Chaklamba (चकलांबा)

चकलांबा, ता. गेवराई, जि. बीड.


येथील 6 स्थान 3 ठिकाणी आहेत - 3 स्थान चकलांबा गांवच्या नैर्ऋत्य विभागी मंदीरात व मंदीर परीसरात आहेत.
2 स्थान गावाच्या दक्षिणेस दीड कि.मी. अंतरावर एकवीरादेवी (डोंगराईदेवी) मंदिर परिसरात आहेत.
व 1 स्थान चकलांबा गावाच्या पश्चिमेस अर्धा कि.मी. अंतरावर महादेवाच्या देवळाच्या चौकात आहे.


जाण्याचा मार्ग :

चकलांबा हे गाव, शेवगाव-गेवराई मार्गावरील चकलांबा फाट्यापासून दक्षिणेस 8 कि.मी. आहे. शेवगाव ते चकलांबा फाटा 36 कि.मी. आहे. गेवराई ते चकलांबा फाटा 28 कि.मी. शेकट्याहून वायव्येस चकलांबा पायमार्गे (तरटगव्हाण मार्गे) 7 कि. मी. आहे. शेकट्याहून चकलांब्याला जाण्यासाठी जीपचा मार्ग आहे. चकलांब्याला जाण्यासाठी एस, टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील 3 स्थान एकाच मंदिर परिसरात आहेत)

1. अवस्थान स्थान :

हे स्थान चकलांबा गावाच्या नैर्ऋत्य विभागी उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे तिकवनारायणाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात पहिल्या वेळेस नागलवाडीहून चकलांब्याला आले. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. (उ. ली. 430 ख. प्र. , स्था. पो.) त्यानंतर गावाच्या दक्षिणेस दीड कि.मी. अंतरावर असलेल्या एकवीरेच्या देवळात 20 दिवस अवस्थान झाले. (उ.ली. 558, स्था. पो.) त्यानंतर सर्वज्ञ येथून शेकट्याला गेले.


देवळाच्या पायऱ्या व सोंडी नमस्कारी असल्याचा उल्लेख स्थान पोथी व लीळाचरित्रात नाही.


2. जगतीच्या दारवठ्यातील स्थान :

हे स्थान देवळाच्या उत्तरेस 35 फूट अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे चरणचारी उभे राहात असत. (स्था.पो.)


3. तिकवनारायणाच्या देवळाच्या पश्चिमेचे परिश्रय स्थान :

हे स्थान देवळाच्या पश्चिमेस 25 फूट अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे.


4. आऊसा भेटी, रूदन संबोखन स्थान :

हे स्थान गावाच्या दक्षिणेस दीड कि.मी. अंतरावर असलेल्या एकवीरेच्या (डोंगराईदेवी) देवळाच्या वायव्येस सुमारे 400 फूट अंतरावर चौथऱ्यावर आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. भटा, आऊसा संबोखन स्थान :

हे स्थान एकवीरेच्या देवळाच्या नैर्ऋत्येस सुमारे 150 फूट अंतरावर चौथऱ्यावर आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


6. वसती स्थान :

हे स्थान चकलांबा गावाच्या पश्चिमेस अर्धा कि.मी. अंतरावर महादेवाच्या पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. सर्वज्ञांच्या वेळी या देवळास ‘पंचलिंग’ असे नाव होते. आजचे नाव ‘पंचाळेश्वर’ असे आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभु आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात दुसऱ्या वेळेस शेकट्याहून चकलांब्याला आले. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. 572 स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून घोगसपारगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

2) एकवीरेच्या देवळाच्या ईशान्य कोपऱ्यातील अवस्थान स्थान

4) सोंडीवरील आसन स्थान

5) मादने स्थान

6) पटीशाळेवरील आसन स्थान

7) परिश्रय स्थान.


चकलांब्याची एकूण स्थाने : 12


  • Utarardha Charitra Lila –
  • Chaklamba : आंबा तिकवनारायणीं वस्ति :।।:
  • तेथौनि गोसावी आंबेंया बिजें केलें: तेथ गावांदक्षिणें उत्तरामुख तिकवनारायणाचें देउळः तेथ चौकीं वस्ति जाली :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील तिकवनारायणाचें देउळात स्वामीं वस्तीस थांबले तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila – 558
  • Chaklamba : एकवीरें अवस्थान :।।: (चकलांबा)
  • एरी दीं गोसावी आंबेंयादक्षिणें आग्ने कोनां आश्राइतः टेकांपसिमें अधोपरी एकवीरेचें देउळ उत्तराभिमुखः जगतिचां दारवंठांही उत्तराभिमुखः तेथ भितरीं देवतें पूर्वे अवस्थान जालें: दिस वीस :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila – 559
  • Chaklamba : भट प्रसनायेकु सत्रा जेउं पाठवणें :।।: / भटां उष्णत्व साधन निरूपण :।।: (चकलांबा, एकवीरा)
  • भट प्रसनायक सावखेडा गेलेः तें परतौनिया मागुते आलेः क्षुधार्थ असतिः भक्तिजनी भोजने सारिली होतीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्ही दोघै छत्रा भोजना जाः’’ म्हणौनि एकवीरहिूनि गोसावी भट प्रसनायक छत्रां जेवूं धाडिलें: भट प्रसनायक सत्रां गेलेः तेहीं बैसौ घातलें: उन्हउन्ह अन्न वाढिलें: एकु चाटू भटासि वाढिलाः एक चाटु प्रसनायकासि वाढिलाः भट जेविलें: आचवलें: मग भट पुढेंचि गोसावियांपासी आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें पासी बैसलें: गोसावी पुसिलें: ‘‘कां गाः जेवण जालें?’’ भटीं म्हणितलें: ‘‘हो जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइ काइ जेविलेति?’’ भटीं म्हणितलें: ‘‘जी जीः उष्ण उष्ण ठोंबराः’’ प्रसनायकें दुसरा चाटू वाढवुनी मागितलाः जेविलें: आचवलें: मग मागिलाकडौनि प्रसनायकु आलेः गोसावियांसि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘उसिरु कां गा लाविला परसेयाः’’ प्रसनायकें म्हणितलें: ‘‘जी जीः उष्ण ठोंबरा नागदेयानि चाटूभरी घेतलाः मियां दोनि चाटू घेतलें: साधन काही नसैचिः काही पत्रशाख नाहीं: हा जेउनी पुढां आलाः मज गिळवेनाः म्हणौनि जेवितां उसीर लागला जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘उष्णत्व हेचि एक साधनः तुम्हीं महात्मे कीं गाः तुम्हीं रेंदेया चेंदेया दरु भरीजेः ऐसां अनधिकारु येओ नेदीजे कीं गाः’’ :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila – 560
  • Chaklamba : घुइनायकां भेटिः वस्त्रपूजा स्वीकारु :।।: (एकवीरा, चकलांबा)
  • घुइनायकासि बीडा जातां पंचलिंगी भेटि जालीः दुसरी बीडीं: तिसरी प्रतिष्ठानी जाली होतीः तयांचां एकु आवारू आंबा एकु महांडुळीः तयासी गोसावियांवरि वेधे इश्वरप्रतीति होती म्हणौनि भट गोसावियांतें न पुसतः ‘गोसावी बीजें केले असेः’ हें सांगावेया कव्हणे स्थानीं गेलें: तें नेणिजेः एकु दीं तेही दरीसनाची आइती केलीः पानेंपोफळें: नारीयळें: सवें वस्त्राचें दिंडः ऐसें आलें: गोसावियांपुढां अवघें ओळगवीलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: ‘‘जी जीः ये माझी वस्त्रें स्वीकरावीः’’ म्हणौनि श्रीचरणावरि माथा ठेविलाः बैसलें: गोसावी मानिलें: प्रसन्न होउनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वानरेयाः लागति तें घेयाः’’ मग भटोबासीं लागति तें बरवी चांगटे घेतलीं: गोसावियांलागौनि वोली एकः आंगीये एकुः बहिर्वासा एकुः पासवडेया एकुः पासवडी रात्री पांगुरणाची एकीः गोसावियांचीये सेवेची तेतुकी घेतलीः एरें नेघतीचिः मग तिहीं पुढति विनविलें: ‘‘जी जीः महात्मेया एक एक वस्त्र देयावे?’’ भटीं म्हणितलें: ‘‘आम्हां न लगतिः गोसावियांचिया उपयोगां जाति तें घेतलीः’’ ऐसें निराकरिलेः घुइनायकी दंडवतें घातलीं: मग भक्तिजनासहित उपहारालागी विनविलेः गोसावी विनवणी स्वीकरिलीः पाकनिष्पत्ति जालेयानंतरे बोलाउ आलेः ‘‘जी उरकलेः बिजें करावेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथचि आणाः’’ आणिलाः गोसावियांसि ताट केलेः भक्तिजना वाढलेः दंडवतें घातलीं: गोसावियांसि आरोगणाः गुळळाः विडा जालाः घुइनायकमुख्य समस्ता पांती प्रसाद जालें: मग गोसावी तयांसि पाठवणी दिधलीः एर अवघें घरां घेउनि गेलें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila – 562
  • Chaklamba : ब्रम्हचारी गाळीदानीं आउ सीक्षापण/पूरश्चरण स्वीकारु :।।: (एकवीरा, चकलांबा)
  • एकु दीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें पटिशाळें रीगतां डावेया हातां आसन असेः माणुसें देवतेसि आलीः तयांतु एक मुंजीयाः ब्रम्हचारी भगवाः भितरीं जाओं बैसला तवं आउसासि पावो लागलाः आणि आउसें कोपलीं: तो आउसातें खवळूं लागलाः ‘‘तुझे एथ काही असेः हा ठावो देवतेचाः एथ किती एक जोगिए सीमरेः थोंटीं: राहातिः चेंदा खातिः मागुतें जातिः’’ ऐसा बहुतचि वदू लागलाः सविया देओ लागलाः तवं आउसीं तयातें सविया दिधलीयाः ‘‘है रेः तुमचें निसंतान होइल रेः ऐसा तू सडी पड रेः चक्रीं पड रेः तुंते विवसी खावों रेः’’ इतुकेनि तो गेलाः तवं गोसावी आइकीलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसे न म्हणिजे की नायकाः सन्निधानी जे घडले ओखटें तें सन्निधानीचि भोगिता परि कैसेही अन्यथात्व नव्हेः अन्यत्र किजे तें वाराणसी फेडिजेः वाराणसी किजे तें कें फेडावे नायका? तैसें असन्निधानीं जे घडले ओखटे तें सन्निधानीं फेडावेः आणि जे सन्निधानीं घडले तें कें फेडावे?’’ आउसीं म्हणितलें: ‘‘स्वामी जगन्नाथाः तेही आपणचि सांगावेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथीचेनि सन्निधाने कर्मे नासा नाः तरि कें नासाल नायका?’’ आउसीं म्हणितलें: ‘‘जी जीः कर्मे नासावी कां लागति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नायकाः मळकर्मे निवर्तलेयाविण जीव कृपेसि पात्र नव्हेः म्हणौनिः’’ मग गोसावी अग्निचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘अग्निचेनि संबंधे ओली कोरडी सानी थोर काष्टे जळतिः तैसें परमेस्वरु सन्निधानी असता अनारब्धे प्रारब्धे संतासंते कर्मे नासतिः’’ मग फुटाणेकाराचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘कव्हणी एकु फुटाणेकारू असेः तो चणेयासि वोल देः भिजतिः मग एकी वाळू घालीः तें फेडीः दुसरी वाळू घालीः तेही फेडीः तिसरी वाळू घालीः तेही फेडीः हिरवटानि कठीनत्व हें दोन्ही दोष जातिः सुरै मृदुत्व हें गुण येतिः कंचुकवत टरल होएः मग गुळेसि खावया योग्य होएः तैसें परमेस्वरु जीवासि बोधदातृत्व करीतिः शाब्द देतिः अपरोक्ष करीतिः सामान्यज्ञान देतिः विशेष देउनि प्राप्तियोग्य करीतिः’’ मग आउसें अनुतापलीः ‘‘ऐसें जी स्वामी जगन्नाथाः तरि नेणेचि जीः’’ गोसावियांचिया श्रीचरणांचेनि प्रसादें फेडीन जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरी घाला दंडवतः’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि आउसीं अनुतापौनि श्रीचरणां लागलीः श्रीचरणांवरि माथा ठेविलाः आणि दंडवतें घातलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नायकाः उठाः’’ :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila – 563
  • Chaklamba : एकाइ ऋणयाचनीं लखुबाइं उरीण करणें :।।: (एकवीरा, चकलांबा)
  • मागां अनियतवासीं लखुबाइसीं गोसावियांचीये वस्त्रपूजेलागी सेताची पाटी एकाइसापासी गाहाण ठेवोनि एकाइसाचीया दोनि आसू ऋण काढीलिया होतियाः तवं सारंगपंडीत वाराणसीं जात होतें: तयासांघातें एकाइसेंहीं वाराणसीं निगालीः वेच नाहीं म्हणौनि आपुलिया तिया आसू लखुबाइसातें मागावेयाकारणें एकाइसा आंबेंयासि आलीः सरिसी देमाइसें आलीः लखुबाइसें सन्निधानीं दास्य करीतें असतिः गोसावियांसि बाहीरिली पटिशाळेसि आसन असेः गोसावियांसि भेटि जालीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः तियें दिसीं राहीलियाः एरी दिसीं उदेयाचि एकाइसीं लखुबाइसातें म्हणितलें: ‘‘लखुबाइः माझिया दोनि आसू देयावियाः’’ लखुबाइसीं म्हणितलें: ‘‘गोसावियांची सेवा एथ कोण्ही करितें नाहीं: मीं गावां जाइनः मग भलती उभराउभरी करौनि तुमचीया आसू देइनः’’ तिया म्हणितलें: ‘‘ना माझिया आतांची देयावियाः’’ म्हणौनि धरणें बैसलीः तें देखौनिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुमचिया दोनि आसू हें देइलः तिया आसू एथ उसनीया देयाः तुमचिया दोनि आसू हें लागेः’’ तीं म्हणितलें: ‘‘ना जीः पांडे वाराणसीं जात असतिः मीं जाइनः माझिया आतांची देयावियाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तया उपहाराचे गोमटे तुम्हांसिः तुमची वाराणसीं एथौनि चरितार्थ किजेलः कां एथौनि तुमचिया दुनिया देइजैलः’’ तिया म्हणितलें: ‘‘ना जी माझिया आतांची होआवियाः मज वाराणसी जावें असेः’’ आणि लखुबाइसासि म्हणितलें: ‘‘माझिया दिधलीया वांचैनि अन्न खासि तरि तुज गोसावियांची आनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्ही जयावर दिधल तें द्रव्य आले नाहीं तरि कैचे देतील?’’ आणि तिया असत्कारें विकरौनि म्हणितलें: ‘‘मी काइ जाणे कैचे देइल? दे वो देः’’ यावरि गोसावियांसि थोरी खंती आलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वानरेयाः सांगवखेडा जाः एल्हंभटातें दोनि आसू उभाउभी मागौनि आणाः’’ भटीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ भट आउठ गावे सांगवखेडा गेलेः तवं एल्हंभट आंघोळीं बैसले असतिः भेटि जालीः बैसों घालविलें: भटीं मागील सांघितलें: तवं आसूची वाखारी वोसरिएवरि होतीः तें वाखारी घेउनि तिहीं म्हणितलें: ‘‘लागे तें घेयाः माझे दैव भाग्यः मातें गोसावी मागो पाठविलेः’’ म्हणौनि भटापुढां अपार आसू ठेविलियाः भटीं तयांतुली दोनि घेतलियाः एरी एल्हंभटाचा हातीं दिधलीयाः एल्हंभटीं म्हणितलें: ‘‘आणिक लागति तिया घेया नाः’’ भटीं म्हणितलें: ‘‘गोसावी मजकरवी दोनिचि बोलाविलीयाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो कां:’’ पुढति म्हणितलें: ‘‘तरि भटो राहाः आंघोळीं कराः जेवाः मग जाः’’ भटीं म्हणितलें: ‘‘ना मज गेलेयाविन न सरेः मज गोसावी उभाउभी पाचारिलें असेः’’ तें तैसेचि तयातें पुसौनि मागौतें दिसेंचि गोसावियांपासी आलेः गोसावियांसि तैसेचि चौकीं आसन असेः तियांची आसूं एकाइसांकडें टाकुनी घातलीयाः मग दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: तेथचि पुढां बैसलेः मग मागील अवघे सांघितलें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila – 564
  • Chaklamba : देमाइसातें राहावणें :।।: / देमती निर्गमनीं दैवादि निरूपण :।।: (चकलांबा, एकवीरा)
  • एकाइसासरिसें जातां देमाइसीं गोसावियांसि पुसिलें: ‘‘जी जीः मीं गावां जाउनी येइनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देमतीः इतुके दिस ऐसें म्हणाः बाइसा हातीं असों न लभेः तरि आतां धर्माचिया चाडा यातें सातसीया परवडी वेढुनिया कां नसा?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः तें दैव नाहीं:’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देमतीः देवे करावे तें केलें: पुरुषें करावे तें ठेलें: हें प्रबोध देउनि दैव उत्तराइ होतिः पुरुषाचे करणीय तें राहिलेः’’ यावरि गोसावी माळेकाराचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘कव्हणी एकु माळेयावरि उभा असेः कव्हणी एकु वाटा जातु असेः तया तो म्हणेः ‘‘आगा या वाटा जासी तरि नगराः पूराः पाटणा वरीपडा होसीः ना या वाटा जासी तरि चोरीं नागवीजसिः कां वाघे खाइजसिः’ तेया वाटा जाए नगराः पूराः पाटणा वरीपडा होएः ना तेया वाटा जाए तरि चोरीं नागवीजेः कां वाघे खाइजेः तैसे परमेश्वरू वीधिअवीधिचे ज्ञान करीतिः जरि जीव वीधि आचरे तरि वीधिइष्टा वरीपडा होएः ना अवीधि आचरे तरि अवीधि अनिष्टा वरीपडा होएः’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः तेही गोसावीचि करावें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘किजैल तें एथौनीचिः परि जीवें चाटसी स्थानीं होआवे लागेः’’ ‘‘जी जी चाटसी स्थानी तें कैसें?’’ यावरि गोसावी चाटसीयेचां दृष्टांत निरूपीलाः ‘‘कव्हणी एकीं सुगरणी असेः तें चाटसीयेते व्यापारवीत व्यापारवीत पाकनिष्पत्ति करीः आंबातु घालीः खिरीआंतु घालीः ‘षड्रस पक्वानांत घालीः तैसें परमेश्वरू जीवाते व्यापारवीत व्यापारवीत साधननिष्पत्ति करीतिः’’ ए प्रकरणी गोसावी कृपावशे जीवाचे हित बहुत निरूपिलेः लखुबाइसीं म्हणितलें: ‘‘देमाइः गोसावी आपण होउनि राहाविताती तरि कां न र्‍हासिः’’ तिया म्हणितलें: ‘‘ना मीं न र्‍हायें: जाइनः’’ तैसीचि तियें निगालीं: न र्‍हातिचि :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila – 565
  • Chaklamba : आउ ताट करणीं भटां दाखवणें :।।: / आउ ताट विस्तारीं भटां दरीसन करणें :।।:
  • एकु दीं घुइनायकांचा घरीहुनि ताट आले होतें: गोसावियांसि दुपाहारीचां पूजावसर जालाः धूपार्तिः मंगळार्ति जालीः मग आउसीं गोसावियांसि ताट केलें: दाळीः तूपः पोळीयाः पत्रशाखाः ऐसें अपार वाढिलें: चणेयाची दाळी अर्धपात्रा एक भरीलेः पळीभरी तूप घातलें: दोनि पोळीया मोडुनी घातलीयाः ऐसें संचले ताट गोसावियांपुढें ठेविलेः गोसावी ताटापासी बिजें केलें: ऐसें अवलोकिलें आणि आश्चर्ये म्हणितलें: ‘‘वानरेयाः वानरेयाः आरूता येइं: आउवां ताट वाढिलेः कैसें रेइले असे तें पाहेः’’ भट गोसावियांचिया शब्दासरिसें आलेः तवं तें देखिलेः भटीं म्हणितलें: ‘‘आउवेः ढोरे राखा हो जेया देवाची सकुमार श्रीमूर्तिः श्रीमंत सकुमार आरोगणाः तया देवासि ऐसें वाढिजे? ऐसें ताट किजे?’’ आउसीं म्हणितलें: ‘‘नेणेचि रे बा नागदेयाः’’ तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं यांसि कां कोपतें असा वानरेयाः येही काइ पूर्वि संतामहंताची सेवा केली होती? मां ए जाणतिः पूर्वि म्हातारीयेसि इश्वरसेवा घडली होति म्हणौनि एथीची प्रवृत्ति जाणें गाः म्हणौनि घरा जाउनी संबंधु दिधलाः’’ मग भटीं कुशलता युक्त वाढीलें: अवघेचि वरण फेडिलेः मग थोडेचि वरण वाढिलेः अवघेचि तूप फेडिलेः मग थोडेचि तूप वाढिलेः अर्ध पौळी कानवटी फेडौनि वाढिलीः गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः यावरि भटासि बाइसें आठवलीः भट बाइसाचें दुःख करूं लागलें: मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइसाचें दुःख न करा गाः दुःख कव्हणाचें किजे? जे जीव निरया अधोपातां गेले तेयाचें किजेः’’ मग भट उगेचि राहिले :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila – 566
  • Chaklamba : उमाइ आवाहन प्रसंगें भटां सेवाभावो कथन :।।:
  • एकु दीं भट गावां काही आणावेया गेलेः तवं गांव हिंडतां साडेगांव जवळी पडिलाः भटीं विचारिलेः ‘आउसासि गोसावियांचा सेवादास्यी तत्परता नाहीः म्हणितलें न करीतिः आणि आउसे क्षणा क्षणा रूसेतिः गोसावियांचिया सेवेसि कोण्हीं नाहीं: तरि जावों ना कां: उमाए आणूं:’ म्हणौनि गोसावियां न पुसत साडेगावां गेलेः वाहाणा न फेडीत वोसरीये बैसलेः बहिणी उमाइसाते म्हणितलें: ‘‘उमायेः चाल जावोः गोसावियांचें सेवादास्य ठाकत असें: सेवा करीते कोण्हीं नाहीं: जैसे बाइसे सेवादास्य करीतिः तैसें तू गोसावियांचे करीः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘नागदेया येतिये की परि वैजो गावी नाहीः’’ भटी म्हणितलें: ‘‘मजसांघाते येता तुज कोपैल?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना मीं तैसें न म्हणेः वैजोची ब्राम्हणी गरूदरे असेः प्रसुतीसमय आहेः कोनीं रीगैलः सुयेर करीनः मग मीं येइनः’’ तवं भटां न मनेचिः एकीकडें गोसावियांचें सेवादास्य आणि कव्हणीकडें वैजौचिये ब्राम्हणीचें बाळांतपणः भटासि थोरी खंती आलीः ‘‘मर तेणें बाळांतपणेंसीः’’ तियें राहावितें होतीः परि तें वाहाणा न फेडीत निगालें: रातौनि भागले भुकैले गोसावियांपासी आलें: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें:।: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वानरेयाः रात्री कां केली?’’ मग भटीं मागिल अवघें सांघितलें: तें अवघें आइकौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथीची सेवा तें काइ तुझेनि भाउपणें होइल? एथीची सेवा तें एथौनि द्यावी तेव्हेळी होइल कीं: परमेस्वराचा सकळही व्यापारू शक्तिद्वारकुः एथीचेनि अभिमानिये अभिमान सांडिला गाः आता तुझेनि उद्यमे काइ होइल? तुम्ही कां गेलेति?’’ ऐसें भटासि कोपलेः भटीं म्हणितलें: ‘‘तयासी गोमटे होआवे कीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तैसी एथ प्रवृत्तिचि नाहीः एथौनि दिजैल तें होईल कीं: हेचि दोनि पाउलें परता जातासि तरि म्हातारी निडळावरि हात ठेउनि वाट पाहाति असेः एथचेया सांघातेंवीन ठेली असेः’’ ऐसें गोसावी पाडळीये महादाइसाचें दूषण सांघितलें: मग भटीं ‘‘हो जीः इतुके चुकलोः’’ म्हणौनि दंडवतें घातलीं :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila – 567
  • Chaklamba : हंसराज म्हाइंभटातें बोलावूं धाडणें :।।: (चकलांबा, एकवीरा)
  • एकु दीं उदेयाचां पूजावसर जालाः गोसावियांसि धूपार्ति जालीः आसनीं उपविष्ट असतिः तवं रीधपूरीहुनी हंसराज तथा पाठक आलेः दंडवतें घातलीं: गोसावी यथावीधि श्रीप्रभुचे क्षेम पुसिलेः तेही सांघितलेः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तेथ म्हाइंभट असति की?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो जी असतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मग तें याते कही पुसेति?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो जीः गोसावियांचे भेटीसि उत्कंठीत असतिः आज्ञा होए तरि येतिः’’ तेव्हेळी गोसावी हंसराजातें म्हणितलें: ‘‘हंसराजाः तुम्हीं परमेस्वरुपूरां जाः तेथ म्हाइया नांव ब्राम्हणु असेः तयातें आधीं जातखेवो निरोपु सांघाजे ‘तुमतें एथौनि बोलविलें असेः खैराळेया वस्ति निगावें:’ मग श्रीप्रभुसि दंडवत घालाः’ तिहीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग तिहीं दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः निगालीः निगता सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जातजातां बळ्हेग्रामावरूनि जावेः द्रीढपुरूखातें ऐसें म्हणावेः तुमतें एथौनि बोलाविले असेः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि निगालीः बळ्हेग्रामासि गेलीः निरोपु सांघितलाः मग एकलीं पेणोवेणां रीधपूरां गेलीं: तिकोपाध्याचिये आवारीं श्रीप्रभुंची भेटि जालीः पासी आबैसें: म्हाइंभट उभी असतिः दंडवतें घालितां आठवलें: निरोपु सांघितलाः ‘‘म्हाइंभटों: तुमतें गोसावी बोलाविलें असेः ‘खैराळेया वस्ति निगावेः’ म्हणितलें असेः’’ मग शेष दंडवतें घातलीं: म्हाइंभटीं म्हणितलें: ‘‘महाप्रसादुः गोसावी कव्हणी ठाइं राज्य करिताती?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘ना आंबा राज्य करितातीः’’ म्हाइंभटीं श्रीप्रभुसि पुसिलें: ‘‘जी मातें गोसावी बोलाविलें असेः तरि जाओं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आवो मेला जाये ना म्हणेः जावेंचि म्हणेः’’ श्रीप्रभु गोसावी प्रसन्नताची आज्ञा दिधलीः मग म्हाइंभटीं आबैसातें म्हणितलें: ‘‘आबाइः काही प्रसादु कराः’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘हो कां: उदेया करुं आणि काइ?’’ म्हाइंभटीं म्हणितलें: ‘‘खैराळा वस्ति सांघितलीः’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘तरि आजी नव्हेः’’ मग म्हाइंभटीं सिधा काही प्रसादु होताः प्रसादाचा लाडु आणि मांडेयाचां कुसकटाः तयाचीया पोटळिया बांधलीयाः तो घेतलाः मग निगालेः आबैसे मुख्ये भक्त बोळवित निगालेः मग म्हाइंभट खैराळेया वस्ति आले :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila – 568
  • Chaklamba : गंगातीर भक्तां आवाहनीं खचले प्राणीये अनुवादु :।।: (चकलांबा, एकवीरा)
  • एकु दीं गोसावी दायंबास गंगातिरीचेया भक्तिजनातें चांगदेवोभटातें: उपाध्यातें: नाथोबाते बोलावू पाठविलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भोजयाः जाः तया गंगातीरीचेया अवघेयातें बोलावाः एकु दी संबंधु दीजैलः दरीसन दीजैलः’’ दायंबाए म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: निगालें: बळ्हेग्रामां गेलेः तयां अवघेयांतें म्हणितलें: ‘‘तुमतें गोसावी बोलाउं धाडिले असेः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘आम्हीं कोण्ही आरावों नाः’’ मग दायंबा प्रतिष्ठाना आलेः सारंगपंडीतापुढां सांघितलें: तें उगेचि होतें: मग गोसावियांपासी आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: पासी बैसलेः ‘‘जी जीः’’ म्हणौनि अवघें मागील सांघितलें: गोसावी आइकों सरलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘खचले प्राणीयेः गेलिया बुद्धीः जालीया धर्महानीः गेले प्राणीए धर्मापासौनिः’’ यावरि गोसावी खचलेया देउळाचां तथा हिरेखाणीयेचां दृष्टांत निरूपीलाः ‘‘कव्हणी एक हिरेयांची खाणी खणतिः खणत खणता खांब राखतिः वोदरें तेथ मध्यें टेका सुतिः तयासि ‘षटकोनी हिरा सांपडेः एकासि हिरकणी सांपडेः एक नसुधा रीगे निगेः एकावरि दरडी पडेः तैसें परमेस्वरुसन्निधानी असता एका मोक्षु होएः एका देहविद्या होएः तथा संतफळे होतिः एका सृष्टीशून्य होएः एका नित्यनरक होतिः’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पांडेयासि आतां ऐसीं अवस्था वर्तति असेः यातें देखौनि पालउ वोडवुनी जाइजेः’’ म्हणौनि श्रीकरें अनुकारू केलाः निरोपासरिसें उपाध्येः चांगदेवोभट आलेः नाथोबाही आलेः तेही भेटि लागी पासवडी आणिलीः एर न येतिचि :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila – 569
  • Chaklamba : मार्गी पूर उतरणें :।।: / मार्गी पूरोत्पवनीं भटां आश्चर्य दाखवणें :।।:
  • तेथौनि गोसावी सेकुटेयासि बिजें करूं आदरिलें: तवं अकाळवणी पडिलें होतें: मार्गी वाहाळेसि पुरू आला होताः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां कैसें गा वानराः भोजया?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी आम्ही गोसावियांतें अधरि पैलाडी नेउं:’’ दायंबाए आणि भटीं ऐसें मागां आपुलाले हात धरिलेः तेथ गोसावी श्रीचरणु ठेउनि मग दायंबाचेया खांदावरि एकु श्रीचरणु ठेविलाः एकु भटाचिया ठेविला आणि उभे राहिलेः इतुकेया ऐसें दुरि गेलेः जात जाता चोंढीये पाणी खोल जालें: पडलेः चुभळलें: गजबजिलेः दोहींचें हात सुटलें: आणि तें दोघै वाहावलेः तें बुडकळलें ऐसें जालें: तवं गोसावी उत्पवन करून थडी बिजें केलें: उभे राहिले असतिः तवं भट उदकावरि आलेः ‘गोसावी काइ पां?’ म्हणौनि गजबजौनि भट ऐसें पाहातिः तवं गोसावियांसि न देखतीचिः आणि भ्यालेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वानरेयाः हें एथ असे गाः’’ ऐसें पाहाति तवं गोसावियांतें पैलाडी थडी उभेया देखिलें: मग दोघै पव्होनी आलेः भटी गोसावियांची वस्त्रें पाहिलीः तवं कोरडी देखिलीः भटासि विस्मयो जालाः भटोबासी श्रीमुखाची वास पाहुनी म्हणितलें: ‘‘जी जीः गोसावी ऐसें कैसेनि थडिएसि आलेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हांसि एथौनि एतुलैचि आश्चर्य बहुत मां:’’ :।।:
  • (टिप – सदर लीळा चकलांबा व सेकटा या दोन गावांच्या मधील आहे…)
  • Utarardha Charitra Lila – 572
  • Chaklamba : आंबा पंचलिंगीं वस्ति :।।:
  • तेथौनि गोसावी मागुतें आंबेंयासि बिजें केलें: तेथ गावांपसिमें वाहाळीचिये थडी पैलाडी पंचलिंगाचें देउळ पूर्वाभिमुखः पुढां साजें: जगति पूर्वाभिमुखः तेथ चौकीं वस्ति जालीः गोसावियांसी दुपाहाराचा पूजावसर जालाः गुळळाः विडाः पहूडः उपहूड जालेयानंतरे सिद्धनाथा बिजें केलें: तेथ नावेक आसन जालें: गुळळा विडा जालाः मग पंचलिंगा बिजें केलें: आसन जालें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वानरेयाः ये तुमची पंचलिंगे गाः’’ म्हणौनि गोसावी श्रीकरे लिंगाकडें दाखविलेः तवं भटीं म्हणितलें: ‘‘जी जीः आमची पंचलिंगे तें हेः’’ म्हणौनि गोसावियांकडें दाखविलेः आणि भटीं म्हणितलें: ‘‘जी जीः ये पाणीबुडीयाचीः आमचे पंचलिंग तें चालतें बोलतें: तयाचे जडे पार्थीवे जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें होएः’’ घुइनायकें गोसावी आले ऐसें आइकीलें: मग दरीसना आलें: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलेः गोसावियांसि उपहारालागी विनविलें: गोसावी विनंती स्वीकरिलीः मग वाढुनि आणिलेः तें सपरिवरि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः घुइनायकें म्हणितलें: ‘‘जीः गोसावी आता कव्हणीकडें बीजें करीति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें जाइल ऐसें पेहर थडिएकडेः’’ घुइनायकें म्हणितलें: ‘‘जीजीः तरि आपुलें अपत्य सांभाळीत असावें जीः’’ गोसावी श्रीमुगुटे मानिलें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी-चकलांब्या वरुन सेकटा व परत चकलांब्या येथे आले व वस्तीस थांबले तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila –
  • Chaklamba : देवतायात्रा आगमनीं निर्गमन :।।:
  • कार्तिक पुर्णिमे आंबा यात्रा भरेः तवं कार्तिकी पूर्णिमा आलीः देवतेसि यात्रा भरों लागलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां देवतेसि यात्रा भरैलः मात्रा घ्याः एथौनि निगीजैलः’’ मग लखुबाइसीं आइती केलीः गोसावी तेथौनि बिजें केलें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila –
  • Chaklamba : तथा(आउ) श्रीमूर्ति आवलोकनी जीवे ओवाळणी :।।: / आउ जीवे ओवाळणी :।।: (चकलांबा, एकवीरा)
  • एकु दीं गोसावियांसि विळीचां वेळीं मार्जनें जालें: गोसावी सपूजीत आसनी उपविष्ट असतिः आउसें ऐसीं आलीं: गोसावियांते ऐसें एकाग्र दृष्टी देखिलें आणि सुख उपन्नलें: आणि म्हणितलें: ‘‘जी जीः स्वामी जगन्नाथा एक सीस मां ओवाळुं काइसेनि?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जीवु काइ जाला असे नायकाः जीवु असे कीः’’ आउसीं म्हणितलें: ‘‘ऐसे जी स्वामी जगन्नाथा जीवें ओवाळुनिः’’ :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila –
  • Chaklamba : चांगदेवोभटां भेटि :।।: (एकवीरा, चकलांबा)
  • एकु दीं आंबा गोसावी राज्य करिताती ऐसें आइकौनि चांगदेवोभट गोसावियांचीये भेटी आलेः गोसावियांसि भेटि जालीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: बैसलेः किती एक दिस सन्निधानीं होतें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila –
  • Chaklamba : तथा(एकाइसा) पोळीका असमर्पणीं भटासि आनंदप्रदान :।।: (एकवीरा, चकलांबा)
  • तेहीं आसू घेउनि परवंटीं बांधलीयाः तवं भट अपार भुकैले होतें: अन्न अवघे पाळलें होतें: एकाइसीं सिदोरिएलागी पोळीया केलिया होतियाः तिया सिदोरीचिया पोळीया वरि बांधौनि ठेविलिया होतियाः गोसावी पोळीया अवलोकीलियाः एरा कव्हणातें काही नाहीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बापुडें वानरें भुकैलें:’’ गोसावी आसनावरूनि उठिलेः आंगणी वेढें करीतिः आणि ऐसें म्हणतिः ‘‘बापुडें वानरें भुकैलें: कव्हणातें काही अन्न असे?’’ परि तियें उगीचीः ऐसें गोसावी तयाचीया पौळीया अवलोकीति आणि मागुतें तैसेचि म्हणतिः आणि बाहीरि बिजें करीति आणि मागुतें भितरीं बिजें करीतिः ऐसें वेळां च्यारि पाच म्हणितलें: एकाइसां कळलें परि उगीचि असतिः देओ न सकेतिः मग गोसावी भटातें कृपादृष्टी अवलोकिलें: आनंदु संचरिला आणि भट ढुलों लागलें भटाची भूक हरीलीः आणि ढेकर देओ लागलें तिये एरी दिसीं निगालीं: तवं मार्गी विटाळु जालाः तिया रोटीया गोवळांसि दिधलीयाः मग आपण आंघोळीं केलीः रांधिलेः मग जेविली :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)
  • Utarardha Charitra Lila –
  • Chaklamba : तथा प्रतिदीनीं (घुइनायकाचा)उपहारु स्वीकारु :।।: (एकवीरा, चकलांबा)
  • घुइनायकें जातांसमयी गोसावियांतें विनविलें: ‘‘जी जीः गोसावी जवं एथ राज्य करीति तवं मीं गोसावियांलागी उपहारु आणीनः मीं जरि न पवाडें: तरि गोसावी भक्तिजनातें पाठवावेः’’ गोसावी विनती स्वीकरिलीः मग गोसावी जवं तेथ राज्य केलें: तवं नित्य उपहार स्वीकरिला :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी वरुन चकलांबा येथे आले. येथील एकवीरेचें देउळात स्वामींचे २० दिवस अवस्थान होते तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: