Achalpur (अचलपूर)

अचलपूर, ता. अचलपूर जि. अमरावती


अचलपूर येथील 11 स्थाने 9 वेगवेगळ्या ठीकाणी आहेत (सर्व स्थाने नमस्करावयाची असल्यास माहितीतील एखादी व्यक्ती/भिक्षुक सोबत घेने आवश्यक आहे, किवा या व्यतिरिक्त गुगल मैप वापरून जात येते.)- 
1) पैकी 1 स्थान अचलपूरच्या शास.रुग्णालयाजवळील गरीबपीर दर्ग्यात आहे. 
2) 1 स्थान अचलपूरच्या मध्याभागी रत्णपूजा मंदीर आहे. 
3) 1 स्थान अचलपूरच्या पश्चिमेकडे सर्पीण नदीच्या काठावर महाविद्यालयाजवळ मंदीर आहे. 
4) 1 स्थान अचलपूरच्या सर्पीण नदीच्या काठावरच जवळच काही अंतरावर शेतात मंदीर आहे. 
5) 1 स्थान अचलपूरच्या सर्पीण नदीच्या काठावरच रेल्वे पूलाजवळच मंदीर आहे. 
6) 2 स्थाने अचलपूरच्या सर्पीण नदीच्या काठावरच दीड कि.मी. अंतरावर श्री. भोंडे यांचे शेतात मंदीरात आहेत. 
7) 1 स्थान अचलपूरच्या सर्पीण नदीच्या काठावरच भोंडे यांचे शेतापासून 1 कि.मी. अंतरावर श्री. ढोंडे यांचे शेतात मंदीरात आहे. 
8) 2 स्थान अमरावती रोडकडे जाताना बीछना नदीच्या काठावरच मनकर्णा विहीर महादेव मंदीराजवळ आहे. 
9) व आता उपलब्ध झालेले 1 स्थान तापी भरती जवळ आहे. 


जाण्याचा मार्ग :

अचलपूर हे गाव, अमरावती-परतवाडा मार्गावर अमरावतीहून वायव्येस 47 कि. मी. आहे व परतवाड्याहून दक्षिणेस 3 कि. मी. आहे. काकडा ते अचलपूर 21 कि. मी. (मार्गे रासेगाव, नायगाव) रिद्धपूर ते अचलपूर 30 कि. मी. काकडा ते अचलपूर (कुष्टा, चमक मार्गे) 16 कि. मी. हा पायमार्ग आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान सरकारी दवाखान्याच्या दक्षिणेस जुम्मा मशीदीजवळ पीरगईबच्या दर्यात दक्षिणाभिमुख भुयारात तुरबतीच्या पूर्व बाजूस भिंतीला लागून आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे रामदरणा राजाचा आवार होता, परंतु यवनांच्या अतिक्रमणामुळे येथे मशीदी तुरबती झाल्या.

लीळा : येथे एकांकात रामदरणा राजाच्या दुर्गात देव्हारचौकीमध्ये सर्वज्ञांचे 10 महिने वास्तव्य होते. (पू. ली. 74, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. बिलनपुरा विभागातील श्री. पांगारकर यांच्या वाड्याच्या पश्चिमेचे दक्षिणाभिमुख देवळातील स्थान :

हे स्थान ‘उपडोनि द्राक्ष लावणे’ या लीळेचे श्रीप्रभू चरणांकित असावे (गो. प्र. च. 24) परंतु रत्नपूजा स्वीकार या लीळेचे स्थान असल्याचा निर्वाळा स्थान पोथी व लीळाचरित्र हे प्राचीन व प्रमाणभूत ग्रंथ देत नाहीत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. अवस्थान स्थान :

हे स्थान तापीभारती मठाच्या नैर्ऋत्येस व जगदंवा महाविद्यालयाच्या ईशान्येस श्रीकृष्ण पुलाजवळ सर्पीण नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पिंगळभैरवाचे देऊळ होते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात भांडारेकारांच्यासह जेव्हा अचलपूरला आले, त्यावेळी त्यांचे या ठिकाणी वास्तव्य होते. (पूर्वार्ध लीळा 48, स्थान पोथी) व भडोचहून आले तेव्हा एक रात्र वास्तव्य होते. (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. बोरबनातील स्थान :

हे स्थान तीन क्रमांकाच्या अवस्थान स्थानापासून वायव्येस 200 मीटर अंतरावर सर्पीण नदीच्या उत्तर काठावरील श्री. कप्तान साहेब यांच्या पेरूच्या बागेमध्ये उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. चरणचारी उभे राहणे स्थान :

हे स्थान बोरबनातील स्थानापासून नैर्ऋत्येस 200 मीटर अंतरावर रेल्वे पुलाच्या पूर्वेस केळीच्या बागेत सर्पीण नदीच्या दक्षिण काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे निर्वाणीचे देऊळ होते.

लीळा : एके दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू भांडारेकारांच्यासह येथे आले. देवळाच्या चौकात उभे राहिले आणि भांडारेकारांना म्हणाले, “तुम्ही या देवळात बसा. आम्ही पलीकडच्या देवळात जात आहोत. येथे कुणी येईल तुम्हाला काही म्हणेल, ते तुम्ही करा.” असे सांगन सर्वज्ञ निर्वाणच्या देवळामागील भैरवाच्या देवळात गेले. मग येथे पांचौळीची राणी धानाबाई देवता दर्शनास आली. तिने भांडारेकारांना पाहिले व विनंती करून आपल्या आवारी नेले. (पू. ली. 48, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


6. कुडी वसती स्थान :

हे स्थान चरणचारी उभे राहणे स्थानापासून वायव्येस 1 कि.मी. अंतरावर सर्पीण नदीच्या पश्चिम काठी श्री. बायाजी किसनजी भोंडे यांच्या संत्र्याच्या बगीचामध्ये आहे.

लीळा : रामदरणा राजाची भाव श्रद्धा कमी झाल्यामुळे एके दिवशी सर्वज्ञ उदास होऊन सर्व राज्यधर्माचा त्याग करून पासवडीचे वस्त्र परिधान करून येथे आले. सर्वज्ञांच्या वेळी येथे सोमनाथाचे देऊळ होते. त्यांचे या ठिकाणी दोन दिवस दोन रात्र वास्तव्य होते. रामदरणा राजा सर्वज्ञांच्यासाठी भोजनाचे ताट येथेच घेऊन येत असे. मग तिसऱ्या दिवशी त्यांच्या विनंतीवरून सर्वज्ञ नगरामध्ये गेले. (पू. ली, 77, स्था. पो.)


7. आरोगणा स्थान :

हे स्थान कुडी वसती स्थानापासून पश्चिमेस 1 फूट 4 इंच अंतरावर आहे. (पू. ली. 77)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


8. लाखारबनातील विहरण स्थान :

हे स्थान कुडी वसती स्थानापासून उत्तरेस एक कि. मी. अंतरावर सर्पीण नदीच्या पश्चिमेस श्री. हिरालाल धोंड यांच्या संत्र्याच्या बगीच्यामध्ये पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे विहरणासाठी येत असत. त्यांना या ठिकाणी आसन होत असे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


9. अंबीनाथा विडा वाहणे स्थान :

हे स्थान अचलपूरच्या पूर्वेस एक कि. मी. अंतरावर अंबीनाथाच्या पूर्वाभिमुख देवळाच्या गाभाऱ्यात आहे व अंबीनाथाचे लिंग नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे अचलपूर येथे रामदरणा राजाच्या देव्हारचौकीमध्ये वास्तव्य असताना ते दररोज अंबीनाथ मंदिराकडे येत असत. मंदिरात प्रवेश केल्यावर माधानीचे उदक घेऊन अंबीनाथाच्या लिंगावर घालून मग श्रीकराने लिंगास स्पर्श करीत. नंतर हडपीयास विडा मागुन तो माधानी मध्ये भिजवून मग अंबीनाथास वाहत. (पू. ली. 75, स्था. पो.)

विशेष : परमेश्वर अवताराने लिंगाला विडा वाहण्यामागचे कारण म्हणजे, परमेश्वरांनी ज्याच्या पतित देह स्वीकारला होता त्या हरीपाळ देवाचा पंचलिंगी पूजा करण्याचा मनोदय परमेश्वर पुर्ण करीत होते. तसेच अचलपुर चा अंबीनाथ, त्र्यंबक चा त्र्यंबकेश्वर, नांदुर चा मध्यमेश्वर, आपेगाव चा विज्ञानेश्वर आणि ब्राह्मणी चा घटसिद्धनाथ अशा पाच लिंगाना परमेश्वरांनी विडा वाहीला होता. अर्थात परमेश्वर ज्या ठिकाणी जडत्वाचा जीव घातलेला असेल अशाच लिंगाला श्रीकराने स्पर्श करून विडा वाहत असत. त्यामुळे हरीपाळच्या इच्छापूर्ती बरोबरच तेथील जीवाला संबंधाचे दान होत असे आणि तेथील देवतेलाही आल्हाद लाभत असे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


10. नमस्कारी ‘मनकर्णा’ विहीर :

ही विहीर अंबीनाथ देवळाच्या दक्षिणेस अर्धा फाग बिच्छन नदीच्या पश्चिम काठी आहे. ही विहीर बांधून काढलेली आहे. तिचे प्रचलित नाव ‘मनकर्णा’ असे आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू दररोज सकाळी स्नान झाल्यावर घोड्यावर बसून येथे येत असत. या विहिरीत श्रीमुख, श्रीचरण प्रक्षाळण करून मग अंबीनाथाच्या देवळात जात असत. (पू. ली. 75, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


10. सीमोल्लंघन करणे स्थान :

सीमोल्लंघन स्थानाला अनुपलब्ध घोषित केले गेले आहे, पण फोटो मध्ये अचलपूर चे तेच वादग्रस्त सीमोल्लंघनाचे स्थान आहे असे बोलले जाते, यावर मतांतर आहेत, निश्चित नाही.

हे स्थान कुठे आहे याची सध्या आम्हाला कल्पना नाही. म्हणून याची लोकेशन लिंक आम्ही खाली दिलेली नाही. जर कुणाला माहित असेल तर अवश्य कळवा.

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू अचलपूर येथील 10 महिन्यांच्या वास्तव्यानंतर काकड्याला गेले.


अनुपलब्ध स्थाने :

1. रामदरणेयाच्या आवारातील मर्दना.

2. मादने.

3. धानाबाईच्या आवारातील रत्नपूजा-स्वीकार.

3. अंबीनाथाच्या चौकातील आसन.

5. बाळाणा आसन.

6. वेदिका आसन.

7. चुनेजाती निरूपणे.

8. निर्वाणेजवळील भैरवाच्या देवळातील आसन.

9. पिंगळभैरवाजवळील भैरवाच्या देवळातील आसन.

10. लाखारबनातील आंब्याखालील आसन.

11. सोमनाथाच्या अंगणातील मादने. 


अचलपूरची एकूण स्थाने : 22


  • Purvardha Charitra Lila –
  • Achalpur : अळजपूरीं बहीरवीं अवस्थान :।।:
  • गोसावी अळजपूरा बिजें केलें: तेथ बहीरवीं अवस्थान जालें :।।:
  • Purvardha Charitra Lila – 48
  • Achalpur : धानुबाइ आवारीं भांडारेकारांची पूजा स्विकारू :।।:
  • बेलोपूरीं भटातें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वानरेयाः तुम्हांसि करणीये एक असे गाः’’ भटीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘परि तें द्रव्यसाध्यः’’ तवं भटीं म्हणितलें: ‘‘जी जीः तें गोसावी जाणत असति कीं: मातें द्रव्य नाहीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तू उभा ठाकलाचि पूरेः सिध्दितें एथुनीचि नइिजैल कीं: पुरूख आपुलें करणीय म्हणौनि प्रवर्ते तयासि द्रव्याचीं सतें मिळतिः’’ मग भांडारेकारांची अवघी गोष्टि सांघितलीः ‘‘एथें भांडारेकार होतेः तयासि करणीये वीहिलें: तें एथुनिची सिद्धी नेलें:’’ भांडारेकार ‘गोसावियांचां ठाइं काही माझें प्रवेशन नव्हेचिः गोसावियांची बरवी पूजा न करीचिः’ म्हणौनि अपरीतोखु भावीतचि असतिः ऐसा उल्लेखु भांडारेकारांचा पोटीं उरलाचि होताः तें जाणौनि एकु दीं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटोः तुम्हां करणीये एक असेः’’ भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘जी जीः तें गोसावी जाणताती कीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘परि तें एथौनीचि सिद्धी नइिजैलः’’ एकु दीं अळजपूरीं गोसावी तयातें निर्वाणेचेया देउळा पाठविलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटोः तुम्हीं निर्वाणे जाः देउळीं बैसाः तुमतें कोण्हीं काही म्हणैल तें कराः कव्हणी म्हणैल तेथ जाइजे होः’’ गेलेः गोसावी निर्वाणे मागिला बहीरवां बिजें केलें: तेथ आसनीं उपविष्ट असतिः तें निर्वाणेचेया देउळामागां बैसलेः तवं पांचैळीची राणी धानुबाइः तियेसी निर्वाणेची भक्तिः तें प्रतिदीनी उदेयाचि दांडीये बैसौनि निर्वाणेसि येः तें आलीः दांडीयेखालुती उतरलीः भितरीं देउळांत गेलीः निर्वाणेसि पूजा केलीः बाहीरि आलीः कांहीं ब्राम्हणां दिधलें: प्रदक्षिणेसि आलीः तवं भांडारेकाराते देखिलें: नमस्कारू केलाः गोसावियांपासौनि स्तीति होए तैसीचि भांडारेकारापासौनि स्तीति जालीः तिया म्हणितलें: ‘‘आमचेया आवारासि बिजें करावें:’’ भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘ना हो कां:’’ मग आवारा घेउनि गेलीः तयाते पटिशाळे बरवें आसन घातलें: तेथ बैसलें: पाय धुतलेः मग तिया ताटभरी कनकमणीमय पूजाद्रव्यें आणिलीं: बरवी पूजा करूं आदरिलीः टिळा गंधाक्षता लाऊं बैसलीं: तवं भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘हें काइ कराल?’’ म्हणौनि हातु धरिलाः तिया म्हणितलें: ‘‘ना तुम्हासि पूजा करौनिः’’ भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘पूजा आम्हासि काइसी? मी योग्य नव्हेः’’ तिया पुसिलें: ‘‘तरि कोणः’’ भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘ना पूजा तरि आमुचीयां गोसावियांसि कराः हें पूजा आमचीयां गोसावियांयोग्य होएः मज योग्य नव्हेः’’ तिया म्हणितलें: ‘‘ऐसें: तुम्हाइं आणिक एक गोसावी असतिः’’ भांडारेकारी म्हणितलें: ‘‘तरि काइ आम्हाइं गोसावी असतिः पूजा आमचीयां गोसावियांसि कीं:’’ धानाबाइया म्हणितलें: ‘‘तरि तें कवणी ठाइं असति? सांघाः’’ भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘ना तें पिंगळबहीरवीं असतिः’’ धानाबाइया म्हणितलें: ‘‘तरि आम्हीं तयातें दांडी डोळीकार बोलाउं पाठउं:’’ भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘ना आम्हींचि बोलाउनिः तें तुमचेया बोलाविलेयां न येतिः’’ धानाबाइया म्हणितलें: ‘‘तरि जाः’’ सेवक पूरोहित सांघांते देउनि पाठविलेः गोसावियांपुढां अवघें वृत्तांत सांघितलें: ‘‘जी जीः तरि तेथ बीजें करावें:’’ तवं धानुबाइही आलीः दरीसन जालें: श्रीचरणां लागलीः तिया गोसावियांतें देखिलें: मां गोसावियांचे सौंदर्य देखौनि निवालीं: साष्टांग नमस्कार केलें: मग विनविलें: गोसावी मानिलें: तेथ बिजें केलें: आणि गोसावियांचे अगाधत्व देखौनि तें आसन काढिलें: गोसावी आसनी उपविष्ट जालें: मग धानाबाइया श्रीचरण क्षाळिलेः वोलनी ओळगवीलीः मर्दना दिधलीः मार्जने जालें: वस्त्रे ओळगवीलीः गंधाक्षता आणिलीः आधिलाहीपसि उच आसन रचीलेः आधिलाहीपसि उचें उत्तमें रत्णेंखचितें भूषणें पूजाद्रव्यें ताट भरुनि आणिलीं: गंधाक्षता केलियाः पूजा करूं आदरिलीः तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें याचें कीं: तुम्हीं यांचां हातीं वोपां: हें एथचि खावणी जाणतिः हें एथ पूजा करीतिः मग एथौनि स्वीकरिजैलः’’ धानुबाइया म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग भांडारेकारीं गोसावियांसी टिळा रेखिलाः अक्षता केलियाः पूजा करीता धानुबाइ बेग फेडुनि भांडारेकारांचां हातीं देतिः तें गोसावियांसि पूजा करीतिः तियें सांघत जातिः ‘‘हा पदार्थ आमुकीये ठाइं ओळगवाः हा आमुकीये ठाइं ओळगवाः’’ तें तैसेचि तियें तिये अवयवीं ओळगवीतिः ऐसें अष्टांग ओळगवीलेः यथोक्त पूजावीधि केलाः मग भांडारेकारालागौनि ताट भरूनि पूजाद्रव्यें आणिलीः तेंहीं म्हणितलें: ‘‘हे काइ कराल?’’ धानाबाइया म्हणितलें: ‘‘हे तुम्हासि पूजा करौनिः’’ भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘हे आमचां हातीं देयाः मां आपुली जोडि गोसावियांसि पूजा करौनिः’’ मग तयांलागी पूजे द्रव्यें आणिलीं होतीं: तेही पूजा तयांचेंनीचि हातें केलीः मग दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलेः ऐसिया दोन्ही द्रव्यांची पूजा गोसावियांचा ठाइं केलियाः मग भांडारेकारी दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘उठाः’’ भांडारेकारां थोर परीतोखु जालाः मग गोसावी क्षण एकु निश्चळ होउनी अवलोकनाचा अवसरू दिधलाः धानुबाइया दंडवत घातलेः श्रीचरणां लागलीः आरोगणें विनविलें: आरोगणा जालीः मग गोसावी अवघे अलंकार फेडिलेः मागौते तयाची तयां देवों आदरिलीः तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः इश्वरीं सर्मपिले :।।: तें माघौतें कैसें घेयावें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्ही वाइलें यांसिः तें एथौनि स्वीकरिलें: आतां एथौनि तुम्हां देइजत असिजेः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘ना जी हें चंडीस्वः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः घेयाः हें जया रायाचां भांडारीं असे तेयाचें भांडार थोर होएः तें पूर्णेचि असतिः एथचें होतें घेयाः’’ तियें नेघेतिः भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘घेयाः’’ मग मानिलें: घेतलें: गोसावी भांडारेकारांचा खांदावरि श्रीकरू घालौनि म्हणितलें: ‘‘भटोः एथौनि तुमचें करणीयें चरितार्थ केले होः’’ तयां थोर सुख जालें: तेंही म्हणितलेः ‘‘जी गोसावी केले म्हणौनि जालें जीः हाहीं गोसावियांचाचि प्रसादुः’’ मग गोसावी तेथौनि बिजें केलें: तिये आस्तिकें: तें उद्देशिले :।।: द्रव्य भांडारी न घलीतीचिः मग तेणें द्र्रव्यें निर्वाणेची पौळी केलीः उरलें तेणें धर्मकार्य केलें :।।: (हे गोष्टि गोसावी बेलोपूरीं भटां करणीय प्रसंगें सांघितलीः तथा हें चरित्र बेलोपूरीं महादाइसाप्रति गोसावी म्हाइंभटांचिए प्रसंगीं सांघितलें :।।:)
  • Purvardha Charitra Lila – 75
  • Achalpur : अळजपूरीं अवस्थान :।।: तथा विनतीस्वीकारें अळजपूरीं आवारीं अवस्थान :।।:
  • रामदरणेनि गोसावियांतें विनविलें: ‘‘जी जीः अळजपूर निके असे जीः सुंदर आणि पूराणप्रसिध्दः तेथ तिनी गंगाः नवदुर्गा अकरा स्वयंभ स्थानें बरवी असतिः सिद्धसाधकांजोगे बरवें लाखारबनः बरवीं देउळें असतिः बरविया वनस्थळीया असतिः’’ ऐसें बहुती परि विशेषुनि म्हणितलें: ‘‘जी तें राऊळासिचि क्रीडा/कृडावया योग्यः तरि तेथ गोसावी बिजें करावें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ पूर्वदृष्ट असेः’’ रामदरणेनि म्हणितलेः ‘‘तरि माझेया कुटुंबासि दरीसन देयावें जीः माझी माता गोसावियांचिया श्रीचरणां तुळसी वाइल जीः माझीए मातेसि इष्ट देयावें जीः जी जीः तेथ बिजें करावे जीः’’ गोसावी विनवणी स्वीकरिलीः तेणें वस्त्रें ओळगवीलीः अलंकार ओळगवीलेः गरूड घोडा गोसावियांलागी दिधलाः वेगळे दूस ओळगवीलेः हडपीः सागळीयाः चवरधरः भोइः मादुरीः सुआरः बडवाः वेंचकरः थोटेः मैळवटे ऐसें दाही सेवक दिधलेः गोसावी जैसे राज्यधर्म स्विकरावे तैसेचि स्विकरिलेः गोसावियांचा परिवारू गोसावियांसरिसा वेगळा चालें: मार्गी गरूडा घोडेयासि स्तीति होएः तेणें गति क्षाळेः उभे राहिलयावाचैनि सरेचिनाः मग गोसावी एकाधी शास्त्रीची कां राजकी गोष्टि सांघतिः जें उभे राहिलेयावाचैनि आइकोंचि न येः रामदरणा गोसावियांसि पुसेः गोसावी सांघेति तें साच होएः तवं घोडेयाची स्तीति भंगेः मग गोसावी साउमे बीजें करीतिः ऐसें पेणोवेणां बिजें केलें: खेडीं जानापेया वरिलीकडें पसिमीली पाळीं मेळीकार जालाः तेथ वस्ति जालीः तेथ गोसावियांसि मर्दना मादनें जालें: पूजा आरोगणा जालीः गुळळा जालाः कापूरें निबंधु विडा जालाः प्रभाते पालाणिलें: वाद्यंत्रें लागलीः गोसावी देउळवाडेयां पेणे केलें: काजळेस्वरामांगा उत्तरें मेळीकार जालाः मर्दनामादनेः पूजावसरः आरोगणाः गुळळाः विडाः पहूडः उपहूड जालाः मग काजळेस्वरां बिजें केलें: तेथ चैकीं आसन जालें: रामदरणेनि अळजपूरा लिखिते पाठविलीः जें ‘अवघें नगर श्रृंगारावें: अवघी आइत करावीः’ सर्व मोहोत्सावो आरंभिलेः अळजपूर श्रृंगारविलें: एरी दिसी गोसावी अळजपूरासि बिजें केलें: गोसावियांसि नगराआंत बिजें करावया मुहुर्त नाहीः जव मुहुर्त निगे तवं नगरापूर्वे बनांत अष्टमहासिद्धी त्रीरात्री अवस्थान जालें: रामदरणेनि गावांत निरोप पाठविलाः घरोघरी सडासंमार्जनेः चैकरंगमाळीकाः गुढीयाः तोरणें: मखरें उभिलीः चळदृपा पताकाः चांदोये वितानेः राजबीदी उदकें सिंचीलियाः मंगळवाद्ये लाविलीं: मुहुर्ताची वेळ जालीः गोसावी दांडियेवरि आरोहण जालें: वाद्यंत्रे लागलीः मग अंबीकापूरा बीजें केलें: तेथ नावेक आसन जालें: तेथ गावीचा लोकु साउमा आलाः मग मानियेः मंडळीकः प्रधानः महाजनः आणि पूरजनः ऐसें आपुलेनि वर्गेसं बहुतें बडिवारें अंबीकापूरासि आलेः तेथ भेटि जालीः जे येति ते श्रीचरणावरि माथे ठेवीतिः घोडीं: लुगडीं: श्रेष्ठ अलंकारः उत्तमें पक्षीकुळें: अरण्याआंतुलें चतुष्पदें: ऐसें जयातें जें जें अपूर्व फळें पुष्पें आदिकरौनि ते तें समर्पीतीः रामदरणे म्हणतिः ‘‘गोसावियांसि ओळगवाः’’ आणि तें ओळगवीतिः ऐसिया परि यथावीधि गोसावी अंगिकरीलीयाः मग एकी त्यागा देतिः एकी ठेवीतिः एकी जयाचा तयासिचि देतिः एकांसि आपुलें दिधलें पाहिजे तरि तैसें करीतिः तें देखौनि रामदरणां म्हणितलें: ‘‘पूराणांतरीं आइकतों: वर्तमानी तरि महाराजांचा ठाइं न देखों: परि हें अंगिकरीति राजलीळेची परि क्वचित नास्तिः’’ ऐसें बहुत चमत्करलेः मग अवघेयांसि गंधाक्षता केलियाः वीडे देउनि पाठविलेः मग गोसावी निगालें: तें लोक मागां गोसावियांचिया अपूर्वा कथा करीतिः अनेकें परिं विशेषीतिः ‘‘हां होः तुम्हीं ऐसें कैं देखिलें:’’ आणिक म्हणतिः ‘‘आहों हें स्वप्न जालें:’’ ऐसें पूरजनासीं दरीसन देउनि संतोखातें पावविलें: गोसावी नगरांतु प्रवेसलें: तेथ नगरीचिया स्त्रिया ओवाळू आलीयाः गोसावियांसि दरीसन जालें: जे भेटि तियें गोसावियांसि ओळगवीः गोसावी जेथची तेथ देतिः मग रामदरणा घोडेयावरि बैसलाः मां गोसावियांपुढां राउताइची आंगे दाखवीः घोडा दाखवीः गोसावियांपुढां राउतः पाइकः गोसावी नगरांत उभिया हाटवटीया बिजें केलें: मग नगरबाइला ताटें घेउनि वोवांळुं आलीयाः जयांसि बाहीरि निर्गमन नाहीं तिहीं माडयाउपरियावरूनि तवंगावरूनि निरार्जिलेः ओवाळणी करौनि पाने पुष्पें फळें वस्त्रे ओवाळुनि टाकीतिः सेवक आणि मागते अभर जालें: ऐसा अवघीयां स्त्रीजनासि दरीसन देउनि परम संतोखातें पावविलीयाः रामदरणेयासि भेटी ये तें रामदरणा गोसावियांसि ओळगवीः गोसावी इकडीलाची भेटि इकडीलासि देतिः कदाचित जेथची तेथ देतिः कव्हणी म्हणें ‘हे रामदरणाचे गुरुः’ कव्हणी म्हणे ‘हे रामदरणाचे जावांइः रामदरणेयाते लेकी वाढत असे हें जावाइ करावेया आणिले असतिः’ गोसावियांपुढां भाट सासले पवाडे पढतिः वाद्यंत्राचा एक नाद जालाः मग गोसावी राऊळगणाचा दारवंठां पावलें: तेथ गाणें भाटें बहुरूपीः कळावंतें: किंभवनोक्त जेतुकीही कळापात्रें: तियें तेथ राहाविलीः आणिकही उपाधीक ओळगणे तेही राहाविलेः मग गोसावी आणि राजाआंगलगेंसि राऊळगणांतु प्रवेसलें: राऊळगणाचिये सभेसि बैसका जालीः तेथ माता मुख्यकरौनि रानवसाः समस्त संबंधीकः कणकाचा परीयेळीं रत्णाचा दीपीः अन्येका पुष्प जातिः फळ जातिः अनेक उत्तम वस्त्रें ऐसा पूजावीधि केलाः ऐसा तो अनुपम्य मंगळकाळु जालाः मग गोसावियांसि सभामंडपीं शेष भरीलीः तेथ रामदरणेयाचीया राणीया ओवाळावेया आलीयाः माता आलीः श्रीचरणां तुळसी वाइलीः तेहीं तैंलागौनि तोचि नेम घेतलाः मग मर्दनामादनें पूजा आरोगणा जालीः मग गोसावियांसि रामदरणेयाचीये देव्हारचैकीये दुर्गात अवस्थान जालें: मास दहाः गोसावी तेथ राज्यधर्म स्वीकरिलें: धानुबाइचा आवारू आणि रामदरणेयांचा एकुचि आवारूः दुर्गांत दुसरा आवारी रामदरणांची दुसरी राणी होतीः तेथ गोसावी बिजें करीतिः गोसावियांसि मर्दनामादने होएः आरोगणा होए :।।:
  • (टिप: अचलपूरला स्वामि पहिल्यांदा भांडारेकारासोबर आले होते. यावेळी स्वामि रामदरना राज्या सोबत दुसर्यांदा आले.)
  • Purvardha Charitra Lila – 75
  • Achalpur : प्रतिदीनी अंबीनाथा बिजें करणें: तथा गरूडा स्तीति :।।:
  • गोसावी राज्यधर्म स्वीकरिलें: गोसावियांसि उदेयाचि मर्दना मार्जनें होएः पाटाउं प्रावर्ण होएः काढनिया घोडा पालाणीतिः मग गोसावी गरूडा घोडेयावरि आरोहण करीतिः प्रतिदीनी अंबीनाथा बिजें करीतिः तेव्हेळी मार्गी गरूडा स्तीति होएः घोडा स्तीतिसी डोलतु चालेः मार्गी चालतां गरूडाची गति क्षाळेः मां घोडा स्तीतिवंत होउनि उभा राहेः तवं गोसावी पासीलां मनुष्यासी गोष्टि लावीतिः दारवंठां गरूडावरूनि उतरतिः आणि श्रीकरें खांदु थापटीतिः श्रीकरीची चामाठी गरूडाचिये कानीं घालीतिः तो स्तीति भोगीत राहेः गोसावी भितरीं बिजें करीतिः वीहिरीसि गुळळा करीतिः श्रीमुख प्रक्षाळीतिः श्रीकरें श्रीचरण उदकस्पर्श करीतिः मग अंबीनाथासि बिजें करीतिः पाटगादीवरि उकडचि उत्तरामुख आसनी आरोहण होतिः मां आंगीचिया बाहिया ऐसिया वरूतिया सारूनि मांधानीचें उदक घेउनि अंबीनापयावरि उदक घालीतिः दोन्हीं श्रीकरीं लिंग स्पर्शतिः हडपीयातें विडा मागौनि मांधानी तिमौनि अंबीनाथासि पोफळ विडा वातिः क्षणु एकु तेथ निश्चळ बैसले असतिः मग बाहीरीः चैकासि बिजें करीतिः प्रदक्षिणा करीतिः कदाचित चैकीं उत्तरीलीकडें कोना आश्राइत दोहीं खांबामध्यें नैऋत्याभिमुख आसन होएः समस्त जन उभे असतिः लोकातें ‘बैसा’ म्हणतिः आणि तें जुहारूनि बैसतिः कीर्तन पूराण होत असे तरि गोसावी पूराण श्लोकु एक दोनि आइकतिः तेथ वैष्णवांचे गाणें होत असे तरि तें नावेक आइकतिः कदाचित बाळाणा टेकुनी आसन होएः पेखणे होत असे तरिये पेखणें अवलोकीतिः त्यागु देतिः प्रदक्षिणा करीतिः मग बिजें करीतिः घोडेयावरि आरोहण होतिः कानीची चामाठी श्रीकरी घेतिः मां गरूड घोडा माघौता आनंदें ढुलतु चालेः मग गोसावी लाखारबना वेहाळीए वेदिकेसि बिजें करीतिः तें बकुळाचेया वृक्षाळासी घोडा उभा करीतिः वीहिरीआंतु बिजें करीतिः वीहिरीसि श्रीमुख प्रक्षाळीतिः मग वेदिकेसि ब्राम्हणापासी ओटयावरि आसन होएः कापूरेनिबंधु विडा घेतिः चाटे पढत असतिः तया चाटेयां चुकि ठेवीतिः तेयांसि विडा दान देतिः मग गरूडा घोडेयावरि आरोहण होतिः आणि आवारासि बिजें करीतिः देव्हारचैकिए मर्दना मादने होएः रामदरणेयाची माता प्रतिदीनीं श्रीचरणां तुळसी वायेः यथोक्त पूजावीधि करीः नमस्कारू घालीः मग गोसावियांसि आरोगणा होएः मग गोसावियांची आज्ञा घेउनि तें जेवीः मग गोसावियांसि डोल्हारेयावरि पहूड होए :।।:
  • (टिप: अचलपूरला स्वामि पहिल्यांदा भांडारेकारासोबर आले होते. यावेळी स्वामि रामदरना राज्या सोबत दुसर्यांदा आले.)
  • Purvardha Charitra Lila – 76
  • Achalpur : चूणेजाति निरूपण :।।: (अचलपूर)
  • एकु दीं गोसावी अंबीनाथासि बिजें केलें: तवं तेथ चुनयांची दडपणी घातलीं होतीः तो वाटावा काढिला होताः गोसावी अंबीनाथासि प्रदक्षिणा करीत असतिः तेथ सुतार चुना उखरडीत असतिः अंबीनाथा प्रदक्षिणा करितां आग्नेकोनी आश्राइत देउळाचीए नासीदक्षिणे उभेया ठाकुनी तयातें गोसावी पुसिलें: ‘‘हां गाः हा चुना कां उखरडित असा?’’ तेही म्हणितलें: ‘‘जीजीः नवा चुना केला असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तो चुना जाला असेः एर्‍हवीं तयापरिस वर हाचि निका असेः’’ तेणें म्हणितलें: ‘‘ना जीः आणिकु बरवा असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कैसा बरवा असे? जो करित असा तो कव्हणी कव्हणी वर्णचा?’’ तें जाणति तयाचीया जाती सांघीतलियाः मग गोसावी पुसिलें: ‘‘जाला चुना तो कैसेनि जाणिजे?’’ मग तेहीं चुना जैसा केला तैसा सांघितलाः चुनाची दडपणी सांघितलीः डवख घेउनि दाखविलाः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसा नव्हेः हा मर्दनी उणाः तयापसी वरि हाचि निकां:’’ तेणें म्हणितलें: ‘‘जी आम्ही चुनाडियांची जातीः फेडी म्हणितलेया फेडिजेः लावी म्हणितलेंया लाविजेः’’ मग तेंही म्हणितलें: ‘‘जी चुनयांचिया जाती तिया कैसिया?’’ यावरि गोसावी चुनेजाति निरूपीलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘चुना तो ऐसा कीं: खडे ऐसें भाजावेः ऐसीं ऐसीं द्रव्यें होआवीं: ऐसीं मर्दनी होआवीः इतुके दिस कुहिजों देयावाः मग ऐसें वाटावाः आमुकीचि जातिचें खडेः अमुकीेचि जातिचें कोळसेः अमुकाचि काळपर्यंत भाजूं देयावेः आमुकीचि जातीचां तागुः अमुकाचि काथः अमुकेचि उडीदः आणि वाटीति परिः द्रव्य मेळवीति परिः कुहीजवीति परि तें वेगळीः’’ मग तेही म्हणितलें: ‘‘तरि तें परिक्षा कैसी जी?’’ आणि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाला चुना तो ऐसा जाणिजेः उंडा काढुनि तो चुना शुनयापुढें घालिजेः दधिभाताचां उंडा म्हणौनि डककरि घासु घेः खाए डखडख करौनि गिळीः आणिका दुसरेया घासाची वास पाहेः यातें श्वानभक्षी चुना जाला ऐसें म्हणिजेः तो न खाए तरि नव्हेः तरि आणिक गूळः तागः उेडदांची डाळी घालुनि मागुता दडपिजेः आणि इतुके दिस कुहिजों देयावाः मग ऐसा वाटावाः मग सुनयां पुढां घालिजेः तो खाएः तो चुना जाला ऐसा जाणिजेः ऐसा होए तरि करावाः ना तरि फेडावा नाः’’ तेहीं संतोखौनि म्हणितलें: ‘‘फेडिति तरि फेडूं: आणिकु करवीति तरि करूं: यापरि पोट भरूं: गोसावी जाण म्हणौनि निरूपिलेः जीजी आम्हीं आइकीलें नाहीं: मां करौनि काइ? जी जीः हें आम्हीं परिसो नेणों: मग जाणोनि काइ? हें गोसावीचि निरूपावे आणि गोसावीचि परिसावें: हें आम्हीं भाषही नेणो जीः ऐसिया आमचिया जाणिवा जीः आणि हें राजे ततोिि नेणतिः तें आम्हाकरवी करवीत असति तरि करित असो जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यापरिस उचडित असा तो निकाः’’ मग तेहीं गोसावियांतें जोहारीलें: मग चैकीं आसन जालें: मग गोसावी दारवंठेंया बिजें केलें: तवं गरूड स्तीति भोगीतु असेः मग आरूहण जालेः राजगृहा बीजें केलें :।।:
  • (टिप: अचलपूरला स्वामि पहिल्यांदा भांडारेकारासोबर आले होते. यावेळी स्वामि रामदरना राज्या सोबत दुसर्यांदा आले.)
  • Purvardha Charitra Lila – 77
  • Achalpur : वस्त्रपूजा स्वीकारूः प्रयाण :।।: (अचलपूर)
  • मग हातें हात धरूनि नगरात बिजें केलें: गोसावी आवारासि बिजें केलें: मर्दना मार्जनें जालें: मग बरवें आसन रचीलेः सर्वांगी चंदनाची पिंजरी केलीः कस्तुरीचा आडा रेखिलाः श्रीमुगुटीं पुष्पें ओळगवीलीः दवणा ओळगवीलाः पूजा केलीः गोसावियांसि पाटाउं मांजिठी त्रिवडी ओळगवीलीः आणि पाटाउं सोनेसळाः क्षीरोदकः मदवीचिया ऐसीं तीनि पूजा केलीः रामदरणेयाचीया माता अवघेया जन्माची तुळसी वाइलीः धुपार्ति मंगळार्ति केलीः तयातें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें व्रत नेघिजे की बाइः हें कव्हणीकडें जाइल तेव्हेळी काइ कराल?’’ तिया म्हणितलें: ‘‘तरि माझे शरीर जातें जीः’’ मग गोसावियांसि विळीचा आरोगणा जालीः तयासि सपांती जेवणें जालीः मग गोसावियांसि गुळळा जालाः विडा जालाः मग रामदरणेयाची माता पारणें केलें: तियें दीं देव्हारचैकिये वस्ति जालीः रामदरणेनि दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलाः मग दोन्ही हात जोडौनि उभा राहिलाः आणि म्हणितलें: ‘‘जी जीः इतुले दीसु मियां गोसावियांसि निरोध केलाः आतां गोसावियांसि राहावाची प्रवृत्ति तवं राहावेः गोसावियांसि बिजें करावाची प्रवृत्ति तेव्हेळी बिजें करावेः’’ म्हणौनि श्रीचरणां लागलाः मग गोसावी एरी दीं बिजें केलें :।।:
  • (टिप: अचलपूरला स्वामि पहिल्यांदा भांडारेकारासोबर आले होते. यावेळी स्वामि रामदरना राज्या सोबत दुसर्यांदा आले.)
  • Purvardha Charitra Lila – 77
  • Achalpur : आरवीं सोमनाथीं अवस्थान :।।: (अचलपूर)
  • गोसावियांसि सोमनाथीं तीनि दी अवस्थान जालें: तिसरा दिसी मागुता आलाः तवं गोसावियांची दृष्टी प्रसन्न ऐसीं देखिलीः मग रामदरणेनि गोसावियांसि दंडवते घातलीः श्रीचरणां लागलाः पुढां पाय मोडौनि बैसलाः आणि म्हणितलें: ‘‘जीः ऐसें काइ अव्हेरीलें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ प्रवृत्ति नाहीं: हें आतां तेथ न येः विद्या अविद्येतें सांडीः सवे अविद्येस्तवं पुरूख धमापसौनि जाएः ऐसें जाणें तो पुरूख अविद्येतें सांडीः ब्रम्हविद्येतें धरीः आणि तुम्ही जवळीपासी यातें बुध्दीचि राखाः जैसे हें तुमचें काही घेउनि आले असेः’’ तवं तेणें म्हणितलें: ‘‘हे काइ जीः गोसावी आमचें सर्वस्वः तरि सर्वस्व आणिले नव्हेः’’ म्हणौनि अश्रुपातीं झळंबता नयनी करूणारूप गुंडाळतां अक्षरीं बहुतचि विनउं लागलाः परि गोसावी विनवणी न स्वीकरीतिचिः मग रामदरणेनि विनविलेः ‘‘जी जीः माझिये मातेसि तीन दी उपवास पडिले जीः श्रीचरणां तुळसी वाइलेयावीन तियेसी जेवणे नाहीं: हें नित्यव्रतः तरि गोसावी आवारा बिजें करावे जीः मग माझी माता श्रीचरणां तुळसी वाइलः तियेसी पारणें होइलः तियेचे व्रत सुफळ होइलः मग सरळा सुप्रसन्ना लोचनी इखित हास्य करौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मागुते तेचि कीः’’ रामदरणेनि म्हणितलें: ‘‘ना जी अवघेया दिसीचें एके वेळे वातीः तियेचे व्रत संपूर्ण होइलः श्रीचरणी तुळसी वाउ देयावी जी? मग गोसावियांचिया प्रत्यया ये तैसें गोसावी करीतुः’’ एतुलेनि गोसावियांचे उदास्य परिहरलेः मग मानिलें :।।:
  • (टिप: अचलपूरला स्वामि पहिल्यांदा भांडारेकारासोबर आले होते. यावेळी स्वामि रामदरना राज्या सोबत दुसर्यांदा आले.)
  • Purvardha Charitra Lila – 77
  • Achalpur : औदास्य स्वीकारू :।।: (अचलपूर)
  • ऐसें दाहा मास गोसावियांसि तेथ अवस्थान जालें: एकु दीं गोसावी रामदरणेयावरि औदास्य स्वीकरिलें: काइसयावरूनि ते नेणिजेः गोसावी उदेयांसीचि उठिलेः तें अवघी वस्त्रे परीत्येजुनि गोसावी पासवडा परिधान करौनि बिजें केलें: आरवीं सिध्दनाथापासीला वृक्षाखाली आसन जालें: एरीकडें उदेयाचि मर्दनिया आलाः गोसावियांचे अवघे सेवक ओळगे आलेः पाहों लागलेः तवं गोसावियांतें न देखतिः मग तेहीं रामदरणेयांपुढां सांघितलें: ‘‘गोसावी उदास्य स्वीकरौनि बिजें केलें:’’ ऐसा बोभाट जालाः तेणें भवतें पाहों धाडिलें: दोघ दोघे चहु वाटा राखणें घातलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें जैसें कांही तेयाचें काही घेउनि गेलें:’’ तियें दीं गोसावी भेटि नेदितीचिः एरीं दीं गोसावियांतें सोमनाथापासी उत्तरें लाखारबनाआंतु दोनि आंबें तेया आंबेंयाखाली आसन होतें: तवं एकें दोघें गोसावियांतें आसनी देखिलेः एकीं सांघितले ं: ‘‘गोसावी आरवीं वृक्षातळी सोमनाथापासी आंबेखाली असतिः’’ तवं गोसावी विळीचां वेळीं सिध्दनाथीं नासीआंतु गेलें: नासीसी खाकरलें: राणेनि आइकौनि हळुचि पाहिलें: तवं गोसावियांतें देखिलें: तेणें आणिका गुरवातें म्हणितलें: ‘‘एथ गोसावी असतिः तुम्हीं एथ रक्षाः मीं रायापासीं सांघों जाइनः’’ तेही म्हणितलें: ‘‘हो कां:’’ तेणें शीघ्र जाउनी सांघितलेः रामदरणा धावत तेथ आलाः रायासी दरीसन जालें: तवं गोसावियांचा ठाइं उदास्य थोर देखिलेः गोसावियांचीये दृष्टीपुढां रीगवेनाः रामदरणा भीतभीत गोसावियांसि विनवावया आलाः दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलाः आणि ‘‘ऐसें कां अव्हेरीलें जी?’’ ऐसें विनउं लागलाः गोसावी विनती न स्वीकरीतिचिः एरा आंबेंयाचेया बुडाखालुनि एरा आंबेंयाखाली जातिः मग तेणें वाट वाटेः दोघ दोघे राखण दृष्टीचि आळवीं घातलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जैसे हें तयांचें काही लागे तैसे यांसि गुपतिया राखणे घातलीः’’ रायें गोसावियांसि दुःख करौनि आरोगणेचे विनविलें: मग गोसावियांसि सोमनाथीचि आरोगणा जालीः तेथचि पहूड जालाः पश्चात पाहारीं उपहुड होएः मां सोमनाथाचिये उतरिली जगतिसी खिडकीः तियें खिडकीहिुनि परिश्रया बिजें केलें: मागुतें जगतिआंत आलेः चैकी आसन जालें: तेधवां रावो मागौता गोसावियांतें विनवावेया आलाः गोसावी विनवणी न स्वीकरीतिचिः मग दुःख करौनि गोसावियांतें आरोगणेचें विनविलें: मग तो तेथचि ताट घेउनि येः मग सिध्दनाथीं आरोगणा होएः तेथचि पहूड होए :।।:
  • (टिप: अचलपूरला स्वामि पहिल्यांदा भांडारेकारासोबर आले होते. यावेळी स्वामि रामदरना राज्या सोबत दुसर्यांदा आले.)
  • Purvardha Charitra Lila –
  • Achalpur : सिमोलंघना बिजें करणे :।।: (अचलपूर)
  • दसरेयाचा दिसी गोसावियांसि मर्दना मादने जालें: पूजा जालीः आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः मग भवरा घोडेयावरि आरोहण जालें: सोनेभरी कबाय घातलीं: पाटाउ दुटीः श्रीमुगुटी सोनेसळाः चुनडीः वरि फुलें: पुढें गोसावियांचा घोडाः मागा रामदरणेयाचा घोडाः तयामागां रामदरणेयाचा परिवारः ऐसें उत्तरेचेनि दारवंठेंनि बिजें केलें: नगराबाहीर तळेयाचिये उत्तरीली पाळीवरि अंबिठा होताः तेथ गोसावी घोडेयाखालुते उतरलें: पांच पोफळें आणि तांदूळ तेयाखाली घातलेः मग ‘‘सोने घेयाः सोने घेयाः’’ म्हणौनि अनुवाद केलाः तेथ काही वेचिलें: मग प्रदक्षिणा केलीः आणि गोसावी बिजें केलें: रामदरणेयाचीया माता गोसावियांसि ओवाळणी केलीः हें चरित्र शोधीचें :।।:
  • Purvardha Charitra Lila –
  • Achalpur : नाचणिया चूकी ठेवणें :।।:
  • सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एकु दी हें गाभारपाहुनि मंडपासी आलें: चैकी आसन जालें: मां हें धूर ऐसें बैसले असेः’’ तवं नाचणीचा अवसर मांडलाः मग तें नाचणी नाचतां हस्तकीं चुकलीः इतुलेनि गोसावी चूकि ठेविलीः मग तें पडघाउ नाचों लागलीः तवं नाचता मुडपावरि गोमासी बैसलीः मग तिया वरान गौस्फूरणवायो साधिला होताः तेणें करौनि तिया तें गोमासी उडविलीः तें कळेसि गोसावी रुप केलें: आणि तोखलेः तेणेंकरौनि तियेसी गोसावी बहुत रूके उचित दिधलेः हे गोष्टि वामदेवांचिया पक्वान्नाउपरि गोसावी बाइसांप्रति प्रतिष्ठानीं सांघितलीः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जरी कळा असे तरि जाण नसेः जाण असे परि उचित नसेः उचित असे परि पाहातां कळाचि नसेः मग उचितत्वाचा पसावो तो कैसा? तियें बाइयेचिया ठाइं कळा असे परि वामदेवापासी दयावेया उचित नाहीं:’’ :।।:
  • (टिप: अचलपूरला स्वामि पहिल्यांदा भांडारेकारासोबर आले होते. यावेळी स्वामि रामदरना राज्या सोबत दुसर्यांदा आले.)
  • Govind Prabhu Charitra Lila – 24
  • Achalpur : उपडौनि द्राक्ष लावणे : ॥
  • गोसावी अळजपुरासि बीजें केलें एका ब्राह्मणांचीए घरी द्राक्ष होती ते गोसावी उपडीली : तेही म्हणीतले ” हा राउळो ! फळते फुलतें झाड का उपचीलें?” तें गोसावीं तीसरा दीसी आणिलें : मग काडिया (काठिया) करुनि उकरीलें : मोळीया रोवीलीया : तीनि चुळ रांजणीचे पाणा घातले : तीही म्हणीतलें : ” राउळो ! हें सुकलें वाळलें : आता हे काइ लागैल” मग गोसावी बीजे केलें : तवं ते तीसरा दीसी फळी फुली घडी मोडत आली : आणि तयाप्ति आश्चर्य जालें : मग म्हणीतलें: “राउळ माए : राउळ बापु : राउळ इस्वर : राउळ करीति ते काइ नव्हे!” ऐसी स्तुति कर लागली : मग गोसावी बीजें केलें ॥२४॥



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: