Adgaon (आडगाव)

आडगाव, ता. नाशिक, जि. नाशिक


येथे 3 स्थाने - 
चौरंगी स्थान - मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक च्या बाहेर आडगाव च्या रस्त्यावर आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरच बाजुलाच मोठे मंदीर आहे. या मंदीरात येथे 2 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

आडगाव, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून ईशान्येस 10 कि.मी. आहे. व ओझर हून नैर्ऋत्येस 10 कि. मी. आहे. आडगावला जाण्यासाठी नाशिकहून सिटी बस सेवा उपलब्ध आहे. आडगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. चौरंगी विद्या निरूपणें स्थान/आडगाव मार्गी पव्हे आसन स्थान :

हे स्थान नाशिक च्या बाहेर 8 कि.मी मुंबई-आग्रा महामार्गाच्या उत्तरेस दक्षिणाभिमुख देवळात आहे. येथून आडगाव चे बाकी 2 गावातील स्थाने ईशान्येस 2 कि.मी. अंतरावर आहेत. हे स्थान आडगाव च्या रस्त्यावर असल्याने जाण्यास सोपे आहे. एस. टी. बस ने आल्यास जत्रा हॉटेल स्टॉप वर उतरणे, येथून मंदिर 350 मीटर वर आहे. या स्थानाला श्रीकृष्ण मंदिर या नावाने ओळखतात.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात नाशिकहून आडगावला जात असताना या ठिकाणी विश्रांती साठी काही वेळ थांबले होते. येथेच स्वामींनी बाईसाला चौरंगी विद्ये बद्दल सांगितले होते. (पू. ली. 261)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. वसती स्थान :

हे स्थान आडगावच्या वायव्येस 200 मीटर अंतरावर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात नाशिकहून आडगावला आले. देवळाच्या चौकात त्यांना आसन झाले. उपाध्ये व उपासनीये यांना पुढील गावास पाठविले. बाइसांनी संध्याकाळचा पूजावसर केला. उपहार तयार केला. सर्वज्ञांनी व्याळी केली. मग रात्रभर येथेच मुक्काम झाला. (पू. ली. 262) दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर ते येथून सुकेण्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (स्थान क्रमांक 2 आणि 3)


3. मादने स्थान :

हे स्थान वसती स्थान देवळाच्या आग्नेयेस उत्तराभिमुख देवळात आहे. (लीळाचरित्र ख. प्रत)


आडगावची एकूण स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila – 261
  • Nashik : मार्गी चौरंगी विद्या निरूपणें :।।: / मार्गी आसनः आरोगणांतीं चौरंगी विद्या निरूपण :।।:
  • गोसावी नासिकीहुनि निगालेयां मार्गी बिजें करीत असतिः आडगावां जातां मार्गी पव्हेयाुढां सेत होतें: तेथ निंबाचा वृक्ष एक होताः सर्वज्ञें म्हणितलें ‘‘बाइः एथ आसन कराः’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः एथ आसन किजत असिजेः परि हें अरण्यः एथ पाणी नसेः गावांजवळी चालिजो कां बाबा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एथचिये प्रवृत्ति विषयो हो जाणा ना तरि एथ कां असा?’’ बाइसीं तया वृक्षातळी आसन केलें: गोसावी आसनीं उपविष्ट जालें: आणि उपाध्यांतें म्हणितलें: ‘‘बटिकाः पाहा पां: ऐसें जा पां:’’ उपाध्ये गेलेः सागळ घेतलीः तिकडें पाणी पाहिले तवं नाहीं: आलेः ‘‘जी तेउते पाणी नाहीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः ऐसें ऐसें जा गाः ऐसें हान होइलः’’ गेलेः तिकडें पाणी पाहिलें: तवं देखिलेः सरवर भरला असेः सागळ भरीलीः मग म्हणितलें: ‘‘ऐसें गा आमचे गोसावीः ‘अमुकिएकडें उदक असेः’ ऐसें सांघतिना कां: परि आपुले ऐश्वर्य लोपीतिः’’ मग उदक घेउनि आलेः नाथोबाये बाइसाकरवी दूधभात करविला होताः तयाचि गोसावियांसि आरोगणा जालीः पहूड जालाः उपहूड जालाः ऐसें अवलोकिलें: तवं पळसाचा वृक्ष तोडिला असेः मग तें खोड पाल्हैलें होतें: भवतेभवतें बरवे कोंब निगाले असतिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे देखिले गाः याचां तरि स्वभावोः स्वतःसिद्ध स्वाभाविकु गुणुः पुरूखाचां ठाइं देखिजे तरि सिध्दसाधकाचें ज्ञान म्हणौनि आश्चर्यासि कारण होएः ऐसें माणुसाचां ठाइं दिसे तरि चौरंगीची विद्या जाली म्हणिजेः’’ बाइसीं पुसिलें: ‘‘चौरंगीची विद्या म्हणिजे काइ बाबा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कव्हणी एकु रावो सत्रसिंगा तळीवटीं राज्य करीः तयासि दोघी राणीयाः वडील राणिएसि पुत्र होताः तो रूपैं स्वरूपें बरवाः तो सेजारी एकला निजैला होताः तवं धाकुटी राणी आलीः तेयासि विखेवासना झोंबो लागलीः तेणें म्हणितलें: ‘ते माएः तैसीचि तू माः’ ऐसें तेणें निराकरिलेः तेणें तिएसि दैन्य जालें: मग तिया आपुला सर्वांगी नखें घातलीं: जाउनी सेजारीं निजैलीः तवं राओ पारधीहूनि आलाः सेजारांतु गेलाः तियेतें पुसिलें: ‘तू कां निजैलीसि?’ तवं तें न बोलेः राएं म्हणितलें: ‘सांगसि कां ना?’ तिया म्हणितलें: ‘ना काइ सांघोः तुमचेनि पुत्रें ऐसेनि ऐसें केलें:’ म्हणौनि नखें दाखविलीः तैसेचि रावो सभामंडपासी आलाः तयातें बोलाविलेः विद्वांस बोलाविलें: जाणतें पूराणिक बोलाविलेः तेयापुढें सांघितलें: ‘ऐसेंयासि काइ किजेल?’ तिहीं म्हणितलें: ‘ना ऐसयासि चौरंगु किजेलः’ मग गावाबाहिरी चौरंगु करविलाः तवं तिया वाटां मच्छिंद्रु आलाः तेणें तयातें पुसिलें: ‘पुताः हें ऐसें काइ?’ तेणें अवघें सांघितलें: मग मच्छिंद्रे नेउनी कपाटीं सिळतिळीं घातलाः तयातें म्हणितलें: ‘पुताः ए सिळकिडें पाहातुचि असः आणिकीकडें पाहासि तरि ही सिळा तुजवरि पडैलः’’ मग मंत्र उपदेशिलाः आणि म्हणितलें: ‘मी ऐसां तिये होः’ म्हणौनि निगालाः गोपाळातें म्हणितलें: ‘तुम्हीं मोटा जेवाल तेव्हेळी याचीए तोंडी कुरंधनें पीळावी होः’ तिहीं म्हणितलें: ‘नाः हो कां:’ मग तो निगौनि गेलाः बारा वरिखां तेयासि हात पाय निगालेः मग तोही गेलाः तो चौरंगी सिद्धः बाइः’’ तेथौनि गोसावी अडगावां बिजें करितां गावांसमीप पातलें: गावापसिमे महालक्ष्मीचें देउळः तेथ नावेक आसनः मग विहरण केलेः गोसावी श्रीप्रभुंची महिमा निरूपीत होतें: तवं उपासनिये म्हणितलेः ‘‘जी जीः मी रीधपूरा जाइनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाः पेणाविणिया जावेः उपेणे न करावेः रीधपूर म्हणिजे कासियेचा वासः तेथ तुम्हीं मौने वर्तावेः मौने असावेः रीधपूरी पूजापूरस्कारु स्वीकारावे नाहीं:’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि तैसेचि दंडवत घालुनि उपासनिये निगालेः आणि तया स्तीति जालीः तें सुकियाणेयाचेनि मार्गे निगालेः मग गोसावी तेथौनि उपाध्ये पुढीला गावां पाठविलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः तुम्हीं पुढीला गावां जाः तेथ भिक्षा कराः आपजवाः मां हें तुम्हा उदेया दरीसन देइलः’’ मग तें निगाले :।।:
  • (टिप – १ : अडगाव व नाशिक यांचे मधे ही लीळा झाली आहे.)
  • Purvardha Charitra Lila – 262
  • Adgaon : अडगावीं वसति :॥:
  • अडगावीं लिंगाच्या देउळीं आसन जालेः बाइसीं श्रीचरणक्षाळन प्रक्षाळिलें: बाइसीं गावातुनी मडके मागौनि आनीलेः गोसावीयांसि मार्जनेयालागी पानी ठेविलेः मग गोसावीयांसि मार्जने दिधलेः मार्जने केलेः विळीचाचा पूजावसरु केलाः गोसावीयांसि व्याळी जालीः गुळुळा जालाः विडा जालाः तेथची वसति जाली :॥:
  • (.. येथे हे पहील्यांदा येने. स्वामी यावेळी त्र्यंबकेश्वर-नासिक वरुण आले असताना अडगावला वसतिस थांबले.)
  • Purvardha Charitra Lila – 263
  • Adgaon : मार्गी उपासनिया स्तीति :।।: (सुकिणां मार्गी)
  • आधिला दिसी उपासनिये गेलेः तें सुकियाणा राहिलें: तवं मागिलाकडौनि उपाध्यें गेलें: उपाध्यां भेटि जालीः उपासनिये पुसिलें: ‘‘कें जात असा?’’ उपाध्यीं म्हणितलें: ‘‘मातें गोसावी पुढां पाठविलें:’’ ‘‘हो कां:’’ मग दोघै देउळीं निजैलेः उदयाचि उपासनिये स्तीतितवं म्हणो लागलें: ‘‘चालाः गोसावियांपासि जावोः’’ उपाध्यीं म्हणितलें: ‘‘तुम्हीं परमेस्वरपूरां जात होते की?’’ उपासनिये उगेचिः एरी दी उदेयाचा पूजावसरू जालेयानंतरें गोसावी अडगावीहुनि बिजें केलें: मार्गी उपाध्यें: उपासनियेः साउमे आलेः भेटि जालीः गोसावियांतें देखिलें: आणि उपासनियां स्तीति जालीः वस्त्रें सांडिलीः गोसावियांपुढें ऐसें धनुष्याकृति उभे राहिलेः भक्तिजनीं म्हणितलें: ‘‘हे काइ? तुमतें गोसावी रीधपूरां पाठवीलें होतें कीं:’’ तें उगेचिः मग भक्तिजनीं म्हणितलें: ‘‘वाट सोडाः’’ उपासनी म्हणितलें: ‘‘मार्ग काइ तुमचां?’’ गोसावी भृभंगानुकारू केलाः आणि तिरा एकाचेनि मानें जाउनी तैसेचि उभे जालें: मार्गी पुढां चालतां मागुतें पाहातिः गोसावी श्रीमुकुटें ‘चाला’ म्हणति आणि मागुतें डोळे रगतांबर करौनि गोसावियांवरि चालौनि येतिः गुलटी घेतिः मागौते गोसावियांपुढें धनुष्याकार उभे राहातिः आणि गोसावी श्रीमुकुटें निराकरीतिः श्रीमुकुटें चालवीतिः वाटेकडें दाखवीति आणि पुढांरें चालतिः चालतां चालतां मार्ग धनुष्याकार वळणे चालतिः ऐसें वस्त्रें होतीं तो ठावोवेर्‍ही गेलेः तेथ स्तीति भंगलीः वस्त्रें घेतलीः पांघुरणे घेतलीः गोसावियांपासी आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हासि परमेस्वरपूरासि पाठविलें होतें कीः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हे नव्हेः आता जात असों:’’ मग बाइसीं पुसिलें: ‘बाबाः हें काइ शांभवीची विद्या?’’ सर्वज्ञें म्हणितलें ‘‘बाइः शांभवीचा रश्मि होए तरि सकळही आत्मत्वे देखेः’’ बाइसीं पुसिलें: ‘‘तरि काइ शाक्तेय?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नव्हेः’’ बाइसीं पुसिलें: ‘‘तरि आणव?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आणवा चीही पूर्ण नव्हेः’’ बाइसीं पुसिलें: ‘‘तरि काइ बाबा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आणवीचा रश्मि एकुः’’ मग गोसावियांसि तेथ आसन जालें: आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः मग तेथौनि बिजें केलें :।।:
  • (टिप – १ : अडगाव व सुकिणां यांचे मधे ही लीळा झाली त्यामुळे ही लीळा या ठीकानि Upload केली आहे.)
  • (टिप – २ : स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे नासिक-अडगाव वरुण आले व सुकिणांकडे निघले.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: