Shingnapur (शिंगणापूर)

शिंगणापूर, ता. दर्यापूर जि. अमरावती


शिंगणापूर येथील 1 स्थान शिंगणापूर गावातच माळीपूर्यात गावाचे मध्य भागात मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

शिंगणापूर हे गाव, दर्यापूर वलगाव मार्गावर दर्यापूरहन पूर्वेस 19 कि.मी. आहे व वलगावहून नैर्ऋत्येस 24 कि.मी. आहे. लाखपुरी ते शिंगणापूर (दर्यापूर मार्गे) 31 कि.मी. अमरावती ते शिंगणापूर (वलगाव मार्गे) 35 कि.मी. शिंगणापूरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान शिंगणापूर गावाच्या मध्यभागी माळीपुरा विभागात पूर्वाभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रिद्धपूरला जाताना लाखपुरीहन शिंगणापूरला आले. त्यांचे या ठिकाणी सात दिवस वास्तव्य होते. (पू. ली. 154 स्था. पो.) बाइसा व हंसराज यांना सर्वज्ञांनी येथून रिद्धपूरला पुढे पाठविले. सात दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून खोलापूरला गेले. (पू. ली. 155)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. घाटेया हरीभटांच्या आवारातील आसन स्थान.

2. मर्दना स्थान.

3. मादने स्थान.

4. पूजा आरोगणा स्थान.

5. पहूड, उपहुड स्थान.

6. देवळाच्या पूर्वेचे परिश्रय स्थान.

7. गोपाळाचा देऊळी विहरण स्थान.


शिंगणापूरची एकूण स्थाने : 8


  • Purvardha Charitra Lila – 154
  • Shingnapur : सिंगणापूरीं अवस्थान :।।: / कोंडेस्वरीं घाटेया हरीभटा भेटिः स्तीति :।।:
  • गोसावी सिंगणापूरासी बिजें केलेः पद्मेस्वरी आसन जालें: बाइसीं चरणक्षाळण केलें: विडा ओळगवीलाः मग बाइसें हंसराजे पद्मेस्वरी राहिलीः तैसेचि गोसावी कोंडेस्वरा बिजें केलें: सरीसि चांगदेवभट असतिः चौकीं आसन जालें: चांगदेवोभटां स्तीति जालीः तें एकी देउळीं अनुभवीत बैसले होतेः घाटे हरीभट गंगेकडौनि हातीं तांबवटिये उदक तुळसी ऐसें देवते तर्पण करावेया आलेः देउळाचेया गाभारेयाआंत जपत होतेः तवं गोसावियांतें देखिलें: आणि आलेः ‘‘जी जीः गोसावी केव्हळी बिजें केलें?’’ श्रीचरणां लागलें: मग गोसावियांसि तांबवटीचेनि उदकें चरणसिंचन करौनि श्रीचरणांवरि उदक घातलें: श्रीचरणोदक भितरीं घेतलें: माथेयावरि घातलेः तुळसी वाइलीयाः अष्टांगीं तुळसीचें आर्चन केलें: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: श्रीमूर्तिचे अवलोकन करीति पासी बैसलेः आणि गोसावी सुप्रसन्ना लोचनि अवलोकुनी स्तीति संचरिलीः स्तीति जालीः भोगिलीः सुखानंदु अनुभविलाः स्तीति भंगलीः मग गोसावियांतें घरां नेयावया विनविलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पैल देउळीं बटिकु असे तो बोलावाः’’ गेलेः तवं चांगदेवभट बहीरवाचा देउळीं बैसले होतेः स्तीति जाली होतीः तयांचें आसन अंतरीक्ष उपमत असेः वरि कळसी लागत असेः हरीभटी म्हणितलें: ‘‘जीजीः तें देउळाचेनि कळसें कळसें जात असतिः’’ गोसावी मागुते धाडिलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाः एथिचें नांव घेयाः ‘एथौनि बोलाविला अससिः’ ऐसें म्हणाः’’ गेलेः म्हणितलें: ‘‘तुमतें गोसावी बोलावित असतिः’’ आणि स्तीति भंगलीः आलेः दंडवत करौनि स्वसुखानुभवाचें आश्चर्य मानुनि पुसिलें: ‘‘जीः ऐसें काइसेयातवं होएः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथिचेया स्पर्शातवं होएः’’ यावरि गोसावी कुकडीचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘कुकडी असेः तें आंडी घालीः पीली होतिः तेयासि पाखवा देः अमृतकळा असेः तें संचरेः तयातवं तियें वाढति तैसें परमेस्वराचेया स्पर्शातव एका वेध संचरेतिः’’ गोसावी सिंगणापूरांतु हरीभटाचेया घरासि बिजें केलें: तेहीं आसन रचीलें: गोसावी आसनी उपविष्ट जालें: गोसावी चांगदेवभटातें म्हणितलें: ‘‘बटीकाः बाइसातें बोलावाः’’ मग चांगदेवभट बाइसाः हंसराजातें बोलाउनी घेउनि आलेः मग मर्दना मादनें: पूजावीधि केलाः मग बरवें कुशळता ताट केलें: भक्तिजनासहित आरोगणा जालीः विळीचां मागुती हरीभटा स्तीति जालीः भोगिलीः भंगलीः मग पद्मेस्वरा बिजें केलें: तेथ वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी विसैये-आलेगाव-पातुर-एळवन-लाखापुरीवरुन सिंनापूर येथे आले व पुढे रिद्धपूरकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 155
  • Shingnapur : बाइसें हंसराज रीधपूरा पाठवणें :।।:
  • एरे दिसीं उदेयांचि गोसावी बाइसांतें म्हणितलें: ‘‘बाइः श्रीप्रभुचेया दरीसनातुम्हीं हंसराज पुढां जाः आजी वांकियेचां हाटुः श्रीप्रभुलागी वांकिये एकी आसूचें वस्त्र घेयाः एथ तिन्ही पूजावसर करीतां तैसें श्रीप्रभुचां ठाइं करावेः वाडवेळ श्रीचरणावरि माथा न ठेवावाः बहीरवीं बिढार करावेः दुरौनि दृष्टीचिये आळवी श्रीप्रभुची सेवा करावीः प्रवृत्ति भंगो नेदावीः तुम्ही परमेस्वरपूरा पावाना तवं हें मागिलाकडौनि येइलः’’ बाइसें हंसराज पुढां गेलीः गोसावी पद्मेस्वरींहुनि कोडेस्वरवरि अनुवर्जन केलें: पुढा कोनटेयापासी राहिलेः तिहीं वांकिये वस्त्र घेतलें: मग रीधपूरा गेलीः श्रीप्रभुसि दरीसन जालें: यथावीधि भेटि सारिलीः जवं श्रीप्रभुचा सन्निधानि होती तवं गोसावी विहिला जो वीधि तो श्रीप्रभुचां ठाइं यथोक्त आचरति :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी विसैये-आलेगाव-पातुर-एळवन-लाखापुरीवरुन सिंनापूर येथे आले व पुढे रिद्धपूरकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 156-157
  • Shingnapur : चांगदेवोभटां स्तीति: खडखांबुला खेळु :।।: / चांगदेवोभटां स्तीतिः साधनवीधि निरूपण :।।:
  • गोसावी विहरणा कोटेस्वरा बिजें केलें: चौकीं आसन जालें: घाटे हरीभट गंगेसि कर्मवीधि सारूनि कोटेस्वरा आलेः गोसावियांसि दंडवतें घातलें: मग कोटेस्वरासि नमस्कार करौनि गोसावियांपासी बैसलेः मग म्हणितलें: ‘‘जी गोसावी आमचां गृहीं उपहार करावाः’’ गोसावी मानिलेः निमंत्रण देउनि गृहा गेलेः पाकनिष्पत्ति करविलीः उरकलेयानंतरें बोलाउं आलेः दंडवत करौनि म्हणितलें: ‘‘जी बिजें करावें:’’ मग गोसावी तयाचेया गृहासि बिजें केलें: श्रेष्ठासन घातलें: मग अर्घपाद्ये करौनि चरणोदक घेउनि मस्तकीं वंदिलें: गंधक्षता करौनि विडा ओळगवीला मग ओलनि ओळगवीलीः मर्दना मादने पूजा आरोगणा गुळळा विडा जालाः चांगदेवभटां हरीभटां पांती प्रसाद जालाः गोसावी कोटेस्वरासि बिजें करूं आदरिलें: तेव्हेळी हरीभटीं विनविलें: ‘‘जी जीः जवं गोसावी असतितवं एथचि प्रसाद पहूड करावाः मज सन्निधान होइलः’’ गोसावी मानिलें: गोसावियांसि तयांचां गृही त्रिरात्र पंचरात्र अवस्थान जालें: गोसावियांसि प्रतिदीनी हरीभटांचां घरीं आरोगण होएः गुळळाः विडा होएः तेयांचेचि घरीं पहूड स्वीकरीतिः निच चांगदेवोभट भिक्षा करौनि पद्मेस्वरा जातिः गोसावी तेथ बिजें करीतिः झोळी दृष्टीपूत करीतिः मग जेवीतिः तिये दिसीं चांगदेवभट भिक्षा करौनि आलेः गोसावियांसि झोळी दृष्टीपूत नव्हेचिः म्हणौनि झोळी काठिये घातलीं: काठी टेकुनी ठेविलीः अस्तमान जालें: परि गोसावी बिजें न करीतिचिः आणि दृष्टीपूत केलेयांवांचैनि तें भोजन न करीतिः मग गोसावी निर्मळ स्तीतिसुख संचरिलें: आणि स्तीति जालीः तैसेचि खडखांबुला खेळों लागलेः एरा खांबापासौनि एरा खांबापासी जातिः एरा खांबीहूनि एर खांबी सिवीतिः ऐसें चार्‍ही पाहार सवेळवेर्‍हीं पटिशाळेचीयां चहु खांबाभवंते भवंत होतेः तवं दिसु निगालाः उदेयाचि गोसावी परिश्रया बिजें केलें: गोसावी परिश्रय सारिलाः तैसेचि देऊळासि तयाजवळी बिजें केलें: तयाची क्रीडा/कृडा देखौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइ बटीकाः खडखांबुला खेळत असा?’’ आणि तेहीं ऐसें पाहीलेः मग गोसावीयांतें देखिलें आणि म्हणितलें: ‘‘जी जीः’’ आणि स्तीतिसुख आकर्षिलें: स्तीति भंगलीः आलेः दंडवत घातलें: श्रीचरणां लागलें: आपुलीये कंथेयाचें आसन रचीलेः गोसावी आसनीं उपविष्ट जालें: आणि पुसिलें: ‘‘बटिकाः रात्री जेविलेति?’’ तेही म्हणितलें: ‘‘जी नाहीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कां नाहीं?’’ तेही म्हणितलें: ‘‘ना जीः गोसावियां झोळी दृष्टीपूत करावी होतीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आणा पां आरूतीः’’ गोसावी झोळी आणविलीः अवलोकिलीः तवं साधन काही नाहीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः हें काइः साधन काही नाहीं: रूक्ष असे मां:’’ तेही म्हणितलें: ‘‘जी जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि एथ सांघाचिनाः एथ म्हणिजे हो बटिकाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘गोसावियांचि मागावयासि अनुज्ञा नाहीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः भिक्षा करीतां साधन काही आपजविजेः साक वरण मागावें: रूक्ष अन्न न जेवावें: सेवटिली कां संभवाचां घरीं सीः बी चुळः चिमुटीः या चै मध्यें न गमे तरि एकाधा एकु ठावो आपजविजेः बटिकाः जेवाः जाः’’ तेही म्हणितलें: ‘‘पाणी नाहीं जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः तुम्हीं महात्मे कीं गाः एकी गावीं जेविजेः एकि गावीं आंचविजेः बटिका अन्न मिळे तेव्हेळी अन्न खाइजेः पाणी मिळे तेव्हेळी पाणी पीजेः ऐल थडी जेविजेः पैल थडी आचविजेः जा जेवाः पैल नदीसी आचवाः तुम्हां आगळी उदक घेवो न येः’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि तें गेलेः तेहीं जेवण केलेः आलेः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिका भुकैलेति कीं?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी समाधानेंचि होतों: सुखातिशें खेळत होतों: क्षुधा काइसीं जी?’’ याउपरि गोसावीं मातेचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘कव्हणी एकी माता असेः तें लेंकुरवातें निजउनी कांडू जाएः कां दळू जाएः मोटका पान्हा ये आणि तें जाणें: ‘ते भुकैलें असैलः’ मग येउनि तयासि स्तनपान देः तैसें परमेस्वर आणिकें देशीं राज्य करीत असतिः आणि आर्त आणिके देशी असेः तयाची आर्ति जाणौनि आपण पूरवीति कां कव्हणा एकाकरवी पूरवीतिः’’ मग चांगदेवभट श्रीचरणां लागलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी विसैये-आलेगाव-पातुर-एळवन-लाखापुरीवरुन सिंनापूर येथे आले व पुढे रिद्धपूरकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 158
  • Shingnapur : पद्मेस्वरीं अवस्थानः रात्रीं भिक्षान्न व्याळी करणे :।।:
  • मग गोसावियांसि तेथचि पद्मेस्वरीं अवस्थान जालें: दिस सातः ऐसें जवं अवस्थान जालें तवं गोसावियांसि दुपाहारीची पूजा आरोगणा हरीभटाचां घरी होएः तेयाचेचि घरी दुपाहाराचा पहूड स्वीकरीतिः विळीचां चांगदेवभट भिक्षा करीतिः कदाचित तेयांचां घरीहूनि दधिभात आणीतिः झोळी दृष्टीपूत करीतिः व्याळीएकारणें विनवीतिः मां बरवे बरवे पदार्थ निवडीतिः गोसावियांसी व्याळी होए :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी विसैये-आलेगाव-पातुर-एळवन-लाखापुरीवरुन सिंनापूर येथे आले व पुढे रिद्धपूरकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: