राजमढातील स्थाने (डोमेग्राम)

राजमढातील स्थाने


येथील स्थाने 3 - नवीन बांधकामामुळे राजमढाचे अस्तित्व राहिले नाही.



श्रीचक्रधर मंदिरात उत्तर बाजूस पूर्वाभिमुख राजमढ आहे. सर्वज्ञांच्या वेळी हा मढ दक्षिणाभिमुख होता व त्यास ‘नरसिंह’ मढ असे नाव होते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

1. वसती आणि अवस्थान स्थान :

हे स्थान राजमढात मध्यभागी असून त्यावर संगमरवरी दगडाचे लहान पण प्रेक्षणीय देऊळ आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात पहिल्या वेळेस घोगरगाव-(ता. नेवासा) हुन डोंबेग्रामला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते; (पूर्वार्ध लीळा 232, स्थान पोथी) व दुसऱ्या वेळेस बाजाठाणहुन डोंबेग्रामला आले, त्यावेळी त्यांचे येथे सात दिवस वास्तव्य होते. (पूर्वार्ध लीळा 292, स्थान पोथी)

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू उत्तरार्धात पहिल्या वेळेस छिन्नपापहून डोंबेग्रामला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी सहा महिने वास्तव्य होते. (उत्तरार्ध लीळा 124, स्थान पोथी) दुसऱ्या वेळेस घोगरगाव (ता. नेवासा) हून डोंबेग्रामला आले. (उत्तरार्ध लीळा 215. त्या वेळीही त्यांचे राजमढामध्येच वास्तव्य होते. तिसऱ्या वेळेस ममदापूरहून डोंबेग्रामला आले. त्या वेळी त्यांचे येथे पंधरा दिवस वास्तव्य होते. (उत्तरार्ध लीळा 298, स्थान पोथी उ. को. प्रत)

येथील इतर लीळा : 1. दाइभागवतांच्याकडून ओटा करवून घेणे (पूर्वार्ध लीळा 232)

2. दाइभागवतांच्याकडून ओट्यासाठी चुना पिटवणे. (पूर्वार्ध लीळा 292)

3. सर्वज्ञांचा सकाळाचा व सायंकाळचा पूजावसर या ठिकाणी होत असे. (पाठसमुदायाची पोथी पूजावसर प्रकरण)

4. भक्तजनांना परावर शास्त्राचे निरूपण करणे. (पाठसमुदायाची पोथी आणि लीळाचरित्र)

5. नाथोबांच्याकरवी भटोबासांना बाहेर घालविणे. (उत्तरार्ध लीळा 125)

6. शरभंजन प्रसंगी देमाइसाला हिंसापाप निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 126)

7. नेवासा गमनी भटोबासांची ज्वरनिवृत्ती करणे. (उत्तरार्ध लीळा 128)

8. प्रार्धबाइसा व भटोबास यांना निर्वचन प्रकरण निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 129)

9. भटोबासांच्याकडून दोन वेळा विलक्षण पूजा करवून घेणे. (उत्तरार्ध लीळा 129)

10. भिक्षेचे पदार्थ लपविले म्हणून मार्तंडाला शिक्षापण करणे. (उत्तरार्ध लीळा 131)

11. म्हाइंभटांशी आक्षेपपरिहारपूर्वक चर्चा करून त्यांना ईश्वरप्रतीती करणे. (उत्तरार्ध लीळा 133)

12. म्हाइंभटांना बोध प्रकरण निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 134)

13. म्हाइंभटांना अनुसरल्याची चर्या निरूपणे, (उत्तरार्ध लीळा 136)

14. म्हाइंभटांना भिक्षाविधी व अटनविधी निरूपणे (उत्तरार्ध लीळा 137)

15. म्हाइंभटांना परमेश्वराचे चतुर्विध लक्षण निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 138)

16. म्हाइंभटांना महावाक्य निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 140)

17. म्हाइंभटांना संसरण प्रकरण निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 141)

18. म्हाइंभटांना देवता तथा क्रियास्वरूप निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 142)

19. देसाइसाला कुष्टधर्म निरूपणे (उत्तरार्ध लीळा 144.

20. सहस्त्रार्जुना वरप्रदान व परशुरामा भेटी या दोन लीळा भक्तजनांना सांगणे. (उत्तरार्ध लीळा 145,146)

21. बेडकाला वेधाने आकर्षित करणे. (उत्तरार्ध लीळा 147)

22. साधाला गुळभेदाची हकीगत सांगणे. (उत्तरार्ध लीळा 150)

23. लाहामाइसाची अक्षयतृतीया चरितार्थ करणे. (उत्तरार्ध लीळा 151)

24. साधा वैस्यगृहवास अभियोगे परिहासु. (उत्तरार्ध लीळा 152)

25. साधाला प्रसन्न होऊन वरदान देणे. (उत्तरार्ध लीळा 154)

26. वाराणसी मुक्तिक्षेत्र-निषेध. (उत्तरार्ध लीळा 159.

27. माहादासाला साभिमानीयाचे साभिमान निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 160)

28. माहादाइसाला, वाराणसीला जाताना तीर्थक्षेत्र अमोचक व परमेश्वर सन्निधान मोचक निरूपणे व वाराणसीला जाण्याचे निराकरणे. (उत्तरार्ध लीळा 161)

29. मासोपवासिनी प्रशोधनी मार्कंडा कोपणे. (उत्तरार्ध लीळा 168)

30. मंडळिका दुधानयेनि जीवपरीहारूभाव कथन. (उत्तरार्ध लीळा 170)

31. नाथोबा हृदयसुन्यता. (उत्तरार्ध लीळा 183)

32. मंडळिका देवता अनुवर्जित येणे. (उत्तरार्ध लीळा 184)

33. वैराग्य मिरवणे हा विकाराचाच एक प्रकार आहे, याविषयी भटोबासांना निरूपण करणे. (उत्तरार्ध लीळा 190)

34. दाइभागवतांच्याकडून ओट्यासाठी चुना पिटवणे. (उत्तरार्ध लीळा 192)

35. रामदेवाला शिखासूत्राचा त्याग निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 193)

36. बाइसी निरूपण पुसणे. (उत्तरार्ध लीळा 196)

37. पचन पाचन-निषेध निरूपण. (उत्तरार्ध लीळा 196)

38. उपासनीया रीद्धपुरी वासु नीक्षेदु. (उत्तरार्ध लीळा 197)

39. नाथवाणीची प्रशंसा करणे. (उत्तरार्ध लीळा 198)

40. आबाइसाला गुरू लक्ष सांगणे. (उत्तरार्ध लीळा 199)

41. चंद्रदेवांना खीरभोजनाला पाठविणे. (उत्तरार्ध लीळा 200)

42. चंद्रदेवांना लाडुभोजनाला पाठविणे. (उत्तरार्ध लीळा 201)

43. भुतानंदाला कोल्हापूरला पाठविणे. (उत्तरार्ध लीळा 202)

44. अन्यवार्ता निषेध निरूपण. (उत्तरार्ध लीळा 203) पाठसमुदायाची पोथी पूजावसर प्रकरण)

45. ज्ञान, भक्ती, वैराग्य निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 205)

46. म्हाइंभटांना संहार-प्रकरण निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 206)

47. भटोबासांना दुसरेनि अन्यव्यावृत्ती निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 209)

48. तथा पाहाले म्हणणे. (उत्तरार्ध लीळा 210)

49. बाइसांचे लखुबाइशी पाए धुणे. (उत्तरार्ध लीळा 217)

50. आउसाला सुपारीचा दृष्टांत निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 218)


2. वाहाटीला खांब स्थान :

हे स्थान मुख्य ओट्यापुढे दक्षिण बाजूस आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लाकडी खांब होता. तो खांब आता येथे नाही. फक्त त्या खांबाची जागा आहे. खाली दिलेल्या लीळा मुख्य स्थानावरच घडलेल्या आहेत. कारण सर्वज्ञांनी मुख्य ओट्यावर बसूनच खांब बाहाटलेला आहे; परंतु खालील लीळांचा संबंध खांबाशी असल्याने त्या येथे दिल्या आहेत.

लीळा : 1. सर्वज्ञ प्रार्धबाइसांना निर्वचन प्रकरण निरूपण करीत होते. तेवढ्यात बाइसा उंचमढातून आल्या आणि म्हणाल्या, “हा बाबा, येथे मी नाही, नागदेव नाही, तरी हे आपण कोणाला निरूपण करीत आहात?” तेव्हा सर्वज्ञ आवेशून म्हणाले, “आम्हाला जर इच्छा झाली, तर आम्ही एखाद्या खांबालाही निमित्त करून निरूपण करू.” असे म्हणून ओट्यापुढील खांबावर थाप मारली. (उ. ली. 129, स्था. पो.)

2. एके दिवशी रात्री जेवणे झाल्यावर सर्वज्ञ निरूपण करीत होते. त्या वेळी भटोबासांना जाड्य आले होते. वाइसा कोणत्या तरी कामाला गेल्या होत्या, त्या आल्या. बाइसा म्हणाल्या, ”बाबा, नागदेयाला जाड्य आले आहे, तरी हे आपण कोणाला निरूपण करीत आहात?” तेव्हा सर्वज्ञ आवेशून म्हणाले, “आम्हाला जर इच्छा झाली, तर आम्ही एखाद्या खांबालाही निमित्त करून निरूपण करू.” असे म्हणून ओट्यापूढील खांबावर थाप मारली. (पाठसमुदायाची पोथी सायंकाळचा पूजावसर)


3. आरोगणा स्थान :

हे स्थान बाहाटीला खांब स्थानाच्या पूर्व बाजूस आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आरोगणा करीत असत. (स्था.पो. उ.प्रत)


राजमढातील स्थाने संपूर्ण.


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: