Dodhra (डोढ्रा)

डोढ्रा, ता.देउळगांवराजा जि.बुलढाणा


येथील 7 स्थाने 3 ठीकानी आहेत -
आसनस्थान - हे 1 स्थान डोढ्रा गावाच्या पूर्वेकडे अर्धा कि.मी.अंतरावर मंदीरात आहे.
आसन,वसती व मादने स्थान - ही 4+1 स्थाने डोढ्रा गावाच्या उत्तरेकडे गावातच नाल्याच्या काठावर आवारात व मंदीरात आहेत. येथे मुख्य आवार व मंदीर परिसरात ही सर्व स्थाने आहेत.
आसनस्थान - हे 1 स्थान डोढ्रा गावाच्या पश्चिमेकडे गावाच्या हद्दीजवळच्या शनी मूर्तीच्या मागे आहे.


जाण्याचा मार्ग :

डोढ्रा हे गाव, चिखली देउळगावराजा सडकेवरील अंढेरा फाट्यापासून नैर्ऋत्येस (पिंपरी मार्गे) 6 कि.मी. आहे व देऊळगावमहि पासून उत्तरेस 6 कि.मी. आहे. तीर्थयात्रेच्या वाहनांकरिता देऊळगावमहिहून डोढ्र्या ला जाण्यास रस्ता आहे. मासरूळहून डोढ्र्याला धामणगाव, धाड,दुधा, सैलानी, चिखली, मेरा फाटामार्गे जाता येते. चिखली ते देऊळगावमहि 39 कि.मी. देऊळगावराजा ते देऊळगाव महि 19 कि.मी. चिखली ते अंढरा फाटा 27 कि.मी. देऊळगावराजा ते अंढरा फाटा 31 कि.मी. जालना ते डोढ्रा 51 कि.मी.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान डोढ्रा गावाच्या ईशान्येस एक फर्लाग अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कोळगावहून डोढ्र्याला आले. प्रथम त्यांना येथे आसन झाले. येथे राघवदेवांची भेट झाली. मग राघवदेवांनी सर्वज्ञांची पूजा केली. नंतर त्यांना वाजतगाजत आपल्या घरी नेले. (पू. ली. 176, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील 4 स्थाने.

2. कुडी वसती स्थान :

हे स्थान डोढ्रा गावाच्या उत्तर विभागी गढीच्या उत्तरेस नदीच्या पश्चिम काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. देवळास उत्तराभिमुखही एक दरवाजा आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणामुख आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे राघवदेवांचा आवार होता.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंचे या ठिकाणी दोन रात्र वास्तव्य होते. त्यांनी येथे राघवदेवांच्या पूजा आरोगणेचा स्वीकार केला. (पू. ली. 176, स्था. पो. उ. प्रत) दोन दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून राजूरला गेले.


3. आसन स्थान :

हे स्थान कुडी वसती स्थानाच्या उत्तरेस आहे.

लीळा : राघवदेवांनी सर्वज्ञांना वाजत गाजत आपल्या घरी आणल्यानंतर प्रथम त्यांना येथे आसन झाले. मग राघवदेवांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. (पू. ली. 162 ख. प्र.)


4. मर्दना स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून उत्तरेस 13 फूट 4 इंच अंतरावर आहे. (पू.ली.176)


5. मादने स्थान :

हे स्थान मर्दना स्थानाच्या पूर्व बाजूला आहे. (पू. ली. 176)

मादने स्थानापासून पूर्वेस 4 फूट 2 इंच अंतरावर एक स्थान आहे. ते स्थान कोणत्या लीळेचे आहे, हे सांगता येत नाही.


6. चौबारा आसन स्थान :

हे स्थान राघवदेवांच्या आवारातील स्थानांच्या पश्चिमेस वेशीजवळ (वेशीचे अस्तित्व राहिले नाही, फक्त जागा आहे.) भव्य आणि उंच अशा मंदिरात हनुमंताच्या (प्रचलित नाव शनि) मूर्तीच्या पाठीमागे आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


निर्देशरहित स्थान : 1


डोढ्र्याची एकूण स्थाने : 6


  • Purvardha Charitra Lila – 176
  • Dodhara : डोडवीहिरां राघवदेवां भेटिः गृहीं वस्ति :।।:
  • ‘गोसावी सेंदुर्जनां आले आणि डोडवीहिरेया बिजें करीत असतिः’ ऐसें राघवदेवीं आइकीलें म्हणौनि तेहीं आइती केलीः तयांसि पूर्वि भोगनारायणी गोसावियांचें दरीसन जालें होतें: मग तिहीं मोहोछावो केलाः घरोघरीं सडेसंमार्जनें केलीः चौकरंगमाळीका भरीलियाः मखरें पताकाः चळदृपा पताकाः बरवीं वितानेः गुढीया उभिलीयाः गोसावियांलागी जळमांडवी केलीः मुखर मांडपी करौनि भागवत मेळविलेः मग परियळी पानें: पोफळें: फुलें: नानाविधें पूजाद्रव्यें: ऐसें मंगळ मोहोछाव आपुलेनि प्राकर्ये केलेः गोसावी डोडवीहिरा पातलेः गावांउत्तरे खडकाळीये पींपळः तयाचीये पूर्विलीये पालवी आसन जालें: तवं तें स्वजना आणि पूरजना सहवर्तमान मंगळवाद्ये लाउनी गोसावियांपासि गातः वातः नाचतः बागडीं धरीत महोछायेसीं साउमे आलेः गोसावियांसि भेटि जालीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: मग सेवकवृत्ति सन्मुखें बैसुनि गोसावियांतें म्हणितलें: ‘‘हें काइ जी गोमटदेव हो इतुके दिवस अपत्यातें कहीं सांभाळीजेनाः पडिताळिजेनाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें नव्हेः आलें:’’ तवं राघवदेवीं म्हणितलें: ‘‘निकें केलें गोमटदेव होः बरवें केलें गोमटदेव हो आपुलेया अपत्यातें पडिताळिलेः सांभाळीलें: कृतार्थ केलें:’’ म्हणौनि बहुत स्तविलें: तोखतिः गातिः नाचतिः हरीखैजतिः खदखद हांसतिः खेदखिन्न होतिः श्रीचरणां मोमें देतिः मग गोसावियांसि तेथचि आसन रचीलें: मग तेथचि गोसावियांसि बरवी पूजा केलीः अवघेयांसि टिळें जालें: अक्षताः माळाः महाजना तांबुळे दिधलीः गोसावी राघवदेवमुख्य समस्तां मंगळावसरू दिधलाः राघवदेवीं गोसावियांतें प्रार्थिलें: ‘‘जी आतां गृहासि बिजें करावें:’’ गोसावी मानिलें: नगरमहाद्वारापासी चैबारा नावेक आसन जालें: तेथ ओवाळणी जालीः गोसावियांवरि जळमांडवी धरिलीः तैसेचि गातः बिंबतः बागडी धरीत टाळः मांदळः काहाळा वातः नाचतः गोसावियांसि उभय हाटवटीया आपुलेया आवारा घेउनि निगालेः लोकु पुसेः ‘‘राघवदेव हो हें कव्हण? या नांव काइ?’’ तें गातिः नाचतिः तें चालतचि असतिः तेवीचि म्हणतिः ‘‘हे गोमटदेव बाः गोमटदेव बाः’’ ऐसिया परि गोसावी तयांचेया घरा बिजें केलें: गावांउत्तरे वेसीपूर्वे नैचिये थडी आश्राइत तयाचा प्रचंडु आवारूं: तयातें दोनि चैकिया होतियाः एकीं उत्तराभिमुखः एकीं पूर्वाभिमुखः उत्तराभिमुख देव्हारचैकियेसि गोसावियांसि आसन जालें: मर्दनामार्जने जालें: मर्दनासमयी राघवभागवत परते गेलेयां बाइसीं पुसिलें: ‘बाबाः हें कव्हण?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें राघव भागवत वैष्णवः हें आणिका वैष्णवासारिखे नव्हतिः हें दुंडीराऊळाचें अनुग्रहितः’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः तरि हें काइ उपदेशीति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः दुंडीराऊळ तें शुक्लभटः श्रीप्रभुंचे बडवे होऊनि द्वारावतिये गेलेः श्रीचांगदेवराऊळीं खरांटेनि हाणितलें: इतुकेनि तेथ स्तीति जालीः आधीं होतें तें भंगलें: मग तयां मंत्रजात जेतुकें तेतुकें विदित जालें: मग श्रीचांगदेवराऊळ गोसावी दंडु देवपाटु जें पुढां होतीं तें गोमतियेआंतु घातलीं: आणि निगालेः’’ यावरि बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः तरि हें श्रीचांगदेवोराऊळांचे नातु होति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘होति बाइः’’ मग गोसावियांसि मार्जनें जालें: सर्वांगीं चंदनाची भोरि लाविलीः पूजा केलीः भक्तिजनासहित आरोगणा जालीः पहूड जालाः तेथचि वस्ति जालीः एरी दीं उदैक गोसावी तेथौनि बिजें करूं आदरिलें: तें गोसावीयांतें राहावीत होतेः परि गोसावी न र्‍हातीचिः बिजें केलें: तें गोसावियांसि बोळवित आलेः गोसावी तयातें ग्रामप्रांतीं राहाविले :।।: (टिप – येथे स्वामी पहिल्यांदाच आले…स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे ऋद्धपूरवरुन बेलौरां-कारंजा-टाकळी-आलेगाव-आंजनी-मेहकर-सेंदुर्जनी-कोळगाव मार्गे आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: