Nanded Sthan (नांदेड स्थान)

नांदेड ता.जि.नांदेड


येथील 2 स्थाने 2 ठीकानी आहेत -
येथील प्रथम भांडारेकर शीक्षापन स्थान - जुन्या नांदेड शहरातील जुन्या पूलाजवळ (ब्रम्हपूरी मोहल्ला) मोठे मंदीर आहे. खाली तळघरात स्थान आहे.
येथील दुसरे गोरक्षण स्थान - जुन्या नांदेड शहरातील जुन्या पूलाचे खालचे भागस भव्य खडक म्हणजेच स्थान होय, येथे मंदीर नाही.


जाण्याचा मार्ग :

नाळेश्वर ते नांदेड 11 कि.मी. औरंगाबाद ते नांदेड 263 कि.मी. जालना ते नांदेड 198 कि.मी. परभणी ते नांदेड 63 कि.मी. माहूर ते नांदेड 142 कि.मी. मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील नांदेड हे रेल्वेस्थानक आहे. नांदेड बस स्थानकाजवळील सिटी बस स्टॉपवरून सिडको, हडको, एम.आय.डी.सी. तुपा इत्यादी जुना पूलमार्गे जाणाऱ्या सिटी बसने खुदवेनगर स्टॉपवर उतरणे. तेथून स्थान जवळ आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान नांदेड शहरातील ब्रह्मपुरी या विभागात जुन्या पुलाच्या पश्चिमेस गोदावरी नदीच्या उत्तर काठावर भुयारातील पूर्वाभिमुख देवळात आहे. भुयारात उतरण्यासाठी उत्तर बाजूने 13 पायऱ्या आहेत.


लीळा : 1. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकामध्ये अचलपूरहून नांदेडला आले. त्यांच्या सोबत निळभट भांडारेकार होते. सर्वज्ञांचे या ठिकाणी 15 दिवस वास्तव्य होते. (पू.ली. 49, स्था.पो)

2. पटीशाळेनिमित्त भांडारेकारांना शिक्षापण करणे (पू.ली. 50)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

भावेश्वर अवस्थान स्थान

2. गाई राखणे स्थान :

हे स्थान जुन्या पुलाच्या पूर्वेस एक फर्लाग अंतरावर गोदावरी नदीच्या उत्तर काठाला लागन आहे. हे स्थान म्हणजे मोठा नमस्कारी खडक आहे. हे ठिकाण ‘गोरक्षण’ या नावाने प्रसिद्ध आहे. या स्थानावर अद्यापही मंदिर बाधण्यात आलेले नाही, जवळच मुसलमानाची मजार आणि दर्गाह आहे, त्यामुळे कुटील राजकारणी येथे त्यांच्या पक्षाने बोलतात, व धर्मनिरपेक्षतेचा गळा घोटतात. सविस्तर माहिती खाली दिलेल्या Youtube लिंक मध्ये आहे.


लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू ब्राह्मणाच्या गाई घेऊन येथे येत असत. ते दिवसभर या खडकावर बसत. सर्व गाई भोवताली बसून त्यांची श्रीमूर्ति अवलोकन करीत असत. सायंकाळच्या वेळेस सर्वज्ञ गाई घेऊन परत ब्राह्मणाच्या घरी जात. अशा प्रकारे १० दिवस सर्वज्ञांनी ब्राह्मणांच्या गाई राखल्या. (पू.ली. 60, स्था.पो)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

द्विजगोरक्षण

हे द्विज गोरक्षण स्थान 800 वर्षांपूर्वी परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींनी या ठिकाणी ब्राह्मणाच्या गायी राखल्या. गायींना स्थित्यानंद दिला. अतिशय पवित्र समस्त हिंदू समाज व नांदेड साठी भुषण असलेले ऐतिहासिक, पौराणिक श्रद्धास्थान. पण समाजकंटकांनी वारंवार विटंबना केली. दि. 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2013 मधे या ठिकाणी अखंड गीतापाठ व नामस्मरण घेतले असता 27 जानेवारी ला आमचा शामियाना जाळण्यात आला. स्थानावर दगडांचा वर्षाव झाला, शेण लावले शी केली व कळस म्हणजे हैदराबाद बॉम्बस्फोटानंतर दुसरे दिवशी हिरवे लावले संबंध स्थान हिरवे केले. असे असूनही गुन्हेगार राजरोसपणे फिरतात पण भक्तांवर मात्र अन्याय सतत होत राहतो कारण महानुभाव पंथ शांत आहे सोशीक आहे. मानवी हक्कांची सरळ पायमल्ली होतांना दिसत असुनही कुणाला याचे काही नाही. इतिहास संशोधक श्री तात्यासाहेब कानोलेंनी त्यांच्या रिसर्च जर्नल्स मधेही स्वामींच्या नांदेड व परिसरातील सर्व लिळा समाविष्ट केल्या आहेत, पण पाहतो कोण? हिंदूंच्या भावनांची कदर केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. अगदी जवळचा रस्ता असुनही तीन कि. मी. दुरुन ल फुटलेल्या बंधाऱ्यावरुन गाडी घेऊन कसे जायचे भक्तांची श्रद्धा लक्षात घेऊन काही कार्यक्रम असेल तर त्यांच्याशी अरेरावी करावी की सहानुभूतीपूर्वक व्यवहार असावा याचे कुणी उत्तर देईल. कुठल्याही देवस्थानाची नियमानुसार पुजा अर्चना व्हायला हवी की नाही? त्यासाठी रोज परवानगी तीही कलेक्टर ची घेणे शक्य आहे का. आत्ता खुप अत्ती झाली आमच्या दैवतावर आत्ता गप्प बसायच नाही. राजकारण्यांनो नांदेड हे पुरातन शहर परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. द्विज गोरक्षण स्थान हे महानुभावीय तिर्थस्थान आहे तुम्हाला कधीच कुणालाही त्याची आठवण आली नाही स्थानाची वारंवार विटंबना झाली याचे काहीच वाटले नाही. तेथे दर्शनासाठी परवानगी लागते. रस्ता तीन कि. मी. दुरुन आहे. मानवी हक्कांचे अवमूल्यन आहे.

अनुपलब्ध स्थाने :

1. पिंपळाखालील आसन स्थान.

2. परिश्रय स्थान.

3. खीरारीया नेत्रपतन स्थान.

4. गोवारीच्या घरी अवस्थान स्थान.

5. ब्राह्मणाच्या घरी अवस्थान स्थान.

6. नंदेश्वरी अवस्थान स्थान.


नांदेडची एकूण स्थाने : 8


  • Purvardha Charitra Lila – 49
  • Nanded : नांदीयेडीं भावतीर्थि अवस्थान :।।:
  • गोसावी तेथौनि नांदीयेडा बिजें केलें: तेथ पहिला दिसीं चंडीके वस्ति जालीः मग बहीरवीं आसन जालें: गावांपूर्वे भावतीर्थि नृसिहांचां उत्तराभिमुख देउळीं सा मास अवस्थान जालें: उत्तरदक्षिण दोनि ओटेः रीगतां डावेया हाता ओटाः तेथ गोसावियांसि पहूडु होएः तया ओटयावरी अवस्थानः उजवीएकडें वाटेसमीप ओटयाखाली भांडारेकार असतिः भांडारेकार भिक्षे जातिः तें गोसावियांसि आरोगणा होए :।।:
  • Purvardha Charitra Lila – 50
  • Nanded  :  पटिशाळनीमीत्ये भांडारेकारां सीक्षापण :।।: / भांडारेकारां पटिशाळपतन श्रवणें भिक्षानिषेदु :।।:   
  • एकु दीं भांडारेकार भिक्षें गेलेः तवं नवी पटिशाळ व्यवहारेनि एकें केंली होतीः तियेसी उद्यापन केलें नाहीं: म्हणौनि तियें दिसीं देवता पटिशाळेवरि एकी उभिया होतियाः एकी खांबेसि झोंबत असतिः भांडारेकारीं देखिलें आणि पहातचि राहिलें: तवं हांदोळविंदोळ केलीः पटिशाळे लेंकरूवें पढतें होतीं: तयांतु थोरलेही चाटे होतेः भांडारेकारी तें पटिशाळ पडित देखिलीः तें पडावी जवं तवं म्हणितलें: ‘‘आरे आरे बटकुरें होः बाहीरि निगाः पटिशाळ पडतायेः परते परते सराः पटिशाळ पडिलीः पडिलीः’’ तें पंडित आणि लेंकुरवें अवघीं पाट घेऊनि पळालीं: बाहीरि निगालीं: आणि पैर्‍हां उभे ठाकतिना तवं पटिशाळ धडैकरि रीचवलीः लोकासि थोर आश्चर्य जालें: अवघे आपुलालेया घरा गेलेः लेंकरूवे आपुलेया माबापापुढां सांघो लागलीः ‘‘आजी आमतें एही महात्मा राखिलेः एर्‍हवी आम्हांवरि पटिशाळ पडतिः तरि अवघेयाचा दबका होताः’’ तियें मायबापे काकुलति आलीः तेहीं म्हणितलें: ‘‘हे पुरूख साक्षात नरसिंह होतिः’’ मग भांडारेकारीं भिक्षा केलीः घरोघरीं नेतिः जेथ जाति तेथ पाटपीढीं चैरंग बैसावेया घालीतिः पाय धुतिः दंडवते करीतिः गंधाक्षता टिळा माळ तांबुळेंसीं बरवी सोपस्कर भिक्षा देतिः दंडवतें घालीतिः अपार आवाहन विसर्जन करीतिः मग तें संतोखेसि गोसावियांएउते आलेः गोसावियांसि नृसिहांचां चैकीं आसन असेः गोसावी तयांतें येत देखिलें: आणि भृभंगी नेत्रांचीया खुणा पुसिलें: मग गोसावियांपुढां तिहीं शंकत शंकत मागिल वृतांत सांघितलेः आणि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां होः तुम्ही दृष्टपातु दृष्टघातु चुकविलाः आता अदृष्टासि काइ कराल?’’ भांडारेकारी म्हणितलें: ‘‘तें गोसावीचि चुकवितिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एणें तुमतें वर्जिलें होतें कीं: जें तुम्हा कांहीं एक स्फूरैलः तेयाचा अनुवादु न करावाः जिभें टिभा घालावाः तुम्हीं लोहें पाणी ग्रोसलें ऐसें होआवें कीं:’’ भांडारेकारी म्हणितलें: ‘‘जी जीः मज बोलु लागला?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां हो तुम्ही तेयाचीयां आहारा आड आलेति कीं:’’ ऐसें गोसावी कोपलेः सर्वज्ञें म्हणितलेः ‘‘हां गाः ऐसेंही करितां लोकु न भजोः तुम्ही महात्मे कीं गाः ऐसें न किजे कीं: महात्मेनि होतें पूजापूरस्कार न स्वीकरावे कीं गाः तुम्ही आपणपें प्रकाशाल तरि कां गा लोकु मानु न करि? पुरूख आपणपें प्रकाशीनातरि तयाचि कव्हणी वासही न पाहेः हां गा दृष्टीं काइ अदृष्ट असे?’’ ऐसां तीं प्रमाणी शिक्षापिलें आणि म्हणितलें: ‘‘तुम्हां ऐसेचि होआवें? तरि तुम्हां ऐसेचि होइलः परि हें नव्हेः’’ आणि कांटाळैलेः मग विनविलें: ‘‘ना जीः ऐसें मज न व्हावें: आजीलागौनि मीं ऐसें न करीं: जी जीः मज तेणें काज नाहीं: मज ऐसें न व्हावें: मज गोसावीचि होआवेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आजीलागौनि ऐसें न करा तरि पूजापूरस्कारू नव्हेः तुमचें एथ गार्‍हाणें आले होतें:’’ आणि अनुतापलेः मग गोसावी आश्वासन दिधलें: अपराधाची दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: परि अनुचिताचें शल्य अंतःकरणी वाहातचि होतें: हें लीळा गोसावी निवासां मंडळीक देवता तीरस्कार प्रसंगी बाइसाप्रति सांघितली :।।: (टिप: नांदेडला स्वामी दुसर्यां दा आले.)
  • Purvardha Charitra Lila – 51
  • Nanded : (भांडारेकार) शुश्रुषावीधि स्वीकारू :।।:  
  • भांडारेकारां सोळा वरिखें सन्निधानः एकु दीं भांडारेकारां अशक्ति उपनलीः मळप्रवृत्तिचा उपद्रो जालाः देह थोर तुटलें: बडवे पथ्य आणीतिः कदाचित गोसावी आणीतिः पहिलें आपणचि येति जातिः मग गोसावी श्रीकरू देतिः बाहीरि नेति आणीतिः तयासि भिक्षा न करवें: मग गोसावी नगरांतु पाणिपात्र करीतिः तें भांडारेकारां सीतपथ्य देति मग गोसावी आरोगणा करीतिः तया उठवेनाः ऐसें तेयांचेया एरझारांचे दुःख देखौनि गोसावी तेयांची शुश्रुषा करीतिः आपुलेनि श्रीकरें बाहिरती फेडीतिः तेयांची वस्त्रे आपुलें श्रीचरणवरि धुतिः मागौती पांगुरवीतिः सावयाचि गंधी सुटलीः तें बडवे आणि ब्राम्हण नावेक खंती करीति आणि संन्यासी तेथ जपत होतेः तें खंती करीतिः तें देउळ भोगस्थानः संमर्दाचें स्थानः उपाधीक देवालयः म्हणौनि गोसावी तेथौनि बीजें केलें: गोसावी श्रीमूर्तिचा लागु देउनि पैलाडी नंदेस्वरा नंदाटेकासि नेलें: तेथ त्रिरात्र अवस्थान जालें :।।:
  • Purvardha Charitra Lila – 51
  • Nanded : भांडारेकारां देहाअवसान :।।: / तथा देहावसानी उसीसां जानु देणें :।।:
  • मग तयांसि देहावसान मांडलें: कलशु ढळेः मग भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘जी जीः मज उसिसां मांडी देयावीः’’ गोसावी मांडी उसिसेया दिधलीः तवं डोळेयाचे वाट भवंतातीः मां तेव्हेळी गोसावी तेयाचेया तोंडाचिकडें अवलोकीत होतेः मां काइ चितां वाहिली तें नेणिजेः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटोः काळवंचना करूं?’’ भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘ना जीः’’ आणि गोसावियांचें श्रीमुख एकाग्र अंतःकरणे अवलोकित होतें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटोः काळवंचना एकीं असे तें किजे ना कां? तें अंगिकरालः मां द्वापरीचा आउक्ष देइजैलः’’ भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘ना जीः हें सन्निधानः जानूं उसिसा येइल?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘अन्यत्र होइलः परि हें नव्हेः’’ भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘तरि पूरे जीः आतां देह जाये तरि बरवें: मग ऐसीं उसिसां मांडी कैचीः ऐसें गोसावियांचे सन्निधान कैचें:’’ तवं गोसावियांते बहुत स्तविलें: आणि म्हणितलें: ‘‘जे होआवें तें आतांची हो जीः’’ मग मांडी उसिसें करौनि श्रीमुख अवलोकीत देह त्यजिलें: मग गोसावी तयांसि राणेयांकरवी तियेची पाणिवठां जळनिक्षेपु करविलाः ऐसें तें सभाग्यः हे गोष्टि सांगितलेयावरि सर्वज्ञें म्हणितलेः ‘‘बाइः मग यांसि तेथ राहावेचिनाः मग हें तेथौनि निगालें: कोण्हासि कोण्हाचें दुखः कोण्हासि कोण्हाचें दुःखः यांसि तया ब्राम्हणाचें दुःखः’’ यावरि गोसावी तिसरिये विरहिणीचां दृष्टांत निरूपीलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कव्हणीं एकीं जरठ विरहिणी असेः तियेसि चंदन तैसा चिखलः अन्न तैसी मातीः साखर तैसी धुळीः तैसें परमेस्वरेवयोगें विरहिया पुरूखासी अन्य पदार्थ तैसें परमेस्वरसंबंधीये वासनिक भिक्षु शास्त्र प्रसाद स्थानः’’ :।।: (टिप: नांदेडला स्वामी दुसर्यां दा आले.)
  • Purvardha Charitra Lila – 60
  • द्विजगोरक्षण :।।: / द्विजगोरक्षणी सामथ्र्य प्रकाशु :।।:
  • सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे नांदीयेडासि गेलेः तेथ यांसि अवस्थान जालें: दिस दहाः गोसावी गावीं एकी ब्राम्हणा एकाचेया घरा पाणिपात्रसि बिजें केलें: तवं ब्राम्हणें गोसावियांते देखिलें आणि म्हणितलें: ‘‘ऐसें मोटेधाटे आडवेरूंदः उभेदीर्घ दिसत असाः आणि पाणिपात्र करीत असाः तें एकाधेयाचीया गाइ कां राखानाः’’ तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें राखैलः परि यांसि कव्हणी राखों नेदीः याकरवी कव्हणी राखवीनाः’’ तेणे म्हणितलें: ‘‘आम्हीं आपुलिया गाइ राखउनिः मोटे दहींभात सूनिः व्याळीये दुधभात घालुनिः आमचीं राखाः’’ तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे राखो जाणेः सोडूं जाणे परि बांधोः दोहों नेणेः हें राखैल परि दोहेनाः सोडिल परि बांधेनाः’’ तेणे म्हणितलें: ‘‘आम्ही दोहौनिः आम्हीं बांधौनिः’’ गोसावी मानिलें: मग तेहीं म्हणितलें: ‘‘होः तरी याः या ओटयावरि राहाः आमचा गोवळ गेलाः तयाचा ठाइं तुम्ही राहाः’’ मग तयाची जाडी वाहाणाः डांग पागोटेः ऐसें गोसावियांसि दिधलें: गोसावियांसि तेथ आसन जालें: तियें दिसीं गोसावी तयांचांची वाडीं राहिलेः मग रात्री गोसावियांसि दुधाची आरोगणा जालीः तयाचीये दारी ओटयावरि पहूड स्वीकरिलाः एरी दीं उदेयांचि तियें उठुनि पाहातिः तवं गोसावी उभें असतिः ब्राम्हणें ब्राम्हणीतें म्हणितलें: ‘‘गोरक्षासि मोट देयाः’’ गोसावियांसि दहींभाताची मोट घातलीं: गोसावी गाइं सोडिलीयाः तिया रानासि निगालीयाः पुढा गोसावीः मागां गाइं: गोसावियांसरिसा तोही अनुवर्जित निगालाः मग तो म्हणेः ‘‘कोण्हाचिये सेती रीगों नेदावियाः कोण्हाचिये मेरे चारावीयानाः बरविया रानावरि घालावियाः वेळे उदकांसि मेळवावियाः बरवी साउली मेळवावीः’’ ऐसें सिखविलेः मग तो राहिलाः ऐसें तीन दिस अनुवर्जित येः मग न येः गोसावी गाइ राना चारावेया नेलियाः रान पावले आणि शिळातळावरि आसन स्वीकरिलें: गाइ त्राहाटीत डोळेः त्राहाटीत कानः त्राहाटीत पुसें: ऐसिया बगटावरि बगटे घालुनि वरति बगाटे करौनि श्रीमूर्ति अवलोकीत बैसलीयाः श्रीमूर्तिचा आनंदु रोवंतीतिः गोसावी मोटेचें अन्न आरोगणा केलेः सुडा धुनि श्रीमुकुटावरि घातलाः विळीचां गोसावी पुढां: मागां गाइः ऐसें घेउनि बिजें केलें: वाडां गाइ घातलीयाः तिहीं बांधलीयाः गोसावी वासरूवें सोडिलीं: तिहीं आखडुनि गाइ दुहीलीयाः तवं दूध बहुत जालें: गोसावी पहूडतिये ठाइं आसन स्वीकरिलें: मग गोसावियांसि दूधभाताची आरोगणा दिधलीः तिये आपुलीं वोरासारी करौनि विस्मयौचि करीत निजैलीं: ‘जें आम्हासि गोवळ निका जोडलाः’ ब्राम्हणीतें म्हणितलें: ‘‘आजी दूध बहुत जालें: गाइ निकिया चारिलियाः यांसि न्हावेया लोणी घालावें: याचिये मोटे दहीं घालावें:’’ यापरि दिसेंदीसु अधिकचि गाइंसि दूध होएः लोणीः तूप बहुत हों लागलें: ऐसा थोरू दुभो लागलीयाः दूध दुणें जालें: दोहतां दोहतां कांडारू येतिः गोसावी तेथ नीच बिजें करीति आणि गाइं भोवतालिया आनंद रोवंतीत असतिः मग गावींचां गोवळीं तया ब्राम्हणातें म्हणितलें: ‘‘ऐसा कोणु गा राहाविला असे? तन नाहीः उदक नाहीं: ना साउली नाहीं: एका खडकावरि बैसौनि भवंतिया गाइ बैसवीतायेः’’ ऐसें दोनि दी पर्यंत सांघितलें: तेणें अधिकचि विस्मितु जालाः ‘काइ पां दूध तरि दुना निगतायेः ऐसें काइ सांघतातीः’ मग एकु दीं तेणें म्हणितलें: ‘‘जावोः तरि हें गाइ कव्हणा रानां नेत असे पां? तें पाहों पां:’’ म्हणौनि तो वृक्षा एकावरि राखों ठाकलाः तवं गोपाळी सांघितलें तें तैसेचि देखिलेः गोसावियांसि मद टेकाळीये सिळातळावरि आसन असेः गाइ श्रीमूर्ति अवलोकित आनंदे रोवंतित असतिः विळवेर्‍हीं चारा नाहीं: पाणी नाहीं: ऐसें देखिलें: थोर विस्मयो जालाः ‘‘एया रे पुरूख सामान्य नव्हेतिः साक्षात श्रीक्रष्ण मां:’’ मग घरीं येउनि ब्राम्हणीपुढां सांघो लागलाः ‘‘पैः आमचीया गाइ राखतो तो साक्षातु श्रीक्रष्णुः हें गोसावीः असति तवं असति आणि जावो लागतिः तरि गोसावी येतिः मां एक पावो तू धरिः एक पावो मीं धरीनः मां गोसावियांसि पुसोः तुम्ही काइं?’’ तियें दिसीं गोसावी गाइ गावांतु घातलीयाः मग बाहीरिबाहिरे न पुसतचि बिजें केलें: तियें दोघें दुःख करूं लागलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तयांसि याची अवस्था उरलीचि होतीः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘जी ऐसें कां केलें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तवपर्येंत असावे जवं आपुले श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशेनाः’’ भटीं म्हणितलें: ‘‘श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशे तेणें काइ होए?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘श्रेष्ठत्व प्रकाशे तेणें अन्यधर्म विकार आपजेः मग अन्यधर्म पुरूख धर्मापासौनि जायेः तथा विकारास्तव नष्टत्व प्रकाशे तेणें उपद्रव उठीः’’ भटीं म्हणितलें: ‘‘जी तरि काइ करावें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आपणेयां जयाचा उपद्रवु उठें तयाचां असंबंधु करावाः’’ भटीं म्हणितलें: ‘‘हो का जीः’’ :।।: (टिप: स्वामि पहिल्यांदा एकांकात आले होते. दुसर्यांदा स्वामि भांडारेकारासोबत आले. यावेळी नांदेडला स्वामि तिसर्यांदा आले.)
  • Purvardha Charitra Lila – 67
  • Nanded : नांदीयेडीं आंबोच्चारू :।।:
  • गोसावियांसि नांदीयेडीं नदीचिये थडीये भावतीर्थ देउळीं आसन असेः तवं देऊळीचेनि राणेनि पुसिलें: ‘‘देव हो गावांतु वर्‍हाड जालें: तेथ तुम्हीं जेविलेति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘होः’’ राणेनि पुसिलें: ‘‘काइ काइ जेविलेति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वडें मांडें: पुरीयाः अमृतफळेः खीरिः साखरः लाडुः तिळवेः चैवणीः तूपः वरणभातुः साखः’’ ऐसें अवघे पदार्थ सांघितलेः पुढां आंब जवं सांघावें तवं गंगेसि पूरु आलाः राणेनि म्हणितलें: ‘‘जी जीः चालाः चालाः पळाः पळाः पुरू आलाः’’ राणा पळौनि गेलाः गोसावियांवरौनि पुरू गेलाः देउळ बुडालें: दिसां तीं पुरू वोहटलाः राणा आलाः देउळीचा पन्हा फेडिलाः तवं श्रीमुकुट देखिलाः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘राणे हो आंब गोड जालें:’’ राणेनि म्हणितलें: ‘‘हो जीः’’ राणेयां विस्मयो जालाः लोक आला होताः तें म्हणतिः ‘‘गोसावी आंब गोड म्हणति ते काइः’’ तवं राणनि म्हणितलें: ‘‘गोसावी आरोगुनि आले होतेः अवघे पदार्थ सांघितलेः आंब सांघावें तवं पूर आलाः तें आतां सांघत असतिः’’ मग तयासि आश्चर्य जालें: हे गोष्टि गोसावी आउ पवनगुरु उपहासावरि जोगेस्वरीसि आउसाप्रति सांघितलीः मग महादाइसीं पुसिलें: ‘‘जी जीः ऐसें तें आणिक कोण होतिः ऐसें तें आमचे गोसावीचि होतिः’’ गोसावी मानिले :।।:


Nanded (Bhaveshwar Sthan) Darshan by Sarang Dhar || Jay Krishni Mahanubhav ||
Dwij Gorakshan (Nanded) Sthan Darshan by Sarang Dhar || Jay Krishni Mahanubhav ||



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: