Nashik (नाशिक)

नाशिक, ता. नाशिक, जि. नाशिक


येथे 2 स्थाने - नाशिक शहराच्या पंचवटी विभागात, अहिल्यादेवी होळकर पूलाच्या पूर्वेकडे गोदावरी नदीचे पात्रात हे 1 स्थान व अहिल्यादेवी होळकर पूलाच्या पश्चिमेकडे सुन्दरनारयनाचे मंदीर आहे. मंदीरातील सभामंडप/चौक नमस्कारी आहे हे दुसरे स्थान होय.


जाण्याचा मार्ग :

नाशिक हे शहर, मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर आहे. मुंबई ते नाशिक 185 कि.मी; पुणे ते नाशिक 210 कि.मी; अहमदनगर ते नाशिक 154 कि.मी; औरंगाबाद ते नाशिक 182 कि.मी; जळगाव ते नाशिक 243 कि.मी; धुळे ते नाशिक 184 कि.मी; सिन्नर ते नाशिक 29 कि.मी; गंगापूर ते नाशिक 9 कि.मी; नाशिक हे शहर, मुंबई-भुसावळ या लोहमार्गावरील नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून वायव्येस 9 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. चरणचारी उभे राहणे स्थान :

हे स्थान नाशिक शहरातील पंचवटी या विभागात अहिल्यादेवी होळकर पुलाच्या पूर्वेस गोदावरी नदीच्या पात्रात चासाच्या उत्तर बाजूस आहे.

लीळा : सुंदरनारायणाच्या देवळात थोडा वेळ थांबल्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू नदीच्या घाटावरील देवळीजवळ उभे राहिले. मग तेथून गंगा उतरून येथे आले. या ठिकाणी थोडा वेळ उभे राहिले. येथून कपाळेश्वराच्या देवळात गेले. (पू. ली. 247, स्था, पो.)

देवळाच्या वायव्येस 70 फुट अंतरावर असणारे स्थान मांडलिक आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. सुंदरनारायणाच्या चौकातील आसन स्थान :

हे स्थान अहिल्यादेवी होळकर पुलाच्या पश्चिमेस सुंदरनारायणाच्या पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. देऊळाला एकूण दोन दरवाजे आहेत. देऊळाला एक पूर्वाभिमुख, एक दक्षिणाभिमुख दरवाजा आहे.

लीळा : पंचायेतनाचा देऊळी उदास्य स्वीकारल्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. देवळाच्या चौकात त्यांना थोडा वेळ आसन झाले. (पूर्वार्ध लीळा 247, स्थान पोथी)

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भगूरहून नाशिकला आले. रामनाथी गुंफेत त्यांचे 10 दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथन गोवर्धनला गेले व पुन्हा त्र्यंबक, अंजनेरीहून नाशिकला आले. त्यावेळी त्यांचे महालक्ष्मीच्या देवळात तीन दिवस व पंचवटीला तीन दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून आडगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. रामनाथी गुंफे अवस्थान स्थान

2. गुंफेच्या अंगणातील मादने स्थान.

3. गुंफेच्या दक्षिणेचे परिश्रय स्थान.

4. रामनाथी आसन स्थान.

5. आदित्याचा देऊळी विहरण स्थान.

6. महालक्ष्मीचा देऊळी विहरण स्थान.

7. गणेशाचा देऊळी विहरण स्थान.

8. सोमनाथाचा देऊळी विहरण स्थान.

9. विनायकाच्या देऊळी विहरण स्थान.

10. आंब्याच्या झाडाखालील आसन स्थान.

11. आंब्याच्या पूर्वेस परिश्रय स्थान.

12. कपाळेश्वराच्या देवळातील स्थान.

13. कपाळेश्वराच्या जगतीआंतुल गुंफेतील पूजा आरोगणास्थान.

14. वरूणासंगमी चरणचारी उभे राहणे स्थान.

15. घाटी देऊळीपाशी उभे राहणे स्थान.

16. जळसेनी आसन स्थान.

17. जळसेनाचा घाटी आसन स्थान.

18. पंचयातनाचा देऊळी आसन स्थान.

19. पंचयातनाचा घाटी देऊळी तेथ आसन स्थान.

20. काळीकेचा देऊळी वसती स्थान.

21. साळातीर्थी आसन स्थान.

22. पंचवटीए गुंफेवसती स्थान.

23. महालक्ष्मीचा देऊळी अवस्थान स्थान.

24. पंचवटीए अवस्थान स्थान.


नाशिकची एकूण स्था : 26


  • Purvardha Charitra Lila – 247
  • Nashik : उदास्स्वीकारें गंगा उतरणें :।।: / औदास्स्वीकारें गंगोत्तीर्ण :।।:
  • च्यारी दिवस अतिक्रमलेः पांचवा दिवसीं उदेयाचां पूजावसरू जालेयानंतरें गोसावी रामाचां देउळासि बिजें केलेः देउळीं आसन जालें: गोसावी भक्तिजनासि अनन्यगतीचे निरूपण करीतातीः तवं गोसावियांचीये प्रवृत्ति विषयो कोण्ही हों जाणतीचिनाः मग तेथौनि उदास्य स्वीकरिलें: गोसावी भक्तिजनातें म्हणितलें: ‘‘तुम्हीं एथौनि अवघे जा गाः हें एकांकीं असैलः तुम्ही एथचिये प्रवृत्ति विषयो हों जाणानाः एथौनि म्हणितलें तें न कराः तुम्हां एथ असतां सतसंभवी अवीधि अनिष्टचि होत असेः तुम्हां एथ अधिकारू नाहीं: तुमचा एथ निरोधुचि कीं: तुम्हीं एथ काइसेया असा?’’ तवं तें कोण्हीं न वचतीचिः हाडुतिया माना घालुनि तेथचि राहीलेः तें उगेचि होतेः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं न वचा तरि हेचि जाइलः’’ तैसेचि गोसावी सुंदरासि बीजें केलें: सुंदरीं नावेक आसन जालें: मग तेथौनि घाटासि बिजें केलें: घाटी दंउळीयेपासी उभे जालें: मग डोहांतु उदकामध्यें बिजें केलें: सवेचि बाइसें रीगालीं: बाइसीं गोसावियांचा फुटा धरिलाः बाइसांचा पालव अवघा भक्तिजनीं धरिलाः बाइसां पाणी बहुत जालें: गळयाइतुके उदक जालेः तेणें बाइसें नावेक बुडकळों लागलीः आणि ‘‘हा हाः बाबा बाबाः आपण के जाइजतों:’’ ऐसें म्हणौनि बोबाइलीं: गोसावी मागील वास पाहिलीः तवं बाइसाते देखिलेः आणि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘या बाइसां हातीं केहीचि जाओं न लभेः’’ मग गोसावी परतलेः गंगा उतरौनि ऐसें चासापासी नावेक उभे होतेः चास अवलोकिलेः मग कपाळेस्वरा बिजें केलें: कपाळेस्वरीं चैकी आसन जालें: तिमिलीं वस्त्रें फेडिलीः आणि आणिकें वेढिलीं: नावेक पहूड जालाः उपहूड जालाः गोसावियांचां ठाइं उदास्य देखिलें: मग अवघीं भक्तिजनें उगीचि बैसलीं: पुढां रीगवेनाः बाइसे नावेक कोमाइली असतिः मग कपाळेस्वरा आडवांगीं दक्षिणे गुंफा होतीः तेथ उदास्य परिहरलेः पूजा जालीः बाइसीं आरोगणेलागी विनविलें: ताकाभाताची आरोगणा जालीः गुळळा जाला :।।:
  • (टिप – नासिकला हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे सिन्नरवरुण आले असताना स्वामींचे नासिकला १० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila – 248
  • Nashik : सौंर्दानुवादु :।।:
  • एकु दिसीं उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें गोसावी सुंदरासि बीजें केलेः सवे बाइसें: डखलेः चांगदेवभटः दायंबा असतिः दायंबाए पुसिलें: ‘‘जी जीः गोसावियाहुनि कव्हणी बरवें असे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘त्रेतीं सीता बरवीः द्वापरीं श्रीक्रष्णचक्रवर्ति बरवेः कलियुगीं हें बरवें:’’ मग गोसावी तिएची गोष्टि सांगितलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः सकळ देवतांचे पळु पळु बरवेपण काढिलें: मग सीता रचीलीः ऐसीं तें जनकतनयाः तिचेया कानांतु गुढरीला हस्ती सामाएः ऐसीं ती ‘षोडशवरिषीः स्त्रियांतु सीता बरवीः पुरूखांतु हें बरवें: देवतांतु सुंदरू बरवाः’’ म्हणौनि गोसावी बाइसांपुढां सुंदरू दाखविलाः सोनयांचें जाणिवें: सोनयांचा कडीदोराः सोनयाची उतरीः सोनेयाचा मुकुटुः पाटाउ कास घातलीं असेः इतुकेनि बाइसें मानविलीं: ‘बाबाः कोणे भक्तें केली?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें सारंग महालेनि केलेः’’ :।।:
  • (टिप – नासिकला हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे सिन्नरवरुण आले असताना स्वामींचे नासिकला १० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila – 257
  • Nashik : पंचवटिये गुंफे अवस्थानः :॥:
  • गोसावी पंचवटिये गुंफेसि बीजे केले : बाइसीं श्रीचरण प्रक्षाळिलें: पूजावसरु केलाः आरोगणा जाली : गुळुळा जालाः विडा जालाः तेथ अवस्थान जाले दिस तीन :॥:
  • (…येथे स्वामी दुसर्यांदा आले. स्वामी यावेळी त्र्यंबकेश्वरवरुण आले असताना पंचवटिये गुंफेत अवस्थानास तीन दिवस थांबले.)
  • Purvardha Charitra Lila – 257
  • Nashik : नासिकीं पंचवटिये गुंफे अवस्थानः :॥:
  • नासिकीं पंचवटिये रामनथी गुंफे अवस्थान जालेः दिस दहाः रामनथी दोनि गुंफाः एक पुर्वाभिमुख एक उत्तराभिमुखः पुर्वाभिमुख गुंफे अवस्थानः उदयाचा पूजावसरु जालेयानंतरे गोसावी रामनाथाचेया देउळा विहरणा बीजे केलेः मग अग्निष्टिके नावेक आसनः मग साळतिर्थी नावेक आसनः मग घाटापासि बीजे केलेः घाटी देउळिये नावेक आसन जालेः मग चासापासि बीजे केले: चास अवलोकिलेः चासा ऐलाडी नावेक आसनः मग चास उतरौनि पैलाडी आसनः मग डोहापासि बीजे केले: तेथ नावेक आसनः मग ढगावरि बीजे केले: तेथ नावेक आसनः तेथ गोसावी चरणचारी उभे होतेः मग जळसेना बीजे केलेः तेथ गोसावी नावेक आसन जालेः मग घाटासि बीजे केलेः तेथ देउळिये नावेक आसनः मग पंचायतना बीजे केले: एकविराः विनयकः केसवः महादेवः अदित्यः ऐसे पांच मिळौनि पंचायतनः तेथ गोसावियासि पृथक पृथक विहरण जालेः तैसेची गोसावी सुंदराचेया देउळा बीजे केले :॥:
  • (टिप – नासिकला हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे सिन्नरवरुण आले असताना स्वामींचे नासिकला १० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila – 257
  • Nashik : औदास्य स्वीकारें चांगदेवोभटां पाठवणी :।।:
  • एकु दीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसरू जालेयानंतरें गोसावी रामाचेया देउळा बिजें केलें: तेथ चौकीं आसन जालें: भक्तिजनावरि उदास होउनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथौनि तुम्हीं अवघे जा गाः हें एकाकी असैलः तुम्हीं एथौनि म्हणितलें: तें न कराः तुम्हीं एथचिये प्रवृत्ति विषयो हो जाणा ना तुमचा एथ निरोधुेचः तुम्हां एथ असतां सतसंभवी अवीधि अनिष्टचि होत असेः तुम्ही एथ काइसेया असाः तुम्हीं जाः’’ परि भक्तिजन उगेचि राहिलेः गोसावी डखलेयातें म्हणितलें: ‘‘डखलेयाः तुम्हीं निश्चिंत काइ?’’ डखला म्हणितलें: ‘‘जीः आम्हीं न वचो जीः’’ चांगदेवोभट गोसावियांजवळी बैसले असतिः तें एळापूराउपरि कोठें आले होतें तें नेणिजेः चांगदेवांभटासि पोटीं जावें जावें ऐसें होतेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हुं: चांगोः हें कव्हणी न वचति तूं जाये तूं तर्‍िह आदि होएः आगवली काढा पां:’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि चांगदेवोभट धोत्र खांदावरि घालुनि निगालेः तवं बाइसीं म्हणितलें: ‘‘ते कव्हणी न वचतीचिः तरि यातें कां पाठवीत असिजे बाबा?’’ गोसावी उगेचिः बाइसें नावेक कोमाएलीं होतीं: मग उदास्य परिहरलेयावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एथ प्रतिदीनी करा तें कां न कराः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हो कां बाबाः’’ मग गोसावियासि पूजावसर जालाः आरोगणा जालीं: दुसरां दिसीं: सर्वज्ञें म्हणितलें ‘‘हां गाः तुम्ही अवघे राहिलेतः आणि तो बटकु एकला गेलाः तुम्ही कां न वचाचि?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जी आम्ही न वचोंचिः तो गेलाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं कव्हणीं न वचा तरि चांगेयाचि काइ केलें? डखलेया जाः चांगोतें बोलावाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि डखलां दंडवत केलें: निगालेः गोसावी सरिसी लोहवी जाडी दिधलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे जाडी घेयाः जेथ राहाल तेथ आडवी बांधावीः’’ ‘‘हो कां जीः’’ तवं बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः तो बटिकु कालि गेलाः हा आजी जाइलः मां तो यांसि कोणी ठाइ भेटैल? बाबाः तो काइ यांसि भेटतु असे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाओ कां बाइः याची यात्रा काइ निर्फळ जाइल? बापुडी बटिकें डोंगरें डोंगरू लंघितें झाडां खेवें देतें येतें असतिः वारेनि पानरटें जाति ऐसीं यातें सोधितें असतिः गिवसीतें असतिः ‘एथचें दरीसन घेयावेः मग गावां जावेः’ ऐसा परिछेदु केला असे बाइः’’ मग तें नमस्कारु करौनि निगालेः मग डखले गेलेः तें चांदोरिये आलेः तवं तेथ चांगदेवभट भेटलेः तेहीं म्हणितलें: ‘‘कोण गा येत असे?’’ तवं डखला म्हणितलें: ‘‘आगा चांगोः गोसावी तुम्हापासी पाठविले असेः’’ तेही तेथ अग्निष्टीकेसि राहिलेः अग्निष्टीके लोहवी जाडी आड बांधलीः आणि तेथ पाठी घातलीं :।।:
  • (टिप – येथे स्वामी दुसर्यांदा आले. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात यावेळी त्र्यंबकेश्वरवरुण आले असताना पंचवटिये गुंफेत अवस्थानास तीन दिवस थांबले. तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila – 258
  • Nashik : उपाध्यां: नाथोबा भेटि :।।:
  • तवं एरीकडें उपाध्यां: नाथोबासि पर्वाकारणें न टकेचिः तें बळ्हेग्रामुनि निगालेः गोसावियांतें गिवसीत येत असतिः गोसावी श्रीनगरीं राज्य करित असति म्हणौनि श्रीनगरा आलेः तंव गोसावी तेथौनि बिजें केलें: भिलमढीं संन्यासी एक राहिले होतेः तयातें पुसिलें: ‘‘एथ आमचे गोसावी होतें कीं?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘काइ कराल गोसावी? गोसावियांतें काइ ब्रम्हविद्या पुसाल? ब्रह्मविद्या तरि आम्हीं सांघौनिः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘आम्ही काइ तुमतें ब्रह्मविद्या पुसत असों: आम्हीं आपुलेयां गोसावियांतें पुसत असों:’’ तवं तेहीं म्हणितलें: ‘‘कैसीं गा बटिकुरें चाळविली असति? वेधिली असतिः’’ ऐसें वेळां तीनि उपाध्यी नाथोबासीं संन्यासीयातें पुसिलें: आणि संन्यासीहीं वेळा तीनि तैसेचि म्हणितलें: मग तेही चैथीये वेळे म्हणितलें: ‘‘तरि आम्हासि दंडवत करा मां सांघौनिः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘आधी सांघाः मग दंडवते करूनीः’’ संन्यासीये म्हणितलें: ‘‘कैसी गा बटिकुरें आग्रहाचीः’’ तेंही एकमेकांचीया तोंडाची वास पाहिली आणि म्हणितलें: ‘‘दंडवतासाटी जरि गोसावियांतें सांगति तरि दंडवत कां न करूं:’’ मग दंडवत केलें: संन्यासीये म्हणितलें: ‘‘जाः तुमचें गोसावी सत्रसिंगा गेले असतिः’’ निगालेः मग विचारिलेः उपाध्यी म्हणितलें: ‘‘नाथोः डोंगरांतु जाओ नेः तरि चांदोरिये पांगुरणें ठेवूं: धड वस्त्र ठेवूं: फाटकी वस्त्र पांगरों: मग सत्रसिंगासि जावोः जरि न भेटति तरि पाठ कोडें बांधौनि मग जावों: आपुलेया गोसावियांतें झाडोझाडी गिवसूः पाहोः’’ म्हणौनि चांदोरिये आलेः गंगेसि जवं गेले तवं अग्निष्टीकेसि गोसावियांची जाडी देखिलीः आणि म्हणितलें: ‘‘हे जाडी गोसावियांची नव्हे? हें तरि गोसावियांचीः तरि काइ गोसावी एथ राज्य करित असति?’’ म्हणौनि सामोरे आलेः तवं तेथ डखले हांसत हांसत लावलेणेया आतुनि बाहीरि निगालेः डखलेया भेटि जालीः तेयांसि खेवं दिधलें: ‘‘हे काइ गा डखलेयाः चांगदेवभटोः गोसावी कव्हणी ठाइं असति?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘ना गोसावी नासिकीं राज्य करीत असतिः चालाः चालाः तुमतें गोसावी बोलाउ पाठविलें असेः सामोरें पाठविलें असेः’’ डखलेयासि आश्चर्य जालें: मग डखला म्हणितलें: ‘‘ऐसें गा आमचे गोसावीः आपुलें ऐश्वर्य असौनि लोपीतिः मां ऐसें कां न म्हणावें? आमुके येतांति तया साउमे जाः’’ ऐसें गोसावियांचे गुण अन्यमोदूं लागलेः तैसेचि तें चैघही निगालेः नासिका आलेः उपाध्यां: नाथोबाः भेटि जालीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: मग मागील अवघे वृत्तांत सांघितलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देखिलें कीं बाइः भगवे ऐसें म्हणतिः जे ‘बापुडीं बटिकुरें चाळविलीं आहातिः’’ पुनति गोसावी पुसिलें: ‘‘मग मग बटिकाः कैसें कैसें म्हणें भगवा?’’ उपाध्यी तैसेचि सांघितलेः मग गोसावी मागौतें पुसतिः उपाध्ये मागौतें तैसेचि सांगतिः ऐसें वेळां तीनि पुसिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देखिलें बाइः बटिकुरें पुसति यातें: तो यांसि सांघे ब्रम्हविद्याः कैसें जालें: कैसी बापुडी ब्रह्मविद्याः सुपें सूनि विकिजत असिजेः’’ मग गोसावी ब्रम्हविद्येचें तथा अवरविद्येचें बरवें निरूपण केलें :।।:
  • (टिप – येथे स्वामी दुसर्यांदा आले. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात यावेळी त्र्यंबकेश्वरवरुण आले असताना पंचवटिये गुंफेत अवस्थानास तीन दिवस थांबले. तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila – 259
  • Nashik : नाथोबा केसदरीसनी वीस्मो :।।: / नाथोबा केशदरीसनी परिहारू देणें :।।:
  • चांगदेवोभटां भिक्षा करितां बाइलीं देखिलें होतें: मग नाथोबा गाउनी आलेः गोसावियांसि उदेयाचां पूजावसरू जालेयानंतरें गोसावी विहरणा बीजें केलें: सरिसे नाथोबा असतिः गावाउत्तरे कपाळेस्वरांदक्षिणें गुंफेपासी पूर्व रामनाथापसिमें तेथ आंबेंयातळीं गोसावियांसि आसन जालें: तेथौनि गोसावी गंगेकडें परिश्रया बिजें केलें: तवं सागळ घेउनि सरीसे नाथोबा होतें: तवं पाणिव्यथां बाइलीं देखिलें: ‘‘आवो आवो माः कालिचि बटिकु बोडिका कीं: कालीचि याची डोइं बोडिली आणि आजीचि एवढे केश काइसेनि जालेः’’ ऐसा विस्मयो केलाः गोसावी उभेया राहुनि उत्तर दिधलें: ‘‘बाइः तो हा नव्हेः तो याचा भाउः हें दोघे सारिखेचिः जावळाचे भाउः तो गावां गेला होताः तो भागला म्हणौनि घरी राहिलाः आणि हा आजी गाउनी आलाः इतुलेनि तयाचे अन्यथाज्ञान फिटलेः विस्मयो गेलाः आणि गोसावी बिजें केलें :।।:
  • (टिप – येथे स्वामी दुसर्यांदा आले. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात यावेळी त्र्यंबकेश्वरवरुण आले असताना पंचवटिये गुंफेत अवस्थानास तीन दिवस थांबले. तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila –
  • Nashik : पंचलिंगीं आसन :।।:
  • (संपुर्ण लीळा नाही.)
  • ((टिप – नासिकला हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे सिन्नरवरुण आले असताना स्वामींचे नासिकला १० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा. संपुर्ण लीळा नाही. फक्त यादि आहे..)
  • Purvardha Charitra Lila –
  • Nashik : नासिकीं महालक्ष्मिये वसतिः तथा काळिकें वसति :॥:
  • गोसावी तेथौनि नासिकासि बीजे केले : तेथ महालक्ष्मियेचा चौकी आसन जालेः बाइसीं श्रीचरण प्रक्षाळिलें: आरोगणा जाली : गुळुळा जालाः विडा जालाः पहुड जालाः नगरांतु काळीकेचे देउळ पुर्वामुख तेथ वसति जाली :॥:
  • (टिप – नासिकला हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे सिन्नरवरुण आले असताना स्वामींचे नासिकला १० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila –
  • Nashik : नासिकीं नगरांतु वसति :॥:
  • उदयाचा पूजावसरु जालेयानंतरे गोसावी नासिकासि बीजे केले : तेथ नगरांत काळीकेचे देउळी वसति जाली :॥:
  • (…येथे स्वामी दुसर्यांदा आले. स्वामी यावेळी त्र्यंबकेश्वरवरुण आले असताना नासिकला गावात वसतिस थांबले)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: