Matkuli (मातकुळी)

मातकुळी, ता. आष्टी, जि. बीड.


येथील स्थाने 4 - येथील 2 स्थान ही मातकूळी गावाच्या ग्रामपंचयात जवळ मंदीरात आहेत. 
1 स्थान गावालगतच वायव्येस सडकेच्या पलीकडे आहे.
व 1 स्थान मातकुळी गावापासून पूर्वेस 3 कि. मी. डोंगराच्या पायथ्य पाचबैल यांच्या वावराजवळ आहे.


जाण्याचा मार्ग :

मातकुळी हे गाव अहमदनगर बीड मार्गावरील चिंचपूर गावापासून ईशान्येस 4 कि.मी. आहे. आष्टी ते चिंचपूर 12 कि.मी. जामखेड ते चिंचपूर 5 कि. मी. अहमदनगर ते चिंचपूर 72 कि. मी. बीड ते चिंचपूर 71 कि.मी. आष्टीहून पूर्वेस मातकुळी पायमार्गे (पोखरी, कन्हेवडगावमार्गे) 11 कि.मी. आहे. मातकुळी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. मातकुळी व चिंचपूर येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील 2 स्थाने, क्र. 1 व क्र. 2)

1. वसती स्थान :

हे स्थान मातकुळी गावाच्या मध्यभागी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे ब्राह्मणाचे घर होते. त्या घरातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात रामदयाहून मातकुळीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी ते येथून आष्टीला गेले. सर्वज्ञांनी येथे ब्राह्मणाच्या पूजा आरोगणेचा स्वीकार केला. (पू. ली. 343, स्था. पो.)


2. आसन स्थान :

हे स्थान देवळापुढील पटीशाळेत नैर्ऋत्य विभागी आहे. ब्राह्मणाच्या घराच्या पटीशाळेवरील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ रामदयाहून आल्यावर प्रथम त्यांना लिंगाच्या देवळाच्या पटीशाळेवर आसन झाले. तेथून ब्राह्मणाने, सर्वज्ञांना विनंती करून आपल्या घरी आणले. पटीशाळेवर आसन झाले. मग ब्राह्मणाने, सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण केले (पू. ली. 343)


3. लिंगाच्या देवळाच्या पटीशाळेवरील आसन स्थान :

हे स्थान मुख्य मंदिरापासून वायव्येस 90 मीटर अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते, त्या देवळाच्या पटीशाळेवरील आसन होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात रामदऱ्याहून मातकुळीला जात होते. तेव्हा गावात जाण्यापूर्वी ते येथे थांबले होते. (पू. ली. 342)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. बाइसा आग्रहे अदृश्य होइजैल म्हणणे स्थान :

हे स्थान मातकुळी गावापासून पूर्वेस 3 कि. मी. अंतरावर डोंगराच्या पायथ्यास श्री. साहेबराव पाचबैल यांच्या वावराजवळ वडाच्या झाडाच्या पश्चिमेस देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात रामदऱ्याहून मातकुळीला जात होते. येथे दोन रस्ते फुटलेले होते. म्हणून सर्वज्ञ या ठिकाणी उभे राहिले. बाइसांनी सर्वज्ञांना विचारले, “हे रस्ते कुठे जातात?” सर्वज्ञ म्हणाले, “हा रस्ता जामखेडला जातो; आणि हा रस्ता मातकुळीला जातो.” जामखेडला बाइसांचे नातेवाईक होते; म्हणून त्यांनी सर्वज्ञांना जामखेडला जाण्याचा आग्रह केला, तेव्हा जवळच चरत असलेल्या हरणांच्याकडे हात करून सर्वज्ञ बाइसांना म्हणाले, “जर तुम्ही असा आग्रह कराल तर आम्ही यातील एका हरणाचे देह धारण करू. मग तुम्ही आम्हाला काय म्हणून ओळखणार? आणि कोणाच्या पाठीमागे धावणार?” तेव्हा दायंबा बाइसांना म्हणाले, ”बाई, तुम्ही गप्प का बसत नाही ? सर्वांच्या मुळास विळा का घालता?” हे ऐकून बाइसा घाबरल्या व म्हणाल्या, “आता मी आग्रह करणार नाही.” (पू. ली. 342, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) मातकुळीच्या महाजना भेटी स्थान.

2) ब्राह्मणाच्या घराच्या अंगणातील मादने स्थान.


मातकुळीची एकूण स्थाने : 6


  • Purvardha Charitra Lila – 342
  • Matkuli : मार्गी बाइसां आग्रहोनिवृत्ति करणें :।।:
  • गोसावी तेथौनि बिजें केलें: मात्रकौळिये बिजें करितां: मध्यें मार्गी मळा वाट फांकलीः तेथ गोसावी उभे ठाकलेः बाइसीं पुसिलें: ‘बाबाः हा मार्ग कव्हणा गावां जाइल?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा मार्ग जांबखेडेयासि जाइल आणि हा मात्रकौळिये जाइलः’’ तवं बाइसीं विनविलें: ‘बाबाः जांबुखेडा बिजें किजो कां?’’ तेथ बाइसाचें संबंधीए होतें म्हणौनि बाइसीं आग्रहो केलाः गोसावी तीनि वेळ निराकरिलें: चैथिये वेळें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एथ प्रवृत्ति नाहीं: आग्रहो न कराः महात्मेयांसि आग्रहो परिग्रहो न व्हावाः’’ बाइसीं पुढति म्हणितलें: ‘‘नां बाबाः या वाटा जाइजैलः तें या वाटा जावें बाबा आणि काइः’’ तेथ हरीणें चरत होती तें गोसावी श्रीकरें करौनि दाखविलीः आणि कोपौनि म्हणितलें: ‘‘बाइः तुम्ही जरि आग्रह कराल तरि हें हरीण देखिलें? यामध्यें एक हरीण होइजैलः यांतु एका हरीणाचे देह घेइजैलः एका हरीणा होइजैलः मग हें कव्हण म्हणौनि काइ ओळखाल? मग काइ कराल? कोणापाठीं धावाल?’’ तवं दायंबाये म्हणितलें: ‘‘बाइः उगी असाः अवघेयांचा मुळीं इळा कां घालालः अवघेयांची सीसे कां निवटालः’’ मग बाइसें नावेक गजबजिलीः आणि उगीचि राहिलीः मग बाइसीं म्हणितलें: ‘‘नको बाबाः आतां मीं आग्रह न करीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘स्त्रिया अविद्यात्मकाः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पाटवध्याला १४ दिवस वास्तव्य करुन साकत-सौताळ्यावरुण व रामदर्याकडे आले येथे स्वामिंचे २० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हांच्या ह्या लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 343
  • Matkuli : मात्रकौळियें ब्राम्हणांगृहीं वस्ति/मादणें: पूजाः आरोगणा स्वीकारू :।।:
  • गोसावी मात्रकौळिये बिजें केला भक्तिजनाचिया खांदीं काठियाः तें भाले ऐसें दिसतिः गोसावी प्रसनायकाची धौची तांबडी दुटी प्रावर्ण केली होतीः तें सूर्याचां रश्मि तेजें करौनि सेंदुरें वोडण ऐसें दिसो लागलेः तें सेतकरी देखिलें: गावींची माणुसें भियालीः तियें काळीं तस्करभय होतें म्हणौनि भयास्तव लोकें वेसी घातलीं: ‘‘आलेः आले ओरपेकार पाइकः पुंडः आलेः’’ म्हणौनि झुंजाची आइती केलीः वेसीदारीं केतुली एकीं मांदी मिळालीः गोसावी नाथोबातें तथा उपाध्यातें पुढां पाठविलें: ‘‘हें तियें ऐसें सांघावेः’’ तेहीं जाउनी म्हणितलें: ‘‘आहा भीवों नकोः हें गोसावीः रामदरां होतें येतातीः’’ तवं गोसावी सामोरे बिजें केलें: गोसावियांतें देखिलें: हर्षातें पावलें: ‘‘आरेः हें गोसावी मां:’’ गोसावी गावांउत्तरें भिवेंस्वराचें देउळ तेथ बिजें केलें: पटिशाळेंचां वरिली सिरां आसन जालें: मग तें आलेः अवघै लोके दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलेः बैसलेः मग विदुरकथां केलियाः म्हणितलें: ‘‘गोसावी बिजें केलें: आतां सर्व विघ्ना उपशांति जालीः’’ तयां मध्यें साविनी एकु ब्राम्हणुः तयासि तेथ भेटि जालीः तेणें गोसावियांतें उपाहारालागी विनविलेः ‘‘जी जीः गोसावी माझेया घरा बिजें करावें:’’ गोसावी विनंती स्वीकरिलीः मग तेणें घरा नेलें: चरणक्षाळण जालें: मर्दनामादनें जालें: पूजा केलीः आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः तेथ वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे पहील्यांदा येने… स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात रामदरा येथे २० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मात्रकौळि येथे आले वस्ति जाली…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: