Mahur (माहूर)

माहूर, ता. माहूर, जि. नांदेड


माहूर येथील 16 स्थाने (श्री दत्तात्रेयप्रभू व श्री चक्रपाणी महाराज) माहूर गावाच्या बाहेरच आहेत.

1 ते 4. देवदेवेश्वर - देवदेवेश्वर माहुर गावाच्या आग्नेयेकडे गावालगतच भव्य मंदीर आहे तेथे आहे. देवदेवेश्वर या मंदीर परिसरात 4 स्थाने आहेत- त्यापैकी श्रीदत्तात्रेयप्रभूंचे निद्रास्थान व श्रीचक्रपाणी महाराज यांचे अवस्थान स्थान हे एकाच भव्य मंदीरात आहे. व इतर 1 खोलेश्वर लिंग हे निद्रास्थानाच्या मागे खोल देवळात आहे. तर कृष्णावळी स्थान निद्रास्थानाच्या पश्चिमेकडे लहान मंदीर आहे तेथे आहे. (1 वनदेव स्थान निद्रास्थानाच्या मागे आहे हे मांडलीक आहे यास वनदेव स्थान म्हणतात.)

5. मेरुवाळा तळे अथवा जळक्रीडा स्थान - मेरुवाळा तळे म्हणजेच श्रीदत्तात्रेयप्रभूंचे जळक्रीडा स्थान होय. येथे श्रीचक्रपाणी महाराज यांचाही सहा महिने स्नान करणे असा संबंध आहे. असा दोन्ही अवतारांचा संबंध येथे आहे.

6. मेरुवाळा भोजनता - श्रीदत्तात्रेयप्रभूंचे व श्रीचक्रपाणी महाराज यांचे भिक्षा भोजन स्थान हा एकच ओटा या मंदीरात आहे. दोन्ही अवतारांचा संबंध येथे आहे.

7. पंचदेउळीया - पंचदेउळीया हे दोन्ही अवतारांच्या संबंधाचे क्रिडास्थान आहे. आता येथे भव्य मंदीर बांधकाम झालेले आहे.

8. विंझाळे तळे/विषेश तळे - श्रीदत्तात्रेयप्रभूंचे हे स्थान देवगढ किल्ल्यात आहे. देवदेवेश्वर पासून 2 की.मी.अंतरावर आहे.

9. सहस्रार्जुना वरप्रदान स्थान - हे स्थान म्हणजे मोठा खडक आहे. येथील विषेश पूजेत असतात. आताही विषेश आनले जातात. क्र. 8 व 9 एकाच ठीकाणी आहेत.

10. वनदेव अथवा यदुराजा वरप्रदान स्थान - हे स्थान विंझाळे तळे/विषेश तळे येथुन पूर्वेकडे 2 की.मी.अंतरावर आहे. हे वनदेव नावाने ओळखले जाते.

11. ऋचिक ऋषी भेटी स्थान - हे स्थान वनदेव पासून दक्षिनेकडे 200 मी. अंतरावर आहे.

12. अळर्कराजा भेटी स्थान - हे स्थान ऋचिक ऋषी भेटी स्थाना पासून दक्षिनेकडे दीड कि.मी. अंतरावर आहे. दत्त शिखरावर जाताना पायथ्यालगतच चिंचेचे झाडाखाली हे स्थान आहे.

13. शंकराचार्या वरप्रदान स्थान - हे स्थान दत्त शिखरावर जाताना पायथ्यालगतच लहानसे देउळ आहे येथे लहान ओट्यावर पादुका कोरल्या आहेत ते हे स्थान होय.

14. ज्ञानशक्ति स्विकार स्थान - हे स्थान दत्त शिखरावर जाताना उतारावर हे स्थान आहे. आता येथे नवीन देउळ झाले आहे. येथे श्रीदत्तात्रेयप्रभूं व श्रीचक्रपाणी महाराज असा दोन्ही अवतारांचा संबंध आहे.

15. परशुरामा भेटी स्थान - हे स्थान दत्त शिखरावर पूर्वमूख देवळात आहे. चौकशी केल्याशिवाय हे स्थान नमस्करणे शक्य नाही.

16.  गोरखनाथाची झोळी उतरवणे स्थान - हे स्थान दत्त शिखराच्या पूर्वेस 1 कि.मी. अंतरावर असणाऱ्या कैलाश टेकडी वर आहे.   


जाण्याचा मार्ग :

नागपूर ते माहूर (वर्धा, यवतमाळ, आर्णी मार्गे) 223 कि. मी. नांदेड ते माहूर (तामसा, हदगाव, महागाव मार्गे) 142 कि. मी. अमरावती ते माहूर 163 कि. मी. जळगाव ते माहूर (बुलढाणा, वाशिम मार्गे) 296 कि. मी. यवतमाळ ते माहूर 76 कि. मी. माहरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


तें मातापूर देखिलेयां नयेनी : मागीला माहापाताका होय धुनिं आणि पुढां आपुर्व नीफजे ततक्षनिं : मनिं चिंतीली फळें ॥३५॥ तेथे अत्री अनुसयेचा सुतु : राज्ये करीतांये श्रीदत्तु तेणे अळकुं नीववीला जळतु : वीवीधा तापापासौनी ॥३६॥ आणि सासार्जुनासिं उचीति : सहस्त्र भुजा देऊनि स्थापीला क्षीती फरसरामाचीया मातापीतयां दीधली मक्ति आणि स्थापिले रेनुकेते ॥३७॥ ऐसा तो दत्तात्रय देवाधीदेवो: आर्तजनांसि दे मनें चिंतीला दावो तेणे पवीत्र केला मातापुर ठावो : तयासि नमन माझे ॥३८॥ (रुक्मिणी-स्वयंबर प्रसंग चौथा)

स्थानाची माहिती :

1. श्रीदत्तात्रेयप्रभुंचे निद्रास्थान :

हे स्थान माहूर गावाच्या आग्नेय विभागी उत्तराभिमुख देवळात आहे. त्रेतयुगात या ठिकाणी देवल ऋषींचा आश्रम होता. त्यांनी लिंगाची स्थापना केली, म्हणून या ठिकाणास ‘देवदेवेश्वर’ असे म्हणतात.


लीळा : देवल ऋषींच्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने वाढत असलेले लिंग श्रीदत्तात्रेयप्रभुंनी आपला श्रीकर ठेवून खाली दाबल्यानंतर देवलऋषी श्रीदत्तात्रेय प्रभुंना शरण आले. त्यांनी श्रीदत्तात्रेयप्रभूची षोडशोपचारे पूजा केली. श्रीदत्तात्रेयप्रभुंनी प्रसन्न होऊन देवल ऋषींना वर मागण्यास सांगितले. तेव्हा देवलऋषी म्हणाले, “हे जगद्गुरो ! जगचालका ! भगवंता ! जो पर्यंत चंद्र, सूर्य, पृथ्वी आहे, तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी दररोज रात्री निद्रा घेण्यास यावे.” श्रीदत्तात्रेयप्रभुंनी देवल ऋषींच्या विनंतीचा स्वीकार करून ‘तथास्तु’ म्हणून वर दिला. तेव्हापासून म्हणजे त्रेतयुगापासून श्रीदत्तात्रेयप्रभू दररोज संध्याकाळी येथे निद्रा घेण्यास येतात.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

श्रीदत्तात्रेय प्रभू निद्रा स्थान

2. श्रीचक्रपाणीप्रभुंचे अवस्थान स्थान :

हे स्थान श्रीदत्तात्रेयप्रभू निद्रास्थानाच्या पश्चिम बाजूस आहे.


लीळा : श्रीचक्रपाणी प्रभू शके 1080 मध्ये फलटणहून माहूरला आले. त्यांचे या ठिकाणी सहा महिने वास्तव्य होते. ते नगरामध्ये भिक्षा करून मेरुवाळा तळ्याच्या काठी आरोगणा करीत असत. (पू.ली. 2. श्री. च. ली. 36,37)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. देवदेवेश्वर, श्रीदत्तात्रेयप्रभू संबंधित लिंग :

हे नमस्कारी लिंग श्रीदत्तात्रेयप्रभुंच्या निद्रास्थान देवळाच्या पाठीमागे पूर्वाभिमुख देवळात आहे. यास ‘खोलेश्वर’ असेही म्हणतात.


लीळा : देवल ऋषींनी नदीवर स्नान करून तीन मुठी वाळू आणून येथे महादेवाच्या लिंगाची स्थापना केली आणि आपल्या तपश्चर्येला त्यांनी प्रारंभ केला. त्यांच्या तपश्चर्येच्या प्रभावाने लिंग दिवसेंदिवस वाढतच चालले होते. लिंग प्रखर तेजस्वी झाले होते, जणू त्यात ज्वालामुखी साठवलेला होता. हे लिंग स्वर्गापर्यंत पोचविण्याचा त्यांचा विचार होता. हा सर्व प्रकार पाहन स्वर्ग, कैलास, वैकुंठातील देवी-देवता चिंताग्रस्त झाल्या. त्या सर्व देवीदेवतांनी मिळून बद्रिकाश्रमाला जाऊन श्रीदत्तात्रेयप्रभूना विनंती केली की, देवलऋषी आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने लिंग स्वर्गापर्यंत पोचवू पाहात आहेत. तरी आपण देवीदेवतांवर आलेल्या या संकटाचे निवारण करून त्यांचा अभिमान दूर करावा. मग श्रीदत्तात्रेयप्रभू बद्रिकाश्रमाहून सह्याद्री पर्वतावर आले. अभिमानात गढलेल्या देवल ऋषींनी श्रीदत्तात्रेयप्रभूना ओळखले. ते आपल्या तपश्चर्येतच मग्न राहिले. श्रीदत्तात्रेयप्रभू लिंगाजवळ आले आणि आपला श्रीकर लिंगावर ठेवून त्याचा माथा दाबला. लिंग अतिवेगाने खाली दबत चालले. लिंगाची अशी अवस्था पाहन देवल ऋषींचा गर्व नाहीसा झाला व त्यांनी लगेच श्रीदत्तात्रेयप्रभूचे श्रीचरण घट्ट धरले आणि विनंती केली की, आठवण म्हणून औट हात लिंग स्मरणार्थ ठेवा. मग श्रीदत्तात्रेयप्रभूनी औट हात लिंग ठेवले. देवळाच्या पाठीमागे प्रदक्षिणा मार्गावर मांडलिक स्थान आहे. ते ‘वनदेव’ या नावाने ओळखले जाते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. आसन स्थान :

हे स्थान निद्रास्थान देवळाच्या पश्चिम बाजूस उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा :

1. प्राचीनकाळी येथे कृष्णावळीचे म्हणजे काळ्या आवळीचे झाड होते. देवलऋषी येथील झाडाखाली बसून तपश्चर्या करीत असत. झाडाच्या बुडाला पूर्व बाजूस त्यांचे आसन होते. देवी-देवतांच्या विनंतीवरून श्रीदत्तात्रेयप्रभू बद्रिकाश्रमातून माहूरला आल्यावर कृष्णावळीच्या झाडाखालील देवल ऋषींच्या आसनावर जाऊन बसले. त्यावेळी देवलऋषी नित्याप्रमाणे नदीवर स्नान करण्यासाठी गेले होते. ते एका हातात पाण्याने भरलेला कमंडलू व एका हातात फुले घेऊन येत होते. दुरूनच त्यांनी आपल्या आसनावर कोणीतरी बसल्याचे पाहिले. त्यांना भयंकर क्रोध आला. त्या अनावर क्रोधाने त्यांच्या डोळ्यातून ज्वाळा निघू लागल्या. ऋषींनी गर्वाधतेमुळे श्रीदत्तात्रेयप्रभूना ओळखले नाही. माझ्या आसनावर बसणाऱ्यास शाप देऊन भस्म करू की काय? असे त्यांच्या मनात आले; परंतु अखंड चालू असलेली लिंगपूजा प्रथम करू, नंतर त्याचा समाचार घेऊ. असा विचार करून ते पूजा करण्यासाठी लिंगाजवळ गेले. पूजा प्रारंभ केल्यावर श्रीदत्तात्रेयप्रभू उठून लिंगाजवळ गेले व लिंग आपल्या श्रीकराने खाली दाबल्यावर पुन्हा याच ठिकाणी येऊन बसले.

2. मग येथेच देवल ऋषींनी श्रीदत्तात्रेयप्रभूची षोडशोपचारे पूजा केली. तेव्हा श्रीदत्तात्रेयप्रभुंनी त्यांना वरदान दिले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. मेरुवाळा तळे, जळक्रीडा स्थान :

हे तळे श्रीदत्तात्रेयप्रभू निद्रास्थान देवळाच्या ईशान्येस 200 मीटर अंतरावर आहे.


1. मेरुवाळा तळे हे श्रीदत्तात्रेयप्रभूचे जळक्रीडा स्थान होय. (उ. ली. 456)

2. फलटणहून आलेला यात्रेकरूंचा मेळा मेरुवाळा तळ्याच्या काठी उतरला होता. त्यावेळी श्रीचक्रपाणीप्रभुंनी या तळ्यामध्ये स्नान केले. (श्रीचक्रपाणी चरित्र 7)

3. श्रीचक्रपाणीप्रभुंचे माहूर येथे सहा महिने, वास्तव्य असताना ते दररोज मेरुवाळा तळ्यात स्नान करीत असत, अशा प्रकारे उभय अवतारांच्या संबंधाने हे तळे परमपवित्र झालेले आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


6. आरोगणा स्थान (भोजनता) :

हे स्थान मेरुवाळा तळ्याच्या पश्चिम काठावर उत्तराभिमुख देवळात आहे.


लीळा : येथे श्रीदत्तात्रेयप्रभुंनी व श्रीचक्रपाणीप्रभूनी भिक्षा भोजन केले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. पंचदेवळ्या क्रीडास्थान :

मेरुवाळा तळ्याच्या दक्षिण काठावर पाच देवळ्या आहेत. तेच पंचदेवळ्या क्रीडास्थान होय.


लीळा : श्रीदत्तात्रेयप्रभू व श्रीचक्रपाणीप्रभू यांनी मेरुवाळा तळ्यात स्नान करून येथे शिंपण्याचा खेळ केला.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


8. विंझाळे तळे :

हे तळे सह्याद्री पर्वतावर देवगड किल्ल्यात आहे. किल्ल्याच्या उत्तर दरवाजातून तळ्याकडे जाता येते. हे तळे गावाच्या दक्षिणेस आहे. देवदेवेश्वरी संस्थानापासून विंझाळे तळे 2 कि. मी. आहे.


लीळा : मातापित्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी परशुरामाने येथे बाण मारून जमिनीतून पाणी काढले. श्रीदत्तात्रेयप्रभुंनी आपल्या श्रीचरणाचा अंगठा लावून सर्वतीर्थ केले. (उ.ली.146,स्था.पो.श्रीदत्तात्रेय बाळक्रीडा अध्याय 9)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


9. सहस्त्रार्जुना वरप्रदान स्थान :

हे स्थान विंझाळा तळ्याच्या ईशान्य विभागी आहे. हे स्थान म्हणजे मोठा खडक आहे. भक्तजन येथील विशेष नमस्कार करण्यासाठी नेतात.

लीळा : राजा कार्तवीर्य हा थोटा होता. तो आपल्याला हात प्राप्त करून घेण्यासाठी सह्याद्री पर्वतावर आला. श्रीदत्तात्रेयप्रभुंच्या आश्रमात राहून
त्यांचे सेवादास्य करू लागला. एके दिवशी श्रीदत्तात्रेयप्रभूचे स्नान झाल्यावर त्यांचे केसकळाप वाळविण्यासाठी कार्तवीर्य धुपटणे पाहात होता. तेव्हा धुपटणे लवकर सापडेना. म्हणून त्याने आपल्या थोट्या हातावर विस्तव घेतला. त्यावर धूप घालून केसकळाप सुकवू लागला; परंतु विस्तवामुळे हाताचे कातडे जळू लागले. त्याचा घाण वास सुटला. तेव्हा श्रीदत्तात्रेयप्रभूनी पाठीमागे वळून पाहिले व राजाला विस्तव खाली टाकण्यास सांगितले आणि म्हणाले, “मी प्रसन्न झालो आहे. तुला काय पाहिजे आहे ते माग.” राजा कार्तवीर्य म्हणाला, “आपण ते जाणत आहात की’ मग श्रीदत्तात्रेयप्रभू म्हणाले, “सहस्रभुजा होतील, अतुरबळीया होशील, चक्रवर्तीपद प्राप्त होईल, तिन्हीही लोकांत गमन करता येईल, लोकांचे मनोरथ पूर्ण करशील; पण स्त्री, ब्राह्मण व गाय यांची हत्या करशील तर तुझा नाश होईल.’ असा श्रीदत्तात्रेयप्रभुंनी वर दिला. तेव्हापासून राजा कार्तवीर्यास ‘सहस्रार्जुन’ हे नाव प्राप्त झाले. (उ. ली. 145, स्था. पो.) याच तळ्याच्या काठी श्रीदत्तात्रेयप्रभुंनी गोरक्षास भेट दिली.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

विंझाळे तळे/विशेष स्थळ

10. यदुराजा ज्ञानप्रदान स्थान :

हे स्थान विंझाळे तळ्यापासून पूर्वेस 2 कि. मी. अंतरावर पूर्वाभिमुख गुंफेत आहे. या स्थानास ‘वनदेव’ असेही म्हणतात.


लीळा : श्रीदत्तात्रेयप्रभुंनी येथे यदुराजास ज्ञान दिले (श्रीदत्तात्रेय बाळक्रीडा अध्याय 6)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


11. ऋचिक ऋषी भेटी स्थान :

हे स्थान यदुराजा ज्ञानप्रदान स्थानापासून दक्षिणेस एक फलांग अंतरावर कळंबाच्या झाडाखाली आहे.


लीळा : श्रीदत्तात्रेयप्रभूनी येथे ऋचिक ऋषींना भेट दिली व त्यांना एकसारखे काळ्यारंगाचे 500 घोडे दिले. (श्रीदत्तात्रेय बाळक्रीडा अध्याय 9)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


12. अळर्कराजा भेटी स्थान :

हे स्थान ऋचिक ऋषी भेटी स्थानापासून दक्षिणेस दीड कि. मी. अंतरावर रस्त्याच्या कडेला चिंचेच्या झाडाच्या पश्चिमेस आहे.

लीळा : अळर्कराजा हा काशीच्या ऋतुध्वज राजापासून मदाळसेला झालेला चौथा मुलगा. त्याला तिन्ही ताप प्राप्त झाल्यामुळे तो फिरत फिरत सह्याद्री पर्वतावर आला. श्रीदत्तात्रेयप्रभू देवगिरी पर्वताकडून उत्तरेस धारागिरीकडे जात होते. अळर्कराजा उत्तर दिशेकडून येत होता. श्रीदत्तात्रेयप्रभुंनी अळर्कराजाचे तिन्हीही ताप शंबलिन् शंबलिन् म्हणून दूर केले व त्याला येथे मातांग वेषामध्ये भेट दिली. (उ.ली.253,स्था.पो.उ.को.प्र)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


13. शंकराचार्या वरप्रदान स्थान :

दत्त शिखराकडे जाताना प्रथमत: पायऱ्याजवळ पूर्वाभिमुख लहानसे देऊळ आहे. त्या देवळाच्या वायव्य कोपऱ्यात 11 इंच चौरसाचा लहान ओटा आहे. त्यावर पादुका काढलेल्या आहेत. तेच शंकराचार्या वरप्रदान स्थान होय.

लीळा : शंकराचार्यांनी श्रीदत्तात्रेयप्रभूना विनती केली की, मी जे दर्शन केले आहे, ते लोकी मान्य व्हावे. तेव्हा श्रीदत्तात्रेयप्रभुंनी “होईल” म्हणून वर दिला. (उ. ली. 636)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


14. ज्ञानशक्ती स्वीकार स्थान :

हे स्थान दत्त शिखराच्या उत्तरेस पर्वताच्या उतरणीवर आहे. श्रीदत्तात्रेयप्रभू व श्रीचक्रपाणीप्रभू य उभय अवतारांचा या स्थानास संबंध आहे.

लीळा : या ठिकाणी श्रीदत्तात्रेयप्रभूनी श्रीचक्रपाणीप्रभूना वाघाच्या रूपात भेट दिली. त्यावेळी श्रीचक्रपाणीप्रभुंनी श्रीदत्तात्रेयप्रभुंच्यापासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. (पू. ली. 2, स्था. पो. उ. को. प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


15. परशुरामास भेट देणे स्थान :

हे स्थान दत्त शिखरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार (चांदीचे) उत्तराभिमुख आहे.


लीळा : श्रीदत्तात्रेयप्रभुंनी येथे परशुरामास पारध्याच्या वेषामध्ये भेट दिली. (उ. ली. 146, स्था. पो. उ. को. प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


16. गोरखनाथाची भिक्षा झोळी उतरवणे स्थान :

हे स्थान दत्त शिखराच्या पूर्वेस 1 कि.मी. अंतरावर असणाऱ्या कैलाश टेकडी वर आहे. वनदेव स्थानापासून पायी 2 कि.मी. रस्ता आहे.

जेव्हा गोरखनाथाची भिक्षा झोळी आकाश मार्ग ने जात होती, तेव्हा श्री दत्तात्रेय प्रभूंनी याच स्थानावर, झोळीला खडे मारून ती झोळी खाली उतरवली, व त्यातून भिक्षा ग्रहण केली होती. 👉👉👉 संदर्भ 👈👈👈

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

गोरखनाथाची भिक्षा झोळी उतरवणे स्थान

माहूर ची एकूण स्थाने : 16


  • Purvardha Charitra Lila – 1
  • Mahur : श्रीदत्तात्रेयप्रभु मार्गादिमूळ निरूपण :।।:
  • एकु दीं गोसावी आसनीं उपविष्ट असतिः निरोपण होत असेः महादाइसें मुख्य अवघीं भक्तिजनें बैसलीं असतिः महादाइसीं पुसिलें: ‘‘जी जीः या मार्गासि कव्हण आदि/आदिकारण ?’’ या उपरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः या मार्गासि श्रीदत्तात्रेयप्रभु आदि/आदिकारण:’’ महादाइसीं पुसिलें: ‘‘जी जी तें कैसें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘श्रीदत्तात्रेयप्रभु गोसावी भोगभुमी कृतायुगीं ऋषीस्वरांचां ठाइं अवतारु स्वीकरिलाः अत्रीऋषी पीताः अनसूया माताः गोसावी ऋषींचें धर्म स्वीकरिलें: मग कर्मभूमीसि सह्याद्री पर्वतासि मातापूरां बिजें केलें: गोसावियांसि जीव उद्धरावाची प्रवृत्तिः गोसावियांसि तेथ देवेगरीवरि अवस्थान जालें: सह्याद्री क्रीडा/कृडाः तेथ चहु युगीं राज्य करुं लागलें: सह्याद्रीं श्रीदत्तात्रेयप्रभुंचें व्याघ्रवेषें दरीसन श्रीचांगदेवोराउळांसि जालें: तेथौनि तेहीं ज्ञानशक्ति स्वीकरिलीः श्रीचांगदेवोराऊळांचें दरीसन श्रीप्रभुंसि जालें: तेथौनि तेहीं ज्ञान स्वीकरिलें: श्रीप्रभुंपासौनि एथः एथौनि तुम्हां अवघेयां:’’ म्हणौनि श्रीकरें दाखविलें: ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि महादाइसें श्रीचरणां लागली:।।:
  • Purvardha Charitra Lila – 2
  • Mahur : सैह्याद्री श्रीदत्तात्रेयप्रभु व्याघ्रवेषें भेटि :॥:
  • मातापूरां बिजें केलें: पेणोवेणा पव्हा मातापूरां पावलाः अवघैनि लोकें पेणिसी मात्रास्नानें केलीं: गोसावीहीं मात्रास्नान केलें: अवघा लोकु घाटावरि निगाला: गोसावी घाटावरि बिजें केलें: मग मूळपीठी उजवी घालुनि गडु डावा घालूनि मूळदरीहूनि बिजें केलें: मग अवघेनि लोकें मेरूवाळा स्नान केलें: गोसावी मेरूवाळा स्नान केलेः मग मेरूवाळयावरूनि सर्वतीर्थासि बिजें केलें: लोकें सर्वतीर्थ स्नानें केलीः लोकासरिसें गोसावीही सर्वतीर्थ सचैल स्नान केलें: अवघा लोकु देवेगरीवरि निगालाः लोकासवे गोसावी देवेगरीवरि बिजें केले: दोही भागीं मोकळे केशकळापः उत्तरासंगें धोत्र: डावेया खांदी मात्राः वरि पांढरे घोंगडेः श्याम श्रीमूर्ति: कटीप्रदेशाभवंतें वस्त्र गुंडिले होतें: दोनि वाटें पव्हा पुढें: एक वाटां मागे: मध्यें गोसावीः दोही भागीं पव्हा सारूनि शीघ्र देवेगरीवरि बिजें करित असति: तें पर्वताचां अधोपरी करवंदीची जाळीः तेथ श्रीदत्तात्रेयप्रभु व्याघ्राचा प्रतिभाषिक वेषु धरूनि पूर्वाभिमुख ठाण मांडौनि एक श्रीकर भाळस्थळीं देउनि तनतळीयेसि वाट पाहातातिः तवं आमचे गोसावी आलें: अवचित श्रीदत्तात्रेयप्रभु जाळीतळुनि बिजें केलें: हाक दिधलीः हाकेंसरिसां लोकु भचकीत होतसांता ‘‘वाघु रे वाघुः’’ म्हणौनि पुढील लोकु पुढां पळालाः मागीलु लोकु मागां पळालाः मग लोकु म्हणे: ‘‘ब्राम्हणुं वाघें खादला:’’ श्रीदत्तात्रेयप्रभु गोसावी व्याघ्रवेखें हाक देउनि चपेट वरति उभारूनि तीं पायीं चालिलें: पुढां उभे राहिलें: दोही देवां भेटि जालीः श्रीमुकुटीं चवडा ठेविलाः श्रीमुखां श्रीमुख मेळविलें: तेथ प्रकाश पडिला: नावेकवेर्ही दोन्ही गोसावी उभें होतें: उभय अवतारां भेट होऊनि आमुचें गोसावी गरूडासनीं आणि श्रीदत्तात्रेयप्रभु पद्मासनीं ऐसें बैसले: तेथ आमचा गोसावी परावर शक्ति स्वीकरिली: पर आच्छादिलेः अवर प्रगटिए केलें: केतुला एक काळ वाट प्रतिबंधली होती: मग श्रीदत्तात्रेयप्रभु अदृश्य जालें: जनाचें भय निवर्तलेः जवं लोकु जाय तवं आमचे गोसावी तेथ होतेः नगरांतु पुडी करीतिः मेरूवाळां भोजन करीतिः देवदेवेश्वरीं पहूड स्वीकरीतिः ऐसें सा मास राज्य केले:।।:
  • Uttarardha Charitra Lila – 145
  • Mahur : :॥: सहस्रार्जुना वर प्रदान :॥:
  • एकु दीं गोसावी कव्हणा प्रस्तावेयानुरूप श्रीदत्तात्रेयप्रभुंची महिमा निरूपीली हें नेणिजेः ‘‘जे मागैति तें देतिः परि जीव मागो नेणतिः आज्ञा न वर्ततिः’’ मग गोसावी सहस्त्रार्जुनाची गोष्टि सांघो आदरिलीः महादाइसाते सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कृतवीर्याचा कार्तवीर्युः तो विकटाबहु जन्मलाः नसुधे थापेः पीता काळधर्मा गेलाः तो राज्या अर्हु नव्हें म्हणौनि तेणें राज्य प्रधानासि निरोविलें: ‘तुम्ही राज्य सांभाळाः मीं आपणेयांसि हात जोडीनः मग येइनः साम्राज्य करीनः’ म्हणौनि निगालाः अवघेयां ‘ऋशिस्वराचिया पर्णकुटीका पाहात पाहात सैंहाद्रासि आलाः तवं श्रीदत्तात्रेयप्रभुंचां आश्रमीं निर्वैरे भूतें देखिलीः ‘हे होएः’ म्हणौनि सुखाते पावलाः आश्चर्य जालें: मग म्हणितलेः ‘कोणे पुरूखासी भेटी होइल पां?’ कोटीतीर्था आलाः तेथ गुंफेसी श्रीदत्तात्रेयप्रभु देखिले आणि परमानंदाते पावलाः दंडवत घातलेः मग विनविलेः ‘जी मी गोसावीयांची सेवा करीनः तें अंगिकरावीः’ ‘हो कां किजोः’ तेथ राहिलाः श्रीदत्तात्रेयप्रभुंचे सेवादास्य करूं लागलाः प्रातःकाळीचा वीधि करीः मर्दनामार्जन देः आरोगणा देः सर्व सेवा बरवी कुशळता करीः एकु दीं श्रीदत्तात्रेयप्रभुसि मर्दनामार्जनें जालें: केशकळाप धूपावाकारणें धूपटणें पाहों लागलाः तवं न देखैचिः ‘जवं पाहीन तवं केशकळाप वाळतिः तरि धूप परिमळु न लगेः’ म्हणौनि थापां आंगारा घेउनि आलाः तयांवरि धूप घातलाः आणि केशकळाप धुपूं लागलाः तवं करपटानि आलीः श्रीदत्तात्रेयप्रभु पुसिलें: ‘करपटानि काइसी आली?’ आणि मागील वास पाहिलीः तें देखौनी श्रीदत्तात्रेयप्रभु म्हणितलें: ‘हे काइ रे? सांडी सांडीः माग प्रसन्न जालों:’ आणि सामोरा आलाः हात जोडुनि पुढां उभा ठाकलाः ‘जी जीः तें गोसावी जाणत असति कीं: जी मज बाहुबळ नाहीं:’ श्रीदत्तात्रेयप्रभु म्हणितलें: ‘सहस्त्रभुजा होतिः सहस्त्रार्जुन नांव पावसिः आतुर्बळीया होसीः’ तात्काळीची जालें: ‘सहस्त्रार्जुना आणिक मागः प्रसन्न जालोः’ तेणें म्हणितलें: ‘जी या भुजा पूरे इतुके राज्य होआवेः’ श्रीदत्तात्रेयप्रभु म्हणितलें: ‘वलयांकृत पृथ्वीचे राज्य होइलः’ तेणें म्हणितलें: ‘ते राज्य कैसेनि आवरे जी?’ श्रीदत्तात्रेयप्रभु म्हणितलें: ‘अतीत अनागत होइलः अनाहत आज्ञा होइलः जाणौनि लोकाचें मनोरथ पूरविसीः तिहीं लोकी गमन होइलः चक्रवर्तिपद पावसीः आणिक मागः प्रसन्न जालोः’ तेणें म्हणितलें: ‘आयुष्य होआवे जीः’ श्रीदत्तात्रेयप्रभु म्हणितलें: ‘चीरंजीव होसीः तिहीं लोकी तुज मानु होइलः परि आम्हीं म्हणुनि तें कराः आम्हीं ब्राम्हणः ब्राम्हणु क्षोभवावेनाः गायेः ब्राम्हणुः स्त्री: ये तिन्हीं अवध्यः ये वधिसी तरि नाससीः’ ऐसां श्रीदत्तात्रेयप्रभु वरू दिधलाः नमस्कार करौनि सव्यें श्रीमूर्ति घालुनी महीखावतियें आलाः चतुरंग सैन्येसि प्रधान सामोरे आलाः सुुमुहुर्ति राज्यपटाभिषेक केलाः ऐसें राज्य करूं लागलाः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘हा जीः देवो प्रसन्न जालेया हें काइ मागितलें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जीव दृष्टार्थियेः अदृष्टार्थि कव्हणी नाहीं: कव्हणी एकु अदृष्टार्थिः तयाते इश्वर उद्धरीतिः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘परि श्रीदत्तात्रेयप्रभु वारिलें तेचि तेणें केलें: तेचि तया जालें:’’ :।।:
  • Uttarardha Charitra Lila – 146
  • Mahur : परशरामां भेटि :।।: / परशरामागमनीं श्रीदत्तात्रेयप्रभु आचार्यत्वानुवादु :।।:
  • महादाइसीं म्हणितलें: ‘‘ते निरूपावे जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘सहस्त्रार्जुन रावो पारधी निगालाः तो विझाचेया तल्हानया अरण्यांतु आलाः आणि तान्हैलाः एकु उदक शोधीत शोधीत जमदाग्निचेया ठाया गेलाः तेथ जमदाग्नि रणिुकेचिया गुंफा होतियाः तवं एकवीरा जमदाग्नि दोघें सारी खेळत होतीः तेणें म्हणितलें: ‘रावो तान्हैला तरि पाणी होआवें:’ एकवीरा कानीचां मळु काढिलाः करंडा केलाः तो पाणिये भरूनि दिधलाः तेणें म्हणितलें: ‘एणें पाणिये काइ होइल?’ एकवीरा म्हणितलें: ‘पूरैल जाः’ तें नेता फुटलें: थोर सरवरू जालाः हस्तीः घोडेः पाइकः परिवारूः अवघेया उदक पूरलें: तवं रावो भुकैलाः मागुता जनु पाठविलाः तेणें म्हणितलें: ‘रावो भुकैलाः तरि जेवण होआवें:’ तेहीं म्हणितलें: ‘जा आणाः हातपाय धूनि याः’ गेलें: हातपाय धूनि आलेः रेणुका जमदाग्नीनी इंद्राची कामधेनु आणिलीः तें नानाविधें पक्वानें श्रवलीः तें देवतारहाटीः उपासनेस्तवं इंद्रे सर्वही पाठविलेः यथानुक्रमे बैसलेः ताटे जालीः आज्ञा दिधलीः जेविलेः विडे घेतलेः बैसलेः सर्वही राजरहाटी देखौनि क्षोभलाः अंतःकरणी म्हणितलेः ‘ऐसा माते एकही पदार्थ नाहीं:’ मग चातुरंग सैन्यासि जयासि जे लागे तें ते उदंड दिधलेः तें देखौनि राजामुख्य अवघे विस्मित जालें: तया जेउं घातलें: जेविलेः मग म्हणितलें: ‘ये ऐसीं अन्नें आमचां राज्यीं नाहीं: ये कैचीं?’ तेही म्हणितलें: ‘यें अन्ने ये गाइपासौनिः’ जवळी सासोले होतें: तेही म्हणितलेः ‘राजे होः ऐसें निधान तुमचा ठायी असावेः’ सहस्त्रार्जुने तयाचे कानी घेतलें: मग जमदाग्निते म्हणितलेः ‘मी मागीन तें राऊळे द्यावेः’ तेही म्हणितलेः ‘मां तुम्हा दीजे ऐसें माते काही नाहीं:’ सहस्त्रार्जुनें म्हणितलें: ‘ना तुम्ही हो म्हणाः’ तेही म्हणितलेः ‘मी वृथाचि हो न म्हणेः’ तेहि सासोला म्हणितलेः ‘तरि हें गाये आम्हांसि देयावीः’ तेही म्हणितलें: ‘कामधेनु इंद्राचीः’ जमदग्नि जैसे होतें तैसेचि सांघितलेः ‘तरि हें सर्वही इंद्राचेः माझे होतें तरि मी देतोः’ सासोला म्हणितलेः ‘याते काइ पुसता? गाये धरा आणि चालाः’ ऐसें म्हणौनि कामधेनुसि हात घातलेः जमदग्नि म्हणितलेः ‘तुमचेनि नविवैल तरि न्याः’ तेहीं नेवो आदरिलीः तें गाये हागिलीः मुतिलीः कंपायमान होउनी हंबरडा हाणितलाः तियेचेया सिंगापासाव खुरापासाव पुसापासाव रोमापासाव सर्वही योध्ये प्रवर्तलेः परिवारूः हस्तीः घोडेः सर्व दळ जालें: तें महावीर सहस्त्रार्जुनासी जुंझों लागलें: तेही सहस्त्रार्जुनाचे चातुरंग सैन्य संहारीलेः रावो पराभविलाः एकला रथेसी उरलाः कामधेनु मुख्य सर्वही स्वर्गस्थ होता देखिलेः दंपतेचि उरलीः मग राये कोपौनि म्हणितलें: ‘‘इतुकें हें एणें ब्राम्हणें केलें: म्हणौनि शस्त्र घातलेः अर्ध शीर निवटिलेः दुसरा घाव उचलिलाः तवं रेणुका आपणेयाते ओडविलेः तेही घाये पडिलीः कंठप्राण जालें: जमदाग्नि मारीलाः एकवीरा वरि पडिलीः तवं तियेसिही घाये लागलें: तें देखौनि राजेनि प्रस्तावा मानिलाः मग पोटी म्हणितलेः ‘मज तिन्ही अवध्य कीः’ मग सहस्त्रार्जुन नगरासि गेलाः परशराम कैळासीं महादेवापासी विद्याअभ्यासु करित होताः तवं एकवीरा धावा फोकरिलाः ‘परशरामा धावः’ ऐसें तीनि वेळ म्हणितलें: तवं महादेवें म्हणितलें: ‘जा तुमचेया माते आपत्ती पडिली असें: तें तुमतें बोलावीत असेः जमदाग्नि घाइं पडिला असेः’ मग तेथ आलाः तवं एकवीरा घाए टुकटुकीत असेः जमदाग्नी घाइ पडिला असेः एकवीरा म्हणितलें: ‘बा आलासि?’ परशरामें म्हणितलें: ‘हो आइः आलों:’ रेणुका म्हणितलेः ‘सहस्त्रार्जुने वधिले रेः’ म्हणौनि पूर्वकथन केलेः आणि परशराम कदळीपत्रवत कोपायमान जालाः आणि म्हणितलेः ‘आइः सहस्त्रार्जुनाते आताची वधुनि येतोः’ परशरामे ऐसीं पैज घेतलीः ‘एकवीस वेळ पृथवी निक्षेत्री करीः तरि परशरामु होः’ माता म्हणितलेः ‘बापाः आधी आमचा संस्कारु करीः परि निशले भूमिके संस्कारू करावाः श्रीदत्तात्रेयप्रभु आचार्य करावेः’ परशरामें म्हणितलें: ‘ते मियां ओळखावें कैसेनि?’ तिया म्हणितलें: ‘‘तयाचेनि दरीसनें निर्जवें तिये सजिवें होतीः कावडी कोंभ फुटतीः तें वीधि सांघेति तो तुवा करावाः आमची उध्र्वगती होइलः मग सहस्त्रार्जुनाचा वध करावाः’ ऐसें म्हणौनि एकवीरा देह ठेविलेः परशरामें दोन्हीं कावडी घातलीं: हाती धनुष्यबाण घेतलेः मग कावडी खांदावरि घालुनि बहु दी हिंडिनलाः ऐसां हिंडत हिंडत सैहाद्रासि आलाः ऐसां जातु असेः तवं पैलाकडौनि श्रीदत्तात्रेयप्रभु पारधियाचेनि वेषें बिजें करीत असतिः खळीचा साउला मालगंठी वेढिला असेः डाविये श्रीकरीं शुनयांचां जवटुः तियेची काखे गडियापाः उजवीये श्रीकरीं मासः आणि सुरैची करवतीः श्रीमुकुटीं दोरीयाणाः कर्णयुगळीं ताडपत्रेः श्रीचरणीं दुतपिया उपान्हौः सरिसीं आउसें होतीः तियें खळीचां साउलाः परिवंटे नेसलीं होतीः खळीची चोळीः पाखेया गांठीः मोकळी वेंणीः नासिकीं मुक्ताफळः पायीं दूतळीया वाहाणाः हाती धनुष्यबाणः ऐसें देखिलेः तवं कावडीं कोंभ फुटलेः परशरामे तैसीचि कावडी ठेविलीः चातुर्दक्ष पाहीलेः तवं अन्यत्र काही नाहीं: हेचि देखे आणि सुख जालें: माता खूण सांघितली तें समीक्षा पूरलीः आणि दंडवत घातलेः दंडवतासि आलाः श्रीदत्तात्रेयप्रभु निराकरूं लागलें: ‘आरे हें काइः तू ऐसां: आम्हीं ऐसें: परता परताः’ तेही म्हणितलेः ‘ओळखीलेया बुद्धी काइसी?’ परशरामु विनउं लागलाः परि श्रीदत्तात्रेयप्रभु विनवणी न स्वीकरीतिः मग सरिसीं आउसें होती तिहीं विनविलेः तेव्हेळी स्वीकरिलीः ‘‘हो कां उठीः’’ उठौनि पाहे तवं ब्राम्हण वेषः जवळी मायादेवीः ऐसीं श्रीदत्तात्रेय देवाची ‘ऋशिस्वर मूर्ति देखिलीः मग परशरामे माता जे आज्ञा दिधलीः तें श्रीदत्तात्रेयदेवाप्रति निवेदिलीः ‘जी तरि राऊळी चरितार्थ करावेः’ ‘हो कां:’ म्हणौनि मूळदरीसि बिजें केलें: श्रीदत्तात्रेयप्रभु म्हणितलें: ‘परशरामा एथ सर्व तीर्थ आणावी लागतिः’ परशरामे म्हणितलेः ‘सहस्त्रार्जुनाचा वध आणि हें कृत्य थोर साकडें असे जीः जी जीः गोसावीयांचा श्रीचरणीं सर्वतीर्थ असतिः’ श्रीदत्तात्रेयप्रभु परशरामाकरवी बाणु काढविलाः परशरामें बाणु काढिलाः मग श्रीदत्तात्रेयप्रभु म्हणितलें: ‘परशरामा एथ बाणु घालीः म्हणौनि बाणु घालविलाः परशरामें तेथ बाणु घातलाः आणि भुडकरि उदकाची उकळी निगालीः तेथ श्रीचरणीचां आंगुठा धुतलाः सर्व तीर्थ केलीः आचार्यत्वाचां वेषु स्वीकरिलाः परशरामे स्नान केलेः सर्वतीर्थ दसदेहिक थ्याोचित उधेक्रिया केलीः मूळदरिये संस्कारु केलाः तें अश्यरीरिणी वाचा जालीः ‘तृप्ति नव्हेंचिः’ मग परशरामे श्रीदत्तात्रेयदेवाप्रति सांघितलें: श्रीदत्तात्रेयप्रभु एकु गोटा घेतलाः मूळपीठी प्रतिष्ठिलाः सुराअर्चन केलेः भोगाते पाव ऐसें म्हणितलें:’’ महादाइसीं पुसिलें: ‘‘जी जीः सरिसी होती तियें कव्हणें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तियें अनघाः तियें मायादेवीः’’ ‘‘जी जीः’’ म्हणौनि श्रीचरणां लागली :।।:
  • Uttarardha Charitra Lila – 453
  • Mahur : श्रीदत्तात्रेयप्रभु अवतारू ज्ञान करणें :।।:
  • एकु दीं महादाइसीं गोसावीयांतें पुसिलें: ‘‘जी जीः श्रीदत्तात्रेयप्रभुंचा अवतारू तो कवणिये युगीचां?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः श्रीदत्तात्रेयप्रभुचां अवतारू तो त्रेतीः अनसुयेचया गर्भी ऋषिकुळीं स्वीकरिलाः बाइः श्रीदत्तात्रेयप्रभुचां चतुर्युगीं अवतारूः तें चहु युगीं राज्य करितातीः नाना वेषें क्रीडा/कृडा करितातीः’’ ऐसा गोसावी तयाचां स्वीकारू सांघितला :।।:
  • Uttarardha Charitra Lila – 453
  • Mahur : अळर्का भेटिः अनुसरण कथन :।।: / :॥: अर्लकाचे त्रिताप हरने :॥:
  • गोसावीयांसि गणपतिमढीं अवस्थान असतां एकु दीं महादाइसीं पुसिलें: ‘‘जी जीः श्रीदत्तात्रेयप्रभुंचा शिक्ष्य अळर्कः तयाचि तपनिवृत्ति केलीः ऐसें पूराणिक म्हणतिः तें साच जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साच बाइः’’ महादाइसीं पुसिलं येः ‘‘श्रीदत्तात्रेयप्रभु गोसावी अळर्कासि कव्हणा भाखाः कव्हणें वेषें भेटि दिधली?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः मातांग वेषें:’’ महादाइसीं पुसिलें: ‘‘जी जीः तें कैसी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तिहीं तापीं तापला अळर्कु खिडकद्वारहिूनि निगालाः तो सैहाद्रासि आलाः ऐसां वनदेवाचेनि पाठारेहुनि जातु असेः पर्वतासमीप आलाः तवं श्रीदत्तात्रेयप्रभुतें स्पर्शाेनि मळयानीप आंगी विसांवलाः आणि अळर्कऋषी म्हणितलें: ‘आजी कव्हणें पुरूखेसीं भेटि होइल पां?’ तवं पैलाकडौनि श्रीदत्तात्रेयप्रभु मातांगवेखें बिजें करीत असतिः उभय धाटिया खळिउ साउला नेसला असतिः कटीप्रदेशीं परिवंटीं मांसभेदिती तीक्ष्ण काती खोविली असेः श्रीकंठी बोरिया मणियांची गांठीः श्रीचरणीं दुतळिया उपान्हौः उजविये श्रीकरीं काठीः बाबरझांटीः गुंजावर्ण डोळेः मुकटी दोरियाणाः पिंगटा सुनयाची जोडः खांदावरि गळत मांसाची कावडीः तेणें पेराभारें श्रीमूर्ति ऐसीं ऐसी लवतिलवति जात होतें:’’ म्हणौनि गोसावी अनुकार करौनि दाखविलेः ‘‘तवं पुढा अळर्कातें देखिलें आणि ‘शंबोली शंबोली’ ऐसें म्हणतिः आणि तेवीचि काठीया भूमि हाणतिः ऐसें त्रिशेद्ध ‘शंबोली शंबोली’ म्हणौनि तीनि वेळ काठिया भूमि हाणितलीः अळर्कु तिहीं तापीं तापला जळत जातु होताः तो निवालाः अळर्कें म्हणितलें: ‘काइ पां: मीं जळतु होता तो काइसेनि पां निवालाः’ ऐसें पाहिलें: तवं श्रीदत्तात्रेयप्रभुतें देखिलें: आणि दंडवत घातलें: श्रीचरणां लागलाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘अळर्काचें तिन्हीं तो दरीसनासरिसें शंबोली शंबोली म्हणौनि फेडिते जालें: कां तें वाणी अमृतवर्षिणी कीं: सुख जालें आणि जैसे स्वरूप तैसें देखिलेः मग अळर्कु श्रीदत्तात्रेयप्रभुंचां ठाइं अनुसरलाः प्रेम दिधले आणि सन्निधानी असों लागलाः’’ यावरि महादाइसीं म्हणितलें: ‘‘जीः तयां तेया वाचेपासौनि अमृत वर्षलें: तरि आम्हासि ये वाचेपासौनि अमृत वर्षतेः तिया वाचा आपकार्यचे तो गेलेः आता या अमृतसंजीवनिया वाचा आमचेही ताप गेले जीः’’ म्हणौनि नमस्कारू केलाः गोसावी उगेयाचि मानिलें :।।:
  • Uttarardha Charitra Lila – 454
  • Mahur : एकवीरे भोगु कथन :।।: 
  • गोसावीयांसि प्रतिष्ठानी गणपतिमढीं अवस्थानः उदेयाचां पूजावसरू जालेयानंतरे गोसावी विहरणा बीजें करीत होतें: महादाइसें मुख्यकरौनि अवघी भक्तीजनें सरिसीं होतीं: एकवीरेचा पव्हा अपारू आला होताः चीन्हीं चीन्हीं अपारें आलीं होतीं: तें देखौनि महादाइसीं पुसिलें: ‘‘एकवीरेचिये यात्रेसि अवघा लोकु जात असेः तें काइ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः श्रीदत्तात्रेयप्रभु प्रतिष्ठा केलीः तें भोगाते पाव ऐसें म्हणितलें होतें: म्हणौनि भोगातें पावत असें:’’ :।।:
  • Uttarardha Charitra Lila – 456
  • Mahur : मेरूवाळा जळक्रीडा/कृडानुवादु :।।:
  • एकु दीं महादाइसीं पुसिलें: ‘‘श्रीदत्तात्रेयप्रभु मेरूवाळां जळक्रीडा/कृडा करितातीः हें साच जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साचः बाइः अद्यापी श्रीदत्तात्रेयप्रभु मेरूवाळा जळक्रीडा/कृडा करितातीः’’ :।।:
  • Uttarardha Charitra Lila – 636
  • Mahur : शंकराचार्यां वरप्रदान कथन :।।:
  • एकु दीं बेलोपूरीं म्हाइंभटीं गोसावीयांतें पुसिलें: ‘‘जी जीः यां संन्यासीयासि सीखासूत्र नाहीं: संध्यास्नान नाहीं: कव्हणीचि कर्म नाहीं: आणि यांसि लोकीं एसणीं मान्यता उपाधी काइसीं जी?’’ यावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘शंकराचार्ये संन्यासचिन्ह प्रतिष्ठिलें: तें भटाचार्ये खंडिलें:’’ म्हाइंभटीं पुसिलें: ‘‘ते कैसें जी?’’ गोसावी यथाप्रकारें सांघितलें:।: एकु दीं शंकराचार्य मातापूरासि जाउनी श्रीदत्तात्रेयप्रभुतें वरद केलें: श्रीदत्तात्रेयप्रभु दरीसन दिधलें: शंकराचार्ये साष्टांग नमस्कार करौनि पूर्वकथन केलें: मग श्रीदत्तात्रेयप्रभुसि विनविलें: ‘‘जी जीः मियां दरीसन केलें असेः तें लोकीं मान्य होआवें जीः’’ श्रीदत्तात्रेयप्रभु ‘‘होइलः’’ ऐसां वरू दिधलाः तेणें लोकीं एसणीं मान्यताः’’ :।।:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: