Balegaon (बळेगाव)

बळेगाव, ता. अंबड, जि. जालना

येथील 4 स्थाने - बळेगांव येथे एकाच ठीकाणी 4 स्थाने आहेत. बळेगांव गावाच्या नैऋत्येकडे 2 कि.मी.अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर नवीन मंदीरात आहेत.

जाण्याचा मार्ग :

बळेगाव, पैठण-शहागड मार्गावरील बळेगाव फाट्यापासून दक्षिणेस एक कि.मी. आहे. पैठण ते बळेगाव फाटा 28 कि.मी. शहागड ते बळेगाव फाटा 12 कि.मी. बळेगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. बळेगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. हिरडपुरी ते बळेगाव पायमार्गे 2 कि.मी. आहे.

स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील सर्व चारही)

1. अवस्थान आणि वसती स्थान :

हे स्थान बळेगावच्या नैर्ऋत्य विभागी गोदावरी नदीच्या उत्तर काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गुंफा होती. त्या गुंफेतील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पहिल्या वेळेस आपेगावहून (विज्ञानेश्वराचे) बळेगावला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी 20 दिवस वास्तव्य होते. (पू. ली. 534, स्था. पो.) व दुसऱ्या वेळेस पांचाळेश्वरहन बळेगावला आले. त्या वेळी त्याचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली 553,स्था.पो.)

येथील इतर लीळा : 1) राणाइसाला वेशीला पाय लावण्यासाठी पाठविणे. (पू. ली. 537)

2) जोमाइसाला नृत्य दीपनशक्ती देणे. (पू. ली. 539)

पहिल्या वेळेच्या 20 दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभ येथून रोकड्याला गेले व दुसऱ्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून हिरडपुरीला गेले.

2. आसन स्थान :

हे स्थान देवळाच्या सभामंडपात उत्तर बाजूस आहे. गुंफेच्या पटीशाळेवरील हे स्थान होय.

लीळा : 1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंनी येथे बळेगावातील सोवासिनी स्त्रियांच्या ओवाळणीचा स्वीकार केला. (पू. ली. 534, स्था. पो.)

2) ओवाळणीचा सोहळा झाल्यानंतर उपाध्ये व नाथोबा यांना राया मंडळिकांचा दृष्टान्त देऊन समजावणे. (पू. ली. 535)

3) ओवाळणीचा सोहळा झाल्यावर लाखाइसाने सर्वज्ञांच्यासाठी उपहार आणला. मग सर्वज्ञांनी व्याळी केली. गुळळा विडा झाला. (पू. ली. 536)

3. मादने स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून पूर्वेस 5 फूट 6 इंच अंतरावर आहे. (स्था.पो.)

4. आसन स्थान :

हे स्थान मादने स्थानापासून दक्षिणेस 20 फूट 4 इंच अंतरावर आहे. (पू. ली. 582, ख. प्रत)

अनुपलब्ध स्थाने :

1. सत्यादेवीच्या देवळाच्या दारसंका धरुनी भीतरी अवलोकणे स्थान.

2. लिंगाच्या देवळातील आसन स्थान.

3. राखसे रामदेवा महादेव दाखविणे स्थान.

4. ब्राह्मणाच्या आवारी पटीशाळेवरील आसन स्थान.

5. महालक्ष्मीच्या देवळातील आसन स्थान.

6. सांडल्यामांडल्याची आख्यायिका कथन स्थान.

7. ब्रह्मनाथाच्या देवळातील विहरण स्थान.

8. मांडवखडकी आसन स्थान.

9. पिवळदरडी आसन स्थान.

10. भोजनता आसन स्थान.

11. सत्यादेवीच्या देवळाच्या अंगणातील आसन स्थान.

12. लघुपरिश्रय स्थान.

13. परिश्रय स्थान.

बळेगावची एकूण स्थाने : 17

  • Purvardha Charitra Lila – 534
  • Balegaon : बळ्हेग्रामीं गुंफें ओवाळणीः अवस्थान :।।:
  • तवं लाखाइसीं आपुली सून श्रुंगारूनि ओवाळणीयेलागी आणिलीः तियेचा ताटीं चंदनः कुंकुमः अक्षेताः माळः मंगळदीपः तिया गोसावियांसि चंदनाचा टिळा केलाः कुंकुम अक्षेता लाविलीयाः श्रीकंठी माळ ओळगवीलीः विडा ठेविलाः मग ती गोसावियांतें ओवाळीलेः आणि महाजनी आपुला घरीं स्त्रियासि निरोप दिधला होताः ‘जें तुम्हीं गोसावियांसि आखेवाणीयासि यावेः आखवाणें करावें:’ तयातें देखौनि एरी घरीचे एरी घरीचे आखेवाणीसि ओवाळीतिः ऐसिया अवघेया नगरीचिया ब्राम्हणीः शूद्रिणीं: सोवासीनी ओवाळावेया आलीयाः मग तिया ताटीचा विडा गोसावियांसि ओळगवीतिः आणि ओवाळीतिः गोसावी ओवाळणीचा विडा जातां तयाचीया थाळां घालीतिः एराचां विडा एरां देतिः अवघेया गावांतु एकीसि गोसावियांचें दरीसन नाहीं: तियेचां भ्रातारू तीयेसि येवो नेदीचिः म्हणौनि तें न येचिः ऐसीं विळुवेर्‍ही ओवाळणी जालीः विळींचां गोपाळ आलेः सभा घनदाट बैसलीः दाटणी जालीः गोसावी उपाध्यानाथोबातें म्हणितलें: ‘‘तुम्हीं बाहीरि बैसा गाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ उपाध्ये आणि नाथोबा सत्यादेवीचिये न्हाणीचेया नैरूत्य कोणटेयापासौनि गोसावियांचां अवसरू पहातु होतें: मध्यें सीरोवरीं देवताही आलीयाः तेथ सीरोवरिं अपूर्वा स्त्रिया देखतिः दिव्यदीप्तमाना दिव्याभरणीयुक्ताः खळीवं साउलेः खळीचिया चोळियाः कनकमणीम परिएळः रत्णाचे दीपः ऐसें श्रेष्ठ निरांजन देखौनि संभ्रमें विस्मित जालें: मग नाथोबाए उपाध्यातें पुसिलें: ‘‘हें कोणी? कोणाची?’’ उपाध्ये जें जें संबंधीनी जायासि होए ते तें सांघत गेलें: नाथोबाए म्हणितलें: ‘‘तरि या कोणी?’’ उपाध्यीं म्हणितलें: ‘‘नेणेः सकळ गावींचिया स्त्रिया ओळखतों: या अपुर्वां:’’ मग सत्यादेवीचिया देउळांतु लिंगापासुनि गुंफेआंत दाटणी थोर जालीः मग मांदी दाटली देखौनि गोसावी सभेसि पाठवणी दिधली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले..)
  • Purvardha Charitra Lila – 535
  • Balegaon : उपाध्यां नाथोबां दृष्टांतद्वारें संबोखू :।।: उपाध्यां नाथोबां दृष्टांतद्वारें निजानुचरभावो कथन :।।:
  • ऐसा गोसावी तयासि अवसर दिधलाः मग उपाध्ये आणि नाथोबा सत्यादेवीचिये न्हाणीचेया नैरूत्य कोनटेयापासि उभे होतें: तें आलेः मग गोसावियांपासी बैसलेः श्रीचरण चुरूं लागलें: गोसावी दोनि श्रीचरण दोघाचिया मांडियावरि घातलें: मग चुरूं लागलें: मग सर्वज्ञातें पुसिलें: ‘‘मी अवघीया स्त्रियांतें ओळखतों: या अपूर्वा ओवाळीति या कोणी जी?’’ गोसावी म्हणितलें: ‘‘तिया देवताः’’ मग तयासीं आश्चर्य जालें: बाइसीं म्हणितलें: ‘‘बटिकाः बाबाये अवघेया कैसा अवसरू दिधलाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो बाइः आम्हीं आळगौनि पहात होतोः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः तुम्हासि काइ गा निरोधु जाला?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘रायाचिये ओळगें राणें मंडपीक येतिः ओळग भरेः अंगाजवळीकेचें धाकुटे सेवक परतें सरतिः मग ओळग विसर्जेः पाठवणी होएः मग तेचि मां तेचिः मग तेहीचि घेपीजेः दीजे गाः मग तिहींचि आपंचुपाळंचुः घे फोडिः दे फोडि होतीः बटिकाः तुम्हां निरोधु जाला?’’ तेही म्हणितलें: ‘‘निरोधु काही नाहीं: सतसंभवी परमसुख जालें: गोसावियांचां अवसरू पहात होतोः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले..)
  • Purvardha Charitra Lila – 536
  • Balegaon : गुंफे अवस्थानः रात्रीं लाखाइसांचा उपहारू स्वीकारू :।।:
  • ओवाळणीं जालीः मग लाखाइसीं उपहारालागी विनविलेः बाइसीं गोसावीयांसि पूजावसरू केलाः रात्री लाखाइसीं ताट आणिलें: भक्तिजनासि ठाये केलें: लाखाइसीं दंडवत घातलेः गोसावियांसि व्याळी जालीः गुळळा जालाः विडा जालाः मग लाखाइसा पाठवणीं दिधलीं :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले..)
  • Purvardha Charitra Lila – 537
  • Balegaon : राणाइसां वेसीं पावो लाववणें :।।:
  • बाइसीं वोंटेयावरि शयनासन रचीलें: गोसावियांसी मोटका पहूड जालाः गोसावी शयनासनी जागृत असतिः तवं राणाइसें गोसावियांचिया दरीसना आलीः गोसावियांसि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एवढेया वेळा आलींतिः भिया ना?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना जीः काइसेया भिउनिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथौनि म्हणीजैलतें कराल?’’ तिया म्हणितलें: ‘‘हो जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि वेसी पावो लाउनी या पां:’’ तिया म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग गेलीं: वेसी पावो लाविलाः तवं बाहीरिलाकडेः बाबरझांटीः गुंजावर्ण डोळेः उंच विशाळ कानः खांदावरि आगळः तथा लोहाचां मुदगलुः उच थोरू महाप्रचंड महापर्वतु ऐसा पुरूख देखिलाः आणि भियालीं: तैसींचि गोसावियांपासी आलीं: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः ‘‘बाइः गेलीं होतींतिः मां काइः’’ गोसावियांपुढें सांघितलेः ‘‘जी जीः मीं तेथं गेलीयें: तवं बाबरझांटीः गुंजावर्ण डोळेः खांदावरि लोहाचा मुदगलुः उच थोरू ऐसा पुरूख देखिला जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भियाचिनाः’’ तिया म्हणितलें: ‘‘ना जीः हां जीः तरि तो कोण?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तो ब्रम्हनाथुः ग्रामदेवताः एथचिये ओळगे आला होताः’’ ऐसें गुंफे अवस्थान दिस पाच जालें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले..)
  • Purvardha Charitra Lila – 538
  • Balegaon : राखसेया महादेव हटें नमस्कारू स्वीकारू :।।: / राखसेया महादेव दरीसनें हटें नमस्कारू ग्रहणः नामकरण :।।:
  • एकु दिसीं विळीचां वेळीं गोसावी सत्यादेवीचा आंगणीं उभे असतिः अवघे महाजन सत्यादेवीचा देउळा आले होतेः तेहीं गोसावियांते देखिलें आणि आलेः अवघी गोसावियांसि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः तयांत राखसे रामदेव तें गोसावियांजवळी उभे असतिः तें गोसावियांसि नमस्कार न करीतिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘येहीं अवघां एथ नमस्कारू केलाः तुम्हीं न करा तें काइ?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः आम्हीं कव्हणाहीं न करूं: आम्हीं आपुलेया महादेवा करूं: कां आमचेया महादेवातें दाखवी तया करूं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुमचा नमस्कारू एथें घेणें आतिः तुम्हीं आपुला महादेवो ओळखा?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कैसा असे?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘कर्पूरगौरः वृषभवाहनः अर्धांगीं पार्वतीः पंचवगत्रः त्रिनेत्रः खटवांगकपाळः पिंगटा जटैः वाघांबर प्रावर्ण हातीं त्रिशूळः डौरूः कंठीरूंडमाळाः व्याळांचीं अभरणेः भस्म उधळणः ऐसा असे जीः’’ आणि गोसावी वरूती वांस पाहिलीः मग म्हणितलें: ‘‘हा घेया पैलु तुमचा महादेवोः एथचिये ओळगे येत असेः’’ मग तिहीं पाहिलाः तवं गगनमार्गे येतुं देखिलाः जैसा तिहीं म्हणितला तैसाचिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘चांग पाहाः निका पाहाः घाला दंडवतेः’’ तिहीं चांग पाहिलेः मग दंडवतें घातलीं: उठीतिः तवं देखतिनाः मग गोसावियांसि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलाः ‘‘जी जीः गोसावीचि महादेवोः’’ घरा गेलेः तेही आपुली स्त्री गोसावियांसि आखवाने करूं पाठविलेः गोसावियांसि ओवाळीलेः श्रीचरणां लागलीं: तियेसी दरीसन जालें: मग उपाध्याकरवी तीयेसि विडा देवविलाः मग तियें गेलीः तियें दिउनी तें प्रतिदीनीं गोसावियांचां दरीसनासि येतिः गोसावियांसि दंडवत करीतिः दंडवतें घालीतिः श्रीचरणां लागतिः एकु दीं गोसावियांचीयां दरीसना आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलेः पासी बैसलेः मग गोसावी तयातें म्हणितलें: ‘‘तुम्हां नांव काइ?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जीजीः मज नांव राक्षेसा रामदेव म्हणतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि तुम्हां नांव दसाननाः दसवदनाः लंकनाथाः म्हणाः’’ ऐसीं नावें ठेविलीं: मग गोसावी तयातें म्हणतीः ‘‘वेदवाइकाः दसाननाः लंकनाथा याः’’ मग तें ‘‘जी जीः’’ म्हणौनि पुढां बैसति :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले..)
  • Purvardha Charitra Lila – 539
  • Balegaon : तथा (जोमाइ) नृत्यें दीपनशक्ति देणे :।।:
  • एकु दिसीं गोसावियांजवळी भक्तिजनें बैसलीं असतिः चरस्थळी करितां रूची अरूचीचिया गोष्टि करितें होतें: कव्हणा काइ साहेः कव्हणा काइ रूचेः मग गोसावी अवघेयांतें पुसिलें: आणि जोमाइसातें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्हा काइं रूचे?’’ जोमाइसीं म्हणितलें: ‘‘जी जीः मज लाकाचें धिडरें रूचेः परि साहेनाः पचे नाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नृत्य कराः मग साहेः ऐसें किजेलः’’ तिया म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ तवं एकी म्हणितलें: ‘‘जी जीः यांतें घरीं जाखेरांचा देव्हारा असेः ये सुपलिया नाचतिः गावों जाणतिः नाचों जाणतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें बाइः तें गाणें नाचणे एथ दाखवावेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जा गा कर्‍हाड बाइेयेचे घरौनि लाकाचीं दोनि धिडरीं घेउनि याः’’ मग लाखाइसांचिये घरीची धिडरी आणिलीः मग तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः मीं सुपलियाविण नाचो नेणें:’’ एकाचिए घरौनि सुपली आणिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः नृत्य करावें: घांसु घेयावाः सुपली वाजवावीः गावें: एथीची वास पाहावीः’’ तिया म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग तियें नाचों रीगालीः तियें नाचों जाति तवं घासुं ठाकेः घासु घेवो जातिः तवं गाणें ठाकेः गावों जातिः तवं सुपली वाजवणें ठाकेः सुपली वाजवावी तवं वास पाहाणे ठाकेः ऐसें एकेक ठाकत जायेः तवं तवं गोसावी हास्य करीतिः गोसावी म्हणतिः ‘‘हा घांसु पडिलाः हें गाणे ठेलें:’’ ऐसें गोसावी चुक दाखवीत जातिः तोंडें उससां: फेसु निगेः गोसावी इखितु हास्य करीतिः मग म्हणतिः ‘‘मां मां: रत्णमाणिका ऐसें दिसत असे मां:’’ ऐसें तोखतिः आणि गोसावी इखितु हास्य करीतिः ऐसीं गोसावी लीळा केलीः मग पूरे केलें: तें श्रीचरणां लागलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां तुम्हां लाकाचे धिडरें साहातिः’’ तियें दिउनी तया लाकाचें अन्न रूचे :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले..)
  • Purvardha Charitra Lila – 540
  • Balegaon : कामाइ पंचनामकरण :।।:
  • एकु दिसीं गोसावी ब्रम्हनाथासि बिजें केलें: चौकीं आसन जालें: कामाइसें तियें राणाइसाची बहिणीः तियें दुहुवें: आवेया ऐसीं फुरसैली डोइः इउले ऐसें नाकः इउले ऐसें केशः इउलाले ऐसें कानः वेखंड ऐसें दांतः मुडिया बाहयाची चोळीः काळी मसी ऐसीं तानवडेः ऐसीं राणाइसासरिसीं गोसावियांचिया दरीसना आलीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः गोसावियांजवळी बैसलीः मग गोसावी पुसिलें: ‘‘बाइः यां नांव काइ?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी इये नांव कामायेः’’ तियेतें पुसिलें: ‘‘तुम्हां नांव काइ?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः मातें कावूं: कावूं: ऐसें म्हणतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइं: कावूंसेनाः कामाख्याः कोवनीः कोवनी देवीचें खेळवणें:’’ ऐसीं गोसावी पांच नावें ठेविली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले..)
  • Purvardha Charitra Lila – 541
  • Balegaon : चाटेया आवाहनीं अगाधत्व निरूपण :।।:
  • एकु दिसीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालेंयानंतरें विहरणा बिजें केलें: विहरणौनि येतां सत्यादेवीचेया देउळां बिजें केलें: सरिसे उपाध्ये असतिः गोसावी दोन्हीं दारवंडा श्रीकरीं धरूनि भितरीं अवलोकिलेः तवं भितरीं चाटे पढत होतें: तेहीं गोसावियांचें नांव घेउनिः ‘‘राऊळो याः राऊळो याः’’ म्हणौनि पाचारिलें: तवं गोसावी तैसेचि बिजें केलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘चाटे काइ म्हणति बटिका?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः कैसें महाजनाचें मूल मातले असेतिः ‘राऊळो याः राऊळो याः’ उठावेः नम्र हुनि बरवें गौरव देउनि गोसावियांसि दंडवतें घालावीः श्रीचरणां लागावें: मग बोलाविजे कीः तें नाहीं:’’ मग मार्गी उपाध्यीं म्हणितलें: ‘‘हें काइ जी? गोसावियांतें तिरस्करौनि बोलाविलें:’’ याउपरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां गाः हें काइ नेणों एक तें तुम्हांसीचि कीं: यांसि काइः हें अगाधाचें अगाधः’’ म्हणौनि गोसावी खडेयाखुबटेयाचा दृष्टांतु निरूपीलाः ‘‘कव्हणी एकु डोहाचिये थडीए बैसला असेः तेथ कव्हणी एकु वेडसु वेडसु येः उदकाचें स्वच्छ निर्मळणि देखौनि आंतुल खडेखुबटे आसळग देखेः अंगीएची बाहे वरौति सारूनि हातु घालीः हातें न पवेः मग पावो घालीः पाप न पवेः मग पडदणी घेउनि बुडी देः तेणेंही न पवेः मग थडीये बैसला असेः तो म्हणें: ‘आगाः हें अक्षोभ्य उदकः तू भलतेही करी पां जरि पावसिः’ तैसें हें अगाधाचें अगाधः’’ हा दृष्टांतु गोसावी दो ठाइं निरूपिलाः एथ आणि खडकाळीये आउसांप्रति कोणा प्रकरणावरूनि तें नेणिजे :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले..)
  • Purvardha Charitra Lila – 542
  • Balegaon : मांडवखडकीं आसनः तथा मांडवीकथा निरूपण :।।:
  • एकु दिसीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालाः गोसावी आंगी टोपरे केलें: विहरणां गोसावी मांडवखडकां बिजें केलें: खडकावरि आसन जालें: बाइसीं पुसिलें: ‘बाबाः या खडकासि मांडवखडक ऐसें नांव कां?’’ यावरि गोसावी मांडवऋषीची कथा सांघितलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हा मांडवऋषीचां आश्रमुः हें मांडवऋषीचें खडकः तो अठयांसि सहस्त्रांतुलः तो एथ तप करीः एथ आंघोळीः देवपूजाः अनुष्ठान करीः तवं एकु दीं टिळा लाविता त्याचीये वस्त्रीं उं निगालीः तेणें तें काटेनि टोचुनि आडवी सुळीं दिधलीः तया पापातवं तोही सुळी दिधलाः चोरीं गावीं एकीं खान घेतलें: घोडा काढिलाः मागु पडिलाः तें मागेमागेचि धावणे आलेः तवं चोरे एकीदोनि पदार्थ तयापुढें ठेविलेः आणि तो निगौनि गेलाः तें तेया मागेमागेचि आलेः तवं मोसु तेयापासी देखिलाः आणि चोरू म्हणौनि धरिलेः ‘दिहा एथ असतिः आणि रात्रीं खानें घालीतिः तो हा आपण वाटा घेतलाः तेयातें नीउ दिधलेः’ म्हणौनि धरूनि नेलें: ऐसे तें मागिला पापासतव सुळीं दिधलेः’’
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले..)
  • Purvardha Charitra Lila – 543
  • Balegaon : सांडल्या मांडल्या/कौंडल्या आखइका कथन :।।:
  • एकु दीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें गोसावी विहरणां बिजें करीति असतिः तवं सत्यादेवी वाव्य कोनीं पांडा दाहा गोसावी उभे राहिलेः मग म्हणितलें: ‘‘या गांवां नांव पूर्वि सत्यापूरः एथ बळ्हे पडिली गाः म्हणौनि लोकीं बळ्हेग्राम ऐसीं आख्या प्रवर्तलीः’’ मग भक्तिजनीं पुसिलें: ‘‘जी जीः बळ्हे पडिली म्हणिजे काइ जी?’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मांडवऋषी नगरांत भिक्षें जात होताः तवं अंतरीक्ष बळ्हे उडत होतिः तें हागिलीः तें तयाचेया माथेयावरि पडिलेः तें तेहीं हातें करौनि पाहिलें: तवं विष्टी देखिलीः एतुलेनि तेणें वरूतें पाहिलेः तंव बळ्हे जात देखिलीः तें तेणें दृष्टी शापुनि त्राहोटलीः तें पडिली गाः’’ भक्तिजनीं पुसिलें: ‘‘जी जीः सांडल्या मांडल्या/कौंडल्या म्हणिजे काइ?’’ यावरि गोसावी सांडल्या मांडल्या/कौंडल्याची गोष्टि सांघितलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तो मांडवऋषी तैसाचि नगरांत भिक्षें गेलाः भिक्षा करीतकरीत मांडल्ये/कौंडल्येचेया घरां गेलाः तियें नांव सुमना तें पतिव्रताः तें पतीचां सेवाधर्म मांडली म्हणौनि तियेतें मांडल्ये/कौंडल्या म्हणतिः तेव्हेळीं तें तयाचें पाय धुत होतिः म्हणौनि तिया तयासि आज्ञा दिधलीः मग तेणें तियेची वास पाहूनि त्राहाटिलीः तवं तिया तयातें म्हणितलें: ‘ते मीं नव्हे बळ्हेः जे तुझेनि पडैनः’ एतुलेनि तो निगालाः एकु दीं तें आपुलेया पतीसि न्हाणीते होतीः तवं तयाभवति धार दिधलीः तेणें म्हणितलें: ‘धार कां दिधली?’ तिया म्हणितलें: ‘माझी बहिणी डोंगरीं तप करीत असेः तेथ वणवा लागलाः तें कोडळीकाः तें कुष्टींनीः पळवेनाः तें जळैल म्हणौनि तियेचीये गुंफेभवतां अग्नि विझविलाः’ तो उगाचि होतां: मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तिये नांव दुर्मनाः तें तयाने सांडिली म्हणौनि तिया सांडल्या म्हणतिः तो एकु दीं निजैला होताः तें पाये तल्हातीत होतीः तवं मांडवऋषी भिक्षेसि आलाः तिया म्हणितलें: ‘नावेक चालावें:’ तें तेणें तिएची वास रोखेसि पाहिलीः आणि तिया म्हणितलें: ‘वास पाहाताः मीं नव्हे काइ बळ्हेः मां श्रापुनि खाली पाडीसिः’ तेणें मनीं विचारिलेः ‘हे पतिव्रता होएः इसि श्रापु न चलेः’ मग गेलाः ते तिचेनि भातारें पुसिलें: ‘तू कोणासि बोलिलीसि?’ तिया म्हणितलें: ‘ना कोण्हेसि नाही’ ‘ना हें सांघः तियें दीं तरि धार दिधलीः आजी तरि कोणेसि बोलिलीसिः’ मग तिया अवघी गतकथा सांघितलीः तेणें म्हणितलें: तिचीयां तपाहूनि तुझे पतिव्रतापण काइ थोरः’ तिया म्हणितलें: ‘होइल आणि काइः’ मग तो तया वनासि पाहावेया गेलाः तवं अवघे रान जळीनले असेः तिया धार दिधलीः तितुके वाचलेः मग तेयासि पतिव्रता ऐसें उमटले आणि थोरी आलीः तें अवघेया लोकांप्रति सांघे जे हें पतिव्रता ऐसेः’’ मग गोसावी तेथौनि बिजें केलें: गोसावियांसि बळ्हेग्रामीं जवं अवस्थानतवं तेथ विहरणा बिजें करीतिः आणि प्रत्यहीं भोजनतेया बिजें करीतिः तेथ आसन होएः कदाचित आरोगणा होएः एकाधा दीं ब्रम्हनाथीं विहरण होएः एकाधा दी वंकनाथी विहरण होएः एकाधा दी महालक्ष्मीये विहरण होएः गुंफेचा आंगणी मादने होएः सत्यादेवीचा आंगणी लिंगाची देउळीः तेथ आसन होएः गुंफेमागा लघुपरिश्रः सत्यादेवीउत्तरे जगतिची खिडकीः तियेवाव्यें परिश्रया बिजें करीतिः पीवळदरडी आसन :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले..)
  • Purvardha Charitra Lila – 546
  • Balegaon : जोमाइ नामाकरण :।।:
  • लाहामाइसें वेसाइसें दोघी बहिणीः लाहामाइसाची साधें: वेसाइसाची जोमाइसें: जोमाइसें तियें दुर्बळीं: धोंगडा साउलाः खांड बाहयाची चोळीः निडळभरी कुंकूः तें देखौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्ही आपुलेया वरैतयासि कैसिया पढिया?’’ जोमाइसीं म्हणितलें: ‘‘मीं आपुलेया वरैतयासि रत्णमाणिक ऐसीं पढियेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें: तरि तुम्हां नांव रत्णमाणिक म्हणाः’’ जोमाइसीं म्हणितलें: ‘‘जी जीः आजीलागौनि मज रत्णमाणिका एणेचि नामे आळवावें:’’ गोसावी मानिलें: मग गोसावी तियेते रत्णमाणिका म्हणौनि पाचारीतिः मग तियें हर्षे रीगति निगतिः तें देखौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘रत्णमाणिकाः सोवासीनी मिरवतें कैसीः’’ आणि तया सुखचि होएः तवं तवं गोसावी पुसतिः ‘‘रत्णमाणिकाः सोवासीनी जेविलीः’’ ऐसा सांभाळु करीतिः ऐसें नांव ठेविलेः बाइसां व्यापारू करूं लागतिः मग पांचाळेस्वरा गेलीं :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले..)
  • Purvardha Charitra Lila – 547
  • Balegaon : बळ्हेग्रामीं उपाध्या भेटी: स्मरण निरूपण :।।:
  • मग गोसावी बळ्हेग्रामीं उपाध्याचेया आवारा बिजें केलें: उपाध्ये ओसरीयेवरि बैसले होतेः गोसावियांसि देखौनी उठिलेः आसन घातलेः गोसावी आसनी उपविष्ट जालें: दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलेः मग आरोगणेलागी विनविलेः गोसावी विनवणी स्वीकरिलीः ओलनी ओळगवीलीः मर्दनामादने जालें: पूजावसर जालाः ताट केलेः गुळळा विडा पहूड उपहूड जालेयानंतरे आसनी उपविष्ट असतिः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटीकाः हें आता परमेस्वरपूरा जाइलः’’ उपाध्यी म्हणितलें: ‘‘जी तरि मीही येइन जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्ही एथीचे नामस्मरण कराल तेव्हेळी हें तुम्हापासीचि असैलः’’ मग तें श्रीचरणां लागलेः तेथचि वस्ति जाली :।।:
  • Purvardha Charitra Lila – 553
  • Balegaon : बळ्हेग्रामी गुंफे वस्ति :।।:
  • धुळीरा शमलेया उपरांतिक गोसावीं बळ्हेग्रामां गुंफेसि बिजें केलें: तेथ वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. परत स्वामीं पांचाळेश्वरवरुण बळ्हेग्राम(बळेगाव)ला वस्तिस आले तेव्हाची ही लीळा. यापूर्वी स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान झालेले होते. पूढे स्वामीं नवगाव-पैठण-जोगेश्वर/संगमेश्वरकडे निघाले..)
  • Purvardha Charitra Lila – 554
  • Balegaon : निर्गमनीं उपाध्यांची विनती स्वीकारू :।।:
  • एरी दीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसरू जालाः गोसावी बिजें केलें ऐसें कोण्हीं नेणतिः उदेयाचि भक्तिजने रीगतांनिगतां महाजनीं देखिलीं: तैसेचि महाजन गोसावियांचिया दरीसना आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: मग महाजनीं म्हणितलें: ‘‘हे काइ जी? गोसावी केव्हेळी बिजें केलें: ऐसें आम्हीं नेणोचिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे रात्री आलें:’’ महाजनीं म्हणितलें: ‘‘जी आम्हीं गोसावियांचिया रातीचेया पूजावसरासि चुकलोः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मा तो ऐसांचि कीं गाः जो आलेयाही कोण्हीचि नेणें: आणि गेलेयाही कोण्हीचि नेणेः’’ मग बाइसातें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एथ पुनरपी धूपारती कराः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हो कां बाबाः’’ मग बाइसी धूपारती केलीः पूजावसर जालाः तो तेही पाहिलाः पूजावसर जालेयानंतरें गोसावी आंगणी उभे ठाकौनि आंगीटोपरें लेति असतिः तवं उपाध्याचीया मातां देखिलेः उपाध्यांचिया माता म्हणितलें: ‘‘हा रे बा जानोः गोसावियांचां ठाइं येहीं अवघां उपहारू केलाः तें आमचा उपहारू नव्हेचिः तरि आतां एकु दीं सुआः गोसावियांतें उपहारालागी विनवा रेः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘नागदेवोभटांतें म्हणाः’’ मग नागदेवोउपाध्यातें म्हणितलें: तिहीं म्हणितलें: ‘‘जानोकां न म्हणें:’’ तें म्हणतिः ‘‘हा कां न म्हणे?’’ ऐसें एर्‍हेंएर्‍ह गोसावियांचिया दरीसनासि आलेः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: नागदेवोउपाध्यांसि गोसावियांतें विनववेनाः स्वरभंगु जालाः मग उपाध्यांची वास पाहिलीः उपाध्यीं म्हणितलें: ‘‘जी जीः नागदेवोउपाध्ये गोसावियांतें उपहारालागी विनवावेया आले असतिः राहावावेया आले असतिः आजीचा दिसु राहावे जीः’’ गोसावी सुप्रसन्ना दृष्टी तयातें अवलोकुनी तयाची वास पाहिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें हा भटो?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो जीः गोसावी आजीचा दिसु राहावेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे निगालें: न राहेः हें ग्रामांतर करीत असेः तुम्हीं हिरण्यपुरिये उपहार घेउनि याः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हों कां जीः’’ तैसेचि गोसावी बिजें केलें: महाजन बोळवीत निगालें: ब्रम्हनाथां वाव्य मार्गी तेथ महाजनां पाठवणीं दिधलीः तें राहिलेः उपाध्यें घरां गेलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. परत स्वामीं पांचाळेश्वरवरुण बळ्हेग्राम(बळेगाव)ला वस्तिस आले तेव्हाची ही लीळा. यापूर्वी स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान झालेले होते. पूढे स्वामीं नवगाव-पैठण-जोगेश्वर/संगमेश्वरकडे निघाले..)

या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: