Mehkar (मेहकर)

मेहकर, ता.मेहकर जि. बुलढाणा


येथील 6 स्थाने एकाच परिसरात आहेत - मेहकर शहररात 'महानुभावांचे श्रीकृष्ण मंदीर' या नावाने ओळखले जानारे हे भव्य मंदीर न.प.सरकारी दवाखान्या जवळच्या पटेल साँ मिला जवळच आहे. येथील स्थाने एकाच परिसरात आहेत त्यामुळे चुकत नाहीत. व 1 मार्कंडविहीरी चे स्थान मेहकर शहररातच पाँवरहाऊस जवळ तलावालगत आहे.


जाण्याचा मार्ग :

मेहकर हे गाव, चिखली-मालेगाव मार्गावर चिखलीहून आग्नेयेस 41 कि.मी आहे व मालेगावहून नैर्ऋत्येस 45 कि.मी. आहे. बुलढाणा ते मेहकर 66 कि.मी. अकोला ते मेहकर 106 कि.मी. वेणीहून उत्तरेस मेहेकर (अंत्रीदेशमुख मार्गे) 12 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील 6 स्थाने.

1. अवस्थान आणि वसती स्थान :

मेहकर शहरातील नगर परिषद दवाखान्याच्या उत्तरेस पटेल सॉ मिल आहे. त्या पटेल सॉ मिलजवळ पूर्वाभिमुख देवळात हे स्थान आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे बाणेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. आज हे देऊळ, ‘महानुभावीय श्रीकृष्ण मंदिर’ या नावाने ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात अंजनीहून मेहकरला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी 10 महिने वास्तव्य होते. (पू. ली. 91,93 स्था. पो.) व पूर्वार्धात पैठणहून रिद्धपूरला जाताना शेंदूरजनहून मेहकरला आले. त्यावेळी त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 144, स्था. पो.)


2. आरोगणा स्थान :

हे स्थान श्रीकृष्ण मंदिराच्या आग्नेयेस उत्तराभिमुख देवळात दक्षिण बाजूस आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे बोणेबाइयांची गुंफा होती. त्या गुंफेतील हे स्थान होय.

लीळा : 1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आरोगणा करीत असत. (पू. ली. 91,92,95)
2) गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्वज्ञांनी बोणेबाइयांच्या पूजेचा येथे स्वीकार केला. (पू. ली. 95)


3. मादने स्थान :

हे स्थान आरोगणा स्थानापासून उत्तरेस 9 फूट 9 इंच अंतरावर आहे. बोणेबाइयांच्या गुंफेच्या अंगणातील हे मादने स्थान होय. (स्था.पो.)


4. चोरास विशाळरूप दाखविणे स्थान :

हे स्थान श्रीकृष्ण मंदिराच्या सभामंडपाच्या दक्षिण बाजूस पूर्वाभिमुख लहान देवळात आहे.

लीळा : एके दिवशी रात्रीच्या वेळी बोणेवाइयांच्या गुंफेत चोराने प्रवेश केला. त्यांने सर्व सामान गुंफेतून बाहेर आणले व गाठोडे बांधू लागला. तेवढ्यात बोणेबाइयांनी गुंफेचा दरवाजा घट्ट लावून घेतला आणि “धावां धावां बा मौन्यदेव हो : नागवलो : चोरू : चोरू :” म्हणून मोठ्याने ओरडू लागल्या. लगेच सर्वज्ञ येथे येऊन उभे राहिले. थोडे खांकरले. चोराने मागे पाहिले, तेव्हा सर्वज्ञांनी विशाळरूप धारण केलेली मूर्ति त्याच्या दृष्टीस पडली, त्यामुळे तो घाबरला व सामानाचे गाठोडे टाकून पळून गेला. (पू. ली. 94, वि. स्था. पो. क्र. 1279, 1625)

चोरास विशाळरूप दाखविणे स्थानापासून 47 फूट 10 इंच अंतरावर एक स्थान आहे. काही स्थान पोथींच्या मताप्रमाणे त्याठिकाणी चोरास विशाळरूप दाखविले.

श्रीकृष्ण मंदिराच्या पाठीमागे पश्चिम भिंतीला लागून एक स्थान आहे. एका वासनेप्रमाणे चोराच्या प्रसंगी सर्वज्ञ त्या ठिकाणी उभे होते.


5. अवस्थान स्थान :

हे स्थान देवळाच्या आवारात श्रीकृष्ण मंदिराच्या वायव्येस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे भैरवाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : देवतेची उपकरणे चोरीला जातील, म्हणून बाणेश्वराच्या पुजाऱ्याने सर्वज्ञांना बाणेश्वराच्या देवळात निद्रा करण्यास मनाई केल्यामुळे त्यांचे येथे तीन दिवस वास्तव्य झाले. (पू. ली. 91 स्था. पो.)


6. आसन स्थान :

हे स्थान देवळाच्या आवारात पाण्याच्या टाकीच्या उत्तरेस पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू सायंकाळच्या वेळेस अंजनीहून मेहकरला आले. बाणेश्वराच्या जगतीच्या उत्तराभिमुख दरवाजाची पूर्व सोंडी येथे होती. त्या सोंडीवर त्यांना लोंबता श्रीचरणी आसन झाले. त्या वेळी बोणेबाइया भिक्षेला जात होत्या. त्यांची व सर्वज्ञांची प्रथम भेट या ठिकाणी झाली. (ए.ली.62 तु.प्र.स्था.पो.)


श्रीकृष्ण मंदिर व त्या परिसरातील स्थाने संपूर्ण

7. मार्कंड विहिरी, शिळेवरील आसन स्थान :

हे स्थान मेहकर शहराच्या ईशान्येस व पावर हाऊसच्या वायव्येस पूर्वाभिमुख देवळात आहे. स्थानाजवळ आसपास बाभळीची झाडे आहेत. मार्कंड विहिर बुजलेली आहे.
लीळा : 1) एके दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू मार्कंड विहिरीकडे विहरणासाठी आले. त्यांना येथे आसन झाले.

2) याच ठिकाणी सर्वज्ञांनी मार्कंडवाडीच्या ब्राह्मणाच्या पत्नीस सात वेळा पाण्याची घागर उचलून दिली. (पू.ली. 96 स्था.पो.)

एकांकातील १० महिन्यांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभु येथून पैठणला गेले व पूर्वार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून इसवीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

आसन स्थानाच्या वायव्येचे पूर्वाभिमुख देवळातील स्थान निर्देशरहित आहे.


अनुपलब्ध स्थाने :

1. तळ्याच्या पाळीवरील आसन स्थान.

2. बाणेश्वराच्या ईशान्येचे परिश्रय स्थान.

3. महीकयुद्ध निवारण स्थान.

4. सामान्य स्त्रीच्या घरातील आसन स्थान.

5. सारंगधराच्या देवळातील विहरण स्थान.

6. अग्नीष्टिका आसन स्थान.

7. मार्कंडेश्वराच्या देवळातील स्थान.

8. मार्कडवाडीच्या ब्राह्मणाच्या घरातील मादने स्थान.

9. ओसरीवरील आसन स्थान.

11. पूजा आरोगणा स्थान.


वासनाभेदाची स्थाने : 2


निर्देशरहित स्थाने : 2


मेहकरची एकूण स्थाने : 17


  • Purvardha Charitra Lila – 91
  • Mehekar : मेघंकरीं बोणेबाइयां भेटिः /सेवास्वीकारू :।।:
  • एरी दीं तेथौनि विळीचां वेळीं गोसावी मेघंकरासि बिजें केलें: कटीप्रदेशीं सुडाः श्रीमुकुटीं सुडाः श्रीमुखीं तांबुळ ऐसें बाणेस्वराचिये जगतिचां उत्तरीली दारवंठांबाहिरी दोनि सोंडियाः तियें पूर्विली सोंडियेवरि गोसावियांसि लोंबता श्रीचरणीं पसिमामुख आसन असेः तवं बाणेस्वरीचेया बोणेबाइया भिक्षे निगालियाः तेहीं गोसावियांतें देखिलें: आणि म्हणितलें: ‘बाबाः कव्हणी कुसीसि होतासि बाः कव्हणीची कुसी उसासुनि निगालासि बाः ऐसीं कव्हणी पापिणी विसंबली बाः’’ गोसावी उगेचिः पुढति पुसिलें: ‘‘बा आपण कव्हणीकडौनि येइजतो?’’ गोसावी खुणाचि श्रीमुकुटें आंजनीकिडें दाखविलेः बोणेबाइया म्हणितलें: ‘‘बा ऐसें वराडाकडौनि?’’ गोसावी श्रीमुकुटेंचि मानिलें: बोणेबाइया म्हणितलें: ‘‘बा आपणेया नांव काइ?’’ गोसावी उगेचिः तयाचीया कन्या म्हणितलें: ‘‘आवो हें बोलति ना तरि हें मौन्यदेवः’’ मग तिहींचि म्हणितलें: ‘‘हां बा तरि आपण मौन्यदेवां होइजैल?’’ गोसावी श्रीमुकुटें मानिलें: सारंगधरासि पांच लाडू वोघीचे फिटतिः तो एक लाडु भोपा बोणेबाइयांसि देः तो लाडू आणिलाः सागळ घेउनि आलीः लाडुवाची चुरी आणि साकर तूप ओळगवीलें: वाटां उदक ओळगवीलेः गोसावी च्यारि एकें सेवखंडें आरोगिलीं: उदक स्वीकरिलें: गुळळा केलाः विडा ओळगवीलाः एर प्रसाद तेहीं घेतलाः मग बोणेबाइं गोसावियांसि विनविलेः ‘‘जी आमचेया गुंफेंसि बिजें करावें:’’ गोसावियांतें गुंफे घेउनि गेलियाः गोसावी बिजें केलें: गोसावियांसी आसन घातलें: आसन जालें: मग निगतां विनविलें: ‘‘बा मौन्यदेयाः आम्हीं भिक्षा मागौनि येउनि तवं एथचि असाः मग तुम्हां आरोगणा देउनिः’’ गोसावी तेंहीं मानिलें: मग तिया लवलवकरूनी भिक्षा मागौनि आलीयाः गुंफे आरोगणा जालीः पुढति गोसावियांतें विनविलें: ‘‘बा मौन्यदेयाः ये नगरीं जवं असाल तवं उदेयां एथ पाणीभातु घेयावाः विळीचां भिक्षा मागौनि येउनि तें जैसें येइल तैसी जेवावीः कव्हणी लोकां न म्हणावें: आपुलें म्हणावें: कव्हणीकडें न वचावें:’’ ऐसें विनविलें: गोसावी श्रीमुकुटें मानिलें: स्वीकरिलें: मग बोणेबाइयां जेविलियाः गोसावी निद्रास्थाना बाणेस्वरा बीजें केलें: तवं राणेनि म्हणितलें: ‘‘जीः देवाचीं उपकरणें असतिः कुचिटापे घातलें असेः तुम्ही बहीरवांचिया देउळासि जाः’’ बहीरवांचें देउळ पहूडावेया दाखविलें: तेथ गोसावी पहूड स्वीकरिलाः बहीरवीं त्रिरात्र अवस्थान जालें :।।: (टिप – येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वडनेर, वासनी, इसवि, अंजनि वरुन मेहकरला आले. येथे स्वामींचे ६ महिने वास्तव्य होते. …)
  • Purvardha Charitra Lila – 92,93
  • Mehekar : बहिरवीं अवस्थान: ज्वारी उपद्रवो :।।: / नखक्षतोपद्रवदरीसनें बाणेस्वरीं अवस्थान :।।:
  • गोसावियांसि बहीरवीं पहूड जालाः उदेयांचि गोसावी सारंगधराकडें विहरणां बिजें करीतिः विहरणौनि गुंफे बिजें करीतिः दुपाहारीं बोणेबाइया गोसावियांसि पाणीभाताची आरोगणा देतिः विळीचां तरि तैसी देतिः बहीरवी पहूड स्वीकरीतिः एकु दीं गोसावी रात्रीं बहीरवीं पहूडले असतिः तवं माध्यानिके रात्रीं जुवारी जूं हारविलें: तें रात्रीसमयी तेथ लपों आलेः तेहीं ‘‘हें कोण?’’ म्हणौनि श्रीमूर्तिवरि हातु घातलें: गोसावियांची सकुमार श्रीमूर्ति पाटसूत ऐसीं लागलीः आंधारीं स्त्रीं म्हणौनि श्रीकंठु स्पर्शिलाः तवं श्रीकंठी नखें वोरखडलीः तवं गोसावियांपासी काही देखतिचीनाः मग म्हणितलें: ‘‘आरे हें गोसावी कीः’’ मग म्हणो लागलें: ‘‘जी जीः गोसावी आम्हांसि काही खावेया द्यावे जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यातें काइ असेः मां हें काइ देइलः’’ इतुलेनि तें गेलेः उदेयाचि गोसावी विहरणासि बिजें केलें: विहरणौनि बोणेबाइयाचिये गुंफेसि बिजें केलें: आरोगणा करितां बोणेबाइं गोसावियांचा श्रीकंठी नखक्षत देखिलेः तेहीं म्हणितलें: ‘‘बा मौन्यदेयाः हें कंठीं काइ जालें?’’ गोसावी उगेचिः तवं तयासि आन जाणवलेः जे ‘सामान्य स्त्री एकाधी एकी आली असैलः’ यावरि तयाचे अन्यथाज्ञान फिटावेया मौन भंगलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः रात्रीं जुवारी आलेः तेहीं एथ उपद्रो केलाः तें भवंते हात घालीतिः तेणें नखें लागलीः तें याते काही खावेया मागतिः एणें म्हणितलें: ‘याते काइ असेः मां हें काइ देइलः’’ मग बोणेबाइं म्हणितलें: ‘‘बा मौन्यदेव हो हेचि जरि घांटीये नख लागतें तरि आजीचि पाणिये दिवा पाजळताः’’ ऐसें म्हणौनि तस्करां अपयशकमळें वाइलीं: ‘‘आम्हीं राणेयातें म्हणूः मग तुम्ही बाणेस्वरीं निद्रा कराः तयाचें जाइल तें देउनिः परि तुम्हीं बाणेस्वरीचि निद्रा करावीः’’ गोसावी मानिलेः मग तेहीं बाणश्विरिचीयां राणेयातें म्हणितलें: ‘‘आमचीयां मौन्यदेयांसि बाणेस्वरीं निद्रा करूं द्याः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘आमचीं उपकरणें जातिः’’ बोणेबाइं म्हणितलें: ‘‘जाती तरि आम्हीं देउनिः’’ बोणेबाइ गोसावियांतें बाणेस्वरासि नेलें: चौकीं आंथुरीलें: मग गोसावी तेथ पहूडु करीतिः राणा जाः मां गोसावी कवाडे घालीतिः आगळ घालीतिः मग पहूड स्वीकरीतिः तेथ सा मास अवस्थान जालें :।।:
  • Purvardha Charitra Lila – 94
  • Mehekar : गुंफे चोरविद्रावन :।।: / रात्रीं चोरविद्रावन :।।:
  • एकु दीं रात्री दाराटियाहूनि बोणेबाइयांचे गुंफेसि चोरू रीगालाः भितरीं घाट ऐसा दिवा पाजळत असेः बोणेबाइया देखतिः परि भेणे बोंबातिनाः जरि बोबाउनी तरि तो मारील म्हणौनि तिया उगियाची दडालीयाः तेणें आपुली जाडी दारीं आंगणी पसरिलीः आणि दोन्ही वाटीं भितरील पदार्थ आणआणूं तेथ घालीः ऐसें अवघे घातलेः बोणेबाइयां हाणैल म्हणौनि भेणे बोलतिनाः भेउनी उगियाचि होतियाः तो बाहीरि निगालाः मोट बांधत असेः मग तेंही कवाड खिळी दाटूनि घातलें: आणि गोसावियांसि बोबापडिलाः ‘‘धावाः धावा बा मौन्यदेयाः चोरें नागवीलें:’’ ऐसिया बोबाती असतिः तवं गोसावी बाहीरि बिजें केलें: गोसावी देउळाचां कोणटां उभे ठेलें: इखितु खांकरिलें: सांचलु पडिलाः आणि चोरें मागुती वास पाहिलीः तवं गोसावियांची श्रीमूर्ति परबतएसणी वाढिन्नली देखिलीः चोरू भियालाः मोट सांडौनि पौळी उडौनि पळालाः मग गोसावी सामोरेया बिजें केलें: आणि म्हणितलें: ‘‘बाइः काइ म्हणत असा?’’ बोणेबाइया म्हणितलें: ‘‘बा मौन्यदेयाः चोरें नागवीलों बा’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘उघडा बाइ कवाडः बाहीरि याः’’ बोणेबाइया म्हणितलें: ‘‘आवो आमचे मौन्यदेव आले वोः मौन्यदेव आले वोः’’ म्हणौनि बोणेबाइं कवाडें उघडिलें: बाहीरि आलीयाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुमचें काइ काइ गेलें?’’ बोणेबाइया म्हणितलें: ‘‘बा मौन्यदेव होः सर्वस्व आमचे गेलेः आतां काइ करूं?’’ ऐसें म्हणौनि क्लेशातें पावलीयाः तवं मोट देखिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तरि हें मोट कव्हणाची?’’ गोसावी मोट सोडविलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पां पां बाइः तुमचें काइ गेलें?’’ पाहाति तवं अवघेचि असेः हरीखैलीः बोणेबाइया म्हणितलें: ‘‘बा मौन्यदेयाः अवघेचि आहेः आमचें काही न वचेचिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः जाडी कोणाची? काइ तुमची?’’ बोणेबाइया म्हणितलें: ‘‘बा नव्हेः हें जाडी चोराचीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तरि उपराठां चोरूचि नागवीला म्हणाः तरि कव्हणें कव्हणुं नागवीले बाइः’’ आणि गोसावी हास्य केलें: तवं तेहीं म्हणितलें: ‘‘बा मौन्यदेयाः आतां तो जाडीकारणें मागुता येइलः’’ सर्वज्ञें म्हणितलें:‘‘बाइः आतां तो न येः तो गेलाः’’ बाइं म्हणितलें: ‘‘हा बा मौन्यदेयाः तो काइसेनि गेला?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें एवढे एक वाढिन्नलें देखिलें: तो भियालाः म्हणौनि मोट सांडौनि पळालाः’’ बोणेबाइया म्हणतिः ‘‘ये वेळे मौन्यदेवे राखिलें: आणिकी वेळे मौन्यदेवचि राखतिः’’ ऐसें म्हणौनि तियें सुखेंचि गुंफेसि निजैलीं: गोसावी बिढारासि बिजें केलें :।।:
  • Purvardha Charitra Lila – 95
  • Mehekar : गोकुळाष्टमी पूजास्वीकारू :।।:
  • गोकुळाष्टमीचां दिसीं उदेयांचीये आरोगणे गोसावी गुंफेसि बिजें केलें: तवं तेहीं आधिला दिसीं माती आणिली होतीः तें बाइयासि मोतयेचे गोकुळ करितां देखिलें: गोसावी तयापासी उकड बैसलेः बोणेबाइयांतें पुसिलें: ‘‘बाइः आजी तुमतें लवडीसवडी मोटीसी मां:’’ तवं तिहीं म्हणितलें: ‘‘मौन्यदेयाः तुम्हीं हें नेणाः मौन्यदेव होः आजी जन्माष्टमीः’’ गोसावी पुसिलें: ‘‘हें पैल काइ? हें माती काइसी? ऐसें काइ करित असा?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘आजी श्रीक्रष्ण जन्मलेः याचा श्रीक्रष्ण करौनिः वसुदेव देवकी करौनिः नंदु यशोदा गोकुळ करौनिः आजी बरवा फुलौरा किजेः व्रत किजेः’’ तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः मां इयें मातियेची कीं: श्रीक्रष्ण काइ मातियेचाः तो साचोकारा देवो कीं: नंदयशोदाः वसुदेव देवकीदेवी काइ मातियेचीः गोकुळ काइ मातियेचीः तियें तवं साचोकारीं माणसें होती कीः हें असों देयाः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘तरि काइ करूं बा मौन्यदेया?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें श्रीक्रष्णु होइलः तुम्हीं देवकीदेवी होआः ये व्रतस्तें होउनि एथ पूजा करीतिः सांडा परती मातीः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘हो कां बा’’ मग जें करितें होतीं तें सांडिलें: मग गोसावियांसि आरोगणा जालीः गोसावी विहरणा बिजें केलें: मग तिहीं अवघी आइती केलीः सोजी काढिलीः सरवळीः वळवटे वळीलीः कडकणेः पहिले केलें: सेंगुळीः बुडडीं: पुरीयाः सोवळीयाः घारियाः खाजीं तळीलीं: तवं गोसावी विळीचां वेळीं नावेक सकाळीचि विहरणीहूनि बिजें केलें: मग गोसावी आपुलेनि श्रीकरें फुलौरा बांधलाः बाइया पदार्थ वोववोउं गोसावियांचां हातीं देतिः गोसावी बांधतिः अवघी फळोवळी बांधलीः निंबुवेः जांबुळें: डाळींबे बांधलीः अवघी आइती केलीः गोसावियांसि मर्दनाः मादनेः आरोगणा जालीः मग व्रतस्ती बाइया गोसावियांसि बरवी पूजा केलीं: जेव्हडा वेळां श्रीक्रष्ण जन्मले तियें वेळे गोसावी श्रीमूर्ति संकौचिलीः श्रीमूर्तिवरि बाळत्वाची प्रभा स्वीकरिलीः देवकीयेचां कामाइसांचिये उसंगां रीगालेः स्तनपान केलेः चतुर्भुज श्रीक्रष्ण आभरणी आणि लक्षणयुक्त जैसा वेख होता तैसाचि स्वीकरिलाः आसनीं उपविष्ट जालें: मग पूजावीधि केलाः मग श्रीकरीं वाण सर्मपिलेः गोसावियांसि आरोगणा जालीः देवकीदेवी जाली तियें ऐसा वरूता पालौ करौनि उपरतौनि दोहीं पदरीं माथा बांधलाः खीरि रांधिलीः वाणे दिधलीः कामाइसे उपवास करितें होतीं: गोसावी तयातें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्ही जेवाः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘ना जीः आजी गोकुळाष्टमीं व्रत करीनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः श्रीक्रष्ण उपजले तै देवेकादेवी काइ उपवासु केलाः पेज तर्‍हीं घेतली कीं:’’ मग तियें आइसें गोसावियांचीये पांती जेविलीं: पेंज पीयालीः गोसावी तयांसि परमानंदाचा सुकाळु केलाः व्रतस्था बाइया नागाइसा उपवासु केलाः मग गोसावियांसि फुलौरेयाखाली ओटयावरि रात्रीचा पहूड जालाः एरी दिसीं उदेयांचि उपहूड जालाः गोसावी विहरणा बिजें करूं आदरिलें: तेव्हेळी बाइं विनविलें: ‘‘बा मौन्यदेव हो नागाइसांसि पारणेयांसि उसीरू होइलः आजी लवकरि याः मग तुमचेया पांती तें पारणे करीलः’’ गोसावी मानिलें: बाइं उपहार निफजविलाः नागाइसीं गोसावियांसि पडदणी ओळगवीलीः गोसावियांसि मर्दना मार्जनें जालीः पूजा केलीः आरोगणा जालीः गुळळा जालाः मग तयांसि पांती पारणें जालें: मग बाणेस्वरीं दों प्रहरांचां पहूड स्वीकरिलाः ऐसीं तें आगाधा अनंतां आद्यपुरूखाचें मातृत्व पावलीः अजन्मेनि तियेसी आपुले पुत्रत्व दिधलेः ऐसीं तें सभाग्य जननी :।।:
  • Purvardha Charitra Lila – 96
  • Mehekar : सप्तघटां हातु लावने :।।: / सप्तघटां श्रीकरप्रदानी ब्राम्हणगृहीं पूजाः आरोगणा :।।:
  • बाणेस्वरा इशान्ये दुरि ऐसीं मार्तंड वीहिरीः एकु दीं गोसावी विळीचेया पाहारा एका तेथ विहरणासि बिजें केलें: तेथ पूर्विली रीगावा रीगतां डावेया हाता सोंडियेवरि आसन जालें: तवं वीहिरी इशान्यें मार्तंडवाडियेची ब्राम्हणी बाइल एकीं पाणीयांसि आलीः घागरी भरीलीः गुडघेयावरी ठेविलीः आणि मागापुढां पाहिलें: कोण्हीं न देखैचिः तवं गोसावियांसि देखिलें: मग तिया म्हणितलें: ‘‘हां बा नांवभरी घागरीसि हातु लावा कां?’’ गोसावी उठौनि घागरी श्रीकरू लाविलाः डोइयेवरि ठेविलीः आणि गेलीः मागौती आलीः यापरि सातां घटां श्रीकरू लाविलाः तवं विळीचां वेळीं तियेचा भातारू तेथ संध्या करूं आलाः डोइये कडबेयाचा भारा असेः हातपाय धुआवेया वीहिरीसि आलाः तेणें गोसावियांतें आसनीं उपविष्ट देखिलें: श्रीचरणां लागलाः विनवुनी आवारासि घेउनि गेलाः पटिशाळेसि ओसरीयेवरि आसन घातलें: गोसावी आसनीं उपविष्ट जालें: तेणें ब्राम्हणीतें म्हणितलें: ‘‘ये येः गोसावियांचीयां श्रीचरणां लागः’’ तें श्रीचरणां लागलीः तिया गोसावियांतें देखौनि म्हणितलें: ‘‘उहुं: मीं म्हणें कोण गोसावीः येहीं माझेया सातां हेलयां हातु लाविलाः’’ तवं तेणें म्हणितलें: ‘‘चांडाळीः पापिणीः गोसावियांकरवी श्रीकरू कैसा लावविलाः गोसावियांचिया श्रीचरणां लागः घाली घाली दंडवतें:’’ तें लवकरि नुठीः तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्ही कां गा याते कोपते असाः प्राणियासि पूर्वि देखिजे तें हेळ वाटेः’’ मग तिया दंडवत घातलेः मग तेणें चरणक्षाळण केलें: विडा ओळगवीलाः मर्दना मादनें जालें: बरवी पूजा केलीः आरोगणा जालीः गुळळा विडा जालाः आणि गोसावी तेथौनि बिजें केलें: हें गोष्टि जोगेस्वरीये तिवाडीभार्या दुरडी उतरणी इंद्रभटांप्रति सांघितली :।।:
  • Purvardha Charitra Lila – 97
  • Mehekar : समानअस्त्रीयां भेटि :।।: / सामान्यवनितां दरीसनप्रदानीं अंतर ज्ञान करणें :।।:
  • हे लीळा गोसावी एकाइ मुद्रिका प्रसंगी सांघितलीः।: एकु दीं गोसावी विहरणासि बिजें केलें: विहरणौनि मागुतें सामान्य स्त्री हाटें बिजें करित असतिः पूर्वपसिम हाटवटीः दक्षिणीली वोळी पसिमीली सीरां मुक्ता स्त्रिया दोघी एकीः तयाचीं घरें होतीं: तिया आपुलिया घरीचिया आंगणी होतियाः तयांतु एकीं गोसावियांतें देखौनि साउमी आलीः श्रीचरणां लागलीः दंडवत केलें: गोसावियांतें विनउनी पालवीं धरूनि घरा घेउनि गेलीः बाजसिुपवतियेवरि आसन जालें: श्रीचरण धूतलें: गोसावियांसि बरविया फोडी ओळगविलीयाः विडीया करौनि दिधलीयाः तवं सेजारीली घरीची दुसरी आलीः दंडवतें करौनि समीप बैसलीः मग तिया विनविलें: ‘‘जी जीः मातें द्रव्य अपार असेः परि तें भोगी ऐसा पुरूख नाहीं: तें भोगेंवीन वायां जात असेः’’ गोसावी एरीचिया तोंडाची सहेतुक वास पाहिलीः तवं एरी म्हणितलें: ‘‘सर गे परतीः ऐसें काइ म्हणतासि? गोसावी मायबापुः गोसावियांचें सेवादास्य किजेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मां मां काइ म्हणत असे?’’ आणि गोसावी मागुती एरीचेया तोंडाची वास पाहातिः पुढति तिया तैसेचि म्हणितलें: एरी तैसेचि निराकरिलें: एरी एरीवरि कोपलीः गोसावी तियेचे शब्द आइकौनि एरीची वास पहातिः एरीची वास पहातिः ऐसें उभय वर्ग त्रिसुध्दि म्हणितलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्हीं म्हणत असा तें नव्हेः ये म्हणतें असति तें होएः’’ यावरि तिया तियेतें विसारिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एकांचा मनोभावो ऐसाः एकांचा भाव ऐसाः म्हणौनि भावासि काइ रावो राणा असेः एकाची वासना ऐसीः एकाची वासना ऐसीं: वासनेसि प्रतिबंध नाहीं:’’ मग गोसावी तेथौनि बिजें केलें :।।
  • Purvardha Charitra Lila – 98
  • Mehekar : महीखयुद्ध्य निवारण :।।:
  • एकु दीं गोसावी विहरणौनि मागुते एरी हाटवटीया बिजें करीत असतिः तवं मधील पूर्वपसिम हाटवटीः तेथ म्हैसे दोन्ही झुंजत असतिः तवं गोसावी सारंगधरीहुनि उभीया हाटवटीया म्हैसेयाकडें बिजें करीतातीः अवघीं माणुसें पळालीं: माणुसें माळवधावरूनिः उपरियाः पटिशाळावरि उभे ठाकौनि पाहातें असतिः गोसावियांसि बिजें करितां लोकें वारिलें: ‘‘देव होः न वचाः देव हो न वचाः पुढां म्हैसे झुंजत असतिः दोन्हीं थडका मिसळले असतिः’’ गोसावी ऐसीं तयाची वास पाहिलीः आणि आइकौनि अगाध चक्रवर्ति अगाधपणें बिजें केलें: तवं तें थडक मिसळौनि झुंजावेया ओसरले होतेः तवं लोक बोबाइलें: ‘‘आहो महात्मे हो मारीलेती हो मारीलेती होः’’ गोसावी दोहीतें कृपादृष्टी अवलोकुनी दोहींमध्यें बिजें केलें: गोसावी श्रीकरें सिंगी धरूनि एकु ऐसा केलाः एकु ऐसां केलाः आणि दोहीचा रोखु निवर्तलाः निर्मछर जालें: एकु ऐसा भुइ उंघतु उंघतु निगालाः एकु ऐसा निगालाः अवघेया लोकासि विस्मयो जालाः लोक म्हणेः ‘‘जी आजी गोसावी राखिलें: एर्‍हवीं हें एका दोघांतें मारितेः’’ म्हणौनि नमस्कारू करौनि आपुलिया परि महति बोलतिः मग गोसावी गुंफैसि गेले :।।:
  • Purvardha Charitra Lila – 99
  • Lonar : सोमवारीये लोणारां जाणें :।।: / सोमवारीये लोणारां गमनीं मढीं वस्ति :।।:
  • एकु दीं सोमवारी आलीः गोसावी सकाळी विहरणा बिजें करीत होतें: तवं बोणेबाइ गोसावियांतें विनविलें: ‘‘बा मौन्यदेयाः आजी सोमवारीः अवघा लोकु लोणारासि निगाला तरि आपण लोणारासि जावोना?’’ गोसावी मानिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइ चालाः घेया मात्राः’’ बाइं अवघी आइती केलीः मात्रा घेतलीः मग गोसावी बिजें केलें: गोसावी उजूचि कुमारेस्वरां बिजें केलें: कुमारेस्वरीं आसन जालें: बाइया गोसावियांपासी मात्रा ठेउनि अष्टतीर्था करौनि आलीयाः मग गोसावी बाइयासहित धारेसि बिजें केलें: पटिशाळे आसन जालें: तेथ तेही मात्रा ठेविलीः धारे गोमुखावरि सीळ होतीः मग तियेवरि लोंबता श्रीचरणी आसन जालें: गोसावी गोमुखीं धारे श्रीचरण ओडविलें: तेथ बाइया स्नानें केलीः अवघेयां लोका स्नानें जाली तवं तेथ गोसावियांसि आसन असेः मग गोसावियांसि साजां आसन जालें: तिया कुंडासि प्रदक्षिणा करौनि आलीयाः परिवंट बांधलेः मात्रा घेतलीः ‘‘बा मौन्यदेव होः आतां गावांतुं चालाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः चालाः’’ मग गोसावी गावांतु दैत्यसूदनासि बिजें केलें: चौकीं आसन जालें: दैत्यसूदना वाव्यकोनीं मढुः तेथ बाइया बिढार घेतलें: बिढाराहुनि गोसावी मागुतें धारेसि बिजें केलें: आसन जालें: मग बाइया बिढारी उपहारू निफजविलाः आणि गोसावीयांतें विनउनी तेथ घेउनि गेलियाः तेथ गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः तेथ बाइया मात्रा ठेविलीः आणि कुंडा प्रदक्षिणे गेलियाः मग तयासि आलेयागोसावी दैत्यसूदनासि बिजें केलें: तेथ गोसावियांसि वस्ति जाली :।।: (टिप – येथे हे पहील्यांदा येने. पहील्यांदा स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वडनेर, वासनी, इसवि, अंजनि, मेहकरला परत आले. मेहकर वरुन लोणारला आले…)
  • Purvardha Charitra Lila – 100
  • Mehekar : लोणारमार्गी चोर कुमति हरणें :।।:
  • उदेयाचि गोसावियांसि उपहूडु जालेयानंतरें मढीचि आसन जालें: बाइया अष्टतीर्था करौनि आलेयावरि गोसावी दैत्यसूदना विहरणा बिजें केलें: बाइया उपहारू निफजविलाः मग गोसावी तेथ बिजें केलें: आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः पहूडउपहुड जालाः तवं अवघा लोकु निगालाः तें दिसीं हाटः बाइं हाटांतु जाउनी पानेंपोफळें घेतलीः दुनीचिया आंगीये घेतलियाः टोपरें घेतलेः सिविलें: उपान्हौ घेतलियाः पुडवाटोवा घेतलाः पानी पोफळीं भरीलाः इतुकें गोसावियांसि ओळगवीलेः तवं अवेळ जालीः मग तयांतडी येउनि गोसावियांतें विनविलें: ‘‘बा मौन्यदेयाः लोकु अवघा निगालाः आतां गावां जावो ना?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः घेया मात्राः’’ गोसावी अवळा वेळीं मेघंकरासि बिजें केलें: मार्गी जातां गोसावी नावेक श्रम स्वीकरिलाः सेरियापासी मार्गी वीहिरीः तेथ पींपळः तया वृक्षाखाली नावेक आसन जालें: चरणक्षाळण जालें: गुळळा जालाः विडा जालाः तेथौनि बिजें केलें: एणीएपरतें मार्गी देउळादक्षिणें काटीयेतळीं सिळातळावरि आसन जालें: मग जुझमालीं देउळापासी आसन जालें: जुझमालींहूनि पव्हेसि आसन जालें: चरणक्षाळण जालें: गुळळा जालाः विडा जालाः मग तेथौनि बिजें केलें: तवं चोर आलेः बाइं पींपळापासी चोर देखिलें: बाइं म्हणितलें: ‘‘बा मौन्यदेयाः धावां धावां: नागवीलों: चोर बाः चोरः’’ बोबावो लागलीयाः थोरें गजबजिलियाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः भिानाः पुढें होआः पुढां चालाः’’ बाइया पुढें निगालीयाः तवं तें साउमें आलेः उभे राहिलेः गोसावियांतें देखिलें आणि म्हणितलें: ‘‘आरे हें गोसावी रे गोसावीः’’ जोहारू घातलाः ‘‘जोहारू देवाः जोहारू देवाः’’ म्हणौनि पुढां भवंताले उभे राहिलेः गोसावी अवलोकिलेः तेणें म्हणितलें: ‘‘हे काइ जी गोसावी उसीर केलाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कां बा महात्मे हो जें हुनि तुम्हीं आलेति तें कां किजेना? दोनि च्यारि पांगरूणे आतिः तें तुम्हीं घेयाः ऐसें का पहाता? हें असे तें तुम्हीं घेयाः हें भिक्षु महात्मेः यांसि आणिक कव्हणी देइलः हें निस्फूर होउनि असैलः’’ तवं तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः गोसावियांचां ठाइं काइ कैसें करावें जी? गोसावियांची आम्हीं कैसी घेउनिः इयें गोसावियांचीः हें गोसावीचि नेसावीं: गोसावीचि पांगरावीं जीः गोसावी अवेळ केलीः अवळा वेळीं कैसें बिजें केलें? आणि गोसावियांसरिसे कव्हणी माणूस नाहीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मे हो तुम्ही असा नव्हेः काइसी अवेळ?’’ मग बोणेबाइयांकरवी तयांसि विडे देवविलेः तें च्यारि च्यारि पानें एक एक पोफळ देते होतीः मग गोसावी तयासि पुडवाटोवा अवघाचि झाडुनि तांबुळ दिधलें: गोसावी तयातें राहावित होतेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां तुम्हीं राहा?’’ परि तें न र्‍हातीचिः तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः आमचें पुढे आणिक असतिः तें गोसावियांचां ठाइं उपद्रो करीतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तैसें एथ कव्हणी काही न करीः एथ तैसें काही नाहीं: तुम्हीं एथीचें काइ केलें: मां तें काइ करीतिः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘ना जी तें मांगः कुकर्म असतिः तें गोसावियांचा ठाइं ओखटें करीतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तैसें एथ काही नाहीं:’’ ऐसाही तें गोसावियांसि बोळवीत निगालेः ‘‘जीः तरि सेवेसि येउनिः’’ तें सरिसे आलेः पुढां तेः मागां गोसावीः तवं सुंदरासंगमीचिये लवणीसि आणिक चोर होतेः तें भेटलेः आणि एर एरां खुणविलेः ‘‘घे घे’’ करी उठिलेः गोसावी दृष्टी अवलोकुनी तयाची कुमति हरीलीः सवें होतें तेही म्हणितलें: ‘‘सरा रे परतेः हें गोसावी येत असतिः हें गोसावी रे गोसावी रेः’’ ऐसीं एर एर खुण जालीः एर एरा खुणां तस्कर भाषा बोलीलेः हातीचे दगड सांडिलेः काखे हातिएर घातलेः मग तेही एर एरां तांबुळें दिधलीः आणि एर्‍हएर गोसावियांतें गावंवेर्‍ही महारवाडयासि वांट फांके तवं बोळवित आलेः मग तयासि पाठवणी जालीः आणि तें गावां मध्यें गेलेः बहीरवांचीये सोंडिएवरि गोसावियांसि आसन जालें: बोणेबाइयातें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्ही पुढें चालाः हें मागिलीकडुनि येइलः’’ गोसावियांसि विडा ओळगवीलाः मग तिया निगालीयाः एरी वाट उजू बाणेस्वरा जाएः तेया वाटा गोसावी उजुचि बाणेस्वरासि बिजें केलें: बाइयासि थोर आश्चर्य जालें: तिया आश्चर्य करीतिः ‘‘यें वेळे मुनिदेवीं राखिलों: आणिकी वेळे मुनिदेव राखतीलः’’ :।।:
  • (लोणारवरुन मेहकरला परताना मार्गातील गावे या लीळेत आलीत.)
  • Purvardha Charitra Lila – 101
  • Mehekar : सिंहस्ता यात्रें गमन/जाणें :।।:
  • बारा वरिखां सिंहस्तु आलाः एकु दीं अवघा लोकु त्रियंबका यात्रे निगालाः बोणेबाइं गोसावियांतें विनविलेः ‘‘बा मौन्यदेयाः अवघा लोकु त्रियंबकां सिंहस्ता यात्रे निगालाः तरि तुम्हीं आम्हीं चाला जावोः’’ गोसावी मानिलें: ‘‘बाइ चालाः’’ ते सीयाळे दिसः बाइं गोसावियांसि दुनीची आंगीटोपरे सिविलें: आणि गोसावियांतें पुसिलें: ‘‘बा मुनिदेव हो तुम्हाकारणें उपान्हौ घेवों?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यासि न लगतिः’’ तिहीं आग्रहों केलाः आणि उपान्हौ बांधलीयाः मग तिहीं कणीकतांदुळीं पोतीं भरूं आदरिलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें काइ करीत असाः ओझें काही घेवों नकोः वाटें मिळैलः’’ बाइं म्हणितलें: ‘‘बा मौन्यदेयाः साना गावीं वेसजु सहजचि न जोडेः ऐसेंहीं जोडे तरि पव्हेयामध्यें महागः थोडें बहु तर्‍ही घेवों:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइं असों देयाः हें पुढें जोडैलः वाटे अपार मिळैलः’’ तर्‍हीं तिहीं काही घेतलेंचः मग गोसावी बिजें केलें :।।:
  • Purvardha Charitra Lila – 144
  • Mehekar : मेघंकरीं बाइसें हाटा गमन :।।: / मेघंकरीं बाणेस्वरीं वस्तिः बाइसीं हाटवेचाननी सामथ्र्य कथन :।।:
  • गोसावी मेघंकरां बिजें केलें: गावाउत्तरे नदीचीए थडीए अग्निष्टीकाः तेथ आसन जालें: मग मेघंकरीं बाणेस्वरा बिजें केलें: तेथ चैकी गोसावियांसि आसन जालें: बाइसीं चरणक्षाळण केलें: पहूड जालाः तवं बाइसीं उपहार निफजविलाः उपहूड जालाः मग गोसावियांसि पूजा जालीः आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः मागुता पहूडुजालाः पुढील गावों धाकुटा म्हणौनि बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः पुढील ग्रामी काही पदार्थ मिळतिनाः आणि एथें तरि अवघेचि मिळैलः आणि वेच पाळला तरि कैसें करू?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जा कराः तुम्हासि मिळैलः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हो कां बाबाः’’ बाइसें हाटांतु काही वेचु घेयावेया निगालीः वाणीया उपाधीक संभावनिक देखौनि तयाचेया पसारेया आलीः बाइसातें देखौनि नमस्कार करौनि वाणीयें म्हणितलें: ‘‘आइ या साउमीः’’ बाइसें भितरीं आलीः तेणें उठौनि माची बैसो घातलीं: बाइसें बैसलीं: मग बाइसीं म्हणितलें: ‘‘काही वेचु देयाः’’ तेणें म्हणितलें: ‘‘आइः नावेक राहाः या ग्राहिकातें बुझाउ देयाः यातें पाठवीनः मग तुम्हीं मागाल तें देइनः’’ तया थोरू विकरा जालाः तवं बाइसें बैसलीचि होतीं: तेणें ग्राहिकातें पाठविलें: मग पुसिलें: ‘‘आइः काइ काइ देवोः’’ बाइसीं कणिकः तांदुळः तूपः हिंगुः मिरें: जिरें: साकरः ऐसा सोळा दामाचा वेचु सांघितलाः मग वेचु दिधलाः बरवा सवंग सुवास हाटवका दिधलाः बाइसें द्रव्य देवो बैसलीः तवं तेणें म्हणितलें: ‘‘आइः इतुकें तुम्हीं माझें आपुलेया उपयोगा न्यावेः’’ आणिक दक्षिणा सोळा दाम दिधलें: नमस्कार करौनि हाटवकेयाची मात्रा आपुलेयापासी घेउनि बाइसांसी बिढार पावेततवं बोळवीतु आलाः नमस्कार करौनि म्हणितलें: ‘‘आइः हें घ्याः मीं राहीनः’’ बाइसें आलीं तवं गोसावियांसि उपहूड जाला असेः गोसावी आसनी उपविष्ट असतिः गोसावी पुसिलें: ‘‘बाइः उसीरू कां लाविला?’’ बाइसीं तयाचा आदरू सांघितलाः ‘बाबाः तयाचें भलेपण काइ सांघों: मीं हाटा गेलीयें तवं माची बैसावेया घातलीं आणि म्हणितलेः ‘आइः ग्राहिक पाठउं देयाः मग तुम्हीं मागाल तो हाटवका देइनः’ मग ग्राहिक पाठविलीः आणि मज तेणें हाटवका दिधलाः सोळा दामाचाः आणि सोळा दाम देओ बैसलियें: परि तो नेघेचिः तेणें आणिक सोळा दाम दिधलें: तें काइ बाबा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्हां गेलेयां तुमचेया ठाइ तयांचे तुम्हाहुनि एतुकेचि बहुत? तुम्हां तेतुलेंचि बहुत?’’ मग बाइसांचां संतोख देखौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तरि हें ऐसें तुम्हासीचि होआवेः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘ऐसें मज न व्हावे बाबाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें न करा तरि नव्हे आणि काइः’’ आणि पोळलीं: ‘‘आमचे बाबाचि आम्हासि होआवेः’’ म्हणौनि दंडवत घातलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘उठाः’’ मग वस्ति जाली :।।:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: