Paithan (पैठण)

पैठण, ता. पैठण, जि. औरंगाबाद


पैठण येथील मंदीरे पैठण शहराच्या दक्षिनेकडच्या भागात, गोदावरी नदीच्या काठावर, प्रतीष्ठान महाविद्यालया जवळ स्थित आहेत.
येथील 16 स्थाने -
 पैठण येथे एकाच ठीकाणी 6 मंदीरे आहेत. 
पाषानाचा शास्त्रमढ, पांड्याची गुंफा, बाइसाची गुंफा व अनुपदेवाची गुंफा, भोगनारयाण गुंफा, काष्ठाचा शास्त्रमढ, तसेच पुढे अतीरीक्त मोकळी जागा आहे तीथेही स्थाने आहेत.
1) पाषानाचा शास्त्रमढ - येथे 1 स्थान आहे.
2) पांड्याची गुंफा - येथे 2 स्थाने आहेत.
3) बाइसाची गुंफा - येथे 3 स्थाने आहेत.
4) अनुपदेवाची गुंफा - येथे 4 स्थाने आहेत.
5) भोगनारयाण गुंफा - येथे 1 स्थाने आहेत.
6) काष्ठाचा शास्त्रमढ - येथे 5 स्थाने आहेत.
तसेच पुढे अतीरीक्त मोकळी जागा आहे तीथेही 2 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

पैठण हे शहर, घोटणहून ईशान्येस 18 कि. मी. आहे. (1) औरंगाबाद ते पैठण 49 कि.मी. (2) जालना ते पैठण (अंबड, पाचोड मार्गे) 90 कि. मी. (3) शहागड ते पैठण 41 कि. मी. (4) बीड ते पैठण 85 कि. मी. (5) अहमदनगर ते पैठण 96 कि. मी. (6) श्रीरामपूर ते पैठण 102 कि. मी. पैठणला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपबलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकूण चार वेळा पैठणला आले. पहिल्या वेळेस ते मेहेकरहून पैठणला आले व तेव्हापासून त्यांच्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळास प्रारंभ झाला. पहिल्या वेळेस सर्वज्ञांचे भोगनारायणी 10 महिने वास्तव्य होते. पूर्वार्धातच दुसऱ्या वेळेस सर्वज्ञ वडवाळीहून पैठणला आले. त्यावेळी त्यांचे त्रीपुरुषाच्या देवळात एक रात्र वास्तव्य होते.

उत्तरार्धात पहिल्या वेळेस सर्वज्ञ पिंपळवाडीहून पैठणला आले. त्यावेळी त्यांचे गणपत मढी अवस्थान होते. दुसऱ्या वेळेस सर्वज्ञ ब्राह्मणीहून पैठणला आले. त्यावेळी त्यांचे गणपत मढी 4 महिने, ढोरेश्वरी 10 महिने, नागनाथाचा देऊळी पहिले 1 महिना व दुसरे 7 दिवस, काळीकेचा देऊळी 20 दिवस, रवळमढी 18 दिवस, सप्तमात्राचा देऊळी पहिले 3 दिवस व दुसरे 7 दिवस आणि त्रीपुरुषाचा देऊळी 3 दिवस वास्तव्य होते. या व्यतिरिक्त भटोबास व बाइसा यांना रिद्धपरला श्रीप्रभूच्या दर्शनाला पाठविल्यानंतर ढोरेश्वर, गणपत मठ, सप्तमात्रा, रवळमठ, चिंचाए, नागनाथ ही सर्वज्ञांची अनिश्चित वास्तव्याची ठिकाणे होत.

आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्धातील व उत्तरार्धातील काळापैकी सर्वाधिक काळ सर्वज्ञ पैठण येथे राहिले. या काळात, त्यांचा पैठण येथील अनेक मंदिरांशी संपर्क आला होता. त्यांचे कुठे अवस्थान तर कुठे वसती, कुठे आसन तर कुठे विहरण होत असे. तसेच सारंगपंडित, माइतेया हरी, माएधुवा यांच्या घरी सर्वज्ञ जात होते. वामदेव, पुरुषोत्तमदेव, ब्रह्मचारीदेव, अनुपदेव, नागाराऊळ, पांडा, बाइसा यांच्या गुंफेतही ते जात होते. त्याचप्रमाणे कधी चासाकडे, कधी नागडोहाकडे, कधी गोदावरी नदीच्या काठी विहरणासाठी जात होते. एकंदरीत सर्वज्ञांच्या पैठण येथील पूर्वार्धातील व उत्तरार्धातील वास्तव्याने पैठण व पैठणचा परिसर परम पवित्र झालेला आहे.

अल्लाउद्दिन खिलजीपासून ते औरंगजेबच्या काळापर्यंत म्हणजे एकूण 400 वर्षांच्या काळात महाराष्ट्रावरील मुस्लिमांच्या आक्रमणांमुळे पैठणमध्येही फार मोठी उलाढाल झाली. औरंगजेबाच्या कालखंडात तर पैठणमध्ये बरीच स्थित्यंतरे घडली. त्याने पैठणची पुष्कळशी प्राचीन मंदिरे पाडली व मशिदी बांधल्या. एकंदरीत 400 वर्षांच्या काळात पैठणमधील काही मंदिरांच्या ठिकाणी मशिदी व दर्गे निर्माण झाले. वरील घटनेमुळे अन्य मंदिरांच्या आश्रयाने असलेली सर्वज्ञांची चरणांकित स्थाने आज अनुपलब्ध झालेली आहेत. सर्वज्ञांचा ज्या ज्या मंदिरांशी संपर्क आलेला होता, त्यातील काही मंदिरे आजही पैठणमध्ये आहेत; परंतु ती मंदिरे प्राचीन अवस्थेत नसल्यामुळे तेथील स्थानांची निश्चिती करता येत नाही. तसेच भोगावती घाट, सिद्धेश्वर मंदिर या भागांचाही नारायणराव पेशवे यांच्या काळात काही प्रमाणात का होईना जीर्णोद्धार झालेला आहे. त्यामुळे तेथीलही स्थानांची निश्चिती करता येत नाही.

आज फक्त काष्टाच्या शास्त्रमढातील स्थाने, पाषाणाचा शास्त्रमढ, भोगनारायणीची स्थाने, पांड्याच्या गुंफेतील स्थाने, बाइसांच्या गुंफेतील स्थाने, अनुपदेवाच्या गुंफेतील स्थाने उपलब्ध आहेत. ही सर्व स्थाने पैठण शहराच्या दक्षिण विभागी प्रतिष्ठान महाविद्यालयाजवळ आहेत. ती आम्ही क्रमाने देत आहोत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

1. माहादाश्रमाची यंत्रासनपूर्वक पूजा स्वीकार स्थान :

हे स्थान पूर्वाभिमुख देवळात आहे. स्थानालगतच श्रीदत्तात्रेयप्रभूची मूर्ति बसविलेली आहे. सर्वज्ञांच्या वेळी या देवळास ‘शास्त्रमढ’ असे नाव होते. हा पाषाणाचा शास्त्रमढ होय. या मढाचे प्राचीनकाळचे दगडी 16 खांब अजूनही आहेत, आज हे देऊळ ‘श्रीदत्त मंदिर’ या नावाने ओळखले जाते. स्थानाच्या चारी बाजूचे खांब नमस्कारी आहेत.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंची काष्टाच्या शास्त्रमढी संन्याशांच्या बरोबर चर्चा झाल्यापासून व त्यांना स्थित्यानंद दिल्यापासून सर्व संन्यासी सर्वज्ञांच्याकडे वेधले गेले. ते माहादाश्रमाला माहीत न होता सर्वज्ञांच्या दर्शनाला येऊ लागले. त्यांच्या तांबोळाचा प्रसाद घेऊ लागले. चरणोदक घेऊ लागले. ही गोष्ट माहादाश्रमाला समजली. त्याला वाटले, हे श्रीचांगदेवराऊळ आमचा मार्ग उच्छेदित आहेत; म्हणून त्याने सर्वज्ञांना ओखटे करण्याच्या हेतूने पाषाणाच्या शास्त्रमढामध्ये रंगपूजा केली. यंत्रासन रचले. सर्व देवता आव्हाणून उर्ध्वमुखा केल्या. आपल्या शिष्याकडून सर्वज्ञांना बोलाविले. सर्वज्ञ येथे आले. “येईजोजी येईजोजी” म्हणून माहादाश्रम व त्याचे शिष्य उठून उभे राहिले. सर्वज्ञांनी येताच डाव्या श्रीचरणाच्या अंगठ्याने आसन ढाळून उर्ध्वमुखा देवता अधोमुखा केल्या. मग आसनावर बसले. नंतर माहादाश्चमाने त्यांची पूजा केली. विडा अर्पण केला. त्यानंतर सर्वज्ञ येथून निघून गेले. (उ. ली. 476, उ. ली. 294 ख प्र.)


2. अवस्थान तथा निद्रा स्थान :

हे स्थान श्रीदत्त मंदिराच्या पश्चिमेस 56 फूट अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. स्थानाचा उत्तर-दक्षिण ओटा आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे भोगनारायणाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे येथे 10 महिने वास्तव्य होते. ते येथे दररोज निद्रा घेत असत. (स्था. पो. पू. ली. 105, 106, 107)


3. आसन स्थान :

हे स्थान अवस्थान तथा निद्रा स्थान देवळाच्या पश्चिमेस 13 फूट 8 इंच अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे. हेही भोगनारायणाच्या देवळाच्या चौकातील स्थान होय.
लीळा : (1)दादोस, ग्रहेसारंगपाणी, ग्रहेसारंगपाणीची माता, चांगदेवभट, देइभट, लखुबाइसा, उपाध्ये, देमाइसा, महादेव पाठक, राघवदेव, गदोनायक, ब्रह्मचारीदेव, सारस्वतभट इत्यादींच्या भेटी येथे झाल्या. (पू. ली. 111, 112, 113, 117, 127, 128, 129, 130 स्था. पो. उ. प्रत)

(2) ग्रहेसारंगपाणीची भूतबाधा दूर करणे (पू. ली. 111)

(3) रामदेवाला देवताचक्र निरुपणे. (पू. ली. 131).


4,5. पांड्याच्या गुंफेतील स्थाने :

ही स्थाने अवस्थान तथा निद्रा स्थान देवळापासून दक्षिणेस 18 फूट 4 इंच अंतरावर देवळात आहेत. सर्वज्ञांच्या वेळी येथे पांड्याची उत्तराभिमुख गुंफा होती. त्या गुंफसी संबंधित ही स्थाने होत. लीळाचरित्राप्रमाणे येथे दोनच स्थाने घडतात; पण प्रत्यक्षात येथे तीन ओटे आहेत. उत्तर बाजूचे चरणचारी उभे राहणे स्थान व दक्षिण बाजूचे गुंफेतील आसन स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे सेवादास्य बाइसा आणि हंसराज करू लागल्यानंतर पांडा त्यांची निंदा करू लागला. बाइसा सर्वज्ञांना म्हणाल्या, “हा पांडा रोज निंदा करतो, तरी काय करावे ?” सर्वज्ञ शांत होते. काहीच बोलले नाही. एके दिवशी रात्री पांड्याला स्वप्न पडले. स्वप्नात दोन यमदूत आले आणि म्हणाले, “अरे ! हे द्वारावतीकार श्रीचांगदेव राऊळ, साक्षात ईश्वर अवतार आणि तू त्यांची निंदा करतोस !” असे म्हणून मुदगलाने ते पांड्याला मारायला धावत. तेव्हा सर्वज्ञ मध्ये आड येऊन त्यांना बाजूला करीत व म्हणत, “नका मारू याला, हा तसा नाही. याला जाणीव नाही. अज्ञान आहे. ” पुन्हा ते यमदूत मारायला धावत, पुन्हा सर्वज्ञ मध्ये जाऊन त्यांना निवारीत. असे रात्रभर पांड्याने स्वप्नात दु:ख भोगले. सकाळी उठल्यावर बाइसांना मोठ्याने हाका मारू लागले. बाइसा आल्या. त्याने रात्रीची सर्व घटना बाइसांना सांगितली व सर्वज्ञांना येथे बोलावून आणण्याची बाइसांना विनंती केली. बाइसांच्या विनंतीवरून सर्वज्ञ येथे आले. गुंफेच्या उंबऱ्यावर दोन्ही श्रीचरण ठेवून उभे राहिले. (हेच उत्तर बाजूचे स्थान) पांड्याने श्रीचरणावर डोके ठेवून नमस्कार केला. मग ओट्यावर आसन रचले. (दक्षिण बाजूचे स्थान) सर्वज्ञ आसनावर बसले. पांड्याने त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. चरणोदक घेतले. (पू. ली. 109, स्था, पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


पांड्याच्या गुंफेतील स्थानांच्या पश्चिम बाजुच्या देवळातील तीन स्थाने कोणत्या लीळेची आहेत, हे निश्चित सांगता येत नाही.


उर्पुवरित स्थान पुढील पेज वर आहेत, पेज 2 वर ज्याण्यासाठी ‘2’ वर क्लिक करा… 👇🏾👇🏾👇🏾