावें:’’ म्हणौनि महादाइसीं राहियाचां हातीं एका दामाचे कवडे देत होतीं: तवं म्हणितलें: ‘‘कवडे नेघें: दूध माझेः एर तुमचें:’’ महादाइसें निराकरीतिः तेही निराकरीतिः तवं महादाइसीं म्हणितलें: ‘‘ऐसें नाः मीं मिश्रित क्रिया न करीः’’ तवं सर्वज्ञें राहियातें म्हणितलें: ‘‘यें म्हणतें असति तेंचि कां न करा? तुमचें क्येंही गेलें असे? ये ऐसें कां गा करीति? आतां तवं ये म्हणतें असति तैसें करा पां:’’ राहिनायकें म्हणितलें: ‘‘हो कां जीः जी जीः मातें साकरी नावें म्हैसी असेः तियेचा तांबीयाभरी दुधा मीं प्रतिदीनी गोसावियांलागी व्याळीये आणीनः’’ गोसावी मानिलें: मग राहिनायका पाठवणीं जालीं: रात्री महादाइसांचीयां कवडेयाचें दूध आणिलें: आणि आपुले वेगळे आणिलेः मग दिसवडी तांबीया भरूनि आणीतिः महादाइसीं उपहारू निफजविलाः गोसावियांसि रात्रीचा पूजावसरू जालाः व्याळी जालीः भटां महादाइसां भक्तिजनां पांती जेवणें जालीः मग गोसावियांसि पहूड जालाः भट महादाइसें केदाराचेंया देउळीं निजैलीं :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात बिडला ४ महिने वास्तव्य करुन पाली-पोहिचादेव-निंबागणेशवरुन पाटवध्याला आले व येथे स्वामींचे १४ दिवस वास्तव्य होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 328
  • Patoda : तथा श्रमनिवृत्ति करवणें :।।: / महादाइसांचीए पाठीवरि श्रीचरणु ठेवणें :।।:
  • पश्चातु पाहारीं गोसावियांसि उपहूड जालाः गोसावी परिश्रया बिजें केलें: परिश्रयो सारिलाः उदका विनियोग केलाः मग देउळासि केदारांतु बीजें केलें: तवं महादाइसें बीडीहुनि दिसेचि आउठ गावुवे आली होतीं: सरवळाचें पोतें आणिलें: थोर भागलीः तेणें पाठी दुखे म्हणौनि तें पालथीं निजैलीं होतीः तवं गोसावी तयांसि जेथ दुःख होतें तेथ पाठीवरि श्रीचरणु ठेविलाः तवं महादाइसीं सुखातें पावौनि म्हणितलें: ‘‘हो हो वोः हो वोः एथचि वो एथचि वोः व्यथा आहेः कव्हण वो दैवाचें: भागचें?’’ ऐसें परतौनि पाहाति तवं गोसावीः महादाइसीं म्हणितलें: ‘‘हे काइ जीः नागदेयाः नागदेयाः उठीः उठी गोसावी बिजें केलें असें: उतरिजो जीः श्रीचरण दुखवेलः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः राहाः थोर भागलीतिः बाइः आपुलेया श्रमलेयाची श्रमनिवृत्ति किजेः’’ भटोबास निजैले होतेः तें उठिलें: दोघीं दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीं: मग गोसावियांसि चौकीं आसन जालें: गोसावी दिवा आणविलाः आणि गोसावी भटांकरवी पायेवरि महादाइसाची श्रमनिवृत्ति करविलीः महादाइसीं श्रीचरणां लागौनि म्हणितलें: ‘‘जी जीः गोसावीं माझा अनंता जन्माचा श्रमु हरीलाः’’ मग गोसावी गुंफेसि बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात बिडला ४ महिने वास्तव्य करुन पाली-पोहिचादेव-निंबागणेशवरुन पाटवध्याला आले व येथे स्वामींचे १४ दिवस वास्तव्य होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 329
  • Patoda : तथा उपहारूस्वीकारीं प्रवृत्तिज्ञान करणें :।।: / महादाइसांचा उपहारू स्वीकारू :।।:
  • उदेयांचि महादाइसीं उपहारालागौनि जे आणिलें तें बाइसां हातीं दिधलें: बाइसें आणि महादाइसें भितरीं व्यापार करितें असतिः महादाइसीं म्हणितलें: ‘‘बाइः गोसावीयांसि भक्तिजनांसहित उपहारू करावाः गुळमिरीयाचीया आंगारिकाः तांदुळ वेळावेः सरवळेयाचांची खीरी करावीः’’ तवं बाइसीं म्हणितलें: ‘‘तांदुळाची खीरि करूं: सरवळीयें वेळूं:’’ तवं महादाइसीं म्हणितलें: ‘‘तांदुळ वेळूं?’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबा गुजः: बाबासि तांदुळाची खीरि आवडेः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘हें काइ वो जालें: गोसावी ईश्वरूः इश्वरी काइ आवडीनावडी असेः’’ तवं गोसावियांसि पटिशाळेवरि डाविएकडें आसन असेः गोसावी बाइसातें म्हणितलें: ‘‘बाइः आतां तवं ये म्हणतें असति तेंचि कां न करा? मग तुमचे तें क्येंही गेलें असेः’’ महादाइसीं जाणीतलें: आणि आपुला जीवीं पोळलीः भियालीः मग म्हणितलें: ‘‘बाइः आतां तुम्हीं जाणा तैसें कराः’’ मग बाइसीं म्हणितलें तेंचि केलें: उपहारू निफजविलाः तवं गोसावी केदाराउत्तरे वडु तेथ विहरण केलें: उपहारू निफजलाः मग बाइसें गेलीः गोसावियांतें विनविलें: ‘बाबाः उपहारू जाला असेः बीजें किजोः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एथचि कां पूजा न वर्ते एथचि घेउनि याः’’ मग बाइसें: महादाइसें उपहार घेउनि आलीः महादाइसीं गोसावियांचें चरणक्षाळन केलें: तेथचि पूजा केलीः धूपार्ति मंगळार्ति केलीः बाइसीं ताट केलें: भक्तिजना ठाय केलेः महादाइसीं ताटावरील मुखवस्त्र फेडिलें: बाइसीं निंबलोण केलें: महादाइसीं दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलीः अनुज्ञा दिधलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें काइ बाइः तांदुळांची खीरि केली मां: बाइः ये म्हणतें होतीः तेंचि कां न कराचि?’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘जी जीः मीं काइ गोसावियांची प्रवृत्ति जाणति असें? बाइसें प्रवृत्ति जाणतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं म्हणितलें तें कींरूं तैसेंचिः एथ भोजन करितां काइ आवडीनावडी असे? परि एथचि प्रवृत्ति बाइसें जाणतिः’’ ‘‘जी जीः मीं नेणेचि जीः’’ म्हणौनि महादाइसीं अनुतापु केलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ असिजे तवं बाइसातें पुसो पुसो किजे होः’’ मग आरोगणा जालीः भक्तिजन जेविलेः गुळळा जालाः विडा जालाः पहूड जालाः उपहूड जालाः गुंफे बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात बिडला ४ महिने वास्तव्य करुन पाली-पोहिचादेव-निंबागणेशवरुन पाटवध्याला आले व येथे स्वामींचे १४ दिवस वास्तव्य होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 330
  • Patoda : तथा(महादाइसा) एकादसी व्रत निरूपण :।।: / तथा एकादसी प्रश्ण करणें :।।:
  • एकु दीं महादाइसीं पुसिलें: ‘‘जी मीं एकादसी करी तें वायनायकें सांडविलीः जी जी सांडिलेया काइ होए?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘न केलेयां दोन्ही नव्हतिः’’ तिया म्हणितलें: ‘‘जीजीः एकादसी व्रतीं एकचि उपोषण एवं दानही किजतें आणि महाप्रसिद्धिः तरि एकादसी केलेया काइ होए?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘दोन्ही होतिः पापही होएः पुण्यही होएः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘जीजीः व्रत केलेया कां पाप होए?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः जीवासि पिडा होएः जीवु पळुभरी मास भोजन करी म्हणौनि पाप होएः आणि बारसि उजविजेः देवब्राम्हण किजे तेणें पुण्य होएः आणि फळही होए बाइः एकादसी केलेयां व्रतचि केलें होएः परि एकादसी करूं कोण्हीचि नेणेः बाइः दसमीचां दिसीं अलोणीं ताकभाताचें एकवत किजेः भूमिशयनः ब्रम्हचर्य वागनियमः पारणें तेंही अलणीं ताकभाताचें किजेः पारणें तेंचि निवारणें: ऐसें किजेः तैचि फळातें दें: दोघांचैघां पांती अन्न घालीजेः नाहीं तरि उपवासु केलेया नरकचि होति बाइः’’ ‘‘जी जीः’’ म्हणौनि महादाइसें श्रीचरणां लागली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात बिडला ४ महिने वास्तव्य करुन पाली-पोहिचादेव-निंबागणेशवरुन पाटवध्याला आले व येथे स्वामींचे १४ दिवस वास्तव्य होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 331
  • Patoda : तथा(महादाइसा) एकादसी संग्रहो निरूपण :।।:
  • महादाइसीं पुसिलें: ‘‘हां जीः आम्हीं एकादसी करूं न करूं: ऐसें कोण्हीचि नेणतिः आणि एर्‍हवीं तरि म्हणतिः ‘यें एकादसी न करीतिः’ तथा आम्हीं एकादसीचां दिसीं भलेतैसें चोरूनि जेउं आणि बारसीचां दिसीं पारणें करू परि लोक जाणेचि जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यथार्थ प्रगटेः सत्यार्थु प्रगटेः’’ तिया म्हणितलें: ‘‘हा जी लोकु तरि जाणे मां देखतां भिक्षा कां न किजे? प्रकट कां जेविजेना?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइ स्त्रीपुरूखांचा व्यवहारू जगवीश्व जाणें: तरि काइ चोहटा बाज घालूं येइल? तें घराचेया माजघरीचि घालावी कीं: एरव्ही लोकु सनिवेर्‍ही नेघेः तैसें बाइः तेहीं पां जाणीतलें: परि आपण तैसेचि करावें कीं: संग्रहो करावाः एकादसी भिक्षा न करावीः लोकसंग्रहो भंगैलः मग लोक सनिवेर्‍हीं घेइलः’’ एथ गोसावी दृढतर संग्रहो विहिलाः मग महादाइसे उगीचि राहिलीं :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात बिडला ४ महिने वास्तव्य करुन पाली-पोहिचादेव-निंबागणेशवरुन पाटवध्याला आले व येथे स्वामींचे १४ दिवस वास्तव्य होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 332
  • Patoda : दायंबा जावाइ निराकरणें :।।:
  • पाटवधां व्यवहारे एकः तयांचेया घरा दायंबा भिक्षे जातिः तियें सोपस्कर भिक्षा देतिः तयांचा जावाइ तयांचीये लेकीतें सांडौनि गेला होताः तो दायंबाचसारिखा होताः तयातें देखौनि तियें म्हणतिः ‘‘हें काइः आमचे जावाइ आले मां: हा तोचिः’’ दायंबा म्हणतिः ‘‘मी नव्हेः’’ तें म्हणतिः ‘‘होएः’’ म्हणौनि सोइरेधांइरेयांपुढा दाखवीतिः तेही म्हणतिः ‘‘हा तोचिः’’ दायंबा म्हणतिः ‘‘मीं नव्हेः’’ मग तेहीं म्हणितलें: ‘‘आगाः याची ब्राम्हणी बोलावाः तें ओळखैलः’’ मग तें लेंकीतें पुसतिः ‘‘हा वों: हा तुझा वरैतु होए?’’ तें म्हणेः ‘‘मातें काइ पुसत असाः काइ तुम्हीं नेणा?’’ तेव्हेळी तेहीं दायंबातें पाचारिलें: ‘‘तुम्हीं आमचे जावाइः इतुके दी गेले होतेतिः आतां तुम्हीं आपुली वस्तु सांभाळाः आम्ही किती दिवस संवसाळुनिः’’ दायंबाए म्हणितलें: ‘‘ना आम्हीं तुमचे जावाइ नव्होः’’ बहुत विवादु केलाः तवं एकी म्हणितलें: ‘‘अहोः यांतें काइ म्हणत असा? यांचिया गोसावियांतें म्हणाः मां तें यांते म्हणतिः आणि हें अंगिकरीतिः’’ ऐसें विवादत एर्‍हएर्‍ह गोसावियांपासी आलें: ‘‘जीजीः हें आमचे जावाइ इतुके दी आपुलीये ब्राम्हणीतें सांडुनि गेले होतेः आतां हें नव्हे म्हणतातीः तरि ऐसा याचा कोण धर्म आतां आपुली वस्तु सांभाळीतुः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्ही यातें ओळखत असा?’’ तेही म्हणितलें: ‘‘तरि काइ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नायकोः तुमची शाखा कोणी?’’ तेही म्हणितलें: ‘‘जीजीः माध्येंजनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं माध्येंजनः हा कर्‍हाडा ऋगवेदीः प्रतिष्ठानी चांगदेवीचे बडुवें: तयांचा हा जावाइः तुम्हीं सारिखेयां लागलीतिः’’ तेव्हेळी तेयाचें अन्यथाज्ञान फिटलेः आणि मग तियें उगेचि गेलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां पोराः नव्हे न म्हणसिः मां: निराकरिसीचिनाः गळां लोंढणें बांधति तरि काइ करितासिः’’ तवं दायंबाये म्हणितलें: ‘‘तरि दोघें असतों गोसावियांसांघाते आणि काइ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पाहाः पोरू तैसेयासीचि टेकला मां:’’ म्हणौनि हास्य केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात बिडला ४ महिने वास्तव्य करुन पाली-पोहिचादेव-निंबागणेशवरुन पाटवध्याला आले व येथे स्वामींचे १४ दिवस वास्तव्य होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 333
  • Patoda : राहिया चिंतनप्रश्नें प्रत्युत्तर देणें :।।: / चिंतनप्रश्नें राहिया पाठवणी :।।:
  • एकु दिसीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालेंयानंतरें पटिशाळेसि आसनीं उपविष्ट असतिः तवं राहिनायक सवें दोघचैघ गवळी ऐसें गोसावियांचीया दरीसना आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलेः नावेक जवळी बैसलेः गोसावी आसनीं निश्चळ असतिः तवं राहियें म्हणितलें: ‘‘हां जीः आम्हीं गोसावियांतें चिंतू आठवूः गोसावी काइ चिंतीति जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथौनि तुम्हीं केव्हळी केव्हळी निगालः ऐसें चिंतीत असेः’’ तवं तें ऐसें बुझलेः ‘जे गोसावियांसि आमचा निरोध जालाः’ आणि राहिनायकें म्हणितलें: ‘‘आरेः उठा उठा गाः गोसावियांसि निराधु होतु असेः मियां आपणेयासांघातें माणुसें आणिलीः आम्हीं गोवळी लोणीए न्हाउनी आलो असोः तयाचां वास गोसावियांसि जात असेः बोचुटानी येत असेः म्हणौनि गोसावी मातें म्हणितलें:’’ तें अवघे उठिलेः गोसावियांसि दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: निगालेः एर्‍हवी गोसावियांचां हेतु ऐसां: जे ‘या संसारापासौनि केव्हळा केव्हळा जालः’ मग आणिकीं वेळें तें एकलैचि गोसावियांचां दरीसनां येतिः गोसावी पाटवधाहुनि बिजें केलें: तैं राहिया शीववेर्‍ही बोळवीत आलाः मग तो गोसावी राहाविलाः दुःखाकुळ होउनि राहिला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात बिडला ४ महिने वास्तव्य करुन पाली-पोहिचादेव-निंबागणेशवरुन पाटवध्याला आले व येथे स्वामींचे १४ दिवस वास्तव्य होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 334
  • Patoda : पदुमनाभी भेटिः वस्त्रपूजा स्वीकारू :।।:
  • एकु दीं बीडीहुंनि पदुमनाभीदेव गोसावियांचिया दरीसना आलेः गोसावियांसि पटिशाळे आसन जालें: गोसावियांसि भेटि जालीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: वस्त्रपूजा केलीः शेंदुरी दुटी ओळगवीलीः आर्त केलीः गोसावियांतें उपाहारालागौनि विनविलेः गोसावी मानिलेः गोसावियांपूरता उपहारू निफजविलाः गोसावियांसि आरोगणा जालीं: गुळळा जालाः विडा जालाः पहूड जालाः उपहूड जालाः मग गोसावियांसवें होते :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात बिडला ४ महिने वास्तव्य करुन पाली-पोहिचादेव-निंबागणेशवरुन पाटवध्याला आले व येथे स्वामींचे १४ दिवस वास्तव्य होते तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: