Kanashi (कनाशी)

कनाशी, ता.भडगांव जि.जळगांव


येथील 5 स्थाने 2 ठीकानी आहेत -
वसती 4 स्थाने - ही स्थाने गावातच दक्षिणेकडील भागात भव्य मंदीर आहे. येथे मुख्य मंदीर व मंदीर परिसरात ही सर्व स्थाने आहेत.
नांदनी आसन स्थान - हे स्थान कनाशी गावाच्या दक्षिणेकडे नाल्याचे पलीकडे भव्य मंदीर आहे व नांदनी विहीर आहे.


जाण्याचा मार्ग :

कनाशी हे गाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावरील कजगावपासून उत्तरेस 6 कि.मी. आहे. वाघळी ते कजगाव 8 कि.मी. भडगाव ते कजगाव 16 कि.मी. मुंबई-भुसावळ मध्य रेल्वेमार्गावरील चाळीसगाव पाचोरामधील कजगाव अथवा नगरदेवळा रेल्वेस्थानकांवर उतरून कनाशीला जाता येते. कजगाव रेल्वेस्थानक ते कनाशी 5 कि.मी. नगरदेवळा रेल्वेस्थानक ते कनाशी 5 कि.मी. कनाशीला जाण्यासाठी चाळीसगावहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान कनाशी गावाच्या दक्षिणेस ओढ्याच्या पलीकडे नांदणीच्या (बारवेच्या) आग्नेय काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वाघळीहून कनाशीला आले. प्रथम त्यांना येथे आसन झाले. (पू.ली. 381, स्था.पो.)

येथील इतर लीळा :

(1) दादोस, इंद्रभट, काकोस, सारंगपंडित, एल्हाइसा, आबाइसा, माहादाइसा, उमाइसा, गौराइसा, सामकोस, सोभागा या सर्वांची भेट येथे झाली. (पू.ली. 381)

(2) एल्हाइसाचे ‘साधा’ नामकरण करणे. (पू.ली. 382)

(3) सामकोसाचे ‘मदळसा’ नामकरण करणे. (पू.ली.383)

(4) इंद्रभटाते सुखस्वस्ति पुसणे. (पू.ली. 384)

(5) ब्राह्मणा अभ्यार्थनी भृत्याते जेऊ पाठविणे. (पू.ली. 385)

(6) सर्वज्ञांना दुपारचा पूजावसर, आरोगणा, पहुड, उपहुड येथेच झाला. (पू.ली. 385, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. वसती स्थान :

हे स्थान कनाशी गावाच्या दक्षिण विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. आवाराचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. याला कन्हैयालाल बाबा मंदिर सुद्धा म्हणतात.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंना नांदणीच्या काठावर आसन असताना सायंकाळच्या वेळेस गावातून एक ब्राह्मण आला. त्याने सर्वज्ञांना विनंती करून आपल्या घरी आणले. सर्वज्ञांच्या वेळी येथे त्या ब्राह्मणाचे घर होते. मर्दना मादने झाल्यावर सर्वज्ञांना या ठिकाणी आसन झाले. पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा, विडा झाला व येथेच त्यांचा एक रात्र मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर ते येथून भडगावला गेले. (पू.ली. 386, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील सर्व स्थाने. (2 ते 5)


3. मर्दना स्थान :

हे स्थान देवळाच्या गाभाऱ्यातून बाहेर येताच दक्षिण बाजूस (उजव्या हाताला) आहे. ब्राह्मणाच्या घराच्या ओसरीवरील हे मर्दना स्थान होय. (पू.ली, 386)


4. मादने स्थान :

हे स्थान मर्दना स्थानापासून ईशान्येस 12 फूट 6 इंच अंतरावर आहे. (पू.ली. 386, स्था.पो.)


5. आसन स्थान :

हे स्थान देवळाच्या सभामंडपासमोर पश्चिमाभिमुख देवळात आहे.

लीळा : ब्राह्मणाने सर्वज्ञांना विनंती करून आपल्या घरी आणल्यावर प्रथम त्यांना येथे बाज सुपवतीवर आसन झाले. ब्राह्मणाच्या पत्नीने तांब्याभर पाणी आणून सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. (पू.ली. 386)


अनुपलब्ध स्थान :

1. ब्राह्मणा अनुवर्जनी वेवाचा दृष्टांत निरूपणे स्थान.


कनाशीची एकूण स्थाने : 6


  • Purvardha Charitra Lila – 381
  • Kanashi : कानसें मळां देवां: शिक्ष्या भेटि :।।:
  • दादोस बीडीहुंनि गेलेयां किती एकां दिसां श्रीप्रभुचेया दरीसना गेले होतेः तेथौनि मागौते आमचीयां गोसावियांचिया दरीसना निगालेः निगतां दादोसी श्रीप्रभूतें पुसिलें: ‘‘जी जीः गोसावी कव्हणीं ठाइं भेटती जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आवो मेला जायेः कानडगावां जाये म्हणेः भालुगावां जाये म्हणें:’’ तैसेचि दंडवत करौनि निगालें: परि ते गोसावियांपासी उजू न येतिचिः तें वडनेरावरूनि वविदेयासि गेलेः तेथुनि तें चारठाणेयां आलेः तेथं लाहामाइसे एल्हाइसें साधऋषी होतीं: दादोस तें एल्हाइसासि साधोंस सोयरे होतिः तयांचीये वोसरियेवरि बैसलेः एल्हाइसें आबीलीचा डेरा खरवडीतें होतीः दादोसासी भेटि जालीः श्रीप्रभुचां महिमा निरूपू लागलें: एल्हाइसीं पुसिलें: ‘‘रामाः कव्हणीकडुनि येत अससि?’’ दादोसी म्हणितलें: ‘‘ना रूद्धपुरूनिः’’ एल्हाइसीं पुसिलें: ‘‘तू एतुके दिस कव्हणीं ठाइं गेला होतासि?’’ दादोसी म्हणितलें: ‘‘ना श्रीप्रभुचा ठाइं:’’ एल्हाइसीं पुसिलें: ‘‘काइ करूं गेला होतासि?’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘श्रीगुंडम राऊळां गोसावियांचिया दरीसनाः’’ एल्हाइसीं म्हणितलें: ‘‘गुंडम राऊळ तें कव्हण? लेकरूवां पाठीं धावतिः पिसेः पिसेः राऊळ ते?’’ दादोसी म्हणितलें: ‘‘हो वोः हो वोः बाइः पिसे पिसे राऊळ ते?’’ तैसीचि स्तीति जालीः आणि डेरेयांतु डोइ सूनिः ‘‘होए वोः होए वो तेः’’ म्हणौनि तियें डेरांआंत डोइ भोवंडीतिः दादोसीं डेरा फोडिलाः लाहामाइसाकरवी खांद चुरविलेः आणि स्तीति भंगलीः मग एल्हाइसीं पुसिलें: ‘‘रामाः आतां तू कव्हणीकडें जात अससि?’’ दादोसी म्हणितलें: ‘‘नां श्रीचांगदेवराऊळा गोसावियांचिया दरीसना जाइनः’’ एल्हाइसीं म्हणितलें: ‘‘तरि मीहीं येइनः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘याः’’ मग सरवळेयाचां पोतें भरीलें: लाहामाइसें: एल्हाइसें: काकोस ये तेथौनि निगालीं: तें रावंसगाउनी साडेगावां आलीं: तेथौनि करंजाळेयासि आलेः करंजाळां सामकोसां भेटलेः तियें तयासरिसीं निगालीः ऐसें अवघेया शिक्ष्यांसि भेटलेः आबैसें: उमाइसें: महादाइसें: सामकोसें: सोभागें: गौराइसें: गौराइसांचें भ्रतार नागदेवोभटः काकोः मार्तंडः ऐसीं अवघी साडेगावूनि निगालीं: तियें गाउनी गावां कानडी भालुगावां आलीः गावीचीयातें पुसिलें: ‘‘एथ श्रीचांगदेवोराऊळ गोसावी होतें कीं:?’’ तेही म्हणितलें: ‘‘एळापूरासि गेलेः’’ भालगावूनि एळापूरासि आलीः तेथ पुसिलें: तवं गोसावी हातनौरासि बिजें केलें: हातनौरासि आलीः तेथ पुसिलेः गोसावी कनरडेसि बीजें केलें: तवं कनरडे आलीः तेथही शोधिलें: तवं तेथौनिही गोसावी सागव्हाणासि बिजें केलें: मग कनरडे वसिनलीः तेथ ब्राम्हणी सांघितलें: ‘‘परवां एथौनि गोसावी साव्हाणासि बिजें केलें:’’ मग तेथौनि निगालीं: गाउवें च्यारि आलीः सागव्हाणासि आलेः सागव्हाणीं पुसिलें: तेहीं म्हणितलें: ‘हे नव्हे गोसावीं वागुळीएसि कालि बिजें केलें:’’ ऐसें एकें पेणेनि गोसावी पुढां बिजें करीतिः एकें पेणेनि दादोस मागें येतिः एरी दीं दादोसीं: महादइसीं अवघेयातें म्हणितलें: ‘‘जयासि टाकैल तिहीं यावें: न टके तेहीं हळुहळु यावें: आम्हीं आजी गोसावियांतें देखौनि तेव्हेळी चुळु पाणियां भरूनिः गोसावियांचा उचिष्ट प्रसाद तेचि अन्नः चरणोदक तेचि उदकः’’ ऐसा परिछेदु केलाः महादाइसीं म्हणितलें: ‘‘दादोः मीं तुम्हासरिसी वहिली येइनः’’ तैसींचि तियें दोघें पुढां निगालीं: ऐसां तियें वागुळिएसि आलीं: तवं गोसावी तियेची दिसीं तेथौनि बिजें केलें: तवं गोसावी कानस पातलेः गावां इशान्येवभागीं मळाः तया मळेयाआंतु गोसावी बिजें केलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः घाला जाडीः एथ आसन कराः’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः उदेयांचि कैसें आसन? एवडेयाचि वेळा काइ राहिजैल? गांवु सानाः दिस सांकडाः ब्राम्हणाचें एकचि घरः पुढारेयां चालिजो बाबाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः वारेनि कडबाडाचीं पानरटें उडतें येतें असतिः तैसी बापुडी याकारणें येतें असतिः तया हातीं जावो लभे? घाला जाडीः’’ बाइसीं आसन केलें: गोसावी आसनीं उपविष्ट जालें: तेथ जोगी आणि जोगिणी बैसलीं होतीं: तिहीं गोसावियांतें आसनी देखिलें: तेही उठिलें: निगतां जोगिणी म्हणितलें: ‘‘एाि कैसें सौंदर्यः साक्षात गोरक्षनाथुः’’ तेणें जोगीये म्हणितलें: ‘‘होए देवीः पृथ्वीपलेटन केलें: बहुत पुरूख देखिलें: ऐसां पुरूख कव्हणीं नाहीं देखिलाः कैसें लावण्य सौंदर्यः’’ ऐसिया गोष्टि करितें मार्गे जातें असतिः तवं दादोस महादाइसें तिये असतिः तें महादाइसीं आइकीलें: आणि तयातें पुसिलें: तेहीं अवघें सांघितलें: मग महादाइसीं म्हणितलें: ‘‘दादोः दादोः तें आमचे गोसावीः’’ महादाइसीं तयातें म्हणितलें: ‘‘आमची मागीलीकडें येतें असतिः तयापुढें सांघावें तुमचे गोसावी पुढीली गावीं मळां असतिः तुम्ही वहिलीं याः’’ दादोसः महादाइसें: उमाइसें गोसावियांते टाकौनि हरीखैजत मळेयासि आलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः महात्मे आले मां:’’ गोसावी नावेक साउमेयां बीजें केलें: दादोसीं गोसावियांतें देखिलें: तेथौनि दंडवतेसीं आलेः दादोसां: महादाइसां क्षेमाळिंगन दिधलेः दंडवतें घालौनि उभयवर्ग बैसलीं: गोसावी क्षेम पुसिलें: तेहीं पूर्वकथा सांघितलीः गोसावी म्हणितलें: ‘‘कोण कोण तियें?’’ दादोसीं पृथकाकारें नामें सांघितलें: मग मागिलीकडौनि अवघीं आलीं: दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीः पानेपोफळे आसनावरि ओळगौनि अवघी श्रीमूर्ति अवलोकितें बैसलीः गोसावी पुसिलें: ‘‘तुमची अवघी आली कीं कोण्हीं मागें असे?’’ तेही म्हणितलें: ‘‘जी जीः मागें सोभागें असतिः तयाचा पावो अवटळलाः तें मागें कुंटितें कुटितें येत होती जीः’’ हें परिसौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें: सोभाग आलें:’’ गोसावी हरीष स्वीकरिलाः मार्तंड तें बाइसांचे भाचेः मागा कव्हणा ठाइं दरीसन होउनि सन्निधानी राहिले हें नेणिजेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मार्तंडा जाः तुम्ही आणि बटीक सोभागातें पाठकुळीये घालूनि आणाः’’ मार्तंड आणि चांगदेवभट गेलेः तेयातें पाटकुळीये वाहुनि आणिलीः खाली उतरलीं: सोभागांसि भेटि जालीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘सोभाग आलें मां:: सोभाग आलींतिः’’ तवं तियें ‘‘जी जीः’’ म्हणौनि बैसलीः बाइसीं चरणक्षाळण केलें: अवघेयां चरणोदक दिधलें: अवघेयां तांबुळ प्रसाददान केलें: एल्हाइसातें देतें होती तवं एल्हाइसें नेघेतिचिः मग दादोसीं म्हणितलें: ‘‘एल्होः घेः’’ अवडळभटातें घेतां देखिलेः मग एल्हाइसीं तांबुळ हातीं घेतलें: काकोसांची वास पाहातें असतिः पोटीं म्हणितलें: ‘काको घेइल तरि मीं घेईनः’ काकोसीं भितरीं घेतलें: काकौयें म्हणितलें: ‘‘एल्होः घेयाः’’ मग एल्हांइसीं घेतलें: तें अमृतोपम अनुभवा आलें: आणिकही इच्छीतिः परि पावतीचिनाः तियें गोसावियांची श्रीमूर्ति देखौनि वेधली आणि गोसावियांची श्रीमूर्ति अवलोकितें उभीचि असतिः तेणें डोइयेचें पोतें गळेयासि आलें: परि काही स्मरेनाः डोळे वाटारूं लागलीं: अवघीं भक्तिजने म्हणतीं: ‘‘आवों गोसावियांसीं दंडवते घालीः’’ परि उगीचिः मग बाइसीं पुसिलें: ‘‘हें देखिले बाबाः हें ऐसें काइः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तीर्थः देवताः पुरूखः इये तीनि आपलवीति कीं:’’ बाइसीं पुसिलें: ‘‘ते कैसी बाबा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तीर्थ जैसी वाराणसीं: देवता जैसी सारंगधरः आणि पुरूख जैसें हें आणि काइः’’ मग दादोसीं वेधली देखौनि म्हणितलें: ‘‘एल्हौचिये गळांचें पोते घेयाः एल्हो गोसावियांसि नमस्कारू करीलः’’ मग इंद्रभटीं एल्हाइसांचिये गळांचें पोतें घेतलें: एल्हाइसें दंडवत न करीतिचिः तेव्हेळी सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यें एथ दंडवत न करी तें काइः’’ मग तेहीं दंडवतें घातलीः श्रीचरणां लागतां लववेनाः तेव्हेळी गोसावी श्रीचरणु साउमा नेउनी आंगुठा निडळीं लाविलाः तेणें विमळ सुख जालें: बैसलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः आधीं याचा माथा सिंपाः मग पाणी पाजाः’’ बाइसीं आधी माथा सिंपीलाः मग पाणी पाजीलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मे हो ये तुम्हां काइ होति?’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘जी जीः संबंधीयेः चुलतीः’’ सर्वज्ञें एल्हाइसातें म्हणितलें: ‘‘तुम्हीं एथीचे भेटिकारणें भागलेतिः श्रमलेति मां:’’ आणि परमसुखातें पावलीं: मग म्हणितलें: ‘‘जीजीः या चरणारविंदासीं दरीसन जालें: आणि सर्वताप गेले जीः’’ ऐसें म्हणौनि बहुत स्तविलें: ऐसें अवघेयां शिक्ष्यांसी दरीसन दिधलें: मग गोसावी एरातें अवलोकुनि आबैसांतें पुसिलें: ‘‘बाइः ये कव्हणे? ये कीं अपूर्वेः’’ आबैसीं सामकोसांकडें दाखउनी म्हणितलें: ‘‘जी जीः ये अवडळाची माताः’’ गौराइसातें म्हणितलें: ‘‘हे अवडळांची लेंकः’’ नागदेवोभटातें म्हणितलें: ‘‘हा अवडळांचा जावाइः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें तरि ये अवघीं अवडळीं लाविली मां:’’ गोसावी सामकोसातें म्हणितलें: ‘‘हे काइ बाइः इतुलियां दूरि कैसीं आलेति?’’ तिया म्हणितलें: ‘‘जीः आपुलेया गोमटेयाकारणें आलीं: गौराया गोसावियांकारणें पाइ चिंधीया बांधलीयाः वाहाणा वर्जिलियाः माथाचें न्हवन वर्जिलेः तेलः तूपः दहीं: दूध वर्जिलें: बरवीं अन्नें वर्जिलीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ए धाकुट धाकुटीः एथचेया दरीसनासि कां आली? बाइ वाराना? एथचेया दरीसना येतें असतिः माथांचा जाः वाळेनाः एथें पिसे एक आतिः तें लागे तरि काइ?’’ सामकोसीं म्हणितलें: ‘‘ऐसें लागो कां जीः तरि एं दैवाची भाग्याचीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें तरि तुम्हीं मदळसा म्हणाः’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः हाही गोसावियांचाची प्रसादः’’ ऐसां वाक्यीं गोसावियांतें परीतोखविलें: एथ गोसावी प्रसादाचें नाम ठेविलेः गोसावी दादोसातें पुसिलें: ‘‘तुमचें कुटुंबपरिवार निकेनि असें?’’ तेही म्हणितलें: ‘‘जी असेः’’ मग गोसावी महादाइसातें पुसिलें: ‘‘वायनायकः तुमची माताः आपलो ऐसें निकेनि असति?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जी असतिः’’ ऐसीं गोसावी अवघी क्षेम वार्ता पुसिली :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी हातनुर-कन्नड-सायगव्हाण-वागुळिवरुण कनाशीला आले. येथे स्वामीचे काही काळ वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा.…)
  • Purvardha Charitra Lila – 382
  • Kanashi : दमनिका स्वीकारें एल्हाइसां साधें नामकरण :।।:
  • मग दादोसीं एल्हाइसें आंघोळी धाडिलीः दादोसीं वीहिरी दाखविलीः ‘‘एल्होः स्नान करिः जायेः’’ गेलीः आंघोळी केलीः पूजा करावेया काही पुष्पें पाहात होतिः तवं पुष्पें काही देखतिनाः तवं तेथ मळेयाआंतु दवणा देखिलाः तवं दवणेयांचें वाफे पाणीयें भरले असतिः माळीयातें म्हणितलें: ‘‘आलेयाः काही वावेया एतुका ऐसा दवणा दे कां?’’ तेणें म्हणितलें: ‘‘आइः घेया जाः’’ घेतलाः दोनि रोपें समूळी घेतलीः तेथचि सारणीसि नावेक वोहळिलीः चिखलु विसुळिलाः काही माती फिटली कांही न फिटेचिः घेउनि आलीः गोसावी आसनीं उपविष्ट असतिः दवणा आणुनि दोन्ही आवडदेवढीं करौनि श्रीमुगुटावरि गळतु समूळीं वाइलाः साष्टांगी पूजा केलीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीं: पुढां उभी राहिलीः दोन्हीं हात जोडुनि मग म्हणितलें: ‘‘जीः जीः संसारीं जन्मलेयाचें फळ आजी जालें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तें कैसें बाइ?’’ एल्हाइसी म्हणितलें: ‘‘हें नव्हे जीः जैसें तुम्हीं देखिलेतिः एहीं नेत्रीं गोसावियांचें दरीसन जालें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें होएः’’ श्रीमुकुटीचा दवणाः तयाचि मुळे दोहीं मुडपावरि दोंदावरि गळतिः तें चिखलाचें थेंब बाहुवरि पडतिः बाइसें आलीं: तवं श्रीमूर्तिवरि दवणा थिबतु असेः ‘‘ऐसें कोणें वो केलें बाबांसि? पाहा वो बाबाची वोली नासलीः’’ म्हणौनि सविया दिधलीयाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः यांसि कां कोपतें असा? ऐसें ये काइ जाणते असति? ये वराडिचीं साधें कीं:’’ एथ गोसावी साधें हें प्रसादिक नाम ठेविलेः बाइसीं दवणेयाची मुळे मोडिलीः मग बरवा दवणा श्रीमुगटांवरि वाइला :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी हातनुर-कन्नड-सायगव्हाण-वागुळिवरुण कनाशीला आले. येथे स्वामीचे काही काळ वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा.…)
  • Purvardha Charitra Lila – 383
  • Kanashi : सामको मदळसा नाम करणे :।।:
  • गोसावीं सामको म्हणीतलेः “हे काइ बाइः इतुलेयां दुरि कैसी आलींति ?” “जी जीः आपुलेया गोमटेयाचि कारणे आलीएं जीः” सर्वज्ञं म्हणीतलेः “तुम्ही आलीतिः मा एं कां आली ?” “जी जीः तीएं आपुलेया गोमटेयाकारणे आलीः “गौराया गोसावीयांकारणे पाइंचींधीया बांधलीयाः वाहाणा वर्जिलीयाः माथांचे न्हाण वर्जिलेंः तेलः तुपः दहीः दुध वर्जीलेंः बरवी अंने वर्जीलीः सर्वज्ञे म्हणीतलें : “बाइः ए धाकुटधाकुटी एथिचेया दरीसनासि आलीः मां एथिचें पीसें एक असेः तें लागेल तेवळि काइ कराल ?” “जी जी लागो का : तरि एं दैवांची भाग्याची” “ऐसें तरि तुम्ही मदळसा म्हणाः” (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी हातनुर-कन्नड-सायगव्हाण-वागुळिवरुण कनाशीला आले. येथे स्वामीचे काही काळ वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा.…)
  • Purvardha Charitra Lila – 384
  • Kanashi : नागदेवोभटा सुखस्वास्थ्य पुसणें :।।: इंद्रभटातें सुखस्वास्ति पुसणें :।।:
  • गोसावी इंद्रभटातें म्हणितलें: ‘‘महात्मेयापासौनि तुम्हां काही सुखस्वास्थ्य आति?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि एथचेया दरीसना यावेया काइ कारण?’’ तेहीं ऐसें म्हणितलें: ‘‘जीजीः दादोस ऐसें म्हणतिः ‘मागां द्वापरी श्रीक्रष्णचक्रवतिपासौनि अकृतिमु आनंदु आतिः तैसाचि कां आतां आमचीयां गोसावियांपासौनि आतिः’ जीजीः श्रीक्रष्णचक्रवतिपासौनि नरां: पशुवां: तिर्यंचां अकृतिमु आनंदु आतिः तयाचि आम्हां चाडः तया चाडां आलो जीः आनंदु तो ब्रम्हणोरूपिणाः’’ गोसावी गौराइसातें दाखविलें: ‘‘आनंदाचेया चाडा आलेतिः तरि हें काइ?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी वेदे ऐसें म्हणितलें: ‘धर्मे चः अर्थे चः कामे चः नातिचरामिः नातिचरतवः’ ऐसें म्हणितलें असें कीं: यदर्थी स्त्री वंचूं नयेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘धर्मे चः अर्थे चः कामे च असेः परि मोक्षेचि नाहीं कीं:’’ तेही म्हणितलें: ‘‘हो जीः तरि ये आपुलेया पुण्याकारणें आलीः आम्हीं आपुलेया पुण्याकारणें आलोः आपुलेया भलेयाचेया चाडां यांसि यावेयाची उत्कंठाः’’ गोसावी मानिले :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी हातनुर-कन्नड-सायगव्हाण-वागुळिवरुण कनाशीला आले. येथे स्वामीचे काही काळ वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा.…)
  • Purvardha Charitra Lila – 385
  • Kanashi : ब्राम्हणा अभ्यार्थनीं/विज्ञापनीं भृत्यातें जेउं पाठवणें :।।:
  • उदेयांचि महादाइसीं गोसावियांतें उपहारालागी विनविलें: ‘‘जी आजी एकादसी तरि मीं गोसावियांचि पूरता उपहारू करीनः’’ गोसावी विनती स्वीकरिलीः महादाइसें उपहार निफजउ लागलीः तवं गावांतुनि ब्राम्हणु एकु गोसावियांतें उपाहारालागी विनउं आलाः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलाः तेणेंही गोसावियांसि विनउ आदरिलें: ‘‘जीजीः माझेया घरा गोसावी बिजें करावेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देखिलें? रंधन वर्तत असें: आतां हें न येः मग हें नावां एकां विळींचां वेळीं येइलः’’ तेही म्हणितलें: ‘‘जी जीः तरि महात्मेयांतें धाडावेः बाइयातेही पाठवावेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइयां एकादसीः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जीः मजकारणें मोडावी जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यासि मोडणे नाहीं: या मासोपवासिनियाः दादेयांतें नेयाः’’ आणि ‘‘जा गाः जा गाः’’ म्हणौनि भक्तिजन पाठउं आदरिलेः मग अवडळः मार्तंडः काकोः नागदेवभटः उपाध्येः चांगदेवभटः उपासनिये अवघेचि निगालेः महादाइसीं गोसावियांलागी उपहारू निफजविलाः महादाइसासीं पोटीं ‘दादोसांतें गोसावी राहावावेः तें गोसावियांचीये पांती जेवीतेः’ ऐसा मनोधर्मः परि बोलों शंकेतिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइ बाइः भितरीं लुकलुकिते?’’ म्हणौनि श्रीकरें ऐसें केलें: महादाइसीं म्हणितलें: ‘‘जीजीं: दादोस राहाते तरि गोसावियांचीयें पांती जेवितेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मे होः तुम्ही राहाः’’ दादोस राहिलें: मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि कव्हण पां धाडिजे? पदुमनाभी तरि तुम्ही जाः’’ तवं बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः सदर्थाचे लेकरूः लोकांचीया घरा कैसें जेउं जाइल? बटकातें राहावावेः’’ म्हणौनि पदुमनाभीदेव राहाविलेः मग गोसावियांसि पूजाः आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः दादोसासि पांती जालीः तेणें महादाइसांसि थोर संतोख जालाः गोसावियांसि पहूड जालाः उपहूड जालाः आंगीटोपरें केलें: गोसावी विळुवरि तेथ होतेः समस्त भक्तिजन गोसावियांपासी आलेः नमस्कार करौनि बैसलेः मग तया ब्राम्हणाचे गुणविशेष सांघो आदरिलें: मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तो ऐसाचि होएः’’ तवं तो ब्राम्हणु आलाः तेणें विनविलेः ‘‘जी जीः आतां बिजें करावें:’’ :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी हातनुर-कन्नड-सायगव्हाण-वागुळिवरुण कनाशीला आले. येथे स्वामीचे काही काळ वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा.…)
  • Purvardha Charitra Lila – 386
  • Kanashi : रात्रीं ब्राम्हणाघरीं पूजा आरोगण :।।: / रात्रीं ब्राम्हणागृहीं मर्दनामार्जनें: पूजाः आरोगणा वस्ति :।।:
  • गोसावी विळीचांचां वेळीं भक्तिजनासहित तयाचेया घरा बिजें केलें: ब्राम्हणें सडासांर्जन चौकरंगमाळीका भरीलियाः दारीं गुढी उभिलीः रूइचीया देठयाचें तोरण बांधलेः बळीराजा केलाः ओसरीयेवरि बाजसुविती घातलीः तयावरि बाइसीं आसन रचीलें: मग तेथ गोसावियांसि आसन जालें: तयाचीये ब्राम्हणीसि चरणक्षाळण करावें ऐसीं वासनाः म्हणौनि तियें गोसावियांचे श्रीचरण प्रक्षाळावेया तांबीया भरूनि उदका घेउनि आलीः तियेचीए हातीचा तांबीया बाइसीं घेतलाः आणि चरणक्षाळण करावेया आलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्हीं राहाः आजी एथचेया यजमाना करूं देयाः एथीची यजमानें धुतिः’’ मग तेही उभयवर्ग चरणक्षाळण केलें: चरणोदक भितरीं घेतलें: मस्तकीं वंदिलेः चरणोदकें घर सिंपीलें: कोठा सिंपीलाः घोडवडी सिंपीलीः मग टिळाअक्षता विडा ओळगवीलाः बाइसीं म्हणितलें: ‘‘रूपैः बाबासि मार्जने बहुत दी नाहीं: चोखणी पाणी कराः’’ चोखणी केलीः पाणी ठेविले होतें: तेथचि आणिक रीचविलें: पाणी ठेवितां विनविलेः ‘बाबाः मार्जनें बहुत दीं नाहीं तरि किजोः’’ गोसावी मानिलें: बाइसें करूं रीगालीं: गोसावियांसि पडदणी ओळगवीलीः ओसरीयेएवरि आसन केलें: आडकानवडा जाडीचा बांधलाः तवं तेहीं चिकसा कालउनी आणिलाः मग बाइसें मर्दना करूं रीगालीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः मर्दना पदुमनाभी देइलः’’ मग गोसावी पदुमनाभीकरवी करविलें: पदुमनाभीदेव मर्दना देत असतिः तवं ऐसा समढं दादोसीं साधें धाडिलीं: ‘‘एल्होः जाये पां: गोसावियांसि अवसरू कीं अनअवसरूः ऐसें पाहौनि येः’’ आलीं: तवं बाइसें गोसावियांचें आंगीटोपरें लेउनी आंगणीं उभीं असतिः ‘गोसावी’ म्हणौनि साधे बाइसांकडें आलीः बाइसासि दंडवत करूं बैसलीः बाइसीं म्हणितलें: ‘‘एल्होः मीं: बाबा पैर्‍हा वोसरिएवरि असतिः’’ साधीं लावणें उघडुनि पाहिलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइ पाहातें असा साधे हो? देवो पाहातें असा?’’ तिया म्हणितलें: ‘‘जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘याः तुमचा देवो एथें असेः’’ आलीं: दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधें हो तुम्हीं मर्दना देवों जाणा?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः मीं नेणें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि वरैतयासि कोण उटी?’’ तिया म्हणितलें: ‘‘जीजीः आम्हा नायकां वागुंडुः आमतें चाटेबडुवे मर्दना देतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘लेंकरूवें न्हाणाः तरि लेंकरूवां काइ करा?’’ तिया म्हणितलें: ‘‘जीजीः तियें ऐसीं ऐसी गोरसी परिवसिजतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ते परिवसणें ऐसें एथ दाखवाः’’ मग तियें मर्दना देयावेया सावधे जालीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कासोटा देयाः’’ तिया म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ तिहीं कासोटा दिधलाः तवं मांडिया उघडीया घातलीयाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधे होः तुम्हीं आपुली मांडी परपुरूखां देखो नेदीजे कीं: स्त्रिया आपणांतें आवरूनि सावरूनि असिजे कीं: पालउ ऐसा खोवाः’’ पुढति सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘सरा गा पदुमनाभीः’’ मग तियें मर्दना देयावा सावधें जालीः मग साधीं मांडिया चिकसा लाविलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधे हो तुमतें बळ असें तेतुलेही एथ दाखवाः एर्‍हवीं एथौनि जाणीजत असिजेः’’ तिया म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग एकु श्रीचरणु उटिलाः वरीलु तळी तळीलु वरि केलाः सू सू करितें उटूं बैसलीः ‘‘साधे हो आतां पूरेः तुम्हीं राहाः तुमचें होतें बटिक उटिलः’’ म्हणौनि गोसावी पूरे करविलें: तिया म्हणितलें: ‘‘ये गा पदुमनाभीः’’ मग पदुमनाभी मर्दना दिधलीः तियें गोसावियांजवळी बैसलीं होतीः मैळा पडेतिः तेयाचा गोळा करीतिः साधें प्रसाद म्हणौनि मैळा घेतिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें काइ साधें हो?’’ तिया म्हणितलें: ‘‘जीजीः प्रसादु घेतलाः’’ मग पाणी सारिलें: गोसावियांसि चौरंगावरि आसन जालें: गोसावियांचा श्रीमुगुटीं चोखणी ओळगवीलीः गाडु ढाळीतांढाळीतां श्रीमूर्तिचेया पाणीयांचें चुळ पाठमापरि ठाकौनि भितरीं घेतिः बाइसें वस्त्रें आणूं गेलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधे हो बाइसां भियानाः बाइसें देखति तरि काइ करा?’’ तिया म्हणितलें: ‘‘जीजीः पाणीयांसीचि काइ भियावे जी? मीं प्रसादु घेति आहेः’’ बाइसें वस्त्रें घेउनि आलीं: आणि साधें पाणियां आंजुळी भरूनि पैर्‍हां गेलीः बाइसीं वस्त्र ओळगवीलेः मग गोसावी भितरीं बिजें केलें: ऐसें राजोपचारीं मर्दना मादने जालें: पूजा जालीः चंदनाचा आडा रेखिलाः धूपार्ति केलीः मंगळार्ति केलीः दंडवते घातलीं: ताट केलें: गोसावियांसि आरोगणाः गुळळाः विडा जालेयाउपरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधें हो आतां बिढारां जानाः रात्री वडील जालीः’’ साधीं गोसावियांतें प्रसादु मागितलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः साधांसी तीं बोटां मध्ये सामावें इतुका प्रसादु देयाः’’ साधीं प्रसादु घेतलाः ‘‘पदुमनाभीः साधांतें बोळवीत जाः’’ तेणें म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग साधें गेलीं: गोसावियांसी माचेयावरी पहूड जालाः तो बाम्हण आणि ब्राम्हणी गोसावियांचे श्रीचरणसव्हान करूं लागलीः मग गोसावियांसी पहूड जालाः तियें दोघे गोसावियांचिया पाइतियाकडें निजैलीः भक्तिजन पटिशाळें विसवलें:’’ दादोसीं साधातें म्हणितलें: ‘‘हें काइ एल्होः तुमतें गोसावियांचा अवसरू पाहों धाडिलें: मां सांघो न येसीचि? गेलीसि आणि तेथचि राहिलीसिः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘काइ सांघावें असे? गोसावियांसि पूजा होइलः ऐसें काइ नेणा? तुम्हीं कोणें कामें नाराचि? तुम्हीं कां न याचि? इतुकेनि दुरि तुम्हीं गोसावियांचिया दरीसना आलेतिः अन्नाउदकाचा परिछेदु कराः आणि आणिकी ठाइं बिढार करा? तरि तुम्हां पैर्‍हा बिढार काइसें? तुम्हीं गोसावियांचा अवसरू राखत असावें कीः मियां एवढा वेळु गोसावियांचा अवसरू पाहिलाः’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘कैसा जाला?’’ म्हणौनि मागिल सांघितलें: ‘‘गोसावी मज प्रसाद दिधलाः मग मीं आलीयें:’’ तें दादोसासी न मनेचिः मग गोसावियांसि तेथ वस्ति जाली :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी हातनुर-कन्नड-सायगव्हाण-वागुळिवरुण कनाशीला आले. येथे स्वामीचे काही काळ वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा.…)
  • Purvardha Charitra Lila – 387
  • Kanashi : मार्गी ब्राम्हणा अनुवर्जनीं वरप्रदान :।।:
  • एरी दीं उदेयांचि गोसावियांसि उपहूड झालाः गोसावी परिश्रया बिजें केलें: उदका विनियोग जालाः मग तेही आसन रचीलें: गोसावी श्रीमुख प्रक्षाळण केलें: श्रीचरण प्रक्षाळण केलें: चंदनाचा आडा रेखिलाः वरि दहियांचा टिळां आगम मात्र केलाः दहियाचें अक्षविन केलें: धूपार्ति मंगळार्ति जालीः उदेयाचा पूजावसर जालेंयानंतरें गोसावी आंगीटोपरें केलें: मग तेथौनि बिजें केलें: तयाचि ब्राम्हणी वेसीदारापासी राहविलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्हीं राहाः’’ ब्राम्हणु गांवीचीये सिवंवरि गोसावियांतें अनुवर्जित आलाः मार्गी सेताचीया पाटियाः तो ठावोवेर्‍ही आलाः तेथ तेणें म्हणितलें: ‘‘जीजीः हें माझे कामतः या माझिया पाटियाः सेतें दाइ भाइ हिरतलीं जीः’’ मग गोसावी तेथ उभे राहिलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटोः एथ काही मागाः’’ तेणें म्हणितलें: ‘‘काइ मागों जी? धुइपुतीं: कोठेया कोनी सुनाचेनि हातें बहुत ताकआंबिली हें द्यावें जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटोः हें होइल कीं: आणिक काही मागाः हें काइ मागावें असे? कर्मवशे जीव सकळही पावेः एकवांचैनिः’’ तेही म्हणितलें: ‘‘जी जीः या माझिया पाटिया सेतें दाइजीं हिरतली तिया सुटावियाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तियाही कर्मवशेंचि सुटतीः’’ तेही म्हणितलें: ‘‘जीजीः हेचि होआवेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे होइल हो राहाटी घडी बांधली असेः तें येः जायेः भरेः रीचवेः तैसें हें कर्मवसेचि होइलः आणिक काही मागाः’’ परि तेहीं तेचि मागितलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटो राहाः’’ परि तो राहेचिनाः गांवीचीये सिवंवरि बोळवीत आलाः मग राहाविलाः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलाः मग गेलाः बाइसीं म्हणितलें: ‘‘या ब्राम्हणासि काइ जाले? बाबा म्हणतिः ‘आणिक काही मागाः’ कीं तेणें त्रिशुध्दी ऐसेचि मागितलें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः यांसि जाली तेया साळीयाची परिः’’ ‘बाबाः साळीयाची परि कैसी बाबा?’’ यावरि गोसावी उभेया राहूनि वेवांचां दृष्टातं निरूपीलाः ‘‘कव्हणी एकु साळी हाटासि वेव घेवावेया जाएः हाटवेळु नव्हें म्हणौनि वृक्षा एका खाली साउली म्हणौनि निजें: वरूतें पाहे तवं सरळडाळ खांदी देखें: मग म्हणें: ‘याचें कैसें बरवे वेव होइलः’ तवं सरकरि वेव पडें: लवकरि उठिलाः झाडुनि वेव घेः खांदावरि घालीः निगें: मग तेणें वृक्षें म्हणितलें: ‘आगा आगा साळीयाः माग तुज प्रसन जालाः मागसी तें देइनः’ तवं तेणें म्हणितलें: ‘तू कोणु?’ मग तो म्हणें: ‘आगाः मीं कल्पवृक्षः कल्पीलेयां फळांतें दें: मीं प्रसन्न जालाः मागः’ ‘तरि मोडीयेतोडीये आणिक वेवचि दें:’ आणिक वेवं खाली पडिलें: तें घेतलें आणि निगालाः तैसी परि जाली यांसि बाइः कल्पवृक्षातें पावलेयां तेणें काइ वेवं मागावें: सुताउवें पाटाउवे मागावी नां: अथवा सुष्टें फळें कां मागेचिनाः मां वेंवचि मागीतलें: तैसें इश्वर प्रसन्न जालेयाः जीवें काइ विषयव्यवहार मागावाः इश्वर प्रसन्न जालेया जीवें इश्वराचें प्रेम मागावे कीं:’’ मग बाइसीं म्हणितलें: ‘‘ऐसें काइ जालें या ब्राम्हणासि? बाबानि जाणविलें परि प्रेम न मागेचिः’’ यावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘माया चक्रभ्रमणनें पर्यायवशे जीव सकळही पावेः एक वांचैनिः’’ मग गोसावी प्रेम प्रकरण निरूपिले :।।: बाइसें श्रीचरणां लागलीं: मग गोसावी बिजें केलें :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी हातनुर-कन्नड-सायगव्हाण-वागुळिवरुण कनाशीला आले. येथे स्वामीचे काही काळ वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा.…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: