Nandur Madhymeshwar (नांदूर मध्यमेश्वर)

नांदूर, ता.निफाड, जि. नाशिक


येथे 5 स्थाने आहेत - नांदूर गावाच्या पश्चिमेकडे 1.50 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर बांधाजवळ मध्यमेश्वर महादेव मंदीरातील लिंग नमस्कारी आहे हे 1 स्थान, व सभामंडप/चौक म्हणजे दुसरे स्थान होय. तीसरे आणि चौथे स्थान महादेव मंदीराच्या परिसरात आहेत. नांदूर गावाच्या पश्चिमेकडे असलेल्या मंदीरातील वसती स्थान म्हणजे पाचवे व नांदूर मधील मुख्य स्थान.


जाण्याचा मार्ग :

नांदूर हे गाव, निफाडहून आग्नेयेस 11 कि.मी. आहे. शिवऱ्याहून दक्षिणेस नांदूर 5 कि.मी. आहे. शिवऱ्याच्या स्थानापासून दक्षिणेस नांदूर बंधारा 6 कि.मी. आहे. नांदूर येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथ तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


गावाबाहेरील मध्यमेश्वर मंदिराकडील स्थाने :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील 2 स्थान, क्रमांक 1 व 2)

स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान नांदूर गावाच्या पश्चिमेस 1.50 कि.मी. अंतरावर बंधाऱ्याजवळ गोदावरी नदीच्या दक्षिण काठी मध्यमेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. चौक डाव्या हातावर आहे व आता तेथे ओटा बनवलला आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात निफाडहून प्रथम येथे आले. त्यांना देवळाच्या चौकात आसन झाले. पूजा, आरोगणा झाली. पहूड, उपहड झाला. सायंकाळच्या वेळेस सर्वज्ञ येथून नांदूर गावात गेले. (पू. ली. 269, स्था. पो.)


2. मध्यमेश्वरा विडा वाहणे स्थान :

हे स्थान देवळाच्या गाभाऱ्यात आहे व मध्यमेश्वराचे लिंग नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञांनी लिंगास श्रीकराने स्पर्श केला. मग विडा वाहिला. (पू. ली. 269, स्था. पो.)

विशेष : परमेश्वर अवताराने लिंगाला विडा वाहण्यामागचे कारण म्हणजे, परमेश्वरांनी ज्याच्या पतित देह स्वीकारला होता त्या हरीपाळ देवाचा पंचलिंगी पूजा करण्याचा मनोदय परमेश्वर पुर्ण करीत होते. तसेच अचलपुर चा अंबीनाथ, त्र्यंबक चा त्र्यंबकेश्वर, नांदुर चा मध्यमेश्वर, आपेगाव चा विज्ञानेश्वर आणि ब्राह्मणी चा घटसिद्धनाथ अशा पाच लिंगाना परमेश्वरांनी विडा वाहीला होता. अर्थात परमेश्वर ज्या ठिकाणी जडत्वाचा जीव घातलेला असेल अशाच लिंगाला श्रीकराने स्पर्श करून विडा वाहत असत. त्यामुळे हरीपाळच्या इच्छापूर्ती बरोबरच तेथील जीवाला संबंधाचे दान होत असे आणि तेथील देवतेलाही आल्हाद लाभत असे.

3. चासी, जळक्रीडा स्थान :

हे स्थान मध्यमेश्वराच्या देवळाच्या आग्नेयेस 450 फुट अंतरावर गोदावरी नदीच्या चासात आहे.

लीळा : सर्वज्ञांनी उपाध्ये, नाथोबा, डखले या भक्तजनांच्या समवेत या चासामध्ये जळक्रीडा केली. (पू. ली. 267, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. गंगेच्या दोन फाट्याचा संगमी शिळातळावरील आसन स्थान/नाथोबापिते ग्रहनिवृत्ति स्थान :

हे स्थान मध्यमेश्वराच्या देवळाच्या ईशान्येस 310 फुट अंतरावर गोदावरी नदीच्या दोनही फाट्याच्या संगमावर उतारावर आहे.

लीळा : सर्वज्ञांनी भक्तजनांच्या समवेत या चासामध्ये जळक्रीडा करत असताना नाथोबा ची ग्रहनिवृत्ती केली होती. (पू. ली. 268, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. वसती स्थान :

हे स्थान नांदूर गावाच्या पश्चिम विभागी उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 270, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून कानळसला गेले.

वसती स्थानाच्या पूर्वेचे व ईशान्येचे स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. लघु परिश्रय स्थान.

2. देवळाच्या नैर्ऋत्येचे परिश्रय स्थान.


नांदुरची एकूण स्थाने : 7


  • Purvardha Charitra Lila – 267,268
  • Nandur : नांदौरीं जळकृडा :।।: / चासीं जळक्रीडे नाथोबोपीतिये ग्रहोनिवृत्ति :।।:
  • तेथौनि गोसावी नांदोरा बिजें केलें: मध्यमेस्वरीं आसन जालें: बाइसें उपहारू निफजउं लागलीः तवं गोसावियांसि जळक्रीडेची प्रवृत्तिः मध्यमेस्वराआग्ने चासः तेथ दों पाहारां बिजें केलें: मध्यमेस्वरापासी डोहो होताः तेथ गोसावी चरणचारी उभे राहिलेः आणि भक्तिजनातें म्हणितलें: ‘‘या गाः या गाः पव्हों: हें तुम्हासि सिंपेलः आणि तुम्ही यातें सिंपाः हें तुम्हासि सिवैलः तुम्ही यातें सिवाः’’ तेही म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ गोसावी पांगुरणें कडें ठेविलीं: गंगेआंतु रीगालेः एरातें डवंचलेतिः एरांतें डवचलेतिः उपाध्येः नाथोबाः डखलेः ऐसें जळक्रीडा/कृडा खेळत होतेः खेळता गोसावी आंवघेयातें टाकुनी धरीतिः तवं एक बुडकळी देतिः एक पळतिः तयातेंही गोसावी बुडकळी देउनि टाकीतिः ऐसें समस्तातें धरीतिः मग गोसावी भक्तिजनातें म्हणितलें: ‘‘आतां तुम्हीयातें सिवाः’’ म्हणौनि गोसावी बुडकळी देउनि बिजें करीतिः तें गोसावियांतें टाकावया धांवतिः परि गोसावी टाकतिनाः ऐसा गोसावी खेळु मांडिलाः गोसावी थडीयेसि बिजें केलें: आणि कवतुकेंचि म्हणितलें: ‘‘बाइः आतां हें न येः आतां हें ऐसेचि जाइलः’’ मागौती थडीयेवरूनि उडी घातलीं: आणि भक्तिजनीहीं उडीया घातलीयाः भक्तिजनासहित पव्हत पव्हत थडियां थडियां बिजें केलें: तवं बाइसें एरी थडिया थडिया बोंबातिः ‘‘पूरें किजो बाबाः आरोगणे उसीर जालाः हां गाः डखलेया गोसावी जाति?’’ तवं डखलांही म्हणितलें: ‘‘बाइः गोसावी न येतिः तुम्हीं जाः आम्हीं आणि गोसावी ऐसें पव्हत पव्हत पैलाडी जाउनिः पैली गावीं भिक्षा करूनी गोसावियांसि आरोगणा देउनिः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘पोरा डखलेयाः उगा अससि कीं नससिः’’ मागुतें बाइसीं गोसावियांसि विनविलें: ‘‘पूरों दीजो बाबाः’’ आणि मागौतें तैसेचि डखले म्हणतिः म्हणौनि मागुतें बाइसें कोपतिः मग बाइसें सावियांचि बोबावो लागलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां पूरें करा गा डखलेयाः आतां बाइसें सिनतें असतिः आतां पूरे गाः’’ मग गोसावी पूरे केलें: गंगेचां दोहीं फाटेयाचां संगमीं सिळातळः तयावरि आसन जालें: तवं चरणचारी उभेया :।।: ठाकौनि दोन्ही श्रीचरण जोडिलेः दोही श्रीचरणावरौतें पाणी होतें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बल्हेग्रामी ग्रहो बहुतः’’ उपाध्यीं म्हणितलें: ‘‘हो जीः बळ्हेग्रामीं ग्रहो बहुतः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाः बोलावा गा मंडळीकातें: तयाचे पीतें ग्रहो जालें असतिः तें एथौनि मुंचविजत असिजेः’’ उपाध्ये नाथोबाते बोलाउ गेलेः उपाध्यीं म्हणितलें: ‘‘नाथो उठी उठीः तुझा पीता पुरूखोत्तम तो ग्रहो जाला असेः गोसावी मुंचउं पाहात असतिः’’ नाथोबा आलेः आणि गोसावी नाथोबातें म्हणितलें: ‘‘मंडळीकाः एथ एक स्नान करा गाः आपुलेया पीतयाचिये वरिची एकीं बुडी अधिक देयाः’’ तवं नाथोबायें म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग नाथोबायें श्रीचरणांखाली स्नान केलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुमचे पीते ग्रहो जालें असतिः तें ग्रहत्वापासौनि मुंचविले होः’’ नाथोबाए म्हणितलें: ‘‘जीः’’ उपाध्यीं म्हणितलें: ‘‘नाथोः या चरणारविंदाचेनि प्रसादें पुत्रत्वासी उत्तराइ जालासिः’’ गोसावी वस्त्रें नेसले होतें: तियें दोही श्रीचरणावरि पिळीलीः वस्त्रें वेढिलीं: मग बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात नासिक-अडगाव-सुकिणां-निफाड वरुन नांदौर येथे आले. पुढे स्वामि सुरेगांवकडे निघले तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila – 269,270
  • Nandur : नांदौरीं मध्यमेश्वरा विडा वानेः आदित्यीं वसति :॥:
  • गोसावी मध्यमेश्वरा बीजे केलेः बाइसाता विडा पोफळ मागितलेः बाइसीं उपाध्याचां हातीं दिधलेः मग गोसावी दोन्ही द्वारसंका धरुनि भितरी प्रवेसलेः मध्यमेश्वरा विडा वाईलाः माधाणेंचेनि उदके लिंगसिंचन करुनी विडा प्रक्षाळुनी स्वकरे विडा वाईलाः उपाधीं मंत्रु म्हणीतलाः गोसावियांसि चौकी आसन जालेः मग उपाध्याते तथा नाथोबातें म्हणीतलेः तुम्ही मध्यमेश्वरा विडा वा गाः उपाध्यी तथा नाथोबाये वायीलाः मग गोसावियांतें चौकी पूजावसरु जालाः आरोगणा जाली : गुळुळा विडा जालाः पहुड उपहुड जालाः गोसावी विळीचाचा वेळी गांवातु बीजे केलेः नांदौरीं आदित्यीं चौकी वसति जाली :॥:
  • (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात नासिक-अडगाव-सुकिणां-निफाड वरुन नांदौर येथे आले. पुढे स्वामि सुरेगांवकडे निघले तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila –
  • Nandur : उपाध्यां नाथोबा पाठवणी :।।:
  • मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मंडळीकाः तुम्हीं आणि बटिक गावासि जाः तुमची कुटुंब अवसर करिते असतिः तयांसि वरो घालाः मग मागौते याः’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि दोघै उठिलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें गोसावी बाइसाकरवी सिदोरि घालविलीः मग निगाले :।।:
  • (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात नासिक-अडगाव-सुकिणां-निफाड वरुन नांदौर येथे आले. पुढे स्वामि सुरेगांवकडे निघले तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila –
  • Nandur : नाथोबा मंडळीक नामकरण :।।:
  • गोसावियांप्रति समयोचिती नाथोबा राजवार्ता करीतिः वर्तमानीचे अथवा पूराण संगतीचे राजे मंडळीकः तयांचीया सुखवार्ता यशकीर्तिवंत तयाचीया गोष्टि गोसावियांपुढा समयोचिती सांघेतिः एकु दीं नाथो कोरोचेया घरा रायांचे मंडळीक आले होतेः तयाची गोष्टि गोसावियांपुढां सादर होउनि सांघितलीः ‘‘जी जीः मीं एकु दी देइंगावांसि गेला होताः तवं तेथ नाथो कोरा तथा कान्हों कोराः तें दोघै भाउः तयाचेया घरा महादेवरायाचें मंडळीक दोघै आले होतें: तें ऐसें बैसतिः ऐसें उठीतिः ऐसें बोलतिः ऐसें ठाकेतः’’ गोसावी प्रसन्न होउनि परिसिलीः सांघों सरलीः आणि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ते तेथीचे मंडळीकः तरि तुम्हीं एथचे मंडळीकः’’ ऐसें प्रसादाचें नाम ठेविलेः मग गोसावी तयातें तेणेंचि नामें बोलावीति :।।:
  • (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात नासिक-अडगाव-सुकिणां-निफाड वरुन नांदौर येथे आले. पुढे स्वामि सुरेगांवकडे निघले तेव्हाची ही लीळा.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: