Dabheri (दाभेरी)

दाभेरी, ता. मोर्शी जि. अमरावती


1. दाभेरी गावातील स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा व आमचेस्वामी) - दाभेरी गावात 5 स्थाने आहेत, प्रत्येकच ठीकाणी लहान अथवा मोठे मंदीर बांधलेले आहे, एका ठीकानाहुन दुसरे मंदीर दिसते, त्यामुळे येथील स्थाने करणे सोपे आहे.
2. दाभेरी, दर्भाळा तलावाचे काठावरील स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा व आमचेस्वामी) - दाभेरी गावाच्या उत्तरेकडे दर्भाळा तलाव आहे, आता येथे मोठे मंदीर बांधलेले आहे व आश्रमही आहे. येथील 9 स्थाने ही नवीन मंदीरात आहेत, तर 7 स्थाने ही दर्भाळा तलावाचे काठावरील नवीन लाहान मंदीरात आहेत, व 2 स्थाने रिद्धपूर दाभेरी रोडवर कडेला आहेत. ही सर्व स्थाने एकाच परिसरात असल्यामुळे येथील स्थाने करणे सोपे आहे.


जाण्याचा मार्ग :

परतवाडा – तिवसा मार्गावरील ब्राह्मणवाडा (दिवे) फाट्यापासून दाभेरीला जाणारी सडक आहे. ब्राह्मणवाडा फाटा ते दाभेरी ३ कि. मी. आहे. रिद्धपूर ते ब्राह्मणवाडा फाटा 4 कि. मी. रिद्धपूर ते दाभेरी 3 कि.मी. (रिद्धपूर दाभेरी मार्गावरील स्थानांचाच क्रम पुढे दिलेला आहे.) दाभेरीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. काळा गुढा स्थान :

हे स्थान रिद्धपूर दाभेरी रस्त्यावरील वनसंरक्षण क्षेत्राजवळ रस्त्याच्या पश्चिम बाजूस आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभू दाभेरीला जाता येता येथील काळ्या गुढ्याला संबंध देत असत. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. माए पुता बुझावणी स्थान :

हे स्थान काळा गुढा स्थानापासून आग्नेयेस 66 फूट 8 इंच अंतरावर रस्त्याच्या पूर्व बाजूस आहे.

लीळा : एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईवर रागावून निघाला होता. त्याच्या पाठीमागे त्याची आईपण निघाली होती. त्यावेळी श्रीगोविंदप्रभू दाभेरीला जात होते. या ठिकाणी त्यांची भेट झाली. श्रीप्रभुंनी त्या दोघांनाही समजाविले. मग ते दोघे गावात परत गेले. (गो. प्र. च. 302, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


दर्भाळा तळ्याकाठची स्थाने :

3. महीका स्नान अनुवाद करणे स्थान :

हे स्थान दर्भाळा तळ्याच्या पश्चिम विभागी आहे.

लीळा : एके दिवशी श्रीगोविंदप्रभू क्रीडा करीत येथे आले. त्यांना या स्थान-दर्शन ठिकाणी आसन झाले. पाण्यात म्हैशी बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून श्रीप्रभू अनुकार करू लागले. त्यात एका म्हैशीच्या कपाळावर चांद होते. त्याला पाहून ते म्हणाले, “या पाठकाला टीळा आहे. याला नाही.” जी म्हैस पाण्यात बुडी देई तिला म्हणत, “याला सचील स्नान झाले. याला नाही. हा पाठक कंठ स्नान करीत आहे. हा चांगला आहे. हा नाही. हा नष्ट आहे.” असा अनुवाद करून श्रीप्रभू निघून गेले. (गो.प्र.च, 78, स्था.पो.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. गोपाळांत खेळ तथा आरोगणा करणे स्थान :

हे स्थान दर्भाळा तळ्याच्या दक्षिण काठावर आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी येथे गोपाळांमध्ये खेळ-क्रीडा केली. त्यानंतर गोपाळांनी त्यांना आरोगणा दिली. (गो. प्र. च. 79, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

5,6. खेळ-क्रीडा करणे स्थान :

ही दोन स्थाने गोपाळांत खेळ तथा आरोगणा करणे स्थानापासून पूर्वेस 213 फूट अंतरावर आहेत.

लीळा : 1. गौरी खेळणाऱ्या मुलींमध्ये खेळ करणे. 2. पोळ्याचे बैल शृंगारणे. 3. दिवाळीच्या म्हैशी शृंगारणे. (स्था. पो.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7,8,9,10,11. आसन स्थाने (श्रीचक्रधरप्रभू चरणांकित) :

ही पाचीही स्थाने खेळ-क्रीडा करणे स्थानापासून पूर्वेस सुमारे 250 फूट अंतरावर इमारतीत आहेत.

लीळा : पूर्वी येथे पिंपळाचे झाड होते. सर्वज्ञांचे एकांकामध्ये दाभेरीला वास्तव्य असताना त्यांना येथील पिंपळाखाली आसन होत असे. तसेच त्यावेळी थंडीचे दिवस होते. सर्वज्ञ झाडाखाली ओतपळी घेण्यासाठी ही बसत असत. त्यांना सकाळच्या वेळेस झाडाच्या पूर्व बाजूस पूर्वाभिमुख आसन होत असे, सायंकाळच्या वेळेस झाडाच्या पश्चिम बाजूस पश्चिमाभिमुख आसन होत असे. कधी झाडाला टेकून आसन होत असे. (पू.ली.38, स्था.पो.उ.प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


12. आसन स्थान (श्रीचक्रधरप्रभू चरणांकित) :

हे स्थान आसन स्थानांच्या इमारतीच्या पूर्वेस दक्षिणाभिमुख देवळात आहे. (स्था. पो. उ. प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

दर्भाळा तळ्याकाठची स्थाने संपूर्ण.


दर्भाळा तळ्याच्या दक्षिणेची स्थाने :

13,14. परिश्रय स्थाने (श्रीचक्रधरप्रभू चरणांकित) :

ही दोन स्थाने आसन स्थान देवळाच्या नैर्ऋत्येस तळ्याच्या दक्षिण पाळीच्या उतारावर आहेत.

परिश्रय स्थानांच्या मधील पन्हाळ असलेले स्थान निर्देशरहित आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


15. अवस्थान स्थान (श्रीचक्रधरप्रभू चरणांकित) :

हे स्थान परिश्रय स्थानांच्या नैर्ऋत्येस आहे. देवळात जाताना पूर्व बाजूचे स्थान निर्देशरहित आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे भैरवाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. (मुख्य मोठे मंदिर)

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे एकांकात येथे 20 दिवस वास्तव्य होते. (पू. ली. 39, स्था. पो.)


16. दर्भेश्वराच्या चौकातील आसन स्थान :

हे स्थान अवस्थान स्थान समोर आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभू दाभेरीला आल्यावर येथेही येत असत. त्यांना येथे आसन होत असे व ते या ठिकाणी खेळ-क्रीडाही करीत असत. (स्था.पो.) चौकातील आसन स्थानाच्या नैर्ऋत्येची 5 फूट अंतरावरील स्थाने नाहीत. ते नमस्कारी चिरे असल्याचे बोलले जाते. मात्र याला लेखी आधार नाही.


17. आसन स्थान (श्रीचक्रधरप्रभू चरणांकित) :

हे स्थान चौकातील आसन स्थानापासून पूर्वेस 14 फूट 10 इंच अंतरावर आहे.

लीळा : येथे रूपनायकांची भेट झाली. मग त्यांनी सर्वज्ञांना विनंती करून काटसुरला नेले. (पू. ली. 40, स्था. पो.)


18. निद्रा स्थान :

हे स्थान दर्भेश्वराच्या चौकातील आसन स्थानाच्या दक्षिणेस आहे. या स्थानास उभय अवतारांचा संबंध आहे. पूर्वी येथे मल्लीनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : 1. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे दुपारच्या वेळेस निद्रा घेत असत. (स्था. पो.) 

2. श्रीगोविंदप्रभूदाभेरीला आल्यावर येथेही येत असत. त्यांना येथे आसन होत असे व ते या ठिकाणी खेळ-क्रीडाही करीत असत. (भी. प्रत ली. 287, स्था. पो. उ. प्र.)

निद्रा स्थान समोरील दोन स्थाने निर्देशरहित आहेत. तसेच दक्षिणेचे 20 फूट अंतरावरील स्थान निर्देशरहित आहे व दक्षिणेचे 33 फूट अंतरावरील स्थान निर्देशरहित आहे. निद्रा स्थानाच्या पूर्वेस दक्षिणाभिमुख हनुमंताची प्रतिमा श्रीप्रभू संबंधित असल्याचे बोलले जाते. 


19. ओतपळी घेणे स्थान (श्रीचक्रधरप्रभू चरणांकित) :

हे स्थान हनुमंताची प्रतिमा पासून पूर्वेस 13 फूट अंतरावर आहे.

लीळा : दर्भेश्वराच्या देवळाच्या आवाराला पूर्वी वाटोळ्या दगडाची भिंत होती. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे भिंतीला टेकून उभे रहात व ओतपळी घेत. (स्था. पो.)
देवळाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील उत्तराभिमुख देवळातील स्थान व विहिरीच्या पश्चिमेचे स्थान ही दोन स्थाने निर्देशरहित आहेत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा) वरील सात स्थान.

दर्भाळा तळ्याच्या दक्षिणेची स्थाने संपूर्ण. 


दाभेरी गावातील स्थाने:

20. होळीशी प्रदक्षिणा करणे स्थान :

हे स्थान दाभेरी गावाच्या पूर्व विभागी मारवाडीपुरा व बौद्धपुरा दोहींच्या मध्यावर देवळात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभूनी येथे होळीला प्रदक्षिणा केली. (स्था. पो.) होळीशी प्रदक्षिणा करणे स्थानाच्या पश्चिमेचे कुणबीपुरामधील स्थान मांडलिक आहे.


21. तेलीणीच्या आवारातील स्थान :

हे स्थान कुणबीपुरा विभागात वाटेच्या दक्षिणेस श्री. पंजाबराव इंगळे यांच्या घराजवळ उत्तराभिमुख पडवीत आहे.

लीळा : पूर्वी येथे तेलीणीचे घर होते. श्रीगोविंदप्रभुंनी तेलीणीचा विसरलेला तेलाचा डो येथून घेऊन तिला नेऊन दिला. (स्था, पो.) 


22.आसन स्थान :

हे स्थान दाभेरी गावाच्या पश्चिम विभागी मारूतीच्या देवळापुढील ओट्यावर लिंबाच्या झाडाखाली आहे. (स्था. पो. उ. प्र.)

23. रूपनायकांच्या आवारातील स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून जवळच श्री. विठ्ठलराव लबडे यांच्या घराजवळ देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे रूपनायकांचा आवार होता. त्यांच्या आवारात सर्वज्ञांना मर्दना, मादने, पूजा, आरोगणा झाली होती; परंतु हे स्थान निश्चित कोणत्या लीळेचे आहे हे सांगता येणार नाही. (स्था.पो.)


24. चरणचारी उभे राहणे स्थान :

हे स्थान दाभेरी गावाच्या उत्तर विभागी रस्त्याच्या कडेला देवळात आहे.

लीळा : पूर्वी हे नगर विसाव्याचे ठिकाण होते. येथे श्रीगोविंदप्रभू चरणचारी उभे रहात असत. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) वरील सहा स्थाने दाभेरी गावात आहेत, त्यांची लिंक उपलब्ध नाही, म्हणून दाभेरी गावाची देत आहोत…


दाभेरी गावातील स्थाने संपूर्ण.


अनुपलब्ध स्थाने :

1. तेलीणीचा डो आणून देणे.

2. घाटी आरोगणा.

3. वडाखालील आसन.

4. हनुमंताशी खेळ करणे.

5,6. पिंपळाखालील दोन विहरण स्थाने.

7. चंडीके च्या देवळाच्या पूर्व भिंतीचे स्थान.

8. उमाइसाचा आवारी आसन.

9. पटीशाळेवरील ओतपळी घेणे.

10. रूपनायकांच्या आवारातील एक स्थान.


निर्देशरहित स्थाने : 8


दाभेरीची एकूण स्थाने : 34


  • Purvardha Charitra Lila – 37
  • Dabheri : श्रीप्रभुदरीसनां गमन :।।: दीन त्रीं :।।:
  • मग गोसावी तेयाचा सांगातु सांडुनि एकांकी रात्री दी करौनि तीं अहोरात्रें परमेस्वरपूरा बिजें केलें: दाभवीहिरी दर्भेस्वरीं अवस्थान जालें: दिस उगवलाः मग बिजें केलेः।।:
  • Purvardha Charitra Lila – 38
  • Dabheri : श्रीप्रभु भेटि :।।: दर्भेस्विर :।।: दाभवीहिरी अवस्थान :।।:
  • मग गोसावी दाभवीहिरी बिजें केलें: तेथ पाणिपात्र करीतिः उत्तरे वेसीद्वारें नगरांत रीगतिः पूर्विले वेसीद्वारें निगतिः दर्भाळा घाटीं श्रीचरणे लांब शिळेवरि उदक घालीतिः तेथ श्रीकरीचें पाणिपात्र घालीतिः दर्भाळां आरोगणा होएः पाळीसि पींपळ असेः तयातळीं आसन होएः विळीचांचीये वेळीं तरि पसिमीलीकडें आसन होएः उदेयाचिये वेळीं तरि पूर्विलीकडें आसन होएः तें सीयाळे दिस म्हणौनि वोतपळीये तपत बैसतिः कदाचित दर्भेस्विराचीया बाळाणेयावरि आसनः कदाचित पूर्वेचेया बाळाणेयावरि आसनः बहीरवीं पहूडु होएः प्रतिदीनी श्रीप्रभुचेया दरीसनां जातिः ऐसें अनुमान दिस वीस अवस्थानः सेवटुवरि पीवळतळौली तियेची पाळी दोहीं देवां भेटि होएः विहरण होएः कांटीए तळीं दोन्ही गोसावी पाहार दोनि बैसले असतिः मग श्रीप्रभु गोसावी रीधपूरासि बिजें करीतिः आमचे गोसावी जरि पीवळतळौलियांसि पुढें बिजें करीति तरि आमचे गोसावी श्रीप्रभुची वाट पाहातिः श्रीप्रभु जरि पुढां बीजें करीति तरि आमचीयां गोसावियांचि वाट पाहातिः हें दूसरी भेटि :।।:
  • Purvardha Charitra Lila – 39
  • Dabheri : क्षेत्रखाजें आरोगणा :।।: / सारंगो क्षेत्रखाजें आरोगणा :।।:
  • आमचें गोसावी उदेयाचि श्रीप्रभुगोसावियांसि सामोरे बिजें करीतिः पुढारे श्रीप्रभु गोसावी पैलीकडौनि बिजें करीतिः एर एरा गोसावियांसि पाळीवरि आसन होएः श्रीप्रभु गोसावी खेळ करीतिः कदाचित क्षेत्रासि बिजें करीतिः मार्गी वाटे दक्षिणें तया सेंबेयापासी मातांग पानाची पातळी करौनि ठेवीः तियेवरि जेव्हेळी जे पदार्थ तें डोणे भरूनि ठेविले असतिः एकी डोणां हुरडाः एकी डोणां निंबूः एकी डोणां वांबीयाः एकी डोणां चणेयाचे सोलेः एकी डोणां घोळाणाः एकी डोणां लांकाचे सोलेः एकी डोणां वाटाणेयाचे सोलेः एकी डोणां वालाचीया पोपटीचे तथा तुरीचे सोलेः एकी कुरंधनेः एकी उळाः एकी डोणां कोवळी वाळकें: एकी डोणां उसोंचीया पेराः एकी डोणां उदक भरूनि ठेविले असेः ऐसें सेतीचें पदार्थ तो नीच ठेवीः वरि एकी पातळिया झांकीः आणि तो मातांग कडबेयाआड बैसेः तवं श्रीप्रभु गोसावी बिजें करीतिः सरिसें आमचें गोसावी तें इतुकेया एका दुरी उभे असतिः मां श्रीप्रभु गोसावी तें क्षेत्रखाजें देखौनि ऐसें ऐसें चवंकतिः आणि म्हणतिः ‘‘मेला जाए ये काइः मेला जाएः’’ म्हणौनि तेथचि उकड आसन होएः अनुक्रमें डोणें असति तें व्यतिक्रमें ठेवीतिः मागुते अनुक्रमें ठेवीतिः अवघे पदार्थ चावीथुंकी करौनि इतुके इतुके आरोगीतिः तेथचि आरोगणा होएः डोणाचे उदकपान करीतिः उदकें चूळ भरीति आणि बिजें करीतिः मग आमचें गोसावी बिजें करीतिः तियें दिसीं आमचेया गोसावियांसि प्रसाद होएः आमचे गोसावी दाभवीहिरीसि बीजें करीतिः मग तो मातंग दोही देवाची लीळा पाहे आणि दंडवत घालीः एर एरा गोसावियांचा प्रसाद तो तयासि होएः एरी दिसी तो दुना डोणें ठेवीः तया नाव सारंगोः श्रीप्रभु गोसावी ऐसें खेळत खेळत दाभवीहिरीसि बिजें करीतिः आमचे गोसावी श्रीप्रभु गोसावियांचा खेळ पाहात पाहात बिजें करीतिः श्रीप्रभु गोसावी म्हणतिः ‘‘मेला जाएः’’ म्हणौनि एरां घरीं बिजें करौनि मग दर्भेस्विरी खेळ करीतिः मग श्रीप्रभु गोसावी परमेस्वरपूरां बिजें करीतिः पीवपतळौलियावरि आमचे गोसावी बोळवीत बिजें करीतिः तेथ राहुनि भाळप्रदेशावरि श्रीकर ठेउनि जवं श्रीप्रभु गोसावी ऋद्धीपूरांत बिजें करीति तवंवेर्‍ही आमचे गोसावी पाहतचि असतिः मागौतें दाभवीहिरीसि बिजें करीतिः ऐसें आमचे गोसावी नीच श्रीप्रभुगोसावियांसि साउमें जातिः मागौतें बोळवीत जातिः ऐसें प्रतिदीनी दोही देवासि पीवळतळौलिया भेटि होएः कदाचित एकाधीये वेळें श्रीप्रभु गोसावी न येतिः तियें दिसीं आमचे गोसावी बिजें करीतिः मां पीवपतळौलीयेचिये पाळीवरि उभे राहुनि परमेस्वरपूराकडें भाळस्थळावरि श्रीकर ठेउनि पाहतचि असतिः मग गोसावी मागुतें दाभवीहिरीसि बिजें करीतिः मग येउनि दाभवीहिरीसि पाणिपात्र करीति :।।:
  • Purvardha Charitra Lila – 39
  • Dabheri : श्रीप्रभु भेटि :।।: पीवळतळौलि :।।:
  • दाभवीहिरीकडौनि आमचा गोसावी बिजें केलें: पैलीकडौनि श्रीप्रभु गोसावी आपवीहिरेया बिजें केलें: आपवीहिरेया नावेक खेळ केलाः मां आपवीहिरेयाकडौनि खेळत खेळत श्रीप्रभु पीवळतळौलियासि बिजें केलें: मां दोहीं पीवळतळौलियामध्यें वेढे करीत होतें: तवं आमचा गोसावी श्रीप्रभूतें देखिलें आणि श्रीप्रभुनि गोसावियांतें देखिलेः आमचां गोसावी जय केलें: श्रीप्रभु आपणेयां आपण क्षेमाळिंगन दिधलें: तेथ दोहीं पीवळतळौलिया मध्यें खोलली तळौलीयचिये वाव्य कोणीं कांटी तेथ दोहीं देवां भेटि जालीः क्षेमाळिंगन जालें: मग आमचां गोसावी श्रीप्रभुचें रज वंदिलेः तवं ब्राम्हणु एकु वाटां जात होताः तेणें म्हणितलेः ‘‘हे तुम्हासि काइ होति?’’ आमुचा गोसावी म्हणितलें: ‘‘हे आम्हासि गुरु होतिः’’ तवं श्रीप्रभु गोसावी म्हणितलें: ‘‘आवो मेला विदित करीताये म्हणेः’’ म्हणौनि थापा हाणीतलें: मग श्रीकरें श्रीकर धरूनि पीवळतळौलिये पसिमीलें पाळीवरि बिजें केलें: मग पाळीवरि पहार दोनि कांटिये एकी तळीं दोहीं देवां आसन जालें: श्रीप्रभूसी उकड आसन जालें: श्रीप्रभुपुढां आमचीयां गोसावियां मांडखुंटीये विनतकंदर होउनि आसन असेः श्रीप्रभु दक्षिणाभिमुखः आमचे गोसावी उत्तराभिमुखः तेणें ब्राम्हणें दोन्ही देव नमस्करिलेः तवं श्रीप्रभु गोष्टि करूं लागलेः ‘‘तुम्हीं समळ जीवातें उद्धरावें: आम्ही शुद्धा जीवातें उद्धरूनिः’’ ऐसा ऐसा संप्रधार जीवाद्धिरणासि जालाः मग येर्‍हें एर आपुलालेया भाषा काइ बोलिले तें नेणिजेः तें देवोचि जाणतिः मग श्रीप्रभु खेळु करीत रीधपूरा बीजें केलें: श्रीप्रभुची श्रीमूर्ति दिसे तवं आमचे गोसावी पाळीवरूनि अवलोकीत उभे होतें: मग आमचां गोसावी जय करौनि दाभवीहिरी बिजें केलें :।।:
  • Purvardha Charitra Lila – 40
  • Dabheri : रूपनायका भेटि :।।:
  • हे गोष्टि गोसावी जोगेस्वरी पाणिपात्रप्रदानी साधांवरि सांघितलीः।: साधाते सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधें हो मामेयाचा घरीं जेवाल की भिक्षा करौनि जेवाल?’’ मग साधीं म्हणितलेः ‘‘हा जीः गोसावी मामेयातें केवी जाणति?’’ यावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधें हों: हें पूर्वि दाभवीहिरीसि होतें: रूपनायक तें साधांचे मामेः तयांचें एक घर रीधपूरीं होतें: एक घर कांटसरां होतें: गोसावियांसि दर्भेस्विराचेया बाळाणेयांवरि आसन असेः तवं रूपनायक आलेः गोसावियांते देखिलें आणि दरीसनासवेचि वेधलेः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: गोसावियांते विनविलें: ‘‘जी माझेया गावांसि बिजें करावे जीः’’ गोसावी मानिलें: आपुलेया गावां कांटसुरेयासि घोडेया वाउनी घेउनि गेलेः श्रीचरण प्रक्षाळन केलेः गोसावियांसि वोलनी दिधलीः मर्दना जालीः मार्जनें जालें: पूजा केलीः आरोगणेलागी विनविलें: मग गोसावियांसि ताट केलें: तद्भावी दुधातुपा वाटी भरूनि ताटावरि ठेविलीः मग दुधातुपाची आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः तेथ तेयांचांची घरीं वस्ति जालीः मग उदेयांसीचि तेथौनि बीजें केलें: साधी म्हणितलें: ‘‘हा जीः तो पूजा करूं केवी जाणे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तें आगमिक पूजा करूं जाणतिः’’ :।।: (हे गोष्टि गोसावी जोगेस्वरी पाणिपात्रप्रदानी साधांवरि सांघितलीः।।:)
  • Govind Prabhu Charitra Lila – 78
  • Dabheri : दर्भाळा महीका स्नान अनुवादु :।।:
  • दर्भाळा महीका स्नान अनुवादु ॥ गोसावी दर्भाळेयासि वीजें केलें : तया पसीमे पाळीवरि आसन जालें : आंतु सी बैमलीया होतीया : एकीचा माथां चांद होतें : एकीचा नाही : मग गोसावी म्हणीतलें : ” या पाठकासि टीळा जाला : या पाठकासि नाही :” जे बुडकळी दे : तीतें म्हणेति : “सचील स्नान जालें : यासि नांहीं” बुडकळी देति : तयातें म्हणेति : “हा पाठक कंठस्नान करीतु असे : हा नीका : हा नीका नव्हे म्हणे : हा नष्ट म्हणे : ” ऐसा गोसावी अनुवादु करीति : मग बीजें करीति : ॥ ७८॥
  • Govind Prabhu Charitra Lila – 79
  • Dabheri : गोपाळा आंतु खेळ :।।:
  • गोपाळा आंतु खेळ: ॥ ” आवो ! हा पाठकु गोपाळु : आवो ! हा वीण गोपाळु : आवो ! हा ब्रह्मचारी गोपाळु : आवो ! हा सुद्रचि होय म्हणे : ” मग गोसांवीं बीजें करूं आदरीलें : गोपाळी म्हणीतले : ” राउळो ! राउळो ! काला जेवा : मग जा : ” मग बरवा बरवा पदाथु नीवडीला मग गोसावियासि आरोगणा दीधली : मग आपण जेवीले : मग गोसावी बीजे केले ॥ ७९॥
  • Govind Prabhu Charitra Lila – 302
  • Dabheri : माए-पूता बुझावणी :।।:
  • माए-पूता बुझावणी :॥ म्हातारीए यकीचा पुत्रू तो आपुलीएचि म्हातारीवरि रोसे नीगाला : तेयामागें म्हातारीही नीगाली ते तेयाने टाकांति जाति असे : तवं गोसावी दामविहिरीसि बीज करीतां पीवळ-तळोलियां अनिकोनी आडवाटे भेटि जाली : तीया म्हातारीया गोसांवियांसि दंडवत केलें : श्रीचरणा लागली : मग वीनवीले : ‘जो जी! माशा पुत्र रोसें जातु असे : राहे ना : तर काइ कर जी? : ” म्हणौनि रडों लागली : मग गोसावी म्हणीतलें : ” आवो मेली जाय : काया रूसतासि : ” मग गोसावी ते यातें श्रीकरें धरिलें : तीएपासि नेला : मग तीएसि आणि तेयासि बुझावणी केली : मग तीये दोघे गावासि गेली : मग गोसावी मदासि बीज केलें ॥ ३०२॥



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: