Paithan (पैठण)

बाइसांच्या गुंफेतील स्थाने :

पांड्याच्या गुंफेतील स्थानांच्या देवळाच्या पश्चिमेस 34 फूट अंतरावर बाइसांच्या गुंफेतील स्थाने आहेत. सर्वज्ञांच्या वेळी बाइसांचीपूर्वाभिमुख गुंफा होती, स्थान पोथी आणि लीळाचरित्राप्रमाणे बाइसांच्या गुंफेत दोनच स्थाने घडतात; पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी तीन ओटे आहेत. बाइसांच्या गुंफेच्या ठिकाणी भव्य व प्रेक्षणीय मंदिर उभारलेले असून ते आज ‘श्रीचक्रधर मंदिर’ या नावाने ओळखले जाते. हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिरास पूर्वाभिमुखही एक दरवाजा आहे.

6. बाइसा प्रेमदान देणे स्थान :

श्रीचक्रधर मंदिरात एकूण तीन ओटे आहेत. त्यात एक मोठा ओटा व दोन लहान ओटे आहेत. पूर्व बाजूचा पहिला जो लहान ओटा आहे, तेच बाइसा प्रेमदान देणे स्थान होय.

लीळा : (1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंनी येथून बाइसांना प्रेमशक्तीचा संचार केला. (पू. ली. 107, स्था. पो.)

(2) प्रेमशक्तीचा संचार करण्यापूर्वी दोन दिवसपर्यंत बाइसा येथे सर्वज्ञांना पाय पुसणे बसण्यासाठी टाकीत असे व पाणीभाताची आरोगणा देत असे. (पू. ली. 105, 106, 107)


बाइसा प्रेमदान देणे स्थानाच्या पश्चिम बाजचे लहान ओटा असलेले स्थान कोणत्या लीळेचे आहे, हे सांगता येत नाही.


7. आसन स्थान :

पश्चिम बाजूचा जो मोठा ओटा आहे, ते आसन स्थान होय. येथेच बाइसांचा बसण्याचा ओटा होता. प्रेमशक्ती संचारानंतर सर्वज्ञांना येथील ओट्यावर आसन होत असे.

लीळा : सर्वज्ञांनी बाइसांना प्रेमशक्तीचा संचार केल्यानंतर बाइसांना सर्वज्ञांचा ठायी ईश्वरबुद्धी आली. मग बाइसांनी ओटा झाडून चांगले आसन रचले. सर्वज्ञ आसनावर बसले. बाइसांनी त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. चरणोदक घेतले. चांगल्या प्रकारची पूजा द्रव्ये आणली. पूजाबसर केला. दीप लावून आरती केली, पाच दंडवते घातली. त्यानंतर चांगला उपहार तयार केला आणि तेव्हापासून बाइसा सर्वज्ञांचे सेवादास्य करू लागली. त्या दररोज तिन्हीही पूजावसर येथे करीत असत. (पू. ली. 107, स्था. पो.)

येथील इतर लीळा : (1) हंसराजाला स्थिती देणे. (पू. ली. 108)

(2) उपाध्यांना तांबोळाचा प्रसाद देणे. (पू. ली. 118)


8, 9, 10, 11. अनुपदेवाच्या गुंफेतील आसन स्थाने :

ही चार स्थाने अवस्थान तथा निद्रा स्थान देवळापासून उत्तरेस 44 फूट अंतरावर दक्षिणाभिमुख देवळात आहेत. सर्वज्ञांच्या वेळी येथे अनुपदेवाची गुंफा होती. त्या गुंफेशी संबंधित असलेली ही स्थाने होत.


12, 13, 14, 15, 16. काष्टाच्या शास्त्रमदातील स्थाने :

अनुपदेवाच्या गुंफेतील आसन स्थान देवळापासून पूर्वेस 80 फूट 2 इंच अंतरावर दक्षिणाभिमुख देवळात ही पाच स्थाने आहेत. सर्वज्ञांच्या वेळी येथे काष्टाचा शास्त्रमढ होता. येथील प्रत्येक स्थान कोणत्या लीळेचे आहे, हे सांगता येणार नाही. लीळाचरित्रामध्ये येथील एक लीळा आलेली आहे. ती खालीलप्रमाणे:

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूनागणपत मढी अवस्थान असताना दुपारचा पूजावसर, आरोगणा, पहुड, उपहुड झाल्यानंतर ते येथे आले. सोबत देइभागवत होते. शास्त्रमढामध्ये संन्यासी वेदान्त वाचत होते. सर्वज्ञ आलेले पाहून ‘एइजोजी एइजोजी’ म्हणून संन्यासी उठून उभे राहिले. देइभागवतांनी आसन घातले. सर्वज्ञ आसनावर बसले. मग संन्याशांना विचारले, “हे आपण काय वाचत आहात?” संन्यासी म्हणाले, “जी जी हे वेदान्त” सर्वज्ञांनी विचारले, “वेदान्तामध्ये कोणत्या विषयाचे प्रतिपादन केले आहे ?” संन्यासी म्हणाले, “आत्म्याचे प्रतिपादन केलेले आहे. ” सर्वज्ञ म्हणाले, “ते कसे?” मग संन्यासी बोलू लागले. सर्वज्ञ म्हणाले, “आत्मा काय असा आहे ? तो असा आहे की”, म्हणून सर्वज्ञांनी त्यांना निरुपण केले. नंतर सर्वज्ञांच्यापासून सर्व संन्याशांना स्थिती झाली. (उ. ली.475)


उर्पुवरित स्थान पुढील पेज वर आहेत, पेज 3 वर ज्याण्यासाठी ‘3’ वर क्लिक करा… 👇🏾👇🏾👇🏾