Bhingar (भिंगार)

भिंगार, ता. जि. अहमदनगर


भिंगार गांवाच्या उत्तरेकडे ब्राम्हण गल्लीत मंदीरात मुख्य स्थाना सहीत 5 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

भिंगार हे गाव, अहमदनगर पाथर्डी मार्गावर अहमदनगरहून पूर्वेस 3 कि. मी. आहे. भिंगारला जाण्यासाठी अहमदनगरहून सिटी बस सेवा तथा एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. वांबोरीहून भिंगार (नगरमार्गे) 28 कि. मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान भिंगार गावाच्या उत्तर विभागी ब्राह्मण गल्लीत तीन नळाजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात एकदा व उत्तरार्ध काळात एकदा असे एकूण दोन वेळा भिंगार येथे आले. ते पूर्वार्धात अरणगावहून भिंगारला आले. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी 15 दिवस वास्तव्य होते. (पू. ली. 160, तु. प्र. स्था. पो.) व उत्तरार्धातही अरणगावहूनच भिगारला आले. त्यावेळी त्यांचे येथे 20 दिवस वास्तव्य होते (उ. ली. 281, स्था. पो.)

येथील इतर लीळा : 1. भाइदेवाची बोरे आरोगण करणे (पू. ली. 357)

2. भाईदेवाने आणलेले चणे आरोगण करणे (पू. ली.358)

3. देमाइसाला ज्ञान, भक्ती, वैराग्य निरूपण करणे (पू. ली. 359)

4. देमाइसाला प्रतीती पंथ व विश्वास पंथ निरूपण करणे. (पू. ली. 360, 361)

5. खेइगोईंना समुद्राचा दृष्टांत निरूपण करणे. (उ. ली. 283)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. साधा, लाहामाइसा, रत्नमाणिका भेटी स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानापासून उत्तरेस 6 फूट 2 इंच अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे बसलेले होते. त्यावेळी साधा, लाहामाइसा, रत्नमाणिका या तिघी जणी अरणगावहून आल्या. आल्यावर त्यांनी सर्वज्ञांना दंडवत घातले.लाहामाइसानेवरत्नमाणिकाने श्रीकंठी फुलांच्या माळा घातल्या. आसनावर विडे व गुळाच्या लहान ढेपा ठेवल्या. साधाने फक्त फलांची माळ घातली व विडा अर्पण केला. सर्वज्ञ साधाला म्हणाले. “यांनी आम्हाला गूळ अर्पण केला. तुम्ही का केला नाही” साधा म्हणाली, “वाटेने येताना, एके ठिकाणी ब्राह्मणाच्या घरी पाणी पिण्यास गेले होते. गुळाच्या तीन ढेपाओसरीवर ठेवल्या होत्या. तेव्हा तेथे एक वासरू आले. त्याने त्यातील एक ढेप खाल्ली. मीच दैवहीन आहे. तेव्हा माझ्याच वाट्याची ढेपखाल्लीम्हणायची.” सर्वज्ञ म्हणाले, “साधे हो, तुम्ही दैवहीन नाही. आम्ही तुम्हाला गूळ देतो, तो तुम्ही आम्हाला अर्पण करा.” साधा म्हणाली, “देवाचेच देवाला कसे काय अर्पण करावयाचे?” सर्वज्ञ म्हणाले, “जीवाजवळ आहे तरी काय हे सर्व देवाचेच आहे.” मग सर्वज्ञांनी साधाला ओंजळभर गूळ दिला. साधाने तो गूळ सर्वज्ञांना अर्पण केला. (उ.ली. 281, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. आसन स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानापासून पूर्वेस 5 फूट 11 इंच अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे बसलेले होते. त्यावेळी लक्ष्मीदेव व भाईदेव यांची माता या दोघांना घेऊन सर्वज्ञांच्या दर्शनाला आली. दंडवत घातले. श्रीचरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि लक्ष्मीदेवाची भूतबाधा दूर होण्याविषयी विनंती केली. सर्वज्ञांनी लक्ष्मीदेवाला हाक मारली; परंतु लक्ष्मीदेव पळाले आणि नारायणाच्या देवळावर चढले. मग त्यांनी पाण्याच्या मोरीमध्ये तोंड खुपसले. सर्वज्ञ म्हणाले, “लक्ष्मीदेव सन्मुख असते, तर त्यांचे पीसे दूर झाले असते.” नंतर फक्त भाइदेवच सर्वज्ञांच्या संनिधी राहिले. (पू. ली. 160, तु. प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. भाइदेवाशी लघुनीती करवणे स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून पूर्वेस 7 फूट 8 इंच अंतरावर आहे.

लीळा : भाइदेव बालवयाचे होते. ते रात्री बाइसांच्या पुढे झोपायचे. त्यांना रात्री लघवीला लागली की ते सर्वज्ञांना म्हणत, “मुनिदेव हो, मुतु” बाइसा म्हणायच्या, “बटीका उठ, मी तुला बाहेर घेऊन जाते. परंतु ते उठत नसत. गप्प राहत. मग सर्वज्ञ भाईदेवांना देवळाच्या दरवाजात घेऊन येत. ते सर्वज्ञांचे दोनी श्रीकर धरून उभे राहूनच लघवी करीत. त्यामुळे सर्वज्ञांचे श्रीचरण शिंतोडले जात. नंतर बाइसा सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण करीत. (पू.ली.372ख. प्रत,वि.स्था.पो.क्र.1625)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. मादने स्थान :

हे स्थान भाइदेवाशी लघुनीती करवणे स्थानापासून पूर्वेस 6 फूट 10 इंच अंतरावर आहे. (स्था, पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


पूर्वार्धातील 15 दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून माळवीपिंपळगावला गेले व उत्तरार्धातील 20 दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून नेप्तीला गेले.


अनुपलब्ध स्थान :

1. आदित्याच्या देवळाच्या पश्चिमेचे परिश्रय स्थान.
2. नारायणाच्या देवळातील स्थान.
3. बडव्याच्या घरातील स्थान.
4. भिंगार देवीच्या देवळातील आसन स्थान.
5. पंचम वेद स्थान.
6. भिंगारदेवीच्या देवळाच्या उत्तरेचे साधाते अनुवर्जित जाणे स्थान.
7. गावाच्या वायव्येचे महालक्ष्मीच्या देवळातील स्थान.
8. एकवीरेच्या देवळातील स्थान.
9. गणेशाच्या देवळातील स्थान.
10. पार्वती सोमनाथाच्या देवळातील स्थान.


भिंगारची एकूण स्थाने : 15


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: