गोदावरीच्या दक्षिण काठावरील स्थाने (डोमेग्राम)

38. रामनाथाचा भिडी आसन स्थान :

हे स्थान अग्नीष्टिका भोजन स्थान देवळाच्या आग्नेयेस सुमारे 200 फूट अंतरावर शेतात उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञांनी येथे भटोबास व नाथोबा यांना स्थिती दिली. त्या स्थितीच्या भरात ते दोघे एकमेकांशी डोक्याने टक्कर घेऊ लागले. त्यामुळे त्यांना सुख होऊ लागले. (उ. ली. 167, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


39. आसन स्थान :

हे स्थान रामनाथाचा भिडी आसन स्थानाच्या ईशान्येस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे रामनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


40. सोंडीवरील आसन स्थान :

हे स्थान आसन स्थान देवळाच्य पूर्वेस पूर्वाभिमुख देवळात आहे. रामनाथाच्या देवळाच्या उत्तर सोंडीवरील हे स्थान होय.

लीळा : सत्यादेवीच्या गोंदोची व लखुमीयाची धावण्याची शर्यत येथून लावण्यात आली होती. त्यावेळी सर्वज्ञांना येथे पूर्वाभिमुख आसन होते. (स्था. पो. उ. ली. 103)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


41. गोविंदाशी पडिताळणे स्थान :

हे स्थान सोंडीवरील आसन स्थान देवळाच्या पूर्वेस अर्धा फाग अंतरावर ओताच्या उत्तर बाजूस उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : एके दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू भक्तजनांसहित रामनाथाकडे विहरणासाठी आले. रामनाथाच्या सोंडीवर सर्वज्ञांना आसन झाले. सर्वज्ञ म्हणाले, “या लखुमीयाबरोबर कोण धावू शकेल?” तेव्हा सत्यादेवीचा गोंदो म्हणाला, “मी धावू शकेन.” सर्वज्ञ म्हणाले, “तू धावू शकणार नाहीस.” गोंदो म्हणाला, “मी धावू शकेन.” मग दोघांच्यामध्ये सिंहूनारायणाचा कोपरा शिवून परत रामनाथाकडे येण्याची शर्यत लागली. दोघे धावत निघाले. सिंहूनारायणाचा कोपरा शिवून दोघे परत येत होते. परत येताना गोंदोच्या पायाला जोरात खडा रूतला. त्यामुळे तो पडला. ‘गोंदो पडला;’ म्हणून भक्तजन मोठ्याने ओरडले. तेव्हा सर्वज्ञ धावत येथे आले. भक्तजनांनी वर चांदोवा धरला होता. गोंदोला उठविले. गुडघ्याला जेथे लागले होते, तेथे पीक घातली, ते सावध झाले. सर्वज्ञ गोंदोला म्हणाले, “तुम्हाला म्हटले होते की, लखुमीयाबरोबर धावू शकणार नाही. आम्ही जे नको म्हटले ते करू नये.” मग सर्वज्ञांनी सारंगपंडितांच्याकडे पाहिले. तेव्हा सारंगपंडित म्हणाले, “द्वापार युगामध्ये भीष्मपितामह शरपंजरी पडल्यावर श्रीकृष्ण चक्रवर्ती यादवांच्यासहित त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले होते. पालव छत्रे वर गंगावने, चवरे ढळती तो जसा प्रसंग, तसाच हाही प्रसंग वाटत आहे.” सर्वज्ञ म्हणाले, “काइ गा पांडेया : पांडीत्य कीजताए?” सारंगपंडित म्हणाले, ‘नाही जी हा यथार्थ आहे.’ मग सर्वज्ञ गुंफेकडे गेले. (उ. ली. 103, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


42. दरेदरकुटे बुजविणे स्थान :

हे स्थान गोविंदाशी पडिताळणे स्थानाच्या उत्तरेस सुमारे 150 फूट अंतरावर नदीच्या थडीलगत पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे डोमेग्राम येथे वास्तव्य असताना ते गोदावरीच्या काठी विहरणासाठी येत असत. त्याप्रसंगी भक्तजनांचा कर्मनाश होऊन त्यांचा अधिकार वाढावा, त्यांना योग्यता व्हावी, या उद्देशाने सर्वज्ञ त्यांच्याकडून लहानमोठे दरेखोरे खड्डे बुजवून घेत असत. त्यावेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे. (स्था. पो. पाठसमुदायाची पोथी, दुपारचा पूजावसर)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: