Changdev (चांगदेव)

चांगदेव, ता मुक्ताईनगर .जि. जळगांव


येथील 7 स्थाने 5 ठीकानी आहेत -
विरहण स्थान - हे स्थान हे स्थान चांगदेव गावाच्या उत्तरेकडे तापी-पूर्णा नदीच्या संगमावरील मंदीरात आहे. याला श्रीकृष्ण मंदीर म्हणुन ओळखतात.
चरणचारी स्थान - हे स्थान जुन्या चांगदेव गावात चांगदेव मंदीरा जवळ दक्षिणेला आहे.
आरोगण,अवस्थान व मादने स्थान - ही स्थाने चांगदेव मंदीराच्या जवळच तापी नदीच्या काठावरील मंदीरात आहे.
एक स्थान चांगदेव मंदिराच्या चौकात आहे, 
व एक स्थान सिद्धेश्वराच्या चौकात आहे.


जाण्याचा मार्ग :

चांगदेव हे गाव, भुसावळ मुक्ताईनगर मार्गावरील चांगदेव फाट्यापासून उत्तरेस 5 कि.मी. आहे. मुक्ताईनगर ते चांगदेव फाटा 5 कि.मी. भुसावळ ते चांगदेव फाटा 27 कि.मी. शेंदुर्णीहून जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर मागे चांगदेवला जाता येते. चांगदेवला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. विहरण स्थान :

हे स्थान चांगदेव गावाच्या उत्तरेस 1 कि.मी. अंतरावर तापी पूर्णा संगमाजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. हे देऊळ ‘श्रीकृष्ण मंदीर’ या नावाने ओळखले जाते. सर्वज्ञांच्या वेळी येथे चतुर्विधाचे देऊळ होते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे विहरणासाठी येत असत. (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. चरणचारी उभे राहणे स्थान :

हे स्थान जुन्या ओसाड चांगदेव गावात चांगदेव मंदिराच्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे चांगदेव मंदिराच्या आवाराच्या दक्षिण दरवाजाची पूर्व सोंडी होती.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू, सकाळचा पूजावसर झाल्यानंतर विहरणाला जात असताना येथे सोंडीवर दक्षिणाभिमुख चरणचारी उभे होते. त्यावेळी कवि डिंभ रामदेव (चिंचखेडकर) नदीकडून गावातील बाजारपेठेतून आपल्या सर्व शिष्यांसहित येत होते. त्यांनी सर्वज्ञांना सोंडीवर उभे असल्याचे पाहिले आणि धावत पुढे आले. आपल्या हातातील रंगीत नक्षीदार काठी सर्वज्ञांना दिली. दंडवत घातले. ती काठी घेऊन त्रीभंगी उभे राहिले. मग कवी डिंभानी एक गीत म्हटले. त्यानंतर सर्वज्ञ येथून विहरणासाठी गेले. (पू.ली. 418, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. अवस्थान स्थान :

हे स्थान चांगदेव मंदिराच्या नैर्ऋत्येस तापी नदीच्या दक्षिण काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. स्थानाच्या उत्तर बाजूचे दोन्ही खांब नमस्कारी असल्याचे बोलले जाते. सर्वज्ञांच्या वेळी येथे मढ होता. त्या मढातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या पूर्वार्ध काळात टाकळीहून चांगदेवला आले. त्यांचे या ठिकाणी पाच दिवस वास्तव्य होते. (पू.ली. 347 ख.प्र.स्था.पो.) त्यानंतर ते येथून दुधळे गव्हाण ला गेले.

4. आरोगणा स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानापासून ईशान्येस 1 फूट अंतरावर आहे. (स्था.पो.)

5. मादने स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानापासून पूर्वेस 8 फूट अंतरावर आहे. (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (3, 4 आणि 5)


6. चांगदेव मंदिराच्या चौकातील आसन स्थान :

हे स्थान पूर्वाभिमुख चांगदेव मंदिराच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे, मंदिराला एकूण तीन द्वार आहेत, उत्तराभिमुख, दक्षिणाभिमुख व पूर्वाभिमुख.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू, सकाळचा पूजावसर झाल्यानंतर कधी कधी येथे विहरणाला येत असत. (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. संगमेश्वराच्या मंदिराच्या चौकातील आसन स्थान :

हे स्थान नदी पलीकडे अर्धा कि.मी. अंतरावर सिद्धेश्वराच्या पुरातन मंदिराच्या बाहेर आहे. त्या काळात इथे संगमेश्वर मंदिराचे चौक होते, हे स्थान मेळसांगवे गावाच्या सीमेत गावाबाहेर पूर्णा नदीच्या पूर्व काठावर आहे, इथे नदी पार जाण्यासाठी चांगदेव मंदिराच्या मागे संगमाजवळ बोट व्यवस्था आहे, किवा मग 26 कि.मी. फेऱ्याने जाता येते.

तापी पूर्णा या दोन नद्यांच्या संगमावरील जुन्या मेळसांगवे गावातील हे पुरातन महादेव मंदिर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू, सकाळचा पूजावसर झाल्यानंतर विहरणाला जात असत. (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)



अनुपलब्ध स्थाने :

1. तापी पूर्णा संगमावरील आसन स्थान.

2. परिश्रय स्थान.

3. चांगदेव देवळाच्या जगतीच्या पूर्वाभिमुख दारवठ्याच्या उत्तर सोंडीचे स्थान.

4. श्रीकृष्ण चरणांकित स्थान. (रूक्मिणी स्वयंवर)


चांगदेवची एकूण स्थाने : 11


  • Purvardha Charitra Lila – 417
  • Changdev : चांगदेवपुरीये/चांगदेवीं अवस्थान :।।: चांगदेव :।।:
  • गोसावी चांगदेवोपुरीयेसि बिजें केलें: तेथ चांगदेवाचीये जगतिआंतु नैरूत्य कोनी मढीं अवस्थान जालें: दिस पाचः एकाधा दीं चांगदेवींचा चौकीं विहरण होएः एकाधा दीं चर्तुुखीं आसन होएः एकाधा दी पैलाडिले देउळी आसन होएः एकाधा दी संगमेस्वरा आसन होएः ऐसें तेथ अवस्थान तवं विहरणां बिजें करीति :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात कनाशी-भडेगाव-पाचोर्यावरुण सेंदुर्णींला आले तेथ वास्त्व्य(अवस्थान) झाले. त्यानंतर स्वामी टाकळी-चवरड्यावरुण चांगदेवपूरिला आले. येथे स्वामिंचे 5 दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा. पुढे स्वामी सावळदबार्याणच्या दिशेने निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 417
  • Changdev : चतुर्मुखीं आसन :।।: चांगदेव :।।:
  • नगराचिये पूर्विले दारवंठेया आग्ने चतुर्मुखाचें देउळ पूर्वाभिमुख तेथ गोसावी बीजें केलें: भितरीं चौकीं आसन जालें: मग गोसावी तेथौनि बीजें केलें :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात कनाशी-भडेगाव-पाचोर्यावरुण सेंदुर्णींला आले तेथ वास्त्व्य(अवस्थान) झाले. त्यानंतर स्वामी टाकळी-चवरड्यावरुण चांगदेवपूरिला आले. येथे स्वामिंचे 5 दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा. पुढे स्वामी सावळदबार्याणच्या दिशेने निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 417
  • Changdev : संगमेस्वरी आसन :।।: चांगदेव :।।:
  • एकु दीं गोसावियांसि क्षौर जालें: मग गोसावी चांगदेवासि विहरणासि बिजें केलें: तेथ चौकीं आसन जालें: सोमवारीए पव्हा आलाः तेणें तेथ रचमच जालीः मग गोसावी तेथौनि पैलाडी संगमेस्वरासि बिजें केलें: तेथ चौकीं आसन जालें: मग विहरण सारूनि मढासि बिजें केलें :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात कनाशी-भडेगाव-पाचोर्यावरुण सेंदुर्णींला आले तेथ वास्त्व्य(अवस्थान) झाले. त्यानंतर स्वामी टाकळी-चवरड्यावरुण चांगदेवपूरिला आले. येथे स्वामिंचे 5 दिवस वास्त्व्य (अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा. पुढे स्वामी सावळदबार्यालच्या दिशेने निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 418
  • Changdev : कवडिंभ रामदेव गायनश्रवणें आंगी टोपरे माळ प्रदान :।।: / चिंचखेडकर रामदेवाचा अवस्वरू आइकणें :।।:
  • एकु दिसीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसरू जालेंयानंतरें विहरणा बिजें केलें: सेपेचें सोरठीए जाडीची आंगीटोपरें लेउनिः चांगदेवीचिये दक्षिणली दारवंठां पूर्विली सोंडियेवरि दक्षिणामुख गोसावी चरणचारी उभे असतिः तवं कवडिंभु चिंचखेडकर रामदेव गंगेकडौनि उभिया हाटवटीयाहुनि गावांतु गातवांत टाळु मादळु शिक्ष्यांसहित येत असतिः तवं गोसावियांतें सोंडियेवरि उभयां देखिलें: आणि गोसावियांतें ओळखिलेः मग ‘‘हा नव्हें माझा स्वामीः एवढा वेळु जाते गात होतो तो हाः’’ म्हणौनि धावत पुढें आलेः हाती चित्रीव काठी होतीः तयावरि दसावतार लिहिले होतें: तें गोसावियांचां श्रीकरी ओळगवीलीः एकु दामु दिधलाः दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलेः गोसावी तें काठी श्रीकरीं घेउनि जाडीचे कोंगते घेउनी गोपाळवेषु नटौनि त्रिभंगी ठान मांडुनि उभे असतिः मग तेहीं मागें सरौनि टाळ आळति घेउनि सिकारू खुणाविलेः मग टीप घेउनि जति केलीः तें ओळगवीलीः ‘‘संख चक्र कौमोदकी गदा सांडुनि हातीं डांग घेतलीः हातियेरू गोवळेयाः गोसावी माझा गोंरूवें राखेः गोपाळुवेसे आलेयाः परि गोवळु ऐसां नावडेः माया मानवीं जालें: रामेया स्वामी दातांरः परि कव्हणी नोळखे आलीएः गोसावी माझा गोंरूवें राखेः’’ हें जति ओळगवीलीः सर्वज्ञें: ‘‘आतां पूरेः’’ म्हणौनि वारिलें: गोसावी पुडवाटवा झाडुनि तांबुळ दिधलें: स्याळीएचिं पीवळी आंगीः टोपरेः गळदंडा दिधलें: तें आंगी लेइलेः टोपरें डोइए घालुनि सुखातिशें बरवें नावेक नाचिनलेः मग गोसावी तयांसि पाठवणीं दिधलीः तें निगालेः गेलेयानंतरे बाइसीं पुसिलें: ‘बाबाः हा कव्हण?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः रामदेव कवडिंभः’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः भक्तु कैसा निकाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा आणिकां भक्तांसारिखा कोरडा नव्हेः हा सलोलु साद्रव्यः’’ यावरि गोसावी देवांभक्ताचें रतिअनुभूतीचें विशेष बहुत निरूपीत तेथौनि बिढारासि बिजें केलें :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात कनाशी-भडेगाव-पाचोर्यावरुण सेंदुर्णींला आले तेथ वास्त्व्य(अवस्थान) झाले. त्यानंतर स्वामी टाकळी-चवरड्यावरुण चांगदेवपूरिला आले. येथे स्वामिंचे 5 दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा. पुढे स्वामी सावळदबार्याणच्या दिशेने निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 419
  • Changdev : तापीतटी मार्तंडा देवता आश्चर्ये दाखवणें :।।: चांगदेव :।।:
  • एकु दिसीं गोसावी विळीचां वेळीं विहरणा बिजें केलें: तापीतटीं संगमी गोसावियांसि आसन जालें: गोसावियांजवळीं बाइसें: मार्तंड बैसलीं असतिः गोसावी मार्तंडातें कृपादृष्टीं अवलोकिलें: आणि मार्तंडा स्तीति जालीः पुढा देखों लागलेः ‘गोसावी हातीं मार्तंडातें धरिलें: आणि पाणियांतु बिजें केलें: दोनि देवता साउमीया आलीयाः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीयाः मग सोनयांचा माचा पासवडीलाः गोसावियांसी तेथ आसन जालें: देवतीं माथाचां केशीं श्रीचरण झाडिलेः कणकमणीम अळंकारीं पूजा केलीः सोनयांचे परीयेळः रत्णाचें दीप उजळीलेः धूपार्ति मंगळार्ति केलीः दोघीं गोसावियांसि ओवाळणी केलीः मग स्तुति केलीः मग गोसावी बिजें केलें: आसनीं उपविष्ट जालेः ऐसें मार्तंडीं देखिलें: स्तीति भोगिलीः भंगलीः मग आंगुस्ती दिधलीः आणि म्हणितलेः ‘‘ऐया ऐयाः’’ ऐसा विस्मयो केलाः बाइसीं पुसिलें: ‘‘काइं मार्तंडा?’’ मग बाइसापुढें अवघेचि सांघितलें: बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः मार्तंड काइ म्हणत असे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तें यातेंचि पुसाः’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः आपण क्यें गेलेयां होतेया?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें क्यें गेले होतें? हें एथचि होतें नव्हेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः यांसि ऐसीचि बुद्धीः हा एथीचीए स्तीतितवं देखतु असेः’’ मग गोसावी मढासि बिजें केलें :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात कनाशी-भडेगाव-पाचोर्यावरुण सेंदुर्णींला आले तेथ वास्त्व्य(अवस्थान) झाले. त्यानंतर स्वामी टाकळी-चवरड्यावरुण चांगदेवपूरिला आले. येथे स्वामिंचे 5 दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा. पुढे स्वामी सावळदबार्याणच्या दिशेने निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: