Bhadgaon (भडगाव)

भडगांव, ता.भडगांव जि.जळगांव


येथील 2 स्थाने 2 ठीकानी आहेत -
अवस्थान स्थान - हे स्थान भडगांव गावातच ग्रामपंचायत जवळ आहे.
विरहण व अवस्थान स्थान - हे स्थान भडगांव गावाच्या इशान्येकडे गावालगतच गिरना नदीच्या काठावरील मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

भडगाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावर चाळीसगावहून ईशान्येस 36 कि.मी. आहे वा पाचोऱ्याहून पश्चिमेस 14 कि.मी. आहे. कनाशीहून ईशान्येस भडगाव (कोटली मार्गे) 8 कि.मी. आहे. भडगाव ला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान भडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वसै होती.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कनाशीहून भडगावला आले. प्रथम गावाच्या ईशान्येस असलेल्या शिवालयात त्यांचे तीन दिवस अवस्थान झाले; परंतु तेथे फार रचमच असल्यामुळे फाल्गुन वद्य प्रतिपदेच्या दिवशी ते येथे आले. त्यांचे या ठिकाणी सात दिवस वास्तव्य होते. (पू.ली. 182, तु.प्र.स्था.पो.)

येथील इतर लीळा :

(1) इंद्रभटांना वसैनिक्षेदप्रसंगी भटाचार्याची गोष्ट सांगणे. (पू.ली. 391)

(2) नागदेवभटांचे ‘इंद्रया’ हे प्रासादिक नाव ठेवणे. (पू.ली. 394)

(3) इंद्रभटांना तांबोळाचा प्रसाद देणे. (पू.ली. 396)

(4) गौराइसाला पंचराणेयाचा मुख्यनायक म्हणणे. (पू.ली.397)

(5) गौराइसा निद्राप्रसंगे इंद्रभटांना शिक्षापण करणे. (पू.ली.398)

(6) माहादाइसाच्या उपहाराचा व वस्त्राचा स्वीकार करणे. (पू.ली. 400)

(7) साधां पूजाकरणी, बाइसा कोपणे. (पू.ली. 401)

(8) उमाइसाला द्वारकेला पाठविणे. (पू.ली. 403)

(9) काकोसांना स्थिती देऊन द्वारका दर्शन करविणे. (पू.ली. 405)

(10) पद्मनाभीचे क्षौर निराकरणे. (पू.ली. 406)

(11) साधां मोदक विपलाणे. (पू.ली. 407)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. अवस्थान आणि विहरण स्थान :

हे स्थान भडगावच्या ईशान्येस गिरणा नदीच्या उत्तर काठावर पश्चिमाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे शिवाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू सायंकाळच्या वेळेस कनाशीहून येथे आले. त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. (पू.ली. 389, स्था.पो.) हे सर्वज्ञांचे विहरण स्थान ही होय. (पू.ली. 393)

यथील इतर लीळा :

(1) अनंताचे सुड ऐकणे. (पू.ली. 393)

(2) नागदेव भटांना स्थिती देणे. (पू.ली. 394)

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू भडगाव येथील 10 दिवसांच्या वास्तव्यानंतर पाचोऱ्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

(1) शिवालयाच्या पटीशाळेवरील आसन स्थान.

(2) शिवालयाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.

(3) शिमगा शिंपणे स्थान.

(4) दक्षिणेच्या वसैएतील विहरण स्थान.

(5) वसैएच्या पटीशाळेवरील आसन स्थान.

(6) अंगणातील मादने स्थान.

(7) गारी बुजवणे स्थान.

(8) वसैए पुढील पिंपळाच्या झाडाखालील आसन स्थान.

(9) वसैएच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.


भडगावची एकूण स्थाने : 11


  • Purvardha Charitra Lila – 389
  • Bhadgaon : भडेगावीं शिवाळा अवस्थान :॥:
  • विळीचां वेळीं गोसावी भडेगावा बीजें केलेंः गावा इशान्ये नदीउत्तरे वाहाळेपस्चिमेः शिवाळे पुर्वाभिमुखः गोसावी शिवाळेयासि बीजें केलेंः शिवाळा अवस्थान जालेः दिस तीन :॥: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 390
  • Bhadgaon : सिमुगा खेळु :।।: / सिमुगा सींपणें :।।:
  • सिवाळें रचमचेचें स्थान म्हणाौनि गोसावी वसैये बिजें करूं आदरिलें: सिमुगेयाचेया पाडीवेयाचां दिसीं उदेयांचि कांसारवाडेंनहूनि बिजें केलें: गोसावियांसि उदेयाचा पूजावसरू जालाः गोसावियांसि श्रीमुगुटीं मुगुटमाळः कंठीं कंठमाळः गळदंडाः ललाटीं चंदनाचा आडाः चंदनेंचर्चित श्रीमूर्तिवरि मळणें उधळिलें: गोसावी मेघवीर्ण पागेची तळसुती केलीः भक्तिजना चंदनाचे टिळें: अक्षताः तोडीं तांबुळेः टिळयेंावरि सेंदुर ऐसें सपूजीत सपरिवारीं सिवाळांहूनि बिजें करितां कांसारवाडांतुनि जातां: मार्गी होळी होतीः तेथ गोसावी उभे राहिलेः नागदेवभट इंद्रभट मंत्रु म्हणतिः गोसावी प्रदक्षिणा दिधलीः श्रीचरणीचेनि आंगुठेनि ‘‘हो जै रेः हो जै रेः’’ म्हणौनि राख उधळिलीः अवघेयाचां निडळीं राख उठिलीः ‘‘महात्मे नकोः’’ ऐसें सर्वज्ञें म्हणितलें: तवं दादोसांवरि राख उधळिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हा नको गाः पैल नको गाः’’ आणि एरएरांतें राखा भरीः गोसावी खुदखुदां हास्य करीतिः श्रीमूर्तिची आठै आंगें हालतिः ऐसें नावेक सिंपणें जालें :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 391
  • Bhadgaon : वसैये अवस्थान :।।:
  • तैसेचि गोसावी गावांतु वसैयें बिजें केलें: गावांतु वसैया दोनिः पूर्वाभिमुखः उत्तरे वसैचिये प्रशस्त स्थान देखौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइ एथचि मात्रा आणाः’’ तेथ सपरिवारीं अवस्थान जालें: दिस सात :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 391
  • Bhadgaon : तथा(इंद्रभटां) वसै निषेदु निराकरण :।।:
  • गोसावियांसि वसैये आसन जालें: नागदेवोभटी दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: बैसलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां गाः इंद्रेयाः हस्ती वेंझ देवों आलेयांहीं परि ब्राम्हणासि वसैयेंआंतु रीगों नये ऐसें तुचें शास्त्र बोलेः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि तुम्हीं रीगालेति कैसे? आलेति कैसें?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः आम्हीं आपुलेया गोसावियांसरिसे आलोः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां गाः दस अवतारामध्यें हें एकीं: देवता होएः नव्हे?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटाचार्ये आपुलेया शास्त्राचेनि बळें देवतेसि आबुखा घातलाः ऐसां गा भटाचार्याः आपुलेनि अभिमानें देवता दुषिलीः वैरीयांचा देवो जाला तरि काइ दगडें हाणौनि फोडावा? हां गा इंद्रेयाः देवतेसि आणि आबुखा?’’ इंद्रभटीं म्हणितलें: ‘‘जी जीः तो भटाचार्या नव्हेः सुना होएः सुनाचार्या होएः जेउतें तेउतें भुंकतुचि गेलाः’’ गोसावी हास्य स्वीकरिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पोरु जीवु आपुले ओखटेगोमटे जाणें: परि जाणौनीचि करीः’’ :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 392
  • Bhadgaon : गारि बुजवणें :।।: भडेगावीं :।।:
  • गोसावियांसि बिजें करितां मार्गीचि गारी होतीः सिमुगा खेळावाकारणें गारी केली होतीः तें गारी वसैये पुढें इशान्येः तियां जातां रात्रीं परिश्रया बीजें करितां अवघडः दिसां दो चै उपरि गोसावी तियें गारीपासी उभे ठाकलें: आणि अवलोकिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें रामाचें वानरसैन्य रीगें: तरि गारी बुजेः’’ तें दादोसीं आइकीलें: बाइसीं आइकीलें: बाइसीं म्हणितलें: ‘‘रामाः रामाः बाबा ऐसें म्हणत असतिः’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘या गाः या गाः’’ म्हणौनि महुर्तामाजि अवघां गारी बुजिलीः तवं गोसावी चरणचारी उभे होतें: समस्थळ प्रशस्त मार्ग केलाः तें देखौनि दादोस मुख्य समस्तातें अमृतसंजीवना दृष्टी अवलोकुनि म्हणितलें: ‘‘रामें शिळीं सेतु बांधला तद्वत केलें मां:’’ मग तेही ‘‘जी जीः’’ म्हणौनि परमसंतोखातें पावौनि नमस्कार केलें: गोसावी तें मार्गि वेढे सातपाच केलेः मग विहरणासि बिजें न करीतिचिः वसैएसि बिजें केलें: आसनी उपविष्ट जालें: तें अवघी श्रीमूर्ति मातीया फुपुवां भरली होतीः बाइसीं पालवेंकरौनि श्रीमूर्ति परिमार्जीलीः मग पडदणी ओळगवीलीः मर्दनामादनें जालें: पूजा आरोगणा जालीः विडा जाला :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 393
  • Bhadgaon : अनंताचे सूड आइकवणें :।।: भडेगावीं :।।:
  • गोसावियांसि पटिशाळे आसन जालें: विष्णुदेव अनंतु नावें वैष्णवः तयाचे सिकार ऐसें गोसावियांचिया दरीसनासि आलेः गोसावियांचें दरीसन जालें: दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: तिहीं गोसावियांचां ठाइं अवसरू केलाः तेहीं आळती घालुनि गाइलेः तें अनंताचें दोनि सूडः उत्तरगोग्रहणिचेः कर्णाविकर्णाचिए जुझीचेः द्वारकाप्रवेशीचा एकुः तें गोसावी निश्चळता आइकीलें: मग तयांसि पाठवणी दिधलीः गोसावी पुडवाटोवा रीचविलाः आणि एकु दामु देवविलाः मग तें गुणानुमोदिन करित तोखत गेले :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 394
  • Bhadgaon : नागदेवोभटां स्तीतिः इंद्रा नामकरण :।।: / इंद्रभटां स्तीतिः नामकरण :।।: भडेगावीं :।।:
  • गोसावियांतें नागदेवोभटीं उपहारालागी विनविलें: ‘‘जी मीं गोसावियांचा ठाइं मास दी उपहार करीन जीः’’ गोसावी विनवणी स्वीकरिलीः बाइसीं पाकनिष्पत्ति करूं आदरीलीः मग गोसावी उदेयाचा पूजावसरू जालेयानंतरें विहरणां सिवाळेयासि बिजें केलें: तेथ आसन जालें: पासी नागदेवोभट असतिः गोसावी बिढारां बिजें करीतां तयातें म्हणितलें: ‘‘इंद्रेयां तुम्हीं एथ बैसालः’’ ऐसें म्हणौनि अवलोकिलेः आणि तया स्तीति जालीः एथ गोसावी नागदेवोभटां इंद्राची स्तीति जाली म्हणौनि इंद्रेया हें प्रसादाचें नांव ठेविलेः गोसावी बिढारा बिजें केलें: तें तेथचि होतेः महादाइसीं पुसिलें: ‘‘जी जीः नागदेवोभट क्यें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तो तेथचि असेः तयासि इंद्राची अंकुशमुद्रा जाली असेः’’ म्हणौनि श्रीकरिचेनि अनुकारें हृदयांत दाखविलेः महादाइसीं म्हणितलें: ‘‘जी जीः आरोगणेसि उसीरू होइल तरि बोलाउं जाओं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाः’’ मग तियें आलीः महादाइसीं म्हणितलें: ‘‘हे काइ नागदेवोभटो? गोसावियांसि आरोगणें उसीरू जालाः तुम्हीं आझूनि कैसें बैसलेति?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘काइ करूं रूपाबाइः पवोचि गेलेः उठों जातों आणि उठवेचिनाः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘उठीः जाओं:’’ तें उठूं गेलेः तवं उठवेनाः मग तेंही आंगेसि धरूनि उठविलें: खांदेसि लाउनी आणिलेः गोसावियांतें देखिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘इंद्रेया याः एथचें यजमान आले मां:’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ महादाइसीं तयासि गोसावियांसि नमस्कारू करवुनी बैसविलेः ‘‘काइ गा इंद्रेयाः इंद्राची अंकुशमुद्रा वर्तति होतीं:’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो जीः सुखानंद प्रगटिलाः परि उठवेनाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां उठाः आणि इतुलेनि स्तीति भंगलीः स्तीति पातळ जालीः परि सावधाइ नाहीं: दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: गोसावी महादाइसातें म्हणितलें: ‘‘बाइः याचिया वारीया तुम्हींचि पूरोहीतें होआः’’ मग महादाइसीं गोसावियांसि मर्दनामादनें केलें: मग गोसावियांसि पूजा जालीः धूपार्तिः मंगळार्ति जालीः भक्तिजन क्रमें बैसलेः मग महादाइसीं दंडवतें घातलें: गोसावी अनुज्ञा दिधलीः गोसावियांसि आरोगणा जालीः गोसावियांचीए पांतीं भक्तिजनां जेवणें जाली :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 395
  • Bhadgaon : तथा(इंद्रभटां) तांबुळ ग्रहण/प्रदान :।।:
  • एकु दीं गोसावी सिवाळेयासि विहरणां बिजें केलें: गोसावी चौकीं आसनी उपविष्ट असतिः इंद्रभट आलें: दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: बैसलेः गोसावियां तांबुळ प्रत्येजितां तेंहीं आंजुळी वोडविलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘इंद्रेयाः एथचें तांबुळ घेयावें ऐसा काइ वीधि?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘नेणें जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि काइ शास्त्र?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘नेणें जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि कां घेति असा?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः भावें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भावो व्यभिचारियाः’’ इंद्रभटीं म्हणितलें: ‘‘ना जी द्यावेः हा माझा भावों:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हो कां: भावासि काइ रावो राणा असेः भावो अनियत फळ दे कीं:’’ मग गोसावी तेयांसि तांबुळ दिधलें: मग तेहीं सामाये तें तोंडी घातलेः एर पदरीं बांधलें :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 396
  • Bhadgaon : सोभागां प्रसाददानीं तुळसी स्वीकारू :।।: / तथा श्रीचरणा तुळसी वाणें :।।:
  • एकु दीं गोसावियांसि आरोगणा जालेयानंतरें आसनीं उपविष्ट असतिः सोभागें भिक्षा करौनि आलीं: गोसावियांसि झोळी दृष्टीपूत केलीः गोसावी डावा श्रीकरू झोळीयेखाली घातलाः कृपादृष्टी अवलोकिलें: गोसावी प्रसादु करीत असतिः तवं इंद्रोबा गोसावियांचिया श्रीचरणां तुळसी वावेया आलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइ गा इंद्रेयाः देवो पाहिजतु असिजे?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देवो ऐसा असें गाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः देवो ऐसांचि बरवा कीं:’’ मग गोसावी श्रीकरीचिया आंगुळीया झोळीयेसि पुसीलीयाः तियें परतीं गेलीं: इंद्रभटीं गोसावियांचे श्रीचरण उदकें सिंचन केलें: श्रीचरणां तुळसी वाइलीयाः साष्टांगीं वाइलीयाः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: गेलेः तवं सोभागें दुःख करूं लागलीः ‘माझें पापिणीचें गोसावी प्रसाद करू न ल्हातीचिः’ म्हणौनि म्लानवदनें हुनि बैसलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘सोभागाः जेवा ना कां?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः जेवीन आणि काइः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आणा झोळीः’’ मागुता प्रसादु केलाः आणि सुखीयें जालीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘घेयाः आतां जाः जेवाः’’ तिया म्हणितलें: ‘‘हो जीः’’ मग तियें जेविलीः तियें रूची गौल्यते ेचिी अनुभवीयें :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा… )
  • Purvardha Charitra Lila – 397
  • Bhadgaon : गौराइ दरीसनाज्ञा करणें :।।: / गौराइ पंचराणेयाचां मुख्य नायकु म्हणणें :।।:
  • कु दीं गोसावियांसि आरोगणा जालीः पहूड जालाः शयनासनीं असतिः तवं गौराइसें गोसावियांचिया दरीसना आलीः दारवंडेसी उभीं असतिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः बाहीरि पाहा पां: कोण असे?’’ बाइसीं पाहिलें: ‘बाबाः कोण्ही नाहीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः पंचराणेयाचां मुख्य नायकु असेः’’ मग बाइसें गेलीः तवं गौराइसें बाहीरि उभी असतिः बाइसीं म्हणितलें: ‘‘बटिकीः भितरीं येः बाबासि दंडवत करिः’’ तिये आलीं: गोसावियांसि दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीः गोसावियांपासी बैसलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तियें अवघीं एथचेया अवसरा आली होतीं: तुम्हीं एथचेंया दरीसना आलेति तरि एथचेया अवसरा केधवांहीं न याचि तें काइ?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना जीः मातें बिढार राखों ठेवीतिः आपण गोसावियांचिया दरीसनां येतिः’’ यावरि बाइसातें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देखिलें बाइ? एथचेया दरीसनाचेया चाडा यां वाहाणाचें व्रतः न्हाणाचें: अन्नाचें व्रतः उदकाचें आदिकरौनि व्रतः तोंडीचें तांबुळ वारिलेः माथांचा जाय न वाळेः ये दसे काइ येहीं हें करावें: ये दसे येही खावें: जेवावें: लेयावें: नेसावें: ऐसयाकरवी बिढार राखवीतिः आणि आपण एथ कोरडी येतिः’’ मग सर्वज्ञें गौराइसांते म्हणितलें: ‘‘बाइः तुम्हीं एथचेया दरीसना आलेति कीं बिढार राखों आलेति? बाइः तियें निगति निगति तवं आपण आधी पुढे येउनि मार्गी उभेया ठाकावें: मग तियें आपुलेया बिढारा भलेतें करीतुं: आपण एथचीया अवसरा न चुकिजे होः बाइः’’ मग तियें गोसावियांचिया तिहीं अवसरां येति :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा… )
  • Purvardha Charitra Lila – 398
  • Bhadgaon : तथा गौराइ निद्राप्रसंगें इंद्रभटां शिक्षापण :।।:
  • एकु दीं गौराइसें गोसावियांचिया विळीचांचेया अवसरा आलीः खांबाआड बैसलीः गोसावियांसि पूजावसरू जालाः मग पाहार एकु परावर निरूपण जालें: एतुकांसमीं गौराइसासि निद्रा आलीः गोसावी भक्तिजनासि पाठवणी दिधलीः तिये अवघीं बिढारा गेलीं: गोसावियांसि व्याळी जालीः गुळळा जालाः विडा जालाः बाइसीं फोडी ओळगविलीयाः विडीया करौनि देतें असतिः कवाडें घालीतां समढं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः भितरीं पाहा पां: कोण असे?’’ बाइसीं पाहिलें: तवं न देखतीचिः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः कोण्हीं नसें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः इंद्रेयाची जाया असेः’’ बाइसें गेलीं: तवं खांबाआड गौराइसें निजैलीं असतिः बाइसीं म्हणितलें: ‘‘बटिकीः उठः तुझीं अवघी बिढारा गेलीं: तू निजैलीसि कैसी?’’ उठिलीं: गोसावियांसि दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः यांतें बोळवितें जाः’’ मग बाइसें बोळवितें गेलीः मग तियें बिढारां गेलीः सांघातें पदुमनाभीदेवही पाठविलें: बाइसी तयांसि निरोविलीः इंद्रभटातें म्हणितलें: ‘‘बटकीतें सांभाळीः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो कां:’’ इंद्रभटीं बाइसांसि नमस्कार केलाः मग वसैवरी बोळवीत घातलीं: आपण बिढारा आलेः तवं रात्रीं गौराइसांसि इंद्रभट कोपों लागलेः चिमोरे घेतिः गालोरें घेतिः पाठीं बोकें तोडीतिः इशाळ करीतिः पैशून्य बोलतिः ऐसें रात्री बहुत दुख दिधलें: उदेयांचि गोसावियांचिया पूजावसरासि भक्तिजन अवघेचि आलेः आणि गौराइसें आलीं: कोमाइलीं: धोमाइलीं ऐसीं गोसावी देखिलीं: गोसावी इंद्रभटातें म्हणितलें: ‘‘हां गाः मुक्तीची चाड आणि तेवीचि खुटंदावें सांभाळणें: मुक्तिची चाड तेणें मुंगीये वीरू न चिंतावेः हां गाः मातलेया वेसरापुढें लेंकरूवें सुआवीं:’’ ऐसें कोपलेः गौराइसांसि ऐसें जालें: ‘गोसावी माझा कैवारू घेतलाः’ इंद्रभटां ऐसें जालें: ‘जें गोसावी माझें अनुचित सांडविलें: घरचिंतन सांडविलेः’ मग इंद्रभटीं म्हणितलें: ‘‘जी जीः मीं चुकलाः’’ म्हणौनि श्रीचरणां लागलें: गौराइसांचें रात्रीचें दुःख निःशेष गेलें: ऐसा गोसावियांचा गुण उभयवर्ग मानिलाः तियें दिउनी अतिप्रीति करीति :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा… )
  • Purvardha Charitra Lila – 399
  • Bhadgaon : स्त्रीसूळव्यथा निवृत्ति: तथा तांबोळदान :।।:
  • ब्राम्हणा एकाची स्त्री तें वसैयेपुढील पिंपळु सिंपो ये तेव्हेळी गोसावियांतें देखेः गोसावी विहरणा बिजें करीति तेव्हेळी झळकतां देखेः तियेसि गोसावियांचिया दरीसनाची थोरी अवस्था संचरलीः तवं महादाइसें तियेंचेया घरांसि भिक्षे जातिः तवं महादाइसातें बैसों घालीः सोपस्कार भिक्षा देः एकु दिसीं तियेसी सुळु उठिलाः महादाइसें भिक्षे गेलीः तवं तिएसि उठवेनाः महादाइसीं म्हणितलें: ‘‘तूं ऐसीं कां?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना मज सूळ उठिला असेः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘तुझा सूळ आमचीयां गोसावियांचनि दरीसनें जाइलः’’ तिया म्हणितलें: ‘‘वसैये असति तें गोसावी?’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘ना होः’’ तिया म्हणितलें: ‘‘तयांचेया दरीसना मीं आधीचि जावों पाहें: परि माझा वरैतु दुरळुः आइः तुमचीयां गोसावियांचें मज दरीसन कैसेनि होइलः’’ ऐसें सांघौनि दुःख करीं: महादाइसीं अनुराग उत्सुक देखौनि म्हणितलें: ‘‘तू पडी घेः’’ तिये विवळो लागलीः तयासि तें धावनी करीतिः परि काइसेनिहीं समेनाः मग तिया भाताराते म्हणितलें: ‘‘वसैये जे गोसावी असति तेयांचीया दरीसना नेयालः तरिचि माझा सूळ जाइलः’’ वरैतें म्हणितलें: ‘‘हो कां:’’ मग तो हाटवटिये गेलाः पानेंपोफळें घेतलीः नारियळ आणिलें: मग दरीसना निगालीः तिया तें नारियळ सुपवतीयेचां दुनवंगी ठेविलेः आधी एकीं वाट पातलीं: आणि म्हणितलें: ‘‘पाहा कां: मीं नारियळ विसरलीयेः सुपवतियेचा दुनवंगी ठेविलें असेः तो नारियळ आणूं गेलाः तवं तें वहिली गोसावियांचिया दरीसना गेलीः गोसावियांसि पटिशाळेवरि उजवीएकडें श्रीमुखीं तांबुळ ऐसें सपुजित आसन असेः गोसावियांसि तिया बाहिया पसरौनि क्षेम दिधलें: दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीः गोसावियांजवळीं श्रीमुख पाहातें बैसलीः तवं तो नारियळ घेउनि आलाः पानेंपोफळें नारियळ गोसावियांसि दरीसन केलें: मग तेणें दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलाः गोसावियांजवळीं बैसलाः गोसावियांपुढें साघों लागलाः ‘‘जी जीः औषधें केलीः बहुत धावनी केलीः परि सूळ काइसेनहीं न र्‍हायेचि जीः मग एहीं म्हणितलें: ‘मातें गोसावियांच दरीसना न्या कां: मग माझा सूळ शमेलः’’ गोसावी आइकतचि होतें: मग तो दंडवत करौनि निगालाः परता गेलाः आणि तें गोसावियांपासी आलीः श्रीमुखीचेया तांबुळां आंजुळी वोडविलीः गोसावी तांबुळ दिधलें: तें तोंडीं घातलें: मग गोसावी तयाचीये पाठीवरि श्रीकर ठेविलाः गोसावी तेयांसि वरू दिधलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एथौनि अद्यप्रभृति तुमतें सूळ न बधी हों:’’ आणि तें दंडवत करौनि निगालीः तेणें निराबाध देखिलीं आणि संतोखलाः तिया महादाइसातें म्हणितलें: ‘‘निच माझें एक पक्वान आणि ये गोसावियांलागी न्यावें:’’ मग महादाइसें नीच भिक्षे जातिः एक पक्वान घेउनि येतिः ऐसीं तें कणवेचीं :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 400
  • Bhadgaon : देव निवारीत महादाइ वस्त्रपूजा स्वीकारू :।।:
  • महादाइसासि गोसावियांचां ठाइं एक वस्त्र ओळगवावें: ऐसीं वासना जालीः इंद्रभटातें म्हणितलें: ‘‘नागदेवोभटोः मज एक वस्त्र घेउनि देया कां?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘मातें काइ म्हणत असाः दादोसांतेंचि म्हणाः’’ मग दादोसातें म्हणितलें: ‘‘दादोः मज एक वस्त्र घेउनि देया कां?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘काइ कराल वस्त्र?’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘ना गोसावियांलागीः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘केतुलेया एकाचें वस्त्र?’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘ना मातें सोळा दाम असतिः तेयाचें घेउनि देयाः’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘इसीः काइसे सोळा दामः मां तयां सोळां दामाचें वस्त्र काइ धड येइलः आणि तें काइ गोसावी पांगुरो जावे असतिः ऐसांहीं तरि दिस च्यारि पांगुरती आणि भलेतेया देउनि फेडितीः तरि उपहारू कां न करा? उपहारूचि कराः’’ इतुकेनि महादाइसा उगीची राहिलीं: महादाइसीं अंतःकरणीं विचारिलें: ‘आतां गोसावियांतेचि विनउः’ इतुलें जवं विचारीतिनां: तवं गोसावीचि बोलाविलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः या आरूतीः काइ म्हणत असा?’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘जी जीः मियां गोसावियांचां ठाइं वस्त्र ओळगवावें: ऐसा मनोरथ केलाः तें नागदेवोभटातें म्हणितलें:’’ म्हणौनि मागिल शब्द सांघितलेः दादोसांचे सांघितलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साच कीं बाइः महात्मा म्हणतु असे तें तैसेचिः हें काइ पांगुरो जावे असे? दिस च्यारि पांगुरिजैलः आणि भलेतेया देउनि फेडिजैलः महात्मा म्हणतु असे तेंचि कां न किजे?’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘ना जीः मीं गोसावियांचां ठाइं ओळगवीनः मग गोसावी दिस च्यारि पांगुरतुः आणि भलेतेया देउनि फेडितुं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः उपयोगा न वचे ऐसें काही असेः हें इतुलें तुम्हांचि तवं नव्हवे? ऐसीं ऐसीं जा पां: कोण्हीं एक साहायातें करीलः तुमचेनीचि होइलः’’ मग तयांसि आठवलें: तियें तया बाइयेचेया घरा गेलीं: महादाइसीं म्हणितलें: ‘‘हां वोः तुझा भाउ दुसीः तरि आम्हांसि एक वस्त्र घेउनि देइल?’’ तिया म्हणितलें: ‘‘हो आइः तो येवों द्याः मग पुसैनः’’ तवं तो आलाः तिया तेयातें पुसिलें: ‘‘हा रे बाः तूतें जें गाहाण वस्त्र असेः तें यां आइसांसि वोपी कां?’’ तेणें तें वस्त्र सोडिलें: महादाइसासि दिधलें: महादाइसीं म्हणितलें: ‘‘बा याचे काइ मोल?’’ तेणें म्हणितलें: ‘‘आइ जे तुम्हीं देयाल तेची घेइनः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘मां तेया वस्त्राचे मोल केले नाहीं कीं:’’ तेणें म्हणितलें: ‘‘जे देयाल तें घेइनः तुम्हा पाहुनी काइ वस्त्र बहुतः’’ तिहीं तयांसि सोळा दाम दिधलें: तेणें महाप्रसाद म्हणौनी घेतलें: एके आसूचें वस्त्र पुण तेणें सोळा दामी दिधलें: वस्त्र घेउनि आलीः गोसावियांचि पूरता उपहारू केलाः गोसावियांसि पूजा केलीः धूपार्तिः मंगळार्ति केलीः वस्त्र ओळगवीलें: गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः पहूड जालाः उपहूड जालाः गोसावी आसनीं उपविष्ट असतिः तें वस्त्र प्रावर्ण केलें असेः ऐसा अवसरीं दादोस गोसावियांचीये ओळगे आलेः नमस्कार करूनी बैसलेः गोसावी फुटेयाचां पदरू तयांकडें घातलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मे हो हें वस्त्र काइ लाहे?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना जीः दाम सोळा लाहेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आणुनि देयाल?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः दाम अठरा एक लाहेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें अठरें आणुनि देयाल?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः दाम वीस लाहेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वीसे दामीं आणुनि देयाल?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः देया दामः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जीजीः तरि आतां न कळेः’’ महादाइसें उगीची पाहातें असतिः मग गोसावी फुटेयाचा पालौ आसूडिलाः गोसावी महादाइसाची वास पाहुनी दादोसांतें म्हणितलें: ‘‘हें वस्त्र आन एक लाहेः यांसि कव्हणीं मोल करूं नेणें:’’ ते वस्त्र गोसावी सा मास पांगुरलें: मग आंगी केलीः आंगी लेइलीः मग जेव्हेळी भटः महादाइसा रीधपूरां पाठविली तेव्हेळी गोसावी महादाइसातें पुसिलें: ‘‘बाइः तुमचें वस्त्र हें सहा मास पांगुुरलें: मग आंगी केलीः आंगी लेइलेः हें आंगी वानरेसां दीजे तरि काइ?’’ ‘‘जी जीः दीजो कां जीः’’ मग महादाइसां सुखचि जालें :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा… )
  • Purvardha Charitra Lila – 401
  • Bhadgaon : साधां पूजे अज्ञान कथन :।।: / साधां पूजाकरणीं बाइसीं कोपणें :।।:
  • एकु दीं साधें स्नानासि गेलीः स्नान केलेः त्रिसंदीची फुलें देखिलीं: तियें घेउनि आलीं: गोसावियांसि दुपाहारचा पूजावसर जालाः आरोगणा होउनि पहूड जाला असेः साधें आलीं: गोसावियांचिया श्रीचरणां फुलें वाइलीं: जानुसि वाहिलीं: वक्षस्थळावरि वाहिलीं: श्रीमुकुटु उघडुनि श्रीमुकुटावरि वाहिलीं: तवं बाइसें बाहीरिलीकडौनि आलीं: तिहीं देखिलें: ‘‘ऐसी कव्हणें वो पूजा केली?’’ म्हणौनि घागरा बांधलाः ‘‘श्रीचरणाचीयाकडें देवो नव्हेः श्रीमुकुटाचीयाकडें देवो होएः पाहा वोः मुगुट उघडुनि वाहिलीः’’ तवं गोसावी उपहूड स्वीकरलाः आसनी उपविष्ट असतिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः यांसि कां कोपतें असाः ये काइ जाणतें असति? ये जाणतीं तरि ऐसें कां करीति? आणि अनवसरीं कां येति? यांसि काइ इष्टाअनिष्टाचें वीधिअवीधिचें ज्ञान असे?’’ तवं तवं साधांसि अधिक दुख होएः तें दुःख देखौनि सर्वज्ञें अमृतसंजीवना परावाचा म्हणितलें: ‘‘साधें होः भेंवों नकों: दुख न कराः तुम्हीं काइ जाणतें असाः जरि जाणा तरि ऐसें करा? तुम्हीं जाणा ना कीं: जाणा तरि काइ ऐसें करा? आणि अनवसरी कां या? जाणतीति तरि ऐसें कां करीतिंतिः’’ ऐसें वेळां दोनि च्यारि म्हणितलें: ‘मगः मी अनवसरीं आलीयें ना पां:’’ म्हणौनि अधीकचि दुःख जालें: ऐसें साधीं आपुलें अनुचित देखिलें :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 402
  • Bhadgaon : महादाइ द्वारावतिये गमनी वीधि निरूपण :।।: / महादाइसां द्वारावतिये जाणें :।।:
  • एकु दीं कटक देवेगरीकडील पव्हा द्वारावतिये निगालाः दादोसीं महादाइसातें ‘द्वारावतिये जावें ऐसें:’ अनेकां परिं उस्तभविलें: ‘‘रूपैः हें कटक देवेगरीकडील लोकुः द्वारावतिये जातु असे हा आपुलाः तरि यांसरिसी द्वारावतिये जा नाः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘ना दादोः काही संबळ नाहीं:’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘संबळ काही मेळवीनः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘तरि गोसावियांतें पुसों:’’ गोसावियांतें उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें महादाइसें द्वारावतिये जावेया पुसों आलीः गोसावियांते दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः मग विनविलें: ‘‘जी जीः मीं द्वारावतियेसी जाइनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तीर्थः क्षेत्रः व्रतः दानादि देवता अमोचकः परमेस्वर सन्निधान मोचकः’’ ऐसें येचि प्रसंगीचें परावर निरूपण केलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ते द्वारावती नव्हेः तो श्रीक्रष्ण नव्हेः तें वज्राची प्रतिष्ठाः श्रीक्रष्णचक्रवर्तिं बिजें केलें: मग तैसाचि समुद्र चालुनि आलाः तें द्वारावती समुद्राआंतु पडिलीः मग बाहीरि श्रीक्रष्णचक्रवर्तिचेनि नावें तेथ प्रतिमा एकी मांडिली असेः मां तेथ काइ असे? काइसेया जाल?’’ मग दादोसापासी गेलीः मागोमति दादोसीं पाठविलीः मागौती गोसावियांपासी आलीः तवं तियें न र्‍हातीचिः तिया म्हणितलें: ‘‘ना जी दादोस म्हणत असतिः तरि मीं जाइनः’’ मग गोसावी अनुज्ञा दिधलीः निगालीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः कोण्ही कोण्हां स्थाना जायेः कोण्ही कोण्हां स्थाना जायेः तुम्हीं तेथं जातें असा तरि तेथ श्रीचांगदेवोराऊळांचीया पाताळगुंफा असतिः एकी उत्तराभिमुखः एक पूर्वाभिमुखः तया गुंफास्थाना जाइजे हो तया तुम्हीं नमस्कारावीयाः तेथ सडेसमार्जने चौकरंगमाळीका भरावीयाः गुंफेचा द्वारीं कोण्हीं एक पुरूख बैसले असतिः तयातें संभाषावें:’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ मग तिहीं दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीः आणि निगाली :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा… )
  • Purvardha Charitra Lila – 403
  • Bhadgaon : उमाइसातें सवे धाडणें/पाठवणें :।।: (महादाइसां सोबत)
  • सर्वज्ञें उमाइसातें म्हणितलें: ‘‘मासोपवासिये हो तुमचीं सांघातियें द्वारावतिये जातें असतिः तरि तुम्हीं कां न वचा?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः मीं न वचें: जी मीं सन्निधानीं असैनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतांची एथौनि पाठवीतां न वचाः पाठीं रडतें भेंकत जालः तें निकें?’’ परि तिये न वचतिचिः राहिलीं: पाठीं निद्रास्थानासि गेलीं: रात्री रडों लागलीं: ‘‘आवो माझिए सांघातिनीः दोघी मासोपवास करूं: दोघी भिक्षा करूं:’’ ऐसें म्हणौनि आठउं आठउं आळाप करौनि रडों लागलीं: उदेयांचि येउनि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः मग गोसावियांपुढे सांघितलें: ‘‘रूपै माझी बाळमैत्रीः जी जीः मज रूपैवीन नसवेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुमतें तेधवांचि म्हणितलें कीं पाठीं रडतें पाठीं लागालः’’ तियां म्हणितलें: ‘‘जी तरि आतां जाइनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां तिये एके पेणेनि पुढां गेलीः तुम्हां कोणें पेणां भेटति?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना जीः मीं तयातें टाकुनि जाइनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मासोपवासियेहोः आतां एथौनि तुम्हा पाठविजति असिजेः’’ तियां म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग दंडवत करौनि निगालीं: गोसावी तयासि नाथोबातें तथा मार्तंडातें सांघातु लाविलाः बोळवित पाठविलेः मग निगालीः तें बोळउनी आलेः गोसावियांसि दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलेः बैसलेः मग म्हणितलें: ‘‘जी रूपाइसां आणि उमाइसातें भेटि केलीः मग आलो जीः’’ :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा… )
  • Purvardha Charitra Lila – 404
  • Bhadgaon : साधातें द्वारावतिये पाठवणें :।।:
  • गोसावी सरळां लोचनीं अवलोकुनि साधांतें म्हणितलें: ‘‘साधे हो तुम्हीं द्वारावतिये जा ना?’’ तेही म्हणितलें: ‘‘ना जीः मातें संबळ नाहीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथौनि संबळ दिजैलः’’ तेही म्हणितलें: ‘‘जी जीः मज पाय नाहीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पाय हें देइलः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः मीं न वचें: माझी द्वारका गोसावीचिः’’ गोसावी उगेचि राहिलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधें हो ऐसेचि होएः इश्वरा विकरवितां न विकरेः तैसा अनुसरला होआवां:’’ यावरि गोसावी माकोडेयाचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘माकोडा असेः तो जीवन पाहेः तयाचे जीवन असुधः जीवन सांपडेः आणि धरीः तो झाडिता झडेनाः तोडिता तुटेनाः ऐसाही झाडिजे तरि धड तुटेः परि झडेनाः तैसें जीवाचे जीवन परमेश्वरूः शारीरे झडावेनाः मानसिकें तुटावेनाः जीवन न सोडावेः’’ मग साधें श्रीचरणां लागलीं :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा… )
  • Purvardha Charitra Lila – 405
  • Bhadgaon : द्वारावतीनिषेदपूर्वक काको स्तीतिः सन्निधान :।।:
  • काकोस तें अन्यमहात्मे वेषें असतिः तें द्वारावतिये जावेयालागी गोसावियांतें पुसों आलेः ‘‘जी जीः मीं द्वारावतिये जाइनः’’ गोसावी ऐसें तयातें अवलोकिलेः आणि म्हणितलें: ‘‘भटोः आजीचा दिवसु राहा पां:’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः मग सांघातु नाहीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्ही भिक्षुः तुम्हां सांघातु काइसा?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘नां जीः मीं जाइनः’’ मग गोसावी चरणचारी उभे ठाकलेः आणि म्हणितलें: ‘‘पुरूखाचेया ठाया जाइजे तरि तेथीचें काही एक गोमटें घेउनि निगीजेः आजीचा दिसु राहा पां: बैसा ऐसें:’’ म्हणौनि श्रीकरें हातीं धरूनि बैसविलेः बैसलेः आणि तयां स्तीति जालीः आणि तें देखो लागलेः सुवर्णांची द्वारावतीः रत्णाची पौळीः सुवर्णाची धवळारेः उपरियाः माळवधेः तेथ उद्धवार्जुनः ऐसिया छप्पन्नकोडी यादवांसहित कनकदंडी विजमानः आणिकेंहीं परिवारें विराजमानुः वस्त्रीं अळंकारीं: चिन्हीं चिन्हांकित ऐसें यथोक्त श्रीक्रष्णचक्रवर्ति गोसावी सिंहासनी उपविष्ट असतिः ऐसें अवघें देखिलें: आणि परमसुखातें पावलें: ‘‘देखिलासि श्रीक्रष्णाः देखिलासि श्रीक्रष्णाः’’ म्हणौनि टाळीया वातिः तें पाहार एक स्तीति भोगुं सरलीः आणि गोसावियांसि दंडवतें घातलीं: श्रीक्रष्णचक्रवर्ति ऐसीं प्रतीति बैसलीः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटोः आतां द्वारावतिये जा ना? सांघातु दुरी जाइलः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः आतां क्यें जाओं? साचोकारी द्वारावती आणि श्रीक्रष्णनाथु तें मियां एथचि देखिलेः आतां मीं न वचे जीः मीं क्षौर करनि आणि गोसावियांसि अनुसरेनः’’ म्हणौनि राहिलेः मग तेही आपुली मात्रा गोसावियांपुढां ठेविलीः देवतें तुळसीचिया गांठीया ब्राम्हणां एका दिधलीयाः नक्षत्रमाळा उपकरणें होतिः तियें विकुनि गोसावी आपुला ठाइं उपहारू करविलाः मग तेहीं क्षौर केलें: ‘‘दासोहं’’ म्हणौनि गोसावियांसि अनुसरलेः मग तें गोसावियांचां ठाइं राहिले :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा… )
  • Purvardha Charitra Lila – 406
  • Bhadgaon : पदुमनाभी क्षौर निराकरण :।।:
  • एकु दीं वसैयेंचिये पटिशाळेवरि गोसावियांचें क्षौर होत होतें: तवं पदुमनाभीदेव गोसावियांतें विनउं लागलेः ‘‘जी जीः मीं क्षौर करीनः’’ म्हणौनि आंगणी चैंडका उडे ऐसें उडों लागलेः आणि गौराइसें क्षौर देखौनि ‘क्षौर किजें: मग गोसावियांचां ठाइं अनुसरिजेः आणि सन्निधानीं असिजेः’ ऐसें म्हणौनि भितरीं दुख करीतें होतीः मग गोसावियांतें बाइसीं विनविलें: ‘बाबाः बटिकु क्षौर करिन म्हणतु असेः तरि करूं दिजो कां?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः पोरू पोकळुः घाला बाहीरिः भितरीं वर्तत असे तें साचः हा काइ क्षौर करील? विरक्तां हों आवडेः परि दांडीये बैसौनि आडवा पाओ घालौनि पुढां आसूची वाखारी झेलावी असेः हा लटिकाः यांसि काइ भिक्षा? हा काइ अनुसरैल?’’ पदुमनाभीदेव विनवीत होतेः परि गोसावी तयांसि क्षौर करूं नेदीतिचि :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 407
  • Bhadgaon : साधां मोदक विपलाणें :।।:
  • इंद्रभट गोसावियांलागी दिसवडी आन आन रांधवीतिः एकु दिसीं इंद्रभटीं साधांतें म्हणितलें: ‘‘एल्होः मज लाडू करौनि दे कां: मां मीं गोसावियांसि ओळगवीनः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘हो कां:’’ मग इंद्रभटी गहुं दळुनि गुळः मिरियें तेलः एळाः एतुलें ऐसें अवघेचि आणुनि दिधलें: मग साधीं सोजी काढिलीः सेव केलीः तळिलीः चुलीवरि पाकु ठेविलाः तवं भिक्षा अवसरू लोटलाः तेहीं म्हणितलें: ‘‘हा पाकु होइलः तवं मीं चहुं घरीची भिक्षा करौनि येइनः’’ गेलीं: तवं तयासि उसीरू लागलाः तवं पांकु लांघलाः आलीं: मग लाडू बांधलेः दुरडी भरूनि इंद्रभटीं गोसावियांलागौनि आणिलेः ओळगवीलेः रात्रीं बाइसें व्याळीए समढं गोसावियांलागी ओळगवावेया फोडूं बैसलीः तवं काइसेनही फुटेनाः मग मुसळवरि फोडुनि ओळगवीलेः एरी दीं उदेयांचेया पूजावसरा साधें आलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः बहुती सुगरणीं देखिलीया परि कोण्ही सुगरणीचे लाडू सातपांची मुसळें मेळउनी फोडिले नाहीं:’’ तवं साधीं म्हणितलें: ‘‘ना जीः तें जालें ऐसें: चुलीवरि पाकु ठेविलाः भिक्षेसि उसीरू जालाः म्हणौनि चहुं घरां भिक्षेसि गेलीयेः तवं उसीरू जाला जीः तेणें पाकु लांघलाः म्हणौनि कठिण जालें जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि सावेयां विशेषुः बहुती सुगरणी देखिलीया परि चुलीवरि पाकु ठेउनि भिक्षे कोण्ही गेली नाहीं:’’ गोसावी इखित हास्य केलें :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा… )
  • Purvardha Charitra Lila – 408
  • Bhadgaon : महात्मा नामपूर्वक कुमारी खाजे देववणें/प्रदानु :।।:
  • एकु दिसी विळीचां वेळीं वसैचियां आंगणी पटिशाळेचेया उजीवेयाकडें गोसावियांसी आसन जालें असें: गोसावी खाजे वांटित होतें कीं आधी वाटिलें होतें तें नेणिजें: बाहुल्यें प्रस्तुतीचिः खातिया एकाची वरिखा साताची कुमारीः तें करा घेउनि पाणी वाहेः वसैयेचें द्वार पावें: आणि उभी ठाकौनि गोसावियांतें पाहेः आणि गोसावी म्हणतिः ‘‘हुं ऊं:’’ आणि आपेआप क्षेम देतिः ऐसें वेळां दोनि तिनि केलें: मागुती परती ए करेसि आलीः वसैयेचेया द्वारापासी उभी ठेलीः गोसावियांतें पाहों लागलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मा येइजोः क्षेम देइजोः महात्मा याः एथ क्षेम देयाः’’ म्हणौनि आपुलेयां आपण क्षेम दिधलें: तियें आलीः मग आपणापासी बैसविलीं: आणि म्हणितलें: ‘‘बाइः तुमतें खाजे असे तें आणाः’’ बाइसें गेलीं: तिये थोडेचि ऐसें घेउनि आलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हां अवघेयां हें काइ होए? यां काही हें नव्हे? अवघेयां महात्मेयां सरिसा भागु आणाः’’: बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः महात्मेयांसरिसें कैसें इसि?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एथ तुम्हीं काइ होआ? मां ये एथ काइ नव्हति?’’ मग बाइसीं अवघेयांसरिसें खाजे आणिलेः गोसावी आपुलेनि श्रीकरें जेणेसि जें: तें तियेसी दिधलें: खुड्डीः गुळः उततियाः साखरः फुटाणेः सोलेः गळदंडाः एतुलें दिधलें: टिळा केलाः तेही भातुकें खादलें: मग पाणी पीयों सुदलें: तांबुळ दिधलें: मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्माः आतां जाइजोः’’ मग तियें श्रीचरणां लागौनि गेली :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Bhadgaon : साधा भिक्षान्न उचित निरूपण :।।:
  • साधें भिक्षें गेलीः भिक्षा करौनि आलीः मग गोसावियांसि झोळी दृष्टीपूत केलीः आणि जेवूं बैसलीः तें जैसी जैसी भिक्षा आलीः तैसें तैसी वेगळाली जेवूं लागलीः तें भिक्षा जेवितां घासाप्रति गोडी घेतिः तें देखौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधे हो दाळ इंद्रीयार्थः घेइजे ऐसें कुसकरौनिः एरेएर परतें:’’ तियां म्हणितलें: ‘‘जी जीः’’ मग तिहीं अवघे समरस केलें: जेविली :।।: (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्यानंतर स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा… )



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: